अखेरची मानवंदना

अखेरची मानवंदना

अखेरची ही मानवंदना
नतमस्तकल्या स्वरी
अश्रू होऊन हृदय वितळले
योद्ध्या चरणावरी

कृषीवलांना, मृदश्रमिकांना
तूच आसरा होता
अर्थवादाच्या प्रबोधिनीचा
तू प्रकाशतारा होता
तूच आमुची मथुरा, काशी
प्रयाग नि पंढरी

एका दाण्यापासून दाणे
हजार निर्मित जेथे
डाकू, लुटारू बनूनी शासक
सनद घेऊनी येते
उणे सबसिडीचा मांडलास तू
हिशेब गणितेश्वरी

युगायुगाच्या अबोलतेला
फोडलीस तू वाचा
मूठ आवळून लढवैय्याची
शिकविलीस तू भाषा
आयुष्याची मशाल चेतवून
जगलास जन्मभरी

कोटी-कोटी शेतकऱ्यांचा
पंचप्राण तू होता
युगपुरुष अन् थोर महात्मा
निर्विवाद तू होता
रेखांकित सप्रमाण केलीस
तू भारत इंडिया दरी

जाऊ नकोस तू त्यागून आम्हा
जरी सोडली काया
सदैव असू दे हात शिरावर
पाईक अभय व्हाया
तूच आमचा प्रकाशसूर्य अन्
योद्धा सारथ्यकरी

– गंगाधर मुटे ’अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

१२/१२/२०१५
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Manwandana

निवले तुफान आता

  निवले तुफान आता

ललकारण्या दिशांना, उठले तुफान काही
त्यातील फार थोडे, टिकले तुफान काही

निद्रिस्त चेतनेचे सामर्थ्य जागवाया
पोटात सागराच्या घुसले तुफान काही

देण्यास अंधुकांना संधीप्रकाश थोडा
किरणासमान चर्या जगले तुफान काही

संसार ध्वस्त झाला, हटलेच ना तरीही
झुंजून निश्चयाने लढले तुफान काही

तू रोवलेस येथे बी अर्थकारणाचे
पैकीच माळरानी रुजले तुफान काही

कमतोल पाइकांचे सेनापती जरी ते
चेतून आत्मशक्ती तपले तुफान काही

तापून षड-रिपुंनी पेटून पाहिले पण;
भट्टीतही जरा ना जळले तुफान काही

घेरून मध्यभागी केलाय कोंडमारा
नाहीच डोंगरांना नमले तुफान काही

उत्थानना बळीच्या लढले जरी ’अभय’ ते
नियतीसमोर अंती हरले तुफान आता

 

काळासमोर हतबल झाले तुफ़ान अंती
हळुवारशा हवेने विझले तुफान आता

बेफ़ाम झुंजणारे, निवले तुफान आता
निवले तुफान आता, निवले तुफान आता

 – गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

नाच्याले नोट : नागपुरी तडका

नाच्याले नोट : नागपुरी तडका

चमचमी बूट हाय, मलमली कोट हाय
सिगारेट सिलगवाले, हजारची नोट हाय

फ़ाटलेलं दफ़्तर, चड्डीले भोक हाय
बापाच्या नशीबात, जह्यराचा घोट हाय

मरणारे मरतात, चरणारे चरतात
लेका इथं कोणाच्या, हाडावर चोट हाय?

वाणी-दास-पुढाऱ्याच्या, मिशीले तूप हाय
दूध-दूभतं करणार्‍याचे, पाठीले पोट हाय

जसं तुले हाय तसं, मलेबी वोट हाय, पण;
ढ्यँगपाट्या सरकाराच्या बापामंदी खोट हाय

सात, आठ, नवव्या आयोगाचे योग हाय
कापसाले भाव म्हणान तं फ़ेंडीवर सोट हाय

मुद्रास्फितीच्या व्यवस्थेत सृजनाचे हाल हाय
तोंडपुज्याले ‘अभय’ अन् नाच्याले नोट हाय

                                  – गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मुरली खैरनार : एक जिंदादील व्यक्तिमत्त्व

मुरली खैरनार : एक जिंदादील व्यक्तिमत्त्व

“मुरली खैरनार गेलेत” असा प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे सरांकडून आलेला sms वाचताच माझ्याच मुखातून शब्द बाहेर पडले “हे राम!”
जीवन क्षणभंगुर असते आणि आयुष्याची दोरी ओढून घेण्याचा काळाचा अधिकार मान्य केला तरी काळाने एवढे निष्ठुर वागायला नको असे राहून राहून वाटत आहे. विश्वासच बसत नाही की मुरली खैरनार आपल्यात नाहीत आणि तशी नोंद लिहायला मेंदूसुद्धा तयारच होत नाही आहे. माझ्या व्यक्तीगत आयुष्यावर प्रभाव टाकणारी जी काही बोटावर मोजण्याइतकी नावे आहेत, त्यातील एक नाव म्हणजे जिंदादील व्यक्तिमत्त्व असलेले मुरली. माझ्या भाग्याने माझ्या दैनंदिनीत काही सोनेरी व कधीच न पुसली जाणारी पाने लिहून ठेवली त्यातला एक अध्याय म्हणजे मुरली खैरनारांचा मला लाभलेला सहवास.

