हिमालयाची निधडी छाती….

हिमालयाची निधडी छाती….

चंद्र मेघात झाकलेला अन, नदीस पूर होता
भटकल्या होडीत ’ती अन मी’ किनारा दूर होता..

ढळलेल्या सांज समयासी, खुपच लांब बगीचा तो
धोतर्‍याचे फ़ूल तिला दिले मी, काय कसूर होता ?

ती मला गवसलीच नाही, हृदय जळतच राहीले
बर्फ़ात लपेटले हृदया, तरी निघत धूर होता..

झेलली किती आक्रमणे, माय मराठीने माझ्या
ना डगमगली कदापि, जो तीचा शब्द शूर होता..

धडकले ते रक्तबंबाळ झाले, युद्धखोर ते
टक्कर दिली! हा हिमालयाचा निधडा ऊर होता..

विलाप लोकसंख्येचा

विलाप लोकसंख्येचा ..
लोकसंख्या म्हणाली कवितेला
तुझ्यात सदा शृंगार, मुसमुसून वाहतो
म्हणून माझ्या कायेचा, आकार वाढत जातो….!

रुसवा फुगवा तुझ्यातला, नकळत लाडीगोडी
पिंगा फुगड्या तुझ्यातल्या, शब्दसंधानी खोडी
ओथंबलेल्या शब्दामधुनी, प्रेमरस वाहतो
म्हणून माझ्या कायेचा, आकार वाढत जातो….!

माझी शिंगे मलाच भारी, भुकेत झाली वृद्धी
कपडालत्ता औषधपाणी, काम करेना बुद्धी
गहू डाळी आयातीला, खोर्‍याने पैसा जातो
म्हणून माझ्या संतापाचा, उद्रेक वाढत जातो….!

ओलांडून ये सनातन रेघा, शृंगारी रसपरिघाच्या
माळरानी त्या कर विहार तू, अभये श्रमगळीतांच्या
पुसण्यास या ललाटरेषा, तुझ्यात तो पाहतो
म्हणून माझ्या करुणेचा, विलाप वाढत जातो….!



                                       गंगाधर मुटे

………… **………….. **…………. **…………

औंदाचा पाऊस

औंदाचा पाऊस

सायबीन झालं पोटलोड, पराटी केविलवाणी
कोमात गेलं शिवार सारं, व्वा रे पाऊसपाणी ……!!

उन्हाळवाही-जांभूळवाही, शेती केली सुधारीत
बी-बेनं खत-दवाई, बीटी आणली उधारीत
नवं ज्ञान, नवं तंत्र, उदीम केला पुरा
पावसाच्या उघाडीनं, स्वप्न झालं चुरा
खंगून गेली कपाशी, बोंड बोरावाणी ……!!

बेनारचा बाबू म्हणे कापूस नाही बरा
औंदा पेर सायबीन, बरकत येईन घरा
नाही उतारा तिलेबी, खासर उलार होते
रोग झाला गेरवा,एकरी दीड पोते
बिनपाणी हजामत, चीत चारखानी ……!!

सायबाचं दप्तर म्हणते, पीक सोळा आणे
अक्कल नाही तूले म्हून, भरले नाही दाणे
विहिरीत नाही पाझर, नयनी मात्र झरे
किसाना परीस कईपट, चिमण्या-पाखरं बरे
भकास झालं गावकूस, दिशा वंगळवाणी …..!!

                                         गंगाधर मुटे
………… **………….. **………….**…….
ढोबळमानाने शब्दार्थ :
पोटलोड = जमिनीतील अपुऱ्या ओलाव्यामुळे
दाण्याची पूर्ण वाढ होण्यापूर्वीच शेंग पक्व होणे.
पराटी = पऱ्हांटी,कपाशीचे झाड.
बेनार = कृषी विषयक सल्ला देणारा शासकीय विभाग
खासर = बंडी, शेतीमाल वाहतुकीसाठी बैल
जुंपून वापरावयाचे साधन.
गेरवा = तांबेरा नावाचा रोग, झाडाची पूर्ण वाढ न
होता पिक कापणीला येते.
खासर उलार होणे = लाक्षणिक अर्थाने व्यवस्था
कोलमडणे. घडी विस्कटणे
……………………………………………..

माणूस

माणूस 

अरे माणूस माणूस
जसा निर्ढावला कोल्हा
धूर्त कसा लबाडीने
रोज पेटवितो चुल्हा ……!

अरे माणूस माणूस
जसा बक समाधिस्थ
मिष साधूचे घेवूनी
करी सावजाशी फस्त …..!

अरे माणूस माणूस
जसं सरड्याचं अंग
वेळ तशी खेळे संधी
बदली चामडीचे रंग ……!

अरे माणूस माणूस
जसा श्वान पोळी खाया
झगडितो आप्तियांशी
नाही दया, नाही माया……!

