हत्या करायला शीक

हत्या करायला शीक

विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली, नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, असे महात्मा जोतीबा फुले म्हणायचे. शेतकर्‍यांची मुलं शाळा-कॉलेजात शिकायला गेली की शिकून-सवरून शहाणी होतील आणि मग शिकून-सवरून शहाणी झालेली शेतकर्‍यांची मुले आपल्या घरातल्या, गावातल्या म्हणजे पर्यायाने शेतकरी समाजातल्या दारिद्र्याचा समूळ नायनाट करतील, असे महात्मा जोतीबा फ़ुलेंना वाटायचे.

विद्या आली की मती येईल, मती आली की निती येईल, निती आली की गती येईल, गती आली की वित्त येईल आणि वित्त आले की अस्मानी-सुलतानी संकटांशी लढण्याचे सामर्थ्यही आपोआपच येईल आणि शेतकर्‍यांचा दिवस उजाडेल असाच दुर्दम्य आशावाद जोपासत म. फुले जगले.

म. फुले गेल्याला शंभरावर वर्षे लोटली. वाहत्या काळाच्या ओघात बर्‍याच उलथापालथी झाल्यात. शिक्षणाचा प्रसार झाला. सर्वदूर शाळा निघाल्यात. महाविद्यालयीन शिक्षणाची व्यवस्था झाली. भरीस भर म्हणून रात्रीच्या शाळाही निघाल्यात आणि शूद्र शेतकर्‍यांची पोरं शिकून मोठी झालीत. उच्च पदावर गेलीत. राजकारणात सत्तास्थानी विराजमानही झाली. पण एकंदरीत शेतकरी समाजाची दुर्दशा काही खंडीत झाली नाही. शेतकर्‍यांची मूठभर पोरं गलेलठ्ठ पगार मिळवती झाली किंवा शेतकर्‍यांची मूठभर पोरं लाल दिव्याच्या गाडीत फिरायला लागली याचा अर्थ एकंदरीत संपूर्ण शेतीमध्येच समृद्धी आली असा कसा घेता येईल?
मग शिक्षणाने नेमके काय केले? याचा जरा शोध घेऊन बघितला तर मोठे मजेदार निष्कर्ष बाहेर यायला लागतात. झाले असे की, शिक्षणाने विद्या आली. विद्येमुळे मतीही आली, पण मती मुळे निती येण्याऐवजी थेट गती आणि वित्त आले. निती नावाचा मधला एक टप्पाच गहाळ झाला. शिवाय वित्त आले की लढण्याचे सामर्थ्यही आपोआपच येईल, असा जोतीबांनी केलेला कयासही शेतकरीपुत्रांनी-शुद्रपुत्रांनी उताणा-उपडा-तोंडघशी पाडला. शूद्राचा पोरगा जेवढा अधिक शिकला तेवढा तो आपल्या इतर शेतकरी बांधवापासून दूर गेला आणि आत्मकेंद्रीत झाला असेच समीकरण दृग्गोचर झाले. संपूर्ण देशात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले पण हा उच्चशिक्षित शेतकरीपुत्र हादरला नाही, पाझरला नाही, विव्हळला नाही आणि पेटून वगैरे तर अजिबातच उठला नाही. शेतकर्‍याच्या जळणार्‍या चिता पाहतानाही तो ढिम्मच्या ढिम्मच राहिला.

“एकजूटीची मशाल घेउनी पेटवतील हे रान” या साने गुरुजींच्या ओळी साकार करण्याचा शिकल्या-सवरल्या-शहाण्या आणि बर्‍यापैकी वित्तप्राप्ती केलेल्यांनी कधी प्रयत्नच केला नाही किंवा चुकून कधी त्या मार्गालाही शिवले नाहीत. कदाचित यात त्यांचा दोषही नसावा. जळत्या घरात आगीचे चटके सोसल्यानंतर त्या घरातल्या एखाद्याला त्या पेटत्या घरातून जर बाहेर पडायची संधी मिळाली तर तो स्वत:चा जीव मुठीत घेऊन जीवाच्या आकांताने पळत सुटतो. पुन्हा मागे वळून त्या घराकडे पाहण्याच्या फंदात पडत नाही किंबहुना मागे वळून त्या घराकडे पाहण्याची त्याच्यामध्ये इच्छाशक्ती उरलेलीच नसते. कदाचित अशाच तर्‍हेच्या सामूहिक मानसिकतेतून शेतीच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी झगडण्याऐवजी आहे त्या व्यवस्थेत स्वत:ला समरस करून घेण्याच्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून ही शिकली-सवरली शेतकर्‍यांची मुले “अडवणूक त्या करणारांची उडवू दाणादाण” असे स्वनातही म्हणायला धजावली नसावीत.

“किसान मजूर उठलेले, कंबर लढण्या कसलेले” असे दृश्य अनेक पाहायला मिळते पण लढण्यासाठी कंबर कसणार्‍यांमधे अशिक्षित आणि अर्धशिक्षित लोकांचाच जास्त भरणा असतो. उच्चशिक्षितांची संख्या मोजायला एका हाताची बोटे देखिल पुरेशी ठरतात किंवा तितकेही नसतात आणि असलेच तर ते लढण्यासाठी नव्हे तर लढणार्‍यांना हुसकावून लावण्यासाठी असतात, लाठ्या घालण्यासाठी असतात किंवा गोळीबाराचे आदेश देण्यासाठी असतात. आणि नेमका येथेच म. फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या “शिक्षणातून क्रांती घडेल” या तत्त्वाचा पराभव झाला असावा, असे समजायला बराच वाव आहे.  पुढे वाचण्यासाठी क्लिक करा.

