अय्याशखोर…!!

अय्याशखोर

मेंदू उगाळतांना माणूस थोर झाला
पंडीत कायद्याचा बाजारखोर झाला

कंकाल हा नराचा जाणीव लोपलेला
सोडून लाजलज्जा मुद्राचकोर झाला

माणूस धर्म ज्याने खुंटीस टांगलेला
भंगार तो तनाचा अय्याशखोर झाला

का ग्रासते मनाला झंकार कंकणाचे
फ़ंदात मोहिनीच्या साधू छचोर झाला

नसतेच जे मिळाले केव्हाच सातजन्मी
ते सर्व प्राप्त होता नेता मुजोर झाला

“कैवार गांजल्याचा” तो डावपेच होता
अधिकार प्राप्त होता अन्यायखोर झाला

का पारखा मनुष्या, मानव्यतेस तू रे
त्यागून कर्मधर्मा, अभये अघोर झाला

                               गंगाधर मुटे
………………………………………..
(वृत्त – आनंदकंद )
………………………………………..

विदर्भाचा उन्हाळा

विदर्भाचा उन्हाळा 

औंदाच्या उन्हाळ्यानं, धमालच केली
आनं श्याम्याची दाढीमिशी, भाजूनच गेली ..॥१॥

हे ऊन व्हंय का कां व्हंय, काही समजत नाही
पाण्यासाठी जीव कसा, करते लाही-लाही
पन्नास डिग्रीच्याह्यवर, पारा चढून गेला
पाणी पेऊ-पेऊ जीव, आदमुसा झाला
इच्चीबैन ओठ-जीभ, सोकूनच गेली ……॥२॥

बाहेर निघतो म्हणलं तं, जम्मून झावा चालते
घरामंधी घुसावं तं, उकाडा फ़ोडणी घालते
लोडशेडिंग पायी बाप्पा, नाकात नव आले
कूलर-पंखे गर्मी पाहून, कामचुकार झाले
उष्माघात आकडेवारी, वाढूनच गेली ……॥३॥

नदी-नाले कोरडे कारण, बरसात नाही झोंबली
पाणी कमी हाय म्हून, वीजनिर्मिती थांबली
नळामधून पाणी कमी, हवा शिट्ट्या मारते
विहीर-तलाव ठणठण, पाणी आंग चोरते
दुष्काळाची बहीणमाय, माजूनच गेली ……॥४॥

पशू-पक्षी अभय नाही, निवारा ना थारा
मागून-पुढून मस्त देते, चटके गरम वारा
दैवाचे फ़टके सोसून, माऊल्या झाल्या धीट
घागरभर पाण्यासाठी, अर्धा कोस पायपीट
नशिबाले जगरूढी, चिपकूनच गेली ……॥५॥

                                         गंगाधर मुटे
…………………………………………………
ढोबळ मानाने शब्दार्थ.
जम्मून = जोराने,झपाट्याने.
झावा = गरम हवेचे तडाखे.
…………………………………………………

मांसाहार जिंदाबाद

मांसाहार जिंदाबाद …!!


सोने गं सोने, रांधल्या का तुने
बेडूकाच्या खुला
खेकड्याची आमटी
अन् गांडूळाच्या शेवया…!!

गोचिडाची खिचडी
टमगिर्‍याचं भरीत
डासाचा अर्क घे
घुबडाच्या तर्रीत
जरासा सुरवंट, थोडेसे ढेकूण
घे पुरणात भराया …..!!

गोमाश्यांचा लाडू कर
त्याला सरड्याचा रंग दे
उवा-टोळ पिळूनी
सापा-विंचवाचा पाक घे
उंदराची चटणी, पालीची सलाद
घे तोंडास लावाया ….!!

कोंबडी नी बकरी
निरुपद्रवी जनावर
तुझ्या जिभेचे चोचले
उठती त्यांच्या जीवावर
गरिबाला सुळी, शत्रूला अभय
का करीशी अन्याया?….!!

                             गंगाधर मुटे
………… **………….. **………….

आज स्व. सुरेश भट यांचा जन्मदिवस.