अरे माणूस माणूस जसा 
इंगळीचा चावं 
एक बोल जिभलीचा 
देई कलिजाला घाव ……!  

अरे माणूस माणूस 
जसा कुंभाराचा खर 
फुकामधी ओझे वाही 
वर चाबुकाचा मार ……!  

अरे माणूस माणूस 
कसं निसर्गाचं देणं? 
गुण श्वापदाचे अभये 
नाही मानवाचं लेणं ……!

                      गंगाधर मुटे
………… **………….. **……..

शल्य एका कवीचे


शल्य एका कवीचे


तो कवी! शब्दप्रभू, अद्भुत प्रतिभाधनी
ओघवती, रसाळ, सोज्वळ त्याची काव्यवाणी……!

कैक संग्रह छापून त्याने, खपविले रातोरात
रसिक समग्र, काव्यात त्याच्या, चिंब-चिंब न्हात
आवेशाने करी वाचन, उधळीत काव्यफुले
हेलाविती तनू-मने, वृद्ध, तरुण, सानुले
शासनाने केला त्याचा, सत्कार शालपांघरी
समीक्षक म्हणती “असा न् होणे” कवी जन्मांतरी
प्रेमरसावर वाहे त्याची, अखंड काव्य सरिता
प्रेमी युगुले रंगून गाती, त्याच्या प्रणयकविता
परी हृदयी शल्य एकची, कायम ही छलना
जीवनी त्याच्या, बनुनी प्रेमिका, ना ये कुणी ललना

“लाख दिलांच्या गळीचा ताईत” मिरवे बिरुदावली
गळात त्याच्या अजुनी नव्हती, एक वारू गावली
सांजसकाळी, ऐन दुपारी, ठाके ना त्याचे चित्त
खाण्यापिण्याशी मन लागेना, एवढ्याची निमित्त
जलात हलते पाय सोडूनी, गावी प्रेम गाणी
कधी येशील गे! रूपमोहिनी मम हृदयराणी
नित्य नेमाने असेच स्वप्न, उघड्या डोळ्या पडे
दचकणे, नेत्र मिचकने, क्षणाक्षणाला घडे
वर्षामागुनी अशीच वर्षे, वर्षे उलटली बारा
अढळ, निश्चल, अचल राहिला, सोसुनी ऊन वारा
प्रेमाराधना, त्याची अर्चना, आसमंता कळाली
प्रेम देवता प्रसन्न झाली, तपश्चर्या फळाली

एक दिवस टक लावूनी, होता क्षितिजाकडे
दूरवर दिसली, एक कामिनी, येत त्याच्याकडे
त्याचे हृदय हलले, अंतरंग फुलले, आली एक झुरझुरी
शहारले अंग, उठले तरंग, रसनाही थरथरली

पाहता अवखळ चंचला, जसा कनक कुंचला, काळीजा रूतला, तीर आरंपार
वाहता खळखळ झरा, जशी भोवळ गरगरा, येतसे तरतरा, झुळूक थंडगार

मग त्याला खात्री पटली
आजवर जी स्वप्नी नटली
मनःचक्षू जीस्तव झटली

ती हीच स्वप्नीची ज्वाला, जिवलग मंदारबाला
हुरूप असा की आला, मग बोलीला गहीवरुनी

मग उठती स्फूर्ती तरंग
त्या अद्भुत प्रतिभेसंग
प्रकटती इंद्रछटांचे रंग
त्याच्या वाणीमधुनी

हे सुंदरी, मदन मंजिरी, कपोल अंजिरी, अधर अंगुरी, अतिसुकुमार
चंचल नयना, मंजुळ मैना, कोकिळ गहिना, प्रीती ऐना, नासिका चिरंदार
रूप साजिरे, मुख गोजिरे, लावण्य लाजिरे, तारुण्य माजिरे, चालणे ठसकेबाज
जशी उमलली,चाफ्याची कली,झुलती रानवली,अल्लड सुकमली,मुसमुसता साज

देवे घडवली, मूर्त मढवली
साजे चढविली, सृष्टीच्या अमोल तारा
स्वप्न साकारा, आले आकारा
दे तू होकारा, होशील का अर्धांगी दारा?

