दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपुरात

दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपुरात
संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे यांची निवड

कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी काही संबंध उरला आहे किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी, कृषिजगताला भेडसावणार्‍या समस्यांची मराठी साहित्यविश्वासोबत सांगड घालण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी आणि मराठी साहित्यक्षेत्राकडून कृषिजगताला असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी २० आणि २१ फ़ेब्रुवारी २०१६ ला नागपूर येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात दोन दिवसाचे दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे.

या संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक माजी प्राचार्य रा.रं. उर्फ़ रावसाहेब बोराडे भूषविणार असून संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार श्री सुरेश द्वादशीवार यांचे हस्ते संपन्न होईल. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी आमदार व शेतकरी नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी जबाबदारी स्वीकारली असून उद्‍घाटन सत्राला एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मागील काही वर्षापासून शेतकरी आत्महत्यांनी विक्राळरूप धारण केले आहे परंतू प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फ़ारसा उहापोह आणि उपाययोजना शोधण्यासाठी शर्थीच्या हालचाली होताना दिसत नाही. अगदी साहित्यक्षेत्र सुद्धा याप्रश्नाकडे गंभीरतेने पाहत आहे आढळून येत नाही. गेल्या १५-२० वर्षांमध्ये देशात लक्षावधी शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याचे प्रतिबिंब साहित्यात प्रभावीपणे उमटलेले आढळत नाही. शेतकरी आत्महत्यांवर सर्वंकश प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेणारे, शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे आणि त्यावर आवश्यक उपाययोजनांची चाचपणी करून जाणिवा समृद्ध करणारे पुस्तक मराठी साहित्यविश्वात उपलब्ध नसणे ही बाब मराठी साहित्यक्षेत्राचे खुजेपण दर्शविणारी आहे.

साहित्यक्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणार्‍या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच केवळ मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.

दोन दिवस चालणार्‍या या संमेलनात आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शासकीय धोरण, मराठी साहित्यावर शेतकरी चळवळीचा प्रभाव, शेतकरी आत्महत्या : कारणे व उपाय, शेतकरी आत्महत्या पत्रकारितेच्या नजरेतून, शेतीसाहित्यातील ग्रामीण स्त्रीचे स्थान, चालू दशकातली शेतकरी कविता, शेतीच्या मुक्तीसाठी मार्शल प्लॅनची गरज अशा विविध विषयावरील एकूण ७ परिसंवाद राहणार असून या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक मा. बाबाराव मुसळे, डॉ शेषराव मोहिते, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, संजय पानसे, शेतकरी नेते रवी देवांग, गुणवंत पाटील, सरोज काशीकर, प्रज्ञा बापट, शैलजा देशपांडे, गीता खांदेभराड, कडुआप्पा पाटील, संजय कोले, शेतीविषयाचे गाढे अभ्यासक डॉ दिलीप बिरुटे, प्रा. डॉ. डी.एन राऊत, गोविंद जोशी अजित नरदे, अनिल घनवट इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार आहेत.

नवसाहित्यिकांना शेतकरी आत्महत्यांच्या दाहक वास्तवाची जाणीव व्हावी म्हणून “शेतकरी आत्महत्या पत्रकारितेच्या नजरेतून” हा विशेष परिसंवाद ठेवण्यात आला असून परिसंवादात विदर्भातील ज्येष्ठ, व्यासंगी व अनुभवी पत्रकार भाग घेणार आहेत. हे या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असणार आहे.

संमेलनात शेतकरी गझल मुशायरा व शेतकरी कवी संमेलन असे दोन स्वतंत्र सत्र ठेवण्यात आले असून कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान प्रा. ज्ञानेश वाकुडकर भूषवतील. या संमेलनात शरद जोशी विशेषांक, प्रातिनिधिक शेतकरी काव्यसंग्रह व गंगाधर मुटे लिखित नागपुरी तडका या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. रात्री १०.०० वाजता नवनाथ पवार लिखित, स्वप्नील शिंदे दिग्दर्शित व स्वप्न, पुणे व्दारा निर्मित तुला कसला नवरा हवा ही एकांकिका सादर केली जाईल.

या संमेलनात महाराष्ट्रासोबतच देश-विदेशातील १००० पेक्षा जास्त मराठी भाषिक प्रतिनिधी, नामवंत साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत सहभागी होतील, असा मला विश्वास आहे.
गंगाधर मुटे
कार्याध्यक्ष
दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 

शेतकरी साहित्य संमेलन
*********
शेतकरी साहित्य संमेलन
*********
शेतकरी साहित्य संमेलन
*********
शेतकरी साहित्य संमेलन
*********
शेतकरी साहित्य संमेलन
*********
शेतकरी साहित्य संमेलन
*********
शेतकरी साहित्य संमेलन
*********

“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा…!

“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा…!

शेतमालाचे भाव वाढले की
आमचा जळफळाट होतो…कारण
आमच्या मनात दडी मारून
बसला आहे एक रावण

आमच्या मनातल्या रावणाला
सीता पळवून न्यायची असते
भूमीतून निपजलेल्या वस्तूंची
किंमत मोजायचीच नसते

आमची मानसिकता रावणीच
संधी मिळताच जागी होणारी
पोशिंद्याला सदैव अशोकवनात
बंदिस्त ठेवू पाहणारी

कधी मरेल हा रावण
तुमच्या-आमच्या मनातला?
आणि कधी होईल मुक्त
बळीराजा रानातला?

रावणी मनोवृत्तीचे दहन व्हावे
अशी बाळगू ‘अभय’ इच्छा
नंतरच देऊ एकमेकांना
“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा…!

                        – गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

औंदाची शेती : रेकॉर्डब्रेक शेती

औंदाची शेती : रेकॉर्डब्रेक शेती

       अपवाद हा अपवादात्मकच असतो म्हणून त्याचे व्यावहारिक महत्वही अपवादत्मकच असले पाहिजे. अपवादानाने घडणार्‍या अपवादात्मक घटनांचा सर्वसाधारण घटनांशी संबंधसुद्धा अपवादानेच जोडला पाहिजे, अपवादात्मक घटनांचा साध्य आणि सिद्धतेशी सांगड घालण्याचा प्रयत्नही अपवादात्मकच असला पाहिजे, असा धडा मला माझ्या औंदाच्या शेतीने दिला आहे.

       होतं काय की बर्‍याचदा अपवादानेच एखाद्याला ढोबळी मिरचीचे प्रचंड उत्पादन येते. पण या अपवादाला एखादा “उंटावरचा शेतकरी” स्वत:ची यशस्विता समजून घेतो आणि रस्त्याने जो मिळेल त्याला “यशोगाथा” सांगत सुटतो. एखाद्याला एखादे वर्षी मक्यासारख्या पिकाला चांगला भाव मिळतो, तोही अपवादानेच. पण तरी सुद्धा तो शेतकरी जर “उंटावरचा” असेल तर स्वत:च्याच तोंडाने स्वत:चेच पोवाडे गात सुटतो. यावर कुणी असेही म्हणेल की “आम्हाला अपवादाने नव्हे तर बुद्धीचातुर्याने यश मिळाले आहे”. त्यावर सरळसोपे उत्तर असे की त्याने निदान सलग चार वर्षाचा त्याच्या शेतीचा बिल-पावत्यासह ताळेबंद सादर करून दाखवावा. जर चारही वर्ष समान गुणोत्तर आढळले तर मी माझी सारी लेखनगाथा आपल्या विचारधारेसह समुद्रात नेऊन विसर्जित करायला तयार आहे.

       पण आव्हान कोणी स्विकारायला तयार नसते कारण वास्तव तसे नसतेच. एखाद्या वर्षी चांगले उत्पादन येते हे खरे; परंतू अनेक वर्ष शेतीतला तोटा भरून काढताना शेतकर्‍याला त्याच्या बायकोच्या अंगावरील मंगळसूत्र विकावे लागते, हे शेतीमधले शाश्वत सत्य झाले आहे, हे कोण नाकारू शकेल? अनेक “कृषिनिष्ठ” शेतकर्‍यांना बॅंकेतून कर्ज काढल्याशिवाय स्वत:च्या बायकोला वस्त्र आणि अंतर्वस्त्र घेताच येत नाही, हे मी पुराव्यासहीत केव्हाही सिद्ध करून दाखवायला तयार आहे. तद्वतच या “यशोगाथा”वाल्यांचा मागील फ़क्त दहा वर्षाचा इतिहास तपासावा, त्याचे पोट शेतीव्यतिरिक्त अन्य व्यवसायावर अवलंबून नसेल, त्याला चोर्‍या करण्याची सवय नसेल, व्याज-बट्ट्याची गावठी सावकारी नसेल आणि फ़क्त शेती हेच जर त्याच्या उपजिविकेचे साधन राहिले असेल तर त्याचीही अवस्था यापेक्षा वेगळी आढळून येणार नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो.

       मी १९८५ साली शेती सुरू केली. तेव्हापासून नाना तर्‍हेचे प्रयोग करून झाले. उभा महाराष्ट्र पालथा घालून झाला. देशाच्या कानाकोपर्‍यातली शेती आणि शेतीची पद्धत न्याहाळून झाली. मिशीला पीळ देत मोठमोठ्या बढाया मारणार्‍या पाटलाचे माजघर पाहून झाले आणि अशा पाटलाच्या माजघरात शिरल्यावर त्याच्या गळलेल्या मिशाही पाहून झाले. विदर्भातील शेतकर्‍यांपेक्षा पश्चिम महाराष्ट्रातला द्राक्ष, उस उत्पादक शेतकरी दहापट जास्त कर्जबाजारी आहे, हेही पाहून झाले. 

