एकदा तरी

एकदा तरी

सकाम कर्म त्यागुनी निदान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी

नसेल आपले तरी कशास हक्क सांगणे?
समानतेस न्याय दे किमान एकदा तरी

महान, थोर, श्रेष्ठ हे बिरूद फ़ार मिरवले
जगून दाव माणसासमान एकदा तरी

स्वराशिवाय रेकलो असाच मी बरेचदा
निघेल सूर कोकिळे समान एकदा तरी?

उदास चेहरा असा कसा मलूल जाहला?
हसा बघू जरा हळूच छान एकदा तरी

खरीदण्यास पाहतोस स्वाभिमान आमचा
करेन बंद मी तुझे दुकान एकदा तरी

सजा सुनावणे अभय कठीण काय त्यात; पण
बघा धरून आपलेच कान एकदा तरी

                                         गंगाधर मुटे
……………………………………………………………….

वृत्त : कलिंदनंदिनी
काफिया :  महान
रदीफ : एकदा तरी
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा
……………………………………………………………….

माझी मराठी माऊली : ओवी

माझी मराठी माऊली : ओवी

.
.

माझी मराठी माऊली, जसा ओंकाराचा वाण
शब्दशब्द मोहविते, हरपते देहभान             …॥१॥

माझी मराठी माऊली, शब्दामध्ये सरस्वती
ओव्या, श्लोक वाचुनिया, सारे जन सुज्ञ होती   …॥२॥

माझी मराठी माऊली, जसा गंगेचा प्रवाह
ओघवते उच्चारण, मन बोले वाह! वाह!!      …॥३॥

माझी मराठी माऊली, कोकिळेची कुहूकुहू
जशी पहाटेची साद, येते कानी मऊमऊ        …॥४॥

माझी मराठी माऊली, इंद्रधनुष्याचे रंग
आणि सुवासाने होई, चंपा, जाईजुई दंग      …॥५॥

माझी अभय मराठी, रेशमाची नरमाई
दिसे माऊली शोभून, सार्‍या जगताची आई    …॥६॥

                               गंगाघर मुटे “अभय”

……………………………………………………………..
सर्वांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
…………………………………………………………….

शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे

शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे
                  शेतक-यांच्या आत्महत्यांच्या समस्येवर सध्या बरीच चर्चा आणि उहापोह सुरू आहे. या समस्येची उकल करताना अनेक मान्यवरांनी शोधलेली कारणे आणि सुचविलेले उपाय बघितले तर “शेतकरी मरतोय तर मरू द्या पण त्याच्या आत्महत्येची कारण-मीमांसा करणे आणि उपाय सुचविणे बंद करा” अशा स्वरूपाची आत्मक्लेशी प्रतिक्रिया शेतकरी समाजमनात उमटल्याशिवाय राहत नाही. कारण शेतक-यांच्या आत्महत्येच्या दु:खद वेदनांपेक्षा यांच्या प्रतिक्रिया अधिक वेदनादायी असतात.
                शेतकरी आळशी किंवा कामचुकार आहे असे वाटते त्या सर्व मान्यवर तज्ज्ञांनी आयुष्यात एकदातरी सलगपणे काही दिवस शेतकरी समाजासोबत (पाटलाच्या वाड्यात किंवा राजकीय पुढा-याच्या बंगल्यात नव्हे ) घालवायला हवे. त्याखेरीज शेतकरी कशाला म्हणतात, तो कसे जीवन जगतो आणि किती कष्ट करतो याचा अनुभव येणे अशक्य आहे. ४-५ तास किंवा अर्धा-एक दिवस शेतक-याच्या झोपडीत घालवल्याने जर कुणाला शेतकरी समजला असे वाटत असेल तर खुशाल वाटू दे, पण हा देश आपण कोण्या कामचुकार, आळशी, अलायक तज्ज्ञांचा हातात सोपवला असा प्रश्न जर कोण्या ग्यानबाला पडला, तर त्याच्याशी वाद घालता येईल, मुजोरीही करता येईल पण त्या ग्यानबाच्या प्रश्नाचे समर्पक निराकरण करता येईल?
                       झोप, जेवण आणि अन्य शारीरिक विधींसाठी लागणारा काळ सोडला तर उर्वरित वेळात शेतकरी काय करतो? स्विमिंग करायला जातो? क्रिकेट / सिनेमा बघायला जातो? बायकोला घेऊन बागेत फिरायला जातो? बिअरबारवर जातो? बारबालांचे नृत्य बघायला जातो की इतवारी / बुधवारपेठेत फेरफटका मारायला जातो? मान्यवर तज्ज्ञांनी पहिल्यांदा या प्रश्नांचे उत्तर शोधायला हवे. ( आणि जरी का या प्रश्नांचे उत्तर होकारार्थी असेल तरीही बिघडते कुठे? सर्व उपभोगाचा भोग भोगणारी आमच्या सारखी भोगवादी मंडळी कुठे आत्महत्या करताहेत? आम्ही जिवंतच आहोत की अजून. )
औताच्या बैलाला वर्षातून फक्त १२० ते १४० दिवस तर शेतक-याला मात्र ३६५ दिवस काम करावे लागते, बाप मेला सुट्टी नाही, बापाला तिरडीवर तसाच ठेवून बैलाचे शेणगोटा, चारापाणी करायला जावेच लागते. पोरगा तापाने फणफणत असेल किंवा अगदी Gastro जरी झाला तरीही पेरणी थांबवता येत नाही हे वाजवी सत्य तज्ज्ञ मंडळींना कधी कळेल?
                 तरीही या तज्ज्ञ मंडळींना शेतकरी आळशी आणि कामचुकार दिसत असेल तर त्यांनी खालील प्रमाणे शास्त्रशुद्ध मार्गाचा अवलंब करून स्वतः:ची खातरजमा करून घ्यावी.
आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन;
१) प्रेताचे वजन करावे व शारीरिक उंची मोजावी. वजन व उंची यांचा रेशो काढावा. तो डॉक्टरला दाखवावा. मयत व्यक्ती सुदृढ की कुपोषित, कष्टकरी की कामचुकार या विषयी सल्ला घ्यावा.
२) मुखवट्याचा एक क्लोजअप फोटो घ्यावा. त्यावरून मरण्यापूर्वी त्याच्या चेहऱ्यावर काय भाव होते, मरण्यापूर्वी त्याची मानसिक स्थिती काय होती याचा याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून रिपोर्ट मागवावा.
३) त्याच्या घरातील नेसनीची वस्त्रे, अंथरून-पांघरून, भांडी-कुंडी यांची यादी बनवावी. त्यावरून मयत व्यक्ती काटकसरी की उधळखोर याचा अंदाज काढावा.
४) व्यसनाधीनतेमुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे. तसे असेल तर तो कोणती दारू पीत होता? गावठी, देशी की इंग्लिश याचा शोध घ्यावा. गावठी, देशी आणि इंग्लिश मद्याचे अनुक्रमे बाजारभाव माहीत करून घ्यावे. (मान्यवरांना गावठी, देशीचे भाव माहीत नसणार) दरडोई येणारा खर्च याचा तुलनात्मक तक्ता/गोषवारा बनवावा. बिगरशेतकरी मद्यप्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण आणि शेतकरी मद्यप्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण याची आकडेवारी गोळा करून तुलना करावी.
