स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-रेकॉर्डिंग Vdo





स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-रेकॉर्डिंग Vdo

स्टार माझा TV द्वारा नोव्हेंबर-डिसेंबर २०१० मध्ये ब्लॉग माझा-३ या ब्लॉग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये जगाच्या कानाकोपर्‍यातून मराठी ब्लॉगर्सनी उत्स्फ़ुर्तपणे भाग घेतला होता. या स्पर्धेचे निकाल जाहिर झाल्यानंतर २७ डिसेंबर २०१० रोजी स्टार माझाच्या मुंबई येथील स्टुडियोमध्ये बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला.
ब्लॉग माझा-३ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याचा समरंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे स्टार माझा TV वर दिनांक २७-०३-२०११ रोजी सकाळी ९ ते १० आणि दुपारी २ ते ३ वाजता प्रक्षेपण करण्यात आले.
या कार्यक्रमाचा रेकॉर्डेड वृतांत सादर करताना खरोखरच खूप आनंद होत आहे. सदर कार्यक्रमाचे अपलोड करण्याच्या सोयीने ५ भागात विभाजन करण्यात आले आहे.
TV वरील कार्यक्रम रेकॉर्ड करून त्याच्या व्हिडियो क्लिप्स बनवून अपलोड करणे ही माझ्यासाठी नविन बाब होती. तरीही मी माझ्यापरीने शक्य तेवढा प्रयत्न केला आहे. व्हिडीओ आणि ऑडियो यामध्ये दर २५-३० सेकंदात टाईम डिफरन्स येत होता. एडिट करून आणि भरपूर मेहनत घेऊनही ध्वनी आणि चित्र यात शतप्रतिशत अ‍ॅक्यूरसी राखणे शक्य झाले नाही, त्याबद्दल दर्शक या बाबीकडे दुर्लक्ष करून मला माफ़ करतील अशी अपेक्षा बाळगतो.

———————————————————————–

———————————————————————–
अन्य व्हिडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

———————————————————————–

………………………………………………………………………………….

ब्लॉग माझा-३ चे आज स्टार माझा TV वर प्रक्षेपण.

ब्लॉग माझा-३ चे आज स्टार माझा TV वर प्रक्षेपण.

        स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे ऑन एअर प्रक्षेपण करण्याची सज्जता झाली असून आज रविवारी (२७ मार्च) सकाळी ९ ते १० या वेळेत स्टार माझावर हा कार्यक्रम आपल्याला पाहता येईल.

चॅनेल : स्टार माझा TV मराठी
दिनांक : २७-०३-२०११
वेळ : सकाळी ९ वाजता

……………………………………………………..
त्या निमित्ताने दि. २६-०३-२०११ ला प्रसारीत करण्यात आलेली स्टार माझावर झलक.



पांढरा किडा

पांढरा किडा
तुझी सांग येथे दखल कोण घेतो
कशाला घशाला उगा त्रास देतो
असामान्य विश्लेषकांच्या भितीने
गझल घप्प कपड्यात झाकून नेतो
नवे रोप लावत पुढे चालताना
कुणी सांड मागून तुडवीत येतो
पिके फस्त केली फळे पोखरूनी
कुठूनी किडा पांढरा जन्म घेतो
अभय लाचखोरीत तो शिष्ट प्राणी
कुणाच्याच बापास ना घाबरे तो
                           गंगाधर मुटे
……………………………………

मीमराठी बक्षिस समारंभ


मेहता पब्लिकेशन हाऊस आणि मी मराठी.नेट (
http://www.mimarathi.net 
यांच्या संयुक्त विद्यमाने “लेखन स्पर्धा २०१०” ही आंतरजालीय स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.
अधिक माहिती या दुव्यावर मिळेल. http://www.mimarathi.net/node/5216
या स्पर्धेत “वांगे अमर रहे…!”
या ललित लेखाला पारितोषक मिळाले आहे.
………………………………………………
हा लेख खालील दुव्यावर वाचता येईल.

……………………………………………..

या स्पर्धेमधे २०७ प्रवेशिका पात्र ठरल्या होत्या.
स्पर्धेसाठी 
श्री. शंकर सारडा
श्री. प्रविण टोकेकर
श्री. रामदास
यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
……………..

१९ मार्च रोजी लेखन स्पर्धा २०१०-२०११ बक्षिसं समारंभ ठाणे येथे संपन्न झाला,

दिवस : १९ मार्च, २०११.
वेळ : ४.०० ते ७.०० संध्याकाळी.
पत्ता :
लक्ष्मी केशव मंगल कार्यालय, प्रताप सिनेमा समोर, कोलबाड रोड, खोपट, ठाणे (प).

…………………

लेखन स्पर्धा बक्षिस समारंभाची काही – क्षणचित्रे

(सर्व छायाचित्र श्री रोहन चौधरी आणि मी मराठी डॉट नेट च्या सौजन्याने.)



****


******

रंगताना रंगामध्ये

रंगताना रंगामध्ये


यमुनेच्या तिरावर, आवळीच्या झाडावरी
दडुनिया बसला गं, नटवर गिरिधारी
पाहुनिया राधिकेला, गुपचिप कान्हा आला
घेऊनिया पिचकारी, नेम धरितो मुरारी
सोडीयेली धार कशी? सररररर
रंगताना राधा बोले अररररर
बावरता राधा पळे, असे कान्हुला तो छळे
तरी चुकेचिना लळे, सावळ्याच्या चाळ्यामुळे
मग राधा करुणेने, बोलू पाहे केविलवाणे
रंगलेले रूप म्हणे, आहे मला घरी जाणे

आतातरी थांब ना रे…..!
कान्हा, आतातरी थांब ना रे…..!

