सोकावलेल्या अंधाराला इशारा

सोकावलेल्या अंधाराला इशारा

सोकावलेल्या अंधाराला, इशारा आज कळला पाहिजे
वादळ येऊ दे कितीही पण, हा दीप आज जळला पाहिजे

आंब्याला मानायचे कांदा, किती काळ असेच चालायचे?
डोळे उघडून तू वाग जरा, नकोसा वाद टळला पाहिजे

गाय इकडे आणि कास तिकडे, चारा मी घालायचा कुठवर?
कधीतरी इकडे; या बाजूस, दुधाचा थेंब वळला पाहिजे

प्रवेशदाराचा ताबा घेत, का उभा ठाकला आहेस तू?
माझा प्रवेश नाकारणारा, इरादा तुझा ढळला पाहिजे

आता थोडे बोलू दे मला, ऐकणे तुही शिकायला हवे
हे आवश्यक नाही की तूच, दरवेळेस बरळला पाहिजे

निर्भीडतेने ‘अभय’ असा तू, यज्ञकार्य असेच चालू ठेव
ग्रहणापायी झाकोळलेला, चंद्र आता उजळला पाहिजे
.
.
                                                   गंगाधर मुटे
…………………………………………………………

सावध व्हावे हे जनताजन

सावध व्हावे हे जनताजन

मळभटं सारी द्यावी झटकून
सावध व्हावे हे जनताजन ….॥१॥

कुणी फ़ुकाने लाटती पापड
कुणी झोपला ओढुनी झापड
मुखा कुणी तो कुलूप ठोकुनी
चिडीचिप झाला मूग गिळून ….॥२॥

आग लागुनी जळता तरूवर
म्हणती आहे मम घर दूरवर
सोकाविती मग कोल्हे-दांडगे
आणिक पिती रक्त पिळून ….॥३॥

किमान थोडा लगाम खेचा
नांगी धरुनी त्यांची ठेचा
झोपेचे हे सोंग फ़ेकूनी
अभय पहा तू डोळे उघडून ….॥४॥

गंगाधर मुटे
……………………………………….

‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.

आज ‘सकाळ’सप्तरंग पुरवणी’ने ‘रानमेवा’ ची दखल घेतली.
.’रानमेवा’

थोडा ’रानमेवा’ खाऊ चला!

………………………………………….

गंधवार्ता….. एका प्रेताची!

गंधवार्ता….. एका प्रेताची!