            शेतकरी संघटनेचा विचार अधिक प्रभावीपणे बिगरशेतकरी आणि शहरी माणसांपर्यंत पोचला पाहिजे अशा व्यापक उद्देशाने १९८६-८७ च्या सुमारास नाशिक येथून ‘आठवड्याचा ग्यानबा’ हे साप्ताहिक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचे संपादकपद श्री मुरली खैरनारांकडे सोपवण्यात आले. त्यांच्या मदतीसाठी म्हणून त्यांनी माझी निवड केली आणि मला त्यांचे सहवासात सहकारी म्हणून काम करण्याचा योग जुळून आला. त्यांचे सोबत काही दिवस नाशिकला घालवता आले आणि मोटरसायकलवरून राज्याच्या काही निवडक भागाचा दौराही करता आला. ‘आठवड्याचा ग्यानबा’ची सुरुवात तर चांगली झाली, त्यांनी त्यासाठी कठोर परिश्रमही घेतले परंतू शेतकरी संघटनेमधील तत्कालीन नेत्यांच्या दुसर्‍याफ़ळीतील काही कार्यकर्त्याकडूनच त्यांना प्रचंड त्रास देण्यात आला. त्रासाचे रूपांतर वादात झाले आणि साप्ताहिक बाळशे धरायच्या आतच म्हणजे आठनऊ महिन्यातच बंद पडले आणि ‘आठवड्याचा ग्यानबा’चा मध्यांतर व्हायच्या आधीच पडदा पाडण्यात आला.

शेतकरी संघटनेवर आणि मा. शरद जोशींच्या विचारावर अपार श्रद्धा असलेले मुरली विनोदी होते, मिश्किल होते, हजरजबाबी होते आणि गंभीरही होते. उच्च दर्जाचे पत्रकार, उत्तम वक्ता आणि नाटयकलावंत, दिग्दर्शकही होते. मनमिळाऊ होते पण सहकार्‍यांकडून कार्यक्षमतेने काम करवून घेण्याची विशेष खुबी त्यांच्यामध्ये होती. ते कुशल संघटकही होते. स्वत:च हजरजबाबी असल्याने ते मिश्किलपणे इतरांवर शाब्दिक कोटी करायचे तर कधी कधी सहकार्‍यांची फिरकी घ्यायचे. स्वत:ची फिरकी घ्यायची संधी ते दुसर्‍याला कधीच मिळू देत नसत. त्यांच्यापेक्षा मी वयाने बराच लहान असूनही त्यांनी मला कायमच बरोबरीच्या मित्राइतका दर्जा दिला त्यावरून त्यांच्या विनयशीलतेचाही अंदाज येतो. कायम बोलत राहणे, नवनव्या छोट्यामोठ्या कथा, विनोदी चुटकूले रचून ऐकवत राहणे हा त्यांच्या स्वभावातला स्थायीभाव होता.

तेव्हा नाशिकच्या शरणपूर रोडवर कार्यालय होते. रात्री नऊ वाजेपर्यंत काम करायचे व नंतर जेवायला जायचे असा आमचा नित्यक्रम होता. आमच्या चमूमध्ये मिलिंद मुरुगकर, स्व. जीवन टिळक, धर्मेंद्र चव्हाण, वसंत विसपूते होते. नऊ वाजले की सर्व आपापल्या घरी जेवायला जायचे व मी भोजनालयात जायचो. एक दिवस मोठा मजेदार प्रसंग घडला. त्यांची फिरकी घ्यायची नामी संधी मला साधून आली आणि मी त्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला. त्यांची पत्नी सौ. मृणालिनी यांची एल.एल.बी ची परीक्षा सुरू असल्याने त्या सायंकाळी लवकरच आपला स्वयंपाक उरकून घ्यायच्या आणि अभ्यासाला लागायच्या. त्या दिवशी मुरलींना बहुतेक फारच कमी भूक असावी म्हणून त्यांनी विचार केला असेल की यालाही जर भूक कमी असेल तर एकाच्या डब्यात दोघांचे जेवण सहज होऊ शकते. याचा भोजनालयात जाऊन जेवणाचा खर्चही वाचेल. म्हणून त्यांनी मला सहजपणे विचारले.

