मराठी भाषा दिन : दोन संकल्प

                   

मराठी भाषा दिन : दोन संकल्प

नमस्कार मित्रहो,

          आज २७ फेब्रुवारी आणि महाशिवरात्री सुद्धा आजच. ५२ वर्षापूर्वी महाशिवरात्री अशीच नेमकी २७ फेब्रुवारी या दिवशी आली होती आणि नेमका हाच शुभमुहूर्त निवडून अस्मादिकांनी या पृथ्वीतलावर आपले ’पुनरागमन’ केले. या दिवसाला वाढदिवस का म्हटले जाते हे एक गूढ कोडेच आहे आणि हा दिवस साजरा करावा हे आणखी एक जटिल कोडे. या दिवशी ’वाढ’ कशात होते हेच कळेनासं झालंय. वयमानात वाढ होते मात्र जगण्याचा काळ कमी होत जातो. यात हर्षोल्लास करण्यासारखे काय आहे?

          वय वाढत जाताना आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर ’वाढ’ या शब्दाचे संदर्भ देखील बदलत जातात. बालपणी वाढत्या वयासोबत शारीरिक बल आणि बुद्धी वाढत जाते. तरुणपणी वाढत्या वयासोबत चैतन्य आणि विवेकशीलता वाढत जाते मात्र एकदा का तारुण्य ओहोटीला लागलं की मग वाढत्या वयासोबत ’वाढ’ शब्दाचे संदर्भही उलटे पडायला लागतात. मानसन्मान वाढण्याची शक्यता असते; केवळ शक्यता असते खात्री नाहीच. मात्र वाढत्या वयासोबत डोळ्याच्या नंबरमध्ये सततची वाढ, प्राकृतिक विकारामध्ये निरंतर वाढ हे मात्र हमखास असते आणि तरीही आयुष्याच्या प्रत्येक अवस्थेत ’वाढदिवस’ साजरा करण्याचा आपला उत्साह मात्र यत्किंचितही कमी होत नाही. हे मानवी स्वभावातील एक रहस्यच समजावे लागेल.

          आजचा दिवस “मराठी भाषा दिवस” “जागतिक मराठी भाषा दिवस” “मराठी भाषा दिन” म्हणूनही जगभरातील मराठी भाषिकांकडून साजरा केला जातो. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेऊन मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या औचित्याने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू केली. या दिवसाचे औचित्य साधून आपणही काहीतरी संकल्प करायला हवा. मी सुद्धा मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी माझ्यापरीने दोन प्रकल्प हाती घेत आहे.

१) सुमारे दीड वर्षापूर्वी म्हणजे २२/०७/२०१२ रोजी मी http://www.sharadjoshi.in अर्थात “योद्धा शेतकरी” या एका महत्त्वाकांक्षी संकेतस्थळाच्या निर्माणाचा एक महाप्रकल्प हाती घेतला. हे संकेतस्थळ म्हणजे शरद जोशी आणि शेतकरी संघटनेविषयी परिपूर्ण माहितीने ओतप्रोत भरलेला अनमोल खजिना व्हायला हवा. शरद जोशींच्या समग्र लेखनासहित अधिवेशने, मेळावे, रस्ता रोको अथवा रेल्वेरोको दरम्यान वेगवेगळ्या आंदोलनस्थळी घडलेल्या घडामोडीविषयीचे शक्यतो फोटोसहित सर्व वृत्तांत येथे उपलब्ध व्हायला हवेत. त्यादृष्टीने कार्य सुरू केले पण हे संकेतस्थळ परिपूर्ण करण्याचे कार्य वाटते इतके नक्कीच सहजसाध्य नसल्याने अजूनही पूर्णत्वास पोचलेले नाही. अजून खूप काम बाकी आहे. दीड वर्षात झालेल्या कामाबद्दल मी स्वतःही समाधानी नाही. पुढील एक वर्षात हे कार्य पूर्णत्वास नेण्याचा मानस आहे. त्यासाठी येत्या काही काळात एक “राज्यव्यापी दौरा” करण्याचे निश्चित केले आहे.

