सारे जुनेच आहे, काही नवीन नाही
विश्वासपात्र उरला तो मात्र चीन नाही
उत्तुंग झेप घे पण दमने नको कधीही
सांभाळण्यास बाळा वरती जमीन नाही
समजू नका कुणीही त्याला गरीब निर्धन
झाले अजून त्याचे पावित्र्य दीन नाही
आहे जरी घमंडी, उद्धट ज़रा जरासा
पण तो तुझ्याप्रमाणे, मित्रा कमीन नाही
“खावू लुटून मेवा” हे ब्रीद शासकांचे
क्लुप्ती जमेच ना ते सत्ताधुरीन नाही
तोडीस तोड उत्तर जमले बघा मलाही
आता पुढील चर्चा मुद्देविहीन नाही
स्वातंत्र्ययुद्ध अथवा संग्राम कोणताही
लढतात तेच जे-जे हुजरेकुलीन नाही
अख्त्यार भावनेच्या जगतो ‘अभय’ असा ‘मी’
हसणे अधीन नाही, रडणे अधीन नाही
– गंगाधर मुटे
————————————————