“दाsssदा, भाऊ गेलाsssss रेsssssss”
                     असा आर्त टाहो कानावर आदळताच आपल्या कामात मग्न असलेला भरत खाडकन भानावर आला. नजर उचलून पाहताच त्याला समोर जे दृश्य दिसलं ते पाहून तो हादरून गेला. काहीतरी भयानक विपरीत घडलंय याची जिवंत वार्ता घेऊन ती बातमीच त्याच्याकडे धावत येत होती.
                  भरत गव्हाणकर म्हणजे एक उच्चविद्याविभूषित आणि तेवढंच सुसंस्कारित व्यक्तिमत्त्व. बुद्धिमत्तेच्या बळावर गावामध्ये काहीतरी वेगळं करून दाखवायचंच, असा मनाचा पक्का हिय्या करून शहर सोडून गावात राहायला आलेला. चांगली महिन्याकाठी भरपूर वेतन आणि भत्ते देणारी शासकीय नोकरी सोडून दिली आणि शेतीमध्ये नवनवे प्रयोग करण्यास सुरुवात केली. त्याला इतिहास बदलायचा होता पण इतिहास बदलला नाही उलट इतिहासाचीच पुनरावृत्ती झाली, इतिहासानेच त्याचे जीवन बदलून टाकले. गावात आजवर जे इतरांच्या बाबतीत घडत होतं तेच भरत गव्हाणकरच्या बाबतीत घडलं. शेतीतून काही वरकड मिळकत मिळविण्याऐवजी, बापा-आज्याने पोटास गांजवून जे काही नगदी चार पैसे, सोनं-नाणं लेकासाठी जमवून ठेवलं होतं, तेही शेतीत गमावून बसला होता. सर्व बॅंकाचा थकबाकीदार झाला होता. खाजगी सावकारांनी त्याच्यासाठी दरवाजे केव्हाच बंद केले होते. थोडक्यात सांगायचं तर “हातावर आणणे आणि पानावर खाणे” येथपर्यंत त्याची प्रापंचिक हालत हलाखीची झाली होती. पण नियतीचे वार सोसूनही न डगमगता त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणारा भरत तेवढ्याच ताकदीनिशी येणार्‍या भविष्याशी समर्थपणे लढत होता. आर्थिक स्थितीने खचला असला तरी त्याच्या मनमिळाऊ स्वभावाने आणि लोकांच्या सुखदु:खात समरस व्हायच्या त्याच्या गुणवैभवामुळे मात्र गावांत त्याला खूप मानमरातब मिळायला लागला होता व गावकरी त्याच्याकडे आदरभावाने पाहायला लागले होते.
शेतीची संपूर्ण कामे करून झाली की उरलेल्या फावल्या वेळात रेडिओ,टीव्ही दुरुस्ती करून चार पैसे मिळवायचे असा त्याने नवा जोडधंदा सुरू केला होता. त्यामुळे दोन सांजेशी गुजराण व्हायला थोडा हातभार लागला होता.
                  त्यादिवशीही तो असाच एक टीव्ही दुरुस्ती करीत बसला होता. संपूर्ण टेबलभर व्हॉल्व, कंडेन्सर, कॅपॅसिटर, मल्टीमिटर अस्ताव्यस्त पडलेले होते. बाजूलाच लालभडक झालेला तप्तगरम कैय्या(सोल्डरिंग मशीन) व २४० व्होल्टचा विद्युत प्रवाह इकडेतिकडे पळवत नेणारे अर्धवट अवस्थेत खुले असणारे वायर्स सभोवताल पसरले होते.
भरत शांतचित्ताने टीव्ही दुरुस्त करण्यात मग्न झाला होता. आणि तेवढ्यातच त्याच्या कानावर एक आर्त टाहो येऊन आदळला.
“दाsssदा, भाऊ गेलाsssss रेsssssss”
                  पिसाटल्यागत सुसाट वेगाने, जिवाच्या आकांताने टाहो फ़ोडत शेवंता धावत आली आणि त्याला काही कळायच्या आतच त्याच्या गळ्याला बिलगली.
            क्षणभर भरत हादरलाच. काहीतरी अघटित घडल्याच्या शंकेच्या कारणापेक्षाही सभोवताल विखुरलेल्या जिवंत विजप्रवाहाच्या खुल्या तारा हे हादरण्यामागचे प्रमुख कारण होते. शिवाय टीव्हीमध्ये पिक्चर ट्यूब प्रकाशमान व्हावी म्हणून “पॉवर सेक्शन” भागात प्रचंड दाबाची विद्युतशक्ती तयार होत असते. नेमका तेथे जर मानवीस्पर्श झाला तर थेट मृत्यूच किंवा शरीराचा किमान एखादा अवयव/भाग कायम निकामी होण्याची हमखास खात्रीच.
                   शेवंता गळ्याला बिलगल्याने तिच्यासोबत त्याचाही तोल डळमळलाच होता. त्यामुळे शरीराचा कोणताही भाग कधी विद्युत प्रवाहाच्या संपर्कात येईल सांगता येत नव्हते. पण असे म्हणतात की आणीबाणीच्या क्षणी माणसाची विवेकबुद्धी शांत असली तर आलेल्या प्रसंगावर मात करण्यासाठी संकट धावून येण्याच्या वेगापेक्षा जास्त वेगाने बुद्धी संरक्षणाचे शस्त्र शोधायला लागते आणि क्षणार्धात उपायाचे मार्ग सुचायला लागतात. आणि तेच झाले. भरतने एकही क्षण न दवडता स्वतःचा तोल सावरून दोन्ही हाताने शेवंताला अलगद छातीपर्यंत उचलून घेतले आणि तिथून बाहेर आला.
तोवर बाहेर पन्नास-साठ लोकांचा जमाव जमला होता. कुणीतरी धावत जाऊन ग्लासभर पाणी आणून शेवंताला पाजले. पण शेवंताच्या तोंडून भाऊ….भाऊ….. भाऊ यापुढे शब्दच फुटेना.
“आवं तोंडानं सांग की, काय झालं त्ये” एक आजीबाई समजावणीच्या स्वरात बोलली.
“जे व्हाचं आसन त्ये झालं एकदा, आमालेबी माहीत होऊ दे ना, का झालं त्ये” सरस्वती काकू
“ताई नुसते रडून काय होणार? थोडा धीर धरून सांगा की आम्हाला” भरतची पत्नी अर्चना.
 आता शेवंताने स्वतःला सावरले होते, त्यामुळे थोडावेळ स्तब्धता पसरली.
आणि शेवंता सांगायला लागली. 
“मी वावरात कापूस वेचत व्हती. बाजूच्या रस्त्याहून एक फटफटी गेली. माह्या माहेरचा त्या फ़टफ़टीवर बसलेला मांगचा माणूस म्होरच्याले डगर्‍याने सांगत व्हता की अर्जुन आणि त्येची बायको दोघबी मेल्येत म्हून. म्या आइकलं आनं त्येला डगर्‍याने आवाज देल्ला, पण थे लई दूर निघून गेले व्हते.”
“अगं मग तो अर्जुन म्हणजे तुझाच भाऊ असेल कशावरून. दुसरा कोणीही असू शकते. तू तसं फारसं काही मनाला लावून घेऊ नकोस” भरत समजावणीच्या स्वरात सांगायला लागला.
“म्या बी थेच म्हंते. उगच दोरीले साप म्हणून भुई कायले ठोपट्टे बाप्पा?” सरस्वती काकूंनीही भरतचीच री ओढली.
“नाय नाय, माहा आत्मा गाही देत्ये की कायबी तरी इपरीत झालंच हाय, थे काय नाय. दादा तू लवकर फटफटी काहाड. आपल्याले लगबगीनं गेलं पाह्यजे” एका हातात पदराचा शेला घेऊन डोळे पुसत शेवंता बोलत होती.
                  शेवंताचं माहेर सोनेगाव फारसं लांब नव्हतं. केवळ १३ किमी अंतरावर. शेवंताचा भाऊ अर्जुन म्हणजे भरतचा वर्गमित्र. त्यामुळे सोनेगाव भरतच्या परिचयाचाच गाव. भरतने डोळ्यासमोर सोनेगावचं दृश्य उभं करून गावात दुसरा कोणी अर्जुन असावा काय, याचा शोध घेतला पण या अर्जुन व्यतिरिक्त दुसरा कोणी अर्जुन डोळ्यासमोर येईचना. म्हणून भरतच्या हृदयगतीचे ठोके जोरजोराने धोक्याची घंटा वाजवायला लागलेच होते.
भरतकडे मोटरसायकल नाही आणि त्याला शेवंताला घेऊन लगोलग सोनेगावला जाणे आवश्यक आहे, हे ताडून सरपंच विश्वासदादांनी आपली होंडा आणून समोर उभी केली आणि चाबी भरतच्या हातात देत म्हणाले.
“भरतराव तुम्ही शेवंताला घेऊन निघा लवकर आणि पोचल्यापोचल्या आम्हांस फोन करा.”
भरत आणि शेवंता सोनेगावात पोहचले तेव्हा गावातली निस्तब्ध शांतता आणि गावकर्‍यांचे पाणी उतरलेले चेहरे पाहून भरतची हृदयगती अधिकच वाढायला लागली होती.
आणि हे काय? अर्जूनच्या घरासमोर गर्दी?
ती घटनाच खोटी असेल किंवा दुसराच कोणीतरी अर्जुन असेल, अशी आतापर्यंत मनसमजावणी करत स्वतःस सावरणार्‍या शेवंताचा आता मात्र धीर सुटायला लागला होता.
गर्दीतून वाट काढत दोघेही कसेबसे अंगणात पोहचले. आणि ते दृश्य पाहून शेवंताने जिवाच्या आकांताने टाहो फोडला.
भाssssऊ हे का केलंssssssss रे ssss????
एखाद्या कठीण काळजाच्या माणसाचेही हृदय फाकून……वितळून पाणी-पाणी व्हावे, असेच ते दृश्य.
गळ्यात दोर लटकवून अर्जुन बोरीच्या झाडाला झुलत होता.
समोरच अगदी १५ फुटावर अर्जुनची बायको नीलिमा दोन्ही हात पसरून उपडी निपचीत पडली होती.
हे दृश्य पाहून भरतला भरून आलं. डोळ्यातून टपटप आसवे गळलीत.
                       पण हे असे का व्हावे त्याला कळेना. अर्जुनला गळ्यात फास लटकवून झुलताना पाहून नीलिमा त्याच्या दिशेने धावली असेल आणि धावता धावताच भावनांचा उद्रेक होवून अचानक हृदयगती थांबल्याने ती तेथेच पोटाच्या भारावर पडून गतप्राण झाली असावी. असा अंदाज त्याला आला पण अर्जुनचे काय? त्याने असा टोकाचा निर्णय का घ्यावा. अर्जुन तसा वाघासारख्या निधड्या छातीचा. विद्यार्थीदशेपासूनच खूप उन्हाळे-पावसाळे सोसलेला. बिनापुस्तकाने वर्गात आला म्हणून गुरुजीने ’गेट आऊट’ म्हणताच “गुरुजी, मी काही वर्गात बेडाबिस्तर घेऊन मुक्कामाला आलेलो नाहीये. ५ वाजले की जाणारच आहे. पण प्रथम मला हे सांगा की, पैशाअभावी पुस्तक घेतले नाही हा काय मोठा गुन्हा ठरतो? तुम्ही मला अभ्यासाचे प्रश्न विचारावे, मी उत्तर देऊ शकलो नाही तर अवश्य ’गेट आऊट’ होईन. पण पुस्तक नाही म्हणून ’गेट आऊट’ हे मी मान्य करणार नाही” असे गुरुजींच्या डोळ्याला डोळे भिडवून सांगणारा अर्जुन आत्महत्या करेल, हे भरतच्या गळी उतरत नव्हतं. पण समोर वास्तव होतं.
“कालच तालुक्याला गेला होता. मुन्नीसाठी शाळेचा ड्रेस आणायला” अर्जुनचा मित्र श्रीकांत सांगत होता.
“म्हणाला की अडत्याला उसनवार पैसे मागतो. पण त्याने दिलेच नसणार. तो तरी कसा देईन? यंदाचे सर्व पीक त्याला देऊनही कर्ज फ़िटलेच नव्हते. बॅंका आणि सावकाराची तर दमडीही चुकता करू शकला नव्हता. दुकानदाराने किराणा तर कधीचाच थांबवलाय. गेल्या वर्षी कोरडा आणि यंदा ओला दुष्काळ.”
                        मुन्नी. अर्जुनला दोनच मुली. मुन्नी मोठी, आठवीत शिकत असलेली आणि शब्दाली लहान, जेमतेम अकरा महिन्यांची.
                          मुन्नीला ड्रेस एकच. तोच शाळेचा आणि तोच घरी वापरायचा. सातवीची शाळा सुरू झाली तेव्हा घेतलेला. मुन्नीने ड्रेसचे नाव काढले की तिला १५ ऑगष्ट सांगायचा, नंतर दिवाळी सांगायची. दिवाळी उलटून गेली की २६ जानेवारी सांगायचे. असाच नित्यक्रम चालला होता दीड वर्षापासून. आणि एवढे दिवस निभावूनही नेलेत. पण आता ड्रेसच्याच आयुष्याने दगा दिला. विहिरीचे पाणी भरतेवेळी घागर उचलताना चर्रकन उभी रेघ घेऊन शर्ट फाटलं. तशी मुन्नीही समजदार, सुईदोरा घेऊन तिने लगेच शिवून घेतलं. पण ते शर्ट तिला घराबाहेर पडू देईना. चारचौघीत मिसळू देईना, शाळेतही जाऊ देईना.
तेव्हा अर्जुन म्हणाला होता.
“अगं मी नाहीतरी २६ जानेवारीला घेणारच होतो. आता २४ तारखेला तालुक्याला गेलो की आणतोच बघ.”
                        पण नियतीला हे मंजूर नसावे. सारे प्रयत्न विफल ठरले होते, आणि तो तालुक्याहून रिकाम्या हाताने परतला होता.
                          हे सर्व कळलं आणि भरतचं हृदय भरून आलं. त्याला टाहो फोडावासा वाटला. धाय मोकलून गडबडा लोळावंस वाटलं. पण त्याची प्रतिष्ठा आडवी होऊन त्याला तसं करू देईना. क्षणभर त्याला वाटलं की हे सर्व खोट्या प्रतिष्ठेचे बुरखे टराटरा फाडून फेकून द्यावे आणि यथेच्छ रडून घ्यावे, अगदी मन हलके होईस्तोवर. पण त्याने परत एकदा स्वतःला सावरले. भावनेवर ताबा मिळाल्याचे बघून हळूच श्रीकांतला विचारले.
“शब्दाली कुठाय?”
श्रीकांत काहीच बोलला नाही, बाजूच्या एका खोलीकडे चालायला लागला.
शब्दाली… ११ महिन्याची पोर ती. तिला नर्मदाकाकू मांजरीच्या पिलासोबत खेळवत होत्या. शब्दालीने त्या पिलाच्या मिशा धरल्या की ते पिलू मान हलवायचे. आणि मनीम्याऊची मान हलतांना पाहून शब्दाली खदखदा खिदळायची.
                         हे दृश्य पाहून परत एकदा भरतच्या मनात कालवाकालव झाली. हिला सांगायला हवे की तिच्या डोईवरचे सर्व छप्पर उडून गेले आहे. ती अनाथ झाली आहे, पोरकी झाली आहे. आज शब्दाली दोन्ही पंखांनी उघडी पडली आहे. हे कुणीतरी शब्दालीला सांगावे असे त्याला वाटले. पण हे सांगायचे कसे?
शब्दात सांगावे तर तिचे कान ग्रहण करण्याच्या योग्यतेचे नव्हते.
डोळ्यांनी दाखवावे तर दृश्याचे पृथक्करण करून मेंदूस अर्थ पुरवण्याइतपत तिच्या जाणीवा पक्व नव्हत्या.
मग तिला श्वसनेंद्रियामार्फ़त गंधवार्ता तरी कळली असावी का?
जडदेहातून प्राण निघून गेला की मग केवळ प्रेतच उरत असते. प्रेताचे वय जसजसे वाढत जाते तसतशी प्रेतातून निघणार्‍या गंधाची तीव्रताही वाढत जाते. आणि त्या गंधाला स्वत:ची अशी एक ओळखही असते.
मग तो गंध तरी शब्दाली पर्यंत वार्ता घेऊन आला असेल काय?
नाहीच. कारण शब्दालीच्या जाणीवांची क्षमता एकतर या सर्व जाणीवांच्या अलीकडे किंवा पलीकडे तरी असणार. आता भरतलाही पुन्हा एकदा भरून आले, आणि तो पुटपुटला.
“अरे कुणी तरी तिची आईबाबांसोबत शेवटची भेट करून द्या रे…….”
आणि आतापर्यंत खिदळत असलेली शब्दाली जोराने रडायला लागली. पण तिच्या रडण्याचे कारण तिला आईबाबांच्या निधनाची वार्ता कळली म्हणून नव्हते तर भरतने मोठ्याने फोडलेल्या कर्णभेदी टाहोला दचकून घाबरल्यामुळे होते.
“अरे कुणी तरी शब्दालीची आईबाबांसोबत शेवटची भेट करून द्या रे…….” असे भरत शब्दात पुटपुटायला गेला आणि यावेळेस त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडण्याऐवजी एक कर्णभेदी टाहोच बाहेर पडला होता.
…………………………..*  गंगाधर मुटे  *……………………………..