५) अज्ञानतेमुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे. तसे असेल तर बिगरशेतकरी पण अज्ञानी अशा अन्य समुदायातील लोक आत्महत्या का करीत नाहीत? किंवा बारामतीचे लोक फारच सज्ञानी आहेत काय?
६) वेडसरपणामुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे. वेडसर लोक आत्महत्या करतात? कुठले? अमेरिकेतील? ब्रिटनमधील? फ्रांसमधील की पाकिस्तानातील?
७) मनोरुग्णपणामुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे. त्यासाठी गावागावात मानसोपचार शिबिरे आयोजित करावी असे त्यांना वाटते. पण ग्यानबाला हे पटत नाही. एका दाण्यातून शंभर दाण्याच्या निर्मितीचा चमत्कार घडवणारा व स्वतः: अर्धपोटी राहून जगाला पोटभर खाऊ घालणारा शेतकरी मनोरुग्ण कसा काय असू शकतो? कदाचित वैफल्यग्रस्त असू शकतो. मग तो वैफल्यग्रस्त, नाउमेद का झाला याची कारणे शोधावी. ती कारणे सामाजिक की आर्थिक याचाही शोध घ्यावा? शेतात गाळलेला घाम, दामात का परावर्तित झाला नाही याचाही शोध घ्यावा. याउलट पॅकेजची रक्कम गिळंकृत करणारे राजकीय पुढारी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मिळणाऱ्या शासकीय मदतीचा चेक काढण्यासाठी लाच खाणारी नोकरशाही मानसिक विकृतीने ग्रासली असून त्यांच्या भावनिक संवेदना बधिर झाल्या आहेत. तेच खऱ्या अर्थाने मनोरुग्ण असून त्यासाठी शासकीय कार्यालयामध्ये, मानसोपचार शिबिरे आयोजित करावी असे ग्यानबाला वाटते. शेतकऱ्याला आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या या व्यवस्थेचे शुद्धीकरण आणि मतपरिवर्तन होणे गरजेचे आहे, ज्या अर्थी शेतीविषयक ध्येय-धोरणामध्ये मूलभूत बदल होताना दिसत नाही त्या अर्थी शेतीविषयक ध्येय-धोरणे आखणाऱ्याकडून शेतकरी आत्महत्या बद्दल व्यक्त होणारी चिंता हा वरपांगी देखावा आहे, ज्या अर्थी शेतीला न्याय देणारी कृषी विषयक धोरणे आखण्यासाठी लागणारी कणखरता त्यांच्यामध्ये नाही त्याअर्थी तेही मानसिक दुर्बल असावे असा ग्यानबाचा कयास आहे, त्यासाठी मंत्रालयामध्ये मानसोपचार शिबिरे आयोजित करावी असेही ग्यानबाला वाटते. जे ग्यानबाला उमजते ते या तज्ज्ञांना का उमजू नये? उमजत असेलही कदाचित परंतु शेतकऱ्याला आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या या व्यवस्थेवर उदरनिर्वाह करणारी मंडळी सिंहासनाच्या इच्छे विरुद्ध काही निष्कर्ष काढतील ही अशक्य कोटीतील बाब आहे, असेही ग्यानबाचे स्पष्ट मत आहे.
८) पॅकेजमुळे आत्महत्या थांबत नाही, असा काहींचा निष्कर्ष आहे. परंतु ते पॅकेजच्या स्वरूपावर अवलंबून आहे. कँसरच्या रोग्याला पॅरासीटामॉलचे पॅकेज द्यायचे, रोगी बरा झाला नाही अथवा दगावला की रोगी अज्ञानी होता, त्याने औषधे घेण्यात कुचराई केली, असा काहीसा बावळट निष्कर्ष काढण्याचा हा प्रकार आहे. त्या ऐवजी पॅकेजच्या मूळ स्वरूपातच गफलत झाली, रोगाचे निदान करण्यात, औषधांची निवड करण्यात चूक झाली हे कबूल करण्यासाठी लागणारी मानसिक औदार्यता आमच्यामध्ये केव्हा येणार हाच खरा लाख मोलाचा प्रश्न आहे.
                          मान्यवर तज्ज्ञांनी या प्रश्नांची उत्तरे शोधायलाच हवी. विषयाच्या खोलवर जायला हवे. अभ्यासांती निष्कर्ष काढून सप्रमाण सिद्ध करायला हवे, पण हे होताना दिसत नाही. पूर्वग्रह बाजूला सारून त्रयस्थपणे मुद्द्याची उकल केल्याखेरीज निर्दोष निष्कर्ष निघू शकत नाही. परंतु बाटली आणि पंचतारांकित संस्कृती वृद्धिंगत झालेल्या स्वनामधन्य तज्ज्ञांना याची गरज भासत नाही. एरवी शेतकरी आत्महत्या सारख्या संवेदनशील मुद्द्यावर तज्ज्ञांनी येरेगबाळे मतप्रदर्शन करण्यापेक्षा चूप बसने शेतकऱ्यासाठी समाधानाचे ठरेल. आणि कदाचित शेतकरी आत्महत्यांसारख्या संवेदनशील मुद्द्याची उकल होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांच्या प्रारंभाचे तेच पहिले पाऊल ठरेल.
                                                             गंगाधर मुटे
…………………………………………………………………………
पुर्वप्रकाशित : १० मार्च २०१०
…………………………………………………………………………

