श्रिकन्ता कमळाकन्ता : हादग्याची गाणी

श्रिकन्ता कमळाकन्ता : हादग्याची गाणी

श्रिकन्ता कमळाकन्ता अस कस झाल
अस कस वेड माझ्या कपाळि आल

वेडियाच्या बायकोने केल्या होत्या करन्ज्या
तिकडुन आला वेडा त्याने निरखुन पाहिले
होडि होडि म्हणुन त्याने पाण्यात सोडले

श्रिकन्ता कमळाकन्ता …

वेडियाच्या बायकोने केल्या होत्या शेवया
तिकडुन आला वेडा त्याने निरखुन पाहिले
अळ्या अळ्या म्हणुन त्याने टाकुन दिले .

श्रिकन्ता कमळाकन्ता …

वेडियाच्या बायकोने केले होते लाडु
तिकडुन आला वेडा त्याने निरखुन पाहिले
चेण्डू म्हणुन त्याने खेळाय्ला घेतले

श्रिकन्ता कमळाकन्ता …

वेडियाचि बायको झोपली होति पलन्गावर
तिकडुन आला वेडा त्याने निरखुन पाहिले
मेली मेली म्हणुन त्याने जाळुन टाकले

श्रिकन्ता कमळाकन्ता …

(केदार जाधव “मायबोलीकर” यांचे सहकार्याने.)

कमळे कमळे : हादग्याची गाणी

कमळे कमळे : हादग्याची गाणी

कमळे कमळे दिवा लाव
दिवा गेला वार्‍यानं
कमळीला नेलं चोरानं
चोराच्या हातातुन सुटली
बाजेखाली लपली
सासुबाईंनी देखली
मामांजीनी ठोकली…

(आश्विनी डोंगरे यांचे सहकार्याने.)

मराठीभाषा : शुद्धी आणि समृद्धी

मराठीभाषा : शुद्धी आणि समृद्धी

८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.द.भि.कुळकर्णी यांनी त्यांच्या भाषणामध्ये भाषा शुद्धी आणि समृद्धतेच्या अनुषंगाने काही मौलीक विचार व्यक्त केले आहेत. त्यावर अधिक चर्चा होऊन भाषालेखनासंबधात काही निटनेटके,सुस्पष्ट आराखडे तयार होणे गरजेचे आहे.

मी साहित्यीक नाही,पण अधून-मधून गद्य-पद्य लिखान करण्याची उर्मी काही पिच्छा सोडत नाही त्यामुळे फ़ुटकळ स्वरूपात का होईना लिखान चालूच असते त्यामुळे मी साहित्यीक नसलो तरी साहित्यापासून अलिप्तही नाही.
भाषेची शुद्धता आणि समृद्धी या दोन्ही अंगाचा विचार करतांना दोन्ही बाबी लवचिक असल्या तरच दोन्हीचा समन्वय साधून भाषाविकास साधला जाऊ शकेल.

शुद्धतेचा ध्यास हवा पण भाषेच्या समृद्धीसाठी नवनविन शब्दांचा स्विकार करण्यासाठी दरवाजे सताड उघडे असले पाहीजेत. परभाषेतील काही शब्द मायभाषेत वापरतांना निसंकोच वापरले गेले पाहीजेत कारण त्या शब्दांना मराठीत पर्यायी शब्द असेलच याची शाश्वतीच नसते. जसे की एन्डोसल्फ़ान, सायपरमेथ्रीन, पॅरासिटामॉल वगैरे. तर काही शब्दांना मराठीत पर्यायी शब्द तयार केले जाऊ शकते जसे की सॉफ़्टवेअर,हार्डडिस्क, ब्लॉग वगैरे. पण ह्या संशोधनाचा उगम ज्या भाषेत झाला असेल, सहाजीकपणे त्याच भाषेतील शब्द प्रथम सर्वश्रुत होतात.ब्लॉग या शब्दाने जेवढा लवकर बोध होईल तेवढा बोध अनुदिनी या शब्दाने होणार नाही हे उघड आहे. तरी पण हे मराठीशब्द शक्य तेवढे वापरायलाच हवे. मात्र तसा अट्टाहास धरणे फ़ारसे लाभदायक ठरणार नाहीत.

