आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून!

आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून!

        यंदाचा दुष्काळ “न भूतो न भविष्यति” असाच म्हणावा लागेल. विदर्भात तर आतापासून चटके बसायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसापासून वृत्तपत्र उघडलं की, शेतकरी आत्महत्त्येच्या संदर्भातील निदान एकतरी बातमी दिसलीच समजायची. आता असा एकही दिवस जात नाही की, शेतकरी आत्महत्त्येची बातमी कानावर येऊन आदळत नाही. मात्र तरीही कोणत्याच पातळीवर काहीही हालचाल होताना दिसत नाही. “रोजचे मढे त्याला कोण रडे” अशी एक म्हण आहे. भारतीय मानसिकता अधोरेखित करण्यासाठी ही एकच म्हण पुरेशी ठरावी.

जेवढे झुलायचे फ़ास लाऊन
तेवढे झुलत बसा
खायचे तितके जहर तुम्ही
खुशाल खात बसा

दहा-पाच करा किंवा शेकड्यांनी करा
हजारोंनी करा किंवा लाखोंनी करा
आम्ही सारे ढिम्म, आम्हाला काय त्याचे?
शेतामध्ये मरा नाहीतर घरामध्ये मरा

शिक्षित, सुजाण, वकील, डॉक्टर
नेता, तज्ज्ञ, सेवक, मास्तर
यांना तरीही ज्या देशामध्ये
निवांत झोप लागू शकते!
शासन-प्रशासन, पुजार्‍यांना
रंभा-परीचे स्वप्न पडू शकते!!
त्या देशाच्या पोशिंद्यांनो
एवढे तरी ध्यानी घ्या की;
हे फ़क्त इंडियातच घडू शकते!!!

संवेदनाशीलता मेली काय?

        माणूस संवेदनाक्षम वगैरे खरंच असतो काय, याबद्दल मला फार पूर्वीपासून संशय होता;  पण तो केवळ संशय होता. आता मात्र माझ्या मनातला कालचा संशय हळूहळू दृढतेत बदलायला लागला आहे. आता मनुष्याच्या संवेदनक्षमतेविषयी मी एवढेच म्हणू शकतो की माणसाच्या संवेदनशीलते मागे त्याचा निहित स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले असतात. स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले नसेल तर सभोवताली कितीही लाजिरवाण्या, क्रूर अथवा अमानुष घटना घडल्या तरीही मनुष्यप्राणी कळवळत नाही, हळहळत नाही आणि काळजाचे पाणी होण्याइतपत द्रवतही नाही. तो निगरगट्ट, ढिम्मच्या ढिम्म आणि निर्विकारच असतो.

आतापर्यंत लाखोच्या संख्येने शेतकरी आत्महत्या झाल्यातरी मख्ख असणारा समाज दिल्लीत एका मुलीवर बलात्कार होऊन खून झाल्याबरोबर रस्त्यावर उतरतो, मेणबत्त्या पाजळतो, सर्वत्र हाहाकार माजेल इतपत निदर्शने करतो, प्रसारमाध्यमातही रात्रंदिवस एवढ्याच एका मुद्द्याभवती रेंगाळत बसण्याची जणूकाही चढाओढ लागते; तेव्हा त्यामागे सुजाण आणि सुशिक्षित समाजाची संवेदनाशीलता नसते. असते ती केवळ त्यांच्या मनात निर्माण झालेली भिती. जी घटना आज त्या मुली संदर्भात घडली तीच घटना आपल्याही मुलीवर ओढवू शकते, या भितीपोटी उडालेला थरकाप!

शेतकरी आत्महत्यांशी सुजाण आणि सुशिक्षित समाजाचे दूरान्वयानेही स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले नसतात. आज आत्महत्या करण्याची वेळ त्या शेतकर्‍यावर आली, उद्या माझ्यावरही येऊ शकते, अशी भिती उत्पन्न व्हायचेही कारण नसते. त्यामुळे शेतकरी कितीही आत्महत्या करोत, सहा लाख शेतकरी आत्महत्या करोत की साठ लाख शेतकरी आत्महत्या करोत; हळहळण्याचे कारणच संपुष्टात आलेले असते.

हुश्श! एका मुलीच्या हत्त्येवर आकाश-पाताळ एक करणारा सुजाण आणि सुशिक्षित समाज शेतकरी आत्महत्यांवर गप्प का बसतो? हा प्रश्न अनेक दिवसांपासून मनात दबा धरून बसला होता. आता मात्र हळूहळू उत्तरावरील धुकं हटायला लागलं आहे. समाजाची संवेदनाशीलता मेली काय? असा प्रश्न उपस्थित करण्याचे औचित्य दिसतच नाही कारण सामूहिक समाजमन संवेदनक्षम असते, हेच मुळात थोतांड आहे, अशी खात्री व्हायला लागली आहे.

बिनपाण्याने हजामत

        या विषयावर उहापोह करण्याचे कारण असे की, मला समोर भयाण वास्तव दिसत आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीय कमी दाबाचा पट्टा निर्माण व्हायला लागला की जशी पाऊस पडण्याची शक्यता बळावत जाते तद्वतच शेतकरी आत्महत्यांमध्ये प्रचंड वाढ होऊ शकेल अशी अनुकूल स्थिती शेतकर्‍यांच्या अवतीभवती निर्माण व्हायला लागली आहे. वेळीच शासकीय स्तरावर वेगवान हालचाली होऊन युद्धस्तरावर उपाययोजना झाली नाही तर येणारे सहा-सात महिने अत्यंत वाईट बातम्या घेऊन येतील, हे अगदी सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट दिसायला लागले आहे.

