एक लेख एका आत्मप्रौढीचा!

एक लेख एका आत्मप्रौढीचा!

आत्मस्तुती किंवा आत्मगौरव मानवी जीवनात निषिद्ध मानल्या गेला आहे. स्वत:च स्वत:चे कौतूक करणे तर अशोभनीयच. अगदी ग्रामीण जनजीवनात सुद्धा अशा वर्तनाला “अर्ध्या हळकुंडाने पिवळा होणे” अशा वर्गवारीत ढकलले गेले आहे. अगदी आत्मचरीत्र लिहायचे असेल तरी लेखकाने आपल्या आयुष्यातील बर्‍या-वाईट दोन्ही प्रकारच्या घटनांचा उहापोह करावा, अशी अपेक्षा असते. पण तरीही आयुष्यात कधीकधी अनपेक्षितपणे असाही प्रसंग येतो की आपलाच आपल्याला अभिमान वाटायला लागतो. आपण सहज म्हणून केलेले कार्य अनपेक्षितपणे अपेक्षेबाहेरची फ़लनिष्पती देऊन जाते. अशावेळी आपलाच आपल्याला वाटणारा  अभिमान अहंकार नसतो. त्यामागे असते केवळ आपल्या हातून घडलेल्या कार्याची कृत्यकृत्यता आणि श्रमसाफ़ल्यता.

अशाच एका प्रसंगाविषयी आज लिहायचा मोह न आवरल्यामुळे आत्मस्तुतीचा दोष स्विकारुन मी लिहित आहे.

 १२ डिसेंबर २०१५ ची ती सकाळ. वेळ ९ च्या आसपासचा. पुण्यावरून माझे मित्र श्री प्रसाद सरदेसाई यांचा एक अचानक मोबाईल कॉल आला. ते कापर्‍या स्वरात म्हणाले,

“मुटे सर, साहेबांच्या प्रकृत्तीबद्दल काही कळले का?”

          शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांची प्रकृती अनेक दिवसापासून  चांगली नव्हती हे मला माहित होते. ते अत्यवस्थ असल्याचा १० नोव्हेंबर २०१५ ला दुपारी संदेश आल्याने रवीभाऊ काशीकर, सरोजताई काशीकर, सुमनताई अग्रवाल, शैलजाताई देशपांडे, पांडुरंग भालशंकर आणि मी लगोलग रात्रीच्या फ़्लाईटने पुण्याला जाऊन रुबिया हॉस्पीटलमध्ये त्यांची भेट घेऊन आलो होतो. ते अत्यवस्थ होते आणि वैद्यकीय उपचाराला त्यांचे शरीर फ़ारसे प्रतिसाद नव्हते. एवढे मला माहित होते. नंतरच्या काळात संपर्क माध्यमातून प्रकृती “यथास्थिती” असल्याचे संकेत मिळत होते. पण अगदीच ताजी म्हणावी अशी माहिती माझ्याकडे नसल्याने मी म्हणालो,

“ नाही. यासंदर्भात ताजी माहिती माझ्याकडे नाही” मी.

“शरद जोशी इज नो मोअर” असा तिकडून प्रसाद सरदेसाई यांचा रडका आवाज ऐकताच माझ्या काळजात धस्स झाले. विश्वास बसत नव्हता पण सरदेसाई सरांनी दिलेली बातमी खोटी असण्याचीही शक्यता नव्हती. मी तातडीने मोबाईलवर नंबर डायल केला.

“सरोजताई, साहेबांच्या प्रकृत्तीबद्दल काही कळले काय?” मी.
“माझं काल रात्रीच बोलणं झालं प्रकृती………”
मी मध्येच सरोजताईंचे बोलणे थांबवून म्हटले.
“आज काहीतरी विपरित बातमी आहे, तुम्ही तातडीने पुण्याला संपर्क करावा”

            इतके बोलून मी लगेच फ़ोन कट केला. नंतर लगेच श्री वामनराव चटप व श्री राम नेवले यांना फ़ोन केला. त्यांनाही काहीच माहिती नसल्याचे लक्षात येताच त्यांनी पुण्याला संपर्क करुन माहिती मिळवावी, असे सुचवले. घरी बायकोला सांगून टीव्हीवर मराठी बातम्यांचे चॅनेल आळीपाळीने सतत बदलून काही बातमी येते का ते बघत राहायला सांगीतले.
            पुण्याला फ़ोन करून म्हात्रे सर किंवा देशपांडे सरांशी संपर्क करावा व नक्की काय ते खात्री करून घ्यावी, असा विचार करत असतानाच तिकडून तितक्यात सरोजताईंचाच फ़ोन आला. त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. आता बोलण्याची गरजही संपलीच होती. मग फ़ोनवर दोन्हीकडून अक्षरश: ओक्साबोक्सी रडारड सुरु झाली. ९-१० मिनिटानंतर मी स्वत:ला सावरायचा प्रयत्न केला पण त्यात यश येईना म्हणून बोट लाल बटनेवर ठेवले आणि फ़ोन कट केला.

आता रडण्याखेरीज अन्य काही कार्य उरलेलेच नव्हते. बातम्या अजून सुरु व्हायच्या होत्या. निदान आणखी दोन तास तरी ही बातमी अधिकृतपणे जाहीर होण्याची व प्रसारमाध्यमांपर्यत पोचण्याची शक्यता नव्हती. बातमी अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना आणि वृत्त वाहिन्यांना शरद जोशींविषयीची माहीती, जीवनपट, छायाचित्र आणि व्हिडियो लागतील. ही सर्व माहिती प्रसारमाध्यमांना उपलब्ध करून देऊ शकेल असे शेतकरी संघटनेकडे एकच व्यक्तिमत्व होते आणि ते म्हणजे प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे. संघटनेच्या सुरुवातीपासूनच म्हात्रे सरांनी केंद्रीय कार्यालय सांभाळले आहे. पण याक्षणाला ते माहिती पुरवायला नक्कीच उपलब्ध होऊ शकणार नव्हते. शिवाय शरद जोशींच्या प्रकृतीची बातमी प्रसारमाध्यमांपासून लपवून गोपणीयता राखल्याने प्रसारमाध्यमेही बेसावध असल्याने ऐन वेळेवर माहिती गोळा करणे त्यांनाही शक्य होणार नाही, याचाही नीटसा अंदाज येऊन गेला.

शरद जोशींच्या अत्यवस्थेविषयी कार्यकर्त्यांनाही फ़ारशी माहिती नसल्याने ही बातमी महाराष्ट्रासहित अन्य राज्यातील शेतकर्‍यांनाही धक्का देणारी असल्याने या बातमीचे महत्वही अनन्यसाधारणच होते. आता यासंदर्भात जे काही करायचे ते आपल्यालाच करायला हवे असे ठरवून  तातडीने लॅपटॉपवर बसलो आणि महाराष्ट्रासहित देशातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांना आणि दुरदर्शन वाहिन्यांना इमेलद्वारे माहीती पाठवायचा सपाटा सुरू केला.

तीन-चार इमेल जाईपर्यंत ठीक होते पण जेव्हा एकापाठोपाठ शरद जोशींविषयीची संपूर्ण माहिती, जीवनपट, आंदोलनाचा आढावा, छायाचित्र व व्हिडियो असलेले दहा-बारा इमेल त्यांचेकडे पोचले तेव्हा पत्रकारांना संशय येऊन काहीतरी नक्कीच वाईट बातमी असल्याचा त्यांनाही अंदाज येणे क्रमप्राप्त होते. मग माझा मोबाईल खणखणायला लागला. पुण्यावरून अधिकृत घोषणा न झाल्याने मी पत्रकारांना बातमीच्या सत्यतेचा दुजोरा देऊ शकत नव्हतो. मग मोबाईल मित्राच्या हाती दिला आणि सांगीतले की कॉल करणार्‍या सर्वांना सांग की मी सध्या अतिव्यस्त आहे त्यामुळे त्यांनी एक तासानंतर संपर्क करावा. मी मात्र माहितीचे इमेल पाठवणे सुरुच ठेवले.

मी पाठवत असलेल्या माहितीचा बाज लक्षात घेता बहुधा प्रसारमाध्यमांनाही पुरेसा अंदाज येऊन गेलेलाच असावा कारण मी फ़ोनवर उपलब्ध नाही म्हटल्यावर तिकडून इमेलवर रिप्लाय यायला लागलेत. रिप्लायला प्रतिसाद न देता मी नवीन माहिती पाठवणे सुरुच ठेवले.  त्याचा परिणाम असा झाला की अधिकृत घोषणा होताच दूरदर्शन वाहिन्यावर थेट सविस्तर बातम्याच सुरू झाल्यात. पुण्यापासून ८०० किलोमिटर अंतरावरील आर्वी छोटी सारख्या दुरवरच्या ग्रामीण भागातील ३००० लोकसंख्या असलेल्या गावात बसून मी दिवसभर राज्यभरातल्या कानाकोपर्‍यातील प्रसारमाध्यमांना हवी ती माहिती आणि साहित्य पुरवत होतो, ही आधुनिक संगणकीय व आंतरजालिय तंत्रज्ञानाची किमया होती आणि मी त्या अत्याधुनिक नवतंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून घेत होतो.  दिवसभर दूरदर्शन वाहिन्यावर आणि १३ तारखेच्या राज्यभरातील वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यामध्ये ५० ते ९० टक्के मजकूर मी पाठवलेलाच दिसत होता किंवा मीच चालवत असलेल्या http://www.sharadjoshi.inhttp://www.baliraja.com या संकेतस्थळावरुन तरी घेतलेला होता. शरद जोशींचा जीवनपट तर जवळजवळ सर्वच वृत्तपत्रांनी मी जसा पाठवला तसाच्या तसाच छापला होता.

माझ्या एका छोट्याशा प्रयत्नाने व मी निर्माण करून ठेवलेल्या संकेतस्थळांमुळे शरद जोशींसारख्या युगात्म्याचे व्यक्तीमत्व सविस्तर माहितीसह जनतेपर्यंत पोहचू शकल्याने श्रमसाफ़ल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटून अभिमानास्पद वाटणे अगदीच स्वाभाविक आहे.

 – गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~~~~
साप्ताहिक उदयकाळ “चैत्र विषेशांक-२०१७” मध्ये प्रकाशित.

शेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही!

शेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही!

 

निसर्ग म्हणजे निसर्ग आहे आणि त्याची वर्तणूक सुद्धा निसर्गाला शोभेल अशी नैसर्गिकच असणार हे उघड आहे.  निसर्ग विविधतेने नटलेला आहे. विविधता हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. निसर्गातला विविधता हा गूण काही कालचा किंवा परवाचा नाही. आपल्यासारख्या बुद्धीवंतांचा जन्म झाल्यानंतर निसर्गाने विविधतेचा गूण धारण केला असेल, असेही नाही. निसर्गाचा जेव्हा केव्हा जन्म झाला असेल तेव्हाच तो विविधतेचा जन्मजात गूण धारण करुनच जन्माला आला असणार, हेही उघड आहे.  ही बाब सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट असूनही यावर मते-मतांतरे व्यक्त होत असतील तर तीही नैसर्गिक वैविध्यतेच्या रचनात्मक मानसिकतेमुळेच होत असते, ही नैसर्गिक शाश्वत सत्यता सुद्धा आपण स्विकारलीच पाहिजे. पण तिथेही विविधताच आडवी येते आणि शाश्वत सत्यता स्विकारायला शतप्रतिशत मानसिकता कधीच तयार होत नसते.

 

भारतीय शेती निसर्गावर अवलंबून असल्याने शेतकरी गरीब आहे, हे विधान मी शाळा-कॉलेजात असताना ऐकण्यात आणि वाचण्यात इतके वेळा कानावर आणि डोळ्यावर येऊन आदळायचे की कानाचे पडदे फ़ाटायला बघायचे आणि डोळ्यातली बाहुली ठार गारद व्हायला बघायची. शाळा-कॉलेजात जाऊन शिकले-सवरलेले आणि ग्रंथ-कुराण-बायबल-वेद वाचून साक्षात ज्ञानाचे महामेरू झालेले इतके येरेगबाळे कसे बोलू आणि लिहू शकतात, याचे कायम कुतुहलमिश्रीत नवल वाटत राहायचे. मग या विधानाची शहानिशा करून आकलन करण्यासाठी मेंदूच्या भवती विचाराचे लोंदे गोळा व्हायचे. ते मेंदूभवती इतका पिंगा घालायचे की मेंदू पार गुळगुळीत होऊन पलिकडे काम करेनासा व्हायचा. कधीकधी मेंदू हँग झाला की मुद्दा निकाली न काढताच त्याला आहे तसाच अर्धवट आणि येरागबाळा सोडून मेंदूला फ़ॉर्म्याट मारून, नव्याने रिफ़्रेश मारून ताजेतवाने व्हावे लागायचे.