२) आजवर मराठी साहित्य चळवळ, प्रादेशिक भाषा साहित्य चळवळ, ग्रामीण साहित्य चळवळ, कामगार साहित्य चळवळ, दलित साहित्य चळवळ अशा अनेक व नानाविध साहित्य चळवळी निर्माण झाल्या, अ.भा. स्तरावर साहित्य संमेलन झालेत पण या देशाचा ’कणा’ असलेल्या शेतीची अ.भा. शेतकरी साहित्य चळवळ मात्र कधी उभी राहिली नाही. या दिशेने पाऊल टाकण्याचा मानस आहे. हे कार्य किती कठीण आहे याची जाणीव असली तरी हे कार्य अशक्यप्राय नाही याचीही खात्री आहे. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीची पायाभरणी करून एका वर्षाच्या आत अ.भा. स्तरावर मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करायचे ठरवले आहे आणि त्यानंतर दरवर्षी मराठी शेतकरी साहित्य संमेलन भरवणे शक्य व्हावे म्हणून संघटनात्मक बांधणी करायचे ठरवले आहे.

          शामियान्याच्या भव्यदिव्यतेपेक्षा चर्चात्मक दर्जाची “भव्यदिव्यता” जर प्रकटीत करता आली तर ते कदाचित अधिक प्रभावकारी शेतकरी साहित्य संमेलन ठरू शकेल. या कामात मला मार्गदर्शक आणि सहकार्‍यांची प्रचंड गरज भासेल. या निमित्ताने मी आपल्यासमोर मार्गदर्शन आणि सहकाराची याचना करतो आहे. जाणकारांनी आणि स्वेच्छूक मंडळींनी स्वतःहून समोर यावे. आपण लवकरच यासंदर्भात चर्चा सुरू करू. संघटनात्मक प्रारूप ठरवू, नियमावली बनवू, संस्था नोंदणीसाठी दस्तावेज तयार करू आणि आकारास आणू अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ.

सहकार्याच्या अपेक्षेत…!

                                                                                                                                आपला नम्र
                                                                                                                              – गंगाधर मुटे
———————————————————————————————————————————- 

तोंडी, लेखी व प्रयोगशाळेतही मेरीटचे गुण घेणारी “माझी गझल निराळी”


तोंडी, लेखी व प्रयोगशाळेतही मेरीटचे गुण घेणारा


गझलसंग्रह : “माझी गझल निराळी”

           हल्ली अनेक कवी गझल लेखनाकडे वळले आहेत. अरबी, फारशी, उर्दू अशी होत होत गझल मराठीत आली. मराठीपूर्वी ती हिंदी व गुजराथीत आली. पूर्वीची गझल ही शराब आणि शबाब ह्या विषयाभोवतीच घुटमळत होती. आता ती विविधांगी बनत चालली आहे. जनजीवनातील अनेक सत्ये परखडपणे गझलेमध्ये मांडली जात असताना गंगाधर मुटे सारखे मातब्बर, कर्तबगार, प्रॅक्टिकल अनुभवी कवी गझलेच्या प्रेमात पडले व त्यातून व्यक्तिगत अनुभव अवलोकन व चिंतन याद्वारे सृजनशील लेखणीतून सत्य मांडण्यात शतप्रतीशत यशस्वी झाले व साकारला गझलसंग्रह “माझी गझल निराळी”.

             आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभवाचं चिंतन त्यांनी आपल्या गझलेत ओतलं तेव्हा वाचकाला त्यातील यथार्थता पटते. हेच मुटेंच्या यशस्वी गझलेचं गमक आहे.
उदा.

                                           “गाळून घाम विणले मी वस्त्र स्वावलंबी
                                           केल्यात पार चिंध्या खिजवून पावसाने”  

             हा कृषकाच्या जीवनातील भयाण भेसूर असा अनुभव. या एकाच शेरात संपूर्ण कृषकाचे जीवनच समोर येते. अशा ताकदीचा यथार्थ शेर लिहिणारा गझलकार विरळाच.