याउलट मराठी भाषेच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या मराठी बोली बोलल्या जातात. त्या स्थानिक बोलीभाषा असल्यातरी समृद्ध आहेत.प्रत्येक बोलीभाषेचे स्वत:चे शब्दभांडार आहेत. स्वत:ची ढब,ठेवन आहे. या बोलीभाषेमध्ये असे अनेक शब्द आहेत की त्याला पर्यायी शब्द प्रमाणभाषेमध्ये आज उपलब्ध नाहीत.उदाहरणार्थ,

विदर्भात मुख्यत्वे वर्‍हाडी आणि झाडी भाषा बोलली जाते हे सर्वश्रुत असले तरी नागपुर,वर्धा आणि आसपासच्या क्षेत्रात जी भाषा बोलली जाते ती ना झाडीबोली आहे ना वर्‍हाडबोली आहे,तर ती स्वतंत्र बोलीभाषा आहे. ज्याला मी नागपुरी बोली म्हणतो. ही नागपुरीबोली सुद्धा परिपुर्ण,समृद्ध बोली आहे. या बोलीत बोलतांना एखादा शब्द नसल्याने मी कुठे अडखळलो अथवा जे म्हणायचे होते तसे सक्षमपणे बोलताच आले नाही, असे कधी घडल्याचे मला स्मरत नाही. पण या बोलीमधील चांगले- चांगले शब्द सुद्धा प्रमाणभाषेत आलेले नाहीत.

उदा :- टोंगळा,घोटा,वज,हिडगा,गंज,गुंडी,कोपर,भेद्रं,चारं,टेंबरं,धान,आंबिल,सुतना,मनिला,खकाणा,भोकणा,
लमचा,इच्चक,चेंगड,सांडशी,बुहारा,पिलांटू,बंबाड,लल्लाऱ्या,माहुरा,बोथर,टालगी,जित्रुब,पहार,बाज,
जुप्न,सुदा,नावकुल,नावनाव,बंदा,सप्पा,सिद्दा,अध्धर,दाल्ला,ऐनक,बेकुब,मेकुड,आव,कवटा,खाती,
कंदोरी,शायवान,तुत्या,इरित,वार्त,वार्ती हे सर्व अर्थबोधक शब्द असूनही यापैकी बहूतांश शब्दांना प्रमाणभाषेत अजिबात पर्यायी शब्द नाहीत.

टोमॅटोला भेद्र हा पर्यायी शब्द प्रमाणभाषा का स्विकारीत नाही हे गौडबंगालच आहे.
असे नविन शब्द प्रमाणभाषेत रूजविने फ़ारसे कठीन काम नाही. लिखान करतांना ते वापरले पाहीजेत आणि सर्वांना कळावे यासाठी तळटीप देऊन अर्थ दिले पाहीजेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी मराठीभाषा शुद्धी आणि समृद्धतेची अपेक्षा व्यक्त केली तर त्यासाठी सर्वांनी काही ना काही प्रयत्न करून अमलात आणले पाहीजेत आणि त्या पदाची बुज राखली पाहीजे. तोच त्या पदाचा यथोचित सन्मान ठरेल असे मला वाटते.

गंगाधर मुटे

कशी अंकुरावीत आता बियाणे?

कसे अंकुरावे अता ते बियाणे?

भुईला दिली ओल नाही ढगाने
कसे अंकुरावे अता ते बियाणे?

दशा लोंबताना तिच्या लक्तरांच्या
कुणी का हसावे? कुबेराप्रमाणे

दगाबाज झाले तुझे शब्द सारे
अता हे फ़ुकाचे कशाला बहाणे?

निखारे विझूनी कशी राख झाली?
अता चेतवू मी मशाली कशाने?

तिजोरी कुणाची उधळतो कुणी तो
अमर्याद झाली तयांची दुकाने

नको रत्न मोती न पाचू हिरे ते
‘अभय’ ते खरे जे मिळाले श्रमाने

                             गंगाधर मुटे
………………………………………..
(वृत्त – भुजंगप्रयात )
………………………………………..

हक्कदार लाल किल्ल्याचे

हक्कदार लाल किल्ल्याचे…!

या देशाचे पालक आम्ही
सच्चे कास्तकार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे
आम्हीबी हकदार रे ………..||धृ||

लढले बापू-लाल-बाल ते
सुराज्याच्या जोषाने
क्रांतीकारी शहीद झाले
रक्त सांडुनी त्वेषाने
स्वातंत्र्याचा लढा रंगला
चेतुनी अंगार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे
आम्हीबी हकदार रे ………..||१|| 

विदेशींनी हक्क सोडता,
केला ताबा देशींनी
केवळ खुर्ची बदलून केले,
वेषांतर दरवेशींनी
परवशतेच्या बेड्या आम्हा,
कितीदा छळणार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे,
आम्हीबी हकदार रे ………..||२|| 

शेतकर्‍यांच्या,कामकर्‍यांच्या,
पोशिंद्याच्या पोरा ये
फ़ुंकून दे तू बिगुल आता,
नव्या युगाचा होरा घे
भारतभूचे छावे आम्ही,
अभयाने झुंजणार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे,
आम्हीबी हकदार रे ………..||३|| 
  
                            गंगाधर मुटे
…………………………………

काळी चंद्रकळा : हादग्याची गाणी

काळी चंद्रकळा : हादग्याची गाणी

काळी चंद्रकळा नेसु कशी?
गळ्यात हार घालू कशी?
ओटीवर मामांजी जाऊ कशी?
दमडिचं तेल आणु कशी?