        हे सांगायचे औचित्य असे की, यावर्षी सार्वत्रिक नापिकी आहे. यंदा शेतीव्यवसायात सर्वत्र हाहाकार माजला असताना व दुष्काळाने शेतीउत्पादनात प्रचंड घट आली असताना माझी औंदाची शेती मात्र याला अपवाद ठरली आहे. या मला विक्रमी उत्पादन झाले व माझ्या स्वत:च्याच शेतीतील उत्पादनाचे ३० वर्षाचे रेकॉर्ड मोडले गेले आहेत. पण मागील वर्षी कमी उत्पादन होऊनही घरात जेवढा पैसा आला तेवढाही पैसा यावर्षी घरात आलेला नाही कारण तूर वगळता अन्य पिकाचे बाजारभाव मागील वर्षी पेक्षा यावर्षी कमी आहेत.

       अधिक उत्पादन घेतल्याने अधिक फ़ायदा होतो, असे फ़क्त कागदीतज्ज्ञच म्हणू शकतात. प्रत्यक्ष शेती करून शेती उत्पन्नावरच जगून पाहिल्याशिवाय किंवा दुसर्‍याच्या शेतीच्या जमाखर्चाचा गणीतीय ताळेबंद मांडल्याशिवाय कुणालाच (अगदी ब्रह्मदेवालासुद्धा) शेतीचे अर्थशास्त्र कळू शकत नाही, हे माझे मत पुन्हा एकदा अधिक ठाम झाले आहे. 

       तसा हा विषय व गणीत साधे, सोपे आणि सरळ आहे. पण शेतीविषयात हात घालू इच्छिणारांमध्ये एक अनुवंशीय खोट आलेली असते. ती खोट अशी की शेतकर्‍याला गाढव गृहीत धरणे व जेवढी अक्कल मला आहे तेवढी अक्कल शेतकर्‍याला नसते, अशी स्वत:ची ठाम समजूत करून घेणे. त्यामुळेच शेतीव्यवसायाच्या उत्थानासाठी “शेतीमालाच्या भावाला” बगल देऊन अन्य गृहितके “उंटावरच्या शहाण्यांकडून” मांडली जातात.
मला यावर्षी रेकॉर्डब्रेक उत्पादन झाले यामागे माझे नियोजन, परिश्रम, आर्थिक गुंतवणूक वगैरे बाबींचा अंतर्भाव नक्कीच आहे, याबाबत दुमत नाही; पण एवढे मी यापूर्वीही केलेले आहे, करत आलेलो आहेच. मग एवढे उत्पादन या पूर्वी का झाले नाही? याचे उत्तरही तसे फ़ार सोपे आहे. शेतीचा संबंध थेट निसर्गाशी आहे आणि निसर्ग विविधतेने नटलेला आहे. एकवर्ष दुसर्‍या वर्षासारखे कधीच नसते, पाऊसमान प्रत्येकवर्षी समान असू शकत नाही. दर चार वर्षातून एकदातरी ओला अथवा कोरडा दुष्काळ नक्कीच पडणार, चारवर्षातून एकदा तरी गारपीठाचा वर्षावही हमखास होणार. त्यामुळे शेतीमध्ये उत्पादन घेण्यासाठी खर्च सारखाच केला तरी दरवर्षी उत्पादनाचा आकडा सारखाच राहील हे कदापीही शक्य नाही. त्यामुळे शेतीमध्ये चार वर्षाच्या उत्पादनाची गोळाबेरीज करून त्याला चारने भागूनच वार्षिक उत्पादनाची सरासरी काढली गेली पाहिजे आणि हेच यावरचे एकमेव उत्तर आहे.

                शेतीत सधनता आणणे अजिबात कठीण नाही पण शेतीत सुबत्ता यावी, हीच अनेकांची आंतरिक इच्छा नसते. त्यामुळे “शेतीमालाचा भाव” हा प्रमुख मुद्दा सोडून अन्य पर्याय सुचविण्याचे व तेच अधिक ताकदीने मांडण्याचे कार्य अनेकांकडून अव्याहतपणे मांडले जाते. त्यामागे मूळ मुद्द्यावरील लक्ष दुसरीकडे वळवणे, हा छुपा डाव असतो. शेतकरी पुत्रांनी हा डाव ओळखला पाहिजे. शेतकरीविरोधी धोरणांच्या पुरस्कर्त्यांच्या सापळ्यात अलगद फ़सण्यापासून स्वत:ला वाचविले पाहिजे.

– गंगाधर मुटे

—————————————————————————————
 sheti
यंदाची सुरुवातच खतरनाक झाली. मातीत बियाणं पडलं आणि वरुणराजा दिर्घ रजेवर गेला.

*********************************
sheti

तुषार सिंचन – दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रकार

*********************************
sheti

पाऊस येईल तेव्हा येईल.. त्यासाठी पेरणी थांबवणे शक्य नसते.

*********************************
sheti

पेरते व्हा! पेरते व्हा!!

*********************************
sheti

पावसाची शाश्वती नसतानाही आपले सर्वस्व मातीच्या स्वाधीन करण्याची कणखरता फ़क्त शेतकर्‍याकडेच असते.

*********************************
sheti

भुईला दिली ओल नाही ढगाने
कसे अंकुरावे अता हे बियाणे?

*********************************
sheti

मात्र तणाला फ़ारच जोर

*********************************
sheti

*********************************
sheti

*********************************
sheti

वादळवार्‍यामुळे गव्हाच्या उत्पादनात सुमारे ३० टक्के घट आली.

*********************************
sheti

नवे तंत्रज्ञान वापरायचे?
(शेतमजुरांचे काय होईल, असा प्रश्न कुणालाच पडत नाही)

*********************************

हवा’मान’ खात्याचे वर्त’मान’

                  गेल्या ४-५ दिवसापासून पावसाची कधी रिपरिप तर कधी सततधार सुरू आहे. हवा’मान’ खात्याचे सारे अंदाज खोटे ठरवीत पावसाने हवा’मान’ खात्याला ‘मान’ खाली घालावयास भाग पाडलेले आहे. तशीही हवा’मान’ खात्याची ’मान’ फ़क्त ताप’मान’ वर्तवण्यापुरतीच ताठ असते. पर्जन्य’मान’ वर्तवताना त्यांचे अनु’मान’ नेहमीच ’मान’ पायाखाली दुमडून उताणे झोपत असते. त्यामुळे शेतकर्‍यांनी स्वत:च्या द’मानं’च घेतलेलं बरं! हवा’मान’ खात्यावर विसंबून आणि आपली ’मान’ हवा’मान’ खात्याच्या मांडीवर ठेवून शेतकर्‍यांनी आपला वर्त’मान’ बिघडवून घेण्यात काहीही अर्थ दिसत नाही.

                  बाहेर पाऊस पडत आहे आणि मी आतमध्ये बसून पेपर चाळत आहे. ’एल-निनो’ ’वृक्षतोड’ या संबंधित एकही बातमी दिसत नाही. कुत्री केकाटण्याचे जसे उत्तरा नक्षत्र असते तसेच ’एल-निनो’ ’वृक्षतोड’ सारखे शब्द उच्चारून केकाटणार्‍यांचे रोहिणी नक्षत्र असते. कधी-कधी पावसाचे आगमन लांबलेच तर ’एल-निनो’ ’वृक्षतोड’ च्या नावाने केकाटणेही थोडेफ़ार लांबत असते. मात्र एकदाचा पाऊस कोसळला की गाढवाच्या सिंगाप्रमाणे हे केकाटणारेही प्रसिद्धीमाध्यमातून गायब होऊन जातात.

                  पावसाचे आगमन लांबले तर त्याला पर्यायी काही उपाय सांगता आलेत तर ते सांगणे उपयोगाचे ठरू शकते पण हे तज्ज्ञ पर्याय सांगण्याऐवजी पाऊस लांबण्याची कारणमिमांसा व्यक्त करण्यात धन्यता मानतात. ज्याचा शेतीला आणि शेतकर्‍याला कवडीचाही उपयोग नसतो.

                  पाऊस किती पडला यापेक्षा तो कसा पडला, यावर शेतीचे पीकपाणी अवलंबून असते, हे साधेसुधे कोडे देखील आमच्या तज्ज्ञांना अजूनपर्यंत उमगलेले नाहीये. यांची भाषा अजूनही पावसाची वार्षिक सरासरी याभवतीच पिंगा घालत आहे. एखाद्या वर्षी पावसाची सरासरी काय होती, ती १००% होती, १५०% होती कि ५०% टक्केच होती यावर पीकपाण्याची-उत्पादनाची शक्यता ठरत नाही. एखादेवर्षी जर २०% किंवा ३०% च पाऊस पडला; पण तो जर थोडा-थोडा आणि नियमित कालावधीत पडत राहिला तरी कोरडवाहू शेतीमध्ये भरघोस उत्पादन येऊ शकते. याऊलट एखादेवर्षी १००% सरासरी पाऊस पडला पण कमी दिवसात/कमी कालावधीत मुसळधार पडला तर कोरडा किंवा ओला दुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण होऊन शेतीच्या उत्पादनात प्रचंड घट येऊ शकते आणि नेमके एवढे साधे गमक सुद्धा अजूनपर्यंत हवामान तज्ज्ञांना गवसायचे बाकीच आहे. मुलभूत ज्ञानाचा पायाच जर अव्यवहार्यतेवर आधारला असेल तर कसले बोडक्याचे संशोधन करणार? अशा संशोधनाची आणि सल्याची उपयोगीता तरी काय असणार आहे?

आणि म्हणूनच

हवामान तज्ज्ञ शेतीच्या दृष्टीने शोकेसचे जिन्नस झाले आहे, असे वाक्य उच्चारले तर ते चुकीचे ठरणार नाही.

                                                                                                                    – गंगाधर मुटे
———————————————————————————————————-

शरद जोशी पुन्हा रणांगणात उतरणार!

शेगाव येथील संयुक्त कार्यकारिणीच्या बैठकीचा वृत्तांत

             दिनांक १० जुलै २०१४ ला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत देशातील एकूण राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि पुढील आंदोलनाची रणनीती ठरविण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटनेची बलस्थाने असलेल्या काही मोजक्या जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

Sharad Joshi

             राज्यावर येऊ घातलेले दुष्काळाचे सावट, दुबार पेरणीचे उद्भवलेले संकट त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍याची परिस्थिती बघता पीककर्ज, वीजबील, हमीभाव यासंदर्भात महत्त्वपूर्ण आणि सांगोपांग चर्चा करण्यात आली.

