अभिप्राय

अभिनंदन..!!
              ज्याच्या अंत:करणात अभिजात कवितांच्या ओळीच्या ओळी सतत झंकारत असतात ते पुरूष भाग्यवान असतात. अशाच काव्यवृत्तीने झपाटलेल्या, कवी हृदयाच्या, तरल मनोवृत्तीच्या, श्रेष्ट पुरूषोत्तमाकडूनच दर्जेदार कवितासुद्धा लिहिल्या जातात. त्या कविता प्रसिद्ध होतात. रसिक वाचक अशा दर्जेदार कवितांना अप्रतिम दाद देतात. अशा चांगल्या कवितांचे जेव्हा संग्रह प्रसिद्ध होतात तेव्हा त्या कवितांना शाश्वत मूल्य प्राप्त होते.
          चांगली,लयदार,आशयघन कविता गंगौघासारखी असते. तिचा प्रवाह पवित्र असतो,निर्मळ असतो.अर्थाचे आणि अभिव्यक्तीचे दोन्ही काठ ती कविता समृद्ध करते.गेली सातशे वर्षे अभिजात मराठी काव्यविश्व असेच बहरले आणि काव्यरसिकांकडून असेच जोपासले गेले.
           तेराव्या शतकाच्या उत्तरचरणात ज्ञानदेवांसारखा अवतारी महापुरूष आळंदीत अवतरला. नेवाश्यात गीताभाष्याच्या निमित्ताने काव्यगंगेचा उगम झाला आणि अनेक वळणे घेत एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात ही काव्यगंगा वर्धा जिल्ह्यातल्या छोटी आर्वी ह्या छोट्या गावात वळणे घेत घेत, येवून पोचली. श्री गंगाधर मुटे  ह्या आर्वी गावातल्या एका अभिजात कवीच्या काही कविता वाचनात आल्या आणि माझे काव्यभारले मन एकदम प्रसन्न झाले. कवी गंगाधर मुटे यांचे सर्वात मोठे यश हे आहे की, त्यांच्या एकूणच काव्यविश्वाला वृत्ताचे भान आहे. शब्दकळा त्यांच्यावर प्रसन्न आहे. विशेषत: ‘माय मराठीचे श्लोक’ हे भुजंगप्रयातातील श्लोक तर उत्तमच आहेत. मराठी भाषेचे पदलालीत्य प्रस्तुत पाच श्लोकांमधून खूप सुरेख प्रगट झालेले आहे. 
            कवी गंगाधर मुटे हे सहृदय अंतकरणाचे कवी आहेत ह्याच्या अनेक खुणा प्रस्तुतच्या ‘रानमेवा’ मध्ये मला प्रत्यक्षात जाणवल्या. त्यांचे “पहाटे पहाटे तुला जाग आली” हे विडंबनकाव्य वाचतांना मला आचार्य अत्रे [केशवकुमार] ह्यांच्या काही विडंबन कवितेच्या ओळींची आठवण झाली.
          ‘आर्वी’सारख्या छोट्या गावात राहून कविता जोपासणे एवढे सोपे नाही. परंतु कवी गंगाधर मुटे ह्यांनी उजव्या हाताच्या तळव्यावर नंदादीप जपावा तसे आपले पवित्र काव्यविश्व फ़ार उत्कटतेने जोपासलेले आहे. त्यांच्या हातून अधिक उत्तम कविता लिहिल्या जातील ह्याची मला निश्चितपणे खात्री वाटते. प्रस्तुत संग्रहातील विशेष उल्लेखनीय कविता म्हणून मी “हताश औदुंबर” ही कविता निवडेन. सद्यस्थितीवर इतके उत्तम भाष्य फ़क्त श्रेष्ठ कवीच करू शकतो ह्याचे ही कविता म्हणजे उत्तम उदाहरण ठरेल. 
     माझ्या अंत:करणपूर्वक शुभेच्छा.       

                                                  वामन देशपांडे
                                    १३, प्रियदर्शिनी, अग्रवाल हॉल लेन
                              मानपाडा रोड, डोंबिवली,पूर्व(मुंबई) ४२१२०१ 
………………….. **…………. ……… **………….. **…………. 