१५ एप्रिल, मराठी साहित्यसम्राट स्व. सुरेश भट यांचा जन्मदिवस.
अजरामर साहित्यनिर्मीतीकार कविवर्य सुरेश भट यांना आदरांजली आणि सादर वंदन.
………………………………………………

हरफनमौला सुरेश

गाण्याचा गळा व गाण्यात रुची या गोष्टी सुरेशमध्ये आहेत; हे आमच्या आईच्या (ती. कै. शांताबाई भट) ध्यानात आले. म्हणून सुरेशच्या गाण्यातील रुची वाढावी, काही माहिती व्हावी यासाठी तिने एक बाजाची पेटी (विश्वास कंपनी, कोलकाता) आणली आणि त्याला संगीताची मुळाक्षरे व बाराखडी शिकविणे सुरू केले. आमची आई ही स्वत: चांगली पेटी वाजवायची व तिला संगीताची जाण होती. पुढे काही वर्षांनंतर सुरेशला पद्धतशीर गाणे शिकविण्यासाठी प्रल्हादबुआ नावाचे संगीत शिक्षक आमच्या घरी येत असत. त्याची गाण्याची आवड व प्रगती पाहून आमच्या वडिलांनी (ती. कै. डॉ. श्री. रं. भट) एच. एम. व्ही.चा एक ग्रामोफोन (चावीवाला) आणला होता.

ते सुरेशसाठी दर आठवडय़ातून एक रेकॉर्ड विकत आणत. आमच्या वडिलांना चांगले संगीत ऐकण्याचा नाद होता. त्यामुळे सुरेशला संगीतात आवड निर्माण झाली. पुढे तो एका बॅण्डपथकामध्ये काही दिवस होता आणि तेथेच तो बासरी वाजविणे शिकला. तो आजारी पडायचा तेव्हा अंथरुणावर असताना तो तासन्-तास बासरी वाजवित असे.

पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दोन मूठ राख

दोन मूठ राख

अस्तित्वहीनाने एकदा
अस्तित्वाला आव्हान दिलं… म्हणालं
“तुला लोळवायला दोन घटका
पुरेशा ठरतील…. माझ्यासाठी”
अस्तित्व हसलं…… म्हणालं
“जिंकणे किंवा हरणे… दोनपैकी एक
काहीतरी नक्कीच करू शकेन मी….
पण तुझं काय?
तुला ना नांव, ना गांव… ना हात ना पाय
ना बाप …………………….. ना माय.
माझ्याशी दोन हात करण्यापूर्वी
माझ्याशी बरोबरी कर
अंधुकसं का होईना…
पण स्वतःचं अस्तित्व तयार कर…
आणि अभयपणे हे सुद्धा लक्षात घे की
मी संपलो तरी, मी नाहीच सरणार
माझी दोन मूठ राख तरी नक्कीच उरणार….!”

                                           गंगाधर मुटे
………… **………….. **…………. **…………..**……..

कृष्ण घालितो लोळण : हादग्याची गाणी

कृष्ण घालितो लोळण : हादग्याची गाणी

कृष्ण घालितो लोळण
आली यशोदा धावून
काय रे मागतोस बाळा
तुला देते मी आणून

‘आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून’
“असलं रे कसलं बाळा, तुझं जगाच्या वेगळं”

कृष्ण घालितो लोळण
आली यशोदा धावून
काय रे मागतोस बाळा
तुला देते मी आणून

‘आई मला साप दे आणून, त्याचा चाबूक दे करून’
“असलं रे कसलं बाळा, तुझं जगाच्या वेगळं”

कृष्ण घालितो लोळण
आली यशोदा धावून
काय रे मागतोस बाळा
तुला देते मी आणून….

(शिरिष “मायबोलीकर यांचे सौजन्याने)

रे जाग यौवना रे

रे जाग यौवना रे….!!


