भूमिकाभूमिका..


माझ्या कवितेचा प्रवास.

                       आदरणीय रसिकजनहो, माझा पहिलावहिला काव्य संग्रह “रानमेवा” प्रकाशित करताना अत्यंत आनंद होत आहे. आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा नकळतपणे घडतात की त्या आपण स्वप्नातही कल्पिल्या नसतात. माझे काव्यलेखनही अशापैकीच एक घटना.
                     मला बालपणी गाणी व भजने लिहिण्याची खूप आवड होती. त्यानंतर १९८४-८५ च्या सुमारास मी “बरं झालं देवा बाप्पा” ही पहिली कविता लिहिली. ती कविता शेतकरी संघटनेचे मुखपत्र असलेल्या शेतकरी संघटकच्या “ग्रामीण अनुभूती विशेषांक” (२६ जुलै १९८५) मध्ये प्रकाशित झाल्यानंतर वेगवेगळ्या शेतकरी आंदोलनात कार्यकर्त्यांकडून त्या कवितेचे थोडेफ़ार वाचन/गायनही झाले. श्री विनय हर्डीकर यांनी लिहिलेल्या “जग बदल घालुनी घाव” आणि “विठोबाची अंगी” या दोन पुस्तकात त्या कवितेचा उल्लेख झाला, दोन वृत्तपत्रीय स्तंभलेखात सुद्धा त्या कवितेचा उल्लेख झाला. आणि महत्त्वाचे म्हणजे मा. शरद जोशींनी “आठवड्याचा ग्यानबा” (०५ ऑक्टोबर १९८७) या साप्ताहिकात लिहिलेल्या एका लेखाचे शीर्षकही “बरं झालं देवा बाप्पा” असे होते. माझ्या पहिल्याच कवितेची एवढी दखल घेतली गेल्यामुळे तेव्हा मला खूप आनंद झाला होता.
                     माझा कविता लेखनाचा प्रारंभ इतका सुंदर झाल्यानंतर वास्तविकत: माझी कविता त्यानंतर अधिक फ़ुलून आकार घ्यायला हवी होती. पण तसे झाले नाही. कारण भाकरीचा शोध घेण्यातच त्यानंतरचा सर्व काळ खर्ची पडला. आणि काळाच्या वाहत्या प्रवाहाच्या उसळत्या लाटांमध्ये कविता लिहिण्याची प्रेरणा व ऊर्मी कशी दबून गेली ते कळलेच नाही.

“शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली 
स्वप्नेच वांझ झाली, तारुण्य जाळतांना” 