अभिप्राय

             ‘रानमेवा’, हा गंगाधर मुटे यांचा कवितासंग्रह प्रकाशित होतोय, हे वाचून आनंद झाला.ह्या पहिल्या-वहिल्या संग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा.
              गंगाधर मुटे हे केवळ हाडाचेच नव्हे तर वर्‍हाडाचे-विदर्भाचे शेतकरी आहेत हे त्यांच्या कविता वाचल्या की ठळकपणे लक्षात येतं. त्यांच्या कवित्ता-गझलांमधून वर्‍हाडी-वैदर्भी बोलीचे अनेक शब्द येतात. तोंडवळा हरवलेल्या शहरी गर्दीत गावाकडचा माणूस अकस्मात भेटल्यावर होणारा हरीख अशा शब्दांनी मला भरभरून दिला आहे.अर्थात अशी शब्दपेरणी त्यांनी मुद्दाम केलेली नाही तर लिहिण्याच्या ओघात ते शब्द सहज आलेले आहेत.
             शेती-मातीच्या कवितेतला आंतरिक ओलावा त्यांच्या शब्दाशब्दांतून पाझरतो. त्यामुळे ती कविता केवळ हवेतली न वाटता तिच्या पाळामुळांना झोंबलेल्या काळ्या मातीचा गंध शब्दाशब्दांतून जाणवतो. 
‘असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी.’
अशा किती तरी ओळी मनात रेंगाळत राहतात.
             मुक्तछंदाच्या आजकालच्या चलतीच्या काळात ‘सुमंदारमाला’ सारख्या वृत्तात लिहिण्याची जोखीम स्वीकारणे ही सोपी गोष्ट नाही.आणि त्या सोबत गझलसारख्या काव्यप्रकारातली त्यांची वाटचाल पाहिली की वाचकांनी त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा ठेवाव्या, हे स्वाभाविक आहे.
‘भरारीस उत्तुंग झेपावतो मी, कवी कल्पनेला अभय गाठतो
परी वास्तवाने घरंगळत येता, उरे एक भूमी दुजे ना कुणी.’ 
ही ‘भूमी’ अशीच पायाखाली आधाराला राहो.दिसामासानं वाढणार्‍या कवितेतलं नवखेपणाचं न्यून सरत जावो आणि मायबोलीचे हे नमन सुजलाम,सुफलाम होवो. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास-
‘जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकात एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो बायबोली!’
मन:पूर्वक शुभेच्छांसह
                                                     – डॉ.श्रीकृष्ण राऊत
                                                             अकोला
……… **………….. **…………. **…………..**………… 
अभिप्राय

                श्री गंगाधर मुटे यांच्या कविता माझ्या अवलोकनात प्रथम मायबोली या वेबसाईटवरून आल्या. माझ्या आठवणीप्रमाणे नोव्हेंबर/डिसेंबर२००९ मध्ये असाव्यात. तेव्हापासून आजपर्यंतच्या उण्यापुर्‍या ८/९ महिन्यांच्या कालावधीत इतके विविध विषय आणि काव्यप्रकार त्यांनी हाताळलेले आहेत की कोणालाही कौतुकाश्चर्य वाटेल. केवळ शेतकर्‍यांच्या व्यथाच नव्हे तर निसर्गवर्णन, राजकीय उपरोध, नर्म विनोद आणि अगदी खळखळून हसायला लावणार्‍या कवितादेखील त्यानी अगदी कुशलतेने लिहिल्या आहेत. त्यांनीच निर्माण केलेल्या ‘नागपुरी तडका’ या काव्यप्रकाराची खुमारी तर काही औरच आहे. गझल या लोभसवाण्या काव्यप्रकाराचे तंत्र अवगत करून घेण्याच्या धडपडीतून आणि पाठपुराव्यातून नवे काही शिकण्याची त्यांची वृत्ती माझ्या निदर्शनास आली आणि मला खरोखर कौतुक वाटले. त्यांच्या सर्वच कविता वाचनीय आणि काही श्रवणीयही आहेत. मला खास आवडलेल्यांमध्ये ‘हवी कशाला मग तलवार, औंदाचा पाऊस, हताश औदुंबर, सरबत… प्रेमाच्या नात्याचं, स्मशानात जागा हवी तेवढी’ इत्यादींचा आणि सगळ्याच नागपुरी तडक्यांचा समावेश आहे.
श्री गंगाधर मुटे यांना त्यांच्या ’रानमेवा’ या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्ताने मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
                                                        मुकुंद कर्णिक
                                                    P.O.Box 262434
                                           दुबई, संयुक्त अरब अमिराती.
                                        http://mukundgaan.blogspot.com 
….**….**….**….**….**….**….**….
अभिप्राय