कुर्‍हाडीचा दांडा

कुर्‍हाडीचा दांडा



काही दिवसापूर्वी मला माझ्या एका मित्राने एक बातमी सांगितली.

“महाराष्ट्र शासनाने कृषिनिष्ठ, शेतीभूषण म्हणून गौरविलेला शेतकरी प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबून आता भूमिहीन झाला आहे.”
               खरे तर ही दु:खद बातमी. ज्याच्या कुणाच्या नशिबात हा भोग आलाय, त्याच्याबद्दल हळहळ आणि मनात सहानुभूती निर्माण करणारी बातमी. पण ही बातमी ऐकताना मला मात्र अजिबात दु:ख झाले नाही किंवा ऐकल्यावर माझ्या मनाच्या कोणत्याच कोपर्‍यात तीळभरही सहानुभूती निर्माण झाली नाही, उलट ही बातमी मला आनंदच(असूरी?) देऊन गेली. अशा वेळी मनाला दु:खाऐवजी आनंद वाटायला लागत असेल ते काही चांगुलपणाचे लक्षण नाही, हे माहीत असतानाही मला माझा आनंद आवरता येईना, आणि मी त्या आनंदाला आवर घालण्याचा प्रयत्नही केला नाही.
         सबंध शेतीच्या इतिहासात १९८० च्या सुमारास प्रथमच शेतकर्‍यांमध्ये त्यांच्या न्याय्य हक्काबद्दल जनजागृती व्हायला लागली होती. एकदा कुत्र्याची शेपटी सरळ होईल पण शेतकर्‍यांची संघटना होणार नाही, असे म्हणणार्‍याच्या नाकावर टिच्चून लाखालाखाच्या संख्येने शेतकरी संघटित व्हायला लागला होता. त्याला शेतीच्या दुर्दशेचे कारण समजायला लागले होते. शेतकर्‍याच्या गरिबीचं कारण तो अडाणी आहे, आळशी आहे, अमुकतमुक जातीचा आहे, तो कष्ट करण्यात वा नवे तंत्रज्ञान आत्मसात करून ते प्रत्यक्षात शेतीत वापरण्यास कमी पडतो किंवा देवानेच त्याच्या नशिबात गरिबी लिहिली आहे अथवा त्याच्या आईने देवाला दगड-धोंडे मारलेत, म्हणून देवाने त्याच्या तळहातावर दारिद्र्याची रेघ ओढली आहे, यापैकी कोणतेही कारण शेतकर्‍याच्या दुर्दशेला, गरिबीला अथवा कर्जबाजारीपणाला कारणीभूत नसून ”शेतीमालास रास्त भाव मिळू नये, म्हणून सरकार जे अधिकृत धोरण राबवते” यातच खरेखुरे शेतीच्या दुरावस्थेचे  कारण दडले आहे, हे शेतकर्‍याला कळायला लागले होते. परिणामी शेतकरी रस्त्यावर उतरायला लागला होता. रेल्वे अडवायला लागला होता.
        जेव्हा एकीकडे लढवय्ये शेतकरी, शेती तोट्याची आहे, असे सांगत “भीक नको हवे घामाचे दाम” “शेतमालास उत्पादनखर्चानुसार रास्त भाव मिळालेच पाहिजेत” “हातात रूमनं, एकच मागणं” म्हणत रस्त्यावर उतरत होते, पोलिसांच्या लाठ्या खात होते, छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलून हौतात्म्य पत्करत होते, नेमके त्याच वेळी काही कृषिनिष्ठ, शेतीभूषण शेतकरी शासनाशी घरोबा करून “आम्ही एकरी ५७ क्विंटल ज्वारी पिकवली, एकरी ३५ क्विंटल कापूस पिकवला” असे सांगत शेतीची दुर्दशा घालवण्यासाठी “आमच्यासारखे अधिक उत्पादन काढा आणि समृद्ध व्हा” असा इतरांना सल्ला देत शासकीय तिजोरीतून जेवढ्या अनुदानात्मक सवलती मिळवता येतील तेवढ्या मिळवत ’ऐष’ करत होते. आणि शेतकरी चळवळीचा घात करून शेतकरी आंदोलनाला सुरुंग लावत होते.
या कृषिनिष्ठ, शेतीभूषणांनी खरंच शेतकरी समाजासाठी रचनात्मक भरीव कार्य केले असते किंवा खरेच कमी खर्चात विक्रमी उत्पादन घेतले असते तर मला आक्षेप असण्याचे काहीही कारण नव्हते, उलटपक्षी या कृषिनिष्ठांचे अनुकरण करून इतर शेतकर्‍यांनाही स्वतः:चा विकास करून घेण्यास प्रेरणा मिळाली असती. पण तसे काही झाले नाही. कारण मुळातच हे शेतीभूषण म्हणजे शेतीत अचाट पराक्रम गाजविलेले योद्धे नाहीत, शेतीविषयक ज्ञानाचे महामेरूही नाहीत आणि यांच्या कार्यामुळे शेतीविषयाला नवी दिशा मिळाली आहे असेही काही नाही. कारण कृषिनिष्ठ, शेतीभूषण वगैरे पुरस्कार मिळणे आणि कमी खर्चात विक्रमी उत्पादन काढणे किंवा शेतकरी समाजासाठी रचनात्मक भरीव कार्य करणे, या बाबींचा एकमेकाशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाहीये. हे अधिक स्पष्ट होण्यासाठी शासनाद्वारे पिकस्पर्धा कशा राबविल्या जातात याचा शोध घेणे गरजेचे आहे.
