मरणे कठीण झाले


मरणे कठीण झाले

जगणे कठीण झाले, मरणे कठीण झाले
शोधात सावलीच्या, पळणे कठीण झाले

ना राहिले जराही विश्वासपात्र डोळे
झुळझूळ आसवांचे झरणे कठीण झाले

हंगाम अन ऋतूही विसरून स्वत्व गेले
हा ग्रीष्म की हिवाळा, कळणे कठीण झाले

कलमा, बडींग, संकर; आले नवे बियाणे
पंचांग गावराणी पिकणे कठीण झाले

बाभूळ, चिंच, आंबा; बागा भकास झाल्या
मातीत ओल नाही, तगणे कठीण झाले

सोंगे निभावताना मुखडा थिजून गेला
माझी मलाच ओळख पटणे कठीण झाले

एकाच वादळाने उद्ध्वस्त पार केले
आयुष्य हे नव्याने रचणे कठीण झाले

दिसतात “अभय” येथे चकवे सभोवताली
रस्ताच जीवनाचा सुचणे कठीण झाले

                                           – गंगाधर मुटे
——————————————————
अवांतर :

याहो पवारदादा, इकडे अभय जरासे
चिक्कार घाम जाता –णे कठीण झाले
——————————————————

त्यांचाच जीव घे तू ….!

त्यांचाच जीव घे तू …..!

हा लावतो पुढारी घामास भाव सस्ता
म्हणुनी यमास झाला गिळण्यास गाव सस्ता

मातीत राबताना इतके कळून आले
फुकटात ठोस जखमा! प्रत्येक घाव सस्ता!!

पर्जन्य, पीकपाणी, दुष्काळ, कर्ज, देणी
शांती महागडी अन केवळ तणाव सस्ता

मरतोय अन्नदाता पर्वा न शासकांना
करतात भाषणे ते आणून आव सस्ता

लाठी उगारताना, बंदूक रोखताना
का वाटला तुला रे माझा उठाव सस्ता?

सत्याग्रहास आता रक्तात माखवावेह
शिकवू चला नव्याने क्रांतीस डाव सस्ता

शोधून शोषकांना तू लाव फास त्यांना
त्यांचाच जीव घेणे उरला बचाव सस्ता

शेतीत राबणाऱ्या खंबीर हो ‘अभय’ तू
एकीत चालण्याचा करूया सराव सस्ता

                             – गंगाधर मुटे
————————————————–

नाटकी बोलतात साले!

नाटकी बोलतात साले!

कोणीतरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे
नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे

भुकेचा प्रश्न सुटणारा नाही, तुझ्या भाषणाने, पण;
तू वाचाळ नाहीस अशी, खात्री तर पटली पाहिजे!

राजसत्ताच कोपली बघ, तुझ्या श्रमाच्या कमाईवर
तुझी शक्ती मनगटात तू, पूर्ण एकवटली पाहिजे

रावणांच्या राज्यात पुन्हा, सीता एकाकी पडलीय
भूमीच्या मुक्तीसाठी, तुझी काया झटली पाहिजे

देच तुतारी फुंकून तू, इथेच, याच स्थळी, अशी की;
क्रिया येथे आणि प्रतिक्रिया, दिल्लीत उमटली पाहिजे

मामला तीन पद भूमीचा, तुझ्या सिंगावर घेच तू
त्या बटू वामनाची सत्ता, “अभय” पालटली पाहिजे

                                                   – गंगाधर मुटे
———————————————————————————————————-

बटू वामन – शेतकर्‍यांना आत्महत्तेस बाध्य करून पाताळात गाडणारे सर्व सत्ताधारी म्हणजे बटू वामनाचेच वारस होय.
बटू वामन हा हिंदूचा देव आणि त्यावरच मी फक्त टीका केली आहे असे समजून हिंदूव्देष्ट्यांनी निष्कारण हुरळून जाऊ नये. कारण सर्वच धर्मांनी शेतकर्‍याला पाताळात गाडण्यासाठी कुठलीही कसर बाकी ठेवलेली नाही, यावर माझा प्रगाढ विश्वास आहे. एका शेरात सर्वच धर्माच्या प्रेषितांचा उद्धार करणे मला शक्य नसल्याने अपरिहार्यतेपोटी मी ’दुधाची तहान ताकावर’ या न्यायाने केवळ वामनाचाच उल्लेख करू शकलो, याची मला जाणीव आहे.
तसा मी आस्तिक, बर्‍यापैकी धार्मिक आणि देवपूजकही आहे.
———————————————————————————————————–

विद्यापिठाच्या Thesis मध्ये माझी वाङ्मयशेती



मराठी ब्लॉग्ज : एक अभ्यास (लघुशोधनिबंध)

                  सोलापूर दिव्यभारतीचे वरिष्ठ उपसंपादक श्री सिद्धाराम भै. पाटील यांनी 2011 मध्ये सोलापूर विद्यापिठात पत्रकारिता व जनसंज्ञापनचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तेंव्हा अभ्यास क्रमाचा एक भाग म्हणून थेसिस सबमिट करण्यासाठी ‘मराठी ब्लॉग्ज : एक अभ्यास’ या विषयावर लघुशोधनिबंध सादर केला. हा लघु शोध निबंध 2011 मध्ये सोलापूर विद्यापिठाला त्यांनी सादर केला आहे. जिज्ञासूंसाठी हा लघुशोधनिबंध येथे उपलब्ध करून देत आहे. त्यांनी संशोधनाकरीता निवडलेल्या १४ ब्लॉग्जमध्ये माझ्या “रानमोगरा – माझी वाङ्मयशेती” या ब्लॉगचा समावेश आहे. 
                                                                                                               – गंगाधर मुटे
PDF स्वरूपात वाचण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

—————————————————————————————————