                   श्री गंगाधर मुटे यांच्या कविता मी ”मायबोली” या साईटवर वाचत असते. मुटे यांच्या कविता विविध विषयांवर आहेत. त्यांनी गेय कविता, लावणी ,लोकगीत, बालगीत, हायकू, गझल असे अनेक काव्यप्रकार सक्षमतेने हाताळले आहेत. त्यांचा ”नागपुरी तडका” हा काव्यप्रकार अनेक वाचकांना फारच आवडतो. ग्रामीण भाषेतील हा काव्यप्रकार समाजातील रूढी, परंपरा, व एकंदर विचार- सरणीचं अचूक दर्शन घडवितो. श्री गंगाधर मुटे यांच्या ”रानमेवा” या काव्यसंग्रहास तसंच त्यांच्या पुढील लेखनास लाख लाख शुभेच्छा.
                                                     छाया देसाई
                                              सिडनी, आस्ट्रेलिया 
……… **………….. **…………. **…………..**………….. 
अभिप्राय

                    गंगाधर मुटे हे नाव एक दिवस असंच मायबोलीवर (जिथे माझा नेहमीच राबता असायचा-असतो) झळकलं… शेतकर्‍यांच्या प्रश्नावर तळमळीनं लिहिणारा असा कोणीतरी मायबोली परिवारात सामील झाला असं माझ त्यांच्याबद्दलच पहिलं-वहिलं मत होतं! शहरी अनुभवांची रेलेचेल असलेल्या मायबोलीवर हा नवा चेहरा सगळ्यांनीच सहर्ष स्वीकारला. शेतकर्‍यांवर-त्यांच्या प्रश्नांवर लेख लिहिणारे मुटे धीरे-धीरे मायबोलीसारख्या आंतरजालीय व्यासपीठावर बरंच काही लिहायला लागले… कविता हे मात्र त्यातलं सगळ्यात मोठं डबुलं होईल हे मला त्यांची पहिली कविता वाचतांना वाटलं नव्हतं…
                    मुट्यांची पहीली कविता मी केंव्हा वाचली ते आता आठवत नाही पण मुटे एकदम डोळ्यात भरले ते त्यांच्या ’’नागपुरी तडका” या प्रकारातील कवितांमुळे. मुटेंच्या कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातला earthy इंटेलीजन्स अन्‍ त्याचा कवितांमधे केला गेलेला उपयोग. माझ्यासारख्या मराठी साहित्यापासून दशकभरापासून दूर गेलेल्या माणसाला त्यांच्या कवितांमधला हा भाग पुरेपुर भावला. तेच झालं इतर शहरी अभिरुचीत वाढलेल्या वाचकांचं अन् त्यांनी मुट्यांना खूप उत्तेजन दिलंही.
                     मी पूर्वी कधीही काव्यलेखन केलं नव्हतं हे मुटेंच वाक्य मी बरेचदा ऐकलंय. पण त्या उशिरामुळे त्यांच्या लेखनात एक प्रगल्भता जाणवते. मुट्यांनी मग कविता, लावणी, अभंग, लोकगीतं या सगळ्या प्रांतात केलेल्या मुशाफिरीचा मी वाचक अन्‍ अवलोकक राहिलोय. मुट्यांनी मला अतिशय प्रभावित केलं ते त्यांच्या गझल शिकण्याच्या वेडामुळे. त्यांनी आंतरजालावर जेव्हढे तज्ज्ञ लोक असतील त्यांना प्रश्न विचारुन आपलं तांत्रिक ज्ञान वाढवलं. जे काही आंतरजालावर उपलब्ध होतं ते मुट्यांनी पक्कं आत्मसात केलं अन्‍ माझ्यासारख्या इतरांनाही वेळोवेळी पुरवलं. मुटेंची गझल नवी आहे पण त्यात चमक आहे. चाकोरीबाहेरचं लिहायचा प्रयास आहे. तसंच त्यांच्या कवितेविषयीही …… त्यांची कविता प्रामाणिक आहे, परिणाम साधणारी आहे.
                माझ्या इंग्रजी माध्यमातल्या मुलानं कबीरनं जेंव्हा, “श्याम्यानं इचीभैन कहरच केला… मुंबैले बिपाशासाठी लुगडं घेऊन गेला” हे मुट्यांनी रेकॉर्ड करुन पाठवलेलं त्यांच नागपुरी तडक्याचं सँपल ऐकलं तेंव्हा तो त्यांच्या प्रेमातच पडला… माझ्या कविता कधीही न ऐकणारा माझा मुलगा मुट्यांच्या कवितेशी मात्र चटकन समरसून गेला. हे त्यांच्या कवितेचं यश आहे. मुट्यांचा तंत्रज्ञानाचा वापर अन् ते जास्तीत जास्त वापरण्याकडचा कल अतिशय कौतुकास्पद आहे. 
              गंगाधरराव मुटे अजून बरच काही लिहिणार आहेत … “रानमेवा” ही तर फक्त सुरुवात आहे! माझ्यासाठी ही सुरुवात उत्साहवर्धक आहे. कारण यातनं साहित्य लोकाभिमुख व्हायला खूप मदत होणार आहे. 
गंगाधरराव मुटेंना माझ्या हार्दिक शुभेच्छा !!!!
सस्नेह ,                                        गिरीश कुलकर्णी 
                                        १, हार्बर रोड, वानचाय, हाँगकाँग 
                                        http://maitreyaa.wordpress.com 
………………….. **…………. ……… **………….. **…………. 
अभिप्राय