“तुला आज किती भूक आहे?”
मला प्रश्नाचा रोखच कळला नाही म्हणून मी सुद्धा ठोकून दिले.
“आज मला भूकच नाहीये. फार तर एखादी पोळी. एखादी पोळी खूप झाले.”
त्यावर ते लगेच मला म्हणाले.
“अच्छा! मग चल माझ्यासोबत घरी जेवायला”

            आता मला “एक पोळी” मागच्या रहस्याचा उलगडा झाला होता आणि पंचाईतही झाली होती कारण मला भूक होती आणि नेहमी इतकेच जेवायला लागणार होते. इतक्यात माझ्यातला ’फिरकी’पटू जागा झाला आणि ठरवले की आज अनायासे संधी आलीच आहे तर मुरलीची मस्तपैकी फिरकी घ्यायची.

घरी पोचलो तेव्हा मृणालिनीताई अभ्यासात गर्क होत्या पण माझा आवाज ऐकताच बाहेर आल्या आणि मला स्मित करून लगेच स्वयंपाकगृहात गेल्या. मृणालिनीताई म्हणजे त्यावेळच्या शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या धडाडीच्या नेत्या. त्यामुळे त्यांची माझी ओळख मुरलींच्याही आधीची. घरी पाहुणा जेवायला आला म्हटल्यावर त्यांनी लगेच वाढीव स्वयंपाक केला आणि झाली जेवणाला सुरुवात. आज मस्तपैकी नाटक वठवायचे आणि फिरकी घेऊन मुरलींची जेवढी करता येईल तेवढी फजिती करायची असा ठाम निश्चय करून  अत्यंत गंभीर मुद्रेने जेवायला बसलो.  पहिली पोळी संपताच मी म्हणालो,

“झाले माझे जेवण”
“अरेव्वा! एका पोळीत जेवण आटोपले? असं काय करताहात?” असे म्हणत मृणालताईंनी दुसरी पोळी ताटात घातली. मी दुसरी पोळी खायला सुरुवात केली आणि म्हणालो,
“त्याचं असं आहे की, माझं आणि मुरलीचं एक अ‍ॅग्रीमेंट झालंय. एकच पोळी खाण्याच्या करारावरच त्यांनी मला जेवायला बोलावले आहे”
ऐकताच मृणालताई जाम भडकल्या मुरलीवर. मुरली समजावण्याच्या स्वरात मृणालताईंना खूप समजावीत होते,
“अगं हा वात्रट आहे, तुला माहीत आहे ना? हा वात्रटपणा करतो आहे. माझ्या म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता”

            पोळी संपली की नवीन पोळी घेताना मी दरवेळेस संपूर्ण ताकदीनिशी नको म्हणत होतो, मात्र ताटावर आडवा हात घालण्याऐवजी ताटाबाहेर हात आडवा करून मस्त नाटक वठवत होतो, त्यामुळे पोळी अलगदपणे ताटात पडत होती आणि पोळी ताटात पडली की मी अधाश्यासारखा पोळीवर तुटून पडत होतो आणि निरागसपणाची भावमुद्रा करून हळूच पुटपुटत होतो.

“जेवणात कुठे आलाय वात्रटपणा? तुला किती भूक आहे, असे कधी कुणाला विचारले जात असते काय? आमच्या विदर्भात नाही बुवा अशी पद्धत!”

            पाहुण्याला फार भूक लागली आहे मात्र मुरलीमुळे अर्धापोटीच पाहुणा जेवण संपवणार होता हे मृणालताई सारख्या अन्नपूर्णेला आणखी बेचैन करत होते आणि तो त्यांचा राग पुन्हापुन्हा मुरलीवर गारपिठीसारखा बरसत होता. त्या दिवशी मी चारपाच नव्हे तर चक्क दहाबारा तरी पोळ्या नक्कीच खाल्ल्या असतील.
            घराबाहेर पडताना मुरली आपली खरडपट्टी नक्कीच काढणार असा माझा कयास होता पण तसे काहीच झाले नाही. बाहेर पडल्यावर मुरलींनी माझ्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले की, तू तर पट्टीचा अभिनेता निघालास. आगामी नाटकात तुझ्यासाठी एखादी खास वात्रटाची भूमिका तयार करावी की काय, नक्कीच विचार करतो. मी उसने आव आणून हसायचा प्रयत्न  केला पण हसू मात्र फुटलेच नव्हते.

