दहा लाखाची लॉटरी

दहा लाखाची लॉटरी

आज सकाळी ९.१८ मिनिटांनी माझ्या मोबाईलवर, +९२३४२७९३६५१५ या नंबरवरून एक कॉल आला.
मला दहा लाखाची लॉटरी लागली असे सांगण्यात आले.
हिंदीमध्ये बोलत होता. पण बोलण्याची ढब भारतीय हिंदीसारखी वाटत नव्हती.
त्यासाठी मी त्यांना माझे पुर्ण नांव आणि राशनकार्डाचा नंबर सांगावा असा आग्रह होता.
बॅंक अकॉउंट नंबर वगैरे जाणून घेण्यात त्यांना फ़ारसा रस दिसला नाही.
त्यावरून हा प्रकार निव्वळ आर्थिक फ़सवणुकीचा नसून काही अवांतर गौडबंगाल असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मला वाटते.
कदाचित identity theft चा प्रकार असू असेल.तसे असेल तर ही गंभिर बाब आहे.
.
.
. मी दहा लाखाचे काय करू? जे माझ्याजवळ त्यात मी समाधानी आहे असे म्हटल्यावर तिकडून फ़ोन डिस्कनेट करण्यात आला.
.
जाणकारांनी मतप्रदर्शन करावे.

गंगाधर मुटे

ती स्वप्नसुंदरी

ती स्वप्नसुंदरी



‘सात’ खिडक्या पुरेशा मी झाकतो तरी
शिरते कशी कळेना ती स्वप्नसुंदरी

जोपासतो अशी ही आम्ही समानता
राधा,टिना,करीना बाजूस श्रीहरी

जोडे सजावटीला एसी-कपाट ते
भाजी-फ़ळांस जागा, मात्र उघड्यावरी

मंगळ कह्यांत आला, कक्षेत तारका
भैरू अजून खातो कांदा नि भाकरी

जिंकून मीच हरतो, ना जिंकतो कधी
तुमचा लवाद आहे, पंच तुमचे घरी

खेड्याकडून जावे शहराकडे जसे
आकार घटत चोळी, जाते सरासरी

शेती करून मालक होणेच मूर्खता
सन्मान मोल आहे कर ’अभय’ चाकरी


                                        गंगाधर मुटे
………………………………….………………
वृत्‍त- विद्युल्लता
…………………………………………………

छातीचं झाकण बोम्लीवर आलं

छातीचं झाकण बोम्लीवर आलं

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं
हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं …… !!

चॅनल पाहावं कोणतंय तं उघडेबंब नाचते
टीव्ही पाह्यतांना पोरासंग, मायबाप लाजते
सभ्यतेची अभिरुची लईच दिसते न्यारी
अब्रू गेली ढोड्यात अन नोट झाली प्यारी
आता उघडं काय, झाकलं काय, सारखंच झालं
हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं …… !!

जलश्यातल्या पोरी कशा टगरबगर पाहे
चार लोकामंधी मात्र झाकूनझुकून राहे
जे काही करे ते अंधारात करे
उजेडात मात्र इज्जतीले मरे
आता उजेड काय, अंधार काय, सारखंच झालं
हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं …… !!

कालेजचे तोतामैना वर्गात नाय दिसत
आडमार्गी झाडाखाली बसते दात किसत
जनाची लाज ना मनाले खंत
खुलेआम प्रेमलीला, नाही त्याले अंत
आता दिवस काय, रात्र काय, सारखंच झालं
हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं …… !!

शायण्याने बगीच्यात जाऊ नये म्हणतात
बिनावार्‍यानं झुडपं तिथं, खल-खल हालतात
झुडपाच्या आडोशाला दोन पाखरं बसते
“प्रेम” या शब्दाचे धिंडवडे नुसते
आता भय काय, अभय काय, सारखंच झालं
हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं …… !!

