प्रस्तावना-शरद जोशी


              

प्रस्तावना
             श्री गंगाधर मुटे हे शेतकरी संघटनेच्या शिबिरातील शिबिरार्थी. आपली पहिली कविता त्यांनी लिहिली ती शेतकरी संघटनेच्या प्रभावात आल्यानंतर. ‘सरकारचे धोरण’ (बरे झाले देवा बाप्पा….) ही त्यांची पहिली कविता ‘शेतकरी संघटक’ या शेतकरी संघटनेच्या मुखपत्राच्या ‘ग्रामीण अनुभूती विशेषांक (२६ जुलै १९८५)’ मध्ये प्रसिद्ध झाली. वाचकांना ती भावली, कवितेचे अनेकांनी कौतुकही केले. त्यानंतर दीर्घ काळ त्यांनी कविता लिहिली नाही. कदाचित, त्यांनी स्वत:च आपल्या एका गझलमध्ये म्हटल्याप्रमाणे
“शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली।
स्वप्नेच वांझ झाली, तारुण्य जाळतांना॥”
या परिस्थितीचाच तो परिणाम असावा. पुढे भाकरीच्या शोधात असताना आलेल्या अनुभवांतून,
“प्राक्तन फ़िदाच झाले यत्नास साधताना।
मोती पुढ्यात आले वाळूस गाळताना॥”
अशी ती साकारली. तर,
“आता ‘अभय’ जगावे अश्रू न पाझरावे।
आशेवरी निघावे ही वाट चालताना॥”
याप्रमाणे निश्चयाने व्यक्त होत गेली. आणि,
“तू गजानन निर्विकल्पा, फेड माझ्या तू विकल्पा।
वेल कवितेची चढू दे, वृक्ष तू व्हावे परेशा॥”
याप्रमाणे बहरत गेलेली दिसते.
           ‘रानमेवा’ या संग्रहात कविता, बालगीत, गझल, लावणी आणि नागपुरी तडका अशा विविध रूपांत कवीने आपला भावाविष्कार शब्दरूप केला आहे. काव्यलेखनासाठी ‘अभय’ हे टोपणनाव वापरले आहे.
आपल्या मायबोलीचे महत्त्व वर्णन करताना,
“जरी वेगळी बोलती बोलभाषा। अनेकांत एकत्व ही प्राणभाषा।
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली। घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!”
असे सांगत,
“तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी।
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली॥”
असे कवी आपल्या व्यासंगाला व्यक्त करताना दिसतो. तर,
“मकरंदाहुनि मधुर तरीही। शर शब्दांचे धारदार।
तळपत असता जिव्हा करारी। हवी कशाला मग तलवार ॥”
असे तिचे सामर्थ्य सुर्व्यांच्या आवेशात वर्णन करून
“जोषालागी साथ निरंतर। कधी विद्रोही फूत्कार॥”
अशी विद्रोही अभिव्यक्ती साधतात आणि आपल्या सहकारी युवकाला,
“आता कवेत घे तू, अश्रांत सागराला।
कापून लाट-धारा, तू खोल जा तळाला।
रोवून दे निशाणा, ती खूण यौवनाची॥”
याप्रमाणे साद घालतात.
स्वाभाविकपणेच, फ़ुत्कारणारी ही कविता मातेच्या विस्कटणार्‍या संसाराने हळवी होऊन,
“छप्पर उडल्या संसारात। ब्रह्मपुत्रा वाहते।
तेल मिरची शिदकुट। पाण्यावरती पोहते ॥”
अशा शब्दांत वेदना व्यक्त करते. आणि, आपल्या वाट्याला आलेल्या आसमानी-सुलतानी संकटाचे वर्णन करताना,
“सायबीन झालं पोटलोड, पराटी केविलवाणी।
कोमात गेलं शिवार सारं, व्वा रे पाऊसपाणी॥”
आणि
