वांगे अमर रहे…!


वांगे अमर रहे…!

                 कॉलेज संपवून शेती करायला गेलो तेव्हा गावातील इतरांकडे नाही ते ज्ञान आपल्याकडे आहे असा माझा दृढ समज होता आणि त्याच आविर्भावात मी शेतीची सुरुवात केली. या सर्व जगाच्या लेखी मूर्ख असलेल्या शेतकर्‍यांना स्वानुभवाने शहाणे करण्यासाठी भरघोस उत्पन्न घ्यायचे ठरविले. दोन महिन्यांत नगदी पैसा मिळवून देणारे पीक म्हणून वांगीची निवड केली आणि ५ एकरात वांगीची लागवड केली. मेहनत,जिद्द सर्वस्व पणाला लावलं. मेहनत फळा आली. भरघोस पीक आलं. अन्य शेतकरी घेतात त्याच्या १-२ नव्हे चक्क ५-६ पट उत्पादन मिळालं. आणि इथेच माझे ग्रह फिरले.
               माझी वांगी बाजारात गेली आणि स्थानिक बाजारात वांगीचे भाव गडगडले. ५ रुपयाला पोतं कुणी घेईना. वाहतूक,हमाली,दलाली वजा जाता जो चुकारा मिळाला ते पैसे बसच्या तिकिटालाही पुरले नाहीत. शेतात घेतलेली मेहनत आणि वांगी फुकटात गेली. असे काय झाले? काहीच कळत नव्हते. प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे माझ्या नजरेत इतर शेतकरी अडाणी,मूर्ख असल्याने त्यांच्याशी सल्लामसलत करण्याचा प्रश्नच नव्हता. शेवटी निष्कर्ष निघाला की मार्केटमध्ये गरजेपेक्षा जास्त माल गेल्यामुळे भाव पडले. कारण ग्राहकाला जेवढी गरज असेल तेव्हढीच तो खरेदी करेल. माझी वांगी खपावी म्हणून ग्राहक पोळी, भात, भाकरीऐवजी नुसतीच वांग्याची भाजी खाऊन पोट थोडीच भरणार आहे? स्थानिक बाजारात गरज, मागणीपेक्षा जास्त माल गेल्याने ही स्थिती झाली त्याला जबाबदार मीच होतो. इतर शेतकर्‍यांनी सायकलवर आणलेली अर्धा पोतं वांगी सुद्धा माझ्या मुळे बेभाव गेली होती. सायकलवर अर्धा पोतं वांगी आणून उदरनिर्वाह करणारे माझ्यामुळे अडचणीत आले.
            झाली चूक पुन्हा करायची नाही म्हणून दुसर्‍या खेपेस वांगी आदिलाबादला न्यायचे ठरवले. माझ्या गावाहून १५० किमी अंतरावर मोट्ठी बाजारपेठ असलेले आंध्रप्रदेश मधील आदिलाबाद शहर. ६० पोती वांगी न्यायची कशी? स्पेशल वाहनाचा खर्च परवडणार नव्हता म्हणून माल बैलबंडीने हायवे क्रं. ७ पर्यंत नेला. रायपुर – हैदराबाद जाणार्‍या ट्रकला थांबवून माल भरला. तिथे हमाल किंवा कुली नव्हताच त्यामुळे मीच ट्रकड्रायव्हरच्या मदतीने माल चढविला. ६० पोती प्रत्येकी वजन ५०-५५ किलो. अनुभव नवा होता. मजा वाटली (?) शेतकरीcumहमाल.Two in One.
आदिलाबाद गाठले.
तिथल्या मार्केटची गोष्टच न्यारी. मार्केटमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती.
वांगेच वांगे.
अत्र तत्र सर्वत्र वांगेच वांगे.
जिकडे तिकडे चोहीकडे, वांगेच वांगे गडे, आनंदी आनंद गडे.
मार्केट वांग्यांनी भरलं होतं. त्या संदर्भात एका शेतकर्‍याला विचारले.
“यंदा हवामान वांगी साठी फारच अनुकूल असल्याने वांगीचं भरघोस उत्पादन आलंय.” तो शेतकरी.