सत्कार समारंभ

सत्कार समारंभ
                        माझ्या ब्लॉगला स्टार माझा पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी व्यक्तिगत पातळीवर फ़ारच मोठी उपलब्धी आणि तेवढीच डोकेदुखी ठरेल असे दिसते. पुरस्कारामुळे आपले कर्तृत्व इतरांच्या नजरेत भरून ते व्यापकप्रमाणावर अधोरेखीत होत असते. अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची मुसळधार बरसात ही होत असतेच. पण माझ्या बाबतीत हा पुरस्कार मला जरा जास्तच भरभरून देत आहे. गरजेपेक्षा जास्त म्हणा की छप्परफ़ाडून देणे म्हणा असंच काहीसं माझ्या बाबतीत होत आहे. शिवाय पुरस्कार मला काही एकट्याला मिळालेला नाही. मी छत्तीसपैकी एक आहे. पण कदाचित कौतुकाचा वर्षाव माझ्यावर जास्तच होत असावा,असे दिसते. आणि त्याची काही कारणेही आहेत.
                             सर्वप्रथम मी मायबोलीकर असल्याने मायबोलीवर आणि मी मराठीकर असल्याने मी मराठीवर अभिनंदनाचा वर्षाव झाला.
पुरस्काराच्या यादीत ३-४ वैदर्भीय नावे आहेत पण मी विदर्भातील एकमेव रहिवासी वैदर्भीय असल्याने स्थानीय सर्व मराठी, हिंदी, इंग्रजी  वृत्तपत्रात ही बातमी अगदी फ़ोटोसहीत झळकली.
इथपर्यंत ठीक होतं पण एकदम सत्कार समारंभ?
                       होय हे खरे आहे. दिनांक १४ डिसेंबरला वर्धा येथील नामदेव सभागृहात शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांचे हस्ते, शेतकरी संघटनेचे प्रांतीय अध्यक्ष श्री रवीभाऊ देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड.वामनराव चटप, माजी आमदार सरोजताई काशीकर यांचे प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला.

……………….


शेतकरी संघटना

गंगाधर मुटे यांना शाल,श्रीफ़ळ व मानपत्र देवून गौरवतांना मा. शरद जोशी


……………….