बळीराजा डॉट कॉम

जाहीर निमंत्रण 

एक नवे संकेतस्थळ

बळीराजा डॉट कॉम

आपण येथे वाचू शकता, 
मराठीत लिहू शकता, 
प्रतिसाद देऊ शकता,
लेख लिहू शकता,
काव्य लिहू शकता,
चर्चेत भाग घेऊ शकता, 
नवीन चर्चा सुरू करू शकता
या, एक वेळ अवश्य भेट द्या.
सदस्य व्हा…..!
गंगाधर मुटे, निमंत्रक

*  *  *

नमस्कार मंडळी,
           आज मिती वैशाख कृ.६ रोज सोमवार दिनांक २३ मे २०११. आकाशात ढग गर्दी करायला लागलेले. रोहिनी नक्षत्राचे आगमन अवघ्या काही तासाच्या अंतरावर येऊन ठेपलेले. अशा या मंगलदायी शुभपर्वावर “बळीराजा डॉट कॉम” या संकेतस्थळाचा शुभारंभ करताना अत्यंत आनंद होत आहे.
           शेती विषय केंद्रस्थानी ठेऊन एखाद्या शेतकर्‍याने एखादे मराठी संकेतस्थळ निर्माण करून ते चालविणे तसे फ़ारच जिकिरीचे काम आहे. मुद्रीत माध्यमातील लेखन वाचण्याशी सुद्धा जेथे हाडाच्या शेतकर्‍याचे हाडवैर आहे तेथे संगणकिय तंत्रमाध्यमात शेतकर्‍यांना सामील करून पुढील वाटचाल करणे किती महाकठीण काम आहे, याची आम्हांस जाणिव आहे. मात्र परिश्रम आणि चिकाटीने हे कार्य सुरू ठेवल्यास, त्यासाठी तंत्रज्ञान विषयक शिबीर आयोजित करून शेतकरीपुत्रांना प्रशिक्षण दिल्यास, प्रचार आणि प्रसार केल्यास जास्तीत जास्त शेतकरी मंडळींना या उपक्रमात सामिल करून घेता येईल, असा विश्वास आहे.
          अनादीकाळापासून ज्या समाजाच्या पिढोन्-पिढ्या स्वत: अबोल राहून इतरांचे ऐकण्यातच गेल्या, त्या समाजाला बोलते करणे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवून पुढील वाटचाल करायचा “बळीराजा डॉट कॉम” या संकेतस्थळाचा मानस आहे. या कामात आपणासर्वांनी आशिर्वाद आणि सक्रिय सहकार्य करावे, अशी कळकळीची विनंती आहे.
          या संकेतस्थळाच्या निर्मीतीत श्री राज जैन यांचे मोलाचे सहकार्य लाभले, त्याबद्दल “बळीराजा डॉट कॉम” च्या वतिने मी व्यक्तिश: आभार मानतो. यापुढेही तांत्रीक सहाय्य त्यांचेकडून वेळोवेळी उपलब्ध होत राहिन अशी आशा बाळगतो.
          या संकेतस्थळाच्या व्यवस्थापन मंडळाची जबाबदारी डॉ. कैलास गायकवाड(मुंबई), श्री. प्रमोद देव(मुंबई) आणि श्री. अनिल मतिवडे(पुणे) यांनी स्विकारली असून त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यात “बळीराजा डॉट कॉम” उत्तरोत्तर प्रगती आणि निहित उद्दिष्टप्राप्तीकडे वाटचाल करेल, याची खात्री आहे.
या मित्रांनो,

काळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो,
उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो,
हक्कासाठी लढणार्‍यांनो,
लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो,
स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो,
नव्या युगाच्या निर्मात्यांनो,
या जरासे खरडू काही,
काळ्याआईविषयी बोलू काही.