“भाव काय चाललाय?” माझा प्रश्ऩ.
“सकाळच्या लिलावात ५-६ रुपये भाव मिळाला.” तो शेतकरी.
“किलोला की मणाला?” माझा प्रश्ऩ.
“किलोला? अरे यंदा किलोला विचारतो कोण? पोत्याचा हिशेब चालतो.” तो शेतकरी.
“म्हंजे? पोतभर वांगीला ५-६ रुपये?” माझा प्रश्ऩ.
“पोतभर वांगीला नाही, पोत्यासहित पोतभर वांगीला.” तो शेतकरी.
“रिकाम्या पोत्याची किंमत बाजारात १५ रुपये असताना पोत्यासहित पोतभर वांगीला ५-६ रुपये? “मी मलाच प्रश्न विचारीत होतो. हे कसं शक्य आहे? 
“१५ रुपये किंमतीच्या रिकाम्या पोत्यात ५०-५५ किलो वांगी भरली की वांगीसहीत पोत्याची किंमत घटून ती ५ रुपये एवढी होते” हे समिकरण मला कुणी शिकवलंच नव्हतं.
विश्वासच बसेना, पण समोर वास्तव होतं. 
“आता लिलाव केव्हा होईल?” माझा प्रश्ऩ.
“इथे नंबरवार काम चालतं, मी काल आलो, माझा नंबर उद्या येईल कदाचित.” तो शेतकरी.
“तोपर्यंत वांगी नाही का सडणार?” माझा प्रश्ऩ.
         यावर तो काहीच बोलला नाही. मूक होता. डोळे पाणावले होते, एवढ्या मेहनतीने पिकविलेलं वांगं सडणार म्हटल्यावर त्याचा जीव कासावीस झाला होता.
आता माझ्याही मनात कालवाकालव व्हायला लागली.
        आपला नंबर तीन दिवस लागला नाही तर अर्धी वांगी नक्कीच सडणार. डोळ्यादेखत वांगी सडताना पाहणं मानसिकदृष्ट्या पीडादायक ठरणार होतं. मी मनातल्या मनात गणित मांडायला सुरुवात केली. तीन दिवसात किमान अर्धी वांगी नक्कीच सडणार. उरलेली ३० पोती गुणिला ५ वजा तीन दिवस जेवणाचा, निवासाचा खर्च बरोबर उणे पंधरा ( -१५) म्हणजे वांगी विकण्यासाठी मला जवळून १५ रुपये खर्च करावे लागणार होते.
काय करावे मला सुचत नव्हतं, डोकं काम करीत नव्हतं, माझं सर्व पुस्तकी ज्ञान उताणं झोपलं होतं.
आता पुढे काय?
निर्णय घेतला. एकदा डोळेभरुन त्या वांगीकडे पाहिलं. गुलाबी-गुलाबी, तजेल आणि टवटवीत. कुणाचीही दृष्ट लागावी अशी. ते दृश्य डोळ्यात साठवलं, एका झटक्यात वांगीकडे पाठ फिरविली आणि गावाचा रस्ता धरला. गावाजवळ आलो तेव्हा दिवस उतरणीला आला होता. आणि आता मला एका नव्या समस्येने ग्रासले होते. गावांतील शेतकरी मला यासंदर्भात विचारतील त्याला उत्तर काय द्यायचे? मूर्ख शेतकर्‍यांच्या नजरेला नजर भिडविण्याचे धाडस विद्याविभूषित शहाण्याकडे उरले नव्हते. मग एका चिंचेच्या झाडाखाली विसावलो. तेथेच टाईमपास केला. गावातील सर्व लोक झोपी गेले असतील याची खात्री झाल्यानंतरच गुपचिप चोरपावलाने गावात प्रवेश केला.
आजही मला दिसतात.
..ते ..वांगे..
गुलाबी-गुलाबी, तजेल आणि टवटवीत. कुणाचीही दृष्ट लागावे असे, अजूनही न सडलेले.
आणी माझ्या दृष्टिपटलावर अमर झालेले.
                                                          गंगाधर मुटे
………… **…………..**…………..**…………..**………….