                   आपल्याच हाताने आपलाच डमरू वाजवत, आपलेच गुणगाण गात ही बातमी तुमच्याशी शेअर करायचा विचार नव्हता. पण  या “सत्कार समारंभाच्या” बातम्याही वृत्तपत्रात झळकायला लागल्या (लोकमत) आणि मित्रमंडळीकडून फ़ोनवर/ईमेलच्या माध्यमातून विचारणा व्हायला लागली आणि प्रत्येकाला स्वतंत्रपणे सांगणे जड जायला लागले, शिवाय मनातील काही भावना सुद्धा व्यक्त करण्याशिवाय राहावले नाही म्हणून उशिराने का होईना पण ही आगळीक.
मुळात भारतातील शेतकरी मुकाच आहे. तो बोलत नाही, वाचत नाही आणि लिहितही नाही. त्याच अर्थाने शेतकर्‍यांची  संघटनाही निरक्षर असते. त्यांच्या कार्याची दखल “बेदखल” असते. लाखो शेतकरी एकत्र येऊन मेळावा घेतला किंवा शांततामय मार्गाने धरणे दिले तरी प्रसार माध्यमात ती न्यूज बनत नाही, किंवा बनली तरी एखाद्या कोपर्‍यात आगपेटीच्या आकारात तिला स्थान मिळत असते. याउलट राजकीय व्यक्ती शिंकली किंवा एखाद्या सेलेब्रिटीच्या पोटात गर्भ वाढत असेल तर भारतीय प्रसार माध्यमांसाठी ती ब्रेकिंग न्यूज ठरत असते, वृत्तपत्रातील रकानेच्या रकाने खर्ची पडायला लागतात.
त्या पार्श्वभूमीवर स्टार माझाला दखल घेण्याइतपत मी आंतरजालावर शेतकरी विषयक लेखन केलं, हे सर्वांना फ़ारच सुखावून गेलं असावं. नागपुरच्या भेटीत चटप साहेबांनी माझ्या सत्काराचा विषय काढला तेव्हा मी त्यांना म्हटले की, असं काही करू नये, शक्यतोवर टाळावे. तर ते म्हणाले “आमच्या मुलाचं कौतुक आम्ही नाही तर कुणी करावे.” वर्ध्याच्या मिटींगमध्ये सरोजताई म्हणाल्या. आम्ही सत्कार नाही तर “कौतुक सोहळा” करू. सत्कार काय किंवा कौतुक काय, शब्दामधले फ़रक. त्यामागची भावना आणि प्रेरणा मात्र एकच. सत्कार किंवा कौतुक करू नये असे नाही, पण या निमित्ताने माझ्या समोर काही प्रश्न निर्माण झाले आहेत. पहिला प्रश्न असा की सत्कार कुणी कुणाचा करायचा. आज माझ्या कवितांचे बर्‍यापैकी कौतुक होत आहे. माझ्या लेखनीला पुरस्कार मिळत आहे, मी प्रगल्भ आणि दर्जेदार लेखन करतो हे जवळपास सर्वमान्य होत आहे.
                   मग हे जर खरे असेल तर, एवढे चांगले लिहिण्याची शक्ती माझ्याकडे आली कुठून? मी वयाच्या विसाव्या वर्षी शेतकरी संघटनेत आलोय. मला माहित आहे की, मी शेतकरी संघटनेत येण्यापुर्वी एक दगड होतो. मी जे काही शिकलो ते शेतकरी संघटनेकडून शिकलो. मी जर आज प्रभावी आणि दर्जेदार काव्य लिहू शकत असेल तर ती बुद्धी मला फ़क्त आणि फ़क्त शेतकरी संघटनेने दिली आहे. शरद जोशींचे ,शेतकरी संघटनेच्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे विचार दर्जेदार होते म्हणून माझ्या लेखनीतले विचार दर्जेदार असावे, हे निर्विवाद सत्य आहे.
                 मग सत्कार कुणी कुणाचा करायचा? मी शेतकरी संघटनेचे आभार मानायचे की शेतकरी संघटनेने माझा सत्कार करायचा?
               दुसरा प्रश्न. आम्ही चळवळीतली माणसं, आंदोलन आमचा पिंड. आजही मला मी कवी आहे याचा जेवढा अभिमान वाटत नाही त्यापेक्षा मी शेतकरी संघटनेचा सच्चा पाईक आणि एक आंदोलक आहे, याचा जास्त अभिमान वाटतो. आणि आंदोलकांनी जे काही करायचे ते स्वत:साठी नव्हे तर चळवळीसाठी करायचे असते. जगायचे तर चळवळीसाठी, मरायचे तर चळवळीसाठी हाच आंदोलकांचा धर्म असला पाहिजे. त्यामुळे चळवळीतल्या कार्यकर्‍यांनी शक्यतो सत्कारापासून वगैरे चार हात लांबच असले पाहिजे हे माझे मत.
                         तिसरा प्रश्न. या तिसर्‍याप्रश्नामागे इतिहास आहे. शेतकरी संघटनेचा इतिहास असे सांगतो की, मुळातच दगड असलेल्यांना शेतकरी संघटनेने शेंदूर लावून मोठे बनविले. दगदाचा देव बनवला. पण मुळातच दगड असलेले दगड मोठेपण प्राप्त झाल्यावर स्वत:ला शेतकरी संघटना आणि शरद जोशींपेक्षाही मोठे तत्वज्ञानी,राजकारणी समजायला लागले, आणि ज्या संघटनेने त्यांना मोठे बनविले त्या संघटनेशी दगाबाजी करून उठून पळालेत. १९८० ते २०१० या काळातील संघटनेला सोडून गेलेल्यांची  यादी बनविली तर ही बाब निर्विवादपणे सिद्ध झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे यापुढे तरी संघटनेने सावधगिरीने पावले टाकली पाहिजेत असे मला वाटते.
मला सध्या एक प्रश्न विचारला जातो की मी असा अचानक कवितेकडे कसा काय वळलो, त्यामागची प्रेरणा काय? वगैरे. याबाबत मी माझ्या ‘रानमेवा’ या काव्यसंग्रहातील लिहिलेल्या भुमिकेत सविस्तर उहापोह केला आहे.
शेतकरी संघटनेच्या एवढ्या वर्षाच्या प्रवासात एक मुद्दा नेहमीच चर्चीला गेला की, शेतकरी चळवळीला पुरक असं साहित्य का तयार होत नाही. शेतकरी समाजाचं वास्तववादी साहित्य तयार व्हायलाच पाहिजे. हाच प्रश्न बराच काळ सतावत होता आणि आजही सतावतो आहे कारण आपण म्हणतो की वास्तववादी साहित्य तयार व्हायला पाहिजे, पण आम्ही मात्र लिहिणार नाही,मग ते कुणी लिहायचं? तर इतरांनी लिहायचं. मला कायम प्रश्न पडतोय तो असा की आम्हाला जे दिसतंय, आम्ही जे भोगलंय, आमची अनुभूती, आमचा विचार पण तो आम्ही नाही लिहिणार, तो इतरांनी लिहावा. हे कसे शक्य आहे? हे शक्य नाही. शेतकरी चळवळीचा विचार पुढे नेणारी साहित्यनिर्मीती शेतकरी चळवळीमध्ये काम केलेला आंदोलक जेवढ्या प्रभावीपणे करू शकेल तेवढा प्रभावीपणे चळवळीबाहेरचा साहित्यिक करू शकणार नाही मग तो कितीही मोठ्ठा प्रभावशाली साहित्यिक असू देत.
आपली अनुभूती आपणच साकारायलाच हवी. बस्स. ह्या एकाच प्रेरणेपोटी मी हाती लेखनी धरली. आणि कविता  लिहायला लागलो.
                 यानिमित्ताने आपण माझे कौतुक केले, ही माझ्यासाठी मोठी गौरवाची गोष्ट आहे आणि म्हणुन मी तुमचा खूप खूप आभारी आहे.
गंगाधर मुटे
*   *    *
सभेत बोलताना स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप म्हणाले की, एकमेकाच्या सुखदु:खात वाटेकरी व्हावे हा माणसाचा स्वभाव आहे आणि शेतकरी संघटनेचं आपलं हे संयुक्त कुटूंब आहे. आपल्या संयुक्त कुटूंबातल्या एका भावाने एका वेगळ्या क्षेत्रात, संघटनेचं कार्य करता करता, त्याच्या मनातल्या असणार्‍या भावना, मनातल्या कल्पना, त्याच्या मनातल्या भुमिका, शेतकरी संघटनेचं काम हे गद्यातलं असलं तरी पद्यामध्ये मांडून समाजाचं प्रबोधन करायचा प्रयत्न केला आहे, म्हणून, संघटना ही आपली आई आहे, आणि आईचं काम आहे की लेकराचं कौतुक करावं. म्हणून साहेब स्वत: आज गंगाधरच्या या सत्कार समारंभाला हजर आहेत. ज्याची दखल स्टार टीव्हीच्या चॅनेलने घेतली, समाजाने घेतली आणि त्याचं त्या तर्‍हेचं कौतुक होणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्या कुटूंबातल्या माणसाला अवार्ड, पुरस्कार मिळतो तेव्हा आपल्या कुटूंबाचा घटक म्हणून त्याचं कौतुक करणं, त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणं आवश्यक असते. म्हणून आपण हा कौतुक सोहळा साजरा करीत आहोत.
*    *    *
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रवीभाऊ देवांग म्हणाले की, गंगाधर मुटेंच्या एका कवितेत गावातला एक शाम्या नावाचा मुलगा बिपाशासाठी मुंबईला लुगडं घेऊन जातो आणि त्या शाम्यात गावरानपणा ठासून भरला आहे. श्याम्यानं तर कहरच केला. इच्चीबैन. आता इच्चीबैन या शब्दात असं काय आहे की ते प्रत्येकाला हसायला लावतं? तर गंगाधर मुटेंच्या शब्दातली ही जादू आहे. या कवितेची ओरिजिनीलीटी काय तर अस्सल गावरानपणा. गंगाधर मुटेंच्या कवितामधून  त्यांची अनुभूती अभिव्यक्त झाली आहे. त्यांच्या कवितेचा आवाका मोठा आहे. त्यांनी गझल लिहिली, त्यांनी लावणीपण लिहिली. एक लावणी तर इतकी सुंदर आहे की ती शेतकर्‍याची मुलगी म्हणते की “मला पावसात भिजू द्या.” तिला आता पावसात खेळायचे आहे. तिच्या मैत्रीनी म्हणतात की तिला मनसोक्त नाचू द्या. तिला स्वातंत्र्याचा आनंद घेऊ द्या. तिच्या आनंद घेण्याच्या कक्षा तिला रुंदावू द्या. अडथळे आणू नका. असे ती लावणी सांगते. गंगाधर मुटेंच्या कवितेमध्ये ती सगळी विविधता भरली आहे. त्यांनी असं म्हटलंय की माझ्या आयुष्यात भाकरीचा शोध घेता घेता अर्ध आयुष्य निघून गेले आणि तारुण्यपणात पाहिलेले स्वप्न भाकरीच्या शोधातच उध्वस्त झाले. सुरुवातीला “बरं झाले देवाबाप्पा शरद जोशी भेटले” असे लिहिणार्‍या कवीची मध्यंतरीच्या काळात जणूकाही कविताच करपून गेली होती. मध्ये बराच मोठा अंतराळ गेला, पुन्हा त्यांची कविता बहरून आली आणि ते संघटनेचे जिल्हाध्यक्षही झाले. त्यांच्या कवितेचं स्टारमाझाने कौतुक केलं आणि त्या निमित्ताने आपण आपल्या परिवारातल्या कार्यकर्‍याचं कौतुक करीत आहो. मा. शरद जोशींनी ज्या दिवशी गंगाधर मुटेंच्या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहिली, मला असं वाटतं की यापेक्षा मोठं कौतुक या कवीचं दुसरं कोणतंच असू शकत नाही. आपण पुन्हा एकदा या कवीचं टाळ्या वाजवून जोरदार कौतुक करुया.
*    *    *