Sharad Joshi

आंदोलनाची दिशा : 

             बैठकीला संबोधित करताना मा. शरद जोशी म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुल्यांची एका बाबतीत चूक झाली, त्यांनी असे मानले की ब्राम्हण-भटजी कारकुनांऐवजी जर शेतकर्‍याच्या जातीचे, त्यांच्या नात्यागोत्यातले कारकून आलेत तर ते शेतकर्‍यांशी जास्त सहानुभूतीने वागतील आणि पिळवणूक कमी होईल पण आता क्रित्येक ठिकाणी भट कारकून गेलेत आणि त्यांच्या ऐवजी शेतकर्‍याच्या जातीचे कारकून आलेत, पण शेतकर्‍यांची पिळवणूक काही कमी झाली नाही, याउलट ते भटकारकुनांपेक्षा जास्त जोमाने व ताकदीने दुष्टपणे पिळायला लागले आहेत.
             मी १९८० सालच्या भाषणात सांगत असे की, साखर, कांदा, बटाटा ही काही जीवनावश्यक वस्तू आहे काय? साखर, कांदा, बटाटा खाल्ला नाही तर माणूस मरत असतो काय? उलट साखर खाल्ल्यामुळे लोकांना डायबिटीस व्हायची भिती असते. डायबिटीसने मरण्याची शक्यता असते. उलट औषधाच्या गोळ्या माणसाचा जीव वाचवतात पण औषधाच्या गोळ्यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश नाही. काँग्रेसही तेच करत होती आणि नरेंद्र मोदी तुमच्या-आमच्या शेतकर्‍यांच्या जातीचे असले तरी तेच करत आहेत. त्यामुळे आता आपल्याला आंदोलनाच्याच मार्गाने जावे लागणार आहे.

             नाशिक येथे ३ ऑगष्टला पुंजाभाऊ खोत यांच्या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा आहे, या कार्यक्रमात मी पुढील आंदोलनाची घोषणा करणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक येथेच ४ ऑगष्टला कांदा उत्पादक शेतकरी मेळावा आहे. कांदा व बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून काढून टाकावा यासाठी, सत्ताधार्‍यांना हादरा बसेल असे आंदोलन मी जाहीर करणार आहे. मी शरीराने थकलो असलो तरी मनाने थकलेलो नाही. रस्ता रोको आणि रेल्वे रोको आंदोलनाचे प्रत्यक्ष रणांगणात उतरून मी नेतृत्व करेन, असेही शरद जोशींनी जाहीर केले.

अर्थसंकल्प २०१४-१५ :

             शेती आणि शेतकरी यांच्यासाठी हा अर्थसंकल्प निराशाजनक व डोंगर पोखरून उंदीरही निघू नये असा आहे. ‘भारत’ आणि ‘इंडिया’ यांच्या लढाईत भारत पराभूत झाला आहे. दुस-या महायुद्धानंतर युरोपातील राष्ट्रांच्या पुनरुत्थानासाठी ज्याप्रमाणे ‘मार्शल प्लान’ अमलात आणला गेला त्याप्रमाणे, शेतक-यांना शेती करण्यास हुरूप वाटेल अशा प्रकारच्या इंडियन मार्शल प्लानची आवश्यकता आहे. असा काही प्लान सरकारचा समोर असल्याचे दिसत नाही. शेतीसंदर्भात या अर्थसंकल्पात काही रस्ते आखून दिले आहेत; त्यावर मार्गक्रमण कसे होते ते बघावे लागेल. अशी प्रतिक्रिया केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्प २०१४-१५ वर बोलताना शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी व्यक्त केली.

Sharad Joshi

शरद जोशी यांची जामिनावर सुटका :

             शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांची बुधवारी न्यायालयाने जामिनावर सुटका केली. सन २०१० साली शेगाव येथे एका कार्यक्रमात चिथावणी देणारे भाषण केल्याने शेतकर्‍यांनी शेगावात रेल रोको केल्याच्या त्यांच्यासह ९ जणांवर आरोप आहे.

             ११ ऑक्टोंबर २०१० साली शेगाव येथे शेतकरी संघटनेने शेतकर्‍यांचा मेळावा आयोजित करण्यात आले होते. स्व.गजाननदादा पाटील मार्केट यार्डात पार पडलेल्या या मेळाव्यात शेतकरी नेते शरद जोशी यांनी आपल्या भाषणातून शेतकर्‍यांना लगेच रेल रोको सुचविल्या नंतर हजारो शेतकर्‍यांनी शेगावचे रेल्वेस्थानक गाठून ३ तास रेल रोको केले. या प्रकरणात शरद जोशी यांच्या सह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी वामनराव चटप, रवी देवांग, नामदेव जाधव, अनिल घनवट, सरोज काशीकर, शैलेजा देशपांडे आणि कैलास फाटे अशा ९ जणांविरुद्ध शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते.
             तेव्हा पासून या प्रकरणातील ४ आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार होते. बुधवारी या फरार आरोपींपैकी शरद जोशी, वामनराव चटप, रवी देवांग हे पोलीस स्टेशनला हजर झाल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. समाधान कणखर रा. वरखेड यांनी शरद जोशी यांची जामीन घेतली. या प्रकरणात अनिल घनवट रा. श्रीगोंदा जि. अहमदनगर हे आरोपी सद्या फरार घोषित केले आहेत.

                 याच बैठकीत मा. शरद जोशी यांनी शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या नव्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. कार्यकारिणी पुढील प्रमाणे;

स्वतंत्र भारत पक्ष : महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी पुढील प्रमाणे;

१ श्री. अ‍ॅड दिनेश शर्मा (वर्धा)                                 प्रदेशाध्यक्ष

२ सौ. सरोजताई काशीकर (वर्धा)                          प्रदेशाध्यक्ष (महिला आघाडी)

३ श्री. सुधीर बिंदू (परभणी)                                   प्रदेशाध्यक्ष (युवा आघाडी)

४ श्री. गंगाधर मुटे (वर्धा)                                       महासचिव

५ श्री. अनिल धनवट (नगर)                                 उपाध्यक्ष

६ श्री. समाधान कणखर (बुलडाणा)                       उपाध्यक्ष

७ श्री. गुलाबसिंग सुर्यवंशी (धुळे)                          उपाध्यक्ष

८ श्री. उत्तमराव वाबळे (हिंगोली)                         उपाध्यक्ष

९ श्री. प्रभाकर दिवे (चंद्रपूर)                                  उपाध्यक्ष

१० श्री. विजय निवल (यवतमाळ)                         उपाध्यक्ष

११ श्री. महमूद पटेल (सोलापूर)                             सचिव

१२ श्री. दिलीप भोयर (अमरावती)                         सचिव

१३ श्री. शिवाजी शिंदे (नांदेड)                                सचिव

१४ श्री. निवृत्ती कर्डक (नाशिक)                           सचिव

१५ श्री. श्रीकृष्ण उमरीकर (परभणी)                      प्रसिद्धीप्रमुख

१६ श्री. संजय पानसे (मुंबई)                                कोषाध्यक्ष

१७ सौ. अंजलीताई पातुरकर (हिंगोली)                 प्रचार प्रमुख

१८ श्री अ‍ॅड प्रकाशसिंह पाटील (औरंगाबाद)           प्रचार प्रमुख

१९ सौ. जोत्स्नाताई बहाळे (अकोला)                    कार्यकारीणी सदस्य

२० श्री. सतिश देशमुख (अकोला)                          कार्यकारीणी सदस्य

२१ श्री. सुनिल शेरेवार (अमरावती)                        कार्यकारीणी सदस्य

२२ श्री. राजेंद्रसिंह ठाकूर (गडचिरोली)                    कार्यकारीणी सदस्य

२३ श्री. आनंद पवार (परभणी)                              कार्यकारीणी सदस्य

२४ श्री. बाबुराव गोरडे (जालना)                             कार्यकारीणी सदस्य

२५ श्री. कडुअप्पा पाटील (जळगाव)                       कार्यकारीणी सदस्य

२६ श्री. शीतल राजोबा (सांगली)                            कार्यकारीणी सदस्य

२७ श्री. माधव मल्लेशे (लातूर)                              कार्यकारीणी सदस्य

२८ श्री. विठ्ठल पवार (पुणे)                                     कार्यकारीणी सदस्य

***********************

***********************

स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही – भाग १

स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही – भाग १


              “येत्या २४ तासात विदर्भ, मराठवाडा आणि प. महाराष्ट्रासह कुठेकुठे मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून त्यापुढील ३६ तासात हवामानामध्ये फ़ारसा बदल संभवत नाही” अशी उद्‍घोषणा आकाशवाणी किंवा दूरदर्शनवर झाली तरी पावसाचे दर्शन होईलच याची खात्री देता येत नाही. कधीकधी २४ अथवा ३६ तासच काय ४८ अथवा ७२ तास उलटून जातात पण आकाशात कापसाच्या बोंडाएवढाही तुकडा दुर्बिनीने शोधूनही नजरेस पडत नाही. मात्र याउलट “पुढील ४८ तासात आकाश निरभ्र राहून स्वच्छ ऊन पडेल,” असा आकाशवाणी/दुरदर्वशनर व्यक्त केला गेलेला अंदाज ऐकून जर एखाद्याने आपल्या लहानग्या मुलास शेतात न्याहारी पोचवायला पाठवायचे ठरवले तर त्याला रस्त्यात पावसाने झोडपलेच समजावे, अशी स्थिती आहे.

             एकदा तर “पावसाने दडी मारली, मान्सूनचे आगमन लांबले – शेतकरी चिंताग्रस्त” असा मुख्यमथळा असलेल्या वृत्तपत्राचे पार्सलच पुरात वाहून गेले होते. बिचारा वृत्तपत्र वाटणारा पोरगा कसाबसा वाहून जाता जाता बचावला होता.