दिनांक : ११-०२-२०११

मेहता पब्लिकेशन हाऊस आणि मी मराठी.नेट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
लेखन स्पर्धा २०१० या स्पर्धेचा आज निकाल आला असून
या स्पर्धेत “वांगे अमर रहे…!”
या लेखाला उत्तेजनार्थ पारितोषक जाहीर झाले आहे.

माझी वांगंमय शेती तोट्यात गेली पण वांङ्मय शेतीला बरे भाव मिळत आहेत. 😉

………… **…………..**…………..**…………..**………….

किती चाटणार भारतपुत्रा? : नागपुरी तडका

किती चाटणार भारतपुत्रा? : नागपुरी तडका

कृष्णावाणी राहुल आणि, म्हणे सोनिया भारतमाय
किती चाटणे आणखी रे, भारतपुत्रा असेच पाय? …!!

जन्म गेला पूर्वजांचा, करता करता खुशामतगिरी
गुलाम तेही मिरवत होते, चप्पल घेऊन डोक्यावरी
दास्यत्वाची जनुकं अजुनी, काही केल्या मरत नाही
आनुवंशिकतेची देण अशी की, लाळघोटणे सरत नाही
चापलुशीम्होरं आता, कसले संस्कार, कसलं काय …!!

राजेशाहीची भलावण, रक्तामासात भिनलेली
भाटगिरीच करता करता, बुद्धी सारी झिंगलेली
कणा आणि मणकाही, उत्क्रांतीमध्ये गळून गेला
स्वाभिमान नावाचा इसम, शरमेसंगे पळून गेला
लोकशाहीचे गुणधर्म रक्तात काही मिसळत नाय …!!

शंभर कोटी जनतेमध्ये, राष्ट्रनायक दिसत नाही
‘ते’ घराणे सोडून अन्य, कुणीच लायक भासत नाही
असेच आमचे गणराज्य, अशीच आमची लोकशाही
भगत-बापूंना माहीत नव्हते, अर्थ निघणार असाही
मुजोर सारे अभय झाले, खाण्याकरिता मलईसाय …!!

