परतून ये तू घरी

परतून ये तू घरी

मेघ गुंजले, पवन रुंजले
आतूर झाल्या सरी
राजसा! परतून ये तू घरी॥

सूर्य, तारका, क्षितिज झाकले
किर्र ढगांनी गगन वाकले
गडगड होता बुरुजाभवती
धडधड भरली उरी
राजसा! परतून ये तू घरी॥

नाग, चिचुंद्री बिळात घुसले
पक्षी पिंपळावरती बसले
कडकडता बघ वीज नभाला
थरथरले गिरी-दरी
राजसा! परतून ये तू घरी॥

शिवार भिजले, तरूवर निजले
अश्रू पिऊनी बुबुळं थिजले
हिरमुसले बघ गायवासरू
अन् गहिवरली ओसरी
राजसा! परतून ये तू घरी॥

– गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

॥सांगा तुकारामा : अभंग-४॥

॥सांगा तुकारामा : अभंग-४॥

 

धाडा तुकोराया । विठूला सांगावा ।
मायेचा कांगावा । उतू आला ॥१॥

नासले सकळ । तन मन धन ।
मिथ्या जन गण । वेढीयले ॥२॥

विलासी लोळती । द्रव्याचे सोयरे ।
अनाठायी मरे । कामनिष्ठी ॥३॥

विव्देषाचा डोंब । कैसा परतावा ।
स्नेहाचा ओलावा । क्षीण झाला ॥४॥

वैष्णवाचे चित्त । झुंडीची मुसंडी ।
सावजाला धुंडी । मिथ्यावादी ॥५॥

नाही उपवासी । नाही एकादशी ।
अभय द्वादशी । सोडियेली ॥६॥

– गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१८/०७/२०१६

॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

 

सांग तुकोराया तुझा । विठू कुठे मेला? ।
कर्जापायी भक्त त्याचा । स्मशानात गेला ॥धृo॥

पुजा, अर्चा, भक्तिभाव । आरतीचे ताट ॥
सर्वकाळ सत्संगाची । सोडली ना वाट ॥
तरी का रे अल्पायुषी । श्वास बंद केला ॥१॥

जित्रुपाचा दोर हाती । ओठी विठू नाम ॥
रात्रंदिन पाण्यावाणी । गाळलाय घाम ॥
तरी का रे चोपडला । कुंकवाने शेला ॥२॥

तुझा देव, धर्म तुझा । शोषकांचा साथी ॥
घोर, दु:ख, हीनता, गरिबी । पोशिंद्याचे माथी ॥
कळेना अभय कैसा । विठूचा झमेला ॥३॥

– गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(१७/०७/२०१६)

॥सांगा तुकारामा : अभंग-२॥

॥सांगा तुकारामा : अभंग-२॥

 

तुझ्या विठ्ठलाचा । कैसा दुजाभाव ।
चारीमुंड्या गाव । चीत केले ॥१॥

रानातलं पाणी । उद्योगानं नेलं ।
उभं पीक मेलं । पाण्याविना ॥२॥

धरणाचा साठा । शॉवरात गेला ।
तिथं श्वान न्हाला । शैम्पुसवे ॥३॥

इथं पाण्यासाठी । शोधती टँकरं ।
धावुनी लेकरं । दुडुदुडू ॥४॥

तिथे शौचासाठी । फिल्टरले जळ ।
माळ्यावरी नळ । चुलीपाशी ॥५॥

इथे पिण्यासाठी । क्षारयुक्त पाणी ।
गढुळाचे धनी । गावकरी ॥६॥

लक्ष अब्जावधी । करोडोचा निधी ।
वाढवी उपाधी । शहरांची ॥७॥

ठेऊनिया कमी । शेतीमाल भाव ।
ध्वस्त केला गाव । पिळुनिया ॥८॥

गावही भकास । भकास मारुती ।
घामाची आहुती । व्यर्थ गेली ॥९॥

तिथे ऐश्वर्याचा । सुख, चैनी, भोग ।
सातवा आयोग । सेवेसाठी ॥१०॥

इथे दारिद्र्याचे । सर्वत्र साम्राज्य ।
कर्जाचेच राज्य । आम्हावरी ॥११॥

गाव म्हंजे जणू । दुभत्याची गाय ।
खरडूनी साय । रक्त पिती ॥१२॥

सांगा तुकोराया । अभय एवढे ।
कुणाला साकडे । घालावे गा? ॥१३॥

– गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१६/०७/२०१६

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो…!!

शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्‍याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो…!!

शेतकर्‍याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्‍याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो…!!

शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्‍याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो…!!

शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्‍याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्‍याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय….!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय….!!!

                     – गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 

 

खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल

हसण्यात जन्म घ्यावा उरकून माणसाने
प्रज्ञा, कला, प्रितीवर भाळून माणसाने

दोन्ही मुठी रिकाम्या घेऊन जन्म-मृत्यू
तृप्तीसवे करावा हनिमून माणसाने

रागिष्ट रागिणीला देऊन सोडचिठ्ठी
शांतीसही बघावे बिलगून माणसाने

माया, तृषा, मनीषा नेईल आडमार्गा
लागू नयेच नादी उमजून माणसाने

करपाश घट्ट द्याया अथवा विलीन व्हाया
सुमतीस वश करावे रिझवून माणसाने

आसक्त कामिनीची छाया पडू न द्यावी
दीप्तीसमेत ज्योती विझवून माणसाने

रति, काम, मोह, मत्सर वरचढ-अभय न व्हावे
मुक्तीकडे निघावे हरखून माणसाने

– गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(मराठी मातीला खट्याळरसाचे वावगे नाही. नास्तिकांना आवडेल अशी भाषाशैली वापरून आस्तिकभाव त्यांचेपर्यंत पोचवण्यासाठी संतांनी खट्याळरसाचा उपयोग खुबीने केलेला आहे. त्याचे पुरावे संतसाहित्यात सापडतात. गझल या विदेशीसंस्कृतीचा पदर लाभलेल्या काव्यप्रकाराला मराठी मातीचा सुगंध देण्याचा हा एक प्रयत्न.)