                 “रानमेवा” कविता संग्रह पाहिला….as usual, जबरदस्त आहे…. काही काही कविता मायबोलीवर आधी वाचल्या होत्या, तरीही पुन्हा वाचताना नव्याने अर्थ उलगडत गेला. प्रत्येक कविता ही आधीच्या कवितांपेक्षा वेगळी आहे आणि मुटेंच्या शब्दशैलीबद्दल तर मी काय बोलावे? एखादी कविता अगदी साध्या शब्दात तर एखादी एकदम लयबध्द वृत्तामध्ये बांधलेली… खूपच सुंदर..! “नागपुरी तडका” आणि “प्राक्तन फ़िदाच झाले” ही गझल लिहिणारी व्यक्ती एकच आहे यावर विश्वास बसत नाही…. मुटेंच्या लिखाणामधे खूप विविधता आहे…..!!!
                    बर्‍याच कवितांमध्ये त्यांनी शेतकर्‍याला वाचा फ़ोडली आहे. आपल्यासाठी अन्नधान्य पिकवणारा शेतकरी स्वत:च कसा अन्नासाठी गळफ़ास लावून घेतो हे त्यांच्या कवितांमधून खूप जाणवते आणि मन हेलावून टाकते.
                  “रानमेवा”ला भरभरून शुभेच्छा आणि आम्हाला असाच नवनवीन आंबट-गोड “रानमेवा” चाखायला मिळत राहावा, ही सदिच्छा…! 
                                                               स्वप्नाली गुजर 
                                                     डेट्रॉइट, मिशीगन, अमेरिका
…………….. **………….. **…………. **………….
अभिप्राय

                      कविता वाचणे किंवा कवितेत रमणे हा माझा छंद निश्चितच नाही. किंबहुना, कविता सोडून इतर साहित्य प्रकार वाचणे हाच माझा छंद! परंतु श्री मुटे साहेबांच्या कविता ‘मायबोली’ संकेतस्थळावर वाचनात आल्यानंतर मला त्यांच्या कविता आवडू लागल्या. शेती आणि ग्रामीण जीवनाबद्दलची त्यांची तळमळ लक्षात आली. ग्रामीण जीवनाचे केवळ काव्यात्म आणि आभासी वर्णन न करता सडेतोड लेखणीतून वास्तवचित्रच समोर उभे करणे ही श्री मुटे साहेबांची खासियत आहे. 
                   वेगवेगळ्या काव्य प्रकारावरील त्यांचे प्रभुत्व प्रशंसनीय आहे. केवळ ग्रामीण जीवनच नव्हे तर रोजच्या जीवनातील अनेक प्रश्न ते प्रभावीपणे हाताळत आहेत. शेती अन् ग्रामीण जीवनाचे वास्तव शहरी लोकांसमोर ठेवणे अन् आभासी जीवनातून प्रत्यक्ष जीवनाचे वास्तव त्यांना अनुभवायला लावणे, ह्या मुटे साहेबांच्या प्रयत्नामुळे शहरी अन् ग्रामीण लोकांमध्ये एक खरा ‘भाव-बंध’ निर्माण करील अशी अपेक्षा! 
त्यांच्या लेखणीला प्रचंड यश लाभावे ही ईश्वर चरणी प्रार्थना! 
                                                   डॉ भारत करडक
                                                      करडकवाडी, 
                                         ता: नेवासा, जि: अहमदनगर 
…………… **…………. ……… **………….. **…………. 
अभिप्राय