* * * * * *

http://www.baliraja.com

श्याम्याची बिमारी

श्याम्याची बिमारी
             श्याम्या म्हणजे एक रोखठोक आणि सरळसोट स्वभावाचा मनुष्य. मनात येईल तसे बेधडक व्यक्त होणे, हे त्याचे गूणवैशिष्ट्य. कणाकणातून ज्ञानार्जन करण्यासाठी त्याचा सदैव प्रयत्न चाललेला असतो आणि तरीही वाचनाच्या बाबतीत श्याम्या मात्र फारच अभागी मनुष्य आहे असे मला वाटते. अभागी या अर्थाने की साहित्यिक क्षेत्रात विपुल साहित्य उपलब्ध असूनही ते जास्तीत जास्त वाचण्याचे भाग्य त्याला फारसे लाभले नाही. कधी आर्थिक स्थितीमुळे पुस्तके विकत न घेऊ शकल्यामुळे तर कधी भौगोलिक स्थितीमुळे त्याच्या संचारप्रदेशात पुस्तके उपलब्ध नसल्यामुळे असे घडले असावे.
पण हे सत्य असले तरी मात्र पुर्णसत्य नाही.
          खरे हे आहे की त्याला एक आजार आहे. आणि तो आजार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उजव्या हाताने जेवण करताना डाव्या हातात पुस्तक घेऊन वाचता-वाचताच जेवण करताना किंवा समोरच्या माणसाशी बोलत असताना सुद्धा त्याची नजर पुस्तकावरच खिळून असल्याचेही मी अनेकदा बघितले आहे. त्याला वाचायला खूप आवडतं, खूपखूप आवडतं. विषयाचेही बंधन नाही, काहीही आवडतं. कथा, कादंबरी, कविता, गझल, लावणी पासून ते हिंदी उपन्यास वगैरे वगैरे…. कशाचे काहीही बंधन नाही.
पण हाती घेतलेले पुस्तक त्याने शेवटापर्यंत वाचून काढले, असे मात्र फारसे घडत नाही. कधी कधी तो पुस्तक घेतो, वाचायला सुरुवात करतोय पण काही पाने वाचून झाली की, त्याला असे वाटते की हे वास्तव नाहीच. या देशातल्या ७० टक्के जनतेचे हे चित्रण नसून या लेखाचा जनसामान्याच्या दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध नाहीये. मग यात वेळ खर्ची घालून अनावश्यक काडीकचरा डोक्यात कोंबण्यात काय हशील आहे? तो असा विचार करतो आणि पुस्तक फेकून देतो.
       कधी कधी तो पुस्तक घेतो, वाचायला सुरुवात करतोय पण काही पाने वाचून झाले की, त्याला असे वाटते की ज्या लेखकाने हे लिहिलेय तो लेखक, त्या लेखकाचे व्यक्तिमत्त्व आणि आचरण त्या लेखात मांडलेल्या विचारांशी, भूमिकेशी प्रामाणिक किंवा सुसंगत नाही. मग जो विचार, भूमिका स्वत: लेखकाला जगता येत नाही त्या विचाराला, “विचार” तरी कसे म्हणावे? थोडा वेळ उत्तर शोधतो आणि उबग आल्यागत पुस्तक फेकून देतो.
         तसे त्याला बालकवींची श्रावणमासी ही कविता फार आवडते कारण त्यात जे श्रावण महिन्याचे वर्णन आले ना, ती केवळ कविकल्पना नसून त्या कवितेतला अद्भुत आनंद त्याला श्रावण महिना सुरू झाला की प्रत्यक्षात अनुभवायला मिळतो.
“सरसर येते क्षणांत शिरवे, क्षणांत फ़िरूनी ऊन पडे”
किंवा 
“झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा! तो उघडे
तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळेपिवळे ऊन पडे”
हे दृश्य केवळ श्रावण महिन्यातच पाहायला मिळते. इतर महिन्यात नाहीच.
कवी, कविता आणि श्रावणमास एकमेकाशी एवढे एकरूप झालेत की त्यांना वेगवेगळे नाहीच करता येणार. त्याला असे वाटते की, कवीने खूप परिश्रम घेतले असणार ही कविता लिहिण्यावर. संपूर्ण श्रावणमासाचे अवलोकन केले असणार, अभ्यास केला असणार आणि कवी श्रावणमासाशी तद्रूप झाला असणार, तेव्हा कुठे ही कविता आकारास आली असावी. कविता लिहून झाल्यावर एवढा प्रदीर्घ काळ लोटला पण अजूनही श्रावणमहिना त्याच कवितेचे अनुसरण करतो आणि तसाच वागतो जसे कवितेत लिहिले आहे.
       याउलट ना. धो. महानोरांची “या नभाने भुईला दान द्यावे” ही कविता तर सर्वांची आवडती कविता. उत्तुंग लोकप्रियता लाभलेली पण श्याम्याला नाहीच आवडत.
तो समर्थनार्थ जे पुरावे सादर करतो तेही जगावेगळे.
        त्याच्या मते नभाने भुईला नेहमीच दान दिलेले आहे. आणि भुईला दिलेल्या दानावर नभ अजूनही ठाम व प्रामाणिक आहे म्हणून तर ही सजीवसृष्टी टिकून आहे. देशाची लोकसंख्या चमत्कारिक गतीने वाढत असतानाही सर्वांना पोटभरून खायला पुरेल आणि सडायलाही शिल्लक साठा उरेल एवढे मुबलक अन्नधान्य या देशात पिकते. नभाचे दान आहे म्हणूनच असे घडते ना?
           मग अतिरिक्त दानाची मागणी करणे याचा अर्थ मातीतून अधिक भरघोस उत्पन्न निघावे अशी अपेक्षा असणार. मग समजा नभाने या अतिरिक्त दानाची आराधना स्वीकारली, भरमसाठ उत्पादन आले आणि जोंधळ्याच्या ताटाला कणसांऐवजी चांदणे, सूर्य आणि चंद्र जरी जखडलेत तरी त्याने काय घडणार आहे, असा श्याम्याचा सवाल आहे. कवीने ज्या शेतकरी समाजाच्या भल्यासाठी हे अतिरिक्त दान मागितले, त्या शेतकर्‍याच्या पदरात काय पडणार आहे? हाच लाखमोलाचा प्रश्न आहे, असे त्याला वाटते. शेतीमध्ये जोंधळ्याच्या ताटाला कणसांऐवजी चांदणे, सूर्य आणि चंद्र जखडायला लागल्याबरोबर प्रचलित व्यवस्थेनुसार कोणतेही सरकार चांदणे, सूर्य आणि चंद्राकडे “शेतमाल” याच दृष्टिकोनातून बघणार, अतिरिक्त उत्पादन येऊनही “ग्राहकासाठी शेतमाल स्वस्तात उपलब्ध झाला पाहिजे” या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने निर्यातबंदी लादणार आणि या सूर्य, चंद्र तार्‍यांना “कांदाभजी किंवा आलुबोंडा” यापेक्षा जास्त भाव मिळणार नाही याची पुरेपूर व्यवस्था करणार. कदाचित शासन रेशनकार्डावर अनुदानित किंमतींत सूर्य, चंद्र तारे उपलब्ध करून देईल. त्यामुळे गल्लोगल्लीत, कचरापेटीत व नालीच्या प्रवाहात सूर्य, चंद्र, तारकांचे ढिगारे साचलेले दिसतील. त्यामुळे मुबलक पिकण्याचे आणि जोंधळ्याच्या ताटाला कणसांऐवजी चांदणे, सूर्य आणि चंद्र लागण्याचे कवीचे स्वप्न साकार होईल.
