श्री गणराया

श्री गणराया

कृपावंत व्हावे श्री गणराया
भूलचूक माझी हृदयी धराया ॥धृ॥

चिंतामणी तू चिन्मय देवा
अनुतापी मी, तू करुणा ठेवा
द्वारी उभा मी नाम स्मराया ॥१॥

भयमोचक तव मंगलदृष्टी
अनुदिन लाभो तारक वृष्टी
हा भवबंध पार कराया ॥२॥

अनुष्ठान हे तव पूजनाशी
क्षणभंगुर मी, तू अविनाशी
साह्य होई मज अभय तराया ॥३॥

                                गंगाधर मुटे
………… **………….. **………….**…….

अट्टल चोरटा मी

अट्टल चोरटा मी……..!!


नभात हिंडताना आणि तारे न्याहाळताना
कळतच नाही मी कसा तल्लीन होवून जातो
ते दृश्य डोळ्यात मी पुरेपूर साठवून घेतो
आणि ते लुकलुकते लावण्य चोरण्याची
मी चोरी करून जातो …..!!

जीवनाचे विविधरंग उलगडणारे शब्द
कुणीतरी सहज बोलून जातो
अलगद पकडून ते शब्द मी तादात्म पावतो
आणि दिव्यत्वाचे चार शब्द चोरण्याची
मी चोरी करून जातो …..!!

ऐकताना गुणगूण, पापण्या थबकतात
नजर स्थिर होवून मन डोलायला लागते
कुणीतरी मधुर तरंग हवेवर पेरून जातो
आणि ती नादब्रह्माची लय चोरण्याची
मी चोरी करून जातो …..!!

वार्‍यापासून बळ चोरतो, सूर्यापासून आग
ढगापासून छाया चोरतो, संतांपासून राग
चोरतो मी ज्ञानमार्ग विवेकाच्या वृद्धीसाठी
सद्‍गुणांची उचलेगिरी अंतराच्या शुद्धीसाठी
असा अभय भामटा मी
असा अट्टल चोरटा मी…….!!

                                          गंगाधर मुटे
………… **………….. **…………. **…………..**……..

हे खेळ संचिताचे …..!

हे खेळ संचिताचे …..!

काजळील्या सांजवाती, चंद्रही काळोखला
का असा रे तू समुद्रा निर्विकारे झोपला

सर्वसाक्षी तू म्हणाला “सर्वमय आहेस तू”
हस्त माझा रेखतांना का असा भांबावला

हंबरूनी वासराने हंबरावे ते किती
आज गायीने पुन्हा तो मुक्त पान्हा चोरला

तृप्त झाल्या क्रुद्ध वाटा, पावले रक्ताळूनी
का कशाला धोंड कोणी जागजागी मांडला?

पाठराखा का मिळेना, का मिळेना सोबती
झुंजताना एकला मी, श्वासही सुस्तावला

साठले कंठात होते, सप्तकाचे सूर मी
साद ती बेसूर गेली, नाद ही मंदावला

संचिताचे खेळ न्यारे, पायवाटा रोखती
चालता मी ’अभय’ रस्ता, काळही भारावला


                                         गंगाधर मुटे
………………………………………………
(वृत्‍त- देवप्रिया)
………………………………………………

वाघास दात नाही

<

वाघास दात नाही


गायीस अभय देण्या, वाघास दात नाही
रजनीस जोजवीण्या, सूर्यास हात नाही

फुलल्या फुलास नाही, थोडी तमा कळीची
एका स्वरात गाणे, साथीत गात नाही

रंगात तू गुलाबी, रूपात का भुलावे
वांग्या तुझ्या चवीला, मुंगूस खात नाही

खांद्यास नांगराचा का भार सोसवेना ?
प्राशू नको विषा रे, देहास कात नाही

अभयात वाढलेली, वाचाळ राजसत्ता
राजा पहूडलेला, राजत्व ज्ञात नाही.

                                   गंगाधर मुटे
………………………………………………..
(वृत्त – आनंदकंद )
……………………………………………….

मुकी असेल वाचा

मुकी असेल वाचा 


कसा वाजवू टाळी, मी देऊ कशी दाद?
पहिला चेंडू छक्का, दुसर्‍या चेंडूत बाद

तुझे-माझे जमले कसे, करतो मी विचार
भाषा तुझी तहाची, मला लढायचा नाद

विसरभोळा असे मी सांगतो वारंवार
भूल पडते देणींची, घेणे असते याद

सरकारी खजिन्यावर मारून घ्यावा हात
चिरीमिरी दिली तरी मिटून जाईन वाद

’अभय’ तुझे ऐकुनिया तो चिडला असेल; पण,
मुकी असेल वाचा तर देणार कशी साद?


