गवसला एक पाहुणा : लावणी

गवसला एक पाहुणा : लावणी

पहाटलेली विभोर लाली
उधाण वारा पिऊन आली
मस्तीतकाया, धुंदीत न्हाया
कशी उतावीळ झाली
गं बाई उतावीळ झाली
मन ऐकेचना, तन ऐकेचना
जाई पुढे, पळते पुढे
सांगू कुणा? मी सांगू कुणा?
सखे गंsssss
नजरेस माझ्या गवसला एक पाहुणा
सखे गं मला गवसला एक पाहुणा ॥धृ०॥

माझ्या राजाची वेगळीच बात
चाल डौलाची मिशीवर हात
त्याचा रुबाब वेगळा तोरा
तरी चालतोय नाकासमोरा
बघा सूटबूट, कसा दिसतोय क्यूट
लाजाळू कसा, टकमक बघेचना ॥१॥

माझ्या गड्याची न्यारी कहाणी
स्पष्ट विचार, साधी राहणी
जुने थोतांड देतो फ़ेकुनी
नव्या जगाचा ध्यास धरुनी
त्याला विसरेचिना, भूल पडेचिना
सखे गं मना, चैन येईचना ॥२॥

जरी वरवर दिसतो तामस
आत हृदयात दडलाय माणूस
जातो अभय सदा धावून
जनसेवेचे व्रत घेऊन
तोच ठसला मनी, होईल माझा धनी
लावा गं सखे, विड्याला काथ, चुना ॥३॥

. गंगाधर मुटे
…*…..**…..***…..****….***….**….*…

कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू?

कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू?

किती ज्येष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, किती सभ्य आहेत ही माणसे
परी माणसासारखी वागताहे, असे चित्र नाही दिसे फारसे

कधी भाट होई सख्या चेहर्‍यांची, कधी घोटती लाळ द्रव्यापुढे
खरे रूप दावी असे धैर्य नाही, किती भ्रष्ट झालेत हे आरसे?

“घराणे” उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही?
सग्यासोयर्‍यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे

जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे?

कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे
परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कसे…!

                                                              गंगाधर मुटे
—————————————————————————-
 गझल                                                                    वृत्त – सुमंदारमाला
लगावली – लगागा लगागा लगागा लगागा, लगागा लगागा लगागा लगा
—————————————————————————-

अण्णा, सेवाग्रामला या! दारूने आंघोळ करू…..!!