“रानमेवा” या पहिल्या वहिल्या कविता संग्रहाला मनापासून शुभेच्छा !!
                    गंगाधर मुटे यांचे लिखाण अतिशय प्रामाणिक आहे आणि त्यामुळेच ते अगदी आतपर्यंत पोचतं. आपल्या आजुबाजूला घडणार्‍या सगळ्या गोष्टी त्यांच्या कवितेतून अगदी लख्ख दिसतात. त्यांची वैदर्भीय बोली पण वाचतांना गोड वाटते. शेतावर जीव तोडून प्रेम करणारा शेतकरी त्यांच्या कवितेतून भेटतो. शेतकरी वर्गाची अगतिकता, मेहेनत, गरीबी, असहायपणा…. सगळं सगळं त्यांच्या शब्दातून फारच समर्थपणे व्यक्त होतं. कवितेचे विविध प्रकार त्यांनी अगदी सहजतेने हाताळले आहेत. त्यांचा हा काव्यप्रवास, असाच अखंड सुरु राहो !!
                                              जयश्री अंबासकर, कुवैत
                                            http://jayavi.wordpress.com 
…………….. **………….. **…………. **………….
अभिप्राय

                         अभ्यासपूर्ण आणि अस्सल काव्यातून मुटेजींनी, परिस्थितीने पिचलेला, गांजलेला शेतकरी, त्याचं वास्तव जीवन, त्याची दु:खं अगदी स्पष्टपणे, सडेतोड मांडलंय, याच बरोबर या बळीराजावर शासनाकडून आणि अनेक बाजूनी होणाऱ्या अन्यायावर तर त्यांनी आसूड ओढले आहेत.
                     मुटेजींच्या या कविता वाचून तर माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांना नक्कीच थोडा आधार मिळेल, नवी उभारी मिळेल यात शंका नाही. 
“रानमेवा” या पहिल्या काव्यसंग्रहास माझ्या हार्दिक शुभेच्छा ! 
                                                अनिल मतिवडे, पुणे
…………….. **………….. **…………. **………….
अभिप्राय

              इतका सुंदर आणि वैविध्यतेने नटलेला ’ओला’मेवा प्रकाशित करीत असल्याबद्दल प्रथम धन्यवाद. मुटे यांच्या निसर्गप्रेमावरील कविता छान असायच्या. त्यात अजून भर घालून त्यांनी देशप्रेम,वस्तुस्थिती,सामाजिक असे वेगवेगळे विषय हाताळले आहेत. गंमत म्हणजे निव्वळ लिहायचे म्हणुन त्यांनी लिहिले नसून ते अंतर्मनाने लिहिले गेले आहे. त्यांच्याबद्दल मला विशेष आदर आहे, तो यासाठी की ते खूप विनम्र आणि प्रांजळ आहेत. काव्य या प्रकाराचा ते आदर करतात आणि त्याविषयी आपले मत प्रदर्शनही करतात.
या संग्रहातील “घायाळ पाखरास” “आईचं छप्पर” आणि “हवी कशाला मग तलवार” हे मला विशेष आवडले. 
त्यांच्या विडंबन काव्यशैलीबद्दल काय बोलावे? विडंबनकाव्य किती सरस लिहिले जावू शकते, हे त्यांच्याकडूनच शिकावे.
                मुटेजी अगदी सहज कवितेतून गझल या प्रांतात शिरले आणि चक्क राज्य करू लागले! हे सर्व पाहता त्यांच्याकडे अनुभवांची शिदोरी आणि सृजनशीलतेची समृद्धी किती आहे हे समजते. अशीच त्यांनी साहित्यात समृद्ध भर घालावी अशी सदिच्छा.
                                             अलका काटदरे, मुंबई
…………….. **………….. **…………. **…………. 
अभिप्राय