यंदा विदर्भात नापिकीने कहर केला आहे. कापसाचे एकरी उत्पादन गत दोन वर्षाच्या तुलनेने फक्त ३०-३५ टक्केच होईल, असा अंदाज आहे. सोयाबीनची स्थिती तर सर्वाधिक खराब आहे. जिथे एकरी ९-१० क्विंटल सोयाबीन व्हावे तिथे १ ते २ क्विंटल होत आहे. अनेक शेतात तर एकरी १ क्विंटलापेक्षा कमी उत्पादन होण्याची शक्यता असल्याने व सोयाबीन कापणीसाठी लागणारा खर्चसुद्धा भरून निघण्याची शक्यता नसल्याने शेतकर्‍यांनी उभ्या पिकातच नांगरट सुरू केली आहे किंवा गुरे चरायला सोडली आहेत. यात जिरायती आणि बागायती असासुद्धा भेदाभेद करायला कारण नाही आहे, कारण एकाची पाणी लावून तर दुसर्‍याची बिनपाण्याने हजामत होत आहे. एकीकडे उत्पादनात आलेली प्रचंड घट आणि दुसरीकडे शेतमालाचे पडलेले बाजारभाव अशा दुहेरी जात्यात शेतकरी पूर्णपणे भरडला जात आहे.

राजा! ही तुझी बदमाषी आहे

        विदर्भातलाच शेतकरी जास्त प्रमाणात आत्महत्या का करतो, या प्रश्नाचे उत्तरही कठीण नाही. कापसाच्या एकाधिकार खरेदीचा कायदा महाराष्ट्र सरकारने १९७१ साली मंजूर केला. पण महाराष्ट्र शासनाच्या कापूस एकाधिकार योजनेअंतर्गत ‘भारतीय कापूस महामंडळा’ च्या धर्तीवर बाजारभावाप्रमाणे किंवा बाजारभावापेक्षा जास्त चढ्या दराने कापूस खरेदीचे धोरण राबविण्यात आले नाही. तुरळक अपवाद वगळले तर अन्य प्रांतातील शेतकर्‍यांना खुल्या बाजारपेठेत जेवढे भाव कापसाला मिळालेत त्यापेक्षा कायमच कमी भाव एकाधिकाराच्या नावाखाली महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पदरात टाकले गेले. अन्य प्रांतात चांगले भाव असूनही त्याचा फायदा राज्यातील शेतकर्‍यांना घेता आला नाही कारण प्रांतबंदी लादून अन्य राज्यामध्ये कापूस विक्रीस नेण्यास राज्यातील कापूस उत्पादकांना कायदेशीर मज्जाव करण्यात आला आणि “आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना” अशी गत खुद्द शासनानेच राज्यातील कापूस उत्पादकांची करून टाकली. कापूस एकाधिकाराच्या गोंडस नावाखाली कापूस उत्पादकांचे जवळजवळ ३०-३५ वर्षे “कायदेशीर शोषण” झाल्याने राज्यातला कापूस उत्पादक आर्थिक स्थितीने एवढा नेस्तनाबूत झाला की त्याला पुन्हा डोके वर काढताच आले नाही.

मध्यंतरी खुल्या अर्थव्यवस्थेच्या प्रारंभालाच चांगली संधी आली होती. कापसाला प्रति क्विंटल ९०००/- भाव मिळू शकेल एवढी तेजी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आली होती. तेव्हा शासनाने फक्त गप्प बसण्याची गरज होती. मामला व्यापारी आणि शेतकरी यांच्यामधला होता. सरकारवर आर्थिक भारही पडणार नव्हता. याउलट कापसाच्या निर्यातीतून परकीय चलनाची गंगाजळी शासकीय तिजोरीत येऊन साठणार होती पण; कापसाला प्रति क्विंटल ९०००/- भाव मिळू देईल तर ते ’मायबाप’ सरकार कसलं? कापूस गिरणी मालकांच्या दबावाखाली येऊन सरकारने तातडीने सूत्रे हालवली. कापसावर निर्यातबंदी लादली आणि देशांतर्गत बाजारपेठेत प्रति क्विंटल ९०००/- सहज मिळू शकणारे भाव प्रति क्विंटल ५०००/- पेक्षाही कमी आले.

जेव्हा चांगलं पिकलं व बाजारभावही चांगले मिळून कापूस उत्पादकांची आर्थिकबाजू सावरायची शक्यता निर्माण झाली तेव्हा शेतकर्‍यांची लूट करायला कोणी व्यापारी आला नाही, दलाल आला नाही, चोर आला नाही किंवा दरोडेखोरसुद्धा आला नाही. कापूस उत्पादकांना सरकारने लुटलं, राजरोजसपणे लुटलं, कायदेशीरपणे लुटलं. कापूस उत्पादकांच्या अधोगतीला शासनाची बदमाषीच कारणीभूत आहे.

आत्महत्या नव्हे, शासकीय खून!

        ज्या वर्षी शेतीत उत्पादन कमी येते आणि शेतमालाचे भावही पडतात, त्या-त्या वर्षी शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत जातो. शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची पाळी येते ती त्याने आळशीपणा दाखवला म्हणून नव्हे, त्याने कर्तव्यात कसूर केला होता म्हणून नव्हे, त्याच्या व्यसनाधीनतेमुळे तर नव्हेच नव्हे! शेतमालाचे भाव ठरविण्याचे, त्यावर निर्बंध लादण्याचे, शेतमालाचे आयात-निर्यात धोरण ठरविण्याचे सर्वाधिकार शासनाकडेच असल्याने शेतीक्षेत्रातील सर्व बर्‍याबाईट परिणामांसाठी व प्रगती-अधोगतीसाठी थेट सरकारच जबाबदार ठरते. शासनाच्या चुकीच्या व शेतकरी विरोधी धोरणांमुळे आज शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या ह्या आत्महत्या नसून ह्या आत्महत्यांना “शेतकर्‍यांचा शासकीय खून” असेच संबोधावे लागेल.

