नंदनवन फ़ुलले

नंदनवन फ़ुलले …!!

वृद्धतरूच्या पारावरती,
झोके घेत झुलले
तरूघरी नंदनवन फ़ुलले

रम्यकोवळी रविकिरणे ती
कुणी अप्सरा खिदळत होती
मेघही हसती उडता उडता
गरजणे भुलले

भूक कोवळी घेऊन पाठी
स्वप्न उद्याचे कुणी शोधिती
भिरभीर भिरभीर उडती पतंगे
पंखही खुलले

पक्षी बोलती खोप्यामधुनी
मधमाश्यांशी हितगुज करूनी
वल्ली नाचल्या धुंद होऊनी
देठ थरथरले

गाय,खार अन् मनीम्याऊ ती
खेळ खेळती लपती छपती
चित्रकार तो तद्रूप झाला
रंगही स्फ़ुरले

चैतन्याचे अभय तरंग
वृद्ध तरूही झाला दंग
खोडव्याला फ़ुटली पालवी
फ़ुले ही फ़ुलले

                         गंगाधर मुटे
………… **………….. **………….

माय मराठीचे श्लोक…!!

माय मराठीचे श्लोक…!!

नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष “हर हर महादेव” झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

“अभय” एक निश्चय मनासी करावा
ध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा
सदा शब्द वाणीत ये सर्वकाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

                             – गंगाधर मुटे “अभय”
…………………………………………………………..
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशीत. दि. १०.११.२०१०)
…………………………………………………………..


श्रीमद्‍ भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहामध्ये ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ आणि समुह यांनी माय मराठीच्या श्लोकाचे गायन केले.
ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
—————————-
गायक – विनायक वानखेडे
गीत- गंगाधर मुटे
तबलावादक – प्रविण खापरे
हार्मोनियम – सुरेश सायवाने

… अशीही उत्तरे-भाग-२

… अशीही उत्तरे-भाग-२

…. थोडक्यात उत्तरे लिहा ….

प्रश्न – आपले नांव सांगा ?
उत्तर – श्यामला तात्याविंचू चावला.
प्रश्न – पृथ्वीचे खंड किती व कोणते ?
उत्तर – सात. एखंड,श्रीखंड,भुखंड,दोरखंड,रेवाखंड,झारखंड आणि उत्तराखंड.
प्रश्न – महासागराची नावे लिहा ?
उत्तर – नवसागर,गंगासागर,आनंदसागर,प्रेमसागर आणि विद्यासागर.
प्रश्न – काकाच्या पत्नीला काकी,मामाच्या पत्नीला मामी तर मेव्हण्याच्या पत्नीला ?
Continue reading

… अशीही उत्तरे-भाग-1

…. थोडक्यात उत्तरे लिहा ….

प्रश्न – भारतीय पुरुष कोणत्या क्षेत्रात पारंगत आहे ?
उत्तर – लोकसंख्या वाढविण्यात.
प्रश्न – पोलीस यंत्रणेचे मुख्य कार्य ?
उत्तर – हप्तावसूली.
प्रश्न – हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
उत्तर – ओला होईल.
प्रश्न – अमिताभ आणि जया मंदिरात काय करतात ?
उत्तर – अभिषेक. Continue reading

नेतागिरी एक बिनाभांडवली धंदा

चला नेता बनुया….!

                 मला कोणी जर “उद्योग-व्यवसाय” कोणता करावा असा प्रश्न विचारला तर मी बिनदिक्कतपणे आमच्यासारखे राजकारणात या असे ठामपणे उत्तर देत असतो.  आणि का देवू नये? राजकारणात घुसून नेता बनण्याएवढा सहज सोपा बिनभांडवली धंदा दुसरा कोणता असेल तर या भारतवर्षातील कोणत्याही मनुष्यप्राण्याने मला सप्रमाण सिद्ध करून दाखवावे. कोणी सप्रमाण सिद्ध करून दाखवल्यास मी त्यांची जाहीरपणे वांगेतुला किंवा कांदेतुला करून त्यांचा यथोचित सत्कार करायला केव्हाही तयार आहे.
                मी “राजकारणात या” असा सल्ला देतो त्यामागे ठोस कारणे आहेत. अन्य कोणताही व्यवसाय करायचा म्हटले की भांडवल लागते, कला-कौशल्य लागते, मोक्याच्या ठीकाणी जागा लागते, नोकरी करायची तर तत्सम शिक्षण लागते, डोनेशनसाठी पैसा लागतो.शेती करायची तर जमीनजुमला लागते, कष्ट उपसायची तयारी लागते. वगैरे-वगैरे……..
                 आमच्या व्यवसायात उलट आहे. इथे काय लागते यापेक्षा काय नको हीच यादी फ़ार मोठ्ठी लांबलचक असते. अगदी मारूतीच्या शेपटीपेक्षाही लांब. 
पण आपण मात्र येथे किमान काय लागते फ़क्त याचीच यादी करू.