             एक सच्चा शेतकरी, शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता जेव्हा हे जाणतो की गझलेचे सहा शेर सहा स्वतंत्र कविता ठरू शकतात. वेगवेगळा आशय आनंद देऊ शकतात तेव्हा हा एक शेतकरी व्याकरणाचा अभ्यास करतो. गझल तंत्राचा अभ्यास करतो व यशस्वी गझल लिहितो. ही गोष्ट वाटती तेवढी सोपी नाही. मी एक रसिक या नात्याने त्याच्या चिंतनाला अभ्यासाला, अनुभवाला व त्यांच्या गझलांना वंदन करतो.
म्हटलेच आहे “सिर्फ बंदीशे अल्फाज काफ़ी नही गझल के लिये, जिगर का खूं भी चाहिये असर के लिये” आणि खरोखरच गंगाधर मुटे यानी आपल्या गझलांमध्ये प्रत्यक्ष प्राण ओतला म्हणून त्या परिणामकारक ठरल्या आहेत.

             ज्यांच्या गझलांना सुधाकर कदमांची (पुणे) प्रस्तावना, भीमराव पांचाळेंचे पाठबळ, प्रदीप निफ़ाडकर, प्रमोद देव(मुंबई), स्वामी निश्चलानंद(अरुणाचल प्रदेश) यांच्या कौतुकाची छाप मिळावी त्या गझलांवर माझ्यासारख्या एका छोट्या व्यक्तीने तोंडी, लेखी व प्रयोगशाळेतही मेरीटचे गुण घेणाऱ्या ह्या गझलावर चार शब्द लिहिणे ही केवळ औपचारिकताच.

“मरणे कठीण झाले” ह्या पहिल्याच रचनेत आश्वासक भरवशाचं असं काहीच राहिलं नाही त्यामुळे माणूस भरकटत चालला. यदाकदाचित तो रस्त्यावर आला तरी त्याला चकवणारे असे खूप आहेत असा आशय व्यक्त होतो.

                                           “दिसतात अभय येथे चकवे सभोवताली
                                           रस्ताच जीवनाचा सुचणे कठिण झाले”

स्वलेखनाने स्वानंदा सोबत परमार्थही साधावा बघा हा शेर

                                           “आनंद भोगताना परमार्थही साध्य व्हावा
                                           असलेच कार्य कर तू दोहे मला म्हणाले”

कर्म और भाग्यका किताब है जिंदगी, पाप और पुण्य का हिसाब है, जिंदगी जेव्हा कर्म करताना भाग्य फळाला येते तेव्हा आपसूकच नशीब फळते.

                                           “प्राक्तन फिदाच झाले यत्नास साधतांना
                                           मोती पुढ्यात आले वाळूस गाळतांना”        

भारतातील सद्य परिस्थितीचे वर्णन खालील शेरामध्ये बघा. सर्वांना नोकरी हवी मग शेती कुणी करायची असा काहीसा आशय.

                                           निघून गेलेत शहाणे सर्व साहेब बनायला
                                           मूर्ख आम्ही येथे उरलो, मोफत अन्न पिकवायला    

             आसवांची अनेक रूपे जसे बेजार आसवे, दिलदार आसवे, कलदार आसवे, हळुवार आसवे, अंगार आसवे, झुंजार आसवे रेखाटलेली आहेत “भांडार हुंदक्यांचे” या रचनेत. दुःखांत सोबतीला नाही कुणी सवे, साथ ज्यांनी निभवली ती फक्त माझी आसवे, असा काहीसा आशय असणारा हा त्यातील एक शेर.

                                           धुत्कारले जगाने, नाकारले सख्यांनी
                                           तेव्हा दिला मनाला आधार आसवांनी                    

             शेतकरी ग्रामीण जनतेची परिस्थिती खूपच वाईट आहे. त्याला सगळेच नाडवतात. जंगली श्वापदे, शहरी नागरिक, सहकार, सावकार, निसर्गासह सगळेच. वर्षानुवर्षे हेच सुरू आहे. म्हणून आता त्याच्या समस्या संपतील असं काहीतरी करायला हवं. वाचा “शस्त्र घ्यायला हवे” ही गझलरचना. (पान क्र २८) नमुन्यादाखल एक शेर;