गंगाधर मुटे
……*…….*……*……*……*……*…….*……*……*……
इसम = व्यक्ती

पुरस्काराचा भुलभुलैय्या

पुरस्काराचा भुलभुलैया
 
                “स्टार माझा” तर्फे, घेण्यात आलेल्या ब्लॉग माझा-३ स्पर्धेत मला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आपण माझेवर प्रेम व्यक्त करून अभिनंदन केलेत त्या बद्दल मी आपणा सर्वांचा अत्यंत ॠणी आहे, त्याबद्दल आपले सर्वांचे खूपखूप आभार. भविष्यातही आपणाकडून असेच उदंड प्रेम मिळत राहील ही अपेक्षा.  
               शक्यतो कुठल्याही स्पर्धेत भाग घ्यायचा नाही. घेतलाच तर त्याचा निकाल कसाही लागो, नंबर येवो अथवा ना येवो, दोन्ही स्थितीमध्ये ना आनंद मानायचा ना दु:ख. अशी मानसिक तयारी करून तसा फार पूर्वीच निर्णय घेतला आहे मी. पण जेव्हा जेव्हा हा निर्णय अमलात यायची वेळ येते तेव्हा तेव्हा मात्र अगदी विचित्र परिस्थिती निर्माण होत असते. मी आणि माझे मन/शरीर या दोन स्वतंत्र ‘संस्था’ आहेत, याची पुरेपूर जाणीव होत असते. कारण मी जे ठरवतो त्यानुरूप वागण्यास मन अजिबात तयार नसते. ‘इंद्रियावर ताबा’ ठेवण्याचे निश्चय सामान्य माणसाला पाळणे तसेही कठीणच काम असते. किंवा असेही म्हणता येईल की, अशा तर्‍हेचे निश्चय करून ते अंगवळणी पाडणे, हे सामान्य माणसाच्या दृष्टीने महाकठीणच असते. फक्त या निमित्ताने मनावर थोडाफार ताबा मिळवता येऊन आचाराविचारावर थोडेफार नियंत्रण मिळवता येते, एवढाच काय तो आनंद.
                  या विषयावर काथ्याकूट करण्याचे कारण असे की, बर्‍याच कालावधीनंतर या तीन महिन्यांच्या कालावधीत मी दोन स्पर्धांमध्ये भाग घेतला. एका स्पर्धेत अपयश आणि दुसर्‍या स्पर्धेत यश. पहिल्या स्पर्धेत जेव्हा अपयश मिळाले तेव्हा थोडीफार नाराजी आलीच. प्रयत्न करूनही नाराजी जाईना. दु:ख मानायचे नाही, हा माझा आदेश माझेच मन स्वीकारेना. मी माझ्या मनाला परोपरी समजावण्याचा प्रयत्न केला, मनासमोर मी तर्‍हेतर्‍हेचे तर्क सादर केले, पण सारे व्यर्थ. मनाची उदासी जैसे थे. मग मनाच्या नाराजीचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एक बाब लक्षात आली की, नाराजी यश मिळाले की अपयश याबाबतची नसून परीक्षकाने मर्यादा ओलांडून निष्कारण आपल्या कलाकृतीला ‘कचरा’ ठरवून जाणूनबुजून हीनत्वाची वागणूक द्यायचा प्रयत्न केलेला आहे. मनाच्या उदासीचे हे कारण मात्र पटण्यासारखे वाटले. मग पुन्हा मी माझ्या मनाला समजावण्याचा प्रयत्न केला.