इच्छुकाने प्रथम पंचायत समिती मध्ये जायचे. त्यासाठी स्थानिक पुढार्‍याशी लागेबांधे असणे गरजेचे. मग संबंधित कर्मचार्‍याला स्थानिक पुढार्‍याचा संदर्भ देऊन त्याच्याशी संगनमत करून योजना आखायची. स्पर्धेसाठी किमान १०-२० शेतकर्‍यांनी स्पर्धेत भाग घेणे गरजेचे असते, त्याशिवाय स्पर्धा कशी होणार? म्हणून आपणच ’डमी/दुय्यम’ १०-२० शेतकर्‍यांचे ७/१२, ८-अ गोळा करून त्यांच्या नावाचे फॉर्म भरायचेत. त्यानंतर जी काही अधिकृत/अनधिकृत फी असेल ती भरायची. एकदा त्याला योग्य ती फी पोचली की त्यानंतर पुढील कार्ये अगदी रितसरपणे तो कर्मचारीच पार पाडतो. म्हणजे असे की; इतर शेतकर्‍यांना स्पर्धेत भाग घेता येऊ नये म्हणून स्पर्धेसाठी अर्ज दाखल करायची अंतिम तिथी उलटेपर्यंत तो अंतिम तारखेचा सुगावाच इतरांना लागू देत नाही. अशा तारखा वृत्तपत्रात जाहीर होत नाहीत. तरीही एखाद्याला सुगावा लागलाच आणि स्पर्धेत भाग घ्यायला आलाच तर कागदोपत्राच्या जंजाळात त्याला कसे लटकवायचे आणि नको त्या शेतकर्‍याला स्पर्धेपासून कसे ’कटवायचे’ यात तो कर्मचारी अगदीच पारंगत असतो. एकदा एवढे सोपस्कार निर्विघ्न पार पाडलेत की, पुढे साराच कागदी घोड्यांचा खेळ असतो. मग पेरणी, मशागत, कापणी, वेचणी, मळणी आणि एकरी उत्पादनाचा आकडा, हा साराच कागदोपत्री खेळ. एवढे सगळे ज्याला पुढार्‍यांच्या आशीर्वादाने व कर्मचार्‍याच्या संगनमताने कागदी घोडे नाचवता येते तो ठरतो पिकस्पर्धा विजेता. मग एक प्रस्ताव बनवायचा. शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याची लिखित बतावणी करून तो प्रस्ताव विहित प्रपत्रात पंचायत समिती कृषी विभागाकडे सादर करायचा. पंचायत समिती कृषी विभागाकडून सदर प्रस्ताव जि.प.कडे सादर केला जातो. जिल्हास्तरीय समितीकडून (शक्यतो छानसा हॉटेल किंवा ढाब्यावर बसून कोंबडीची तंगडी चघळत) पाहणी करून सदर प्रस्ताव शिफारशीसह विभागीय कार्यालयामार्फत कृषी आयुक्तालयास सादर केला जातो . या सगळ्या प्रोसेसमध्ये पुढार्‍यांचा ”वरदहस्त” लाख मोलाचा असतो. मग राज्य स्तरीय समितीकडून शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी शेतक-यांची निवड केली जाते. 
पुरस्कार प्राप्त शेतक-याचा मा.राज्यपाल, महोदय यांचे हस्ते सन्मानपूर्वक सत्कार केला जातो. 
ज्याच्या आयुष्यात सुखाचा, आनंदाचा व सन्मानाचा दिवस कधीच उगवत नाही, त्याच्या आयुष्यात कोणत्या का निमित्ताने होईना, पण राज्यपालाच्या हस्ते सन्मान होण्याचा दिवस उगवत असेल तर कोणाला वाईट वाटण्याचे कारणच नव्हते. पण त्यामुळे सबंध शेतीव्यवसायाचा घात होतो, ही खरी बोच आहे. अशा शेतकर्‍यांकडे अंगुलिनिर्देश करून शासन यांच्यासारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरा, भरघोस उत्पन्न घ्या आणि श्रीमंत व्हा, असे सांगायला मोकळे होते. यांच्या कर्तृत्वाच्या फोलपणाची जाणीव नसल्यामुळे बिगरशेतकरी समाजाचाही शेतीव्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि अधिक मेहनतीने नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेती हा प्रचंड फायद्याचा व्यवसाय आहे, असे जनमानस तयार होण्यास नको ती मदत होते. आणि शेतीचे प्रश्न सुटण्याऐवजी अधिक किचकट व्हायला लागतात.
एखादा शेतीभूषण शेतकरी जर आज कर्जापायी शेतजमीन विकावी लागून भूमिहीन होत असेल तर शेती तोट्याचीच आहे, याचा तो अधिकृत पुरावाच ठरतो. त्या शेतकर्‍याने क्षणिक सन्मान मिळविण्यासाठी काळ्या मातीशी प्रतारणा करून जो आभासी देखावा निर्माण केला होता, शेती फायद्याची आहे हे दाखविण्यासाठी बनावट दस्ताऎवज तयार करून इतरांच्या डोळ्यात धूळफेक केली होती, शेतकरी समाजाशी बेईमानी करून “कुर्‍हाडीचा दांडा, गोतास काळ” या उक्तीप्रमाणे वागण्याचे पाप त्याने केले होते, त्याचेच फळ आज त्याला भोगायला लावून नियतीने त्याच्यावर सूड उगवला आहे, असे खेदाने म्हणावे लागत आहे.  