अण्णा, सेवाग्रामला या! दारूने आंघोळ करू…..!!
आदरणीय अण्णा,
                        आपण ’जनलोकपाल विधेयकाच्या’ मागणीसाठी केलेले उपोषण खूप गाजले. चार दिवस सलगपणे विविध वृत्तवाहिन्यांवर अण्णा आणि त्यांचे उपोषण हा एकच विषय गाजत होता. वृत्तपत्राचे रकानेच्या रकाने भरून आले. इंटरनेटवरही या विषयाची खूप चर्चा झाली. जगाच्या कानाकोपर्‍यातून पाठिंबा जाहीर करण्यात आला. फ़ेसबूकवरून वेगवेगळ्या तर्‍हेने समर्थन व्यक्त केले गेले. सार्वजनिक संकेतस्थळावर धमासान चर्चा झडल्यात. अनेकांनी आपापल्या ब्लॉगवरून या आंदोलनाची दखल घेतली. शेतकरी संघटनेच्या औरंगाबादला झालेल्या राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत या भ्रष्टाचारमुक्ती अभियानाला सक्रिय पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. आणि सेवाग्राम येथील बापूकुटीसमोर सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत लाक्षणिक उपोषण करून जनलोकपाल विधेयकाला समर्थन देण्याचे भाग्य आम्हालाही लाभले.
                         या विधेयकाच्या समर्थनार्थ संपूर्ण देशातला आमआदमी लढण्यासाठी मैदानात उतरला असला तरी त्यातील किती लोकांना जनलोकपाल विधेयक कितपत कळले हे सांगणे कठीण आहे. पण भ्रष्टाचारावर इलाज व्हायलाच हवा. “काहीच न करण्यापेक्षा, काहीतरी करणे कधीही चांगले” एवढाच विचार करून आणि प्रथमच भ्रष्टाचाराच्या विरोधात आपला रोष व्यक्त करण्याची संधी उपलब्ध झाल्यामुळे देशभरातली एवढी आमजनता रस्त्यावर उतरायला तयार झाली असणार, हे उघड आहे.
                     भ्रष्टाचाराचा महाभयंकर राक्षस आटोक्यात येण्याऐवजी वणव्यासारखा पसरून दिवसेंदिवस अधिक उग्र रूप धारण करत आहे. त्यात आमजनता होरपळून निघत आहे. “जगणे मुष्किल, मरणे मुष्किल” अशा दुहेरी कैचीत आमजनता सापडली आहे. या सर्व प्रकारात राजसत्ताच एकतर स्वतः: लिप्त आहे किंवा खुर्ची वाचविण्याच्या मोहापायी हतबल होऊन डोळेझाक करत आहे, भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालत आहे, हे आता जनतेला कळायला लागले आहे. त्यामुळे त्यांना संताप व्यक्त करण्यासाठी लढायला एक भक्कम आधार हवा होता; तो त्यांना तुमच्यात दिसला म्हणून आमआदमी नेहमीच्या कोंडलेल्या भिंती ओलांडून बाहेर पडला. त्यासाठी अण्णा तुमचे लक्ष-लक्ष अभिनंदन आणि कोटी-कोटी धन्यवाद!
अभियान नव्हे जनचळवळ
                       भ्रष्टाचार मुक्ती अभियान आता नुसते अभियान राहिले नसून एक जनचळवळ होऊ पाहत आहे. योग्य मुहूर्तावर, योग्यस्थळी या चळवळीची मुहूर्तमेढही रोवली गेली आहे. पण ही चळवळ पुढे न्यायची तर यापुढची वाटचाल नुसती सात्त्विक अथवा भावनिक असून भागणार नाही तर त्यासाठी तर्कसंगतीची जोड लागेल, अभ्यासपूर्ण वास्तवाचे भान लागेल. करावयाच्या उपाययोजनांची नेमकी जाण लागेल. त्यासाठी तुम्हाला या लढाईसाठी त्या तोडीचे सवंगडीही शोधावे लागेल. कारण चित्रविचित्र विचारधारा जोपासणारे अनेक विचारवंत एकत्र येणे सोपे असते पण उद्दीष्ट्य साध्य होईपर्यंत एकत्र टिकणे महाकठीण असते. त्यांच्यात आपसातच फार लवकर पोळा फुटायला लागतो, हा पूर्वानुभव आहे.