१९८७ च्या सुमारास ‘आठवड्याचा ग्यानबा’ बंद पडले आणि मुरलींशी संपर्क जवळजवळ तुटलाच आणि कधी पत्रव्यवहार तर कधी फोनवर बोलणे इतक्यापुरताच मर्यादित झाला.

            सात-आठ वर्षापूर्वीची गोष्ट. सकाळी नऊच्या सुमारास एक व्यक्ती माझ्या घरी आली. मी टेबलवर्क करत होतो. बसल्याबसल्याच मी नमस्कार केला. मी तसा राजकारणात आणि समाजकारणात असल्याने अनोळखी माणसे घरी येणे नित्याचेच आहे. मनुष्य अनोळखी असला तरी मी त्याच्याविषयी फारश्या ओळखीपाळखीच्या किंवा औपचारिक/अनौपचारिक चौकश्या करत बसत नाही. थेट मुद्द्याचेच बोलायला सुरुवात करत असतो. नित्याच्याच खाक्याप्रमाणे मी म्हणालो.

“बोला, कसं काय येणं केलंय? काय काम काढलंत?”
“तू मला आता ओळखणार नाहीस, आपण भेटून २० वर्षे…….”
आणि मी जागेवरच उडालो. डोळे विस्फारून आश्चर्यतिरेकाने किंचाळलोच
“मुरलीभौ ????”

            मला आश्चर्यतिरेकाचा बहुधा अटॅकच आला असावा. मुरलीसारखा ८०० किलोमीटरवरचा मनुष्य कुठलीही पूर्वसूचना न देताच खेड्यातील थेट माझ्या घरीच पोचू शकतो, याचा डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता.
आमची उरभेट ५-६ मिनिटे तरी चालली असावी. काहीकेल्या मिठी सैल होतच नव्हती आणि डोळ्यातून ओघळणारे आनंदाश्रूही थांबायचे नाव घेत नव्हते.
“मुळीच अवघड नाही” ही लर्नालॉजीची कार्यशाळा घेण्यासाठी ते जिल्ह्यात आले होते. ते आम्ही दोन दिवस मजेत घालवले आणि……..
तीच आमची शेवटची भेट…!
            फेब्रुवारी २०१५ मध्ये संपन्न झालेल्या वर्ध्याच्या पहिल्या अ.भा.मराठी शेतकरी संमेलनातील परिसंवादात भाग घेण्यासाठी मी त्यांना आवर्जून बोलावले होते, त्यांनी आनंदाने स्वीकृतीही दिली होती पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते ऐनवेळेवर येऊ शकले नव्हते.
            त्यांनी लिहिलेली आणि याच वर्षी जुलै महिन्यात प्रकाशित झालेली शोध ही रहस्य कादंबरी खूप गाजली आणि वाचकप्रिय ठरली. एक महिन्यातच दुसरी आवृत्ती काढावी लागली, एवढे यश त्यांच्या लेखणीने मिळवले. त्यांनी चार व्यावसायिक नाटकांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. १८ माहितीपटांची निर्मिती केली. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा धनी असलेल्या मुरलीधर खैरनार यांचे दिनांक ६ डिसेंबर २०१५ ला दिर्घआजाराने निधन झाले.

आज मला पुन्हा माझ्याच काही ओळींची परत आठवण झाली.

काही संदेश नसतातच….. वाचण्यासारखे
काळजात जाऊन रुततात…. टाचण्यासारखे
सांत्वनाही जिथे ओशाळल्यागत होते….
सारेच घाव नसतात जेव्हा…. सोसण्यासारखे
काही जाऊन रुततात, आत खोलवर….
सारेच व्रण कुठे असतात…. दिसण्यासारखे?.
डोळे बधिर अन अश्रू मुके व्हायला लागतात…..
सारेच नसते शब्दात….. सांगण्यासारखे

टाळायचे म्हटले तरी काही टळत नाही……
घडते तेच नियतीला मंजूर…. असण्यासारखे
निश्चयाने झेलत जावा येणारा प्रत्येक क्षण…..
आणखी असतेच काय ‘अभय’ ….. असण्यासारखे?

भगवंत देवो तुम्हांस सुख आणि शांती
हेच शब्द माझे प्रार्थनेसारखे…….!

देव त्यांच्या आत्म्यास सुख आणि शांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हा आघात सोसण्याचे बळ देवो, एवढीच प्रभुचरणी प्रार्थना करतो.

– गंगाधर मुटे
                                                                                                   ranmewa@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~