रसभरी मस्केगिरी ऐकुनी, प्रिया ती हसली
जळात हलते पाय सोडूनी, पाषाणी बसली
मग हळूच वदली, अती मंद-मंद मृदुभाषी
जसे रुणझुण पैंजण की, गुणगुणती मधमाशी

तुम्ही घातले साकडे, बोलुनी बोल धाकडे
मनही आल्हादले गडे, पण बोलू कशी खोटी?
माझ्या रूपाचा रंग भिन्न, चिंता घोर चित्त विषण्ण,
कसा व्हावा प्रेमरंग मान्य व्याकुळल्या पोटी?
गडे स्वीकारू कसा? तवं प्रीतीचा वसा
तन्मयतेने असा? फुकाच्या शब्दे

देवे घडविली मला, तसाच घडविला
बापू, माई आणिक भाऊ तान्हुला
सृष्टीचे अघटित चक्र, बापूला आले अंधत्व
आई पांगळी, दिले नियतीने मला पालकत्व
प्रश्न तोलाचा, लाख मोलाचा, उदरभरणाचा
घोट दुधाचा, ओठ तान्ह्याचा, सवाल जीवनमरणाचा
घरी उपाशी बसली सारी, रस्त्याला टक लावूनी
म्हटले “येते तान्हुल्या, थोडा दूधभात घेवूनी”
पदरी नाही अडकू-खडकू, कसे आणावे दूध कुठूनी?
तुम्ही माझा वेळ दवडला, तुमच्या कविता ऐकवूनी
उत्तम आहे तुमच्या कविता, मनही मस्त रमले
पण पोटातील काहूर माझ्या, जराही न् शमले

‘येत्ते मी आत्ता’ म्हणुनी, गेली निघूनिया तरतरा
ठेवूनी त्याच्या हातावरती, बेरंगी मोतीतुरा

त्या मोतीतुर्‍याच्या अजुनी नाही, फुटल्या प्रेम लाह्या
शोधीत आहे, तो वेडा बापडा, अजुनी प्रेम छाया

अभय रसिकहो, तुम्हांस दिसली, कुठे ती नयन मोहिनी,
द्यावा निरोप तिजला, तो कविराजा, वाट पाहतोय अजुनी……!

                                                                   गंगाधर मुटे
* * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** 

घायाळ पाखरांस

घायाळ पाखरांस …
का गळाले अवसान या करांचे ?
का भासते मलूल फडफडणे या परांचे ?
आल्या अवचित कुठूनी अनाहूत गारा ?
तुला लोळविले भेदुनी तुझा निवारा …..!

दृढ हिकमतीने तू घरटे बांधियेले,
अगम्य कला गुंफुनी अध्धर सांधियेले,
विसरुनी भूकघास, प्राण ओतलास,
वादळात क्षणाच्या झाले सारे खल्लास …..!

गठन-विघटन असे सृष्टीचक्र,
उर्वीही कंपविते होतां दृष्टीवक्र,
उन्मळती तरूही जलप्रलयाने,
रे त्रागा अनाठायी, वियोग आशयाने ……!

सावर विच्छिन्न परं, घायाळ काया,
हो सिद्ध, धरी जिद्द, फिरुनी श्रमाया,
बाधित वेदनांनी, जरी ऊर धापे,
साधित काय होई, रुदन विलापे ? ……!

मेघ येती, विरती, पावती लयासी,
वारा, त्या गारा, अस्तल्या निश्चयासी,
न चिरंतन काही, क्षणभंगुर पसारा,
मग व्यर्थ का रे! शोक अंगीकारा ? ……!
  
रुदन, विलाप असे कायरत्व,
दान आर्जव दूषित याचकत्व,
सज्ज हो झुंजण्या, करुनी चित्त खंबीर,
विपत्तीशी टक्करतो, तोच खरा वीर……!

अनुकंपा, याचना, पसरणे हात,
त्यास म्हणतात मनुजाची जात,
तुम्हा पाखरांची स्वावलंबी पक्षीजात,
स्वसामर्थ्याने करावी अरिष्टावर मात …….!

सरोज तेथे पंक, फ़ूल तेथे काटा,
अवघड दुर्गम्य, होतकरुंच्या वाटा,
पार करुनी जाणे, विपत्ती सावटांना,
अंती जय लाभे, हिकमती चिवटांना ……!

सरसर शर सुटावा, चाप ओढताची,
धक धक उरी धडकी, नाद ऐकताची,
तसे तुझे उडणे, कापीत नभांगणाला,
जणू शूर शोभे, रणांगणाला ……!

पाट पाण्याचे थिरकत तरंग,
वरी विह्नंगावा तोऱ्यात राजहंस,
तसा तूही विहर, घे कवेत दिशांना,
नव्हे धरा रे ! गगन तुझा बिछाना ……!

घे शोध स्वत्व, त्याग आत्मग्लानी,
वाली तुझा तूची, बळ अंगी बाणी,
लाली भोर ल्याली, सरली निशा काळी,
“धडपड” हीच किल्ली, भविष्या उजाळी …!

घे अभय भरारी मित्रा,
घे एकदा भरारी……! 
घे एकदा भरारी……!! 



                                 गंगाधर मुटे

……….. **………….. **…………. **…………..   