                         अण्णा, जेव्हा तुम्हाला नगर जिल्ह्यात सुद्धा पुरेशी प्रसिद्धी मिळाली नव्हती तेव्हापासून म्हणजे १९८५-८६ पासून तुम्हाला मी ओळखतो. तुमच्या कार्यशैलीवर मी तसा बारकाईने लक्ष ठेवून आहे. या देशातल्या सबंध गरिबीवर मात करता येईल असा काही कार्यक्रम तुम्ही हाती घ्याल, अशा आशाळभूत नजरेने मी तुमच्याकडे सदैव पाहत आलोय. पण माझी निराशाच झाली हे मी नाकारण्याचे काहीच कारण नाही. तुमच्या कार्याचे मोल कमी आहे असे मला म्हणावयाचे नाही आणि जेव्हा देशभरातून तुमच्या कार्याचा गौरव होत असताना माझ्यासारख्या एका फ़ाटक्या माणसाने एक वेगळाच सूर काढणे हेही शोभादायक नाही. पण तुम्ही दाखवलेल्या मार्गाचे अनुकरण करून या देशातल्या लक्षावधी खेड्यांमधल्या एकाही माणसाला “दुसरा अण्णा” बनून आपल्या गावाचे “राळेगण सिंदी” करता आलेले नाही. अगदी मला सुद्धा तुमचा कित्ता गिरवून माझ्या गावाचे रुपांतर “राळेगण सिंदी” सारख्या गावामध्ये करता आलेले नाही.
एवढे अण्णा कुठून आणायचे?
                      अण्णा, एकेकाळी क्रिकेटमध्ये भारतात वेगवान गोलंदाज ही दुर्मिळ गोष्ट होती, पण कपिलदेव आले आणि मग त्यांचे अनुकरण करून मोठ्या प्रमाणावर वेगवान गोलंदाज तयार व्हायला लागलेत.
ज्याला “भारतरत्न” म्हणून गौरविण्यात केंद्रसरकारने चालढकल चालविली त्या सचिन तेंडुलकरने तर फलंदाजीची व्याख्याच बदलून टाकली आणि सचिनचे अनुकरण करून गावागावात चेंडू सीमापार तडकवणारे फलंदाज तयार झालेत.
                        सर्व रोगावर रामबाण इलाज म्हणून प्राणायाम आणि योगाभ्यासाचे धडे स्वामी रामदेवबाबांनी दिले आणि अल्पकाळातच जनतेने अनुकरण केले आणि देशभरात हजारो “रामदेवबाबा” तयार झालेत.
                    “शेतकर्‍यांचे मरण हेच सरकारचे धोरण” असून “शेतमालास रास्त भाव मिळत नाही म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाला” त्यासाठी “भीक नको घेऊ घामाचे दाम” असा मंत्र शरद जोशींनी दिला आणि पिढोन्-पिढ्या हतबलपणे जगणारा शेतकरी खडबडून जागा झाला.
शरद जोशींचे अनुकरण करूनच गावागावात लढवय्ये शेतकरी तयार झालेत.
याउलट
                    संपूर्ण देशातील खेड्यांची “राळेगणसिंदी” करायचे म्हटले तर त्यासाठी काही सरकारी ठोस योजना बनत नाही कारण कदाचित ती अव्यवहार्य असेल. मग सरकारी तिजोरीतून गंगाजळी आपापल्या गावापर्यंत खेचून आणायची तर प्रत्येक गावात एकेक अण्णा हजारे जन्मावा लागेल. आणि अशी कल्पना करणेसुद्धा अशास्त्रीय आणि अव्यवहार्य आहे.
                      अण्णा, आपला देश हा नेहमीच चमत्कारिक व्यक्तिमत्त्वाच्या मागे धावणारा आणि व्यक्तीपूजक राहिला आहे. त्यामुळे एखाद्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची आणि त्याच्या कार्याची व्यावहारिक पातळीवर “चर्चा” करणे एकतर मूर्खपणाचे मानले जाते किंवा निषिद्धतरी मानले जाते. त्यामुळे बाबा आमटे, अभय बंग, अण्णा हजारे किंवा सिंधुताई सपकाळ ही व्यक्तिमत्त्वे उत्तुंग असली तरी यांच्या कार्यामुळे एकंदरीतच समाज रचनेवर, संस्कृतीच्या उत्क्रांतीवर, प्रशासकीय यंत्रणेवर आणि नियोजनकर्त्या निगरगट्ट राज्यकर्त्यांच्या धोरणांवर काहीही प्रभाव पडत नाही, हे सत्य असूनही कोणी स्वीकारायला तयार होत नाही.