           आकाशवाणी, दुरदर्शन किंवा वृत्तपत्र यांचे पाऊसविषयक अंदाज हवामानखात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकावर आधारीत असतात. हवामानखात्याला वारंवार तोंडघशी पाडण्यात त्या वरूणदेवतेला काय समाधान लाभते कुणास ठाऊक पण त्याचे विपरित परिणाम मात्र या माध्यमांना भोगावे लागतात. हवामानखाते आपल्या जागी सुरक्षित असते पण विश्वासाहार्यतेला भेगा जातात या माध्यमांच्या. त्यावर जालिम उपाय म्हणून वृत्तपत्रे पाऊसपाण्याचे अंदाज छापण्याचे टाळतात आणि दुरदर्शन व वेगवेगळे टीव्ही चॅनेल जास्तीतजास्त वेळा हवामानाच्या अंदाजाच्या मथळ्याखाली केवळ कमाल आणि किमान तापमान दर्शवून मोकळे होतात.

       कदाचित याच कारणामुळे शेतकरी वर्गात जेवढे स्थान पंचागाचे आहे, त्या तुलनेत हवामानखाते कुठेच नाही. हवामान बदलाच्या  संभाव्यतेचे ढोबळमानाने का होईना पण काहीतरी आराखडे मनात गृहित धरल्याशिवाय शेती करताच येत नाही. हवामानशास्त्राचे शेतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. शेती करणारा प्रत्येक शेतकरी हा त्याच्या शेतीपुरता हवामान शास्त्रज्ञच असतो. पंचागात पर्जन्यामानाची संभाव्यता व्यक्त केली असते ती फ़ारच मोघम स्वरुपाची असते पण बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने वर्षानुवर्षे शेतकरी या पंचागातील हवामानाच्या अंदाजावर विश्वास ठेवून आहे. नक्षत्रानुरुप आणि नक्षत्रांच्या वाहनानुसार पाऊस पडत असतो, यावर त्याचा विश्वास आहे. नक्षत्राचे वाहन जर मोर असेल तर पाऊस थुईथुई येतो, वाहन बेडूक असेल तर भारी पाऊस येतो, वाहन गाढव असेल तर पळता पाऊस येतो किंवा वाहन जर म्हैस असेल तर पाऊस ठाण मांडून बसतो असे त्याने वर्नुषावर्षे अनुभवातून हवामानाचे दर्शन घेतलेले, त्यामुळे त्याचा या बाबीवर विश्वास असतो. पंचागात व्यक्त केलेले अंदाज अचूक किंवा तंतोतंत नसतात पण एकदमच फ़ालतूही नसतात. मोघम असले तरी शेतीमधील उपयुक्ततेचा विचार केला तर हवामान खात्यापेक्षा काहीना काही अंशी अधिक विश्वासाहार्य नक्कीच असतात.

        हवामानाचा अंदाज काढणे हे आकाशाला गवसणी घालण्यापेक्षा जिकिरीचे काम आहे, शिवाय हवामानशास्त्र अजून बाल्यावस्थेतच असल्याने हवामानखात्याचे अंदाज चूकत असावे, त्याला बिचारे हवामानशास्त्रज्ञ काय करतील, असेच मला वाटायचे आणि मग या शास्त्रज्ञाबद्दल सहानुभूती वाटायची. हवामान खात्याबद्दल टीकात्मक लेखन वाचून त्यांच्याबद्दल मनात करूणा उत्पन्न व्हायची. दोनवर्षापूर्वीपर्यंत तरी माझी अशीच मनोधारणा होती.

        पण मी इंटरनेटवर आलो आणि भारतीय हवामानखाते वगळता वेगवेगळ्या परदेशी संकेतस्थळावरील हवामानाच्या अंदाजाची तपशीलवार माहीती पाहून दंगच झालो. बराच काळ मी या अंदाजाची अचूकता पडताळत राहिलो. या अंदाजावर आधारीत शेतीच्या कामाचे नियोजन करित राहिलो. त्याचा मला खूप फ़ायदा झाला. यावर्षी अगदी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मला कपाशीची धूळ पेरणी करता आली. अंदाजाप्रमाणे पाऊस आला. माझ्या शेतीपासूनच्या १०० किलोमीटर परिघक्षेत्रात माझी लागवड इतरांपेक्षा दहा दिवस आधी आणि चांगली झाली. आकाशवाणी-टीव्हीवरील हवामानाचे अंदाज ऐकून ज्यांनी लागवडी केल्यात त्यांच्या लागवडी बिघडल्या. दुबार लागवडीचे संकट कोसळण्याची भिती उत्पन्न झाली होती.

मला ज्ञात असलेली हवामानाचे अंदाज वर्तविणारी काही संकेतस्थळे खालील प्रमाणे:

१) भारत मौसम विज्ञान विभाग
(Ministry of Earth Science, Govt of India)
http://www.imd.gov.in/
———————
२) भारत मौसम विज्ञान विभाग, पुणे
http://www.imdpune.gov.in/
———————
३) foreca
http://www.foreca.com
——————-
४) weatherbug
http://weather.weatherbug.com
——————
५) The Weather chanel India
http://in.weather.com/
———————–
६) MSN Weather
http://weather.in.msn.com
———————–
७) BBC
http://news.bbc.co.uk/weather/
——————————-
८) Agricultural Meteorogy Division
http://www.imdagrimet.gov.in
——————————–

        यामध्ये फ़ोरिका आणि वेदरबग हे संकेतस्थळ मला अधिक विश्वासाहार्य वाटले. येथे पुढील दहा दिवसापर्यंतच्या हवामानबदलाचे अंदाज व्यक्त केलेले असतात. अगदी दर तीन तासांनी हवामानात काय बदल घडतील याचा अंदाज व्यक्त केलेला असतो. शिवाय या अंदाजाचे स्वरूपही राज्यनिहाय किंवा प्रांतनिहाय असे मोघम स्वरूपाचे नसून विभागवार असते आणि हे विभाग ५०/१०० किलोमिटर क्षेत्रासाठी असते. तुम्हाला हवे ते तुमचे छोटेमोठे शहर शोधून त्या शहराचे हवामान ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी काय असू शकेल याचा अदमास घेता येतो.

         या सर्व संकेतस्थळामध्ये शेतकर्‍याचा दृष्टीने अत्यंत निरूपयोगी, समजण्यास क्लिष्ठ, काहीही तपशिलवार माहीती उपलब्ध नसलेले संकेतस्थळ म्हणून उल्लेख करायचा झाला तर एकमेव नाव घ्यावे लागते ते भारत मौसम विज्ञान विभागाच्या संकेतस्थळाचे. या संकेतस्थळाचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास “शेतीमधील उपयुक्ततेच्या दृष्टीने अत्यंत फ़डतूस” असेच करावे लागेल. इथे सारे मोघमच मोघम आहे. “पुढील ४८ तासांत विदर्भ, मराठवाडा, गोव्यात कुठेकुठे पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे” हीच यांची हवामानाच्या अंदाजाची संभाव्यता. त्यावरून कशाचाच काहीही थांगपत्ता लागत नाही. पाऊस कुठे आणि केव्हा येणार, याचाही बोध होत नाही. असे मोघमच अंदाज व्यक्त करायचे असेल तर त्यासाठी शास्त्रज्ञ कशाला हवेत? एवढे किंवा यापेक्षा अधिक चांगले भाकित तर एखादा शेंबडा पोरगाही वर्तवू शकेल. त्यासाठी हजारो कोटी रूपये या हवामान खात्यावर खर्च करायची गरजच काय? एखाद्या बालवाडीतल्या मुलास पेपरमेंट किंवा कॅटबरी दिल्यास तो सुद्धा एवढं वाक्य सहज बोलून दाखवेल. जे काम पेपरमेंटच्या चार गोळ्यांनी होण्यासारखे आहे तेथे हजारो कोटी खर्च करून पांढरे हत्ती पोसण्याखेरीज आपण दुसरे काय करत आहोत? एवढा तरी विचार करायला आपण शिकणार आहोत की नाही?
            मुख्य मुद्दा असा की, जे काम परदेशी शास्त्रज्ञांना जमत आहे ते काम आमच्या भारतीय शास्त्रज्ञांना का जमू नये? फ़ोरिका आणि वेदरबग यासारख्या संकेतस्थळावरील अंदाज अचूक, तंतोतंत किंवा खरेच असतात, असे मला म्हणायचे नाही. ते चुकण्याचीही शक्यता असतेच. शेवटी अंदाज हा केवळ अंदाज आणि शक्यता ही केवळ शक्यताच असते. पण ही संकेतस्थळे सांभाळणारी माणसे जेवढे परिश्रम घेतात, चिकाटी दाखवतात, तपशिलवार अंदाज व्यक्त करण्याचे धाडस आणि आत्मविश्वास बाळगतात, गरजेनुरूप सॉफ़्ट्वेअर निर्माण करण्याचे कौशल्य दाखवतात; तेच आमच्या हवामानखात्याला का जमू नये? हाच मुख्य प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर शोधणेही तेवढेच गरजेचे आहे.
        हवामानशास्त्राच्या बाबतीत आपण इतर देशांपेक्षा शेकडो वर्षांनी मागे आहोत, हे दिसतेच आहे. हरकत नाही पण; इतर देशांच्या पुढे जाण्याचा, बरोबरी करण्याचा किंवा महाशक्ती बनण्याचा मुद्दाही सोडा, शेतीला थोडाफ़ार हातभार लागेल  एवढे तरी हवामानशास्त्र विकसित करण्यासाठी आमचे शास्त्रज्ञ, सत्ताधारी आणि वेळोवेळी निव्वळ पुस्तकी ज्ञानाच्या आधारे शेतीविषयात नको तेव्हा, नको ती लुडबुड करणारी विद्वान मंडळी काही हातपाय हालवणार आहेत की नाही, हाच कळीचा मुद्दा आहे.

      स्वातंत्र्योत्तर भारतातील शास्त्रज्ञ, सत्ताधारी आणि पुस्तकी ज्ञानाच्या महामेरू विद्वान मंडळींना स्वातंत्र्याचे हवामान मानवणार नाही, याचा अदमास जर महात्मा गांधींना जर तेव्हा आला असता तर त्यांनी स्वातंत्र्याचा लढा दिला असता किंवा नाही, याचा अंदाज बांधणे कठीण आहे.