तू हसलीस

तू हसलीस …

तू हसलीस, खेटून बसलीस
प्रिये तुझे चालणेही झोकात
पण खरं सांगू …..
तुझ्या एका स्यांडलच्या किमतीत,
माझे अख्खे ड्रेस होतात…..!

दोन दिलांचा प्रेमभाव
बरं असतं सांगायला अन् बोलायलाही
डोंगर दूर असला की
सुंदर दिसतो पाहायला अन् दाखवायलाही
पण एकदा तरी त्यांना
जाऊन विचार चढणार्‍यांना
दऱ्या-खोऱ्या, दगड अन् धोंडे
सुकून जातात पाण्यावाचून तोंडे,
उरात धाप लागते चढताना
पाय तुटायला होतात उतरताना
डोंगर तितका सुंदर नसतो
जितका लांबून दिसत असतो,
आणि तरीही तेथे …
स्वच्छ उन्हं अन् मोकळी हवा
मस्त विहंगतो पाखरांचा थवा
मोर- लांडोर नाचतात,पिसारा फुलवतात
अलबेल्या वल्लरींना,
झाडे झुडपे झोका झुलवतात
कारण ……….
त्यांच्यात असते एक शक्ती
पाषाणातून पाणी खेचण्याची युक्ती
तुझ्यात जर का असेल तसे बळ
तरच तू दमयंती अन् मी नळ
पण …….
चांदणे शिंपत जाणारी तुझी वाट
इथे ओघळतात नुसतेच घामाचे पाट
उगाच पसरू देऊ नको भावनांना पर
विवेकाला स्मर आणिक विचार कर
तद्‌नंतर अभयाने ……..

तू हां म्हण, ना म्हण, जशी तुझी इच्छा,
एरवी तुझ्या आयुष्याला, माझ्या शुभेच्छा …….!


                                                          गंगाधर मुटे
*      *       **      *       **      *       **      *       *

जरासे गार्‍हाणे

जरासे गार्‍हाणे 

कुठे नोंदावे गार्‍हाणे हत्तीने तुडवले तेव्हा
वार्‍याने उडवले आणि पावसाने बडवले तेव्हा ……!

आदर्शाच्या रेघा शिष्यांनीच पुसून टाकल्या
त्या महात्म्याला वारसाने रडवले तेव्हा ……!

त्यागुनी रणांगणाला पळपुटे जे पळाले
त्यांच्या पराक्रमाला कनकाने मढवले तेव्हा ……!

जीविताची राख ज्यांच्या, सिंहासने घडवताना
त्यांच्याच चामडीचे पायतणे चढवले तेव्हा ……!

बसवूनी खांद्यावर अभयाने आधार दिला,
तोच हितशत्रू ! कारस्थाने दडवले तेव्हा ……!

                                         गंगाधर मुटे
………… **………….. **………….**…….

शेतकरी मर्दानी

शेतकरी मर्दानी..!

काठी न घोंगडं घेऊ द्या की रं,
मलाबी रस्त्यावर येऊ द्या की …….!

या सरकारला आलीया मस्ती
कसे चाकर मानेवर बसती
ही विलासी ऐद्यांची वस्ती
लावती घामाला किंमत सस्ती
त्वेषाने अंबर चिरू द्या की रं ……!

ही सान-सान शेतकरी पोरं
ह्यांच्या बाहूत महाबली जोर
वाघा-छाव्यांची यांची ऊरं
घेती लढ्याची खांदी धुरं,
हातात रूमनं घेऊ द्या की रं ……!

हे फौलादी शेतकरी वीरं,
तळहातात यांचे शिरं,
लढायला होती म्होरं
मग येई सुखाची भोरं
धरणीचं पांग फेडू द्या की रं ……!

ही विक्राळ शेतकरी राणी
नाही गाणार रडकी गाणी
ही महामाया वीरांगनी
अभय गर्जेल शूर मर्दानी
उषेला बांग देऊ द्या की रं ……!

                          गंगाधर मुटे
………… **………….. **…………

मनसुबे मुंगळ्यान्ची

    मनसुबे मुंगळ्यांची

मनसुबे मुंगळ्यांची, ऐरावत बांधण्याची
काजवेच बाप झाली, सूर्य चांदण्याची…….!

रक्ताळला तसाची, घाम जिरून गेला,
स्वप्नेच वांझ झाली, प्रारब्ध गोंदण्याची…!

डुलतात रानवल्ली, त्यांना फाम असे का ?
मक्ते कुणा मिळाली, मुळे खोदण्याची….. ?

बिलग पाडसारे,  तू तुझ्या कळपाला,
चुल्हे निखार व्याली, तुला रांधण्याची…!

त्यागुनी रणांगणाला, अभय जे पळाली,
गर्दी त्यांचीच झाली, शौर्य नोंदण्याची…..!

                     गंगाधर मुटे
                 दि- २३ फेब्रुवारी २००२