                                           श्वापदे पिसाळलीत शस्त्र घ्यायला हवे
                                           झोपले असेल शेत जागवायला हवे

             गझलकार गंगाधर मुटे यांची शेती, शेतकरी, त्यांच्या समस्यांचा पूर्व अभ्यास व अनुभव. म्हणून बहुतेक सर्व गझलांमधून कळवळा, वास्तवता, गरिबी, त्याला छळणारे नेते, पुढारी, अधिकारी, उत्पन्न खर्च वगैरे सर्व शेती संबंधितच विषय आढळून येतो. आपमतलबी पुढारी, सत्ताधारी व विरोधकही सर्व नाटकी भाषा बोलतात. प्रलोभने पेरतात त्यांना त्यांची जागा दाखविली पाहिजे, याकडे अंगुलीनिर्देश करणारी “नाटकी बोलतात साले” ही रचना. त्यातील एक शेर बघा. 

                                           “कोणीतरी यांची आता पडजीभ उपटली पाहिजे
                                           नाटकी बोलतात साले की गरिबी हटली पाहिजे”

             गंगाधर मुटेंच्या गझलांत सुंदर अशा प्रतिमा व प्रतीकांची वापरही दिसून येतो; जसे शुभ्र कावळे, पांढरे पक्षी, चकवे, बत्तीस तारीख, मेड इन चायना, वाचाळ राजसत्ता, रानहेला, राजकीय पहेलवान वगैरे वगैरे. बघा हा जबरदस्त शेर;

                                           “लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
                                           येणार वित्त आहे बत्तीस तारखेला”

                                           “सोकावलेल्या अंधाराला इशारा आज कळला पाहिजे
                                           वादळ येऊ दे कितीही पण दीप आज जळला पाहिजे”

             वरील शेर वाचला की आठवतो, “तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे, वादळवारा पाऊस धारा मुळी ना आम्हा शिवे” यूज अँड थ्रो च्या काळात माणसाचंही मन सुद्धा नाटकी झालं, बेभरवशाच झालं. असा आशयाचा हा शेर;

                                           “चला वापरा एकदा आणि फेका हवी ती खरीदी नव्याने करा
                                           इथे काळिजेही दिखाऊ-विकाऊ हृदय भासते मेड इन चायना”

             पशू पक्षी ही किटके किती बघ मेळ करून राहती, आपत्ती येता कोणती अती संघटुनिया धावती, तू मानवाचा देह असुनि का न तुजही भावना, ऊठ आर्यपुत्रा झडकरी कर सामुदायिक प्रार्थना या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामुदायिक प्रार्थनेच्या आशयासी साम्य असणारा मुटे यांचा हा शेर वाचा;

                                           पाखरेही एकी करतात जरासे पंख फुटल्यावर
                                           पण तुला कधी मिशा फुटणार? सांग माणूस म्हटल्यावर?

शेती करणे म्हणजे कनिष्ठता, मूर्खता याउलट नोकरी करणे म्हणजे श्रेष्ठपणा असा जो सध्या सामाजिक समज रूढ झाला आहे त्यावर मार्मिक टिप्पणी करताना मुटे लिहितात,

                                           “शेती करून मालक होणेच मूर्खता
                                           सन्मान मोल आहे कर अभय चाकरी”

जास्तीत जास्त शरीर उघडे टाकून कमीतकमी वस्त्र वापरण्याच्या ’फॅशन’वर आसूड ओढताना मुटे म्हणतात

                                           “ललना पाहून कपडे शरमले
                                           मते पाहताच नेते नरमले”

भ्रष्टाचारावरही श्री मुटे आसूड ओढून लिहितात की, ही व्यवस्थाच किडली आहे

                                           “टाळूवरील लोणी खाण्यास गुंतला जो
                                           सत्कारपात्र तोची मशहूर थोर झाला”

                                           “सरकारी खजिन्यावर मारून घ्यावा हात
                                           चिरीमिरी दिली तरी मिटून जाईन वाद”

             एकंदरीत अशा ७४ दालनांचा हा वैभवशाली खजिना आहे. याला हवा रत्नपारखीच. वाचकही भाग्यवान, हा खजिना वाचून आणि भाष्य करून मी धन्य झालो. पण यावरील हे भाष्य किंवा या समीक्षणात मावेल एवढी मुटेंची गझल लहान नाही. ती संग्रहीच असावी आणि वेळोवेळी वाचावी, अभ्यासावी अशी आहे.