१)  पाच मीटर खादीचे कापड खरेदी करण्याएवढे एवढे भांडवल पुरेसे ठरते. (ती सुद्धा विकत न घेता अवांतर मार्गाने हडपून मिळविली असेल तर फ़ारच उत्तम.) पण तेवढेही भांडवल नसेल तरी नाउमेद होण्याचे कारण नाही. आजकाल बिनाखादीने सुद्धा हा व्यवसाय करता येतो. फ़क्त यशाचा मार्ग जरा लांब पडतो एवढेच.
२) कातडी किमान गेंड्यासारखी तरी जाड असावी.
३) आंधळ्या भिकार्‍याच्या ताटात एक रुपया टाकल्याचा आभास निर्माण करुन चार आणे टाकून बारा आणे उचलून घेता यायला हवे.
४) प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाता यायला हवे.
५) निगरगट्टपणा असावा.
६) सरड्यासारखे रंग बदलता यायला हवेत.
७) जेथे तेथे आपलेच घोडे दामटता यायला हवे. 
वगैरे वगैरे….

          आता मुख्य प्रश्न राहिला शैक्षणिक पात्रतेचा. 
 शैक्षणिक पात्रता काय असावी हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो.
मी आणि माझा जिवलग मित्र श्याम, आम्ही दोघेही मॅट्रीकमध्ये असतानाची गोष्ट. पहिल्याच वार्षीक परिक्षेत श्याम मेरिट मध्ये पास झाला आणि पुढील शिक्षणासाठी शहरात निघून गेला.
मी मात्र मराठी हा एकमेव विषय कसाबसा काढू शकलो.पुढे अनेक वर्ष मी आणि मॅट्रीक दोघेही कट्टर जिवलग मित्र बनलो. आम्हाला एकामेकावाचून करमेचना. मग मी चक्क पंचवार्षिक योजना राबविली मॅट्रीक मध्ये. पाच वर्षानी मात्र कसाबसा पास झालो एकदाचा.
                          वडीलांनी माझ्यातल्या गुणवत्तेविषयी निदान करून पुढारी/नेता बनण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले “तू व्यापारी बनेगा ना किसान बनेगा, पुढारी की संतान है तू इस देशका भविष्य बनेगा.”
मला त्यांचा सल्ला आवडला आणि घुसलो एकदाचा राजकारणात. चढत्या क्रमाने घवघवीत यश मिळत गेले. शिक्षणसंस्था काढल्यात, सहकारी कारखाने काढलेत.
                         आता पाच वर्षाच्या काळात माझा मानमरातब खूपच वाढत गेला. आता मला कोणी रावसाहेब म्हणतात, कोणी बापुसाहेब म्हणतात तर कोणी दादासाहेब.
आणि हो मुख्य गोष्ट राहूनच गेली.
                    श्याम आला होता. हातात एम. एससी,बी.एड,पी.एच.डी अशा पदव्यांची पुंगळी घेऊन माझ्या शाळेत नोकरी मागायला.  म्हटले जागा निघेल तेव्हा रितसर अर्ज कर. सध्या शाळेचे बांधकाम सूरू आहे. खुप खर्चिक काम आहे ते. त्या कामाला निधी लागतो. शाळेतील मुले ही देशाचे भविष्य आहेत.त्यांच्यासाठी सुखसोई उपलब्ध करून देणे माझे परमकर्तव्य आहे त्यासाठी निधी लागतोच. त्याविषयी तू माझ्या पी.ए सोबत बोलून घे. काम कसे रितसर, कायदेशीर व्हायला नको का?
आणि
मुलाखतीच्या दिवशी आला होता श्याम इंटरव्ह्यू द्यायला आणि मी होतो इंटरव्ह्यू घ्यायला …….!
.                                                                                                                                     
                                                                           गंगाधर मुटे.
/////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////
(लेख काल्पनिकः लेखातील व्यक्तीरेखेशी कुणाची जीवनरेखा जुळतांना दिसली तर तो निव्वळ योगायोग मानावा.)

आभास मीलनाचा

आभास मीलनाचा


केव्हा तरी कशाचा हलकेच भास झाला
आभास मीलनाचा पळभर मनास झाला

शून्यात पाहताना हळुवार लाजली ती
दृश्यात मी असावा, माझा कयास झाला

तू लांब दूरदेशी, ना रूप जाणतो मी
मूर्ती मनी तरळली, कलिजा खलास झाला

पाडातल्या फ़ळांना का आस पाखरांची?
येता थवे निवासा, मग मेळ खास झाला

विरहात वृक्षवल्ली निघुनी वसंत जाता
बघता तया विलापा पक्षी उदास झाला

प्रेमा सदा भुकेली अभये सजीव माया
निष्काम ज्या उमाळा तो प्रेमदास झाला 

                                        गंगाधर मुटे
………………………………………………….
(वृत्त – आनंदकंद )
………………………………………………….