                                                                     गंगाधर मुटे

…………………………………………………………………………………..

कान पकडू नये

कान पकडू नये

आता कुणी कुणाचे कान पकडू नये
वादात या कुणीही सहसा पडू नये

ते दान का मिळाले? जे टाळले सदा
असले पुन्हा नव्याने सहसा घडू नये

शोधेन मीच माझा, रस्ता पुन्हा नवा
त्या मूक दर्शकांनी सहसा रडू नये

निद्रिस्त मीच केल्या माझ्याच जाणिवा
संवेदनेवरी या मीठ रगडू नये

कोणास कोण प्याले, कळतेच ना कधी
नातेच बाटलीशी सहसा जडू नये

म्हणतात वाहवा, व्वा! स्त्रीरम्य वेड ते
सच्चा विचार सहसा का आवडू नये?

सजतात रोज येथे कित्येक मैफ़िली
कोणास न्याय्य मुद्दा का सापडू नये?

झाले अता पुरेसे, ते बोलले बहू
बाळंत होत ना ती, चर्चा झडू नये

सोसून ऊन वारा, अंकूरतो अता
कोंबेजण्याच आधी सहसा सडू नये

आता कुठे जरासा झालोय मुक्त मी
पायास साखळ्यांनी परत जखडू नये

माझ्याकडे मुळीही किल्ल्या न शिल्लकी
माझ्याविना कुणाचे सहसा अडू नये

हे अन्न सात्त्विकाचे ये ’अभय’ भोजना
मंगल अशा प्रसंगी सहसा दडू नये

————-गंगाधर मुटे————–

……………………………………………………………….

वृत्त : विद्युल्लता
काफिया :  पडू
रदीफ : नये
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगा
……………………………………………………………….