मी : हे बघ मना, असल्या बारीकसारीक क्षुल्लक बाबींना एवढे महत्त्व द्यायचे काहीच कारण नाहीये.
मन : बारीकसारीक? क्षुल्लक? येथे चक्क उपमर्द होतोय, आणि तुला काहीच कसे वाटत नाही?
मी : हे बघ मना, तुला जे वाटते तेच खरे असेल कशावरून? त्याला दुसरी बाजूही असू शकते आणि ती खरी असू शकते.
मन : दुसर्‍याला हीन लेखने ही एक विकृती आहे, आणि तिचे समर्थन केले जाऊ शकत नाही.
मी : हे बघ मना, माणूस म्हटलं की चूकभूल होतच राहणार.
मन : नकळत किंवा अनवधाने घडते त्याला भूलचूक म्हणायचे असते. जाणीवपूर्वक केलेल्या कृतीला भूलचूक म्हणता येत नाही. अशी कृती क्षम्य सुद्धा असू शकत नाही.
मी : ते जाऊ दे, पण परीक्षकाबद्दल आणि श्रेष्ठ व्यक्तीबद्दल आदर बाळगायचा असतो, ही साधी बाब तुझ्या कशी लक्षात येत नाहीये?
मन : तीच तर खरी ग्यानबाची मेख आहे रे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. माणसांनाच काय, गाय हे जनावर असूनही तिच्याकडे आदराने बघायला शिकविलेना आम्हाला आमच्या संस्कृतीने. पण आदर राखूनही अवहेलनेचे शल्य तसूभरही कमी होत नाहीये.
                 अर्थातच कारण काहीही असो, आलेला प्रसंग पचवणे कठीण गेलेच. आपणच स्वमर्जीने केलेला निश्चय, आपल्यालाच पुरेपूर पाळता आला नाही, हे अधोरेखीत झाले.
 *   *   *
           प्रसंग दुसरा. आता विजेत्याच्या यादीमध्ये माझे नाव होते. मी निश्चयाप्रमाणे तसा मख्खच होतो. पण मनामध्ये मात्र आनंदाचा एक तरंग उठलाच होता. मात्र हा आनंदाचा तरंग “आपण जिंकलो” या भावनेतून अजिबात आला नव्हता. आपली दखल घेतली गेली, उपेक्षितांच्या भावनांना समजून घेणारेही आहेत, याबद्दल मिळालेल्या पावतीचा तो आनंदक्षण होता. त्यामुळेच यादीत नाव पहिले की शेवटले, याबद्दलही सोयरसुतक उरले नव्हते.
           मी काय लिहितो,कसे लिहितो, याचे मला भान आहे. माझे लेखन बहूसंख्यजनांना न रुचणारे, न पटणारे किंवा अनाकलनीय असू शकते, याची मला जाणीव आहे. कधीकधी तर क्रित्येकाच्या भावना दुखावणारे, तडाखे,चटके देणारे असू शकते, हेही ज्ञात आहे मला. पण नाईलाज आहे, वास्तव हे कटू असले तरी ते वास्तव असते, आणि मी ते टाळू शकत नाही. लेखन करतो म्हणून लेखक आणि कविता लिहितो म्हणून कवी, एवढंच माझं लेखक व कवी या शब्दांशी नातं. एरवी लेखक, कवीसाठी लागणारी योग्यता माझ्यात आहे किंवा नाही, मलाच संशय आहे. कारण मी कल्पनाविलासात फार काळ रमू शकत नाही. लोकांना रुचावे, दाद मिळावी, आपल्याला वाहवा मिळावी म्हणून त्या तर्‍हेने लेखन करण्याचे प्रयत्न मी करू शकत नाही.वाचक, रसिक, समिक्षक हा लेखकाच्या दृष्टीने देव असतो हे मान्य, पण त्यांचे फ़ाजिल लाड पुरविलेच पाहीजे, याबाबत मी सहमत होऊ शकत नाही. याउलट गरज असेल तेथे त्यांना दोन खडे बोल ऐकवण्याची कठोरता लेखकात असायलाच हवी, यावर मी ठाम आहे.लोकांचे निखळ मनोरंजन व्हावे एवढ्यासाठी मी लिहू इच्छित नाही. केवळ उपेक्षितांची दुर्लक्षित बाजू कागदावर चितारायचा प्रयत्न करणे, सिमित म्हणा की संकुचित म्हणा, पण एवढाच उद्देश माझ्या डोळ्यासमोर असतो, हे खरे आहे.
            उपेक्षितांची दुर्लक्षित बाजू कागदावर चितारायचा प्रयत्न करणारे आजवर खूप झालेत. पण इतिहास असे सांगतो की, या तर्‍हेचे व्रत घेतलेली बरीचशी माणसे मध्येच भरकटली आणि शेवटी देवाच्या आळंदीची वाट चुकून चोराच्या आळंदीला पोचलीत. आणि त्यामागच्या अनेक कारणांपैकी ‘पुरस्काराची अभिलाषा’ हे एक प्रमुख कारण आहेच आहे. एकदा का पुरस्काराची इच्छा मनात जागृत झाली की सर्वांना रुचेल, पसंतीस पडेल असे लेखन लिहिण्याकडे कल झुकलाच समजावा. मग कटू, कठोर, तडाखे देणारे, दुष्प्रवृतीवर घाव घालणारे लेखन जन्माला घालणारी लेखनी स्वत्वाच्या विनाशाकडे वाटचाल करायला लागलीच असे निर्विवाद समजावे. मग पुरस्काराच्या भुलभुलैयात लेखनीची धार कधी आणि कशी बोथट झाली, याचा उलगडा भल्याभल्यांना होत नाही.
           जी चूक इतरांनी केली, तीच चूक माझ्याकडून होऊ नये,एवढे बळ विधात्याने मला द्यावे, आणि या प्रवासात पुरस्कार वगैरे मिळाले तर आनंदच आहे, पण नाही मिळाले तरी त्यात खेद वाटण्यासारखे काहीच नाही, आपला मार्ग तेवढा महत्वाचा, तो भरकटू नये, हीच धारणा मरेपावेस्तोवर कायम रहावी, त्यात अंतर येऊ नये, एवढीच आंतरीक इच्छा आहे.   