शेतकरी संघटना

शेतकरी सत्कार समारंभ सभेस संबोधीत करतांना मा. शरद जोशी



                    समारोपीय भाषणात मा. शरद जोशी म्हणाले की, शेतकरी संघटनेच्या सगळ्या इतिहासामध्ये कार्यकर्त्यांना काही पुरस्कार मिळाले आणि त्याकरिता त्यांच्या कौतुकाची काही बैठक झाली, समारंभ झाले असे कधी झाले नाही. कौतुक करावे असे प्रसंग घडले नाहीत असे नाही, पण आपण कुणाचं फ़ारसं कौतुक केलं नाही.अशी परंपरा नसताना एका अगदी वेगळ्या तर्‍हेच्या कामगिरीकरिता किंवा कौतुकाकरिता हा सत्कार समारंभ आहे. ज्या क्षेत्रामध्ये मुट्यांना पुरस्कार मिळाला आहे, ते क्षेत्र माझं आहे, हे लक्षात घ्यावे. मी हिंदुस्थानात येऊन शेतकरी संघटनेच्या कामाला लागण्याआधी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये गणकयंत्र विभागाचा प्रमुख होतो.
                 मी शक्यतो कोणत्याही कवितेच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहीत नाही. गंगाधर मुट्यांच्या कवितेच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली, त्याचा त्यांना आनंद वाटत असेल तर तो त्यांनी व्दिगुणित करून घ्यावा. कारण मी पूर्वी कधी प्रस्तावना लिहिलेली नाही. 
                गंगाधर मुट्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं आहे आणि त्याकरिता प्रस्तावना लिहिल्यानंतर आणि मी तेथे हजर राहणार आहे म्हटल्यावरती लोकांच्या मनात साहजिकच थोडं कुतूहल नेहमीपेक्षा जास्त वाटलं. आणि गंगाधर मुटे वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. तेव्हा जिल्हाध्यक्षाच पुस्तक आणि ते पुस्तक कॉम्प्युटरवर, नेटवर्कवर केलं आहे, म्हणजे नेमकं काय, याची फारशी कल्पना कार्यकर्त्यांना असण्याची शक्यता नाही. माझी या प्रसंगात थोडीशी अडचण होते ती अशी की मी मुळामध्ये काव्यबुद्धीचा नाही. काव्यप्रतिभा ही माझ्याकडे शून्य आहे. पुण्याला राष्ट्रसेवादलाच्या एका बैठकीमध्ये ना.ग.गोरे यांना त्यांच्या बैठकीमध्ये कुणीतरी एक प्रश्न विचारला की शेतकरी संघटनेचं आंदोलन फार मोठं होतं, लाखाच्या संख्येने लोक येतात, लाखाच्या संख्येनं तुरुंगात जातात, शिक्षा भोगतात, त्यांच्या संबंध आंदोलनामध्ये, मघाशी गंगाधर मुट्यांनी म्हटल्याप्रमाणे, साहित्यनिर्मिती फारशी नाही. आणि साहित्याकरिता केवळ गद्यलिखान, लेख आणि पुस्तके लिहून भागत नाही. ना.ग.गोर्‍यांनी असं म्हटलं की याचं कारण असं आहे की शरद जोशी हा मनुष्यच मुळात गद्य स्वभावाचा आहे. त्याला काव्यशक्ती नसल्यामुळे त्याची मांडणी सगळी गद्य स्वरूपाची आहे. आणि शेतकरी किंवा कोणतेही आंदोलन चालवायचं म्हणजे इतकं तर्कशुद्ध, तर्ककर्कश असून भागत नाही. त्याच्यामध्ये कुठेतरी थोडा पागलपणा यावा लागतो. आणि पागलपणा आल्याशिवाय लोकं आहुती चाखायला तयार होत नाही.
                 मी प्रामाणिकपणे सांगतो की, कुणाची सेवा करायची,कुणाची करुणा करायची या भावनेने मी कामाला लागलो नाही. अगदी व्यावहारिक तर्कशुद्ध हिशेब करून मी या कामाला लागलो. मी संयुक्त राष्ट्रसंघात राहिलो असतो तर भारताची राजकीय प्रतिष्ठा लक्षात घेता मी जास्तीत जास्त संयुक्त राष्ट्रसंघाचा महासचिव, सेक्रेटरी जनरल त्याच्या खालोखाल डेप्युटी सेक्रेटरी जनरल या पदापर्यंत पोचलो असतो. पण मी जेव्हा मनाशी हिशेब केला की हिंदुस्थानातल्या दारिद्र्यनिर्मुलनाचे काम इतकं महत्त्वाचं आहे की त्या कामामध्ये कितीही कष्ट,पराजय,अपमान सोसावे लागले तरी सुद्धा संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपमहासचीव होण्यापेक्षा या कामामध्ये मला जास्त आनंद वाटेल इतक्या तर्कशुद्ध बुद्धीने, गणिताने मी या कामात पडलेलो आहे. माझ्यामध्ये काव्यशक्तीनाही हा मुद्दा मी वारंवार मांडलेला आहे.
                      मी जेव्हा हिंदुस्थानात आलो तेव्हा गणकयंत्र इथे माहीत नव्हतं. राजीव गांधींनी ते नंतर आणलं. आणि त्यावेळी माझ्याकडे पहिल्यांदा आयको-२ मॉडेल आलं, त्याचा उपयोग करून मी शेतीमालाचा उत्पादनखर्च कसा काढावा, याचं एक सॉफ्टवेअर तयार केलं. त्या सॉफ्टवेअरमध्ये मी तुम्ही दररोज जे काही कामे करता त्यापैकी कोणकोणते खर्च हिशेबात धरायचे, कोणकोणते खर्च हिशेबात धरायचे नाहीत, याचं एक मॉडेल त्याच्यामध्ये मांडलं होतं. पण जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा आणि त्यानंतर आपली चूक झाली आणि अजूनही शेतकरी संघटनेचं संकेतस्थळ अजूनही पूर्णं झालेलं नाही. सुरुवात झाली पण त्याला नियमितपणे अपडेटींग करणे शेतकरी संघटनेला फारसं जमलेलं नाही. याउलट शेतकरी संघटनेच्या बरोबर झालेल्या चळवळी उदा. NGO ज्यामध्ये मेघा पाटकर, वंदना शिवा किंवा सुमन नारायण, यांच्या चळवळींना जनाधार जवळजवळ शून्य असताना, केवळ त्यांनी गणकयंत्राच्या हिशेबाने आपण फार मोठी संघटना आहे, हे दाखवलं. केवळ महसूलखात्याकडून किती शेतकर्‍यांनी आत्महत्यां केली, त्यांची नांवे, परिस्थिती यांची आकडेवारी घेऊन संकेतस्थळं तयार केली आणि मोठीमोठी पारितोषकं मिळवून गेली. आम्ही याबाबतीत फार कमी पडलो. अलीकडे या बाबतीत चांगल्यापैकी जागृती व्हायला लागली आहे. म्हात्रे सरांनी पहिल्यांदा जुना शेतकरी संघटक सुद्धा ई-मेलने पाठवायला सुरुवात केली आहे. आणि अलीकडे या ब्लॉगमध्ये मी निदान दोन नावं घेतो. सुधाकर जाधव आणि अमर हबीब हे दोघेही या प्रकारचं काम करताहेत. आज ना उद्या त्यांच्या कामालाही चांगला प्रतिसाद मिळेल, अशी मी आशा करतो. गंगाधर मुट्यांप्रमाणे ही मंडळीही या क्षेत्रात पुढे जातील आणि शेतकरी संघटनेची ही लुळी, कमजोर पडलेली बाजू थोडी आणखी मजबूत होईल अशी मी आशा करायला हरकत नाही.