– गंगाधर मुटे
—————————————————————————————————————-

पहिले शेतकरी साहित्य संमेलन : प्रास्ताविक भाषण

पहिले शेतकरी साहित्य संमेलन : प्रास्ताविक भाषण

कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याचा प्रत्यक्ष शेतीक्षेत्राशी काही संबंध उरला आहे किंवा नाही याचा आढावा घेण्यासाठी, मराठी साहित्यविश्व व शेतीमधली वास्तविकता याचा उहापोह करण्यासाठी,  नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि शेतीक्षेत्राला मराठी साहित्यक्षेत्राप्रती असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी आयोजित पहिल्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

आजपर्यंत मराठी साहित्य चळवळ, प्रादेशिक भाषा साहित्य चळवळ, ग्रामीण साहित्य चळवळ, कामगार साहित्य चळवळ, दलित साहित्य चळवळ अशा अनेक व नानाविध साहित्य चळवळी निर्माण झाल्या, अ.भा. स्तरावर साहित्य संमेलने झालीत पण या देशाचा ’कणा’ असलेल्या शेतीची अ.भा. शेतकरी साहित्य चळवळ मात्र कधी उभी राहिली नाही. ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी, हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक या क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट झाल्यामुळे निकोप शेतीविषयक मानसिक मनोभूमी तयार होण्यास व शेती व्यवसायाविषयी समाजमनाची सकारात्मक मानसिकतेची जडणघडण होण्यास मारक ठरलेले आहे. साहित्यातून समाजाच्या सामुहिकमनाचे वास्तव प्रतिबिंबित व्हायला हवे; पण मागील काही वर्षाचा शेतीसंबंधित साहित्यिक आढावा घेतला तर ते सुद्धा झालेले दिसत नाही.

        “साहित्य हा समाजाचा आरसा असतो” असे म्हणतात. ते जर खरे असेल तर साहित्यात समाजातील वास्तवतेचं, वास्तवतेच्या दाहकतेचं प्रतिबिंब उमटायलाच हवं ना? पण गेल्या १५-२० वर्षांमध्ये देशात ६ लाखापेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याची दखल साहित्यक्षेत्राने गांभीर्याने घेतलेली दिसत नाही किंवा त्याचे प्रतिबिंब साहित्यात प्रभावीपणे उमटलेले सुद्धा आढळत नाही. शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे पुस्तक एक शरद जोशी सोडले तर साहित्यक्षेत्रात उपलब्ध नाही. विदर्भप्रदेश गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांमध्ये होरपळत आहे पण शेतकरी आत्महत्यांवर सर्वंकश प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध आणि मागोवा घेणारे आज एकही पुस्तक उपलब्ध नसणे ही बाब साहित्यक्षेत्रासाठी शोभादायक नाही. साहित्यक्षेत्रातील ही शेतीसाहित्याची उणीव भरून काढण्यासाठी शेतीशी प्रामाणिक व कटिबद्ध असणार्‍या लेखक-कवी-गझलकारांनी आता सर्व बंधने झुगारून, स्वत:चा अहंकार बाजूला सारून, वास्तवनिष्ठ, शास्त्रशुद्ध व तर्कसंगत विचाराची अत्युच्च पातळी गाठण्यासाठी प्रथम अभ्यासाला लागले पाहिजे. अभ्यासाला अनुभवाची जोड दिली पाहिजे. आपल्याला जे लिहायचे आहे ते लिहिण्यापूर्वी शेतीअर्थशास्त्राच्या कसोटीवर तपासले पाहिजे. आपण जे लिहिणार असू ते शेतीची बिकट समस्या सोडवण्यासाठी उपयोगी की उपद्रवी याचेही मंथन केले पाहिजे आणि नंतरच लेखनाला सुरुवात केली पाहिजे. काळ्या मातीशी इमान राखणारे लेखन करायचे असेल तर सृजनशीलतेला पहिल्यांदा भ्रामक कल्पनांतून बाहेर काढले पाहिजे.  लेखनशैलीचा उपजतपणा, स्फूर्ती, प्रतिभा व परकाया प्रवेश वगैरे कल्पनांना टाळून कृत्रिम का होईना पण वास्तवाला चितारणारी अभ्यासपूर्ण लेखनशैली जाणीवपूर्वक विकसित करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे.

साहित्यक्षेत्रात आजपर्यंत झालेले लेखन बहुतांशी “शेतीच्या शोषणाला पोषक” असेच लिहिल्या गेलेले आहे आणि “मला जे स्फुरले ते मी लिहिले” हाच दृष्टिकोन त्याला मुख्यत्वे कारणीभूत आहे. साहित्य म्हणजे केवळ वाचकांच्या करमणुकीसाठी लिहायचे नसते, स्वत:ला महानतेकडे पोचविण्यासाठी व स्वत:चे लेखन साम्राज्य वाढविण्यासाठी तर अजिबातच लिहायचे नसते. वाचकाची दिशाभूल करण्याऐवजी त्याला विषयाची योग्य जाणीव करून देण्यासाठी लिहायचे असते, याचा विसर पडल्याने दमदार शेतीसंबंधित साहित्यकृती निर्माण झालेली नसावी, असे समजायला बराच वाव आहे.