गझलकार श्री मुटे यांना पुढील साहित्य प्रवासासाठी शुभेच्छा.

                                                                                                                          – तुळशीराम बोबडे
                                                                                                                                   अकोला
————————————————————————————————————————–

‘माझी गझल निराळी’ अभिप्राय – श्री. श्याम पवार

आदरणीय श्री. श्याम पवार यांचा अभिप्राय
                                                                                                                              दि. १४/०२/२०१४
प्रति,

श्री. गंगाधर मुटे,
आर्वी छोटी, ता. हिंगणघाट, जि. वर्धा

सप्रेम नमस्कार

      अलीकडेच प्रकाशित झालेली तुमची ‘वांगे अमर रहे’ व ‘माझी गझल निराळी’ ही दोनही पुस्तके वाचली. वाचकाला अस्वस्थ करण्याचे व विचार करायला भाग पाडण्याचे काम या लिखाणातून निश्चितपणे झाले आहे. कृषिप्रधान भारतातील, शेतात घाम गाळणार्‍या शेतकरी समाजाचे दुर्दैवी भयाण वास्तव परिणामकारक शब्दांत या लिखाणात व्यक्त झाले आहे.

      ‘वांगे अमर रहे’ या लेखसंग्रहातील प्रत्येक लेखात तुम्ही मांडलेली व्यथा भारताच्या अर्थव्यवहारातील व्यंगांवर नेमकेपणाने बोट ठेवणारी आहेच आणि त्याचबरोबर ‘शेतकर्‍याचा आसूड’ ओढण्याची ताकदही त्यातून समर्थपणे प्रगट झाली आहे.
     गणित विषयात पदवी घेतलेल्या तुमच्यासारख्या शेतकरी कुटुंबातील तरुणाकडून या साहित्यकृतींची निर्मिती अधिकच अभिनंदनीय व परीक्षकाचीच परीक्षा घेणारी झाली आहे. दुसर्‍या बाजुने असेही म्हणता येईल की, शेतकरी संघटनेने मांडलेले अर्थशास्त्र कदाचित इतरांपेक्षा अधिक बारकाव्याने तुम्हाला समजले व त्यामुळेही ते परिणामकारक शब्दांत तुमच्या साहित्यात उतरले आहे. साहित्यनिर्मितीसाठी अनेक बाजू किंवा उद्देश्य असू शकतात. तथापि, सामाजिक अन्यायाविरुद्ध पोटतिडीकीने जी वेदना व्यक्त होते ती सामाजिक परिवर्तनाकडे नेमकेपणाने अंगुलिनिर्देश करणारी ठरते आणि म्हणूनच मूल्यवान ठरते. तेच मूल्य आपल्या पुस्तकांतील या शब्दांना प्राप्त झाले आहे असे म्हणणे अतिशयोक्त ठरू नये. ‘आनंदाचे डोहीं, आनंद तरंग’ याप्रमाणे आनंदाच्या डोहात डुंबण्याचा अनुभव घेण्याचे सामर्थ्य या शब्दांत आणि अनुभूतीत नसेल तथापि, तुकारामांच्या अभिव्यक्तीतील ‘नाठाळाचे माथां, हाणूं काठी’ असा आत्मविश्वास त्यांतून व्यक्त झाला आहे. समाजातील कुप्रथा, जातीपातींच्या अतूट भिंती आणि लोककल्याणकारी राज्याच्या नावाने चाललेल्या भ्रष्ट कारभारातील विसंगतीवर वेगवेगळ्या कालखंडात अनेक समाजधुरीणांनी (उदा. गाडगेबाबा, महात्मा फुले इ. इ.) कठोर शब्दांत आवाज उठविला याची आठवण करून देणारा तुमचा आक्रोश आहे असे वाटते. या पुस्तकांच्या निमित्ताने तुलना करण्यासाठी मी जे लिहिले आहे त्यामुळे काहीना आश्चर्यही वाटेल. परंतु, ज्या देशात, आजच्या परिस्थितीत, घाम गाळणारा व कष्ट करणारा जगाचा पोशिंदा शेतकरी लाखोंच्या संख्येने आत्महत्या करतो आहे त्या परिस्थितीत कोणत्या शब्दांचा प्रयोग करावा? शरीराला महारोग झाला म्हणजे त्या शरीराची संवेदना नष्ट होते; तथापि, त्याच्यावरही उपचार करता येऊ शकतात. मात्र, आज समाजमनाला बधीरतेचा असा कोणता रोग झाला आहे की ज्याचा शोध घेऊन त्यावर उपचार करणे कठीण व्हावे, अशक्यप्राय व्हावे? त्या व्यवस्थेचे वर्णन-विश्लेषण कोणत्या शब्दांत करावे? अश्या परिस्थितीत तुमच्यासारखा तरूण आपल्या ठिकाणी असलेल्या प्रतिभेच्या माध्यमातून काही मांडतो आहे, लिहिण्यासाठी सुधारण्याच्या अपेक्षेने सतत धडपडतो आहे त्यामुळे अशा प्रकारे तुलनात्मक मांडण्याचा प्रयोग मी करतो आहे.