                     आयुष्याची अशी अवस्था चक्क दोन तपापेक्षाही अधिक काळ तशीच कायम होती. मात्र नोव्हेंबर २००९ मध्ये “औंदाचा पाऊस” ही कविता ‘लोकमत’ या दैनिकात आणि ‘मायबोली’ या संकेतस्थळावर प्रकाशित झाली. त्या कवितेवर मिळालेल्या अभूतपूर्व अभिप्रायानेच कदाचित माझ्यातला कवी पुन्हा जागृत झाला असावा आणि इतका प्रदीर्घ काळ कोंडमारा झालेली मनातील भावना शब्दबद्ध होवून कवितेचा आकार घेत अवतरीत झाली असावी. कारण त्यानंतर कविता लिहिण्याचा वेग इतका जास्त होता की मागे वळून पाहण्याचीही उसंत उरली नव्हती. या संग्रहात समावेश असलेल्या कवितांपैकी ८० पेक्षा जास्त कविता ह्या ८/९ महिन्यांच्या कालावधीतीलच आहेत.
                      शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन शेतकरी म्हणून जगणे हाच एक ग्रंथ असतो. या ”लाइव्ह” ग्रंथात निसर्गाशी जवळीक, प्राणिमात्रावर प्रेम, बीजांचे अंकुरणे, झाडांचे बहरणे, कळ्यांचे फ़ुलोरणे, फ़ळांचे लदबदणे, धरणीची माया, आभाळाची छाया…… सारं काही असते. त्यासोबतच वेदना, प्रतारणा, शल्य, उबग, उद्वेग, जोष, होश आणि क्षोभ… अगदी सारंच काही असते. फ़क्त एकच गोष्ट नसते आणि ती म्हणजे उसंत. ना जीवनाचा सर्वंकष उपभोग घेण्याची उसंत, ना आपल्या भावना व्यक्त करण्याची उसंत. ना कविता लिहिण्याची उसंत, ना क्षोभ व्यक्त करण्याची उसंत. फ़क्त कष्ट,कष्ट आणि केवळ कष्ट. मग त्या हाडाच्या शेतकर्‍याने कविता लिहावी तरी कशी? मग माझ्यासारखा थोडीशी संधी मिळताच शेती प्रत्यक्ष कसण्यापासून स्वत:ची सुटका करून घेतलेला, शेतीतल्या कष्टापासून मुक्ती मिळविलेला पण शेतीशी थोडीफ़ार नाळ जुळवून ठेवून बर्‍यापैकी उसंत मिळविलेला शेतकरीपुत्र लेखना-वाचनाच्या, साहित्याच्या जगात “हाडाचा शेतकरी” ठरू लागतो. आणि मग शेती कसण्याच्या प्रत्यक्ष अनुभूतीपासून वंचित झालेला माझ्यातला शेतकरीपुत्र; मला दिसलेल्या, जाणवलेल्या, अनुभवलेल्या शेतकर्‍याला शब्दबद्ध करू लागतो. स्वाभाविकपणे मग शेतकर्‍याच्या वास्तविक मूळ वेदनांपेक्षा माझ्या कल्पनाविलासातला शेतकरी वरचढ ठरून जातो आणि अंतिमत: शेतकर्‍याचे मूळ प्रश्न पुरेशा वास्तविकतेने साहित्यात उतरायचे राहूनच जात असावे, असे समजायला बराच वाव आहे.
                      “कवितेचा शेवट आशादायी असावा, होकारात्मक शेवट नसेल तर ते केवळ रुदन ठरते!” असा सल्ला मला माझ्या मित्रांनी बरेच वेळा दिला, पण मला मात्र तो अमलात आणताच आला नाही. नभ पुन्हा एकदा या भुईला दान देईल, वरूणदेव प्रसन्न होऊन धो-धो पाऊस पडेल, शिवार हिरवेकंच होऊन फ़ळाफ़ुलांनी मोहरून जाईल, सोन्याच्या ताटाला मोत्याची कणसे लागतील आणि मग शेतीची भरभराट होऊन शेतकरी आनंदाने नाचायला लागेल, असे काहीसे सकारात्मक चित्र उभे करणे म्हणजे आशादायी शेवट. पण खरं तर असा शेवट करणे म्हणजे केवळ मनाच्या समाधानासाठी ओढूनताणून केलेले स्वप्नरंजनच असते हे ढळढळीत वास्तव.
                          शेतात सूर्य, चंद्र, तारे पिकवूनही ते जर मातीमोल भावानेच खपणार असतील तर…. तर शेतकर्‍याच्या आयुष्यात त्याचे नैराश्य संपून आशादायी चित्र उभे राहणार तरी कसे? मग याला होकारात्मक/आशादायी शेवट म्हणायचा की स्वप्नरंजन म्हणायचे? की होकारात्मक,आशादायी, सकारात्मक असल्या गोंडस शब्दाआडून शेतकरी जीवनाची डोळ्यात केलेली धूळफ़ेक म्हणायची? उत्तर जटील आहे, हे मात्र नक्की.
                         त्यामुळेच समग्र साहित्याचा तोंडवळा बदलण्याची ऐपत असलेला, वास्तवाचं भान आणि ग्रामीण सुखदु:खाशी नाळ जुळून असलेला, अठराविश्व दारिद्र्यातून सोडवणुकीसाठी करावयाच्या उपाययोजनांची नेमकी जाण असलेला आणि त्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावून प्रसंगी स्वत:च्या आयुष्याची होळी करून कार्य तडीस नेण्याची जिद्द बाळगणारा, कर्तव्यप्रवीण ‘वैचारीक बैठक’ असलेला प्रतिभाशाली साहित्यिकच शेतकर्‍याच्या घरात जन्माला आल्याखेरीज साहित्य क्षेत्रात आमुलाग्र बदल घडून येईल असे वाटत नाही.