दमडीचं तेल आणलं
सासुबाईंचं न्हाणं झालं
वन्सन्ची वेणी झाली
भावोजींची दाढी झाली
मामांजींची शेन्डी झाली

उरलेलं तेल झाकुन ठेवलं
लांडोरीचा पाय लागला
वेशीबाहेर ओघळ गेला
त्यात हत्ती वाहून गेला

सासुबाई सासुबाई अन्याय झाला
दुध्-भात जेवायला वाढा
माझं उष्ट तुम्हीच काढा.

(संकलन : आश्विनी डोंगरे)

…(मायबोलीवरून साभार.)

हताश औदुंबर

हताश औदुंबर

ऐल तीरावर लाल शिरावर,लुकलुकता घेऊन
निळा पांढरा थवा चालला, रजःकण पांघरून
ढोलं-चौघडे, बोल बडबडे, खाकी गर्दी पुढे
सरावल्यांची पोपटपंची, गगन भेदुनी उडे

पैल तीरावर पत्र घरावर, तुळशीचे ठेवून
बेत शिजविला,देह निजविला, काळघुटी घेऊन
अभागीनीचे कुंकूम पुसता, अचेतन ती पडे
पोशिंद्याचा बाळ भुकेला, तिच्या उराशी दडे

दोन तीरांना अभये धारा, विलगे निरंतर
पाने गाळुनी मुंडण करितो, हताश औदुंबर

                                          गंगाधर मुटे
………… **………….. **………….**…….
(“त्या” सर्व हजारो स्वर्गिय शेतकर्‍यांना
भावपुर्ण श्रद्दांजलीसह सादर समर्पित.)

……………………………………………..

भाषेच्या गमतीजमती-भाग-२

भाषेच्या गमतीजमती-भाग-२

आमच्याकडे बोलतांना-लिहितांना “मला जाग आला” असे म्हणतात.
मी पण तसेच म्हणतोय.
पहिल्यांदा मी सुरेश भटांचे “पहाटे पहाटे मला जाग आली” हे गीत ऐकले तेव्हा भटांचे भाषाविषयक ज्ञान कमजोर आहे असाच माझा समज झाला होता.
पण जेव्हा ”जाग” हा स्त्रीलिंगी शब्द आहे हे कळले तेव्हा माझीच बंडी उलार झाली.
आमच्या नागपुरी गावरान भाषेत जाग या शब्दाला “चेव” हा पर्यायी शब्द आहे आणि तोच वापरात आहे.
त्यामुळे “मला चेव आला” हे गांवढळ वाटले तरी शुद्ध वाक्य आहे.
तसेच “तो जागा आहे काय?” या ऐवजी “तो चेता आहे का?” असे म्हणतात.
पण जसजसा अशिक्षित समाज शिक्षितांच्या सानिध्यात यायला लागला तसतसे त्यांनी नवनवे शब्द ऐकून जाणिवपुर्वक आत्मसात केलेत. शब्द शिकता आलेत पण व्याकरण बोंबलले. कारण त्यांनी
“मला चेव आला” हे वाक्य फक्त शब्दबदल करून “मला जाग आला” असे उच्चारले.
आणि शुद्ध बोलण्याच्या नादात मुळात शुद्ध असलेलं वाक्य अशुद्ध करून टाकलं.
.
करू जाता काय, उलटे झाले पाय. आहे ना गंमत?
मी पण तसेच म्हणतोय. काय करणार? माझ्या सभोवताल सगळेच “जाग आला” असे म्हणत असतांना मी एकट्यानेच “जाग आली”
असे म्हणायचे ठरवले तर ते मलाच “वाटोळे” बोलल्यासारखे वाटते.

.
गंगाधर मुटे

कान पिळलेच नाही

कान पिळलेच नाही


उपदेशाने कान कसे पिळलेच नाही
माझे बहिरेपण त्याला कळलेच नाही

निग्रहाचे धडे दिले विपरीत दशेने
पानगळीतही मग पान गळलेच नाही

वेदनांचा काढा मग गटागटा प्यालो
तेव्हापासून व्यथांनी छळलेच नाही

चिरंतन असती बोल संत साहित्याचे
अनीतीच्या शेकोटीत जळलेच नाही

श्रावणात घननिळे जरा पिघळले होते
पुन्हा त्यांचे थेंब कसे वळलेच नाही

जनसेवेचा प्रताप आणि ’अभय’ पुरेसे
शुभ्रकापड घाणीतही मळलेच नाही

                                 गंगाधर मुटे

……………………………………………
(वृत्त – मात्रावृत्त )
…………………………………………..