पण ज्या शेतकर्‍यांसाठी हिरिरीने एवढे मोठे दान मागितले त्याच्या पदरात काय पडणार आहे? शेतात सूर्य, चंद्र, तारे पिकवूनही ते जर मातीमोल भावानेच खपणार असेल तर त्याची दरिद्री आहे तशीच राहणार आहे, सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे. त्या ऐवजी कवीने “या नभाने सरकारला अक्कलदान द्यावे, विजेच्या लखलखाटाने सरकारचे डोके ठिकाणावर यावे, जेणेकरून शेतकर्‍यांच्या दारापर्यंत विकाससूर्य पोहचेल” अशी मागणी करणे जास्त संयुक्तिक नसते का ठरले? त्यातल्या त्यात कवी बिगर शेतकरी असता तर श्याम्याची अजिबात हरकत नव्हती. पण कवी दस्तूरखुद्द शेतकरी असल्याने ही बाब जास्तच गंभीर आहे, असे त्याला वाटते. आणि असे त्याला वाटले की तो डाव्याहातचे पुस्तक तो उजव्या हातात घेतो आणि फेकून देतो.
“काळ्या(काया) मातीत मातीत” ही किती सुंदर कविता. महाराष्ट्रभर गाजलेली. सिनेमावाल्यांना देखील भुरळ पाडून त्यांना त्यांच्या सिनेमात समावेश करण्यास भाग पाडणारी.
          पण श्याम्याला भुरळ पडेल तर तो श्याम्या कसला? त्याच्या मते विठ्ठल वाघासारखे शेतकर्‍याच्या घरात जन्मलेले शेतकरीपुत्र कवी, शेतकर्‍यांच्या वेदना विकून मोठे कवी/साहित्यिक वगैरे झालेत, धन मिळवले, मान मिळवला पण शेतकर्‍याच्या पायातून सांडणारे लाल रगत (रक्त) थोडेफार थांबावे आणि कवीला (श्याम्याला देखील) पडलेले हिरवे सपान (स्वप्न) प्रत्यक्षात खरे होऊन शेतकर्‍याचा घरात आनंदीआनंद नांदावा यासाठी पुढे मग कवीने काहीच प्रयत्न केले नाहीत. ज्या सरकारच्या “शेतकरी विरोधी धोरणांमुळे” ही परिस्थिती उद्भवते, त्या सरकारशी दोन हात करून शेतकर्‍यांचे प्रश्न खंबिरपणे मांडण्याऐवजी सरकारकडून जेवढा काही लाभ उपटता येईल तेवढा उपटण्यातच धन्यता मानली. त्याला हा चक्क बेगडीपणा वाटतो. आणि असे त्याला वाटले की तो हातातले पुस्तक कपाळावर मारून घेतो आणि दूर भिरकावून देतो.
मात्र श्याम्याचे तर्कशास्त्र विचित्र असले तरी तो त्याच्या समर्थनार्थ युक्तिवाद करतो, तो मात्र खरेच बिनतोड असतो.
मी त्याला एकदा म्हटले की, शाम्या तुला कलेचा आस्वाद घेताना त्यातील उपयुक्ततेचाच शोध घेण्याची सवय जडली आहे. कलेचा पैस किती मोठा असू शकतो याचा तुला अंदाज आलेला नाही. अरे Rita Mae Brown यांनी असे म्हटलेय की “Art is moral passion married to entertainment. Moral passion without entertainment is propaganda, and entertainment without moral passion is television.”  त्यामुळे तुला कलेचा आस्वाद घेण्यासाठी तुझे मन मोठे करण्याची गरज आहे!
त्यावर शाम्या उसळलाच आणि म्हणाला की कलेचा पैस किती मोठा असू शकतो याचा मला अंदाज आलेला नाही, असे मोघमपणे म्हणता येणार नाही. तसे असते तर मी पुस्तकाला हातच लावला नसता. माझे मुळ दु:ख, या देशातल्या सत्तर टक्क्यापेक्षा जास्त असलेल्या आम जनतेचे साहित्यामध्ये विपरीत उमटणारे प्रतिबिंब, त्यांच्या समस्यांची सोडवणूक होण्यापेक्षा गुंतागुंत वाढविणारा आशय, त्यांच्या समस्यांकडे इतरांनी पाहण्याचा दूषित दृष्टिकोन, त्यात आढळणारा बेगडीपणा यात दडलेले असावे कदाचित.
श्याम्याच्या मते लेखनासाठी दोन पर्याय असू शकतात.
१) लिहिणार्‍याने वाटेल तसे लिहीत राहायचे, ते इतरांवर लादत राहायचे आणि जर त्यांनी नाराजीचा, नावडल्याचा सूर काढला तर त्यांना “कलेची कदर नाही” अशी त्यांची संभावना करायची.
२) लिहिणार्‍यांनी आत्मपरीक्षण आणि अभ्यास करून तळागाळातल्या जनसामान्यांचे जीवन कसे सुकर होईल, याचा वेध घेऊन लिहिण्याचे कसब अंगी बाणण्याचा प्रयत्न करणे. जे काही लिहायचे, ते लिहिताना त्या लिखाणाचे समाजावर काय बरे वाईट परिणाम होतील याचाही थोडाफार विचार करायचा. ज्वलंत विषय हाताळायचे असेल तर शक्य तेवढा त्या विषयाच्या आतखोलवर शिरायचा प्रयत्न करायचा. आणि नंतरच लिहायचे.  
दोनपैकी तुलनेत पहिलाच पर्याय सोयीचा व विनाकष्टाचा असल्यानेच कदाचित अनादीकाळापासून हाच मार्ग अवलंबीला जात असावा, असे श्याम्याचे मत आहे.  
शाम्याच्या विचारांना काही लोक एकांगी मानतात. पण शाम्याला हे मान्य नाही. याउलट भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतकर्‍यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांना बगल देऊन केलेले लेखन किंवा सरकारची मर्जी राखण्यासाठी धडपड करून जाणीवपूर्वक केलेले लेखनच एकांगी मानायला हवे असे शाम्याचे आग्रही मत आहे.
आणि म्हणून जेथे संधी मिळेल तेथे त्याचं सदैव एकच आणि एवढंच तुणतुणं वाजत असते.  
त्यातूनच त्याला बिमारी जडली.  
नको तसा विचार करणे आणि त्याचा राग पुस्तकावर काढणे.
या प्रकाराला कुठला आजार किंवा विकार म्हणावे बरे?
                                                        गंगाधर मुटे
…………………………………………………………………………                                              