थोडेसे माझ्या कवितेविषयी

                          काव्यलेखन करतांना मी कविता, गझल, अंगाईगीत, बालगीत, तुंबडीगीत, लावणी या खेरीज “नागपुरी तडका” हा एक नवीन काव्यप्रकार हाताळला आहे. नागपूर आणि आसपासच्या काही जिल्ह्यांत जी मराठी भाषा बोलली जाते ती भाषा आणी भाषेचा लहजा, वर्‍हाडी किंवा झाडी बोलीभाषेपेक्षा पूर्णत: भिन्न आहे. त्यामुळे या बोलीभाषेतील रचनेला मी “नागपुरी तडका” असे स्वतंत्र नांव दिले आहे. पण या प्रकारात मी पूर्णत: निर्भेळ नागपुरी भाषेचा वापर करीत नाही. फ़क्त लहजा आणि काही वैशिष्ट्यपूर्ण शब्द यांचाच सीमित वापर करतोय. आणि या काव्यप्रकाराचा आशय व उद्देश, न रुचणार्‍या रूढी-परंपरा-चालीरीती, न रुचणारी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय धोरणे यांचेवर टीकाटिप्पणीसह घणाघाती घाव घालणे हा उद्देश असल्याने या प्रकारास मी जाणीवपूर्वक “नागपुरी तडका” असे नांव दिले आहे. या सर्व पद्यलेखनामध्ये मी “अभय” हे टोपणनाव/उपनांव, तखल्लुस/मक्ता म्हणून वापरले आहे.

ऋणनिर्देश 

                         मायबोली आणि मायबोलीकर यांच्या भरीव सहकार्यामुळेच माझी “कविता आणि गझल” आकारास येण्यात मोलाची मदत झाली, त्यामुळे सर्व मायबोलीकरांचा मी अत्यंत ऋणी आहे. या संग्रहाच्या जडणघडणीत शेतकरी संघटकचे संपादक प्रा.सुरेशचंद्र म्हात्रे यांची मोलाची मदत झाली, त्यामुळे त्यांचा उल्लेख केल्याशिवाय (त्यांचा रोष पत्करून) मला पुढे जाताच येणार नाही, याची मला जाणिव आहे.
                        या काव्यसंग्रहाला श्री वामनराव देशपांडे, श्री डॉ. श्रीकृष्ण राऊत, ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ, श्री मुकुंददादा कर्णिक, श्री गिरीश कुळकर्णी, जयश्री कुळकर्णी-अंबासकर, छाया देसाई, डॉ भारत करडक, अलका काटदरे, स्वप्नाली गुजर, श्री अनिल मतिवडे यांनी सहृदय अभिप्राय दिलेत, त्यांचाही मी अत्यंत ऋणी आहे.
                       या संग्रहाला आदरणीय शरद जोशी यांची प्रस्तावना लाभली हे मी माझे अहोभाग्य समजतो. परंतु त्यांच्या ऋणातून मी औपचारीकपणे उतराई होऊ इच्छित नाही कारण ज्यांच्यामुळे माझ्यासारख्या लाखो शेतकरीपुत्रांच्या आयुष्याचे सोने झाले, विचाराची व जगण्याची दिशाच बदलून गेली, त्यांच्या ऋणातून सहजगत्या ऋणमुक्त होता येईल, असे वाटण्याइतपत मी नक्कीच भाबडा नाही.
                       अप्रतिम मुखपृष्ठ आणि सुबक अक्षर जुळणी ही श्री पंकज टोळ यांची किमया आहे. तसेच वैभव ऑफ़सेटचे श्री. जयंत वखरे यांच्या विशेष प्रयासानेच हा काव्यसंग्रह आकर्षक स्वरूपात मुद्रित होऊ शकला, त्यामुळे त्यांचाही मी अत्यंत ऋणी आहे.
या संग्रहाला सर्वांचे भरभरून प्रेम लाभेल, अशी आशा बाळगतो.

आश्विन शु. १०, विजयादशमी
१७ ऑक्टोबर २०१०                                             गंगाधर मुटे
……………………………………………………………………………..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s