शाळा-महाविद्यालयात मिळवलेल्या ज्ञानाची शिदोरी गाठीशी घेऊन जेव्हा मी प्रत्यक्ष शेती करायला सुरवात केली तेव्हा पहिल्या सहा महिन्यातच पुस्तकीय ज्ञानातील विरोधाभास उघड व्हायला लागला. प्रत्यक्ष शेतीतील अनुभव, प्रत्यक्ष ग्रामीण जीवन, पुस्तकीय ज्ञानातील पांडित्य व बोलघेवड्या पगारी तज्ज्ञांचे सल्ले हे दुरान्वयानेही आपसात एकमेकांच्या नातेसंबंधात लागत नाही, याची प्रचिती यायला लागली. शेती, शेतीतील गरीबी, गावाची दुर्दशा याची कारणे शोधतांना जी कारणे आढळली ती पुस्तकांशी, पुस्तकी पंडीतांच्या निष्कर्षाच्या आणि शिकवणीच्या थेट उलटी दिसत होती. डोहाकडे जाणार्‍याला वाचवण्यासाठी उदात्त हेतूचा देखावा करून सुचवले जाणारे मार्ग त्याला आणखी त्वरेने डोहाकडे नेणारे आणि कुठल्याही स्थितीत तो बुडलाच पाहिजे, अशी बेमालूमपणे पण प्रभावी व्यवस्था करणारेच आहेत, हे ज्या क्षणी लक्षात आले आणि खात्री पटली त्या क्षणीच प्रचलित पुस्तकी पंडीत, पारंपारिक ज्ञानाचे महामेरू आणि पगारी तज्ज्ञ यांच्यावरचा माझा विश्वास भुर्रकन उडून अवकाशात निघून गेला तो आजतागायतही परत आलेला नाही.

मात नव्हे मैत्री

                  निसर्गावर मात करण्याच्या वल्गना हा आणखी एक असाच आगाऊपणा. एकंदरीत निसर्गाची प्रकृती एकजिनशी आणि वैश्विक आहे. विश्वाच्या एका भौगोलिक प्रदेशात घडलेल्या बदलाचा प्रभाव विश्वाच्या दुसर्‍या भौगोलिक प्रदेशात जाणवत असतो. वैश्विक रचना समग्र ब्रह्मांड रचनेशी संलग्नीत आहे, इतके जाणायला मनुष्य खगोलशास्त्रज्ञ किंवा ज्योतिषशात्रीच असला पाहिजे, हेही आवश्यक नाही. ब्रह्मांडाची परिमिती कुणालाच मोजता आली नाही आणि मोजता येणे शक्यही दिसत नाही. आकाशगंगेतील अंतर मोजण्यासाठी प्रकाशवर्ष हे परिणाम सुद्धा अत्यंत थिटे आहे. आकाशगंगेचे नुसते अंतर मोजण्याचीही कुवत नसलेल्या मनुष्यप्राण्याने थेट मात करण्याच्या गोष्टी करणे अत्यंत हास्यास्पद आहे. एकंदरित निसर्गाची आणि निसर्गावर प्रभाव टाकणार्‍या घटकांशी व्याप्ती लक्षात घेतली तर विभागवार किंवा प्रदेशवार निसर्गाच्या प्रकृतीवर नियंत्रण आणता येणे आपल्या आवाक्यात नाही. तंत्रज्ञानाने कितीही झेप घेतली तरी निसर्गाच्या प्रकृतीवर नियंत्रण आणणे कधीही शक्य होणार नाही, याचे भान विसरून चालणार नाही. सतरा वर्षे शाळा-महाविद्यालयात घालवली आणि जोडीला शे-पाचशे पुस्तके वाचल्याने ज्ञानग्रहनक्षमतेच्या कक्षा तेवढ्या रुंदावत जातात, निसर्गावर मात करण्याचे सामर्थ्य प्राप्त होत नाही याचे भान राखायलाच हवे.

हजारो वर्षापासून शेतकरी शेती करत आला पण त्याने निसर्गावर मात करण्याची भाषा कधीच केली नाही. त्याने निसर्गाशी जुळवून घेतले, निसर्गाशी मैत्री केली. निसर्गाला बदलायला भाग पाडणे मनुष्य प्राण्याच्या आवाक्यात नाही, याची जाणीव असण्याइतपत व्यावहारिक ज्ञान त्याचाकडे असल्याने तसा प्रयत्न त्याने कधीच केला नाही. याउलट तो स्वत: बदलला. निसर्ग कसा असतो, हे त्याने समजून घेतले एवढेच नव्हे तर त्याने स्वत:ला निसर्गानुरूप बदलवून घेतले. त्याने नैसर्गिक प्रकृतीला स्वत:च्या प्रकृतीत विलिन करून घेतले. रान केव्हा नांगरायचे, उदिमाला सुरुवात केव्हा करायची, पेरणी केव्हा करायची याचे वेळापत्रक त्याने निसर्गाला अनुसरून तयार केले. पेरणी केली अन पाऊस आला नाही किंवा अति पाऊस होऊन दुबारपेरणीची वेळ आली तर कधी कुरबूर केली नाही, आदळआपट केली नाही आणि निसर्गाला कधी दोष तर दिलाच नाही. पुन्हा नव्याने तयारी केली आणि दुबार पेरणी केली. कधी ओला दुष्काळ पडला, कधी कोरडा दुष्काळ पडला, कधी एका पावसाच्या कमतरतेने पीक करपून गेले, कधी अति पावसाने अथवा महापूराने शेत पिकासहित खरडून गेले, कधी वादळाने तर कधी गारपिटीने पीक धाराशायी केले पण शेतकरी अश्रू ढाळत बसला नाही आणि निसर्गाच्या नावाने शिमगा करत डांगोराही कधीच पिटला नाही. त्याने निसर्गाला मित्रासारखीच वागणूक दिली आणि निसर्गाला त्याच्या विविधतेसह आनंदाने स्विकारले. पावसाने उघडीप दिली किंवा खंडवृष्टीची स्थिती निर्माण झाली तेव्हा शेतकर्‍याने निसर्गाला बोल लावला नाही तर त्याची आराधना केली. कधी कमरेला बेडूक बांधून वरुणदेवतेला प्रसन्न करायचा प्रयत्न केला, कधी सर्व गावकर्‍यांनी एकत्र येऊन मारोतीच्या पाळावर अभिषेक केला तर कधीकधी सामुहिक सदावर्त करून देवासमोर नैवद्य ठेवला आणि गावातील सर्व गोरगरीब गावकर्यांना यथेच्छ जेवनाचा पाहूणचार दिला. शेतकर्‍याने पेरणीसाठी मातीचा, पीक जगवण्यासाठी पाण्याचा, कचराकाडी जाळण्यासाठी अग्नीचा, धान्य उफ़णण्यासाठी वायुचा, उदीमासाठी वृक्षाचा खुबीने वापर केला आणि निसर्गदत्त संसाधनाचा पुरेपूर कौशल्यानिशी वापर करत व निसर्गाशी सलोखा राखत आपली शेती फ़ुलवत ठेवली. इतिहासाच्या कोणत्याच कालखंडात शेतकर्याने निसर्गाला शत्रू मानून त्याच्यावर मात करण्याची भाषा वापरल्याच्या यत्किंचितही पाऊलखुणा आढळत नाही.

कुटनितीचा खेळ

              मग निसर्गावर मात करण्याची आणि शेतीतील अठराविश्व दारिद्र्याशी निसर्गाच्या लहरीपणाशी सांगड घालून निसर्गालाच जबाबदार धरण्याची भाषा आली कुठून? या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे. उत्तर जटील नसले तरी कुटील नक्कीच आहे. शेतकर्‍यांच्या मर्जीनुसार आणि पिकांच्या गरजेनुसार पाऊस कोणत्याच युगात पडल्याची शक्यता नाही आणि यानंतर पुढे येणार्‍या युगातही पडणार नाही, हे शेतकर्‍याला निसर्गत: मान्य असल्याने तो त्याच्या गरिबीला निसर्गाला जबाबदार धरत नसला तरी अन्य कोण जबाबदार असेल याचीही कल्पना त्याला नाही आणि नेमकी इथेच शेतकरी समाजाची गोची झाली. शेतीत दारिद्र्य आहे हे खरे आहे पण ते कशामुळे आहे, याचे नेमकेपणाने उत्तर शेतकरी समाजाला माहित नसल्याने त्यांचा “नरोवा कुंजरोवा” झाला.

शेतकरी समाजातील याच संभ्रमाचा फ़ायदा अनुत्पादक वर्गाने नेमकेपणाने उचलला. डाकूंचे, चोरांचे किंवा भामट्यांचे बरे होते. कुठलेही तत्वज्ञान न सांगता किंवा कारणमिमांसा न करताच बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करत ते शेतमाल फ़ुकटातच लुटून न्यायचे. मात्र ऐतखाऊ, अनुत्पादक व बिगरशेतकरी वर्ग यांच्याकडे बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करण्याची क्षमता नसल्याने म्हणा किंवा त्यांना समाजात सामाजिक प्रतिष्ठा असल्याने म्हणा, त्यांना अशा राजरोसपणे लुटीच्या मार्गाने जाणे शक्यच नव्हते आणि म्हणून शेतीमध्ये उत्पादित होणारा माल फ़ुकटात मिळणेही अशक्यच होते. मग या सर्वांनी मिळून कुटनितीचा डाव खेळणे सुरू केले. जेव्हा जेव्हा थेट दोन हात करणे अशक्य असते तेव्हा तेव्हा समोरच्या बाजुला परास्त करण्यासाठी कुटनितीचा अवलंब करण्याला बहुतांश शास्त्रांची मान्यता असल्याने शेतमालाच्या लुटीसाठी या मार्गाचा अवलंब करणे सर्वांनाच सोईचे वाटले असावे. शेतमाल कमीत कमी दरात उपलब्ध होत राहण्यासाठी शेतकर्‍यांना त्यांच्या गरिबीचे खरे कारण कळू न देता त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने दिशाभूल करत राहणे सर्वांना फ़ायदेशीर ठरले असावे. शेतकरी आळशी, कामचोर, उधळ्या, अज्ञानी आहे, परंपरागत पद्धतीने शेती करणारा, नव्या तंत्रज्ञानाचा वापर न करणारा आहे त्यामुळे तो गरीब आहे किंवा शेतीच्या दुर्दशेला निसर्गाचा लहरीपणा कारणीभूत आहे, अशा सामुहिक जनमानस तयार करणार्‍या संकल्पनांचा वापर शेतीमालाला मिळणार्‍या अत्यल्प भावाच्या मुद्याला बगल देण्यासाठी कुटनितीक शैलीने पद्धतशीरपणे करण्यात आला असावा, हे उघड आहे.

ग्राहकांची मानसिकता

            कोणत्याही व्यक्ती अथवा सामुहिक कुटुंबाचा जमा आणि खर्चाचा ताळेबंद जुळत नाही तेव्हा त्या कुटुंबाचा अर्थसंकल्प तोट्याचा तयार होतो. अर्थाच्या अनुलब्धतेमुळे साधनांच्या खरेदीवर एकतर मर्यादा येतात किंवा खरेदी अशक्य होते. घरात साधनांची त्यातल्या जिवनावश्यक गरजेच्या वस्तुंच्या खरेदीसाठी अथवा जिवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारी क्रयशक्ती संपली की घरात जे चित्र तयार होते त्यालाच आपण दारिद्र्य म्हणत असतो. देशाचा, राज्याचा, कार्पोरेट क्षेत्राचा, सामाजिक क्षेत्राचा अर्थसंकल्प मांडण्याची व तर्‍हेतर्‍हेचे उपाय सुचवण्याची पात्रता असलेले लक्षावधी पगारी अर्थतज्ज्ञ या देशात मुबलक मिळून जातात. अर्थसंकल्पात तृटी दर्शविणारे व त्याचे लेखापरिक्षण करणे ऑडिटर सुद्धा लक्षावधी संख्येने मिळून जातात पण शेतीत गरिबी आहे कारण शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून निघेल एवढेही भाव मिळत नसल्याने शेतीचा अर्थसंकल्प तोट्यात जातो, असे ठासून सांगणारे अर्थतज्ज्ञ किंवा सी. ए मात्र दुर्मीळ असणे वरील कुटनितीचा परिणाम आणि पुरावा आहे.
             गणीताच्या भाषेत ०.५ च्या वरील सर्व किंमती १ च्या बरोबर तर ०.५ च्या आतील सर्व किंमती शुन्याच्या बरोबरीच्याच असतात. आज आपल्या देशात बहुतांश शेतमालाला एकूण उत्पादनखर्चाच्या निम्म्यापेक्षाही कमीच भाव दिले जातात. म्हणजे शून्य किंमतीत म्हणजेच फ़ुकटाच्या बरोबरीनेच शेतमाल हडपला जातो, हे गणीतीय सत्य सर्वांनीच स्विकारायला हवे. शेतीतील गरिबी संपवण्यासाठी शेतमालाचे उत्पादन खर्च भरून निघतील एवढे भाव मिळण्याखेरीज अन्य कुठलाही मार्गच अस्तित्वात नसल्याने शेतमाल स्वस्तात मिळाला पाहिजे, अशी मानसिकता आता ग्राहकांनीही बदलणे, काळाची गरज आहे.