( क्रमश: )
पूर्वप्रकाशित दि : 22/07/2011
                                                                                                                  – गंगाधर मुटे
—————————————————————————————————————-

शेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन

शेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन

          ८, ९ आणि १० डिसेंबरला चंद्रपूर येथील शेतकरी संघटनेच्या संयुक्त अधिवेशनात घोषणा झाल्याप्रमाणे २३ नोव्हेंबर २०१३ ला राज्यव्यापी पानफ़ूल आंदोलन करण्यात आले.

         कापसाला ६०४० रू, सोयाबिनला ५०००रू. आणि धानाला ३२०० रू आधारभूत किंमत जाहिर करावी, या प्रमुख मागणीसह प्रस्तावित सिलींग , भुसंपादन कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेतर्फ़े वायगाव चौरस्ता, आर्वी, सेलडोह आणि जांब चौरस्ता येथे आज दि. २३ नोव्हेंबर रोजी ५ तासाचे पानफ़ूल आंदोलन करण्यात आले.
         यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे कपाशी आणि सोयाबिनच्या उत्पादनात प्रचंड घट आलेली आहे. खरीप हंगामाने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडल्यानंतर पुन्हा शेतकरी रबी हंगामाच्या उदिमाला लागलेला आहे परंतू जिल्ह्यात १८ तास शेतीसाठी वीज भारनियमन असल्याने आणि ६ तास मिळणारी वीज कमी दाबाची आणि खंडीत असल्याने शेतकर्‍यांसमोर जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. परिणामत: पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्यांनी उचल खाल्ली असून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्त्यांचे प्रमाण वाढलेले आहे.
         सरकार मात्र नेहमीप्रमाणेच शेतीच्या मदतीसाठी उदासिन असून शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर काहीही हालचाल सुरू झालेली नाही. देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री शेती विषयावर अवाक्षरही बोलायला तयार नाही. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही, हीच भुमिका शासनाची असल्याने आज राज्यभर पानफ़ूल आंदोलन करण्यात आले.

         या आंदोलनात प्रवाशी वाहनांना थांबवून त्यातील प्रवाशांचे पान-फ़ूल देवून स्वागत करण्यात आले. सध्याची शेतकर्‍यांची हलाखीची परिस्थिती आणि त्याबातची सरकारची शेतकरीविरोधी भूमिका याबद्दलची कैफ़ियत प्रवाशांसमोर मांडण्यात आली. सामान्य जनतेनेच आता शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सरकारला वठणीवर आणण्यासाठी सहकार्य करावे, अशी प्रवाशांना हात जोडून विनंती करण्यात आली. प्रवाशांनी सुद्धा शेतकर्‍यांच्या आजच्या हलाखीच्या स्थितीशी सहमती दर्शवत सरकारने जगाच्या पोशिंद्या अन्नदात्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
*  *  *
वायगाव चौरस्ता (वर्धा) – वायगाव येथिल पानफ़ूल आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गंगाधर मुटे, नंदूभाऊ काळे, प्रा. पांडुरंग भालशंकर, सतिश दाणी, दत्ता राऊत, महेश वल्लभवार, सौ. शारदा प्रभाकर झाडे, बापू ठाकरे, गोविंद भगत, बाबा साटोणे, महादेव गोहो, अरविंद राऊत, माणिक उघडे, शोभा कोरेकार, ज्योती भगत, तानू ठाकरे, मधूकर नेजेकार, देवराव हुडे, राजू इखार, नारायण होले यांचेसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सेलडोह (वर्धा) – सेलडोह येथील पानफ़ूल आंदोलनात माजी आमदार सौ. सरोज काशीकर, सुनंदा तुपकर, निळकंठ घवघवे, रविंद्र खोडे, शकिल खोडे, चेतराम मेहुणे, धोंडबा गावंडे, शांताराम सोनटक्के, अरविंद बोरकर, रंजना सोनटक्के यांचेसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
*  *  *
जांब चौरस्ता (वर्धा) – जाम चौरस्ता येथे शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख मधुसूदन हरणे, प्रा. मधुकरराव झोटिंग, वसंतराव दोंदल, उल्हास कोटमकर, जीवन गुरनुले, अजाबराव राऊत, साहेबराव येडे, जि.प. सदस्य चंद्रमणि भगत, जि.प. सदस्य विणा राऊत, पं.स. सदस्य सुनिल बुरबुरे, दमडु मडावी, कैलास नवघरे, अनिल धोटे, केशव भोले, शंकर घुमडे, हरि जामुनकर, गणेश माथनकर, सुधाकर भगडे यांच्या नेतृत्वात पान, फुल आंदोलन करण्यात आले.
*  *  *
आर्वी (वर्धा) – आर्वी-तळेगाव मार्गावर शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा शैलजा देशपांडे यांच्या नेतृत्वात आंदोलन पार पडले. यावेळी शेतकरी उपस्थित होते.
*  *  *
बुलडाणा – शेतकरी संघटनेतर्फे आज, शनिवारी वेगळा विदर्भ व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पान-फुल आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात करण्यात आले. बुलडाणा तालुक्‍यातर्फे धाड नाक्‍यावर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाहनाला थांबवून प्रवाशांना पान-फुल देत त्यांचे स्वागत केले. संघटनेच्या मागण्यांचे पत्रकही त्यांना देण्यात आले.
         यावेळी वाहनधारकांची कोंडी झाली होती. त्या ठिकाणी झालेल्या छोटेखानी सभेत डॉ. हसनराव देशमुख, नामदेवराव जाधव यांनी वेगळ्या विदर्भाचे फायदे सविस्तर समजावून सांगितले. वेगळा विदर्भ झाला, तर विदर्भात होणारी वीज शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना व नागरिकांना 24 तास मिळू शकते व उर्वरित वीज टिकून मोठा महसूल मिळू शकतो. 24 तास वीज मिळाल्यामुळे शेतीचे व कारखानदारीचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांना आत्महत्येला आळा बसू शकतो. त्यामुळे वेगळ्या विदर्भासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
*  *  *
वणी (जि. यवतमाळ) – येथील शेतकरी संघटनेने वरोरा मार्गावरील वाहनांना थांबवून चालकांना पानफूल देऊन वेगळ्या विदर्भासह अनेक मागण्यांसाठी शनिवारी दुपारी एकला आगळेवेगळे आंदोलन केले.
         या आंदोलनादरम्यान, विविध मागण्यांसाठी घोषणाबाजीही करण्यात आली. दिवसेंदिवस सरकारी धोरणामुळे बुडत चाललेला शेतीव्यवसाय व उत्पादन शेतकरी, पिकांचा भरून न निघणारा उत्पादन खर्च, शेतकऱ्यांवरील वाढत चाललेला कर्जाचा बोजा, अशा अनेक समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. कापसाला राज्य सरकारने शिफारस केल्याप्रमाणे 6040 रुपये प्रतिक्‍विंटल भाव केंद्राकडून जाहीर करावा, धान्याचा व खताचा वाढता खर्च लक्षात घेता सोयाबीनला पाच हजार रुपये केंद्राने जाहीर करावा, उसाला तीन हजार 200 रुपये भावाची पहिली उचल देण्यात यावी, शेतकऱ्यांचे वीजबिल व कर्ज माफ करण्यात यावे, तसेच वीजजोडणी थांबविण्यात यावी, विदर्भ राज्य तत्काळ घोषित करण्यात यावे, सर्व शेतमालावरील निर्यात बंदी हटविण्यात यावी, केंद्र सरकारने केलेल्या सीलिंगच्या कायद्यात सुधारणा करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
*  *  *
पान फ़ूल आंदोलन
वायगाव चौरस्ता

पान फ़ूल आंदोलन
वायगाव चौरस्ता. रापम च्या बस चालकाला पानफ़ूल देतांना 
पान फ़ूल आंदोलन
नांदेड
पान फ़ूल आंदोलन
लोकमत
पान फ़ूल आंदोलन
लोकशाही वार्ता
पान फ़ूल आंदोलन
महाराष्ट्र टाईम्स
पान फ़ूल आंदोलन
नवभारत
पान फ़ूल आंदोलन
पुण्यनगरी
पान फ़ूल आंदोलन
सकाळ
पान फ़ूल आंदोलन
भास्कर
पान फ़ूल आंदोलन
तरुण भारत
पान फ़ूल आंदोलन
देशोन्नती

शेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन – चंद्रपूर

शेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन – चंद्रपूर

स्थळ : क्लब ग्राऊंड, चंद्रपूर                                                         दिनांक – ८,९ आणि १० नोव्हेंबर २०१३

*   *   *

*   *   *
अधिवेशनातील कामकाजाचे प्रारूप व विषय-पत्रीका

दिनांक ८-११-२०१३

सकाळी   ११.०० ते ११.३०        ध्वजारोहन व उद्‍घाटन, उद्‍घाटक मा. शरद जोशी
सकाळी   ११.३० ते ०१.००        शेती, शेतीचे प्रश्न, कर्ज व वीज बीलमुक्ती
दुपारी     ०१.०० ते ०२.००        सुट्टी
दुपारी     ०२.०० ते ०५.००        जैव तंत्रज्ञान, जनुकीय तंत्रज्ञानाचे व बाजारपेठेचे स्वातंत्र्य
सायं       ०५.०० ते ०५.३०        सुट्टी
सायं       ०५.३० ते ०७.३०        दुष्काळ आणि पाणीप्रश्न

दिनांक ९-११-२०१३

सकाळी   ०९.०० ते १२.००        महिलांचे प्रश्न, मालमत्तेचा अधिकार, संरक्षण
दुपारी      १२.०० ते ०१.००        सुट्टी
दुपारी      ०१.०० ते ०४.००        लहान राज्य व स्वतंत्र विदर्भ राज्य का हवे?
सायं        ०४.०० ते ०४.३०        सुट्टी
सायं        ०४.३० ते ०७.३०        अन्न्सुरक्षा, सिलींग कायदा व राज्यघटनेतील शेड्यूल-९