“सायबाचं दप्तर म्हणते, पीक सोळा आणे।
अक्कल नाही तूले म्हून, भरले नाही दाणे।
विहिरीत नाही पाझर, नयनी मात्र झरे।
किसाना परीस कईपट, चिमण्या-पाखरं बरे।
भकास झालं गावकूस, दिशा वंगळवाणी॥”
अशाप्रकारे उपहासात्मक, तरीही बोचर्‍या मार्मिकतेने व्यक्त होते.
         सभोवतालची उद्विग्न करणारी परिस्थिती, शेतीतलं भकास वास्तव, अगतिकता, निसर्गाचा प्रकोप, समाजातला ढोंगीपणा, राजकीय पुढार्‍यांचे निर्ढावलेपण, सुस्तावलेली दंडशाही, खालावलेले माणुसपण यांकडे निर्विकारपणे पहात रहावत नाही म्हणून विडंबनाच्या अंगाने उपहासात्मक रितीने कवी आपल्या अनुभूतींना शब्दरूप करताना सर्वत्र दिसतो.
विकृतीकडे झुकलेल्या समाजघटकाचे ‘माणुस’ या कवितेत,
“अरे माणूस माणूस।
कसं निसर्गाचं देणं।
गुण श्वापदाचे अभये।
नाही मानवाचं लेणं॥”
असे वर्णन करून त्याकडे निर्देश करीत कवी,
“आता उजाडेल, मग उजाडेल।
‘अभय’ कधीतरी उजाडेल?।
की…..।
तू तसा-मी असा।
म्हणून उजाडणेही बुजाडेल?॥”
असा गर्भित इशारा देणारा प्रश्न उपस्थित करतात.
             मार्मिक विडंबन व उपहासात्मक लेखणीच्या अंगाने जाणारी या संग्रहातील कविता चांगली वठली आहे. प्रस्तुत कवीचा हा पहिलाच काव्यसंग्रह असला तरी स्वत:चे वेगळेपण दर्शवणारा आहे. सध्याच्या काळातही मराठी कविता नवोन्मेषाने व्यक्त होऊ घातली आहे याचे प्रत्यय देणारी भाषा आणि प्रगल्भता कवी मुटे यांच्या कवितांत व्यक्त झाली आहे. चटके देत, तरीही सावधानतेचा इशारा देऊन परिवर्तनाला भाग पाडणारी शब्दसंपदा कवीने आपल्या लेखनात अभ्यासाने उतरवली आहे.
“विषा कवळते प्रजा बिचारी, ना सुलतानाला चिंता।
यौवन भटकती पोटपाण्या, नृपास नच ये न्युनता।
अन्नावाचून बालक मरती, कुपोषित आदिवासी।
स्विज्झर बँका तुडुंब भरती, भारतीय मुद्रा राशी।
अतिरेकाला अभय देऊनी, सुस्त झोपली दंडशाही॥”
किंवा
“कनकाच्या भिंती। सोन्याचे कळस॥
सोन्याची हौस। देवालाही॥”
“आम्हां का रे असा। गरिबीचा शाप॥
असे काय पाप। आम्ही केले?॥”
“त्यांचे शुभ हस्त। कसे सांगा देवा॥
हरामाचा मेवा। चाखती ते॥”
असे सर्वच क्षेत्रांतील कटु वास्तव स्पष्ट करीत,
“कोण कसे बुडवीत गेले? हक्क कसे तुडवीत नेले?।
स्वामी असुनिया का रे, पराधीन जिणे आले?।
अंग कसे खंगत गेले? स्वप्न कसे भंगत गेले?।
पोशिंदा तो जगताचा, कोणी कसे रंक केले?।
काळी आई का बंधना? मना… अभय दे कारणा॥”
असा मनाला विषण्ण करणारा प्रश्न कवी उपस्थित करतो. तर पुढे जाऊन,
“घे शोध स्वत्व, त्याग आत्मग्लानी।
वाली तुझा तूची, बळ अंगी बाणी।
लाली भोर ल्याली, सरली निशा काळी।
“धडपड” हीच किल्ली, भविष्या उजाळी।
घे अभय भरारी मित्रा,
घे एकदा भरारी,
घे एकदा भरारी॥”
या शब्दांत येणार्‍या विपत्तींशी लढण्यासाठी स्वयंप्रेरणेने प्रयत्‍नांची कास धरण्याची ऊर्मी प्रकट करतो.