जनलोकपाल विधेयक
                          अण्णा, “जनलोकपाल विधेयक” यायलाच हवे. त्यासाठी तुमच्या समर्थनार्थ मी माझ्यापरीने यथाशक्ती प्रयत्न करणारच आहे. पण या विधेयकामुळे काही क्रांतीकारी बदल वगैरे घडून येतील, या भ्रमात मी नाही. मानवाधिकार आयोगाचा फायदा ’कसाब’ला झाला पण या देशातल्या कष्टकरी जनतेला वेठबिगारापेक्षाही लाजिरवाणे जीवन जगावे लागते, शेतकर्‍यांना आयुष्य संपायच्या आतच आपली जीवनयात्रा संपवावी लागते. देवाने दिलेल्या आयुष्यभर जगण्याच्या त्याच्या अधिकाराचे रक्षण करण्यास मानवाधिकार आयोग कुचकामी ठरला आहे. माहितीच्या अधिकाराचा उपयोग या देशातल्या सव्वाशेकोटीपैकी फक्त मूठभर लोकांनाच झाला. त्यामुळे तुम्ही ज्या मार्गाने वाटचाल करताहात त्यामुळे आमजनतेचे फार काही भले होईल असे मला वाटत नाही.
                       अण्णा, तुम्ही ४-५ दिवस दिल्लीला उपोषण केले आणि आम जनतेच्या नजरेत “हिरो” झालेत. कदाचित हिच आमजनता तुम्हाला एक दिवस “महात्मा” म्हणून गौरवायला मागेपुढे पाहणार नाही. तुमच्या समर्थनार्थ मैदानात उतरायला लागलीच आहे. त्यामुळे मूठभर लोकांच्या नव्हे या “आमजनतेच्या” आयुष्यात सुखाचे आणि सन्मानाचे काही क्षण निर्माण होण्यासाठी तसे थेट प्रयत्न करणे ही आता तुमची जबाबदारी आहे. त्यासाठी नुसती सात्त्विक अथवा भावनिक आंदोलने करून भागणार नाही तर त्यासाठी तर्कसंगतीची जोड लागेल, अभ्यासपूर्ण वास्तवाचे भान लागेल. करावयाच्या उपाययोजनांची नेमकी जाण लागेल. त्यानुरूपच पुढील वाटचाल करावी लागेल.
                          अण्णा, तुमचा कायद्यावर प्रचंड विश्वास आहे ही चांगली गोष्ट आहे. पण कायद्याने सगळे प्रश्न सुटत नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवे. कायदा करून उपयोगाचा नाही त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. दुर्दैवाने कायद्याची नीट अंमलबजावणी होत नाही, नाही तर आहे तेच कायदे खूप आहेत. त्यामुळे प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी पुन्हा नवा कायदा किंवा विधेयक हे काही रामबाण औषध ठरू शकत नाही.
                              याउप्परही तुम्हाला कायदा आणि विधेयके आणली म्हणजे प्रश्न चुटकीसरसी सुटतात, असे वाटत असेल तर मग या वर्धेला. हा जिल्हा महात्मा गांधीजींच्या पावनस्पर्शाने पवित्र झाल्यामुळे फार पूर्वीपासून येथे संपूर्ण जिल्हाभर कायदेशीर दारूबंदी आहे. पण याच जिल्ह्यात पावलापावलावर हवी तेवढी दारू, अगदी ज्या पाहिजे त्या ब्रॅंडमध्ये उपलब्ध आहे आणि गावठीही मुबलक उपलब्ध आहे.
                        नाही खरे वाटत? मग या सेवाग्रामला बापुकुटीसमोर. येताना एकटेच नका येऊ, हजारो कार्यकर्त्यांसह या आणि येथे दारूनेच आंघोळ करा. हजारो लोकांना आंघोळ करायला पुरून उरेल एवढी दारू एकटे सेवाग्राम हे गावच पुरवेल, याची मला खात्री आहे.
कायद्याच्या राज्याचा विजय असो!
                                                                                  गंगाधर मुटे
——————————————————————-
(प्रकाशित : “शेतकरी संघटक” २१ एप्रिल २०११)
——————————————————————-