दिनांक १०-११-२०१३

सकाळी   ०९.००                      हुतात्म्यांना श्रद्धांजली

सकाळी   ०९.०० ते ११.००        युवकांपुढील आव्हाने व बेरोजगारीचा प्रश्न
सकाळी   ११.०० ते ०१.००        मोटारसायकल रॅली
दुपारी   ०२.०० खुले अधिवेशन

अध्यक्ष – मा. शरद जोशी, शेतकरी संघटनेचे प्रणेते व राष्ट्रीय अध्यक्ष, स्वभाप
प्रमुख उपस्थिती – 
        मा. वेदप्रकाश वैदीक, माजी अध्यक्ष, पी.टी.आय
        मा. जयप्रकाश नारायण, आमदार, लोकसत्ता पार्टी
        मा. भुपेंद्रसिंग मान, अध्यक्ष, अ.भा. किसान समन्वय समिती
        सौ. सरोजताई काशीकर, माजी अध्यक्ष, अ.भा. किसान समन्वय समिती
        डॉ. मानवेंन्द्र काचोळे, माजी राष्ट्रीय अध्यक्ष, स्वभाप
        अ‍ॅड दिनेश शर्मा, अध्यक्ष, स्वभाप, युवा आघाडी

*   *   *
अत्यंत महत्वाची सुचना :

१)  शेतकरी संघटनेच्या अधिवेशनाला स्वखर्चाने यायचे असते.
२)  नास्तापाणी, जेवनाची व निवासाची व्यवस्था ज्याची त्याने करायची असते.
३)  पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेखेरीज शेतकरी संघटनेकडून अन्य कुठलीही व्यवस्था पुरवली जात नाही, याची कृपया प्रतिनिधींनी नोंद घ्यावी.
*   *   *

भारतीय सणांचे अनर्थशास्त्र

भारतीय सणांचे अनर्थशास्त्र

                      त्या दिवशी भल्या पहाटेच चक्रधर माझ्याकडे आला होता. त्याला माझ्याकडून प्रवाशीबॅग हवी होती पंढरपूरला जायला. असा अचानक चक्रधर पंढरपूरला जायची तयारी करतोय हे ऐकून मी उडालोच. आदल्या दिवशीच माझे त्याच्याशी बोलणे झाले होते. एका खासगी कीटकनाशक कंपनीच्या कार्यक्रमाला चलतोस का म्हणून विचारले तर म्हणत होता की, त्याला निदान एक पंधरवडा तरी अजिबात फुरसत नाहीच. शेतीची आंतरमशागत करायचीय, फवारणी करायचीय, निंदन-खूरपण करायचेय. अर्थात तो खोटेही बोलत नव्हता. त्याचे शेत माझ्या शेतापासून थोड्याशाच अंतरावर असल्याने मला त्याच्या शेतीची आणि शेतीतील पिकांची इत्थंभूत माहिती होती.


                   चक्रधर शेती करायला लागल्यापासून पहिल्यांदाच त्याच्या शेतीत इतकी चांगली पिकपरिस्थिती होती. यंदा त्याने छातीला माती लावून सार्‍या गावाच्या आधीच कपाशीची धूळपेरणी उरकून टाकली होती. पावसानेही आपला नेहमीचा बेभरंवशाचा खाक्या सोडून चक्रधरला साथ दिली आणि त्याची कपाशीची लागवड एकदम जमून गेली. नशीब नेहमी धाडसी लोकांनाच दाद देत असते याची प्रचिती यावी असाच हा प्रसंग होता. त्यामुळे हुरूप आलेला चक्रधर दमछाक होईपर्यंत शेतीत राबायला लागला होता. त्याला विश्वास होता की, यंदा आपली “इडापिडा टळणार आणि सावकाराच्या पाशातून मुक्ती मिळणार”. भरघोस उत्पन्न आले आणि कर्मधर्म संयोगाने जर भावही चांगले मिळालेत तर ते अशक्यही नव्हते. त्यामुळे कीटकनाशक कंपनीच्या कार्यक्रमाला येत नाही म्हटल्यावर मलाही फारसे नवल वाटले नाही. 

                    पण चक्रधर आता असा अकस्मात पंढरपूरला जायची तयारी करतोय हे मला अनपेक्षित होते. नेमके काय गौडबंगाल आहे हे जाणून घ्यायची माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मी प्रथम त्याच्या हातात प्रवाशी बॅग दिली, प्रवासाला शुभेच्छा दिल्या, येताना माझ्यासाठी पांडुरंगांचा प्रसाद घेऊन यावा, अशी विनंती केली आणि मग हळूच विचारले होते,

“काय चक्रधर, असा अचानक कसा काय बेत आखला बुवा पंढरपूरचा?”
“आरं, मी कसला काय बेत आखतो पंढरीचा? तो पांडुरंगच मला बोलवायला आलाय ना स्वतःहून” इति चक्रधर.
“स्वतःहून थेट पांडुरंगच आला तुला निमंत्रण द्यायला?” आश्चर्याने डोळे विस्फारून मी विचारले. 
“हं मग? इच्छा त्या पांडुरंगाची. दुसरं काय?” चक्रधर निर्विकारपणे सांगत होता.
“अरे, पण मी तर ऐकलंय की पांडुरंग निर्गुण-निराकार असतो. शिवाय तो बोलत पण नसतो” या विषयातील आपले तुटपुंजे ज्ञान उगाळत मी बोललो.
“तसं नाही रे, पंढरीचा विठोबा स्वप्नात आलाय तो त्या रावसाहेबांच्या” माझ्या प्रश्नाचा उबग आल्यागत चक्रधर बोलत होता. पण आता मला संवाद थांबवणे शक्य नव्हते. माझी उत्कंठा शिगेला पोचली होती.
“रावसाहेबांच्या स्वप्नात? रावसाहेब आणि तुला, दोघांनाही बोलावलं होय?” मी प्रश्न फेकलाच.
“आरं बाबा, तसं नाही रे. आत्ता पहाटेपहाटे विठोबा-रुक्मिणी दोघंबी रावसाहेबांच्या स्वप्नात आलेत आणि रावसाहेबांना आदेशच दिला की चक्रधरला तातडीने पंढरीला पाठवून दे. बिचारे रावसाहेब धावतपळत माझ्याकडे आलेत आणि म्हणालेत की, तू आताच्या आत्ता सकाळच्या गाडीने तातडीने पंढरपूरसाठी नीघ. मी पैशाची अडचण सांगायच्या आधीच रावसाहेबांनी माझ्या हातावर जाण्यायेण्याला पुरून उरतील एवढे पैसे पण ठेवलेत. लई मायाळू माणूस आहे बघा आपले रावसाहेब.” माझ्या प्रश्नाच्या सरबत्तीला वैतागलेल्या चक्रधरने एका दमात सगळे सांगून टाकले आणि झपाझप पावले टाकत निघून गेला.

                    पंढरीची वारी करून चक्रधर जेव्हा परतला तेव्हा सारेच काही बदललेले होते. फवारणी अभावी कपाशीची वाढ खुंटून झाड खुरटले होते. मशागत व खुरपणी अभावी तणांची बेसुमार वाढ झाली होती. आल्याआल्या मशागत सुरू करावी तर पाऊस सुरू झाला होता. पाऊस नुसताच सुरू झाला नव्हता तर ठाण मांडून बसला होता. आकाशातील ढग पांगायचे नावच घेईना. म्हणजे झाले असे की, जेव्हा उघाड होती आणि मशागत करण्यायोग्य स्थिती होती तेव्हा चक्रधर पंढरपुरात होता आणि आता चक्रधर शेतात होता तर पावसामुळे मशागतीचे काम करणे अशक्य झाले होते. शेवटी तणाची वाढ एवढी झाली की शेतात जिकडेतिकडे गवतच गवत दिसत होते. कपाशी गवताखाली पूर्णपणे दबून गेली होती. त्यामुळे जे व्हायचे तेच झाले. एकावर्षात सावकाराच्या म्हणजे रावसाहेबाच्या कर्जाच्या पाशातून मुक्त व्हायची गोष्ट दूर, उलट कर्जबाजारीपणाचा डोंगरच वाढत जाणार होता. 

                         रावसाहेब सावकार मात्र आनंदी होते. त्यांनी स्वप्न पडल्याची मारलेली थाप त्यांना मस्तपैकी कामी आली होती. ऋणको जर स्वयंपूर्ण झाला तर धनकोची दुकानदारी कशी चालेल? त्यासाठी ऋणको नेहमीच कर्जात बुडूनच राहावा, हीच धनकोची इच्छा असते. त्यासाठीच नाना तर्‍हेच्या कॢप्त्या लढविण्याचे कार्य धनकोद्वारा अव्याहतपणे चाललेले असते. 



                   मी जेव्हा ही गोष्ट अनेकांना सांगतो तेव्हा त्यांना सावकाराचाच राग येतो. कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढण्याचीही भाषा केली जाते मात्र शेतीच्या ऐन हंगामातच पंढरपूरची यात्रा का भरते? याचे उत्तर कोणीच देत नाही. पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तवर्गामध्ये शेतकरी समाजच जास्त आहे. ज्या वेळी शेतकर्‍यांनी आपल्या शेतीतच पूर्णवेळ लक्ष द्यायची गरज असते, नेमकी तेव्हाच आषाढी किंवा कार्तिकीची महिमा का सुरू होते? याचा धार्मिक किंवा पुराणशास्त्रीय विचार करण्यापेक्षा तार्किक पातळीवर विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.