केवळ आरशासारखी मर्यादित भूमिका सुद्धा साहित्याची असू नये. समाजमनाच्या सामूहिक जडणघडणीचे व मानवीमूल्यांच्या उत्क्रांतीचे उगमस्थान साहित्य हेच असते कारण मनुष्य जन्माला घालण्यापूर्वी माणसाला एखाद्या विषयात पारंगत करायची देवाकडे अथवा निसर्गाकडे कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे जन्माला आल्यानंतर कुठल्याही माणसाला कुठलाही विषय ज्ञात करून घ्यायचा असेल तर त्याच्यासमोर “साहित्य” हाच एकमेव पर्याय आहे. अनेकजण मानवीमूल्यांच्या जडणघडणीसाठी ’संस्कार’ महत्त्वाचा मानतात. पण ते सत्य नाही कारण संस्कार देणार्‍याची मानसिक व वैचारिक जडणघडण सुद्धा साहित्यातून झालेली असते. संस्कार देणार्‍या व्यक्तीचीच जर साहित्याने दिशाभूल केली असेल तर दिले जाणारे संस्कार हे निर्दोष सुसंस्कार नसून सदोष कुसंस्कारच असणार हे उघड आहे. निकोप मानसिकतेचा समाज घडविण्याचे काम मुळात साहित्याचे आहे. म्हणून लेखनी हाती घेऊन खरडणारांना सामाजिक वास्तविकतेचे भान असणे ही मूलभूत गरज साहित्यिकांसाठी अनिवार्य मानली गेली पाहिजे.

बदाबदा पिले प्रसवण्याची रानडुकरांची क्षमता जशी वादातीत असते तद्वतच बदाबदा पुस्तके प्रसवण्याची साहित्यिकांची प्रजनन क्षमता असणे ही काही साहित्यिकाच्या सृजनशीलतेची, सृजनाच्या प्रगल्भतेची कसोटी होऊ शकत नाही. आजपर्यंत हजारो, कदाचित लक्षावधी पुस्तके लिहिली गेलीत पण “शेतीमालाला रास्त भाव मिळत नाही म्हणून शेतीत गरिबी आहे, शेतमाल स्वस्तात लुटून नेला जातो म्हणून गावगाडा भकास आहे” एवढे एक वाक्य लिहिण्याइतपत सुद्धा अभ्यास, वास्तविकतेची जाण आणि भान एकाही साहित्यिकाला असू नये? शेतकर्‍याच्या पोटी जन्म न घेता,  शेतीशी दूरान्वयानेही संबंध नसणार्‍या शरद जोशींना जे कळले ते शेतकर्‍याच्या रक्ताच्या, हाडामांसाच्या शेतकरी पुत्र साहित्यिकाला का कळले नाही? याचा निदान शेतकरीपुत्र असलेले साहित्यिक तरी विचार करणार आहेत की नाही? आत्मचिंतन करणार आहेत की नाही? भाकड साहित्यनिर्मितीमुळेच शेतीचे प्रश्न सुटण्याऐवजी आणखी किचकट झालेत, शेतीच्या लुटीच्या व्यवस्थेला आणखी बळ मिळाले, हा दोष साहित्याने व साहित्यिकांनी स्वीकारला पाहिजे.

वास्तवतेशी प्रतारणा करून आभासी विश्वात रमणार्‍या व कल्पनाविलासाचे मनोरे रचून केवळ पुरस्कार, पारितोषिकांकडे टक लावून बसलेल्या बाजारी साहित्यिकांकडून शेतीला न्याय मिळण्याची शक्यता नसेल तर आता प्रत्यक्ष शेतकर्‍यांनीच समोर आलं पाहिजे. आमचं आयुष्य जगलो आम्ही, आमचं आयुष्य भोगलं आम्ही. रक्ताचं पाणी करून राबलो आम्ही, हाडाची काडं करून झिजलो आम्ही….. अनुभूती आमची आणि आम्ही म्हणतो आम्ही लिहिणार नाही. दुसर्‍याने कुणीतरी लिहावं! पिढ्यानपिढ्या उलटून गेल्या पण आमचा शेतकरी बोलायला तयार नाही. मुळात भारतातील शेतकरी मुकाच आहे. तो बोलत नाही, लिहीत नाही आणि वाचतही नाही. हे चित्र बदलायचं असेल तर शेतकर्‍यांनी एका हातात नांगर आणि दुसर्‍या हातात लेखनी धरली पाहिजे. हा संदेश देण्यासाठीच या संमेलनाचे प्रयोजन आहे.

या शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणार्‍या हौशा-गौशा-नवश्यांचा जमाव एवढेच केवळ मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि यातून लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तीशाली सृजनशील साहित्यिकांची नवी पिढी जन्माला यावी, अशी अपेक्षा आहे.
समाजाची मानसिक जडणघडण व वैचारिक उत्क्रांतीची दिशा बदलण्याची ताकद साहित्यात आहे आणि साहित्याला बदलण्याची ताकद शेतकर्‍यांच्या मनगटात …..!
म्हणून….  काळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो, चला जरासे खरडू काही…..!!  

काळ्याआईविषयी बोलू काही……!!!

                                                                                                             – गंगाधर मुटे
(दि.२८ फ़ेब्रुवारी व १ मार्च २०१५ ला वर्धा येथे संपन्न झालेल्या पहिल्या शेतकरी साहित्य संमेलनात कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यांनी केलेल्या प्रास्ताविक भाषणाचा संपादीत भाग)
———————————————————————————————————————————————————–
By Gangadhar Mute Posted in My Blog

पहिले शेतकरी साहित्य संमेलन : दुसरा दिवस – वृत्तांत

पहिले शेतकरी साहित्य संमेलन : दुसरा दिवस – वृत्तांत

शेती साहित्य आणि पत्रकारिता – परिसंवादाचा वृत्तांत 

(वृत्तसंस्थांच्या सौजन्याने)

महात्मा फ़ुले साहित्य नगरी, वर्धा दिनांक ०१/०३/२०१५

            बहुजन समाजाच्या लेखणीतून वेदना झळकायला लागल्यामुळेच शेतीसाहित्याचे प्रतिबिंब सर्वदूर पोहचले आहे. त्यामुळे खर्‍या जाणिवेचे साहित्य जगापुढे येऊ लागले आहे. आजपर्यंत उपेक्षित राहिलेल्या घटकाला आता या साहित्यप्रेरणेमुळेच न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे, असा सूर “शेती साहित्य आणि पत्रकारिता” या विषयावरील पहिल्या अ.भा.शेतकरी मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशीच्या पहिल्या सत्रात झालेल्या परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केला.