      सन १९८० नंतरच्या दोन दशकांत महाराष्ट्रात शेतकरी संघटनेचे वादळ उठले. भूतकाळाचे अचूक विश्लेषण आणि भविष्यकाळाचा नेमका वेध घेणारे शरद जोशी यांचे नेतृत्व संघटनेला लाभले. संघटनेच्या भरतीचा हा काळ. या भरतीच्या लाटा छातीवर झेलण्यासाठी असंख्य तरूण यात उतरले. शतकानुशतके घाव झेलून वेदना मुकी झालेल्या व सदान् कदा मनं मारली जाऊन मुर्दाड झालेल्यांना नवी ऊर्मी, नवी प्रेरणा या विचाराने निश्चितपणे मिळाली. लाखोंच्या संख्येने शेतकरी भाऊबहिणी रस्त्यावर उतरले. शेतकर्‍याच्या व कष्टकर्‍याच्या स्वातंत्र्याची प्रेरणा घेतलेल्या आणि घरदार सोडून काम करण्यासाठी तयार झालेल्या तरूण संघटनापाईकंची फौज उभी राहिली. पारतंत्र्यानंतर प्रथमच शेतकरी भावांच्या बरोबरीने मायभगिनी तुरुंगात जाण्यासाठी घराबाहेर पडल्या. धास्तावलेल्या स्वकीयांच्या सरकारातील आमच्याच राज्यकर्त्या पोरांनी आपल्या भावांच्या छातीत गोळ्या घालून त्यांचे बळी घेतले, मायभगिनींना लाठ्याकाठ्यांनी सोलून काढले. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर इतर राज्यांतही शेतकरी संघटनेच्या प्रभावाखाली शेतकर्‍यांची एकजूट झाली. राज्य सरकारे आणि केंद्र सरकार यांना संघटनेच्या अर्थशास्त्रीय विचारांची दखल घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. मात्र संघटनेच्या मागण्यांची पूर्तता अजूनही पूर्णत्वाने झालेली नाही. त्यामुळे चळवळीचे सामर्थ्य टिकविणे आणि वाढविणे आवश्यक असल्याचा तुम्ही मांडलेला आशावाद योग्यच आहे. 

          संघटनेचा विचार जितका मूलगामी आणि परिवर्तनवादी तितका तो समाजाच्या विविध थरांतून व विविधांगांतून खोलवर रुजतो. शेतकरी संघटनेला असे भाग्य लाभले. संघटनेच्या विचारांचा व आंदोलनांचा प्रभाव साहित्यक्षेत्रातही झालेला आहे. विशेष करून ग्रामीण साहित्यिक नव्याने लिहू लागले. एक नवीन साहित्यधारा तयार झाली. सकस आणि परिवर्तवादी साहित्यलेखकांची दमदार पिढी संघटनेच्या विचाराने प्रभावित होऊन लिहू लागली, बोलू लागली. आज ही यादी लक्षात घेण्याइतपत मोठी झाली आहे. संघटनेच्या या मंतरलेल्या कालखंडात काम केलेल्यांची पिढी आता वृद्धत्वाकडे झुकली आहे. अनेकजण परलोक(!)वासी झाले आहेत. परंतु, हा वारसा समर्थपणे पुढे सुरू राहील याचा भरवसा तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडे पाहून ‘अभय’ देणारा वाटतो.