– गंगाधर मुटे

(’जनशांती’नाशीक, दिवाळी अंकात प्रकाशित लेख)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रणाम युगात्म्या

प्रणाम युगात्म्या
            १९८० चे दशक उजाडेपर्यंत लढाऊ किसान किंवा लढवैय्या शेतकरी हे शब्दच निरर्थक होते. इतिहासात आपण कितीही मागे जाऊन बघितले तरी कोणत्याही कालखंडात भारतीय शेतकरी त्याच्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध कंबर कसून साक्षात महाकाली दुर्गेचा अवतार धारण करत होता, अशा काही पाऊलखुणा आढळत नाहीत. अगदी शेताच्या बांधावर राजसैन्याच्या घनघोर लढाया व्हायच्या तेव्हाही तो त्या लढायांकडे मुक बधिरतेने निर्विकार चेहरा करूनच बघत राहायचा. शेतकर्‍याला पक्के ठाऊक होते की, राजे असो, पेशवे असो, मोगल असो किंवा डाकू-लुटेरे असो, हे सारे विजयानंतर आपल्याकडे शेतसारा वसूल करायला किंवा धान्याची लूट करायलाच येणार आहेत. ह्या लढाया म्हणजे शेतसारा वसूल कोणी करायचा याचा रीतसर परवाना मिळवण्यासाठीच असतात. ज्याला आपले म्हणावे असे यांच्यापैकी आपले कोणीच नाहीत.

 

               कितीही अन्याय, अत्याचार झालेत तरी त्याविरुद्ध एक शेतकरी म्हणून निखळ शेतीच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शेतकरी पेटून उठला, त्याने राजसत्तेविरुद्ध बंड पुकारले असे उदाहरणच शेतीच्या इतिहासात सापडत नाही. त्याऐवजी दोन्ही हात जोडून अदबीने उभा राहणारा शेतकरी मात्र इतिहासाच्या प्रत्येक पानावर पाहायला मिळतो. साने गुरुजींनी शेतकर्‍यांना लढण्याची प्रेरणा देताना लिहिले,

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकर्‍यांच्या राज्यासाठी, लावू पणाला प्राण

              पण त्या कवितेची शेतकर्‍यांनी दखलच घेतली नाही. शेतकरी उठले नाहीत, रान पेटले नाही आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी कुणी प्राणही पणाला लावले नाहीत. तसे पाहिले तर शेतकर्‍यांचा इतिहासच तसा फार चांगला नाही. ज्यांनी ज्यांनी शेतकर्‍यांना लुटायचा प्रयत्न केला त्यांनी त्यांनी यश मिळवले. पण ज्यांनी शेतकर्‍यांच्या बाजूने लढायचा प्रयत्न केला त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढायला शेतकरी कधीच समोर आला नाही. कदाचित त्यामुळेच शेतकर्‍यांची बाजू घेऊन लढण्यापेक्षा शेतकर्‍यांना लुटून जगणार्‍या व्यवस्थेत सामील होऊन आपला निहित स्वार्थ साधून घेणे सगळ्यांना जास्त सोयीचे आणि परिणामकारक वाटले असावे, असा अंदाज बांधणे भाग पडत आहे.

 

                शेतकर्‍यांची कड घेऊन लढणारे शोधायला आपण इतिहासात कितीही मागे गेलो तरी सरते शेवटी बळीराजावर जाऊन थांबतो. खरे तर बळीराजा हा शेतकर्‍यांचा निखळ राजा नव्हताच. तो शोषित जनतेचा, सामान्य रयतेचा राजा होता. बळीराजाच्या राज्यात प्रजा सुखी होती. शेतकरी हाही त्याच प्रजेचा एक घटक असल्याने तोही सुखी होता. शेतकर्‍यांप्रती चांगला न्याय देणारा बळीराजा व्यतिरिक अन्य कोणी राजाच झाला नसल्याने बळीराजा हाच शेतकर्‍यांना आपला राजा वाटतो. आजही “इडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे” अशी शेतकर्‍यांच्या घराघरात प्रार्थना केली जाते. पण नुसतीच प्रार्थना केली जाते, मनोभावना व्यक्त केली जाते. बळीचे राज्य संपल्यानंतर पुन्हा बळीचे राज्य यावे यासाठी मात्र शेतकर्‍यांनी काही प्रयत्न केले होते, याचा मागमूसही इतिहासात सापडत नाही.     बळीराजानंतर शेतकर्‍याच्या कैवार्‍याचा शोध घेण्यासाठी गाडी पुढे काढली तर गाडी अधेमधे कुठेच थांबत नाही. गाडी थेट म. ज्योतिबा फुले यांच्यानावाजवळ येऊन थांबते. म. फुले हे शेतकर्‍यांचे दैवत. शेतकर्‍यांच्या बाजूने त्यांनीच व्यवस्थेवर पहिला आसूड उगारला. शेतीचे प्रश्न चव्हाट्यावर आणण्यासाठी अनेक हालअपेष्टा सोसून त्यांनी आयुष्य खर्ची घातले पण अत्यंत खेदजनक बाब ही की शेतकरी मात्र म. फ़ुलेंच्या बाजूने उभा राहिला नाही. म. फ़ुलेंच्या खांद्याला खांदा लावून त्यांना नैतिक बळही पुरवले नाही. ज्योतिबांना एकाकी झुंज द्यावी लागली. अगदी सावित्रीबाईच्या अंगावर घाण फेकण्यात आली तरीही शेतकरी सावित्रीबाईच्या बचावासाठी सरसावला नाही, बंड करून उठणे ही तर फारच दूरची गोष्ट झाली.

१९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात पाहिल्यांदाच एक चमत्कार पाहायला मिळाला. शरद जोशींच्या रूपात एक झंझावात आला. इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते पहिल्यांदाच घडले. लाखो शेतकरी शरद जोशींच्या खांद्याला खांदा लावून रणात उतरले. “कुत्र्याची शेपटी सरळ होईल पण शेतकरी संघटित होणार नाही” हा सार्वत्रिक समज तोंडघशी पाडत शेतकर्‍यांची संघटना स्थापन झाली. शेतीच्या प्रश्नावर कधीही शेकडोच्या संख्येत सुद्धा जमा न होणारा शेतकरी समाज लाखांच्या संख्येने गोळा व्हायला लागला. रस्ता रोको, रेलरोको, गावबंदी सारखे अस्त्र उगारून व्यवस्थेला सळो की पळो करून सोडू लागला. पुरुषच नव्हे तर महिलासुद्धा आंदोलनाचे नेतृत्व करायला पुढे सरसावल्या. चांदवडच्या अधिवेशनात ३ लक्ष शेतकरी महिलांची उपस्थिती, हा तर खरोखर चमत्कारच होता. त्यावेळी सर्वांच्या मनात एकच भावना होती,


सरकारच्या धोरणापायी छक्केपंजे आटले
बरं झालं देवा बाप्पा, शरद जोशी भेटले

              निखळ शेतीच्या प्रश्नावर ज्याच्या मागे शेतकरी समाज आपापल्या जाती-धर्माचे कडे झुगारून उभा राहिला की ज्यामुळे त्याला शेतकर्‍यांचा नेता म्हणावे, असा शेतकरी नेता एकच आणि तो म्हणजे शरद जोशी. आज शरद जोशी नसताना त्यांच्या पश्चात त्यांचा ८१ वा जन्मदिवस साजरा करण्याचा हा पहिलाच प्रसंग. आजवर या द्रष्ट्या शेतकरी नेत्याची पहिली जयंती उत्साहात साजरी करणार्‍यांना हा जन्मदिवस शोकविव्हळ वातावरणात साजरा करावा लागणार आहे. या वेळेस उत्साह आणि आनंदाऐवजी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूच तरळणार आहेत आणि शेतकरी कार्यकर्ते सांडुभाई शेख यांच्या कवितेच्या ओळीच प्रत्येकाच्या मुखातून बाहेर पडणार आहेत.

हे ब्रह्मा, विष्णू, पांडुरंगा, तुम्हाला काय कमी सांगा
अमुचे शरद जोशी काका, अम्हाला देऊनी टाका

          शरद जोशींवर जिवापाड प्रेम करणारे, त्यांच्या एका शब्दावर स्वत:चा प्राण धोक्यात घालून आंदोलनाचा झेंडा पुढे नेणारे लक्षावधी पाईक त्यांना मिळालेत हे जितके खरे तितकेच हेही खरे आहे की शेतीचे अर्थशास्त्र मांडताना आणि शेतकरी आंदोलनाला पुढे नेताना त्यांनी कुणाचाही मुलाहिजा ठेवला नाही, कुणाला काय वाटेल याची कधी पर्वा केली नाही त्यामुळे त्यांना शत्रूही लक्षावधीच्या संख्येतच मिळाले. भारत विरुद्ध इंडिया ही संकल्पना मांडताना इंडियाशी वैरत्व घेतले. सारेच पक्ष शेतकर्‍यांचे शत्रू आहेत, असे सांगत सार्‍या राजकीय पक्षांशी दोन हात केले. निवडणुकांतील उमेदवार म्हणजे दोन गाढवांची शर्यत आहे, आपल्याला सोयीचा गाढव निवडायचा आहे असे प्रचारसभेतील व्यासपीठावर उमेदवाराच्या तोंडावर सांगत आपली भूमिका रोखटोकपणे विशद केली. शासकीय कर्मचार्‍यांचे पगार कमी केल्याखेरीज देशाची अर्थव्यवस्था सुधारणे शक्य नाही, असे प्रतिपादन करून शासकीय कर्मचार्‍यांची नाराजी ओढवून घेतली. आपला विचार मांडताना त्यांनी कुठलीच तडजोड केली नाही. परिणामत: त्यांना मिळालेल्या छुप्या शत्रूंची संख्याही अफाट आहे. सत्तेचे लालसी व शेतकरी आंदोलनाचा शिडीसारखा वापर करून राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करू पाहणार्‍या शेतकरी कार्यकर्त्यांनाही त्यांनी आपल्या जवळपास फारसे फिरकू दिले नाही त्यामुळे अनेक कार्यकर्ते शेतकरी आंदोलनापासून दूर जाऊन राजकीय पक्षांशी घरोबा करते झाले.

 

            शेतीला मध्यवर्ती स्थानी ठेवून विचारांची गुंफणं करणारा हा द्रष्टा नेता आज शरीराने आपल्यात नसला तरी त्यांचे विचार अनादिकाळापर्यंत शेतकरी पाईकांना प्रकाशवाट दाखवून शेतकरी चळवळीचे नेतृत्व करत राहील यात शंका नाही. २० व २१ फेब्रुवारी २०१६ ला संपन्न झालेल्या नागपूर येथील दुसर्‍या अ.भा.मराठी शेतकरी संमेलनाने त्यांना युगात्मा ही मरणोत्तर लोकउपाधी प्रदान केली आणि त्यांच्या चरणी भावना अर्पण केली की,

एक युग कवेत घेतले म्हणून तू युगात्मा.
एक युग घडवले म्हणून तू युगात्मा.
स्वातंत्र्योत्तर भारतातील सगळ्यात मोठी
लोकचळवळ उभी केली म्हणून तू युगात्मा.
शेतीचा प्रश्न या मातीचा कळीचा मुद्दा होता
ती कळ तुला सापडली म्हणून तू युगात्मा.
तुझ्या शत्रूलाही तुझे श्रेय नाकारता आले नाही
नंतर नंतर तर सगळे पक्ष आणि संघटना
तुझीच भाषा बोलायला लागले म्हणून तू युगात्मा
ऊठ म्हणालास… उठले युग, चाल म्हणालास चालायला लागले
तुझी पाहून जादू मग ब्रह्मांडही हलायला लागले
युगायुगानंतर येतो असा युगावर मिळवणारा ताबा.
शरद जोशी तुला युगात्मा नाही म्हणायचं
तर काय म्हणायचं बाबा?

– गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६


अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६

     कोटी कोटी शेतकर्‍यांचे पंचप्राण,
शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक
युगात्मा शरद जोशी ८१ व्या जयंतीनिमित्त (३ सप्टेंबर २०१६)

 

सादर करीत आहोत…..
 विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६
विषय : शेती आणि शेतकरी 
(लेखन युगात्मा शरद जोशी यांच्या विचारधारेशी साधर्म्य राखणारे असावे)

 

या स्पर्धेचे चार प्रकार असतील : गद्यलेखन स्पर्धा-२०१६, पद्यलेखन स्पर्धा-२०१६, अनुभवकथन स्पर्धा-२०१६ आणि शेतीसाहित्य समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-२०१६
१] गद्यलेखन स्पर्धा-२०१६
विभाग : अ) ललितलेख   ब) कथा   क) वैचारिक लेख ड) मागोवा

२] पद्यलेखन स्पर्धा-२०१६

विभाग : अ) पद्यकविता   ब) छंदमुक्त कविता   क) गझल   ड) गेय रचना/गीत (पोवाडा इत्यादी)

३] अनुभवकथन स्पर्धा-२०१६ 

विभाग : अ) शेतकरी आंदोलनातील अनुभव   ब) शेतकरी चळवळीच्या वाटचालीतील अनुभव क) शेतीत राबताना आलेले चांगले/वाईट अनुभव   ड) शेतीच्या संदर्भात राजकीय पुढार्‍यांच्या विरोधाभासी भुमिकेचे आलेले अनुभव

४] शेतीसाहित्य समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-२०१६

(परिक्षणासाठी शेतीसाहित्याच्या पुस्तकाची व रसग्रहणासाठी कवितेची निवड स्पर्धकाने स्वत:च करायची आहे. पुस्तक/कविता युगात्मा शरद जोशी यांच्या विचारधारेशी साधर्म्य राखणारी असणे अनिवार्य आहे.)

विभाग : अ) ललित/गद्य/कथासंग्रहाचे समीक्षण   ब) काव्यसंग्रहाचे समीक्षण    क) कवितेचे रसग्रहण

प्रत्येक विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल

स्पर्धेचे स्वरूप थोडक्यात या प्रमाणे:

१) स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वतःचे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे.

२) पूर्वप्रकाशित लेखन देता येईल मात्र लेखन प्रताधिकारमुक्त असावे. प्रताधिकारासंबंधी संपूर्ण जबाबदारी लेखक/कवीची असेल. शक्यतो स्पर्धेसाठी अप्रकाशित व नवीन लेखन/कविता द्याव्यात.

३) एक स्पर्धक सर्व विभाग मिळून जास्तीतजास्त कितीही प्रवेशिका सादर करू शकेल. मात्र एका स्पर्धकाचा एकापेक्षा जास्त पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही. महत्तम गूण प्राप्त करणार्‍या रचनेची निवड केली जाईल.

पारितोषिकाचे स्वरूप :



प्रत्येक विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल. पारितोषिकाचे स्वरूप मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके या स्वरूपाचे असेल.

निकाल :

युगात्मा शरद जोशी यांच्या महापरिनिर्वान दिनी १२ डिसेंबर २०१६ रोजी अंतिम निकाल जाहीर केला जाईल, तो अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या http://www.baliraja.com या संकेतस्थळावर प्रकाशित केला जाईल.

 

पारितोषिक वितरण :

 

सन २०१७ मध्ये होणार्‍या तिसर्‍या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल. तेव्हा स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत पारितोषिक स्वीकारता येईल.

 

प्रवेशिका सादर करण्याची पद्धत :

 

१) स्पर्धा ०३ सप्टेंबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीसाठी प्रवेशिका सादर करण्यासाठी खुली राहील.
२) लेखन स्पर्धा खुली असण्याच्या काळात आपले लेखन प्रकाशित करावे लागेल.
लेखन करण्यासाठी http://www.baliraja.com/node/add/spardha-2016 हा धागा वापरावा.
३) लेखन सादर करण्यासाठी लेखकाला/कवीला बळीराजा डॉट कॉम चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. सभासदत्व विनामूल्य घेता येते.
४) स्पर्धकाची इच्छा असल्यास लेखन टोपण नावाने प्रकाशित करता येईल मात्र टोपण नाव धारक स्पर्धकाचे खरे नाव संपूर्ण परिचयासह  abmsss2015@gmail.com या मेलवर कळवणे बंधनकारक आहे.
५) स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे यासाठी, व्यक्तीगत संपूर्ण माहिती  abmsss2015@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवणे आवश्यक आहे. (ईमेलच्या विषयात : लेखनस्पर्धा- ललितलेख   ब) चरित्रलेख   क) वृत्तांतलेख  ड) अनुभवकथन/छंदमुक्त कविता/गझल असा उल्लेख असावा.) अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहीत धरले जाणार नाही. मेलमध्ये स्पर्धकाचे संपूर्ण नाव, संपर्क क्र, विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील पोस्टाचा पत्ता देणे बंधनकारक आहे. अन्यथा स्पर्धक बाद ठरेल, याची नोंद घ्यावी.
६) सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
७) स्पर्धेसाठी आंतरजाल हेच कार्यक्षेत्र असेल त्यामुळे जगभरातील कोणताही मराठी भाषिक या स्पर्धेत भाग घेऊ शकतो.
८) संयोजक मंडळ व परिक्षक मंडळ वगळता अन्य सर्वच (शेतकरी साहित्य चळवळीचे पदाधिकारी सुद्धा) या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
९) स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही, ती सर्वांसाठी खुली आहे.
१०) गद्यलेखनासाठी कमाल शब्दमर्यादा – २००० शब्द एवढी असेल.
११) गझलेतील एकूण शेरांच्या १/५ शेर विषयाशी निगडीत असेल तरी ती गझल पात्र समजली जाईल. गझल मुसलसल असणे अनिवार्य नाही.

 

नियम व शर्ती :

 

१) स्पर्धेकरता लिहिलेल्या साहित्यावर मूळ लेखकाचा संपूर्ण अधिकार राहील. मात्र अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या मुद्रित अथवा आंतरजालीय विशेषांकात सदर लेखन प्रकाशित करायचे झाल्यास तसा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
२) स्पर्धा सुरळित पार पडावी यासाठी स्पर्धानियमांमध्ये वेळोवेळी योग्य ते बदल करण्याचे अधिकार स्पर्धा-व्यवस्थापन आणि अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
३) स्पर्धकाला वयाचे बंधन असणार नाही.
४) एखाद्या विभागात कमी प्रवेशिका आल्या तरी त्यातूनच विजेता निवडला जाईल. उदा. एखाद्या विभागात केवळ ३ प्रवेशिका प्राप्त झाल्या तरी त्यांनाच पारितोषिक घोषित केले जाईल. प्रवेशिका कमी आल्याची किंवा सादर झालेल्या प्रवेशिका दर्जेदार नव्हत्या अशी किंवा या प्रकारची तत्सम सबब सांगितली जाणार नाही.
५) परीक्षक मंडळ १० सदस्यांचे असेल. सर्व परीक्षकांकडून आलेल्या गुणांच्या सरासरीनुसार अग्रक्रमाने विजेते निवडले जातील. स्पर्धेचा निकाल घोषित होईपर्यंत परिक्षकांची नावे गोपनिय ठेवण्यात येतील.
६) सदर स्पर्धेची जाहीरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या दरम्यान सदर माहिती मध्ये होणार्‍या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी स्पर्धा-व्यवस्थापक सहमत असतीलच असे नाही. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या http://www.baliraja.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.
७) एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
८) अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीकडे सध्या असलेले मनुष्यबळ लक्षात घेता अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखेआधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
९) निकालाबाबत अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीने नियुक्त केलेले संयोजक मंडळ व परीक्षक यांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ बांधील नाही याची कृपया नोंद घ्यावी.
१०) शेतीविषयाला केंद्रस्थानी ठेवून नवसाहित्याची जोमाने निर्मिती होण्यास नवचालना मिळावी, असा उद्देश या स्पर्धा आयोजनामागे असल्याने ही संपूर्ण स्पर्धा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य करावे, ही विनंती
                आपला स्नेहांकित
                    गंगाधर मुटे  
                संस्थापक अध्यक्ष
       अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
————————————————————————————–
अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/
किंवा
येथे भेट द्या,

अभिमानाने बोल : जय विदर्भ!

अभिमानाने बोल : जय विदर्भ!

या मातीचा सवंगडी तू
अभिमानाने बोल
ही धनश्री माझी, वनश्री माझी
अन वैदर्भीय भूगोल
तू अभिमानाने बोल
तू अभिमानाने बोल पाईका
वैदर्भीय भूगोल
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!

तूर, कपाशी, धान, हरबरा
ज्वारी, सोयाबीन
जांभूळ, केळी, पपई, संत्री
रास पिके अनगीन
सुजलाम सुफलाम
शस्य शामलाम
द्रुमफ़लही अनमोल
तू अभिमानाने बोल
तू अभिमानाने बोल पाईका
द्रुमफ़लही अनमोल
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!

बावनकशीचा साग इथे
कानन नृपती वाघ इथे
कोकीळ, पोपट, मोर, काजवे
दिव्यफ़णीचा नाग इथे
सप्तसुरांचे नाद बोलती
ताशा नगारा ढोल
तू अभिमानाने बोल
तू अभिमानाने बोल पाईका
ताशा नगारा ढोल
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!

निसर्गराणी, खनिज खाणी
भुईगर्भाला अविरत पाणी
नयन मनोहर अभय अरण्य
वन्य जीवांची मंजूळ वाणी
या मातीला, जनजीवनाला
मानवतेची ओल
तू अभिमानाने बोल
तू अभिमानाने बोल पाईका
मानवतेची ओल
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!

– गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मुरली खैरनार : एक जिंदादील व्यक्तिमत्त्व

मुरली खैरनार : एक जिंदादील व्यक्तिमत्त्व

“मुरली खैरनार गेलेत” असा प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे सरांकडून आलेला sms वाचताच माझ्याच मुखातून शब्द बाहेर पडले “हे राम!”
जीवन क्षणभंगुर असते आणि आयुष्याची दोरी ओढून घेण्याचा काळाचा अधिकार मान्य केला तरी काळाने एवढे निष्ठुर वागायला नको असे राहून राहून वाटत आहे. विश्वासच बसत नाही की मुरली खैरनार आपल्यात नाहीत आणि तशी नोंद लिहायला मेंदूसुद्धा तयारच होत नाही आहे. माझ्या व्यक्तीगत आयुष्यावर प्रभाव टाकणारी जी काही बोटावर मोजण्याइतकी नावे आहेत, त्यातील एक नाव म्हणजे जिंदादील व्यक्तिमत्त्व असलेले मुरली. माझ्या भाग्याने माझ्या दैनंदिनीत काही सोनेरी व कधीच न पुसली जाणारी पाने लिहून ठेवली त्यातला एक अध्याय म्हणजे मुरली खैरनारांचा मला लाभलेला सहवास.

            शेतकरी संघटनेचा विचार अधिक प्रभावीपणे बिगरशेतकरी आणि शहरी माणसांपर्यंत पोचला पाहिजे अशा व्यापक उद्देशाने १९८६-८७ च्या सुमारास नाशिक येथून ‘आठवड्याचा ग्यानबा’ हे साप्ताहिक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचे संपादकपद श्री मुरली खैरनारांकडे सोपवण्यात आले. त्यांच्या मदतीसाठी म्हणून त्यांनी माझी निवड केली आणि मला त्यांचे सहवासात सहकारी म्हणून काम करण्याचा योग जुळून आला. त्यांचे सोबत काही दिवस नाशिकला घालवता आले आणि मोटरसायकलवरून राज्याच्या काही निवडक भागाचा दौराही करता आला. ‘आठवड्याचा ग्यानबा’ची सुरुवात तर चांगली झाली, त्यांनी त्यासाठी कठोर परिश्रमही घेतले परंतू शेतकरी संघटनेमधील तत्कालीन नेत्यांच्या दुसर्‍याफ़ळीतील काही कार्यकर्त्याकडूनच त्यांना प्रचंड त्रास देण्यात आला. त्रासाचे रूपांतर वादात झाले आणि साप्ताहिक बाळशे धरायच्या आतच म्हणजे आठनऊ महिन्यातच बंद पडले आणि ‘आठवड्याचा ग्यानबा’चा मध्यांतर व्हायच्या आधीच पडदा पाडण्यात आला.

शेतकरी संघटनेवर आणि मा. शरद जोशींच्या विचारावर अपार श्रद्धा असलेले मुरली विनोदी होते, मिश्किल होते, हजरजबाबी होते आणि गंभीरही होते. उच्च दर्जाचे पत्रकार, उत्तम वक्ता आणि नाटयकलावंत, दिग्दर्शकही होते. मनमिळाऊ होते पण सहकार्‍यांकडून कार्यक्षमतेने काम करवून घेण्याची विशेष खुबी त्यांच्यामध्ये होती. ते कुशल संघटकही होते. स्वत:च हजरजबाबी असल्याने ते मिश्किलपणे इतरांवर शाब्दिक कोटी करायचे तर कधी कधी सहकार्‍यांची फिरकी घ्यायचे. स्वत:ची फिरकी घ्यायची संधी ते दुसर्‍याला कधीच मिळू देत नसत. त्यांच्यापेक्षा मी वयाने बराच लहान असूनही त्यांनी मला कायमच बरोबरीच्या मित्राइतका दर्जा दिला त्यावरून त्यांच्या विनयशीलतेचाही अंदाज येतो. कायम बोलत राहणे, नवनव्या छोट्यामोठ्या कथा, विनोदी चुटकूले रचून ऐकवत राहणे हा त्यांच्या स्वभावातला स्थायीभाव होता.