बापूकुटीसमोर विजयी मेळावा

               समाजसेवक अण्णा हजारे यांच्या “भ्रष्टाचार मुक्ती अभियानाला” पाठींबा दर्शविण्यासाठी आणि “जनलोकपाल विधेयकाच्या” सक्रिय समर्थनार्थ वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेच्यावतीने दि. ९ एप्रिलला सेवाग्राम (वर्धा) येथील महात्मा गांधींच्या वास्तवाने पावन झालेल्या पुण्यभुमीतील बापूकुटीसमोर एक दिवसाचे लाक्षणिक स्वरूपाचे सामुहिक उपोषण करण्याचे ठरले होते.
                 केंद्र शासनाने मागण्या मान्य केल्यामुळे अण्णा आज दि. ९ एप्रिलला सकाळी १० वाजता उपोषण सोडणार हे माहित असूनही  बापूकुटीसमोर  शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मग उपोषण सत्याग्रहाचे रूपांतर “विजयी मेळाव्यात” झाले आणि यापुढेही अण्णांच्या आंदोलनाला सक्रिय पाठींबा देण्याचा संकल्प करण्यात आला.
“भ्रष्टाचार चले जाव” चे नारे देवून दुपारी १.०० वाजता कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
सेवाग्राम सत्याग्रह

सेवाग्राम सत्याग्रह

 

 

 

 

अण्णांच्या समर्थनार्थ बापूकुटीसमोर उपोषण

समाजसेवक अण्णा हजारे यांच्या “भ्रष्टाचार मुक्ती अभियानाला” पाठींबा दर्शविण्यासाठी आणि “जनलोकपाल विधेयकाच्या” सक्रिय समर्थनार्थ वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेच्यावतीने दि. ९ एप्रिलला सेवाग्राम (वर्धा) येथील महात्मा गांधींच्या वास्तवाने पावन झालेल्या पुण्यभुमीतील बापूकुटीसमोर एक दिवसाचे लाक्षणिक स्वरूपाचे सामुहिक उपोषण करण्याचे ठरले आहे. त्यापुढील आंदोलनाची दिशा एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेऊन तेथेच जाहिर केली जाईल.