कवीश्रेष्ठ जगदिश खेबूडकरांना विनम्र श्रद्धांजली….!

कवीश्रेष्ठ जगदिश खेबूडकरांना विनम्र श्रद्धांजली….!

जगदिश खेबूडकर

(छायाचित्र मी-मराठीच्या सौजन्याने.)
             एक काळ असा होता की, मराठी चित्रपटगीत म्हटलं की गीतकार म्हणून हमखास जगदीश खेबुडकर यांचंच हमखास नाव असायचं. मराठी गीत विश्वात त्यांची जेवढी गीतं लोकप्रिय झालीत आणि जनसामान्यांच्या ओठावर खेळलीत, तेवढी खचितच कुणाची झाली असेल. अत्यंत सोप्या शब्दात पण गुणगुणतांना आनंद देणारी गीतरचना करण्यात जगदीश खेबुडकर यांचा हातखंडा होता. या कवीकडे शब्दाची वानवा नव्हती. एखाद्या गीताला न्याय देतांना ते कधी कुठेही कमी पडल्याचे जाणवले नाही. भरीचे शब्द घालून किंवा एखादी ओळ पूर्ण करतांना शब्दांची ओढातान झाली, असेही कधी जाणवले नाही.
ग.दि.माडगुळकर आणि जगदीश खेबुडकर हे माझे अत्यंत आवडते कवी-गीतकार राहिले आहेत.
कवीश्रेष्ठ जगदिश खेबूडकरांना माझी विनम्र श्रद्धांजली….!