                         संपूर्ण भारतवर्षात शेतीचा हंगाम सर्वसाधारणपणे जून महिन्यामध्ये सुरू होतो आणि डिसेंबर मध्ये मुख्य हंगाम म्हणजे खरीप हंगाम संपतो. विचित्र गोष्ट अशी की, भारतातील सर्व मुख्य सण याच काळात येतात. जून मध्ये हंगाम सुरू झाला की शेतीच्या मुख्य खर्चाला सुरुवात होते. आधीच कर्ज काढून शेती करणार्‍याला हे सण आणखीच कर्जात ढकलायला लागतात. या सणांच्या खर्चातून शेतकर्‍याला बाहेर पडताच येणार नाही, अशी पुरेपूर व्यवस्था झालेली आहे, हेही ठळकपणे जाणवते. या काळात येणार्‍या सर्व सणांचे त्या-त्या सणानुरूप करावयाच्या पक्वान्नाचे मेनू ठरलेले आहेत. नागपंचमीला करंजी, लाडू, चकल्या कराव्या लागतात. रक्षाबंधनाला राखी बांधायला भावाने बहिणीकडे किंवा बहिणीने भावाकडे जायचेच असते. मग एकाचा खर्च प्रवासात होतो तर दुसर्‍याचा पाहुणचार करण्यात. पोळा आला की बैलाला सजवावेच लागते. घरात गोडधड रांधावेच लागते. त्यातही एखाद्या चाणाक्ष काटकसरी शेतकर्‍याने पोळ्यानिमित्त घरात पंचपक्वान्न करून खाण्यापेक्षा तेवढ्याच पैशात शेतामध्ये दोन रासायनिक खताची पोती घालायचे ठरवले तरी ते शक्य होत नाही कारण या दिवशी शेतकर्‍याने आपल्या घरी गडीमाणूस जेवायला सांगणे, हा रितिरिवाज लावून दिल्या गेला आहे. परका माणूस घरात जेवायला येणार असल्याने पंचपक्वान्न करणे टाळताच येत नाही. अशा तर्‍हेने शेतकर्‍याला खर्चापासून परावृत्त होण्याचा मार्गच बंद करून टाकल्या गेला आहे. शिवाय पोळा हा तीन दिवसाचा असतो. वाढबैल, बैल आणि नंदीपोळा. हे तीन दिवस बैलाच्या खांद्यावर जू देता येत नाही. मग होते असे की जेव्हा उघाड असते आणि शेतात औतकाम करणे शक्य असते, त्यावेळेस पोळा असल्यामुळे काम करता येत नाही. पोळा संपला आणि जरका लगेच पाऊस सुरू झाला तर मग पावसामुळे काम करता येत नाही. कधी कधी या तर्‍हेने आठवडा किंवा चक्क पंधरवडा वाया जातो. मग त्याचे गंभीर परिणाम पिकांना भोगावे लागतात.

                          हरितालिका, ऋषिपंचमी, मंगळागौर, कान्होबा, महालक्ष्मी-गौरीपुजन, श्रावणमास याच काळात येतात. आखाडी व अखरपख(सर्व पितृदर्श अमावस्या) या सणांचा मारही खरीप हंगामालाच सोसावा लागतो. गणपती बाप्पा आले की ठाण मांडून बसतात. शारदादेवी, दुर्गादेवी यांचे नवरात्र पाळायचे नाही म्हटले तर त्यांचा प्रकोप होण्याची भिती मनात घर करून बसली असते शिवाय यांना यायला आणि जायला गाजावाजा व मिरवणूक लागते. बाप्पांना दहा-पंधरा दिवस मोदक पुरवावेच लागतात. बदाम, नारळ खारका द्याव्याच लागतात. दुर्गादेवीची ओटी भरावीच लागते. ते संपत नाही तोच दसरा येतो, दसर्‍याची नवलाई संपायच्या आधीच भुलोजी राणाच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या भुलाबाई येतात. भोंडला, हादग्याला जुळूनच कोजागरी येते. 

                         शेतीचा हंगाम अगदी भरात असतो. ज्वारी हुरड्यावर, कपाशी बोंडावर आणि तुरी फ़ुलोर्‍यावर येण्याला सुरुवात झालेली असते. अजून पीक पक्व व्हायला, बाजारात जायला आणि शेतकर्‍याच्या घरात पैसा यायला अजून बराच अवकाश असतो आणि तरीही आतापर्यंत डबघाईस आलेल्या शेतकर्‍याचे कंबरडे मोडण्यासाठी मग आगमन होते एका नव्या प्रकाशपर्वाचे. दिव्यांची आरास आणि फटक्याच्या आतषबाजीचे. एकीकडे कर्ज काढून सण साजरे करू नये म्हणून शेतकर्‍याला वारंवार आवाहन करणार्‍या शहाण्यांचे पीक येते मात्र दुसरीकडे हे सर्व सण शेतकर्‍यांच्या दारासमोर दत्त म्हणून उभे ठाकत असते. दिवाळी जसा प्रकाश आणि आतषबाजीचा सण आहे तसाच पंचपक्वान्न व वेगवेगळे चवदार पदार्थ करून खाण्याचा सण आहे. शेतकर्‍याने जरी सण साजरा करायचे नाही असे ठरवले तर शेजार्‍याच्या घरातून खमंग वासाचे तरंग उठत असताना शेतकर्‍याच्या मुलांनी काय जिभल्या चाटत बसायचे? दिवाळीला नवे कापड परिधान करायचे असते. नवीन कापड खरेदीसाठी पुन्हा कर्ज काढायचे किंवा कापड दुकानातून उधारीवर खरेदी करायची. लक्ष्मीपूजनासाठी स्पेशल दिवस नेमला गेला आहे. शेतीत पिकविलेला कोणताच शेतमाल जर विक्रीस गेला नसेल तर शेतकर्‍याच्या घरात लक्ष्मी तरी कुठून येणार? मग लक्ष्मीपूजन तरी कोणत्या लक्ष्मीचे करायचे? शेतकरी ज्या लक्ष्मीचे पूजन करतो, ती लक्ष्मी उसणवारीची असून तिचे मालकीहक्क सावकार किंवा बॅंकेकडे असतात. त्याच्या घरावर झगमगणार्‍या आकाशदिव्यांचे कॉपीराईटस जनरल स्टोअरवाल्याच्या स्वाधीन आणि घरात तेवणार्‍या दिवावातीतील तेलाचे सर्वाधिकार किराणा दुकानदाराच्या ताब्यात असतात. शेतीचे खर्च आणि या सर्व सणांचे खर्च भागवण्यासाठी शेतातील उभे पीक शेतकर्‍याच्या घरात पोचायच्या आधीच गहाण झालेले असते. या सर्व सणांनी शेतकर्‍याला पुरेपूर कर्जबाजारी करून त्याच्या कमरेला धडूतही शिल्लक ठेवायचे नाही, असा निर्धारच केलेला दिसतो.

                          आणि सर्वात महत्त्वाची आणि उपराटी बाब अशी की डिसेंबरमध्ये माल बाजारात जायला लागला आणि शेतकर्‍याच्या घरात पैसा यायला लागला की अचानक सणांची मालिका खंडीत होते. गाढवाच्या सिंगाप्रमाणे सण नावाचा प्रकारच गायब होतो. डिसेंबर नंतर जे सण येतात ते निव्वळच बिनखर्चिक असतात. “तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला” असे म्हणत तिळगुळाच्या भुरक्यावरच तिळसंक्रांत पार पडते. बारा आण्याच्या रंगामध्ये होळीची बोळवण केली जाते. तांदळाची खीर केली की अक्षय तृतीया आटोपून जाते. खरीप हंगामात येणारी श्रीकृष्ण जन्माष्टमी घराघरात साजरी केली जाते. मात्र उन्हाळ्यात येणारी रामनवमी व हनुमान जयंती केवळ मंदिरातच साजरी केली जाते आणि शेतकर्‍यांना पदरचा खडकूही न खर्च करता फुकटातच प्रसाद खायला मिळतो. म्हणजे असे की शेतकर्‍याच्या घरात जेव्हा त्याच्या कमाईचा पैसा येतो, तेव्हा त्याने त्या पैशाने सण वगैरे साजरे करण्याची अजिबात सोय नाही. स्वतः मिळविलेल्या मिळकतीतून नवीन कपडे खरेदी करायचे नाहीत. स्वत:च्या मिळकतीच्या पैशाने गोडधड-पंचपक्वान्ने करून मुलाबाळांना खाऊ घालायची नाहीत. बहिणीने भावाच्या घरी किंवा बापाने पोरीच्या घरी जायचे नाही. केवळ आणि केवळ माल विकून पैसा आला की त्याने किराणा, कापड दुकानाची उधारी फेडायची. बॅंका किंवा सावकाराची कर्जफेड किंवा व्याज फेड करायची आणि पुढील हंगामातील शेतीसाठी नव्याने कर्ज घ्यायला तयार व्हायचे. अजबच तर्‍हा आहे या कृषिप्रधान म्हणवणार्‍या देशातील सणांच्या संस्कृतीची.

                          सणांच्या निर्मितीमागचे ऐतिहासिक महत्त्व विशद करणारे पुराणशास्त्री काहीही म्हणोत, परंतु शेतीमधल्या मिळकतीचा संचय शेतकर्‍याच्या घरात होताच कामा नये, शेतकरी कायमच कर्जबाजारी राहावा हा उद्देश स्पष्टपणे डोळ्यासमोर ठेवूनच सणांची निर्मिती आणि रीतिरिवाज अगदी प्राचीन काळापासून नियोजनबद्धरितीने आखल्या गेले आहे, हे उघड आहे. ज्या हंगामात शेतीमध्ये शेतकर्‍याने स्वतःला झोकून देऊन कामे करायची असतात त्याच काळात इतक्या सणांचा बडेजाव शेतीव्यवसायाला उपयोगाचा नाही. उत्पादनासंबंधी आवश्यक तो खर्च करावयाच्या काळात सणासारख्या अनुत्पादक बाबीवर अनाठायी खर्च करणे, शेतीव्यवसायाला कधीच फायदेशीर ठरू शकणार नाही. सणांचे अनर्थशास्त्र शेतीच्या अर्थशास्त्राला अत्यंत मारक ठरले आहे, ही खूणगाठ मनाशी बांधूनच पुढील वाटचाल होणे अत्यंत गरजेचे आहे.