                                                                           गंगाधर मुटे
,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,

संदर्भ :
पहिली स्पर्धा – एक काव्यलेखन स्पर्धा.
दुसरी स्पर्धा – स्टार माझा स्पर्धा.

“ब्लॉग माझा-३”-विजेत्यांचे अभिनंदन

ब्लॉग माझा-३”-विजेत्यांचे अभिनंदन

                                स्टार माझा या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनी तर्फे जगभरातल्या मराठी भाषिक ब्लॉग लेखकांसाठी नुकतीच “ब्लॉग माझा-३” ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेत कुवैत ते कल्याण, इटली ते इंदापूर आणि न्यूयॉर्क ते नागपूर अशा विश्वाच्या कानाकोपर्‍यातून मराठी ब्लॉगर्सनी भाग घेतला होता. नुकतेच यास्पर्धेचे विजेते ब्लॉग जाहीर करण्यांत आलेले आहेत, त्या सर्व विजेत्यांचे मनपुर्वक अभिनंदन.
                           या विजेत्यांच्या यादीमध्ये “रानमोगरा – शेती आणि कविता” (https://gangadharmute.wordpress.com) या माझ्या ब्लॉगचाही समावेश आहे.

                        मराठी ब्लॉगच्या माध्यमातून मराठी भाषेचे वैश्विक पातळीवर संवर्धन आणि प्रसारण करण्यार्‍या ब्लॉगमधून उत्कृष्ठ आणि दर्जेदार ब्लॉग निवडीसाठी परीक्षक म्हणून लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी), विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक, साप्ताहिक ‘साधना’) आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सर्व परीक्षक मंडळी आणि स्टार टीव्हीच्या चमुचा मी आभारी आहे.


                        विजेते ब्लॉगर्स यांच्या कौतुक सोहळ्याच्या कार्यक्रमाचे एपिसोड रेकॉर्डिंग डिसेंबरमध्ये मुंबई येथे स्टार टीव्हीच्या स्टुडियो मध्ये होणार असून या कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम स्टार माझा टीव्हीच्या खास एपिसोडमध्ये प्रसारीत केला जाणार आहे.