साहित्य संमेलन

            संमेलनाच्या स्वागताध्यक्षा सरोज काशीकर, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, परिसंवादाचे अध्यक्ष अनिल महात्मे, ’महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक श्रीपाद अपराजित, देशोन्नतीचे संपादक राजेश राजोरे, विजय विल्हेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

साहित्य संमेलन

            या साहित्य संमेलानाच्या आयोजनामागची भूमिका विषद करताना कार्याध्यक्ष गंगाधर मुटे म्हणाले, या शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणार्‍या हौशा-गौशा-नवश्यांचा जमाव एवढेच केवळ मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि यातून लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तीशाली सृजनशील साहित्यिकांची नवी पिढी जन्माला यावी, अशी अपेक्षा व्यक्त करून ते पुढे म्हणाले की पिढ्यानपिढ्या उलटून गेल्या पण आमचा शेतकरी बोलायला तयार नाही. मुळात भारतातील शेतकरी मुकाच आहे. तो बोलत नाही, लिहीत नाही आणि वाचतही नाही. शेती विषयातील जटील प्रश्न ऐरणीवर आणून शेतीची दुरावस्था बदलायची असेल तर आता शेतकर्‍यांनी सुद्धा एका हातात नांगर आणि दुसर्‍या हातात लेखनी धरली पाहिजे. हा संदेश देण्यासाठीच या संमेलनाचे प्रयोजन आहे. ते पुढे म्हणाले की शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत शासन उदासिन आहे, साहित्यिक निष्क्रिय आहे, केवळ पत्रकारिता व प्रसारमाध्यमेच जागृत आहेत म्हणून “शेतकरी आत्महत्त्यांचा” प्रश्न ऐरणीवर आहे. नाही तर शेतकरी आत्महत्या हा विषय चव्हाट्यावर आलाच नसता असे सांगून सर्व पत्रकार व पत्रकारितेचे त्यांनी आभार मानले.

साहित्य संमेलन

            श्रीपाद अपराजित म्हणाले, विविध चळवळींचा प्रभाव असल्याने साहित्यातून शेतकरी नायकांना फ़ारसा न्याय मिळाला नाही. म. फ़ुले यांच्या ‘आसूड’ मधून शेतकरी वेदनांचा प्रत्यकारी अनुभव सर्वप्रथम आला. मराठीतील साहित्य मोटेवरच्या गाण्यात रंगले असताना हिंदी साहित्यात प्रेमचंद यांच्या ’गोदान’ने शेतकर्‍यांच्या कळा प्रखरपणे पुढे आणल्या. सिनेमातूनही विमल रॉय यांच्या ’दो बिघा जमीन’ने याच दु:खाचा जागर केला. नेमाडेंची ’कोसला’, आनंद यादव यांची ’झोंबी’ने तसेच शंकर पाटील, डॉ. विट्ठल वाघ, सदानंद बोरकर, इंद्रजित भालेराव यांनी शेतीसाहित्याला न्याय दिला. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे दु:ख वृत्तपत्रांनीच आकडेवारीनिशी पुढे आणले.

साहित्य संमेलन

            वर्धा जिल्ह्यातील साहेबराव पाटील या आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यावरील डॉ.विट्ठल वाघ यांची कविता प्रसिद्ध करून वृत्तपत्राने १९८६ च्या दरम्यान पहिले मंथन घडवून आणले, या कडेही अपराजित यांनी लक्ष वेधले. आस्था, व्यवस्था व अवस्था या तीन घटकांचा विचार केल्याशिवाय पत्रकार शेती-शेतकरी यांना न्याय देवू शकत नाही, असे मत राजोरे यांनी व्यक्त केले. पत्रकारितेत क्रिकेट, क्राईम,सिने आणि सेलिब्रिटी या चार ’सी” ला अधिक महत्व दिले जाते. कृषि व शेतकर्‍यांना गांभीर्याने घेतले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

साहित्य संमेलन

            अध्यक्षीय मत व्यक्त करताना अनिल महात्मे म्हणाले, कृषि पत्रकारितेला आज प्रतिष्ठा मिळाली आहे. पण, शेती व शेतकर्‍यांना ती मिळाली नाही. जोपर्यंत शेतमालाला भाव मिळणार नाही तो पर्यंत शेतकर्‍याला प्रतिष्ठा मिळणार नाही. कारण यामागे शेतीचे अर्थकारण दडलेले आहे. सरकार किंवा राजकीय पक्ष शेतकर्‍यांचे प्रश्न तोंडी लावण्यापुरते किंवा सत्तेसाठी वापरतात, असा आरोपही त्यांनी केला. आगामी काळात अन्नधान्याचे संकट उभे राहणार आहे. त्यावेळी शेती आणि शेतकरी यांचे महत्व सर्वांना कळेल, असेही ते म्हणाले.

परिसंवादाचे बहारदार संचालन विजय विल्हेकर यांनी केले.

साहित्य संमेलन

प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांची प्रकट मुलाखत अनंतर नांदुरकर यांनी घेतली.

साहित्य संमेलन

या नंतर शेतकरी कवी संमेलन झाले.

साहित्य संमेलन

या प्रसंगी अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनानिमित्त “सारस्वतांचा एल्गार” या स्मरणिकेचे प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव याचे हस्ते विमोचन करण्यात आले.