         बळीराजाच्या वाट्याला आलेले कटू वास्तव कवीने अत्यंत नेमक्या शब्दांत अनेक कवितांतून व्यक्त केले आहे; त्याच बरोबर, वास्तवाला समर्थपणे सामोरे जाण्याची जिद्दही त्याच वेळी व्यक्त केली आहे.
“असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी।
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी॥”
“भरारीस उत्तुंग झेपावतो मी, कवी कल्पनेला ’अभय’ गाठतो।
परी वास्तवाने घरंगळत येता, उरे एक भूमी दुजे ना कुणी॥”
आणि तरीही,
“आगीत खेळताना, सूर्यास छेडतो मी।
कोळून पी ’अभय’ तो अंगार चित्तवेधी॥”
असे म्हणत,
“नको रत्न मोती न पाचू हिरे ते
‘अभय’ ते खरे जे मिळाले श्रमाने॥”
असे आत्मभान जागवण्याचे धैर्यही या कवितेतून व्यक्त होते.
“तुझी भूक किती, तू गिळतोस किती?।
अभयानं जनता पिळतोस किती?।
तुझे योगदान किती, तू लाटतोस किती?।
नाकानं गांजरं वाटतोस किती?।”
किंवा
“राजकर्‍यांनो जनतेसाठी एवढे ध्यानी घ्यावे।
तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे॥”,
“लाल दिव्याचा हव्यास केवळ, केवळ सत्तापिपासा
घाऊकतेने भरडून खाती, हीनदीनांच्या आशा॥”
“ ‘सहकारात’ होते तेव्हा, काय तोरा व्हता।
कौलारू खोपडं पाडून, इमले बांधत व्हता।
कशी कमाई होते बाप्पा, भगवंताची माया।
देवधरम सोडून जनता, पडे तुमच्या पाया॥”
                  यासारख्या ‘नागपुरी तडका’ या काव्यप्रकारातील उपहासात्मक लेखनशैलीतील ओळी कवीच्या स्वतंत्र लेखनवैशिष्ट्याचे दर्शन घडवितात. वेगवेगळ्या वैगुण्यांवर नेमकेपणाने भाष्य करण्याचे कवीचे शब्दसामर्थ्य परिणामकारक झाले आहे. खरेतर, या संग्रहातील अनेक कविता पूर्णपणेच वाचण्याच्या योग्यतेच्या आहेत असे म्हणावे लागेल.
                  प्रतिभेचे साहित्यातील महत्त्व कधीही न संपणारे आहे, तरीसुद्धा प्रतिभेइतकेच महत्त्व परिश्रमांनाही आहे. कवी मुटे यांनी अभ्यासपूर्वक आणि वेदनेच्या अंगाने जाणारे तरीही आत्मभान जागविणारे लेखनसामर्थ्य प्रकट केले आहे, त्यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत.

                                काहीशी सुरक्षितता लाभल्यावर, लेखक-कवी आपल्याला आलेल्या अनुभवांचे प्रकटीकरण करणारे साहित्य निर्माण करतात. ही निर्मिती होतच राहणार. परंतु, अन्यायाच्या निर्दालनासाठी आणि वेदनांच्या परिहारासाठी एखादा तुकड्या, एखादा कबीर, एखादा तुकाराम आमच्यातून निर्माण व्हावा यासाठी मात्र वाटच पहावी लागेल. 

                                                    शरद जोशी
                                            अंगारमळा, आंबेठान
                                               ता. खेड जि. पुणे
…………………………………………………………………………

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s