शेतीची सबसिडी आणि “पगारी” अर्थतज्ज्ञ

शेतीची सबसिडी आणि “पगारी” अर्थतज्ज्ञ


सबसिडी कुठाय?
गेल्या अनेक वर्षापासून मी ऐकत आलोय की शेतीला भरमसाठ सबसिडी दिली जातेशाळाकॉलेजात शिकत असताना पहिल्यांदा शेतीची सबसिडी’ हा शब्द ऐकण्यावाचण्यात आलाअगदी तेव्हापासून मी शेतीत सबसिडी कुठे आहे म्हणून शोधण्यासाठी जिवाचा आटापिटा करत बसलोयपण मला काहीकेल्या ही शेतीतली सबसिडी गवसतच नाहीयेबहुतेक तळहातावरच्या केसासारखीच ही शेतीची सबसिडी’ सुद्धा अदृश्य स्वरूपात अस्तित्वात असते की कायकिंवा मीच तर अंधार्‍या खोलीत नसलेले काळे मांजर शोधत बसलो नाही नाअसा एक प्रश्न आजकाल माझा मलाच पडायला लागला आहेशिवाय शेतीला सबसिडी आहेही बाब निखालस खोटी आहेअसे म्हणण्याचे धाडसही मी करू शकत नाही कारण शेतीची सबसिडी’ हा शब्द उच्चारणारी माणसे सामान्य नसतात. सर्वसाधारण माणसे या शब्दाचे उच्चारणं करीत नाहीत
शेतीला भरमसाठ सबसिडी दिली जाते’ या विषयावर बोलणार्‍यांची नावे बहुधा नागडी नसतात. त्यांचे नावासमोर प्राडॉअ‍ॅड. बॅकॉमानायापैकी काहीना काही तरी लागलेले असतेचआणि जर का यापैकी काहीही नसलेच तर त्या व्यक्तीची तज्ज्ञपत्रकार, लेखक किंवा थोर मानसेवी समाजसेवक म्हणून समाजाने ओळख तरी मान्य केलेली असतेच. ही माणसे जे काही बोलताततेच प्रमाण मानण्याची अनुकरणीय शिकवण आमच्यासारख्या दळभद्री सामान्यजनांना आमच्या पालकांकडून आणि शाळा-कॉलेजातील “पगारी” गुरुवर्यांकडून मिळालेली असल्याने अगर तूम दिनको रात कहे, तो हम रात कहेंगे” असे म्हणण्याखेरीज अन्य काही पर्यायही आमच्यासमोर उपलब्ध नसतो.
आम्हाला जे काही शिकविले जातेते शिकविणार्‍याने पुस्तक वाचून शिकविलेले असतेपुस्तकात जे लिहिले आहेते वास्तवाला धरून आहे की निव्वळ कल्पनाविलासाचे मनोरे आहेत याची शहानिशा त्याने केलेली नसतेच किंबहुना त्याला तसा अधिकारही नसतोचशिवाय ज्याने पुस्तक लिहिले ते त्या विषयातले अनुभवसमृद्ध व्यक्तिमत्त्व असतेचअसेही नाहीएखाद्या विषयाच्या अभ्यासाला अनुभूतीची जोड मिळविण्यासाठी वणवण भटकून, विषयाच्या खोलात शिरून, वास्तविक जीवनमानाशी ताळमेळ जुळविण्याकरिता आयुष्यातील पाचपंचेविस वर्ष खर्ची घातले आणि मग त्या अनुभवअनुभूतीशी वैचारिक सांगड घालून पुस्तक लिहिले, असेही घडलेले नसते.
एखाद्या विषयाचे पुस्तक लिहायचे म्हणजे काय करायचे असतेतर त्या विषयाशी निगडित आधीच लिहिली गेलेली पुस्तके गोळा करायचीत्या पुस्तकातील उतारेच्या उतारे उचलून नव्याने मांडणी करायचीत्यावर लेखक म्हणून आपले नाव घालायचे आणि पुस्तक छापून मोकळे व्हायचेपुस्तकात जे लिहिले आहे त्याचे स्पष्टीकरण करता आले नाही तर नाचक्की होऊ नये म्हणून “हे मी म्हणत नाहीदुसराच कोणीतरी म्हणतो” असे भासवण्यासाठी पुस्तकाच्या शेवटच्या पानावर संदर्भग्रंथसुची छापून मोकळे व्हायचे. ही असते पुस्तके लिहिण्याची सरळसोट पद्धत आणि अशा तर्‍हेने लिहिलेली पुस्तकेच शाळाकॉलेजात अभ्यासक्रमासाठी आधारभूत पाठ्यपुस्तके म्हणून निवडली जाताततेच आम्ही शिकतो आणि त्याच पुस्तकी ज्ञानाच्या आधारावर स्वत:ला विषयतज्ज्ञ म्हणून मिरवत असतो.
शेतीला सबसिडी
शेतीला भरमसाठ सबसिडी दिली जातेअर्थसंकल्पात भरीव तरतूद करून शेतीला मोठ्या प्रमाणावर अर्थसाहाय्य केले जाते, असा एक सरसकट सर्वांचा समज आहेआणि हा समज दृढ होण्यामागे वास्तवापासून फ़ारकत घेतलेल्या पुस्तकीज्ञानाचा बडेजावच प्रामुख्याने कारणीभूत आहेअसे खेदाने म्हणावे लागत आहे.