* * * * * * * * * *
………………………………………………………………………………
कार्यक्रमाचा वृतांत पाहण्यासाठी आणि मा. शरद जोशी व मान्यवरांचे भाषण ऐकण्यासाठी क्लिक करा.

……

……

……


……

…..

…………………………………………………………………………………..

शेतकरी आत्महत्या आणि मानसोपचार शिबीरे

शेतकरी आत्महत्या आणि मानसोपचार शिबीरे
                   आत्महत्याग्रस्त भागातील शेतकर्‍यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी मानसोपचार शिबिरे आयोजित करावी, असा वारंवार सल्ला दिला जातो त्या अनुषंगाने खालील बाबींचा विचारवंताकडून खुलासा होणे आवश्यक आहे.
१) जेंव्हा जेंव्हा शेतकरी आत्महत्येचा विषय निघतो तेंव्हा तेंव्हा शेतकरी मनोदुर्बलता किंवा मनोरुग्णतेमुळे आत्महत्या करतो असेच निदान केले जाते. आणि त्याच अनुषंगाने उपाययोजना सुचविल्या जातात. सहाजीकच, निदान जर चुकीचे असेल तर सुचविलेले उपाय योग्य कसे असणार? (वाचा – शेतकरी आत्महत्यावर तज्ज्ञांची मुक्ताफळे – )
२) आर्ट ऑफ लिविंग किंवा मानसोपचार शिबिरे आयोजित करायला हरकत नाही पण शेतकर्‍यांचे मनोबळ वाढावे यासाठी काय सांगणार? प्रबोधनाचे स्वरूप काय असणार?
उदा. शेतकरी कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या करत असेल तर त्याचे मनोबळ वाढविण्यासाठी
अ) कर्ज परत करण्यासाठी चोरी करा, दरोडे घाला आणि पैसे मिळवून कर्ज परत करा असे सांगणार? (शेतीच्या उत्पन्नातून/बचतीतून त्याला कर्ज फ़ेड करता आली नाही हे गृहीत धरावेच लागेल.)
आ) मरण पत्करण्यापेक्षा कर्ज बुडवायला शिकण्याचा सल्ला देणार?
इ) आर्थीक हलाखीमुळे मुलीचे लग्न करता येत नसेल तर टेंशन घेऊ नकोस, ती बिनालग्नाची राहीली तरी चालेल पण तू जगलाच पाहीजे असे सांगणार?
ई) सावकाराने कर्जापायी भरचौकात अपमान केला तरी तू मनाला लावून घेऊ नकोस, संवेदनाक्षम, हळवेपणाने जगण्यापेक्षा कोडगेपणाने वाग असा सल्ला देणार?
            मानसोपचार शिबिरे घेणार म्हणजे त्याला काय समजावणार याचा उलगडा व्हायला हवा.
रोगाचे निदानच चुकीचे घेवून एखादा मानसोपचारतज्ज्ञ उपचार करणार असेल तर अपेक्षित परीणाम कसा साधला जाईल?
हे प्रश्न अनुत्तरीत राहातात.
………………………………………………………
या अनुषंगाने झालेली एक प्रश्न-उत्तरांची देवानघेवान.

शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवर पुष्कळ चर्वितचर्वण  झाले आहे.
(आणि त्या सर्वांच्या मते शेतकरी मुर्ख, मनोरुग्न व अज्ञानी आहे.)

 कित्येकदा तर मूळ विषयाचे गांभीर्य दडपून टाकून, केवळ सरकारवर तोफा डागण्यासाठी हा विषय ‘हायजॅक’ केला गेला आहे.
(हे ‘हायजॅक’ करणारे मात्र नक्कीच मनोरुग्न असणार. पाठवा त्यांना मेंटल हॉस्पीटल मध्ये. माझे सक्रिय समर्थन.)

मुंबईतल्या किंवा कुठल्याही झोपडपट्टीमधले, उकिरड्यातले अन्न वेचून खाणारे, रेल्वे रुळांवर शौचास जावे लागत असलेले, दिवसोंदिवस आंघोळ करू न शकणारे लोक आत्महत्या का करीत नाहीत?
(ते सात पिढ्यांत फेडता येणार नाही एवढे कर्जबाजारी नाहीत म्हणून.)

त्यांच्यामध्ये जगण्याची कोणती प्रेरणा असते?
(सर्व सजीवांमध्ये जगण्याची  प्रेरणा सारखीच असते.)

 किंवा, उलटपक्षी, कॅट सारख्या परीक्षांतील अथवा कुठल्याही परीक्षेतील अपयशाला घाबरणारे, आय. आय. टी सारख्या नामवंत शिक्षणसंस्थांतून शिकणारे लोक आत्महत्या का करतात? त्यांच्यामध्ये कोणती प्रेरणा कमी पडते? महत्त्वाच्या परीक्षांच्या निकालांच्या आगेमागे आत्महत्यांची लाट का येते?  रोज रात्री नवर्‍याच्या लाथाबुक्क्यांचा मार खाऊन, प्रसंगी डाग, चटके सोसून पुन्हा सकाळी निमूटपणे सर्व अपमान व सर्वांसमोर झालेली शोभा विसरून(सूडाची भावना न ठेवता) त्याच्यासाठी स्वयंपाक बनवणारी स्त्री कोणत्या अंतःप्रेरणेने जगत असते? त्यातल्या काही आत्महत्या करतातही, पण एकंदर अत्याचाराच्या प्रमाणात त्या नगण्य असतात.
(आत्महत्येस एवढेच कारण पुरेसे नाही.)

शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा देशातल्या एकूण आत्महत्यांमधला एक छोटा भाग आहे.
(किती शेतकर्‍यांनी पुन्हा आत्महत्या कराव्यात म्हणजे आंकडा शोभून दिसेल ????????.
सबंध देशात फक्त एका शेतकर्‍याने जरी आत्महत्या केली तरी एखाद्याला ते लाजीरवाने वाटेल. याउलट आत्महत्या करता करता एखादी पिढी जरी उध्वस्त झाली तरी एखाद्याला त्याचे काहीच वाटणार नाही. हे समिकरण शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या संख्येवर नव्हे तर त्या “एखाद्याची” मानसिक रचना/ठेवन कशी आहे यावर अवलंबून आहे. )

 त्यातूनही, सर्वच कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतात का?  
(“सर्वच कर्जबाजारी शेतकर्‍यांनी आता सामुहीक आत्महत्या करून  तसे सिद्ध करून दाखवावे, तसे न केल्यास आत्महत्या करणार्‍याला आम्ही मनोरूग्न म्हणत राहू, इतर कुठल्याही कसोट्यांवर पडताळा करण्याची गरज नाही” असा याचा अर्थ घ्यायचा काय? )

जर ह्याचे उत्तर ‘नाही’ असे असेल, तर आत्महत्यांमागे मनोदुर्बलता हे कारण असण्याची शक्यता वाढते.