रे जाग यौवना रे, ही साद मायभूची
आव्हान पेलुनीया, दे आस रे उद्याची
रे जाग यौवना रे … ॥धृ०॥

झटकून मळभटाला, चैतन्य खळखळावे
भटकून आसमंती, हे रक्त सळसळावे
तारुण्य तेच जाणा, जे धडपडे सदाची
रे जाग यौवना रे … ॥१॥

आता कवेत घे तू, अश्रांत सागराला
कापून लाट-धारा, तू खोल जा तळाला
रोवून दे निशाणा, ती खूण यौवनाची
रे जाग यौवना रे … ॥२॥

आकाश अंथरोनी, तार्‍यास घे उशाला
बाहूत सूर्यचंदा, पाताळ पायशाला
विश्वा प्रकाश दे तू, तू ज्योत शारदेची
रे जाग यौवना रे … ॥३॥

तू वीर मायभूचा, बलसागराप्रमाणे
यत्‍नास दे उजाळा, युक्ती-बळा-श्रमाने
अभये महान शक्ती, हो शान भारताची
रे जाग यौवना रे … ॥४॥

                                        गंगाधर मुटे
………… **………….. **………….**…….

ऐलमा पैलमा : हादग्याची गाणी

ऐलमा पैलमा : हादग्याची गाणी

ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडूदे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी
पारवत गुंजे गुंजावाणी
गुंजावाणी —च्या सारविल्या टिका
आमच्या गावच्या भुलोजी बायका
एविनी गा तेविनी गा (हे चाल बदलून)
कांदा चिरू बाई तांदूळ घ्या
आमच्या आया, तुमच्या आया
खातील काय दुधोंडे
दुधोंड्याची वाजली टाळी (हे म्हणताना टाळी वाजवायची)
आयुष्य दे रे वनमाळी

माळी गेला शेता भाता
पाऊस पडला येता जाता
पड पड पावसा थेंबोथेंबी
थेंबोथेंबीच्या आडव्या लोंबी
आडव्या लोंबती अंगणा
अंगणा तुझी सात वर्ष
भोंडल्या तुझी बारा वर्ष
अतुल्या मतुल्या
चरणी चातुल्या
चरणीचे धोंडे
हातपाय खणखणीत गोंडे
एकएक गोंडा वीसावीसाचा
सार्‍या नांगर नेसायचा
नेसा ग नेसा बाहुल्यांनो
अडीच वर्ष पावल्यांनो

(शिरीष ‘मायबोलीकर’ यांचे सहकार्याने)

श्री गणराया : हादग्याची गाणी

श्री गणराया : हादग्याची गाणी

आधी नमुया श्री गणराया
मंगलमुर्ती विघ्न हराया
मंगलमुर्ती उंदरावरी
सत्ता त्याची इंद्रावरी
इंद्र हा स्वर्गीचा राजा ( चाल बदल)
झुलती हत्तीच्या फौजा
वरुण चाकर इंद्राचा
पाऊस पाडील हस्ताचा
पड पड पावसा थेंबोथेंबी
थेंबोथेंबीच्या हळव्या लोंबी
हळव्या लोंबी आणुया,
तांदुळ त्याचे कांडुया
मोदक्-लाडु बनवुया
गणरायाला अर्पुया….
………………………………
(आश्विनी डोंगरे यांचे सहकार्याने.)

मराठी पारिभाषिक संज्ञा आणि संज्ञावली कोश

-चेतना प्रधान, विभागीय सहाय्यक संचालक, भाषा संचालनालय

इ. स. १९६०मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर इ. स. १९६४मध्ये महाराष्ट्र शासनाने मराठीला राजभाषेचा कायदेशीर दर्जा प्राप्त करून दिला. इंग्रजी राजवटीत मराठी भाषेला राजाश्रय नव्हता. ज्ञानार्जनाचे प्रमुख साधन म्हणजे भाषा. केवळ विकासासाठी नव्हे तर अस्तित्वासाठी सुद्धा भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा यावा लागतो. यासाठी शास्त्रीय व तांत्रिक शिक्षणाचे माध्यम मराठी असणे आवश्यक होते. ज्ञानभाषा म्हणजे ज्ञानार्जनाची, ज्ञानसंवर्धनाची व ज्ञान देण्याची भाषा. यामध्ये पहिली अडचण अशी होती की, शास्त्रीय व तांत्रिक विद्या शाखांसाठी आवश्यक असलेला पारिभाषिक शब्दसंग्रह उपलब्ध नव्हता. सर्व विद्यापीठांतून समान व एकरूप परिभाषा वापरली जावी यासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक होते.
Continue reading