                                         गंगाधर मुटे
————….————–….————–
..ही कविता ऐकण्यासाठी क्लिक करा..
————….————–….————–

गोचिडांची मौजमस्ती

गोचिडांची मौजमस्ती

चौखूर उधळे दाहीदिशा, गवसणी मग घालणार कशी?
नसते नाकही या मनाला, वेसण तरी टोचणार कशी?

खूप करती निश्चय-इरादे, मुक्त होण्यास जोखडातुनी
चूल-तव्याने बंधक केले, कंबर आता कसणार कशी?

जग बदलले, नाणे बदलले, बदलले ते सारे शिरस्ते
नाणी रुप्याची राणीछाप, पण ती इथे चालणार कशी?

उकर तू तुला हवे तेवढे, हव्या तितक्या लाथाही घाल
पण तुझ्या एकट्या हाताने, जरठ गढी ढासळणार कशी?

रक्तापेक्षा गोचीड जास्त, झालेत तिच्या अंगोअंगी
गोचिडांची मौजमस्ती पण, अता ती गाय जगणार कशी?

’अभय’ तू असाच चालत रहा, रस्ता मिळेल कधी ना कधी
चालल्याविना खाचाखोचा, आडवाट ती कळणार कशी?

                                                       गंगाधर मुटे
…………………………………………………………..
(वृत्त – मात्रावृत्त )
…………………………………………………………..

शुभहस्ते पुजा : अभंग

.
.
शुभहस्ते पुजा : अभंग

प्रथम पुजेला । लालदीवा मस्त ॥
सत्ताधारी हस्त । कशाला रे ॥१॥

त्यांचे शुभ हस्त । कसे सांगा देवा ॥
हरामाचा मेवा । चाखती ते ॥२॥

लबाड लंपट । तयांची जमात ॥
माखलेले हात । रक्ताने गा ॥३॥

पाय तुझे कैसे । नाही विटाळले ॥
मन किटाळले । कैसे नाही ॥४॥

म्हणा काही देवा । आहे साटेलोटे ॥
अभयास वाटे । शंका तशी ॥५॥

                          गंगाधर मुटे
………… **………….. **…………

पंढरीचा राया : अभंग

.

पंढरीचा राया : अभंग

पंढरीच्या राया । प्रभू दीननाथा ॥
टेकितो मी माथा । तुझे पायी ॥१॥

युगे किती उभा । एका विटेवरी ॥
येवुनी बाहेरी । पाहा जरा ॥२॥

बदलले जग । आणि माणसेही ॥
तशा देवताही । बदलल्या ॥३॥

कनकाच्या भिंती । सोन्याचे कळस ॥
सोन्याची हौस । देवालाही ॥४॥

त्यांचे भक्त बघा । विमानाने जाई ॥
आम्हा का रे पायी । बोलावतो ॥५॥

देव गरिबाचा । तू राहिला गरीब ॥
भक्तही गरीब । ठेविले तू ॥६॥

आम्हां का रे असा । गरिबीचा शाप ॥
असे काय पाप । आम्ही केले? ॥७॥

अभयाने देवा । करा नियोजन ॥
जेणे भक्तजन । सुखी होती ॥८॥

                     गंगाधर मुटे
………… **………….. **………….

घट अमृताचा

घट अमृताचा


लपेटून चिंध्यांत घट अमृताचा, न देखे कुणीही, शिवेना कुणी
लपेटून चिंध्यांस रेशीमवस्त्रे, अशी होय गर्दी, हटेना कुणी

किती वाटले छान हे गाव तेव्हा, जरासा उडालो विमानातुनी
इथे मात्र मेले कुणीही दिसेना, तरी का तजेला दिसेना कुणी?

असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी

समाजात या हिंस्र भाषा नसावी, नसो स्थान लाठी व काठीस त्या
परी या मुक्यांची कळे भाव-भाषा, असे ज्ञान सत्तेस दे ना कुणी

भरारीस उत्तुंग झेपावतो मी, कवी कल्पनेला ’अभय’ गाठतो
परी वास्तवाने घरंगळत येता, उरे एक भूमी दुजे ना कुणी

                                                                गंगाधर मुटे
…………………………………………………………………
(वृत्त – सुमंदारमाला )
…………………………………………………………………

अंगार चित्तवेधी

अंगार चित्तवेधी

दे तू मनास माझ्या आकार चित्तवेधी
नजरेत गुंतणारा आजार चित्तवेधी

ती बोलली तरी का शब्दास नाद येतो?
त्या बोलक्या स्वरांचे झंकार चित्तवेधी

नाहीच राग येतो, वाटे हवाहवासा
कानास पीळणारा फ़णकार चित्तवेधी

आभाळ गाठण्याची वेलीस हौस आहे
मिळतो कधीकधी तो आधार चित्तवेधी

दु:खास मांडणारे बाजार फ़ार झाले
दु:ख्खा खरीदणारा बाजार चित्तवेधी

आप्तास कौतुकाचा वर्षाव ही प्रथाची
इतरांस गौरवे तो आचार चित्तवेधी

आगीत खेळतांना, सूर्यास छेडतो मी
कोळून पी ’अभय’ तो अंगार चित्तवेधी

                                   गंगाधर मुटे
…………………………………………….
(वृत्त – आनंदकंद )
……………………………………………..

मी गेल्यावर ….?

मी गेल्यावर ….? 

मी गेल्यावर माझे कोण, कशाला गुण गाईन?
मी तरी जातांना कुणास काय देऊन जाईन?

जरी माझी कातडी जाड असेल गेंड्यासारखी
पण तिची चप्पल बनते ना खेटर
केसापासून ना वारवत, ना चर्‍हाट
ना उब देणारं स्वेटर.
मी कसा कुणाच्या चिरकाल स्मरणात राहीन?

हाडेही माझी कणखर आहेत खरी
पण आयुर्वेदात उपयोग शून्य
मी मात्र मिरवत आलो
देहाचे लावण्य
स्वर्गवाले मजकडे का आतुरतेने पाहीन?

नसलो काही देणार तरी जातांना
नवमण लाकडांची राख आणि
आणखी प्रदूषित करणार
हवा आणि पाणी
जीवेभावे का कोणीतरी श्रद्धांजली वाहीन?

हसू फ़ुलवलं नाहीच आजवर
कधी कुणाच्या चेहर्‍यावर
मात्र नुसतच रडवणार
जातांना-गेल्यावर
स्वयंप्रेरणेने कोण मग खांद्यावर घेईन?

केले असतील सत्कर्म
पण असतील दोन-चार
तेवढ्याने थोडंच उघडणार
स्वर्गाचं दार
काहीतरी कर अभय
जेणेकरून मुक्तिमार्ग जरा सुलभ होईन…!

                          गंगाधर मुटे
………… **………….. **………….

सत्ते तुझ्या चवीने

सत्ते तुझ्या चवीने 




सत्ते तुझ्या चवीने नेते चळून गेले
कुरवाळती कुणाला, कोणा छळून गेले

सारे मिळून भेदू, हा व्यूह ते म्हणाले
लढतोय एकटा मी, सारे पळून गेले

कित्येक चाळण्यांनी, स्वत्वास गाळले मी
उरलीय चित्तशुद्धी, हेवे गळून गेले

समजू नको मला तू विश्वासघातकी मी
पाऊल सरळ होते, रस्ते वळून गेले

आता इलाज नाही, नाहीत मलमपट्ट्या
मजला कळून आले, तुजला कळून गेले

वणव्यात कालच्या त्या, काही उडून गेले
काही बिळात घुसले, बाकी जळून गेले

का सांगतोस बाबा ’अभयास’ कर्मगाथा
द्रवलेत कोण येथे, कोण वितळून गेले?

                                       गंगाधर मुटे
………………………………………….
(वृत्त – आनंदकंद )
………………………………………….