                वर्धा हा महाराष्ट्रातील एक छोटासा जिल्हा, पण बहूपरिचित अशी ही भूमी. सर्वच सेवा कार्यात अग्रेसर असा परिचय असलेली. ‘वरदा’ या पवित्र संतसंगी मायगंगेने आपले कृपेचे आवरण दिले म्हणूनच या जिल्ह्याला ’वर्धा’ हे नाव पडले. ही भूमीराष्ट्रपिता म.गांधी,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत विनोबा भावे यांच्या चरणस्पर्शाने व विचाराने पवित्र झालेली, म्हणूनच संपूर्ण देशात या जिल्ह्याचा वैशिष्ट्यपूर्ण परिचय आहे. या जिल्ह्यात कवी,लेखक,कीर्तनकार, समाजसेवक, दानशूर कार्यकर्ते भरपूर आहेत.
                  याच जिल्ह्यात, हिंगणघाट तालुक्यात आर्वी (छोटी) हे छोटेसे गांव. ’छोटी’ या शब्दातच या गावाचे लडिवाळे प्रेम भरले आहे. श्रमाचे व्रत घेऊन जगणारे श्रमनिष्ठ शेतकरी असलेले हे गांव. या गावात एक कवी जन्माला आला. त्याचे नाव श्री गंगाधर मुटे. व्यवसायाने शेतकरी. श्रमनिष्ठेचे व्रत घेतलेला, बुद्धीमान, प्रारंभिक जीवनात शेतकरी संघटनेच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन शेतकर्‍यांच्या समस्या शासन दरबारी मांडल्या. शेतकरी संघटनेच्या यशस्वी आंदोलनात त्यांना समाजाचा अभ्यास झाला. हा अभ्यासकेवळ बुद्धीवादातला नव्हता तर अनुभवातून आलेला होता, म्हणूनच त्यांची लेखनी कविता लिहिण्यास सिद्ध झाली व त्यातूनचत्यांच्यातल्या कवीने जन्म घेतला व आज एक “अनुभवसिद्ध रानमेवा” हा कविता संग्रह त्यांनी लिहिला. ह्या कविता आपण वाचत गेलो की आपले हृदय हेलकावे खाते व भावना सद्भावनेमध्ये रूपांतरित होऊन समाजाच्या सुखदु:खात एकरूप होतात. एवढी श्री मुटे यांच्यालेखणीची ताकद आहे. या संग्रहातील कविता समाजकार्याच्या प्रेरणा देतात. एवढा मोठा अधिकार श्री मुटे यांचा असतांना मला त्यांनीया पुस्तकासाठी अभिप्राय मागितला हे त्यांचे माझेवरील प्रेम होय. वास्तविक माझ्यात ही ताकद नाही पण फुलावर फुलपाखरू बसले की, फ़ुलाच्या रंगात थोडी का होईना पण भर पडते, असा हा प्रसंग आहे.
                 ह्या कविता घराघरात वाचल्या जाव्यात व त्यातून चारित्र्यसंवर्धन व व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण व्हावी हीच माझ्यासारख्याची अपेक्षा राहील. व्यक्तिमत्त्वविकासाशिवाय देशाची प्रगती होत नाही, देशाच्या विकासासाठी समर्पित व्यक्तिमत्त्वाची माणसं लागतात ती या कवितारूपी सुगंधातून घडावी एवढीच आशा व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी अंत:करणपूर्वक शुभेच्छा देतो.
वर्धा : १०.१०.२०१०                               प्रकाश महाराज वाघ
                                                            माजी सर्वाधिकारी
                                        अ.भा.श्री गुरुदेव सेवा मंडळ,गुरूकुंज मोझरी
……… **………….. **…………. **…………..**…………

One comment on “अभिप्राय

 1. प्रिय गंगाधर,
  मी रानमेवा काव्यसंग्रह अत्यंत काळजीपुर्वक वाचला.
  सर्वच कविता ग्रामीण जीवनाशी निगडीत असून निसर्गाशी नातं सांगणार्‍या आहेत.
  नागपुरी तडक्यासहीत सर्वच काव्यप्रकारातील कविता खूप interesting आहेत.
  शरद जोशींनी लिहिलेली प्रस्तावना तर अप्रतिमच.

  पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा.

  वसंत मुटे
  वर्धा

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s