‘घामाची कत्तल जेथे, होते सांजसकाळी
तुतारी फुंकते तेथे, माझी गझल निराळी’ आणि

‘युगानुयुगे ते बोलले, ऐकत आलो आम्ही
आता माझ्या मतल्याची ऐकवण्याची पाळी’

ही तुमच्या गझलेमधली भूमिका केशवसुतांच्या ‘तुतारी’ची आठवण जागविणारी आहे यात शंका नाही.

सभोवतालचे भयाण वास्तव आणि उद्ध्वस्त ग्रामव्यवस्था यांचे चित्रण वेगवेगळ्या गझलांमध्ये टोकदार शब्दांत व्यक्त झाले आहे.

‘बाभूळ, चिंच, आंबा; बागा भकास झाल्या
मातीत ओल नाही, तगणे कठीण झाले’

‘शिवारात काळ्या, नि उत्क्रांतलेल्या खुज्या माकडांचा धुमाकूळ तो
जिथे कुंपणे शेत खाऊन गेली, तिथे त्या पिकांनी लपावे कसे?’

‘टाळले होते फुलांनी, आयुष्यभर भेटायचे
आज मात्र सडा पडलाय, मस्त तिरडी सजवायला’

‘दिसतात अभय येथे चकवे सभोवताली
रस्ताच जीवनाचा सुचणे कठीण झाले’

‘विज्ञानाने हात टेकले अन् बुद्धीही हतबल झाली
पूजन-अर्चन, जंतर-मंतर, तमाम तेव्हा करून गेलो’

अश्या प्रकारच्या ओळींतून हे वास्तव स्वरूपात व्यक्त झाले आहे. जीवन जगण्यातील हतबलता आणि त्यामुळे होणारी आत्महत्या याची व्यथा

‘असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी’

अश्या ओळींतून व्यक्त झाली आहे. तरीसुद्धा या प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्याची जिद्द ठाम आहे.

‘राजसत्ताच कोपली बघ, तुझ्या श्रमाच्या कमाईवर
तुझी शक्ती मनगटात तू, पूर्ण एकवटली पाहिजे’

‘आता अभय जगावे अश्रु न पांघरावे
आशेवरी निघावे ही वाट चालताना’

या ओळींमधून तुमची संकटावर मात करण्याची लढावू वृत्ती व्यक्त झाली आहे.
राजकारणी आणि एकूणच भ्रष्ट राजसत्ता यांचे विकृतिकरण नेमक्या शब्दांत गझलांमधून व्यक्त झाले आहे.

‘घराणे उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो आम्ही?
सग्यासोयर्‍यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे’

‘आम्हास नाही कुठेच सत्ता, कुठेच नाही अभय पदांचे
लबाड वंशात जन्म ज्यांचा, तमाम त्यांचा पुढार आहे’

‘जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे’

‘लोंढेच घोषणांचे, दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला’

‘भ्रष्ट आचारास सत्ता, मुख्य झाला स्रोत आहे
घाव घाला केंद्रस्थानी, एकदा द्या मात अण्णा’ 

    या प्रकारच्या अनेक गझलांमधून या विकृतीचे चित्र मांडले गेले आहे ते निश्चितच विषण्ण करणारे तर आहेच आणि त्याच बरोबर विचार कराय लावणारे आहे. या सगळ्या विसंगतीत तुमची मातीशी असलेली अतूट नाळ 

‘अभय एक युक्ती तुला सांगतो मी करावे खरे प्रेम मातीवरी या
भुई संग जगणे, भुई संग मरणे, भुई संग झरणे वगैरे वगैरे’

या शब्दांमधून व्यक्त झाली आहे, ती खरोखरी भावणारी वाटली यात काही शंका नाही.