शेतकरी संघटक – वर्धापनदिनाच्या निमित्ताने

वर्धापनदिनाच्या निमित्ताने
ही गोष्ट आहे १९८६-८७ च्या सुमारातली. सुरेश चोपडे सकाळी ६ च्या सुमारास माझ्या वर्धेतील खोलीवर आला आणि आल्याआल्याच अगदी दारावरूनच हुकूम सोडला.
“ए आवर रे पटकन, आपल्याला तातडीने निघायचे आहे.” मी सुद्धा कुठे,कशाला,कशाने वगैरे  कोणताही उपप्रश्न न विचारताच तयारी केली आणि बाइकवर बसलो. तो येतानाच रवीभाऊ काशीकर यांचेकडूनच बाइक घेऊन आला होता. रस्त्याने निघालो आणि मग सांगायला लागला. “मुरलीचा (मुरलीधर खैरनार) फोन होता. ‘आठवड्याचा ग्यानबा’ अंक प्रिटींगला गेलाय पण कागदाला पैसे नाहीत म्हणून छपाई थांबली आहे. आपल्याला आजच्याआज किमान शंभरतरी नवीन वर्गणीदार करून दुपारपर्यंत डीडी पाठवायचा आहे.” आणि मग सुरू झाली युद्धपातळीवर वर्गणीदार नोंदविण्याची मोहीम. तो काळच वेगळा होता. शेतकरी समाज शेतकर्‍यांची संघटना निर्माण झाल्यामुळे भारावला होता. संघटनेचे कार्यकर्ते एका ध्येयाने झपाटले होते. काहीतर चक्क वेडे झाले होते. परभणी अधिवेशनावरून परतलेल्यांना “परभणी पागल” अशी उपाधीच बहाल झाली होती. मग आम्ही मोर्च्या वळवला नेमक्या अशाच घरांकडे. त्यातील बहुतांश आधीच वर्गणीदार होते आणि तरीही प्रत्येकाने पावत्या फाडल्यात. पैसे दिलेत. यामागे ‘आठवड्याचा ग्यानबा’ चालला पाहिजे ही भावना होतीच पण त्याहीपेक्षा शरद जोशींच्या माणसांना ’नाही म्हणायचे नाही’ हीच प्रबळ भावना होती. आम्ही दुपारपर्यंत उद्दिष्ट पूर्ण केले आणि डीडी काढून नाशिकच्या दिशेने रवाना केला.
शेतकर्‍यांमध्ये कार्य करणे किंवा शेतकर्‍यांसाठी साप्ताहिक चालविणे किती कठीण असते याची जाणीव चळवळीबाहेरच्या जनतेमध्ये असतेच असे नाही. शेतकरी संघटनेचा विचार अधिक प्रभावीपणे आणि बिगरशेतकरी, शहरी माणसांपर्यंत पोचला पाहिजे या उद्देशाने नाशिक येथून ‘आठवड्याचा ग्यानबा’ हे साप्ताहिक सुरू करण्यात आले होते; पण तो प्रयोग काही फारसा यशस्वी झाला नाही आणि साप्ताहिक ८-९ महिन्यातच बंद पडले. पुन्हा शेतकरी संघटकची धुरा म्हात्रे सरांच्या खांद्यावर आली.
शेतकरी संघटनेसारख्या व्यापक जनाधार असलेल्या आणि इतिहासातल्या सर्वात मोठ्या शेतकरी आंदोलनाचे आंबेठान येथील मध्यवर्ती कार्यालयाचा संपूर्ण कार्यभार एकट्या प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे सरांनीच एकहाती सांभाळावा, असे विधिलिखितच असावे, असे वाटते. कारण सरांमागचा कामाचा व्याप कमी करण्याचे सर्वच प्रयोग असफल ठरलेत. प्रशिक्षण शिबिरे असोत की शेतकरी संघटक,  कार्यालयीन पत्रव्यवहार असो की आणखी काही, सर्व सांभाळायचे काम म्हात्रे सरांकडेच. शरद जोशींना पर्याय बनू पाहणारे संघटनेत खूप झालेत, शरद जोशींपेक्षा आपणच काकणभर सरस आहोत, अशी दिवास्वप्नेही अनेकांना पडलीत; पण म्हात्रे सरांना पर्याय सोडाच पण निदान मददगार तरी व्हावे, या वाटेला चुकून देखील कोणी गेले नाही. सरांवरचा प्रशिक्षण शिबिरांचा भार कमी करण्यासाठी चंद्रकांत वानखेडे आंबेठानला होते; पण काही महिनेच. त्यानंतर अमर हबिब, ब.