                                                                                                                                    – गंगाधर मुटे
—————————————————————————————————————————————-
(पूर्वप्रकाशित – देशोन्नती दिवाळी अंक-२०१२)

गरिबी निर्मुलनाची क्षमता केवळ शेती व्यवसायातच

गरिबी निर्मुलनाची क्षमता केवळ शेती व्यवसायातच.

                 शेती व्यवसायातील गरिबी संपवायची असेल तर शेतीव्यवसायातून अतिरिक्त मनुष्यबळ कमी केले पाहिजे, असे वक्तव्य मागे एकदा एका शेतकरी मेळाव्यात बोलताना एका मंत्र्याने केले होते. त्याच दिवशी दुसर्‍या एका सभेत बोलताना शेतीव्यवसायाला बरकत येण्यासाठी शेतकर्‍यांनी जोडधंदे करायला हवेत, त्यासाठी शेतकर्‍यांना मदत करायला सरकार निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही, असेही जाहीर करून ते मोकळे झाले होते. दोन्ही वक्तव्यातून शेतीमध्ये प्रत्यक्ष कामाच्या गरजेपेक्षा अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध असल्याचे ध्वनित होते. 

              परंतु प्रत्यक्षात मात्र परिस्थिती याच्या अगदी उलट आहे. जे प्रत्यक्ष शेतीव्यवसायात आहेत किंवा ज्यांची नाळ प्रत्यक्ष शेतीव्यवसायाशी जुळलेली आहे त्यांना पक्के ठाऊक आहे की, शेतीमध्ये मनुष्यबळाची प्रचंड कमतरता आहे. अनेकवेळा शेतीची कामे एकाच हंगामात एकाच वेळी येत असल्याने मजुरांचा प्रचंड तुटवडा जाणवतो. पेरणी, लागवड, खुरपणी किंवा पिक काढणी सारखी कामे योग्य त्या वेळी करणे शक्य होत नाही. शेतीतील कामाच्या वेळापत्रकाला अनन्य साधारण महत्त्व असल्याने व वेळची कामे वेळेत न आटोपल्याने मग उत्पन्नात जबरदस्त घट येते. उत्पादन वाढीसाठी जिवाचा आटापिटा करणे हा उत्पादकवर्गाचा मूलभूत पैलू असल्याने व शेतकरी हा उत्पादक वर्गामध्ये मोडत असल्याने वेळची कामे वेळेत उरकण्यासाठी प्रयत्न करणे हा गुण त्याच्या रक्तामांसातच भिनला असतो. उत्पादन वाढविण्यासाठी मजुरांची मदत घेणे क्रमप्राप्त ठरल्याने मग मजूर कमी आणि गरज जास्त अशी परिस्थिती उद्भवताच अकस्मात मजुरीच्या दरात प्रचंड उलथापालथ होते. शेतमजूरीची दरनिश्चिती सरकारच्या नियोजनामुळे ठरत नाही किंवा शेतमजुरांच्या युनियनने संप पुकारला म्हणून शेतमजुरीच्या दरात वाढ होत नाही तर शेतमजुरीच्या दरातील बदल मागणी-पुरवठ्याच्या सिद्धान्तानुरूप बदलत असते. 

          आजपर्यंत कामाच्या शोधात खेड्याकडून पावले शहराकडे धावायचीत. पण आता गेल्या काही वर्षापासून अकस्मातच काळ बदलला आहे. गंगा उलटी वाहायला लागून वळणीचे पाणी आड्यावर जायला सुरुवात झाली आहे. मोलमजुरी आणि कामधंदा शोधण्यासाठी शहरातील पावले गावाकडे वळायला लागली आहेत. आम्ही शाळा शिकत असताना आम्हाला सांगितले जायचे की, अमेरिकेतील मोलकरीण स्वतःच्या चारचाकी गाडीने भांडी घासायला मालकाच्या घरी जात असते, एवढा तो देश समृद्ध आहे. आम्हाला ते ऐकताना मोठे कुतूहल वाटायचे. एक दिवस भारतातील शेतमजूरही चारचाकी गाडीमध्ये बसून शेतावर काम करायला जाईल असे जर भाकीत त्याकाळी कुणी वर्तवले असते तर त्याची रवानगी थेट वेड्यांच्या इस्पितळात केली गेली असती मात्र; अगदी पंधरावीस वर्षाच्या काळातच इतिहासाला कलाटणी मिळाली असून शहरातील मजू्रवर्ग चारचाकी वाहनात बसून थेट खेड्यात येऊन शेतीच्या बांधावरच उतरायला लागला आहे. फरक एवढाच की अमेरिकेतील मोलकरीण भांडी घासायला मालकाच्या घरी स्वतःच्या चारचाकी गाडीने जात असते, आमचा मजूरवर्ग मात्र किरायाच्या गाडीने जातो. त्यासोबतच परप्रांतीयाचे लोंढेही आता गावामध्ये उतरायला लागले आहेत. 

         मुंबई-पुण्यासारख्या शहरांना परप्रांतीयाचे लोंढे नकोनकोसे होत असताना आणि त्यांना हुसकावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होत असताना खेड्यात मात्र याच परप्रांतीयाचे दिलखुलासपणे स्वागत केले जात आहे. खेड्यातील शेतकरी परप्रांतात जाऊन तेथील कामगारांना आपल्या गावात येण्याचे निमंत्रण देऊ लागला आहे. गावामध्ये आल्यानंतर त्यांची निवासाची व्यवस्था राजीखुशीने करायला लागला आहे.

          शेतमजुरीचे सतत वाढते दर आणि शेतकरी वर्गाकडून परप्रांतीयांचे स्वागत ह्या दोनही बाबी शेतीव्यवसायात मनुष्यबळाची प्रचंड कमतरता आहे, हे अधोरेखित करणार्‍या आहेत. पण आमच्या शासनकर्त्यांचे पाय जमिनीला लागत नसल्याने वास्तविक स्थितीपासून ते बरेच लांब असतात. १९९० मध्ये जे वाचले, पाहिले त्या आधाराने ते २०१० मध्ये बोलत असतात. काळाचा प्रवाह सतत बदलत असतो, याचाही त्यांना विसर पडायला लागतो. त्यामुळेच मग त्यांना शेतीमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध असल्याचा साक्षात्कार व्हायला लागतो. 

             औद्योगिक विकासासाठी शेतीमध्ये तयार होणारा कच्चा माल स्वस्तात स्वस्त भावाने उपलब्ध होईल अशाच तर्‍हेने स्वातंत्र्योत्तर काळात ध्येयधोरणे राबविली गेलीत तरीही बेरोजगारीचा प्रश्न सुटला नाही कारण भारतासारख्या प्रचंड जनसंख्या असलेल्या देशाला गरजे एवढा रोजगार पुरविण्याची क्षमता औद्योगिक क्षेत्राकडे कालही नव्हती, आजही नाही व उद्याही असणार नाही, हे जेवढे लवकर नियोजनकर्त्यांना कळेल तेवढे लवकर भारताच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने पाऊल पडण्यास सुरुवात होईल. शहरातील मनुष्य कामधंद्याच्या शोधात खेड्याकडे वळायला लागला, ही घटनाच मुळात शेतीव्यवसायामध्ये रोजगाराच्या अमाप संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता असल्याचे द्योतक आहे. स्वातंत्र्योत्तर काळात खेड्यांतील श्रमशक्तीचे शोषण करून शहरे फ़ुलविणार्‍या धोरणात्मक नियोजनकर्त्यांच्या मुस्कटात काळाच्या महिमेने सणसणीतपणे हाणलेली ही चपराक आहे. 

                 स्वातंत्र्योत्तर काळात शेतीकडे जर अक्षम्य दुर्लक्ष झाले नसते तर आज देशात वेगळे चित्र पाहायला मिळाले असते. शेतीमध्ये जर भांडवलीबचत निर्माण व्हायला लागली तर शेतीमध्ये रोजगाराचे अमाप दालन खुले होऊन देशाचा कायापालट होऊ शकतो. देशांतर्गत दूध आणि मांसाची आवश्यक गरज जरी पूर्ण करायची म्हटले तरी पशुपालन व्यवसायामध्ये प्रचंड रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. शेती करून किंवा शेतीशी निगडित व्यवसाय करून जर सन्मानजनक जीवन जगता आले तर सुशिक्षित बेरोजगारांची पावले एमआयडीसी ऐवजी रानमाळाकडे वळू शकतात. एका घरात दोन भाऊ असतील तर एक भाऊ शेती आणि दुसरा भाऊ पशुपालन अशी विभागणी होऊन एका घरात दोन स्वतंत्रपणे व्यवसाय उभे राहू शकतात. उद्योगात किंवा कारखान्यात एक रोजगार निर्माण करायला कोट्यवधीची गुंतवणूक करावी लागते त्याउलट शेतीनिगडीत व्यवसायात केवळ दोन तीन लक्ष रुपयाच्या भांडवली गुंतवणुकीत आठ-दहा लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यातूनच ग्रामविकासाचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते. गरिबी आणि दारिद्र्याचा समूळ नायनाट होऊ शकतो. हजारो कोटी रुपये खर्चाच्या भिकेच्या अनुदानात्मक योजना राबविण्याची गरजही संपुष्टात येऊ शकते.

                 आणि एवढे सगळे घडून येण्यासाठी शासनाला तिजोरीतून एक दमडीही खर्च करण्याची गरज नाही. एका दाण्यापासून हजार दाणे निर्माण करण्याचे सामर्थ्य मातीला आणि गवत-कडब्यापासून दूध निर्माण करण्याची कला गाई-म्हशीला निसर्गानेच दिलेली आहे. केवळ शेतीतून किंवा शेतीशी निगडित व्यवसायातून उत्पादित होणार्‍या मालावर शासनकर्त्यांनी निष्कारण निर्बंध लादणे तेवढे थांबवले पाहिजेत.
…. बस्स एवढेच पुरेसे ठरेल शेतीच्या आणि देशाच्या विकासासाठी. 

                                                                                                                 – गंगाधर मुटे
——————————————————————————————————————————————————–