पापाची भागीदारी

प्रिय ग्राहक मित्रहो,

यंदा कांद्याचा भाव आणि कांद्याचे भावाचे राजकारण चांगलेच गाजले. हे आपण जाणताच.
यावर्षी अतिवृष्टीमुळे कांद्याचे उत्पादन प्रतिएकरी कमी आले मात्र प्रति एकरी उत्पादनखर्च एकतर दरवर्षीएवढाच किंवा त्यापेक्षा जास्त आला.
उत्पादनखर्च वाढीची कारणे:
१) वाढलेले डिझेलचे भाव
२) सेंद्रीय /रा. खताच्या वाढलेल्या किमती
३) दुपटी-तिपटीने अचानक वाढलेले शेतमजूरीचे दर.
४) अतिपावसामुळे वाढलेला मशागतीचा खर्च.

खर्च वाढलेत पण उत्पादन मात्र कमी आलेत, त्यामुळे कांदा उत्पादकाला यावर्षी कांदा पिकवायला प्रतिकिलो रू. ४०/- पेक्षा जास्त खर्च आला.
*
मागणीपुरवठ्याच्या सिद्धांतानुसार, मागणी आणि पुरवठा यात तफ़ावत आल्याने कांद्याचे भाव वाढून ७०-८० रू. पर्यंत प्रति किलो एवढे वाढलेत. त्यामुळे निसर्गाने शेतकर्‍यांशी न्याय करून त्याचा उत्पादनखर्च भरून निघेल अशी व्यवस्था केली.
*
पण विद्वत्ताप्रचूर विद्वान अर्थशास्त्र्यांनी कांगावा केला. त्यामुळे नेहमीप्रमाणेच केंद्रशासनाने कांदा निर्यातबंदी केली एवढेच नव्हे पाकिस्तान मधून कांद्याची आयातही केली. अनैसर्गिकरित्या कृत्रिमपणे कांद्याचे भाव पाडलेत.
*
आता प्रतिकिलो २ रू सुद्दा शेतकर्‍यांच्या हातात पडणार नाही, अशी शासनाने पुरेपूर व्यवस्था केलेली आहे.
*
प्रिय ग्राहक मित्रहो,
आता स्वस्तात कांदा खरेदी करतांना तुम्हाला आनंद होत असेल तर आनंद जरूर माना.
पण आपल्याच देशातल्या गरीब, देशोधडीस लागलेल्या, कोणत्याही क्षणी आत्महत्या करण्याची पाळी येऊ शकते अशा कांदा उत्पादक शेतकर्‍याला आपण प्रतिकिलोमागे ३८ रुपयाने लुबाडत आहोत, याचीही जाणिव असू द्या.
*
भविष्यात एखाद्या कांदा उत्पादकाने आत्महत्या केली तर त्या पापाचे सुक्ष्म/अंशता आपणही तर भागीदार नाहीत ना? याचाही शोध घ्या.
*
हे निवेदन वाचून भावनाप्रधानही होऊ नका. कारण ग्राहकासमोर शेतकर्‍याला आता प्रतिकिलोमागे ३८ रुपयाने लुबाडण्याशिवाय इलाजही उरलेला नाही. फ़क्त हे स्वत:च्या मनात ठेवा.
तुम्हाला हे जर जिवाभावातून कळले, हृदयात सहानुभूती निर्माण झाली, नेमक्या प्रश्नाची जाणिव झाली तर “बुडत्याला लुटण्याच्या” पातकातून तरी नक्कीच मुक्ती होईल.
*
अनेकांना प्रश्न पडतो की शेती परवडत नाही मग शेती का करतात. एकेकाळी मलाही हाच प्रश्न पडला होता.
आता मात्र उत्तर गवसले. आत्महत्या करायची वेळ आली तरी चालेल पण तो शेती करायचे सोडू शकत नाही.

कारण,

शेतकरी हा उत्पादक आहे. आणि उत्पादकाला उत्पादन केल्याशिवाय चैन पडू शकत नाही.

उदा. मुलगा मोठा झाल्यावर तुला लाथा घालेल असे कितीही मातृत्वाला समजावून सांगीतले तरी मातृत्वाची प्रसवण्याची प्रेरणा जशी कमी होत नाही, तसेच परिणाम काहीही होवोत शेतकर्‍यांची उत्पादन करण्याची प्रेरणा काही कमी होत नाही.

पण “जालिम जमाना” हे काही लक्षात घेत नाही.
२ रुपयात किलोभर कांदा मिळतो म्हटल्यावर तो जाम खुष आहे.