        पहिल्या अ.भा. शेतकरी साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी मातोश्री सभागृहात झाला. शेतकर्‍यांना बोलण्याकरिता या संमेलनाचा उपयोग व्हावा, असे मत काही विचारवंतांनी व्यक्त केले तर काहींनी आम्हाला दिशा दाखविण्याची गरज नाही, आम्ही लढणारे आहोत, हे संमेलन आमच्या गंजलेल्या तलवारींना धार देण्याकरिता उपयोगी ठरेल, असे विचार व्यक्त केले.
         समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते अँड. वामनराव चटप उपस्थित होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सनदी लेखापाल संजय पानसे, संजय कोल्हे, स्वागताध्यक्ष सरोजताई काशीकर, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, संजय इंगळे तिगावकर उपस्थित होते.

साहित्य संमेलन

       यावेळी मार्गदर्शन करताना अँड. चटप म्हणाले, आम्ही मुळचे शेतकरी संघटनेचे आंदोलक आहोत. लढणे हा आमचा धर्म आहे. आजवर आम्ही अबोल होतो. या संमेलनाने आम्ही बोलू लागल्यास संमेलनाचे यश दिसून येईल. लढा, पुन्हा सज्ज व्हा! व्यक्ती स्वातंत्र्यासोबत बाजार स्वातंत्र्यांचा पुरस्कार आणि रास्त भावासाठी संघर्ष हे तीन मत या संमेलनात व्यक्त झाले. शेतकरी संघटना या तीन मुद्दांचे युद्ध शेवटच्या घटकांना सोबत सोबत घेवून लढणार आहे. त्याशिवाय आपण डोळे मिटणार नाही, असा इरादा शरद जोशी यांनी केल्याची माहिती चटप यांनी दिली.
      सांगलीचे संजय कोले म्हणाले, आम्हाला ‘अबू मियाच्या भेंडी’ इतके तरी स्वातंत्र्य मिळावे एवढेच मागणे आहे. आमच्या नांगराच्या भाराने ते येत नाही. तुमच्या लेखणीने येऊ द्या. पारतंत्र्यातून आम्हाला काढा, भावांचे कर्जाचे मुक्तीचे स्वातंत्र्य मांडा, त्यासाठी शरद जोशी पहिल्यांदा समजून घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.
     अमरावतीचे संजय कोल्हे यांनी याविरूद्ध भूमिका मांडली. ते म्हणाले, साहित्यिकांनी आम्हाला दिशा दाखविण्याची गरज नाही, आम्ही मुळचे आंदोलकच आहोत. हे संमेलन एक प्रयोग म्हणून यशस्वी झाले आहे. थोड्या गंजलेल्या आमच्या तलवारी घासण्यासाठी हा संमेलनाचा ‘खरप’ कामी पडणार आहे. संजय पानसे म्हणाले, शरद जोशी ज्या व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करतात, त्याचे प्रतिबिंब या संमेलनात पडले नाही. काही गोष्टी गांभीर्याने घ्यायच्या असतात तशी चर्चा न होता, वरवरची चर्चा झाली. या संमेलनात झालेली स्वतंत्र अर्थसंकल्पाची मागणी हास्यास्पद आहे. कारण अर्थसंकल्पाच्या उत्पन्न आणि खर्च या दोन बाजू असतात. यात शेती-कृषी ही केवळ खर्चाची बाजूच आहे. उत्पन्नाची नव्हे! त्यामुळे अर्थसंकल्पाची बाब गैरलागू ठरते. शेती सोडून इतर गोष्टींकडे शेतकर्‍यांनी मोर्चा वळवावा, सन्मानाने दुसर्‍या क्षेत्रात जावे, याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.या समारोप्रसंगी मंमेलनानिमित्त आयोजित आंतरजालस्तरीय गझज, गीतरचना, छंदमुक्त कविता, पद्यकविता, ललित लेख, वैचारिक लेख, शेतीविषयक लेख कथा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. संचालन प्रा. राजेंद्र मुंढे यांनी केले.

———————————————————-

साहित्य संमेलन

*********

साहित्य संमेलन

*********

साहित्य संमेलन

*********

साहित्य संमेलन

*********

साहित्य संमेलन

*   *   *   *   *   *

By Gangadhar Mute Posted in My Blog

पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस – वृत्तांत

अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटनमहात्मा जोतिबा साहित्य नगरी (वर्धा) :२८ फ़ेब्रुवारेी २०१५

       देशात शेतकऱ्यांचा पक्ष उरलेला नाही. पंजाबराव देशमुखांनंतर शेतकऱ्यांना दुसरा पुढारी मिळालेला नाही. भारत हा कृषिप्रधान देश असूनही ८६ टक्के शेती कोरडवाहू आहे. देशात स्वतंत्र रेल्वे बजेट आहे, परंतु स्वतंत्र कृषी बजेट नाही; यापेक्षा दुसरी शोकांतिका काय असू शकेल, अशा शब्दात ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी विचार मांडले.

shetkari sahity sanmelan

गझलनवाज भिमराव पांचाळे व शेतकरी नमनगीताचे संगीतकार श्री सुधाकर आंबुसकर यांचे शाल व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

shetkari sahity sanmelan

उद्घाटक डॉ. विट्ठल वाघ याचे स्वागत कैलास तवांर यांनी केले.