आंतरजालीय व्यासपीठ

                सध्या आंतरजालावर मराठीमध्ये मोठ्या प्रमाणावर लेखन केले जाते. त्यात ब्लॉग (अनुदिनी) आणि मराठी संकेतस्थळे येथे विपुल लेखन केले जाते. आंतरजालावर लेखन करण्याचा सहजसोपा, कुणाचाही अंकुश नसलेला पर्याय उपलब्ध झाल्याने आजवर निव्वळ  वाचक असलेली मंडळी आता लेखन करायला लागली आहे. त्यामुळे आता आंतरजालावर लेखक, वाचक, समीक्षक, व टीकाकार या वेगवेगळ्या भूमिका एकच व्यक्ती वठवायला लागली आहे. त्यामुळे आंतरजालावरील लेखनाकडे पाहताना काही चित्रविचित्र मुद्दे उपस्थित होत आहेत. त्यातील काही बाबी अशा.
   १) लेखनावर अंकुश नसल्याने तसेच संपादन करणारा कुणीच नसल्याने ज्याला जसे वाटेल तसे लिहायची मुक्तमुभा मिळाली आहे. त्यामुळे लेखकाजवळ त्या विषयाचा पुरेसा अभ्यास व वैचारिक परिपक्वता नसूनही त्याने जर नको तो विषय हाताळला तर त्याच्या वादग्रस्त लेखनाला थोपविता येणे सहज शक्य नाही.
   २) लेखक/कवीला लेखनाविषयीचा स्वतःचा असा एक दृष्टिकोन असतो. इतर लेखक/कवीचा लेखनाविषयीचा वेगळा दृष्टिकोन असू शकतो, पण स्वतः लेखक/कवी असलेला व्यक्ती इतरांच्या लेखनावर प्रतिसाद देताना ही बाब दुर्लक्षित करून स्वतःच्या दृष्टिकोनातून  इतरांच्या कलाकृतीकडे बघतो तेव्हा चांगल्या रचना देखिल त्याला भंकस वाटायला लागतात. त्यामुळे एखाद्या उत्तम कलाकृतीचे योग्य ते समीक्षण, मूल्यमापन होईल याची अजिबात शाश्वती देता येत नाही.
   ३) लेखक/कवी हाच प्रतिसादक असल्याने “जो मला प्रतिसाद देतो, मी सुद्धा त्यालाच प्रतिसाद देईन” अशी भावना जोर धरून एकतर कंपूबाजी तयार होते किंवा “मी तुझी पाठ खाजवतो, तू माझी पाठ खाजव” असा प्रकार सर्रास सुरू होतो. त्यामुळे लेख/कवितेचा दर्जा हा मुद्दा गौण ठरतो. त्यामुळे साधारण रचनेवरही भरपूर प्रतिसाद पडतात आणि एखादी उत्कृष्ट रचना दुर्लक्षित राहते. प्रतिसादाच्या संख्येवरून रचनेचे मूल्यमापन करता येत नाही, त्यामुळे प्रतिसादाची विश्वासहार्यता आपसूक कमी होते.
              अर्थात हे मुद्दे सरसकट सर्वांनाच लागू होते असे मला म्हणायचे नाही, आणि हे मुद्दे सरसकट सर्वांनाच लागू पडतही नाहीत, पण मोठ्या प्रमाणावर हे घडत असते एवढे मात्र खरे.
   ४) कविता कशी असावी किंवा कविता कशी नसावी याबद्दल जर एखाद्या कवीला मार्गदर्शनपर सल्ला द्यायचा असेल तर पहिल्यांदा त्या कवीची विचारशैली समजून घ्यायला हवी. त्याचा दृष्टिकोन समजून घ्यायला हवा पण तसे न होता स्वतःच्या फूटपट्टीने अवलोकन करून नको तो सल्ला दिला जातो, त्यामुळे त्या कवीला काही प्रेरणा मिळण्याऐवजी त्या कवीचे खच्चीकरण व्हायचीच जास्त शक्यता असते.
त्यामुळे आंतरजालावर वावरताना काही मूलभूत बाबींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
   १) आजवरच्या सर्व व्यासपीठापेक्षा आंतरजालीय व्यासपीठ हे पूर्णतः भिन्न आहे. कारण येथे जात, पात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत, देश, श्रीमंत, गरीब अशा सर्व सीमा ओलांडून एकाचवेळी एकाच व्यासपीठावर वेगवेगळी मंडळी जमू शकतात. त्यामुळे मतभिन्नता असणे किंवा एकच विचार अनेकांनी वेगवेगळ्या शब्दात व्यक्त करणे यात नवल काहीच नाही. आणि येथे लेखकापेक्षा वाचकाचीच जास्त कसोटी लागू शकते, त्यासाठी जालावर वाचक म्हणून वावरताना हे भान ठेवणे गरजेचे आहे.
   २) समविचारी व्यक्ती एकत्र येऊन ग्रुप तयार होणे यात वावगे काहीच नाही, पण त्यात संकुचितपणा नसल्यास कंपूबाजीचे स्वरूप येणार नाही.
   ३) आपले विचार मांडावेत पण दुस‍र्‍यावर लादण्याचा अट्टहास नसावा.
   ४) न पटणार्‍या विचारांना देखिल “असा सुद्धा एक विचार असू शकतो” असे समजून सन्मान द्यावा.
                 हळूहळू आंतरजालिय लेखनाचा/वाचनाचा जसजसा अनुभव वाढत जाईन तसतशी प्रगल्भता आपोआप वाढीस लागेल आणि भविष्यकाळात आंतरजालीय व्यासपीठ हेच सर्वोच्च व्यासपीठ म्हणून नावारूपास येईल, अशी मला खात्री वाटते.
                                                                                                   गंगाधर मुटे
………………………………………………………………………………………………………

‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन

‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन

                            श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत,शेगांव येथे बुधवार दिनांक १० नोव्हेंबर २०१० रोजी ‘रानमेवा’ या माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मा. शरद जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले.

                            मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रविभाऊ देवांग, कवी इंद्रजित भालेराव, माजी आमदार मा. वामनराव चटप, माजी आमदार मा. सरोजताई काशीकर आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला अंदाजे दिड लाख शेतकरी उपस्थित होते.

‘रानमेवा’

                      ११२ पृष्ठे असलेल्या ‘रानमेवा’ या कविता संग्रहात कविता, गझल, लावणी, विडंबन, तुंबडीगीत, अंगाईगीत, बालकविता, बडबडगीत, देशभक्तीगीत आणि नागपुरी तडका या काव्यप्रकांरातील रचनांचा समावेश आहे. 
                    ‘रानमेवा’ या कविता संग्रहास शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांची प्रस्तावना लाभली असून श्री वामनराव देशपांडे, श्री डॉ. श्रीकृष्ण राऊत, ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ, श्री मुकुंददादा कर्णिक, श्री गिरीश कुळकर्णी, जयश्री कुळकर्णी-अंबासकर, छाया देसाई, डॉ भारत करडक, अलका काटदरे, स्वप्नाली गुजर आणि श्री अनिल मतिवडे यांचे अभिप्राय लाभले असून पुस्तकाची किंमत रू. ६०/- आहे.

* ‘रानमेवा’ पीडीएफ़ स्वरूपात हवे असल्यास आपला ईमेल पत्ता ranmewa@gmail.com या ईमेलवर पाठवावा.

* पोष्टाने पुस्तक हवे असल्यास कृपया आपला पोस्टाचा पूर्ण पत्ता ranmewa@gmail.com या ईमेलवर किंवा कॅम्पस प्रकाशन, आर्वी छोटी त. हिंगणघाट जि. वर्धा या पोष्टाच्या पत्त्यावर पाठवून मागणी नोंदवावी. 

* मुल्य म.ऑ ने किंवा चेकने पाठवले तरी चालेल. किंवा बॅंक खात्यात जमा करता येऊ शकेल. त्यासाठी संपर्क करावा. 

* मुळ किंमत पाठवावी. पोस्टेज खर्च प्रकाशकाकडे.

‘रानमेवा’ ऑनलाइन स्वरूपात येथे वाचता येईल.

धन्यवाद!

.                                                            आपला स्नेहांकित
.                                                               गंगाधर मुटे
…………………

रानमेवाचे विमोचन करतांना मा. शरद जोशी.


…………………

…………………

sharad joshi

रानमेवाचे प्रकाशन करतांना मा. शरद जोशी.


…………………
Gangadhar Mute

रवि देवांग,शरद जोशी,इंद्रजीत भालेराव,गंगाधर मुटे,अ‍ॅड उमरीकर इत्यादी


…………………..
शरद जोशी

रानमेवाचे प्रकाशन करतांना मा. शरद जोशी.


…………………..
गंगाधर मुटे

थोडा हास्यविनोद.


……………………
गंगाधर मुटे

उपस्थित जनसमुदाय.


…………………..