धकव रं श्यामराव

धकव रं श्यामराव


धकव रं श्यामराव झोल नको खाऊ
नशिबाची गाथा नको कोणापाशी गाऊ …!

रगताचं पाणी करून रान शिंपलं बावा
गारपिटानं कहर केला निसर्गानं कावा
कंबरछाती गहू होता पुरा झोपून गेला
उंबईचा फ़ुलोरा खड्डून झाडून नेला
दोघाचंबी गर्‍हाणं सारखंच हाय भाऊ …!

मार्केटात गेलो तर उलटे झाले गिर्‍हे
खरीददार म्हणे ह्या गहू होय का जिरे?
आजकाल म्हणे याले कोंबडी खात नाही
घेऊन जा वापस नायतर धडगत नाही
नशीब धुवासाठी मी कोणत्या गंगेत न्हाऊ?….!

पदवीची पुंगी घेऊन पोरगं वणवण फ़िरते
डोनेशनबिगर कुठं नोकरीपाणी मिळते?
चपराश्याचा भाव सध्या सात लाख सांगते
मास्तरसाठी अभयानं बारा लाख मांगते
“नोकरीले मार गोली” म्हणलं खेतीवाडीच पाहू….!

                                       गंगाधर मुटे
………………………………………………
ढोबळमानाने शब्दार्थ.
झोल खाणे = कच खाणे.माघार घेणे.
उंबई = ओंबी, गिर्‍हे = ग्रह
………………………………………………

नाते ऋणाणुबंधाचे

नाते ऋणानुबंधाचे

ऋणानुबंधाचे…… ते हक्क सांगताना
पुलकित होय अवनी, ओहळ रांगताना…!

का उठती रोमांच? अलगद स्पर्श होता
ते गगनही उल्हसित, मेघ पांगताना ….!

गम्य कसे गवसते? तृष्णा कोण जाणे
शहारते पाकळी, पतंग खेळताना ……!

अस्पर्श रक्षिलेला, जपून जतन ठेवा
ते हृदयही कंपित, तार छेडताना ……!

स्पर्श उत्कटतेचे, सख्यांस बळ देते
तन्मय ती तनूही, स्वरूप चाळताना…!

फेकुनी दूर अभये, शाल काळोखाची
रजनी लेत लाली, भानू उगवताना…!

                                   गंगाधर मुटे
………… **………….. **………….**…….

हवी कशाला मग तलवार ?

हवी कशाला मग तलवार ?


मकरंदाहुनि मधुर तरीही
शर शब्दांचे धारदार
तळपत असता जिव्हा करारी
हवी कशाला मग तलवार ?……!!

शब्दच असती कवच कुंडले
शब्दच चिलखत होती
शब्दच होती आयुधे ऐसी
नभास भेदुनि जाती
शब्द खड्ग अन् शब्द ढालही
परतवती ते हरेक वार…….!!

नवनीताहून मऊ मुलायम
कधी कणखर वज्रे
आसवांनी भिजती पापण्या
कधी खळखळ हसरे
हीनदीनांचे सांत्वन करिती
गाजविती दरबार….!!    

भुंग्यासम शब्दांची गुणगूण 
कधी व्याघ्राची डरकाळी 
शब्द फटाके, शब्द फुलझडी 
कधी नीरवता पाळी 
जोषालागी साथ निरंतर 
कधी विद्रोही फूत्कार ….!!  

सृजनशीलता-करुणा-ममता 
संयम विभूषित वस्त्रे 
हजरजबाबी, तलम,मधाळही 
परि कधी निर्भीड अस्त्रे 
पांग फेडण्या भूचे अभये 
तळहातावर शिर शतवार …!!

                           गंगाधर मुटे
………… **………….. **…………

आईचं छप्पर

.आईचं छप्पर.

कडाक्यात भांडतात
मेघ गडगड करून
भरून येते नभाला
अश्रू ढाळते वरूण …!

अश्रू बनती गारा
वादळ तांडव करी
गारठल्या हवेसवे
विजेस हिंव भरी …!

हिंव भरल्या विजेस
ताप चढवी गारा
तिला पांघराया
छप्पर नेतो वारा …!

छप्पर उडल्या संसारात
ब्रह्मपुत्रा वाहते
तेल मिरची शिदकुट
पाण्यावरती पोहते ….!

पोहतांना पुस्तक वही
सरस्वती भिजते
माती करून जीवाची
चूल उल्हे निजते ….!

गरजत्या पावसात
चोळी झबले न्हाती
पदराखाली लेकरं
कवटाळती छाती ….!

                      गंगाधर मुटे
………… **………….. **………….**…….

( शिदकूट = मोजक्या काळासाठी पुरेल एवढी अन्नसामग्री)
( उल्हा = एकप्रकारची कच्च्या मातीची चुलच पण लाकडा ऐवजी कोळशाचा जाळ घालतात.उल्हाचूल.)