महात्मा जोतिबा फुले साहित्य नगरीत शनिवारी पहिल्या अखिल भारतीय शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन दि. २८ फ़ेब्रुवारीला डॉ. विट्ठल वाघ यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. संमेलनाध्यक्ष शरद जोशी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाहीत. त्यांनी आपले भाषण छापील स्वरुपात पाठविले, त्याचे यावेळी वाचन करण्यात आले. याप्रसंगी बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष सरोज काशीकर, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, विशेष अतिथी म्हणून भीमराव पांचाळे, प्रमुख पाहुणे संजय पानसे, माजी खासदार सुरेश वाघमारे, डॉ. शेषराव मोहिते, कैलास पवार, स्मिता गुरव, संजय इंगळे तिगावकर, माया पुसदेकर विराजमान होते.

shetkari sahity sanmelan

डॉ. वाघ पुढे म्हणाले, महात्मा फुलेंनंतर साहित्यात शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदना व संवेदनाच्या जाणिवांचा अभाव दिसून येतो. इतर वर्गापेक्षा शेतकऱ्यांची जाणीव वेगळी आहे. पावसामुळे शेती वाहून गेली, शेतकरी रडतो आहे. हे जाणून घेऊन लिहिलेले साहित्यच खरे शेतकरी साहित्य असेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

shetkari sahity sanmelan

          प्रास्ताविक भाषणातून गंगाधर मुटे यांनी शेती साहित्यात वास्तववादी लेखनाचा अभाव असून जे लिहिले ते खोटे आहे. लेखणी हाती घेताना पहिले गावाचे चित्र बघावे. त्याचबरोबर प्रस्थापित साहित्यिकांकडून वास्तववादी साहित्यनिर्मिती होत नसेल तर शेतकर्‍यांनीच आता एका हातात नांगर व दुसर्‍या हाती लेखणी धरून लेखणासाठी पुढे सरसावले पाहिजे असेही मुटे म्हणाले. सरोज काशीकर म्हणाल्या, शेतकरी जोपर्यंत स्वबळावर उभा राहणार नाही, तोपर्यंत या देशाचा आर्थिक विकास होणे शक्य नाही. जे साहित्य शेतकऱ्यांसाठी लिहिले ते वास्तववादी नाही. ते केवळ मृगजळ आहे. डोळ्यांवरील हिरवी पट्टी काढण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे, यापुढे लेखणी हे हत्यार म्हणून वापरले पाहिजे, तरच शेतकऱ्यांच्या आंदोलनाला धार येईल. यावेळी भीमराव पांचाळे व मान्यवरांची भाषणे झालीत. या संमेलनातील विचारमंथनातून शेतीचे विदारकदृष्य बदलून त्याऐवजी शेतीस नवसंजीवणी देणारे नवलेखक निर्माण व्हावेत असा आशावाद वक्त्यांनी व्यक्त केला.

shetkari sahity sanmelan

संमेलनाध्यक्ष शरद जोशी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे संमेलनाला उपस्थित राहू शकले नाही. त्यांचे छापील अध्यक्षीय भाषणाचे संमेलनात कैलास तवांर यांनी वाचन केले. या भाषणातून त्यांनी उपस्थित राहू शकत नसल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. शरद जोशी आपल्या लेखी भाषणात म्हणाले की, दरवर्षी पावसाळा यायच्या आधी बी-बियाण्यांची जमवाजमव, खर्चासाठी सावकाराची मिनतवारी, सोसायटीतली कारस्थाने, भानगडी, पाऊस येतो की नाही याची चिंता, आल्याचा आनंद, येत नसला तर पोटात उठणारा भीतीचा गोळा, पिकावर येणाऱ्या तणांच्या आणि रोगांच्या धाडी, पीक उभे राहिल्यावर होणारा आनंद, बाजारात गेल्यावरची शोकांतिका, वाढते कर्ज, पुढाऱ्यांची मग्रुरी, आग लागल्यावर घरातून निसटतांना व्हावी तशी गावच्या आयुष्यातून सुटण्याची ज्याची त्याची स्वत:पुरती धडपड या किड्यांसारख्या जीवनात लिहिण्यासारखी प्रचंड सामुग्री, पण ७० टक्के लोकांच्या आयुष्याचे प्रतिबिंब साहित्यात कधीच पडले नाही, अशी खंत संमलेनाध्यक्ष शरद जोशी यांनी आपल्या छापील अध्यक्षीय भाषणातून मांडली आहे. गाव सोडून गेलेली शेतकऱ्यांची मुले शहरात रमली. त्यात लिहिण्याचे कसब असणाऱ्यांनी गावाविषयी लिहिले खरे पण, शहराला काय पटेल, काय आवडेल याचाच विचार त्यात केला. याउलट ग्रामीण भागातील जन्मामुळे साहित्यात आपल्याला काही राखीव जागा असावी, असा आक्रोश करणारी एक साहित्य आघाडी उभी राहिली. शेतकऱ्यांच्या दु:खाचे भांडवल करून त्यावर साहित्य क्षेत्रात स्थानाचा जोगवा ही मंडळी मागू लागली त्यामुळे हे संमेलन मात्र एकमेकांची दु:खे सांगण्यापुरते मर्यादित न राहता संघटनेने फुलविलेल्या निखाऱ्यांवरील राख उडवून ते परत प्रज्वलित करण्याची हिंमत शेतकरी समाजात निर्माण करणारी ठरो, असा त्यांनी लिहून पाठविलेल्या अध्यक्षीय भाषणातून संदेश दिला. प्रास्ताविक कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यांनी तर संचालन प्रा. मनीषा रिठे यांनी केले. संमेलनाला शेतकरी वर्गाची लक्षणीय उपस्थित होती. तसेच देशाच्या कानाकोपर्‍यातून सुमारे ८०० प्रतिनिधी हजर होते.
shetkari sahity sanmelan

उद्घाटन समारंभानंतर जेष्ट शेतीसाहित्यिक डॉ शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली ’शेतकरी चळवळीच्या उदयापूर्वीचे आणि नंतरचे मराठी साहित्य’ या विषयावर परिसंवाद होऊन त्यात डॉ. दिलीप बिरुटे, प्रा. ज्ञानदेव राऊत, प्रा. शेख हासम यांनी सहभाग घेतला.