ल.तामस्कर, कालिदास आपेट आणि स्वतः मी सुद्धा आंबेठानला होतो, पण वर्षभरच. म्हणजे गेल्या तीस वर्षामध्ये केवळ वर्ष-दीड वर्षाचा अल्पकाळ सोडला तर मध्यवर्ती कार्यालय आणि शेतकरी संघटक या दोन्ही जबाबदार्‍या म्हात्रे सर ‘एकटेच’ समर्थपणे सांभाळत होते.
शेतकरी संघटक औरंगाबादवरून प्रकाशित व्हायला लागल्यापासून सरांवरील भार कमी व्हायला नक्कीच मदत झाली असावी. कार्यकारी संपादक श्री श्रीकांत उमरीकर यांच्या अथक प्रयत्नाने संघटकच्या स्वरूपातही आमूलाग्र बदल झालेला आहे. अंक देखणा आणि वाचनीय झाल्याने वर्गणीदार संख्याही वाढायला लागली आहे; पण शेतकरी आंदोलनाचा विचार अधिक व्यापकपणे रुजविण्यासाठी एवढे पुरेसे नाही. शेतकरी संघटक प्रत्येक गावात, प्रत्येक घरात पोचायला हवा. महाराष्ट्रातील सर्व बूकस्टॉलवर दिसायला हवा. हे उद्दिष्ट सोपे नसले तरी कठीण नाही कारण शेतकरी संघटना किंवा शेतकरी संघटक सारखे पाक्षिक चालवणे किती कठीण असते, हे चळवळीत काम करणार्‍यांना देखील पक्के ठाऊक आहे म्हणूनच शेतकरी संघटनेला ‘वेडेपीर’ मिळालेत. घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणारे सैनिक मिळालेत आणि पदरचे पैसे खर्च करून शेतकरी संघटनेची आपल्या आईसमान जोपासना करणारे कार्यकर्तेही मिळालेत.
६ एप्रिलला शेतकरी संघटकला २७ वर्षे पूर्ण होत आहे. जाहिराती न घेता निव्वळ वर्गणीदारांच्या बळावर एवढा प्रदिर्घकाळ वाटचाल करणे, वाटते तेवढे सोपे नाही.  शिवाय ज्या पाक्षिकाचा वर्गणीदार बहुतांश प्रमाणावर शेतकरी आहे, ज्याचे लिहिण्यावाचण्याशी हाडवैर आहे, अशा वर्गणीदारांना घेऊन, त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करून त्यांना निदान शरद जोशींचे लेख वाचायला लावण्याइतपत त्यांच्यात वाचनाची रुची निर्माण केली, ही शेतकरी संघटकची फार मोठी उपलब्धी मानावी लागेल. शेतकरी संघटक वेळेवर आला नाही आणि शरद जोशींचा लेख वाचायला मिळाला नाहीतर लोक कसे कसावीस होतात, हे मी अनेकदा अनुभवलं आहे. शरद जोशींना आणि शेतकरी संघटनेच्या विचारांना शेतकर्‍यांच्या माजघरातील देव्हार्‍यापर्यंत पोचविण्याचं ऐतिहासिक कार्य शेतकरी संघटकने आजवर चोखपणे बजावलं आहे, हे सत्य आहे, निर्विवाद आहे आणि यापुढेही ते अधिक जोमाने चालत राहील याची खात्री आहे.