तेव्हा नाशिकच्या शरणपूर रोडवर कार्यालय होते. रात्री नऊ वाजेपर्यंत काम करायचे व नंतर जेवायला जायचे असा आमचा नित्यक्रम होता. आमच्या चमूमध्ये मिलिंद मुरुगकर, स्व. जीवन टिळक, धर्मेंद्र चव्हाण, वसंत विसपूते होते. नऊ वाजले की सर्व आपापल्या घरी जेवायला जायचे व मी भोजनालयात जायचो. एक दिवस मोठा मजेदार प्रसंग घडला. त्यांची फिरकी घ्यायची नामी संधी मला साधून आली आणि मी त्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला. त्यांची पत्नी सौ. मृणालिनी यांची एल.एल.बी ची परीक्षा सुरू असल्याने त्या सायंकाळी लवकरच आपला स्वयंपाक उरकून घ्यायच्या आणि अभ्यासाला लागायच्या. त्या दिवशी मुरलींना बहुतेक फारच कमी भूक असावी म्हणून त्यांनी विचार केला असेल की यालाही जर भूक कमी असेल तर एकाच्या डब्यात दोघांचे जेवण सहज होऊ शकते. याचा भोजनालयात जाऊन जेवणाचा खर्चही वाचेल. म्हणून त्यांनी मला सहजपणे विचारले.

“तुला आज किती भूक आहे?”
मला प्रश्नाचा रोखच कळला नाही म्हणून मी सुद्धा ठोकून दिले.
“आज मला भूकच नाहीये. फार तर एखादी पोळी. एखादी पोळी खूप झाले.”
त्यावर ते लगेच मला म्हणाले.
“अच्छा! मग चल माझ्यासोबत घरी जेवायला”

            आता मला “एक पोळी” मागच्या रहस्याचा उलगडा झाला होता आणि पंचाईतही झाली होती कारण मला भूक होती आणि नेहमी इतकेच जेवायला लागणार होते. इतक्यात माझ्यातला ’फिरकी’पटू जागा झाला आणि ठरवले की आज अनायासे संधी आलीच आहे तर मुरलीची मस्तपैकी फिरकी घ्यायची.

घरी पोचलो तेव्हा मृणालिनीताई अभ्यासात गर्क होत्या पण माझा आवाज ऐकताच बाहेर आल्या आणि मला स्मित करून लगेच स्वयंपाकगृहात गेल्या. मृणालिनीताई म्हणजे त्यावेळच्या शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या धडाडीच्या नेत्या. त्यामुळे त्यांची माझी ओळख मुरलींच्याही आधीची. घरी पाहुणा जेवायला आला म्हटल्यावर त्यांनी लगेच वाढीव स्वयंपाक केला आणि झाली जेवणाला सुरुवात. आज मस्तपैकी नाटक वठवायचे आणि फिरकी घेऊन मुरलींची जेवढी करता येईल तेवढी फजिती करायची असा ठाम निश्चय करून  अत्यंत गंभीर मुद्रेने जेवायला बसलो.  पहिली पोळी संपताच मी म्हणालो,

“झाले माझे जेवण”
“अरेव्वा! एका पोळीत जेवण आटोपले? असं काय करताहात?” असे म्हणत मृणालताईंनी दुसरी पोळी ताटात घातली. मी दुसरी पोळी खायला सुरुवात केली आणि म्हणालो,
“त्याचं असं आहे की, माझं आणि मुरलीचं एक अ‍ॅग्रीमेंट झालंय. एकच पोळी खाण्याच्या करारावरच त्यांनी मला जेवायला बोलावले आहे”
ऐकताच मृणालताई जाम भडकल्या मुरलीवर. मुरली समजावण्याच्या स्वरात मृणालताईंना खूप समजावीत होते,
“अगं हा वात्रट आहे, तुला माहीत आहे ना? हा वात्रटपणा करतो आहे. माझ्या म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता”

            पोळी संपली की नवीन पोळी घेताना मी दरवेळेस संपूर्ण ताकदीनिशी नको म्हणत होतो, मात्र ताटावर आडवा हात घालण्याऐवजी ताटाबाहेर हात आडवा करून मस्त नाटक वठवत होतो, त्यामुळे पोळी अलगदपणे ताटात पडत होती आणि पोळी ताटात पडली की मी अधाश्यासारखा पोळीवर तुटून पडत होतो आणि निरागसपणाची भावमुद्रा करून हळूच पुटपुटत होतो.

“जेवणात कुठे आलाय वात्रटपणा? तुला किती भूक आहे, असे कधी कुणाला विचारले जात असते काय? आमच्या विदर्भात नाही बुवा अशी पद्धत!”

            पाहुण्याला फार भूक लागली आहे मात्र मुरलीमुळे अर्धापोटीच पाहुणा जेवण संपवणार होता हे मृणालताई सारख्या अन्नपूर्णेला आणखी बेचैन करत होते आणि तो त्यांचा राग पुन्हापुन्हा मुरलीवर गारपिठीसारखा बरसत होता. त्या दिवशी मी चारपाच नव्हे तर चक्क दहाबारा तरी पोळ्या नक्कीच खाल्ल्या असतील.
            घराबाहेर पडताना मुरली आपली खरडपट्टी नक्कीच काढणार असा माझा कयास होता पण तसे काहीच झाले नाही. बाहेर पडल्यावर मुरलींनी माझ्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले की, तू तर पट्टीचा अभिनेता निघालास. आगामी नाटकात तुझ्यासाठी एखादी खास वात्रटाची भूमिका तयार करावी की काय, नक्कीच विचार करतो. मी उसने आव आणून हसायचा प्रयत्न  केला पण हसू मात्र फुटलेच नव्हते.

१९८७ च्या सुमारास ‘आठवड्याचा ग्यानबा’ बंद पडले आणि मुरलींशी संपर्क जवळजवळ तुटलाच आणि कधी पत्रव्यवहार तर कधी फोनवर बोलणे इतक्यापुरताच मर्यादित झाला.

            सात-आठ वर्षापूर्वीची गोष्ट. सकाळी नऊच्या सुमारास एक व्यक्ती माझ्या घरी आली. मी टेबलवर्क करत होतो. बसल्याबसल्याच मी नमस्कार केला. मी तसा राजकारणात आणि समाजकारणात असल्याने अनोळखी माणसे घरी येणे नित्याचेच आहे. मनुष्य अनोळखी असला तरी मी त्याच्याविषयी फारश्या ओळखीपाळखीच्या किंवा औपचारिक/अनौपचारिक चौकश्या करत बसत नाही. थेट मुद्द्याचेच बोलायला सुरुवात करत असतो. नित्याच्याच खाक्याप्रमाणे मी म्हणालो.

“बोला, कसं काय येणं केलंय? काय काम काढलंत?”
“तू मला आता ओळखणार नाहीस, आपण भेटून २० वर्षे…….”
आणि मी जागेवरच उडालो. डोळे विस्फारून आश्चर्यतिरेकाने किंचाळलोच
“मुरलीभौ ????”

            मला आश्चर्यतिरेकाचा बहुधा अटॅकच आला असावा. मुरलीसारखा ८०० किलोमीटरवरचा मनुष्य कुठलीही पूर्वसूचना न देताच खेड्यातील थेट माझ्या घरीच पोचू शकतो, याचा डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता.
आमची उरभेट ५-६ मिनिटे तरी चालली असावी. काहीकेल्या मिठी सैल होतच नव्हती आणि डोळ्यातून ओघळणारे आनंदाश्रूही थांबायचे नाव घेत नव्हते.
“मुळीच अवघड नाही” ही लर्नालॉजीची कार्यशाळा घेण्यासाठी ते जिल्ह्यात आले होते. ते आम्ही दोन दिवस मजेत घालवले आणि……..
तीच आमची शेवटची भेट…!
            फेब्रुवारी २०१५ मध्ये संपन्न झालेल्या वर्ध्याच्या पहिल्या अ.भा.मराठी शेतकरी संमेलनातील परिसंवादात भाग घेण्यासाठी मी त्यांना आवर्जून बोलावले होते, त्यांनी आनंदाने स्वीकृतीही दिली होती पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते ऐनवेळेवर येऊ शकले नव्हते.
            त्यांनी लिहिलेली आणि याच वर्षी जुलै महिन्यात प्रकाशित झालेली शोध ही रहस्य कादंबरी खूप गाजली आणि वाचकप्रिय ठरली. एक महिन्यातच दुसरी आवृत्ती काढावी लागली, एवढे यश त्यांच्या लेखणीने मिळवले. त्यांनी चार व्यावसायिक नाटकांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. १८ माहितीपटांची निर्मिती केली. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा धनी असलेल्या मुरलीधर खैरनार यांचे दिनांक ६ डिसेंबर २०१५ ला दिर्घआजाराने निधन झाले.

आज मला पुन्हा माझ्याच काही ओळींची परत आठवण झाली.

काही संदेश नसतातच….. वाचण्यासारखे
काळजात जाऊन रुततात…. टाचण्यासारखे
सांत्वनाही जिथे ओशाळल्यागत होते….
सारेच घाव नसतात जेव्हा…. सोसण्यासारखे
काही जाऊन रुततात, आत खोलवर….
सारेच व्रण कुठे असतात…. दिसण्यासारखे?.
डोळे बधिर अन अश्रू मुके व्हायला लागतात…..
सारेच नसते शब्दात….. सांगण्यासारखे

टाळायचे म्हटले तरी काही टळत नाही……
घडते तेच नियतीला मंजूर…. असण्यासारखे
निश्चयाने झेलत जावा येणारा प्रत्येक क्षण…..
आणखी असतेच काय ‘अभय’ ….. असण्यासारखे?

भगवंत देवो तुम्हांस सुख आणि शांती
हेच शब्द माझे प्रार्थनेसारखे…….!

देव त्यांच्या आत्म्यास सुख आणि शांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हा आघात सोसण्याचे बळ देवो, एवढीच प्रभुचरणी प्रार्थना करतो.

– गंगाधर मुटे
                                                                                                   ranmewa@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा…!

“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा…!

शेतमालाचे भाव वाढले की
आमचा जळफळाट होतो…कारण
आमच्या मनात दडी मारून
बसला आहे एक रावण

आमच्या मनातल्या रावणाला
सीता पळवून न्यायची असते
भूमीतून निपजलेल्या वस्तूंची
किंमत मोजायचीच नसते

आमची मानसिकता रावणीच
संधी मिळताच जागी होणारी
पोशिंद्याला सदैव अशोकवनात
बंदिस्त ठेवू पाहणारी

कधी मरेल हा रावण
तुमच्या-आमच्या मनातला?
आणि कधी होईल मुक्त
बळीराजा रानातला?

रावणी मनोवृत्तीचे दहन व्हावे
अशी बाळगू ‘अभय’ इच्छा
नंतरच देऊ एकमेकांना
“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा…!

                        – गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

“शेतीतज्ज्ञां”नो, थोडीतरी लाज बाळगा!

“शेतीतज्ज्ञां”नो, थोडीतरी लाज बाळगा!

शेतकरी नेते मा. शरद जोशींचा उदय होण्यापूर्वी म्हणजे १९८० पूर्वी शेतकर्‍यांची संघटनाच अस्तित्वात नव्हती. “कुत्र्याची शेपटी सरळ होईल पण शेतकर्‍यांची संघटना होणार नाही” असे त्या काळी म्हटले जायचे. पण शरद जोशी नावाच्या एका ज्ञानेश्वराने शेतकर्‍यांच्या पाठीवर हात ठेवला आणि चमत्कार झाला. हजारो वर्षापासूनचा मुका असलेला शेतकरी समाज ज्ञानेश्वराच्या रेड्याप्रमाणे बोलायला लागला. नुसताच बोलायला लागला नाही तर साध्या पोलिसाला भिणारा शेतकरी चक्क मूठ आवळून रस्त्यावर उतरला. सरकारशी दोन हात करायला सज्ज झाला. शेतकरी संघटनेने शेतकर्‍याला त्याच्या गरिबीचे आणि दारिद्र्याचे मूळ कारण सांगितले. शेतीत गरिबी आहे याचे कारण शेतीतला माल स्वस्तात स्वस्त भावाने लुटून नेला जातो, हेही शिकविले.

जोपर्यंत शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळत नाही तोपर्यंत शेती व्यवसायाला बरकत येऊच शकत नाही. मग तुम्ही निसर्ग शेती करा, सेंद्रिय शेती करा,  कमी खर्चाची शेती करा, जास्त खर्चाची शेती करा, पारंपरिक शेती करा किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करा. शेती कशीही करा; जोपर्यंत शासनाचे शेतकरीविरोधी धोरण बदलत नाही तो पर्यंत शेतकर्‍याचे मरण अटळ आहे. कोरडवाहू शेती केली तर बिनपाण्याने हजामत होते आणि ओलिताची शेती केली तर पाणी लावून हजामत होते, या पलीकडे फारसा काहीही फरक पडत नाही.

