झ्यामल-झ्यामल

झ्यामल-झ्यामल

कायरं श्याम्या इथंतिथं झ्यामल-झ्यामल करतोस
बैन तोंडाले खरूज आनं मोंढ्याले खाजवतोस….!!

ईचीबैन हे गजकरण भलतच भारी असते
चहाड्या-चुगल्या केल्याबिना पोट भरत नसते
अफवा पेरासाठी लोकायचे कानफट पाजवतोस
बैन तोंडाले खरूज आनं मोंढ्याले खाजवतोस….!!

याची टोपी त्याच डोस्कं, काट्याने काटा काढतोस
साथ देईन त्यालेच तू, तोंडबुचक्या पाडतोस
सिध्यासाध्या असामीले, बोटावर नाचवतोस
बैन तोंडाले खरूज आनं मोंढ्याले खाजवतोस….!!

समोरच्या तंगडीमध्ये, आडवी तंगडी घालतोस
त्याले उबडं पाडूनशान, त्याच्या म्होरं चालतोस
समद्यायले झाशा देऊन, अभये भाकरी भाजतोस
बैन तोंडाले खरूज आनं मोंढ्याले खाजवतोस….!!

                                               गंगाधर मुटे

…………………………………………………………..
मोंढा = पाठीचा खांद्यालगतचा भाग.
……………………………………………………………

चापलूस चमचा

चापलूस चमचा


हलक्या-पतल्याचा जमाना, राह्यलाच नाही
श्याम्यासारखा इब्लिस, म्या पाह्यलाच नाही …!!

पोम्याले म्हणे तुनं, शरम काहून विकली
मिशी पकून गेली तरी, अक्कल नाही पिकली
मुकरदमच्या चपला चक्क, डोस्क्यावर घेते
एवढा कसा लाचार होऊन, त्यायचे धोतरं धुते
असा चापलूस चमचा म्हणे, झालाच नाही …!!

चारचौघात गेला तं, अक्कल तारे तोडते
शोकसभेत बोलंण तं, जम्मून भाषण झोडते
असे गुण गावते, जे मयतात असन-नसन
याचं भाषण आयकून, थो मुर्दा हासत असण
देवळामंधी हार कधी, वाह्यलाच नाही …!!

थेटरमंधी जाईन तं, सुदा नाय बसणार
अभयतेनं खुर्ची भेदून, याची तंगडी घुसणार
तमाशातल्या बाईवर, नोटा-बंडल लुटते
दमडीसाठी भिकार्‍याले, अक्कल सांगत सुटते
जिंदगीचा डाव मात्र, हारलाच नाही …!!


                                           गंगाधर मुटे
………………………………………………….

लकस-फ़कस

लकस-फ़कस


काहून बाप्पा रंगराव, लकस-फ़कस चालता
खादीचं धोतर सोडून, मांजरपाठ घालता….!!

’सहकारात’ होते तेव्हा, काय तोरा व्हता
कौलारू खोपडं पाडून, इमले बांधत व्हता
कशी कमाई होते बाप्पा, भगवंताची माया
देवधरम सोडून जनता, पडे तुमच्या पाया
पद गेल्याच्यानं आता, गोमाश्या हाकलता….!!

म्हणा काही रंगराव, गणित तुमचं चुकलं
विरोधात बसले म्हून, खिसे भरणं हुकलं
बाकीच्यायनं थातुरमातुर, टोपीपालट केली
दोन पिढ्या बघा कशी, गरिबी हटून गेली
पब्लिकच्या भावनेसंगं, चेंडूवाणी खेलता ….!!

होयनोय उठसूठ, विमानवार्‍या करता
खुर्चीच्या लोभापायी, दिल्लीत पाणी भरता
जनतेचे प्रश्न जरा, अभयतेनं मांडा
मणका टाईट ठेवूनशान, खमठोकपणे भांडा
हायकमांडच्या गुरकावणीले थरथर हालता …!!

                                         गंगाधर मुटे
……………………………………………………….
ढोबळमानाने शब्दार्थ:
लकस-फ़कस = बेडौल
मांजरपाठ = स्वस्त व जाड धोतर
……………………………………………………….