हे गणराज्य की धनराज्य ?

हे गणराज्य की धनराज्य?

प्रजापतीही प्रगल्भ झाला, पक्व झाली जनशाही
मतपेटीतून गेंडा जन्मला, धन्य झाली गणशाही…!!


एका-एकुल्या ‘व्होटा’साठी, थैली – थैली नोटा
कुणी पिलवती इंग्लिश-देशी, कोणी हाणती सोटा
कोणी करिती लांगूलचालन, कोणी लोटांगण जाती
भले-शहाणे-सुविद्यही खाती, जातीसाठी माती
सदाचाराचा मुडदा पडतो, मदांध उन्मत्तशाही…!!


डांबर खाती,सिमेंट खाती, जणू चरण्यासाठी सत्ता
क्षणाक्षणाला टनाटनाने, वाढवीत नेती धनमत्ता
किडूक-मिडूक दिल्या बिगर ना, कचेरी कार्यसिद्धा
उद्दामाला दिवस सुगीचे, सत्याच्या माथी गुद्दा
नेकी इमान पांचट झाले, भरात आली बलशाही …!!


विषा कवळते प्रजा बिचारी, ना सुलतानाला चिंता
यौवन भटकती पोटपाण्या, नृपास नच ये न्युनता
अन्नावाचून बालक मरती, कुपोषित आदिवासी
स्विज्झर बँका तुडुंब भरती, भारतीय मुद्रा राशी
अतिरेकाला अभय देऊनी, सुस्त झोपली दंडशाही…!!

                                            गंगाधर मुटे

—————————————————

नशा स्वदेशीची

नशा स्वदेशीची…!!

आज रात्रीच्या मध्यात असे काय घडणार आहे?
जुन्याचा खातमा होऊन नव्याची स्थापना होणार आहे?
की व्यवस्थेचे शेंडाबूड परिवर्तन होणार आहे?
निराशेला बुडवून आशेला कोंब येणार आहे?
की उमेदीला भविष्य खांद्यावर घेणार आहे?
नेमके होणार तरी काय आहे?
फ़क्त हेच होणार की स्वप्नांचे मनोरे बांधले जाणार
आणि अवगुण गाळण्याचे संकल्प सोडले जाणार
मात्र अवगुण गळण्याऐवजी संकल्पच गळणार
तरीही आशा की… भविष्य उजळणार
अशा मंगल घटिकेला, चला एक एक ग्लास भरून घेऊ
पळू नका गांधीप्रेमींनो, आज थोडासा विचार करून घेऊ
ग्रामस्वराज,स्वदेशीचा अर्थ आज लागणार आहे
बदल्यात फक्त गावठीचा एक पेला मागणार आहे
इंग्रज गेल्यापासून म्हणा अथवा
किल्ल्यावर तिरंगा फडकल्यापासून म्हणा
कुठेतरी,कधीतरी, उजेडात वा अंधारात
आढळल्यात त्या महात्म्याच्या पाऊलखुणा ?
हमरस्त्यावर बेदरकारपणे आणि अगदी एकमताने
त्या ग्रामसुराज्याच्या संकल्पनेला फासलाय ना चुना ?
पण इथे ग्रामोद्योगाचा मूलमंत्र साकारलेला दिसतो
मोहाफुलापासुन गावठीचा सुंदर प्रकल्प आकारलेला दिसतो
सरकारला सबसिडी इथे कोणीच मागत नसते
शिपाई,कलेक्टर,मंत्री सर्वांना नियमित हप्ते जात असते
ग्रामस्वराज्याची संकल्पना पचनी पडत नाही कारण
भगतसिंगासारखी नशा आता कुणालाच चढत नाही
खुर्चीच्या दलालांनी नारळ असं कसं फोडलं
नियतीने क्रित्येकांना गुत्त्यावर आणून सोडलं.
थोडी गेली पोटात आता अभय पडू लागला गिअर
पिल्या-बिनपिल्यांनाही मेनी मेनी हॅपी न्यू ईअर………………..!!!!

                                                             गंगाधर मुटे
………… **………….. **…………. **…………..**……..

रे नववर्षा

रे नववर्षा 



रे नववर्षा ये नेमाने
वल्हवीत अंकुर नवजोमाने
एक कवडसा चैतन्याचा
जा फुलवीत ही उदास राने ….!

ना अस्त्राने वा शस्त्राने
उकलन व्हावी सद्भभावाने
मत्सर-हेका ना गर्जन-केका
बाहुबलीचे नको भुजाने …..!

दानवाने ना देवाने
राज्य करावे बळीराजाने
आत्मग्लानी क्लेश त्यजुनी
जगावा पोशिंदा सन्मानाने …!

रे नववर्षा दे अभयाने
दे भरुनी दुरडी भगोणे
वित्तपातल्या लक्तरांना
भरव मुक्तीचे चार दाणे …!
   


                         गंगाधर मुटे
………… **………….. **………….