शेतीमालाचा उत्पादन खर्च भरून निघेल एवढे भाव मिळायला पाहिजे, हे सर्वांनाच मान्य आहे. तसे कोणीच नाकारतही नाही पण; कृती मात्र हमखास उलटी करतात. कुणी अज्ञानापोटी करतो तर कुणी जाणूनबुजून करतो. कुणी स्वत:ला शेतीतज्ज्ञ म्हणवून घेत असले तरी शेतीच्या अर्थशास्त्राच्या बाबतीत बहुतांशी तज्ज्ञ निव्वळ अज्ञानीच असतात, असे थेट विधान केले तरी ते फारसे चुकीचे ठरणार नाही.

शिवाय या स्वनामधन्य शेतीतज्ज्ञामध्ये आपसात एकजिनसीपणा नाही. प्रत्येकाचे तोंड वेगळ्या दिशेला आहे. उठसूठ ज्याला जसे वाटते तसे सांगत सुटतो. कुणालाच खोलवर जाऊन विषयाचा पडताळा घ्यावासा वाटत नाही.  कुणी म्हणतो निसर्गशेती करा, कुणी म्हणतो झिरो बजेट शेती करा, कुणी म्हणतो मार्केटिंग करायला शिका तर कुणी म्हणतो प्रक्रिया उद्योग उभारा. आता तर काही लोकं मानवी मूत्र वापरायचा सल्ला द्यायला लागलेत. ज्याला जसे वाटते तसेतसे बोलत राहतात. बोलायला माझी हरकत नाही. तोंड त्यांचे आहे व जीभही त्यांचीच आहे पण शेतमालाचे भाव म्हटलं तर यांची दातखिळी का बसते? हा प्रश्न शिल्लक राहतोच आणि इथेच खरी ग्यानबाची मेख आहे.

निसर्गशेती म्हणजे काय? आमचे बाप-आजे निसर्गशेतीच तर करत होते. रासायनिक खते वापरत नव्हते, कीटकनाशके फवारत नव्हते, संकरित बियाणे लावत नव्हते आणि घरी संडास नसल्याने संडासला शेतातच जात होते आणि तरीही देशाची लोकसंख्या कमी असूनही जनतेला जाऊ द्या; त्या शेतकर्‍यालाच पोटभर खायला अन्न मिळत नव्हते. धान्याच्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या, ओलिताची व्यवस्था निर्माण झाली, फ़वारणीसाठी किडीनुरूप कीटकनाशके निर्माण झाली आणि चमत्कार झाला. अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण झाला. अन्नधान्याचे उत्पादन वाढण्यामागे रासायनिक खतांनी मोलाची भूमिका बजावली. आजही जर रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर थांबवला तर देशाचे शेतीतील उत्पादन ७० ते ८० टक्क्यांनी घटेल, अशी परिस्थिती आहे.  निसर्गशेतीचा सल्ला देणार्‍यांनो, मुंह खोलनेसे पहले कुछ तो शर्म करो!

झिरो बजेटशेती हा शब्द ऐकला की मला ओकार्‍या व्हायला लागतात. झिरो बजेट शेती हा शब्द मला काही केल्या पचवून घेताच आला नाही. शून्य खर्चाची शेती करायची म्हणजे नेमके काय करायचे? शेतीला बियाणे लागले ते चोरून आणायचे का? गोड गोड बोलून खतं उधारीत आणायची मग त्याचे पैसे बुडवायचे का? खर्च शून्य करायचा म्हटलं तर शेतकर्‍यांनी वस्त्र परिधान करणे सोडून झाडाच्या वल्कली अंगाभवती गुंडाळाव्यात का? मजुरांकडून फुकटात काम करून घ्यायचे म्हटले तर मग या देशात वेठबिगारी व गुलामगिरीची पद्धत नव्याने सुरुवात करायची का? कसली आली बोडक्याची शून्य खर्चाची शेती?

अनेकदा शेतकर्‍यांनी मार्केटिंग करायला शिकावे, असा सल्ला घाऊकपणे दिला जातो. आता या उपटसुंभांना कोणी सांगावे की, कोणत्याही व्यवसायाचे उत्पादन आणि विपणन हे दोन स्वतंत्र भाग असतात. शेतीमध्ये सुद्धा जो शेती कसून उत्पादन करतो तोच शेतकरी असतो. शेती उत्पादन हा पूर्णपणे पूर्णवेळ करायचा व्यवसाय आहे. शेती करताना वेळेची इतकी बचत होत नाही की त्याने जोडीला मार्केटिंगसदृश अन्य व्यवसाय करावा. आजवर अनेकांनी असे चिक्कार प्रयोग केले आहे पण “तेलही गेले, तूपही गेले; हाती धुपाटणे आले” अशीच त्यांची गत झाली, असे इतिहासच सांगतो. याउलट जो शेती सोडून केवळ मार्केटिंगमध्ये गेला त्याने चांगल्यापैकी बस्तान बसवले, असेही इतिहासच सांगतो. जो शेतकरी नोकरी, पुढारीपणा किंवा व्यापार करायला लागतो तो अल्पावधीतच नोकरदार, पुढारी किंवा व्यापारी होतो; शेतकरी म्हणून त्याचे अस्तित्व संपुष्टात येते. सातबारा नावाने असला तर त्याला शेतमालक म्हणता येईल, शेतकरी म्हणता येत नाही. अर्थात शेतकरी फक्त तोच जो शेती कसून उत्पादनाचा विभाग हाताळतो. एका वाक्यात असेही म्हणता येईल की “ज्याची उपजीविका फक्त आणि फक्त शेती उत्पादनावर अवलंबून असते, तोच खराखुरा शेतकरी” भलेही मग सातबारा त्याच्या नावाने असो किंवा नसो. तो भूधारक असो किंवा भूमिहीन असो! आपण जेव्हा शेतकरी असा शब्द वापरतो तेव्हा शेती कसून उत्पादन करणार्‍याविषयी बोलत असतो; व्यापारी, उद्योजक, दलाल यांच्या विषयी बोलत नसतो. शेती कसणे सोडून सार्‍यांनीच व्यापार सुरू करणे अशी कल्पनाच करणे शक्य नाही. इतके साधे गृहितक आमच्या शेतीतज्ज्ञांना कळत नाही, ही अद्भूतआश्चर्याच्या तोडीची बाब आहे.

तरीही शेतकामातून अतिरिक्त वेळ मिळाला तर किरकोळ मार्केटिंग करणे, शेतकर्‍याला वावगे नाही. अनादिकाळापासून शेतकरी शक्य होईल तसे किरकोळ मार्केटिंग करतच आला आहे. पूर्वी दहा-वीस गावाच्या परिघात एका मुख्य गावी गुजरी भरायची. आठवडी बाजार भरायचा. तिथे शेतकरी आपला शेतमाल स्वत: दुकान मांडून विकायचे. ही शेतमालाची मार्केटिंगच होती ना? आपल्या जवळचा शेतमाल विकून येणार्‍या पैशात अन्य गरजेच्या वस्तू खरेदी करणे, शेतकर्‍यांच्या अंगवळणीच पडले आहे. अगदी पौराणिक काळातला जरी विचार केला तरी गौळणी मथुरेच्या बाजारी दही-दूध-लोणी विकायला घेऊन जायच्याच ना? कुठे मध्यस्थ होता? कुठे दलाल होता? मग मार्केटिंग म्हणजे यापेक्षा वेगळं काय असते? आणि तरीही बरेचशे उपटसुंभ तज्ज्ञ शेतकर्‍यांना जणू काही फार मोलाचा आणि क्रांतीकारी मूलमंत्र सांगतो आहोत, अशा थाटामाटात मार्केटिंगसारखा बोजड शब्द वापरून शेतकर्‍याला सल्ले द्यायला उतावीळ असतात.

पूर्वी गावागावात बाराबलुतेदारांचे व्यवसाय चालायचे, गावागावात तेलघाण्या होत्या. गुळाची गुर्‍हाळं होती, हातमाग होते, कवेलू बनविण्याच्या भट्ट्या होत्या, कुंभारांचा कुंभारवाडा होता. तेलबियांपासून तेल, तूर-चण्यापासून डाळ, धानापासून तांदूळ, ज्वारी-बाजरी-गव्हापासून पीठ गावातच तयार होत होते. ही तेव्हाची शेतमाल प्रक्रियाच होती ना? आता शासकीय धोरणांच्या कृपेने गावात पिठाची चक्की हा एकमेव कुटीरोद्योग उरला आहे. बाकी सारंच शहरात-महानगरात पळालं आहे. हा बदल आपोआप घडलेला नाही. याला शासनाची इंडियाला पूरक आणि भारताला मारक शेतकरीविरोधी धोरणेच जबाबदार आहेत.  इस्रायली शेती, शेतकरी व त्यांचं तंत्रज्ञान या विषयी बोलणारे चिक्कार आहेत. रस्त्याने चालायला लागलं की जागोजागी ठेचा लागतात इतके मार्गदर्शक गल्लोगल्ली झाले आहेत पण; इस्रायली सरकारच्या शेतीविषयक धोरणाविषयी कुणीच “माईचा लाल” बोलायला तयार नाही. शेतीविषयात भरारी घेण्यात इस्रायली सरकारच्या शेतीविषयक धोरणांचा सिंहाचा वाटा आहे. तिथले शेतीधोरण शेतीला पूरक आहेत भारतासारखे मारक नाहीत, हे मात्र जाणीवपूर्वक मांजरीच्या शेणासारखे या तज्ज्ञाकरवी झाकून ठेवले जाते.

स्वातंत्र्योत्तर काळात शहरातील औद्योगिकीकरण वाढवण्यासाठी शेतमाल स्वस्तात लुटून नेणारी धोरणे राबविली गेली त्यामुळे गावात बचत निर्माण होणे थांबले आणि खेडी भकास होत गेली. शेतमाल स्वस्तात मिळाल्याने आणि पक्का माल महाग विकण्याची मुभा मिळाल्याने शहरात-महानगरात बचत निर्माण झाली. बचत निर्माण झाली म्हणून शहरात कारखानदारी वाढली आणि शहरे फुगत गेली. जेथे बचत निर्माण होत नाही तेथे प्रक्रिया उद्योग उभे राहू शकत नाही. गाव ओसाड झाले आणि गावात प्रक्रियाउद्योग निर्माण होत नाही याचे कारण येथे दडले आहे. आमचे शेतकी तज्ज्ञ वैचारिक पातळीवर खुजे असल्याने त्यांना हे कळत नाही. त्यामुळे ते शेतकर्‍यांना दोष देत फ़िरत असतात. शासकीय योजनांचा लाभ शेतकर्‍यांना घेता येत नाही असा “वड्याचे तेल वांग्यावर काढणारा” राग आळवत बसतात. धोरणे आखताना चक्क शेतकरी विरोधी आखायची आणि वरून पुन्हा शेतकर्‍यांनी प्रक्रिया उद्योग उभारले पाहिजेत असे सल्ले देत फिरायचे हा चक्क वाह्यातपणा आहे.

मी निसर्गशेती, कमी खर्चाची शेती, पारंपरिक शेती, सेंद्रीयशेती वगैरे कोणत्याही शेतीपद्धतीच्या विरोधात अजिबात नाही, याउलट शेतकर्‍यांसमोर शेती पद्धतीचे अनेक पर्याय उपलब्ध असले पाहिजे, या मताचा आहे. शेतकर्‍याला जे सोयीचे वाटेल, त्याच्या खिशाला परवडणारे असेल तसे तो स्वीकारेल. हा त्याच्या व्यवसाय स्वातंत्र्याचा भाग म्हणून मान्य केले पाहिजे. पण होते असे काही मंडळी स्वत:ला ब्रम्हदेवाचा अवतार समजून किंवा ऋषी-महाऋषी भासवून आम्ही सांगतो तसे केले तर तुझ्या शेतीत करोडो रुपयाचे उत्पन्न येईल आणि तू मालामाल होशील, अशी बतावणी करून फीच्या माध्यमातून पुन्हा शेतकर्‍यांची लूटच करून जातात. शेतकरी देशोधडीला लागतो आणि यांची दुकानदारी मात्र “दिवसा दुप्पट आणि रात्रीची तिप्पट” या वेगाने बहरत जाते. त्यालाही माझा आक्षेप नाही मात्र शेतमाल लुटीच्या व्यवस्थेबद्दल ही मंडळी तोंडामध्ये चक्क बोळे कोंबून असतात, यावर माझा आक्षेप आहे.