                                       गंगाधर मुटे
………………………………………………..
(वृत्त – मात्रावृत्त)
………………………………………………..

कविता म्हणू प्रियेला

कविता म्हणू प्रियेला


कविता म्हणू प्रियेला की काव्यगीत मी?
” साहित्यचोर न टपो ” या काळजीत मी

अपराध काय माझा ते तूच सांग ना
लेखी तुझ्या उरावा माझा अतीत मी

अवहेलनेस भिक्षा नाकारतो अता
जगणे अवखळ माझे अन टवटवीत मी

धावायचे किती रे मी सांग जीवना
तू टाकलीस गुगली अन पायचीत मी

’अभयास’ अभ्रकाचे छप्पर नसे जरी
नक्षत्र पांघरुनी या झोपडीत मी

                                 गंगाधर मुटे
…………………………………………..
वृत्त – ‘विद्युलता’
………………………………………….

कुंडलीने घात केला

कुंडलीने घात केला


कसा कुंडलीने असा घात केला
दिशा शोधण्यातच उभा जन्म गेला

असे वाटले की शिखर गाठतो मी
अकस्मात रस्ता तिथे खुंटलेला

विचारात होतो अता झेप घ्यावी
तसा पाय मागे कुणी खेचलेला

खुली एकही का, इथे वाट नाही
हरेक पथ येथे कुणी हडपलेला?

पटू संसदेचा, तरी दांडगाई
म्हणू का नये रे तुला रानहेला?

दिशा दर्शवेना, मती वाढवेना
कसा मी स्वीकारू तुझ्या ज्येष्ठतेला?

’अभय’ चेव यावा अता झोपल्यांना
असे साध्य व्हावे तुझ्या साधनेला

                                     गंगाधर मुटे
……………………………………………
(वृत्त-भुजंगप्रयात)

……………………………………………

पुढे चला रे

पुढे चला रे….


चेतलेल्या तेलवाती शांत नाही
चालताना वाट ही विश्रांत नाही

नेमलेले लक्ष्य आवाक्यात आहे
ना तमा वा सावजाची भ्रांत नाही

वेदनांची पायमल्ली फार झाली
झुंज शौर्याने अर्जी आकांत नाही

आजमावुन एकदा घे तू लढाई
सोक्षमोक्षाविन अता मध्यांत नाही

घे भरूनी पोतडी दोन्ही कराने
हा विरक्ती साधकांचा प्रांत नाही

                            गंगाधर मुटे
…………………………………….
(वृत्त – मंजुघोषा)

चंद्रवदना …

चंद्रवदना 

मृदगंध पसरला, घुमली शीळ लाघवी ती
पळते खिदळत सर की, चंद्रवदना नवी ती?

रुतले सदैव काटे, गजर्‍यास गुंफताना
ती कमनशीब पुष्पे, वेणीस लाजवीती

कित्येकदा झर्‍यांना, लाटा गिळून घेती
घेणार जन्म तेथे, कल्लोळ,यादवी ती

बोलायचे तुला जे, ते बोल निश्चयाने
शंका कदाचित तुझी, असणार वाजवी ती

छाया नरोत्तमाची, अभयास उब देते
त्यांचा उदो कशाला? जे कलह माजवीती

                                      गंगाधर मुटे
………………………………………………..
(वृत्त – आनंदकंद )

हे रान निर्भय अता

हे रान निर्भय अता

हे रान निर्भय अता, वाघास दात नाही
त्या बोळक्या मुखाने, काहीच खात नाही

नुसत्याच थयथयाटी, कल्लोळ हो सुरांचा
झंकारणे सुराने, त्या घुंगरात नाही

वणव्यात त्या तरूचे, अर्धांग भस्म झाले
तेही वसंतवेडे ऋतु, गीत गात नाही

लादू नये अपेक्षा भरपूर पालकांनी
आनंदही अताशा, त्या शैशवात नाही

बाणा कसा जपावा, लवचीक जो कणा ना
अभिमान “मी मराठी” मुळचा घरात नाही

चौफेर वेढलो मी, फासेच मांडती ते
समरांगणा भिणारी, माझी जमात नाही

छळले मला कितीही, लखलाभ हो तयांना
अभयात नांदतो मी, किल्मिष मनात नाही

                                           गंगाधर मुटे.
……………………………………………….
(वृत्त – आनंदकंद )