           गझल या काव्यप्रकाराची हाताळणी तुम्ही अगदी अलीकडे सुरू केली तथापि त्यात जे लिखाण केले त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना दाद देणे भाग आहे. मात्र त्याच वेळी तंत्राच्या मार्गाने जाताना अंतःकरणातल्या ऊर्मी व्यक्त करताना काही राहून तर जात नाही ना याचा विचार होण्याची आवश्यकता व्यक्त करावीशी वाटते.

      ‘वांगे अमर रहे’ या लेखसंग्रहातील शेवटचा ‘असा आहे आमचा शेतकरी’ हा लेख सर्वांनाच अंतर्मुख व्हायला लावणारा आहे. आणि ‘शेतकरी समाजासाठी कार्य करणे हे तुलनेने अधिक कठीण काम असले तरी ऐतिहासिक आणि महान कार्य आहे याची खूणगाठ मनाशी पक्की बांधून घेणे गरजेचे आहे’ असा व्यक्त केलेला आशावाद बरेच काही सांगून जाणारा आहे. एकूणच सर्व लेखसंग्रह अभ्यासनीय झाला आहे.

        पुस्तके वाचण्याची संधी जाणीवपूर्वक करून दिली याबद्दल मनापासून धन्यवाद आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी अंतःकरणपूर्वक शुभेच्छा.
                                                                                                           श्री. श्याम पवार
                                                                                                      महाळुंगे (इंगळे), जि. पुणे
————————————————————————————————————————————

महाकवी कालीदास विदर्भस्तरीय कवी संमेलन

महाकवी कालीदास विदर्भस्तरीय कवी संमेलन

               महाकवी कालीदासांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या कर्मभूमीत महाकवी कालीदास महोत्सव समिती तर्फ़े नगरधन (रामटेक) जि. भंडारा येथे दिनांक ०८/०२/२०१४ रोजी महाकवी कालीदास विदर्भस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
               या कवीसंमेलनाला कवीवर्य सर्वश्री सुधाकर हेमके, गंगाधर मुटे, मनिषा रिठे, रवीपाल भारशंकर, हरिशंकर जोशी, प्रदीप हेमके, धीरज ताकसांडे, गिरिष सपाटे, दीपक मोहोड, पवन कामडी, मिनाज पौचातोड या कवींना निमंत्रीत करण्यात आले होते.

* * * * *
Mahakawi Kalidas
* * * * *
Mahakawi Kalidas
* * * * *
Mahakawi Kalidas
* * * * *
Mahakawi Kalidas
* * * * *
Mahakawi Kalidas
* * * * *

Mahakawi Kalidas
महाकवी कालीदासांच्या वास्तव्याने पुनीत झालेला महाकवी कालीदास यांचे वास्तव्य असलेला हाच तो नगरधन येथील भुईकोट किल्ला.

* * * * *

अमेठीची शेती

अमेठीची शेती

सांगा कशी फ़ुलावी, तोर्‍यात कास्तकारी
वाह्यात कायद्यांच्या लोच्यात कास्तकारी

देशात जा कुठेही, भागात कोणत्याही
सर्वत्र सत्य एकच; तोट्यात कास्तकारी!

झिजत़ात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण;
दारिद्र्य-अवदसेच्या विळख्यात कास्तकारी

कांदा हवा गुलाबी, स्वस्तात इंडियाला
जावो जरी भले मग, ढोड्यात कास्तकारी

पोसून राजबिंडे; आलू समान नेते
उत्पादकास नेते, खड्ड्यात कास्तकारी

सत्ता सुकाळ शेती, बारामती-अमेठी
ती तांबड्या दिव्याची, अज्ञात कास्तकारी

हे बोलणेच आता, हा नाइलाज उरला
की सोड ’अभय’ एका झटक्यात कास्तकारी

                                         – गंगाधर मुटे
—————————————————-

Amethi

*   *   *   *
Amethi

*   *   *   *
Amethi

*   *   *   *
Amethi