                                                                              गंगाधर मुटे

*     *     *
***

***
     अधिक माहितीसाठी ranmewa@gmail.com येथे संपर्क साधावा.

******
शेतकरी संघटकचा पिडीएफ़ अंक वाचण्यासाठी क्लिक करा.
शेतकरी संघटक
******

कविता स्पर्धा २०११

कविता स्पर्धा २०११ 
लेखन स्पर्धा २०१०   या गद्यलेखन स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर आता http://www.mimarathi.net   या संकेतस्थळाने आता कविता स्पर्धा २०११ ही नवीन स्पर्धा सुरू केली आहे. ही माहिती जास्तीत जास्त कवी मंडळीपर्यंत पोचणे आवश्यक आहे. म्हणून या संबधातील सदर संकेतस्थळाने केलेले आवाहन येथे पुन:प्रकाशित करण्यात येत आहे.
अवश्य भाग घ्या.
………………………………………………………………………………………..
नमस्कार,
यशस्वीपणे पुर्ण झालेल्या लेखन स्पर्धा २०१० नंतर मी मराठी.नेट सदस्यांसाठी व वाचकांसाठी कविता स्पर्धा २०११ ही नवीन स्पर्धा सुरू करत आहे. यासंबंधीचा तपशील इथे देण्यात आलेला आहे. सर्व मराठी जाणकारांनी यात आवर्जून भाग घ्यावा, आपल्या मित्र-मैत्रिणींना कळवावे आणि या जालावरील लेखनाच्या अभिसरणामध्ये आपला वाटा उचलावा ही विनंती.
स्पर्धेचे स्वरूप थोडक्यात या प्रमाणे:
  • स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वत:चे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे. लेखन मुद्रण माध्यमात पूर्वप्रकाशित झालेले नसावे. लेखन फक्त तुमच्या ब्लॉगवर पूर्वप्रकाशित असल्यास ब्लॉग दुवा द्यावा. शक्यतो स्पर्धेसाठी अप्रकाशित व नवीन कविता द्याव्यात
  • एक लेखक ३ पेक्षा अधिक प्रवेशिका सादर करू शकत नाही.
  • वृत्तबद्ध, छंदबद्ध व मुक्तछंद प्रकारातील कविता कविता येथे देणे अपेक्षित आहे.
  • स्पर्धा १ एप्रिल २०११ ते ३० एप्रिल २०११ या कालावधीसाठी खुली राहील. त्यानंतर मे २०११ च्या सुमारास अंतिम निकाल जाहीर केला जाईल, जो मीमराठी.नेट या संकेतस्थळावर तसेच संबंधित संस्थांच्या मुद्रित वितरणातून जाहीर केला जाईल.
  • स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतील जी पुस्तक स्वरूपात असणार आहे. या तिघांव्यतिरिक्त ७ उत्तेजनार्थ स्पर्धकांना मीमराठी.नेट तर्फे प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.
  • स्पर्धेकरता लिहिलेल्या साहित्यावर मूळ लेखकाचा संपूर्ण अधिकार राहील. विजेते लेखन मी मराठी तर्फे मुद्रण माध्यमात प्रसिद्ध करावयावे झाल्यास लेखकांशी स्वतंत्रपणे पत्रव्यवहार केला जाईल.
  • स्पर्धा सुरळित पार पडावी यासाठी स्पर्धानियमांमध्ये वेळोवेळी योग्य ते बदल करण्याचे अधिकार स्पर्धा-व्यवस्थापन नि मीमराठी संचालक मंडळ राखून ठेवत आहे.
  • सदर स्पर्धेची जाहीरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या दरम्यान सदर माहिती मधे होणार्‍या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी स्पर्धा-व्यवस्थापक सहमत असतीलच असे नाही. मीमराठी.नेट येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.
प्रवेशिका सादर करण्याची पद्धत.
१. लेखन स्पर्धा खुली असण्याच्या काळात मीमराठी.नेट इथे प्रकाशित करावे लागेल.
२. यासाठी लेखकाला मीमराठी.नेट चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. १८ वर्षे पूर्ण केलेल्या कोणाही व्यक्तीला मीमराठी.नेट चे सभासदत्व विनामूल्य होता येते.
३. स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे यासाठी, व्यक्तीगत माहिती admin@mimarathi.netआयडीवर पाठवणे आवश्यक आहे (ईमेलचा विषय : कविता स्पर्धा) . अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहित धरले जाणार नाही. प्रवेशिका म्हणून सादर करावयाचे असलेल्या लेखनाचा मीमराठीवरील स्पर्धेतील धाग्याचा दुवा/ लिंक , संपर्क क्र., विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील पत्ता देणे बंधनकारक आहे.
४. सदर स्पर्धा मीमराठी.नेट चे मालक व कुटुंबियाव्यतिरिक्त इतर सर्वांसाठी खुली आहे.
५. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही, ती सर्वांसाठी खुली आहे.
६ एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क मीमराठी.नेट राखून ठेवत आहे.
७. अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखेआधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क मीमराठी.नेट राखून ठेवत आहे.
८. निकालाबाबत मीमराठी.नेट ने नियुक्त केलेले पर्यवेक्षक व परीक्षक यांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास मीमराठी.नेट बांधील नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
______
स्पर्धेसाठी लेखन करण्यासाठी मदत :
डाव्या बाजूला असलेल्या मार्गदर्शकातून लेखन करा येथे टिचकी मारा.
व तेथे असलेला “कविता स्पर्धा २०११” ह्या विभागामध्ये आपले लेखन प्रकाशित करा.
हा धागा वाचूनच प्रवेशिका पाठवाव्यात ही विनंती.
कविता स्पर्धा २०११ मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा…

व्यवस्थापक,

मी मराठी.नेट
………………………………………………………………………………………..