(मग सरकार झोपी गेले काय? अशा मनोरूग्न शेतकर्‍यांची तातडीने राज्यवार यादी बनवा आणि प्रसिद्दीला द्या. म्हणजे अशा मनोरूग्न शेतकर्‍यापासून इतर शेतकरी बांधव सुरक्षीत अंतर ठेवून चालतील.)

                                                        गंगाधर मुटे
………………………………………………………………..

खरेच बियाणे वांझ होते ?

खरेच बियाणे वांझ होते … ?

“भुईला दिली ओल नाही ढगाने
कशी अंकुरावीत आता बियाणे?”


                  बीजाची इच्छा आहे अंकुरण्याची, कोंब फ़ुटून वृक्ष बनण्याची,इतर वृक्षाप्रमाणे उंच-उंच वाढून गगनाशी स्पर्धा करण्याची…पण अंकुरण्यासाठी भुईत ओलावा असावा ना? बिना ओलाव्याने अंकुरायचे तरी कसे? अंकुरायला पाणीच हवे, कोणाचा कोरडा सल्ला किंवा अगम्य आशावाद किंवा प्रचंड मनोबळ असून-नसून उपयोग तो काय? ओलावा मिळाला तरच इच्छाशक्ती,आशावाद,मनोबळ उपयोगाचे. नाही तर शुन्य उपयोगिता.
                  भुईला पण वाटते की त्या बीजाचा जन्म व्हावा. मातृत्वाची प्रेरणा काय असते,हे त्या मातेलाच कळे. पण ती तरी काय करणार बिचारी? ओलाव्यासाठी ती पुर्णत: मेघावर अवलंबून. मेघाकडून तिला पाण्याचे थेंबच हवे. कोरडे गर्जन नकोच. कोरड्या गर्जनाचा आवाज फ़ार मोठा. अशा गर्जनांमुळे गर्जना केल्याचा मेघाला आनंद मिळेलही कदाचित. पण अशा गर्जनांचा भुईने आणि बीजाने उपयोग तरी काय करून घ्यावा?
             बीजाला उगवता आले नाही कारण मातीत ओलावा नव्हता. आणि मातीत ओलावा तयार होण्यात न होण्यात बीजाचा दोष तो काय?
            पाऊस पाडला नाही हा दोष मेघांचा. दोष मात्र मढला जातो बीजाच्या माथ्यावर.
मेघांना दोषी ठरविण्यासाठी लागणारी हिंमत ज्यांच्याकडे नाही ते चक्क बियाणेच वांझ होते असा शेरा मारून मोकळे होतात.
                                                    गंगाधर मुटे
………………………………………………………………..

गाणे बदनाम वाले

गाणे बदनाम वाले


कोण्या एका गावामाजी । वार्ता एक मिळाली ताजी ॥
की कोणी साधू बुवा संताजी । गावामध्ये प्रवेशले ॥१॥

वार्ता पसरता सार्‍या नगरी । गोळा होय सभ्य गावकरी ॥
म्हणती घ्यावा सप्ताह तरी । आता सत्संगाचा ॥२॥

त्यात एक सद्‍गृहस्थ । म्हणे होणार जगाचा अस्त॥
भक्तीमार्गे जावे समस्त । मोक्षप्राप्ती मिळविण्या ॥३॥

सल्ला असा ध्यानी भरला । की भक्तीमार्गे गेला तो तरला ॥
नाहीतर नरकामध्ये चरला । भोगवादी जाणावा तो ॥४॥

ठराव केला एकमताने । आणि गाठला स्वर्ग सुताने ॥
मग उभारले शामियाने । व्यासपिठ भव्यही ॥५॥

पारायणाची पाहती वाट । तिथे गर्दी झाली अफ़ाट ॥
पुजेचेही आणिले ताट । पण बुवा काही येईना ॥६॥

मग कुणाला आली शंका । अफ़वेनेही लूटली लंका ॥
त्यातच कोणी पिटवला डंका । की बुवा पळाले रे ॥७॥

एक नास्तिक संधी साधून । बोलून गेला गहिवरून ॥
घेऊ थोडी ’सिरियल’ पाहून । येईस्तोवर बुवाजी ॥८॥

मग वेळ लावियेला सार्थकी । टीव्हीत नाचत होती नर्तकी ॥
तिने वेधिले चित्त सर्व की । तमाम आपुल्याकडे ॥९॥

पारायणास भुलून गेले । नृत्यांगनेस जवळ केले ॥
ठेका धरूनी नाचू लागले । भावविके भक्तही ॥१०॥

आता मुन्नीचे नाम आले । बुवा झेंडूबाम झाले
गाणे बदनाम वाले । भारतभर फ़ेमस झाले ॥११॥

गंगाधर मुटे
………………………………………………………

तार मनाची दे झंकारून

तार मनाची दे झंकारून

सूर शब्दांचे अलगत छेडून
तार मनाची दे झंकारून ….!!

भावबंध हे मनगर्भिचे
उधळण करतील चितरंगाचे
सुप्तभाव ते पुलकित होता
हात मोकळे तू द्यावे सोडून ….!!

मेघ गर्जुनी करतील दाटी
सुसाट वारा रेटारेटी
मनी विजाही करता लखलख
थेंब टपोरे तू जावे वर्षून ….!!

मनफ़ुलांनी गंधीत वारा
दे दरवळूनी भावफ़ुलोरा
बोल अभय जे कानी येईल
तन्मयतेने घ्यावे ऐकून ….!!

गंगाधर मुटे
……………………………………

शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..?

शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..?.
                                  ‘वांगे अमर रहे !’ हा लेख वाचून शर्मिला यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न नसून उत्तरच आहे असे मला वाटते.
                                 कारण जोपर्यंत मालाची वाहतूक, स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इंडस्ट्री यात वाढ, सुधारणा होत नाही तो पर्यंत हा प्रॉब्लेम कमी होणारच नाही. परदेशात फ्रोजन फूड मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. ती टेक्नॉलॉजीही प्रगत आहे. लगेच फ्रीझ केलेले पदार्थ हे कधी कधी ‘ताज्या’ हून ताजे असतात. जे तंत्रज्ञान आज परदेशात वापरले जाते तसे तंत्रज्ञान आमचा देश कृषीप्रधान्,अर्थव्यवस्थेचा कणा वगैरे असूनही विकसित का करू शकला नाही?.
                            विदेशी तंत्रज्ञान जसेच्या तसे स्वीकारण्यापेक्षा देशातील लोकांना रुचेल आणि देशात ज्या शेतमालाची अधिक पैदावार होते त्यावर आधारित तंत्रज्ञान विकसित व्हायला पाहिजे. उदा.
१) बोरावर आधारित बोरकुट
२) लिंबावर आधारित सरबते
३) टोमॅटो सास
                                या व्यतिरिक्त अजून बरेच काही करता येण्यासारखे आहे पण या सर्व पदार्थांना देशी सुगंध हवा, तरच ते लोकांच्या पसंतीस उतरेल.सामान्य लोकांनी प्रक्रिया उद्योग उभारले तरच त्याची किंमतही आटोक्यात राहू शकते,वेगवेगळ्या भागात स्थानिक शेतमालाची उपलब्धता आणि त्या भागातील लोकांची रुची लक्षात घेऊन पाऊल टाकावे लागेल.
हे सर्व उद्योग मोठ्या किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी करून उपयोगाचे नाही कारण त्यामुळे शेतकर्‍यांना अथवा बेरोजगारांना फायदा होणार नाही.
मागे बायोडिझेल निर्मिती बद्दल बरीच चर्चा झाली.जेट्रोपा लागवड उपयोगी ठरली असती.
                                  शेती विषयक तंत्रज्ञानामध्ये लहान-लहान देश पुढे-पुढे जात असताना आमचा भल्ला मोठा देश मागे-मागे का पडतो?. स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इंडस्ट्री अन्य देशांत स्थापित अवस्थेमध्ये वावरत असताना आम्ही या विषयात अजून पहिले पाऊल सुद्धा नीट टाकायला सुरुवात केलेली नाही. आणि आम्हाला तशी गरजही वाटत नाही. कदाचित असे तर नाही की उगीच माथापच्ची करून नवनिर्माण करत बसण्यापेक्षा इतरांनी विकसित केलेले तंत्रज्ञान चोरून-लपून मिळवायचे,त्यात जुजबी फेरबदल करायचे आणि मेड इन इंडिया असा शिक्का मारला की आम्हीही जगाच्या समांतरच आहो हे भासविण्याचा सरळसोट ‘शॉर्टकट’ आम्ही निवडलाय?. हा माझा दावा नाही उगीच शंका आहे,परमेश्वर करो आणि माझी शंका खोटी ठरो.
                              तरी एक प्रश्न कायमचा कायमच राहतो,आम्ही त्यादिशेने पावले का टाकीत नाही?. जसे शर्मिला यांना वाटते तसे आमच्या राज्यकर्त्यांना का वाटत नाही?.
                              भारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहे असे मी म्हणतो.एक दिवस विचार केला की मी असे का म्हणतो,तर उत्तर मिळाले की पुस्तकात वाचले म्हणून म्हणतो.पुस्तकात लिहिणार्‍यानेही कुठे तरी वाचले असणार म्हणून लिहिले असणार,त्याच्या आधीच्यानेही कुठे तरी वाचले असणार म्हणून लिहिले असणार… ही यादी किती लांब आहे देवच जाणे.
देशाचे चित्र डोळ्यासमोर ठेवून स्वयंप्रेरणेने ‘भारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहे’ असे ज्याला वाटते त्याच्या वैचारिक बैठकीमध्ये आणि कृतिशील हालचालीमध्ये हे प्रतिबिंब नक्कीच उमटत असते..
                        “कृषीक्षेत्राला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा” मानले गेले. गेली अनेक वर्षे मी हा ‘अर्थव्यवस्थेचा कणा’ शोधायचा प्रयत्न करतो परंतु गवसतच नाहीये. अर्थव्यवस्थेचा दिवाळीचा सन म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पच ना? तिथे तर ह्या ‘कण्या’पेक्षा रेल्वेसुद्धा जास्त महत्त्व खाऊन जाते. रेल्वे इतका मान सुद्धा या ‘अर्थव्यवस्थेच्या कण्याला’ मिळताना दिसत नाही. धोरणात्मक निर्णयांमध्ये शेती विषयाचा शेवटून पहिला नंबर लागतो.
                            मग ज्या देशात शेतीक्षेत्र एवढे दुर्लक्षित असेल त्या देशात स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इंडस्ट्री सारख्या इंडस्ट्रीज कशा उभ्या राहतील?. या ठिकाणी एखाददुसरे किंवा तुरळक उदाहरण नव्हे तर व्यापकतेने देशातील ८० % जनतेचा विचार करावा लागेल. कारण पाचपन्नास युनिट उभारल्याने देशाचा प्रश्न सुटणार नाही.
                           त्याशिवाय अशी प्रक्रिया युनिट्स उभारायला स्किल्,कौशल्य,व्यावसायज्ञान,अनुभव,आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळ लागेल. आमच्याकडे मनुष्यबळ सोडलं तर बाकी गोष्टींचा प्रचंड दुष्काळ आहे. मनुष्यबळ आहे पण त्यात बुद्धिबळ कमी आणि बाहूबळ जास्त आहे. जे काही बुद्धिबळ आहे त्यात व्यवहारज्ञान/व्यावसायिक ज्ञान कमी आणि पुस्तकी किंवा कारकुनी ज्ञान जास्त आहे. म्हणून कारखाने काढायला कोणी समोर येत नाही पण कारखाना निघणार म्हटल्यावर रांगा लागतात. याला आजचे युवक अजिबात जबाबदार नाहीत,असलोच तर आम्ही प्रौढ मंडळी जबाबदार आहोत. आमची शिक्षणपद्धती जबाबदार आहे.आजची शिक्षण प्रणाली म्हणजे कारकून घडवणारे आणि बेरोजगार निर्माण करण्याचे कारखाने ठरले आहेत.शाळा कॉलेज किंवा उच्च शिक्षणाचे मुख्य सूत्र ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ असा विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देईल एवढे ताकदवार असायला हवे.याबाबतीत वैद्यकीय शिक्षणाचा ‘मॉडेल’ म्हणून उपयोग होऊ शकतो.मला वाटते की कदाचित ‘डॉक्टर’ हा एकमेव विद्यार्थी असावा ज्याच्यामध्ये डिग्री हाती पडताक्षणीच आपले आयुष्य स्वबळावर जगण्याचा आत्मविश्वास आलेला असतो. बाकी क्षेत्रासाठी आपण एवढी आत्मविश्वास देणारी शिक्षणप्रणाली जर अमलात आणली तर आज गंभीर वाटणारे प्रश्न अत्यंत सुलभ होऊ शकतात.दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.
                           या देशावर वसाहतवादी राज्यसत्ता चालविण्यासाठी इंग्रजांना कारकुनांची गरज होती त्यानुरुप कारकून तयार करणारी शिक्षणप्रणाली त्यांनी स्थापित केली.आम्ही इंग्रजांना घालवले पण त्यांची शिक्षणपद्धती आजतागायत कवटाळून बसलोच आहोत.
                                शाळा कॉलेज शिकताना विद्यार्थी,त्याचे पालक,शिक्षण व्यवस्था या सर्वांचे मिळून अंतिम ध्येय काय असते,त्याने शिकून सवरून या देशाच्या प्रशासन व्यवस्थेचा एक हिस्सा होणे.अगदी कलेक्टर पासून चपराश्यापर्यंत कोणतीही नोकरी मिळाली तरी चालेल पण सरकारी कारकून व्हायचं.३ % नोकरीच्या जागा असताना १०० % विद्यार्थ्यांना आम्ही एकाच मार्गाने ढकलतो.किमान ५० % विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण द्यायला काय हरकत आहे?.
                            यासंदर्भात ‘राजा हरिश्चंद्राचे’ उदाहरण फारच बोलके आहे. राज्य गेल्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी काहीतरी कामधंदा करावा म्हणून राजा हरिश्चंद्र मजुरांच्या बाजारात जाऊन उभा राहिला.तुला काम काय करता येते ? या प्रश्नावर हरिश्चंद्राचे उत्तर होते. “मला राज्य चालविता येते”. पण ज्यांना मजूर हवे होते त्यांच्याकडे ‘राज्य’ कुठे होते,याला चालवायला द्यायला?. राजा हरिश्चंद्रास कामच मिळेना. शेवटी स्मशानात राहून प्रेताची रखवाली करावी लागली.
राज्य चालविण्याखेरीज इतर कसलेच कौशल्य नसलेला राजा हरिश्चंद्र आणि प्रशासन चालविण्या खेरीज कसलेच कौशल्य अवगत नसलेला पदवीधर यांच्यात फरक काय उरतो?
                        डिग्री घेऊन १०० विद्यार्थी बाहेर आले की त्यात ३ लोकांना नोकरी मिळते,ते मार्गी लागतात.उरलेले ९७ नोकरीच्या शोधात भटकत फिरतात. कारण १५-२० वर्षे शाळा कॉलेजात घालवूनही व्यवसाय,स्वयंरोजगार वा अन्य उद्योग करण्यासाठी लागणारे कौशल्य,व्यावसायिक ज्ञान आणि मुख्य म्हणजे आत्मविश्वास यापैकी त्याच्याकडे काहीही आलेले नसते. उद्योग व्यवसाय करायचे म्हटले तर बँका कर्ज देत नाही कारण बँकेला माहीत असते हा शंभराचे साठ करणार. म्हणून बँका टाळाटाळ करतात.पदवी मिळवल्याने व्यवसायज्ञान मिळाले हे बँकेलाही मान्य नसते.
                       शेवटी एक दिवस घरात खायचे वांदे पडायला लागलेत किंवा लग्नाचे वय घसरायला लागले की मग मिळाला तो रोजगार करण्याशिवाय गत्यंतर नसते आणि आमच्या तरुणाईचे खच्चीकरण होते.त्यासोबतच असे प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर काढण्याचे प्रयत्नही निष्फळ ठरते.
                     हे सगळे बदलायचे असेल तर आहे त्या व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावे लागतील आणि या बदलासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागेल.. 
वरना कुछ नही होनेवाला…… असंभव….!
.
                                                                                   गंगाधर मुटे
………………………………………………………………………………………………………….