पगारी शेतीतज्ज्ञांचे तर बरे असते. काही वर्ष रासायनिक खतांचा वापर करा म्हणून सांगत सुटतात, त्याचाही ते पगार घेतात. मग रासायनिक खतांचा वापर टाळा म्हणून सांगत सुटतात. त्याचाही पगार घेतात. यातच त्यांच्या नोकरीचे आयुष्य निघून जाते. पण पुन्हा मरेपर्यंत पेन्शन आहेच. कर्तृत्व काय तर एकदा ’करा’ म्हणून सांगीतले आणि एकदा ’टाळा’ म्हणून सांगितले. मला असे वाटते की शेतकर्‍यांना आता सल्ले वगैरे देण्याची अजिबात गरज उरलेली नाही. शेतमालाच्या भावाचा मुद्दा बाजूला ठेवून अन्य उपचार करण्याची तर अजिबातच आवश्यकता नाही. जर तुम्हाला शेतीच्या भल्यासाठी प्रयत्न करतो आहोत, असा आव आणायचा असेल तर निदान शेतमालाच्या भावाचा प्रश्न निकाली निघेपर्यंततरी सर्वांनी मिळून आपले लक्ष्य शेतमालाच्या भावाच्या प्रश्नावरच केंद्रित केले पाहिजे.

मी एक उदाहरण सांगतो. ४  वर्षापूर्वी माझा एक जवळचा नातेवाईक आजारी पडला होता. आजार तसा साधा होता. पण त्याला सतत ताप यायचा. ताप आला की १०५ डिग्री सेल्सियसच्याही पुढे जायचा. ताप चढला की पॅरसिटॉमालसहित कुठल्याही औषधाने उतरतच नव्हता. फक्त गार पाण्याच्या कापडीबोळ्याने अंग पुसून काढले की ताप उतरायचा पण तोही तात्पुरताच. काही मिनिटातच पुन्हा चढायचा. सर्व उपचार केलेत पण यश येत नव्हते. १५ दिवस लोटले पण काहीच सुधारणा होत नव्हती. हिंगणघाटचे डॉक्टर झाले, वर्ध्याचे शासकीय रुग्णालय झाले, सेवाग्राम इस्पितळात उपचार करून झाले पण ताप उतरायचे नावच घेईना उलट आजार आणखी गंभीर होत गेला. शेवटी पेशंट घेऊन आम्ही नागपूरला एक्स्पर्ट डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने तपासल्यानंतर आजवर केलेल्या औषधोपराची माहिती घेतली आणि म्हणाले की जितका औषधोपचार करायला तेवढा करून झाला आहे. आता मी आणखी कुठले औषध देऊ? काहीही द्यायचं बाकी राहिलेलं नाही. हे ऐकून आम्ही अक्षरश: हादरलोच. मग थोडा विचार करून डॉक्टर म्हणाले की आता एकच मार्ग शिल्लक आहे. आम्ही म्हणालो, काय खर्च येईल तो येऊ द्या साहेब चिंता करू नका पण उपचार कराच. त्यावर डॉक्टर म्हणाले की आता एकच मार्ग शिल्लक आहे आणि तो म्हणजे “उपचारच न करणे.” पुढील ७२ तास रुग्णाला अजिबात औषधच द्यायचे नाही. मला खात्री आहे की पेशंटवर तोच एकमेव उपचार आहे. आम्ही होकार दिला. औषधोपचार बंद केल्याने कदाचित जर काही अघटित घडले तरी आम्ही डॉक्टरला दोष देणार नाही, असेही लेखी स्वरूपात लिहून दिले.

रुग्णाला औषध देणे बंद केले आणि पाच-सहा तासातच ताप उतरायला लागला. १५ दिवसापासून न उतरलेला ताप सातव्या तासाला ताप पूर्णपणे उतरला. पुन्हा फिरून ताप आलाच नाही. रुग्ण पूर्णपणे बरा झाला तो सुद्धा औषधी देणे थांबवल्याने. शेतीचेही तर असेच होत नाही ना? गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. शेती नावाचा पेशंट एकच आहे आणि त्यावर औषधोपचार करणारे तज्ज्ञ आहेत लक्षावधी. संपूर्ण भारतवर्षात शेतीचे मुख्य दुखणे एकच आहे आणि तेही सार्वत्रिक समान आहे मात्र सुचविण्यात येणारे इलाज नाना तर्‍हेचे आहेत. जो येतो तो शेतकर्‍याला वाटेल तसा डोज पाजूनच जातो. शेतीची मुख्य बिमारी एकच; शेतमालास योग्य भाव न मिळणे. पण इलाज मात्र भलतेच चालले. कदाचित नको त्या उपचारानेच तर शेती व्यवसाय आणखी दुर्दशेकडे ढकलला जात नाही ना? याचाही प्रामुख्याने विचार करायची वेळ आली आहे.

शेतकरी हा मुळातच उत्पादक आहे. उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करणे त्याच्या रक्तामांसातच भिनले आहे. सोबत पिढोनपिढ्यांकडून चालत आलेला वारसा आहे आणि बालपणापासूनच शेती कशी करायची याचा त्याला अनुभव आहे. तरीही त्याला पावलोपावली सल्ले देण्याची आवश्यकता आहे का, हेही तपासणे आवश्यक आहे. बीटी आली तेव्हा संशोधकांचे म्हणणे असे होते की, देशभरात बीटी वाण लागवडीखाली यायला वीस-पंचेविस वर्षे लागतील. प्रत्यक्षात दोन ते तीन वर्षातच देशभर बीटीवाणाचा प्रसार झाला. त्यासाठी शासकीय पातळीवरून काहीच प्रयत्न करायची गरज पडली नाही. चांगलं असेल ते ते अंगिकारण्याची क्षमता शेतकर्‍यांना निसर्गानेच दिलेली आहे.

उत्पादन कसे घ्यावे, हे शेतकर्‍यांना सांगायची गरजच नाही. फक्त शेतमालाचे भाव ठरवणे त्याच्या हातात नाही म्हणून शेती तोट्यात जात आहे. शेतीत सुबत्ता येऊन बचत निर्माण करायची असेल तर सर्व शेतकरी हितचिंतकांनी “शेतमालास उत्पादन खर्चावर रास्त भाव” मिळण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत वारंवार शासकीय पातळीवरून जो अडथळा निर्माण करण्यात येतो त्याला थोपवून धरणे गरजेचे आहे. शेतीसाठी अनुकूल आणि पूरक धोरणे जर सरकार राबवू शकत नसेल तर शेतीमध्ये निष्कारण होणारी शासकीय लुडबुड थांबविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

                                                                                                                           – गंगाधर मुटे

——————————————————————————————————————

दि.३१/०५/२०१५ च्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रकाशित माझा लेख

 

लेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका

लेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका

खाली करा शेतशिवार, इथून चालते व्हा
कुठं जाऊ पुसू नका, ढोड्यामंधी जा …॥

शूद्र तुम्ही शेतकरी, ध्यानी धरा पक्के
सरकाराचे बाप आम्ही, चार पानी एक्के
वाद फालतू घालू नका, उगाच काहीबाही
कोर्टामधी जाण्याची, तुम्हांस मुभा नाही
कायदा कडक वाटतो? तर तेल माखून घ्या …॥

घटनेमधले परिशिष्ट, नऊ वाचून पहा
शेतकऱ्यांनो तुम्ही तुमच्या, औकातीत राहा
मर्जीनुसार हिसकून घेऊ, तुमचा जमीनजुमला
कायद्यानंच बांधू तिथं, फाइव्ह स्टार बंगला
तुमच्या लेकीसूना घेऊन, नाचासाठी या …॥

इलंक्शनच्या टायमाले, थैल्या ढिल्या करतो
नाक लाजिम करण्यासाठी, चिमटीमध्ये धरतो
तवा कुठं भूमीग्रहण, कायदा येत असते
पैशाबिगर कोणालेच, ‘अभय’ मिळत नसते
उचला आता धोपटी-बिर्‍हाड, अन चालते व्हा …॥

– गंगाधर मुटे ‘अभय’
——————————————————

उंटावरचे शहाणे की सरस्वतीची लेकरं?

उंटावरचे शहाणे की सरस्वतीची लेकरं?       

शेती हा विषयच मोठा विचित्र आहे. या विषयात जितके खोलवर अध्ययन करत जावे तितके गुंते वाढत जातात. एक गुंता सोडवायला बघावं तर तो गुंता सुटायच्या आतच नवे दहा गुंते निर्माण व्हायला लागतात. शेतीच्या उभारणीत साहित्यविश्वाचे काय योगदान असेल याचा आज थोडासा अंदाज घ्यायला निघालो तर चिंतनाची गाडी पहिल्याच पायरीवर अडखळली. शेतीची दहापट अधोगती घडवून एकपट प्रगती झाल्याचं आज जे ठसठशीतपणे जाणवत आहे त्याला बर्‍यापैकी शेतीशी संबंधीत साहित्यविश्व आणि एकंदरीतच सृजनशीलतेची अपरिपक्व मोघमता कारणीभूत आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि शरद जोशी यांच्याखेरीज शेतीविषयाची नाडच कुणाला कळली नाही. रोगाचे योग्य निदान न करताच केले जाणारे औषधोपचार जसे रोग्याच्या जिवावर उठतात, कधीकधी चुकीच्या उपचारपद्धतीने जसा रोगी दगावतो अगदी तसेच शेतीमध्ये घडले आहे. शेतीच्या अधोगतीचे कारणच न कळल्याने साहित्यिकांनी जरी शुद्ध भावनेने शेतीच्या उन्नतीसाठी साहित्य निर्माण केले असले तरी ते काही तुरळक अपवाद सोडले तर अन्य साहित्यिकांचे शेतीविषयक किंवा शेतीसंबंधित साहित्य हे शेतीसाठी तारक कमी आणि मारकच जास्त ठरले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले, शरद जोशी आणि काही तुरळक अपवाद वगळता शेतीविषयाला लाभलेले साहित्यिक, लेखक आणि शेतकीतज्ज्ञच मुळात उंटावरून शेळ्या हाकलणारे असल्याने ते शेती विषयाला न्याय देऊ शकलेले नाहीत, हे विधान मी अत्यंत जबाबदारी आणि सर्वांचा रोष पत्करण्याची मानसिक तयारी ठेवून करत आहे. शेती हा एकमेव विषय असा झाला आहे की, उठसूठ जो-तो स्वतःच्या पात्रतेचा अथवा आवाक्याचा विचार न करताच शेतीविषयक सल्ला द्यायला उतावीळ असतो. शेती विषयाचे आपल्याला प्रचंड ज्ञान आहे आणि त्यावर आपले मतप्रदर्शन करण्याचा जन्मसिद्धच अधिकार आहे, अशाच आविर्भावात प्रत्येक मनुष्य वावरत असतो. शेती हा कदाचित एकमेव विषय असेल जेथे सल्ला ऐकणार्‍यांची संख्या नगण्य आणि सल्ला देणार्‍यांची संख्या प्रचंड आहे.

एखाद्या रोगाची साथ आली तर जो-तो उठसूठ आपापले उपचारविषयक ज्ञान पाजळत फिरत नाही. आरोग्य शास्त्रातले तज्ज्ञ बोलतात आणि बाकीचे ऐकतात. कायदेविषयक गुंता असेल तर कायदेविषयक तज्ज्ञ बोलतात आणि बाकीचे ऐकतात. व्यापारामध्ये यशस्वी व्यापार्‍याचा शब्द प्रमाण मानला जातो. मात्र शेतीमध्ये अगदीच उलट आहे. शेतीमध्ये यशस्वी असलेल्या शेतकर्‍याला मूर्ख, अज्ञानी असे गृहीत धरून ज्याने कधीच शेती केली नाही, केली असेल तर निव्वळ शेतीच्या भरवशावर निदान सुपरक्लासवन अधिकार्‍याच्या तोडीचे जीवनमान उंचावून दाखवता आले नाही किंवा ज्याला भुईमुगाला शेंगा कुठे लागतात हे सुद्धा माहीत नसते तो सुद्धा स्वतःला शेतकीतज्ज्ञ समजून शेतकर्‍याचे प्रबोधन करायला अत्यंत उतावीळ असतो.

पण खरी मेख त्याही पुढे आहे. विशेषज्ञ डॉक्टरचा पेशा डॉक्टरकीच असतो. नामवंत कायदेतज्ज्ञाचा पेशा कायदेविषयाशीच संबंधीत असतो. शिक्षणतज्ज्ञ हा शिक्षणक्षेत्रातील वाटसरू असतो. किर्तन-पारायण करणारे तर प्रत्यक्ष संत बनून संतत्वाला साजेसे वर्तन करण्याचा प्रयत्न करतात. तद्वतच या सर्वांच्या उपजीविकेचे साधनसुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्राशी संबंधितच असते. त्याच प्रमाणे या विषयातील साहित्यनिर्मिती करणारे, मार्गदर्शन करणारे अथवा उदबोधन करणारे त्या-त्या विषयातीलच कर्मयोगी असतात. ट्रकचा वाहनचालक आरोग्यशास्त्राशी संबंधीत पुस्तक लिहीत नाही. ढोलकीवादक कायदेविषयक पुस्तक लिहीत नाही, एखादी नृत्यांगना विद्यापीठाचा अभ्यासक्रम ठरवत नाही किंवा मासोळ्या विकून पोट भरणारा किर्तन करत नाही. शेती वगळता अन्य सर्व विषयामध्ये “आधी स्वतः करून दाखवले मग सांगितले” हेच सूत्र असताना शेतीत मात्र अगदी विपरित घडत असते.