गंगाधर मुटे
*******

स्पर्धा विजयाच्या निमित्ताने…..!

मित्रांनो,
सप्रेम नमस्कार,


मेहता पब्लिकेशन हाऊस आणि मी मराठी.नेट यांच्या संयुक्त विद्यमाने
“लेखन स्पर्धा २०१०” ही आंतरजालीय स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.


या स्पर्धेचा निकाल जाहिर झाला असून
या स्पर्धेत “वांगे अमर रहे…!”
या ललित लेखाला पारितोषक जाहीर झाले आहे.
………………………………………………
हा लेख खालील दुव्यावर वाचता येईल.

……………………………………………..
स्पर्धेची अधिक माहिती येथे मिळेल.
http://www.mimarathi.net/node/5216

……………………………………………..


या स्पर्धेमधे २०७ प्रवेशिका पात्र ठरल्या होत्या.
स्पर्धेसाठी
श्री. शंकर सारडा
श्री. प्रविण टोकेकर
श्री. रामदास
यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
……………..
वांगे अमर रहे….!

                    मायबोली या संकेतस्थळावर मी “शेतकरी आत्महत्त्यांवर तज्ञांची मुक्ताफळे” हा लेख लिहीला होता. त्यावर आलेल्या एका प्रतिक्रियेवर खुलासा करतांना मी स्वतःचा अनुभव विषद केला. नंतर लक्षात आले की हा अनुभव म्हणजे एक स्वतंत्र ललित लेखच तयार झालेला आहे.
                   त्यापूर्वी मी कविता आणि वृत्तपत्रीय/स्फ़ुट लेखन वगैरे केले होते. परंतू कथा किंवा ललित स्वरुपाचे लेखन कधीही केलेले नव्हते. प्रतिक्रियात्मक स्वाभाविक अनुभव कथन केला आणि अनपेक्षीतपणे या ललित लेखाचा जन्म झाला. आणि हाच माझ्या आयुष्यातला पहिला ललितलेख ठरला.
                     आयुष्याच्या एका वळणावर भोगावा लागला भोगच आज मला एक पुरस्कार देवून गेला. मी आयुष्याच्या पुर्वाधात आयुष्याने माझ्या पदरात टाकलेले ”नकोनकोसे” क्षण मागे वळून पाहण्याचे कटाक्षाने टाळत आलो आहे.
                     पण आज या निमित्ताने मला वाटायला लागलेय की, याच क्षणांनी खरे तर माझे आयुष्य अधिक अनुभव समृद्ध केले असावे. मी काही लेखक नाही, लेखन कौशल्य आणि प्रतिभासंपन्नतेच्या बळावर मी “वांगे अमर रहे…!” हा लेख लिहिला नाही. केवळ अनुभव कथन केला, जो शब्दश: खरा आहे. त्यातला एकही शब्द रंजित वा आगाऊ नाही. याउलट त्यातलाच बराचसा भाग लिहायचा राहून गेला आहे.
                   जेष्ठ गझलकार श्री श्रीकृष्णजी राऊत यांना माझ्यात काय दिसले, कोण जाणे पण त्यांनी मला मी माझे अनुभव लिहून काढावेत, असा आग्रह केला होता. माझ्या अनेक मित्रांनीही केला होता पण “मला मागे वळून पाहायचे नाही” या सबबीखाली मी ते टाळण्याचाच प्रयत्न केला.
                  आज मात्र मी द्विधा अवस्थेत आहे. लिहून काढावेत की नाही, संभ्रम आहे. लिहू नये याचे मुख्य कारण “मागे वळून पाहणे” माझ्यासाठी फ़ारच पिडादायक ठरणार आहे. पण माझ्याकडे काही अनुभव आहेत, जे सर्वसाधारणपणे दुर्मिळ किंवा कल्पनेबाहेरचे किंवा ऐकण्यात/वाचनात न आलेल्या स्वरुपाचे आहेत.
                   असो, यातूनही काहीतरी मार्ग निघेलच. आपल्याशी थोडेसे हितगूज करावेसे वाटले, म्हणून हा लेख प्रपंच.
                
                                                                                गंगाधर मुटे    
………………………………………………………………………………………
माझी वांगंमय शेती तोट्यात गेली पण वांङ्मय शेतीला बरे भाव मिळत आहेत.
………………………………………………………………………………………