shetkari sahity sanmelan

आत्महत्त्येपूर्वी जळगाव जिल्ह्यातील दिनकर नारायण वराडे  या शेतकर्‍याने लिहून ठेवलेल्या पत्राचे त्याचा मुलगा रवी वराडे यांनी केलेले वाचन हा या संमेलनाचा वैषिष्ट्यपूर्ण भाग ठरला. आत्महत्त्येपूर्वी लिहून ठेवलेल्या त्या पत्रात वराडे म्हणतात की, खर्चा करिता गावातून कर्ज उचलले गेले. कांदा भावामुळे गावातील जास्त व्याजाचे पैसे द्यावे लागले. सोसायटीचे व्याज सुद्धा आजपर्यंत भरू शकलो नाही. घर खर्च व मुलाचे शिक्षण सुटू शकले नाही. या वर्षी तर कांदे पिका मुळे कर्जबाजारी झालो. मुलीला स्वतःच्या अंगावरील दागिने माझ्या घरी येऊन मोडावे लागले. ते पण पैसे मी तिला परत करू शकलो नाही, कारण तिच्या लहान मुलास कपडे घेण्यास सुद्धा माझ्या जवळ पैसे नव्हते. कर्जाचा बोजा डोक्यावर, जमीन पडलेली, पेरणीचे दिवस जवळ आलेले. घरखर्च आणि घरातील व्यक्तींच्या मूलभूत गरजा जर घरचालक पूर्ण करू शकला नाही तर, तो दिशाहीन बनतो आणि त्याला कोणताच मार्ग दिसत नाही आणि मरणच त्याला सर्व दु:खापासून मुक्त करू शकते. म्हणूनच तो आत्महत्या हा मार्ग पत्करतो. म्हणून मी सुद्धा आत्महत्या करीत आहे. मेल्या नंतर सर्व दु:खा पासून तर मला मुक्ती मिळेल परंतू माझ्या मरणोप्रांत शासनाने जरी माझे वरील कर्ज माफ केले तरी मी किंवा माझ्यासारखे मेलेले शेतकरी राजे, बळी राजे परत येणार नाहीत. शेतीविषयी शासकीय उदासिनता अशीच कायम राहिली तर एक दिवस शेतकरी आतंकवादी बनतील व शेतकर्‍याचे नांगर दाबणारे ताकदवार हात मंत्र्यांचे गळे दाबतील. त्यामुळे राज्यकर्त्यांनी वेळीच सावध होऊन शेतीला प्राधान्य दिले पाहिजे. पत्र वाचन होत असताना सभागृह सुन्न होऊन अनेकांचे डोळे पानावले होते.
पत्र वाचनानंतर त्यावर चर्चा करण्यात आली. चर्चेत अ‍ॅड दिनेश शर्मा, अ‍ॅड सुभाष खंडागळे, अनिल घनवट, कडुआप्पा पाटील, मधुसुदन हरणे यांनी भाग घेतला.

shetkari sahity sanmelan

देशाच्या कानाकोपर्‍यातून सुमारे ८०० प्रतिनिधी हजर होते.

shetkari sahity sanmelan

सायंकाळी ६ वाजता शैलजा देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ’शेतकरी स्त्री आणि साहित्यविश्व’ या परिसंवादात प्रज्ञा बापट, स्मिता गुरव व गीता खांडेभराड यांनी भाग घेतला.

shetkari sahity sanmelan

          रात्री ७.३० वाजता गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या अध्यक्षतेखाली ’शेतकरी गझल मुशायरा’ संपन्न झाला. त्यात मारोती पांडूरंग मानेमोड (नांदेड), निलेश कवडे (अकोला), राज पठाण (अंबाजोगाई), कमलाकर देसले (नाशिक) नजीम खान, प्रमोद चोबितकर (बुलडाणा), मसुद पटेल, गजानन वाघमारे, विजय पाटील (धुळे), नितीन देशमुख, लक्ष्मण जेवणे, गिरिश खारकर, पवन नालट (अमरावती), सुमती वानखेडे, विजय राऊत, विनोद मोरांडे (नागपूर), रवी धारणे (चंद्रपूर), अनंत नांदुरकर, ललित सोनोने, दिलीप गायकवाड, गंगाधर मुटे (वर्धा), प्रवीण हटकर (अकोला) या गझलकारांनी भाग घेऊन शेत्यकर्‍यांच्या कथा व व्यथेला वाचा फ़ोडणार्‍या गझला सादर केल्याने मुशायरा वेगळाच बाज व बहुरंगी कैफ़ चढवणारा ठरला. सुत्र संचालन विद्यानंद हाडके व प्रफ़ुल्ल भुजाडे यांनी केले.

shetkari sahity sanmelan

रात्री नवनाथ पवार लिखित ’उगवला नारायण’ ही एकांकिका सादर करण्यात आली. त्यात संतोष गडवे, वैशाली कुळकर्णी, किशोरी नाईक यांनी समर्थपणे भूमिका सादर केल्या तर नेपथ्य नागनाथ काजळे यांचे होते.
संमेलनाच्या यशस्वितेसाठी सतिश दाणी, दत्ता राऊत, धोंडबा गावंडे, गणेश मुटे, किसना वरघणे, अरविंद बोरकर, संतोष लाखे, निलेश फ़ुलकर, प्रविण पोहाणे, पंकज गावंडे, सौरभ मुटे, विजय मुजबैले, रवी दांडेकर, सचिन वंजारी, चेतन डुकरे, गौरव चंदणखेडे, अक्षय मुटे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्या सर्वांना मानचिन्ह देवून गौरविण्यात आले तेव्हा उपस्थितांनी उत्स्फ़ूर्तपणे टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला, ही उल्लेखनीय बाब ठरली.

shetkari sahity sanmelan

————————————————————————

shetkari sahity sanmelan

shetkari sahity sanmelan

shetkari sahity sanmelan

shetkari sahity sanmelan

shetkari sahity sanmelan

shetkari sahity sanmelan

shetkari sahity sanmelan

shetkari sahity sanmelan

shetkari sahity sanmelan

shetkari sahity sanmelan

shetkari sahity sanmelan

shetkari sahity sanmelan

By Gangadhar Mute Posted in My Blog