विशेषज्ञ मास्तर उंटावरून शेळ्या हाकत नाही; हाती खडू घेऊन फळ्यावर लिहून दाखवतो. विशेषज्ञ डॉक्टर उंटावरून शेळ्या हाकत नाही; हाती कात्री घेऊन शस्त्रक्रिया करून दाखवतो, विशेषज्ञ वकील उंटावरून शेळ्या हाकत नाही; स्वतः न्यायाधीशासमोर बाजू मांडतो, विशेषज्ञ उद्योजक आपल्या उद्योगात प्रत्यक्ष सहभागी असतो. शेतीविषयात मात्र नेमके याच्या उलट घडत असते. शेती हा विषयच मोठा विचित्र आहे, इथे प्रत्यक्ष शेती कसणारा शेतकरी सोडून अन्य व्यवसायावर किंवा आयत्या शासकीय अनुदानावर उपजीविका करणारेच शेतकी तज्ज्ञ होतात. शेतीवर ज्याची उपजीविका अवलंबून नाही तो शेती साहित्याची निर्मिती करतो. ज्याला शेती करून स्वतःचे पोट जगवण्यात कधीच यश आले नाही तो “शेतीविषयक मार्गदर्शन’’ शिबिरात मार्गदर्शक म्हणून लांबलचक भाषण ठोकून देतो आणि मानधनाच्या स्वरूपात अर्थार्जन करून स्वतःचे पोट भरणारा इतरांना निसर्गशेतीचे सल्ले देत फिरतो. शेतकी तज्ज्ञ किंवा शेतकीविषयावर लिहिणारा साहित्यिक आपल्या हातात नांगर धरत नाही, विळा हातात घेऊन खुरपणी करत नाही, पाठीवर फवारा घेऊन फ़वारणी करत नाही. विशेषज्ञ डॉक्टर डॉक्टरकी करून जगत असतो, विशेषज्ञ वकील वकिली करून जगत असतो. विशेषज्ञ उद्योजक उद्योग करून जगत असतो त्याच न्यायाने स्वतः गहू, धान, बाजरी, दाळी, कापूस, सोयाबीन, कांदा यापैकी एखाद्या पिकाची शेती करून, त्याच शेतीवर आपला उदरनिर्वाह करून आणि इतर सर्व शेतकर्‍यांपेक्षा अधिक मिळकत मिळवून दाखवणारा शेतकरी तज्ज्ञ या संपूर्ण भारत देशात एकही सापडत नाही. झाडून सारेच्या सारे शेतकीतज्ज्ञ सरकारी पगारावर जगत असतात. त्यामुळे शेतकी तज्ज्ञ आणि शेतीसंबंधित साहित्यिक हे उंटावरचे शहाणेच असतात, असे थेट विधान केले तरी ते फारसे चुकीचे ठरणार नाही. शेतीचे विशेष आणि वास्तविक ज्ञान असल्याशिवाय उच्च प्रतीची आणि वास्तवाचे भान असणारी साहित्यनिर्मिती होऊ शकत नाही. हे आज ना उद्या, उद्या ना परवा, कधी ना कधीतरी सर्वांना मान्य करावेच लागेल आणि तो दिवस उजाडेपर्यंत शेतीला चांगले दिवस येण्याची हातावर हात ठेऊन प्रतिक्षा करत बसावे लागेल.

शेतीला केंद्रस्थानी ठेऊन विचार केला तर साहित्यविश्व परिपूर्ण नाही, हे विधान करताना मला अजिबात संकोच वाटत नाही. शेतीव्यवसायाचा सर्वांगीण विचार करणारे साहित्यच लिहिले गेलेले नाही. समजा एखाद्या नवतरुणाला नव्याने शेती करायची असेल तर त्याला सर्वंकश मार्गदर्शन करू शकेल किंवा शेती करताना त्याला साहित्याचा आधार घेऊन दमदारपणे वाटचाल करता येईल असे साहित्य उपलब्ध नाही. ज्या साहित्याचा शेतीच्या व्यावहारिक पातळीवर उपयोग नाही असे साहित्य मात्र साहित्य विपुल प्रमाणात लिहिले गेले आहे. शेती करायची असेल तर मशागत कशी करावी, कष्ट कसे करावे, आधीच गळत असलेला घाम आणखी कसा गाळावा, बियाणे कोणते वापरावे, फ़वारणी कोणती करावी एवढेच नव्हे तर राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज काढून आणखी कर्जबाजारी कसे व्हावे, याविषयी मार्गदर्शन करणारी, दिशानिर्देश देणारी पुस्तके रद्दीच्या भावात घाऊकपणे विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत; मात्र बँकेकडून कर्ज काढून बियाणे घेऊन ते मातीत पेरल्यानंतर, खते जमिनीत ओतल्यानंतर, कीटकनाशके फवारून हवेत गमावल्यानंतर जर अतिपावसाने किंवा कमी पावसाने शेतातील उभे पीक नेस्तनाबूत झाले आणि बँकेतून कर्जरुपाने आणलेले पैसे जर मातीत गेले, पाण्यात गेले किंवा हवेत गेले तर मग बँकेचे कर्ज फेडायला पैसे कुठून आणायचे याचे उत्तर देणारे एकही पुस्तक शेतकी तज्ज्ञांना आणि सरस्वतीच्या लेकरांना आजतागायत लिहिता आलेले नाही. शेतमालाचा उत्पादनखर्च कसा काढावा, कोणत्या पिकाचा उपादनखर्च किती येतो, कोणते पीक घेतले तर खर्च वजा जाता कीती रक्कम शिल्लक असू शकते याचा शास्त्रशुद्ध ताळेबंद उपलब्ध करून देणारे एकही पुस्तक आज उपलब्ध नाही.

शेती वगळता अन्य कोणताही व्यवसाय केला आणि व्यवसायावर जर कोणत्या कारणाने विपत्ती आली आणि मुद्दलसुद्धा नष्ट झाले तर विमाकंपनी कडून भरपाई मागावी, कोणता, कुठे आणि कसा फ़ॉर्म भरावा याची शिकवण देणारी पुस्तके आहेत. शेतीसाठी मात्र अशी पुस्तके उपलब्ध नाहीत. जर शेती वगळता अन्य कोणताही व्यवसाय कुठल्याही कारणाने पूर्णपणे तोट्यात गेला, दिवाळं निघालं तर त्याला दिवाळखोरी/व्यवसाय आजारी किंवा नादारी घोषित करायचा कायदेशीर मार्ग सांगणारी आणि त्या बिगरशेती व्यावसायिकाला संरक्षण देणारी कायद्याची चिक्कार पुस्तके उपलब्ध आहेत. मात्र सर्वांना समान न्यायाचं तत्त्व सांगणारी कायद्याची पुस्तके सुद्धा शेतकर्‍याच्या बाजूने उभी राहायला तयार नाही.

कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याचा प्रत्यक्ष शेतीक्षेत्राशी काहीही संबंध उरलेला नाही. साहित्यविश्व व शेतीमधली वास्तविकता यांचा कुठेही ताळमेळ बसत नाही. ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी, हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक या क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अत्यंत लाजिरवाणेच आहे. साहित्यातून समाजाच्या सामुहिकमनाचे वास्तव प्रतिबिंबित व्हायला हवे; पण मागील काही वर्षाचा साहित्यिक आढावा घेतला तर ते सुद्धा होताना दिसत नाही. गेल्या १५-२० वर्षांमध्ये लाखो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याची दखल साहित्यक्षेत्राने घेतलेली नाही किंवा त्याचे प्रतिबिंब काही साहित्यात उमटलेले नाही. एक खैरलांजी प्रकरण झाले तर त्यावर शेकडो पुस्तके लिहिली गेली. दिल्लीत एका मुलीवर बलात्कार होऊन खून करण्यात आला तर शेकड्यांनी पुस्तके लिहिली जातात, मात्र; लाखो शेतकर्‍यांच्या आत्महत्या दखल घेण्याइतपतही साहित्यक्षेत्राला महत्त्वाच्या वाटत नाही. कारण काय? शेतकरी गरीब असतो म्हणून? की त्याच्याकडे पुस्तके विकत घेण्याची ऐपत नसते म्हणून? या दोन्ही प्रश्नाची उत्तरे ’होय’ अशीच येत असतील व ”खपणार तेच विकणार” हाच सरस्वतीच्या उपासकांचा अंतरस्थ हेतू असेल तर “साहित्य म्हणजे समाजाचा आरसा” ही उक्ती प्रत्यक्षात उतरेलच कशी? शेतकरी आत्महत्यांवर सर्वंकश प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेणारे आज एकही पुस्तक उपलब्ध नसणे ही बाब साहित्यक्षेत्र आणि सरस्वतीची लेकरं यांची पात्रता आणि प्रतिभेची उंची अजूनही अत्यंत खुजी आहे, हे स्पष्ट व्हायला पुरेसे आहे.

शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे शरद जोशींचे लेखन वगळता काहीही अन्य लेखन साहित्यक्षेत्रात उपलब्ध नाही, ही उणीव साहित्यक्षेत्रात राहिलेली आहे, हे सत्य आहे. शेतीच्या दुर्दशेचे कारण सांगताना शेतकरी आळशी आहे, त्याला तंत्रज्ञानाचा योग्य वापर करता येत नाही, तो अज्ञानी आहे, तो व्यसनाधीन आहे अशा कांगावखोर आणि शास्त्रशुद्ध अर्थवादाचा लवलेश नसलेल्या लेखनापलीकडे साहित्याच्या महामेरूंना काही लिहिताच आलेले नाही. योग्य कारणाचा वेध घेऊन अभ्यासपूर्ण लेखन करण्यात साहित्यक्षेत्राने कुचराई केली ही पहिली चूक आणि जे लिहिले ते निखालस खोटे, अशास्त्रीय लिहिले ही दुसरी चूक.

असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी
          

शेतीला भाकड शेतकीतज्ज्ञांचा आणि शेती साहित्यिकांचा शून्य उपयोग आहे. कारण ह्या साहित्यिकांचे, लेखकांचे लेखन आणि मार्गदर्शन फ़ारतर विषाच्या बाटलीपर्यंत किंवा गळफ़ासाच्या दोरापर्यंत शेतकर्‍यांना पोहचवून देऊ शकते. शेतकर्‍यांच्या मुक्तीची गुरुकिल्ली यांनाच अजून गवसलेली नाही मग या मंडळींचे लेखन शेतकर्‍यांना मुक्तीचा मार्ग कसा दाखवू शकेल? तरीही शेतकर्‍यांना फुकटाचा नको तो सल्ला देणार्‍यांची संख्या प्रचंड वाढली आहे. एक उंटावरचा शहाणा शेतकर्‍यांना उच्च तंत्रज्ञान वापरायला सांगतो, दुसरा उंटावरचा शहाणा शेतकर्‍यांना निसर्गशेती करायला सांगतो, तिसरा उंटावरचा शहाणा शेतकर्‍यांना जोडधंदे करायला सांगतो, चवथा उंटावरचा शहाणा शेतकर्‍यांना मार्केटिंग कशी करावी हे शिकवू पाहतो. त्यामुळे शेतकरी गोंधळतो एवढेच नव्हे तर या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे सल्ले तद्दन फालतू, फडतूस आणि अव्यवहार्य असल्याने शेतकर्‍यांनी ते वापरायचा प्रयत्न केल्यास त्यांची शेती आणखी घाट्यांत जाते. त्यामुळे या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे पहिले तोंड बंद केले पाहिजे. बर्‍या बोलाने ऐकत नसेल तर त्यांच्या कानाखाली आवाज काढला पाहिजे जेणेकरून निदान तोंड तरी बंद होईल. शेतकरी मरत असेल तर मरू द्या पण उंटावरच्या शहाण्यांनो प्रथम तुमचे तोंड आवरा, तुमच्या लेखण्या थांबवा. शेतकर्‍यांसाठी तुम्ही काहीच करण्याची गरज नाही. फक्त शेतकरी देशोधडीस लागावा म्हणून शासकीय पातळीवरून होणार्‍या कटकारस्थास तुम्ही जो प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लावता आहात, तेवढा बंद करा. शेतकरी स्वतःचे स्वतःच बघून घेईल. तुम्ही काहीच करण्याची गरज नाही फक्त शेतकर्‍यांच्या छातीवरून उठा.
तुम्ही छातीवरून उठलात तर शेतकरी स्वतःच स्वतःचा मार्ग शोधण्यास समर्थ आहे. त्याला तुमच्या भाकड सल्ल्याची आवश्यकता तर नाहीच नाही.

                   – गंगाधर मुटे    
———————————————————————————————————————-