शेतीला सार्वत्रिक स्वरूपात कुठेहीकशातही आणि कोणत्याच मार्गाने थेट सबसिडी दिली जात नाहीया भारत देशाच्या कोणत्याही कोपर्‍यात नव्याने शेती करण्यासाठी किंवा आहे त्या शेतीचा विस्तार करण्यासाठी किंवा अधिक उत्पन्न घेण्यासाठी उत्तेजन म्हणून उद्योगाला दिली जाते त्या धर्तीवर कुठलीच सबसिडी दिली जात नाही किंवा अशा तर्‍हेची शेतकर्‍यांना सरसकट सबसिडी देणारी, ज्यात देशातील एकूण शेतकरीसंख्येपैकी किमान नव्वदपंचाण्णव टक्के शेतकर्‍यांना लाभ होईल अशा तर्‍हेची कोणतीही यंत्रणा अथवा योजना’ याआधीही अस्तित्वात नव्हती आणि आजही नाही.
सबसिडी कंपन्यांना
          शेतकर्‍यांना शेती परवडावी आणि गोरगरीबांना अन्नधान्य स्वस्तात मिळावे म्हणून शेतकर्‍याला सबसिडी दिली जाते असे वारंवार म्हटले जातेपण हे अर्धसत्य आहेकारण शेतकर्‍याला किंवा शेतमालास प्रत्यक्ष सबसिडी दिली जात नाहीशेतीसाठी लागणार्‍या काही निविष्ठाऔजारे यावर सबसिडी दिली जाते पण ती शेतकर्‍यांना नव्हे तर उत्पादक कंपन्यांना दिली जातेरासायनिक खते शेतकर्‍यांना कमी दरात उपलब्ध व्हावे म्हणून रासायनिक खते उत्पादक कंपन्यांना केंद्र सरकार सबसिडी देते. आणि या सबसिड्यांचा फायदा कंपन्यांना होतो, शेती किंवा शेतकर्‍यांना नाही.
      अप्रत्यक्षपणे मिळणार्‍या आणखी काही सबसिडी आहेतपण त्याचा लाभ शेतकर्‍यांपेक्षा इतर घटकांनाच जास्त होतोजिल्हा परिषदेला काही शेतकी औजारे सबसिडीवर असतात त्याचा फायदा पुढारी आणी त्यांचे हस्तक यांनाच होतोसाधा स्प्रे पंप पाहिजे असेल तर त्यासाठी जि..सदस्याचे अलिखित शिफारसपत्र लागतेसरसकट सर्व शेतकर्‍यांना किंवा गरजू शेतकर्‍यांना काहीही उपयोग होत नाहीशिवाय या अनुदानित औजारांची संख्या गरजू शेतकर्‍यांच्या तुलनेत एक हजारांश किंवा एक लक्षांश देखिल नसते त्यामुळे अशा सबसिडींचा शेतकर्‍यांना फायदा होतो असे म्हणणे शुद्ध धूळफेक ठरते.
      कृषी विभागाच्या काही योजना असतात उदामच्छीतलावसिंचन विहिरीमोटारपंप वगैरेपण यामध्ये आदिवाशी शेतकरी, भटकेविमुक्त जातीजमातीचे शेतकरीअसे वर्गीकरण असतेम्हणजे या योजनेचे स्वरूप शेतकरीनिहाय नसून जातीनिहाय असतेत्यामुळे अशा योजनांमध्ये शेतकरी सोडून इतरांचीच गरिबी हटतेस्थानिक पुढारी अधिकार्‍यांशी संगनमत करून हात ओले करून घेतातत्यामुळे ज्याच्या शेतात विहीर नाही त्याला मोटारपंप मिळतो आणि ज्याच्या शेतीत फवारणीची गरज नाही त्याला स्प्रेपंप मिळतोअशा अनावश्यक वस्तू फुकटात मिळाल्याने एक तर त्या जागच्या जागी गंजून जातात किंवा तो शेतकरी येईल त्या किमतीत विकून मोकळा होतोअशा योजनांमध्ये सुद्धा लाभार्थी निवडायची संख्या गरजू शेतकर्‍यांच्या तुलनेत एक लक्षांश देखिल नसते.
      शासनाच्या अर्थसंकल्पात शेतीसाठी भरीव तरतूद केली म्हणून बराच गवगवा होतो. पण ती सर्व तरतूद कृषी विभागाचे कर्मचारी यांचे पगार, भत्ते, वाहनखर्च यातच खर्च होत असावी. शेतकर्‍यांपर्यंत पोचतच नाही. अर्थसंकल्पात शेतीसाठी म्हणून केलेली संपूर्ण तरतूद कृषी विभाग व कृषिविद्यापिठे यांच्या व्यवस्थापनावरच खर्च होत असावी. या अर्थसंकल्पिय तरतुदींचा दुरान्वयानेही शेतकर्‍यांशी सबंध येत नाही.
      दुभती जनावरे, कुक्कुटपालन, मेंढीपालन व ट्रॅक्टर साठी वगैरे कधीकधी थोडीफार सबसिडी दिली जाते, पण याला शेती म्हणता येणार नाही, हे शेती संबंधित व्यवसाय आहेत. त्यामुळे याला शेतीसंबधित व्यवसायाला सबसिडी असे म्हणावे लागेल. शेतीला सबसिडी कसे म्हणता येईल? शिवाय यातही लाभधारकाचे प्रमाण एक लक्षांश देखील नसते.

      प्रत्यक्षात 
शेतकरी घटक’ म्हणून या देशात सार्वत्रिक स्वरूपात शेतकर्‍याला फुकट काहीच मिळत नाहीअशा परिस्थितीत सरसकट शेतकर्‍यांना फुकट किंवा अनुदानित खायची सवय पडली म्हणून कष्ट करण्याची प्रवृत्तीच कमी झाली असा समज करून घेण्यामागे किंवा असा समज करून देण्यामागे काय लॉजिक आहेएकंदरीत शेतकी संबंधित सबसिडीचा विचार करता शेतकर्‍याला काही फायदा होतोअसे दिसत नसतानात्या तुलनेत शेतकी सबसिडीचा ज्या तर्‍हेने डंका पिटला जातोत्याला ढोंगीपणा म्हणू नये तर काय म्हणावे?
याउलट,
औद्योगिक क्षेत्राला मात्र भरमसाठ सबसिडी
      याउलट औद्योगिक क्षेत्राला मात्र भरमसाठ सबसिडी दिली जातेलघु उद्योगांना २५ ते ३५ टक्के रोख स्वरूपात सबसिडी दिली जातेया साठी विविध शासकीय योजना आहेतखादी ग्रामोद्योगजिल्हा लघु उद्योग केंद्र किंवा यासारख्या अनेक शासकीय यंत्रणा आहेतपंतप्रधान स्वयंरोजगार योजनेअंतर्गत लघु उद्योगासाठी २५ लाख रुपये कर्ज घेतल्यास त्यावर ३५ टक्के म्हणजे चक्क ८ लाख ७५ हजार एवढी सबसिडी दिली जातेमोठ्या उद्योगांच्या विस्तारीकरणासाठी करोडो रुपयांची सबसिडी दिली जाते.
वेतनधारक व जनप्रतिनिधींनाही सबसिडी
      शासकीय वेतनधारकांना श्रमाचा मोबदला म्हणून वेतन दिले जाते. आमदारखासदारमंत्रीजनप्रतिनिधी यांना श्रमाचा मोबदला मानधन’ या स्वरूपात दिला जातोवेगवेगळे भत्ते दिले जातातवेतनमानधन आणि भत्ते यांना सबसिडी किंवा अनुदान मानले जात नाहीपण येथे एक बाब महत्त्वाची ठरावी ती अशी कि यांना वेतनमानधन आणि भत्ते या पोटी मिळणारी रक्कम श्रमाच्या मोबदल्याच्या तुलनेने शेकडो पटींनी जास्त असतेशासकीय कर्मचारी आणि जनप्रतिनिधींना वेतनमानधन स्वरूपात मिळणारी प्रत्यक्ष रक्कम ही किमान वेतन कायद्यानुसार महिन्याचे एकूण कामाचे तास या हिशेबाने तयार होणार्‍या आकड्याच्या रकमेपेक्षा कैकपटींनी जास्त असतेही वरकड रक्कम एका अर्थाने सबसिडी किंवा अनुदान याचेच अप्रत्यक्ष रूप असतेहे मान्य करायला जड का जात आहे?
शहरी नागरिकानंही सबसिडी
      शेतीचे ओलीत करण्यासाठी शेतकरी शेतात स्वश्रमाने किंवा बॅंकेकडून वा खाजगी सावकाराकडून व्याजाने कर्ज घेऊन विहीर खणतो. या कामात शेतकर्‍याला कसलीच सबसिडी किंवा अनुदान मिळत नाही. त्यावर बॅंका कायदा बासनात गुंडाळून चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी करते. थकबाकीदार झाला की त्याच्या शेतीचा लिलाव करून त्याला भूमिहीन करते. शेतकर्‍याला पिण्याच्या पाण्यासाठी विहीरही स्वखर्चानेच किंवा लोकवर्गणी करूनच करावी लागते. आणि जर का दुष्काळ पडून त्या विहिरी आटल्या तर आमच्या मायबहिनिंना कित्येक किलोमीटर अंतरावरून डोक्यावर पाण्याच्या घागरी घेऊन पाणी आणावे लागते.
      याउलट शहरी माणसाला पिण्याच्या पाण्याची सोय करताना शारीरिक श्रम करून विहीर खोदावी लागत नाही. बॅंकेकडून कर्ज काढून नजिकच्या नदीवरून पाईपलाईन टाकून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागत नाही. मायबाप सरकारच सरकारी तिजोरीतूनच अब्जावधी रुपये खर्च करून “पाणीपूरवठा योजना” राबवते. शहरी माणसाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जर स्वत:लाच करावी लागली असती तर त्याला त्याच्या कुटुंबापुरते पाणी नदीवरून आणायला काही लाख किंवा काही करोड रुपये खर्च आला असता. शिवाय पाणी शुद्धीकरणासाठी खर्च आला असता तो खर्च वेगळाच. बिगर शेतकरी वर्गाला विशेषतः शहरी नागरीकाला शासन जेवढ्या सुखसुविधा पुरविते ती एका अर्थाने अप्रत्यक्ष सबसिडीच असते. या तुलनेने शेतकर्‍याला काहीही फुकट किंवा सवलतीच्या दराने पुरवले जात नाही. उदा. बिगर शेतकरी माणसाला स्वयंपाकाचा गॅस सवलतीच्या दराने पुरवला जातो. शेतकर्‍याला स्वयंपाकासाठी लाकूड-इंधन-सरपण गोळा करायला खर्च येतो, घरात सरपण काही फुकट येत नाही, त्याला फोडायलाही खर्च येतो. त्यावर कुठे सबसिडी दिली जाते?
म्हणजे ज्यांना बराच काही लाभ होतो, त्याची साधी चर्चा देखील होत नाही. अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात वस्तुस्थिती विशद करणारे प्रतिबिंब उमटले जात नाही. आणि ज्याला काहीच दिले जात नाही, त्याला खूप काही देत आहोत, असा डांगोरा पिटला जातो.
धन्य आहेत ते विद्वान महापंडित आणि आमचे “पगारी” अर्थतज्ज्ञ…….!!
काय करावे या “पगारी” अर्थतज्ज्ञांचे? यांचे पाय धुऊन तीर्थ प्यावे की शेतकर्‍यांनी आपल्या चामडीचे पादत्राणे बनवून यांच्या पायात घालावे? शेतकर्‍यांनी नेमके काय करावे म्हणजे या “पगारी” अर्थतज्ज्ञांचे पाय वास्तववादी जमिनीला लागतील?
*   *   *
ताजा कलम :- माफ करामी विसरलो होतोएक गोष्ट मात्र शेतकर्‍याला अगदी फुकटात मिळते.
पीळदार मिशी बाळगणार्‍या शेतकर्‍याच्या घरात जर त्याची बायको गर्भवती असेल तर तिच्या गर्भसंवर्धनासाठी तो पीळदार मिशी बाळगणारा शेतकरी अपात्र आहे असे गृहीत धरून आमचे मायबाप राज्यकर्ते फुकटात मूठभर लोहाच्या लाल गोळ्या तिच्यासाठी घरपोच पाठवतातअगदी दर महिन्यालान चुकता ………! 
आणि
आमची लुळीलंगडीपांगळी मानसिकता पुढार्‍यांच्या साक्षीने टाळ्यांचा कडकडाट करते ….!
…… तुम्ही पण टाळ्या वाजवा….!!
….. बजाओ तालियां….!!!
…… Once more, Take a big hand…..!!!!

                                           गंगाधर मुटे
……………………………………………………………………..