अरे थांब गिरिधारी नको मारू पिचकारी,
रंगामध्ये भिजविशी किती रे मुरारी …IIधृ०II

माळ तुटली कशी? मोती गळले कसे?
कंकण टिचकून हातात रुतले कसे?
कसे ना मला आज कोडे सुटे?
ऐसेकैसे तरंग मनाशी उठे?
मनाशी उठे! मनाशी उठे!!
अरे सांग गिरिधारी केली काय जादूगिरी?
रंगामध्ये न्हाऊनिया का हसतो मुरारी? …II१II

हातून सुटली कशी? घागर पडली कशी?
खोल पाण्यात जाऊनी बुडली कशी?
डोईवरचा पदर खांदी आला कसा?
रंगी रंगताना रंगात रंगला कसा?
रंगला कसा! रंगला कसा!!
अरे सांग गिरिधारी केली काय चमत्कारी?
रंगामध्ये भिजवली साडी चोळी सारी …II२II

रासलीला कशा? तुझे रंग कसे?
सार्‍या गोकुळी आमुचे झाले हसे
रोज येते अभय पाणी भरण्यामिषे
तुझ्याप्रितीचे अजब बुलावे कसे?
बुलावे कसे? बुलावे कसे?
अरे थांब गिरिधारी झाली पुरी प्रितखोरी
रंगामध्ये भिजुनिया तू कोरडा मुरारी …II३II

गंगाधर मुटे
……………………………………………….

आयुष्याची दोरी

आयुष्याची दोरी
हे सजीवसंख्येचे नियमन करणार्‍या मृत्यो,
कधीही, कुठेही आणि कसेही
आयुष्याची दोरी कापून टाकण्याचे
तुझे अधिकार मान्य आहेत मला
पण सन्मानाने मरण्याचे अधिकार
मलाही असावेत की नाही?
हे “जीवन” तुझे असले तरी
“मी” तर “माझा” आहे ना?
तुझ्यामुळे आयुष्य सरणार असले तरी
मी मात्र उरणारच आहे. आणि म्हणून…
माझी तुझ्याबद्दल तक्रार नसली तरी
एक छोटीशी नाराजी आहे
आयुष्य छाटण्याबद्दल हरकत नाही, पण…
पण असा देहाला का छाटतोस रे?
तुकड्यांतुकड्यांमध्ये का वाटतोस रे?
कधी चिंध्या, कधी लगदा,
कधी खाद्य मासोळ्यांचे
आणि कधीकधी तर आरपार
उमटतात छेद गोळ्यांचे
थांबायला नकोत काय हे
प्रताप तुझ्या सापळ्यांचे??
हे ऐकून
मृत्यू थोडा भांबावला
मग हळूच हसून म्हणाला
“ही तुझी तक्रार की कांगावा?
प्रथम विचार कर की
सल्ला कुणी कोणास सांगावा?
अरे! कृती तुम्ही करता
आणि विकृती माझी म्हणता?
“एक्सलेटर” दाबण्याआधी “ब्रेक” मारणे शिका
वेगासोबतची थांबवा फालतू अहमिका
ज्याचे हक्क त्याला द्यावे, लूट थांबायला हवी
नाहीतर अटळ आहे संघर्ष व यादवी
स्वावलंबी झाडावर बहरल्यात परावलंबी वेली
परावलंबीने स्वावलंबीची काय गत केली?
सभ्यतेची उत्क्रांती दिशाहीन गेली
म्हणूनच मी आता शस्त्रंपालट केली
अरे माणूस म्हणून जन्मलात
तर माणसावाणी वागा
जरा तरी फुलवून पाहा
सौजन्याच्या बागा……!! ”
                          गंगाधर मुटे
…………………………………….

नव्या यमांची नवीन भाषा

नव्या यमांची नवीन भाषा

मला कळाली पुन्हा नव्याने, नव्या पिकांची नवीन भाषा
कठीण मातीत रूजणार्‍या, नव्या बियांची नवीन भाषा

पुन्हा नव्याने नवीन फुटली, अबोलतेला नवीन वाचा
नवीन दृष्टी, नवे इरादे, निरक्षरांची नवीन भाषा

नभात झेपावण्यास देती, ढगांस टक्कर, विजेस चटके
नवीन किलबिल, नवीन कुजबुज, नव्या पिलांची नवीन भाषा

नशीब आहे विचित्र मोठे, कुणास रुजण्यास खडक-धोंडे
कठोर पाषाण भेदणार्‍या, नव्या मुळांची नवीन भाषा

अता मुखातून शोषितांच्या, ज्वलंत हुंकार बोलताहे
नवीन शस्त्रे, नव्या मशाली, अहिंसकांची नवीन भाषा

कुणास बाहूत घेत मृत्यू, विभागतो देह चिंधड्यांनी
यमास थोडी दया न उरली, नव्या यमांची नवीन भाषा

श्रमास मातीत गाडण्याला, नव्या दमाचा विरोध आहे
नवीन शाई, नवे मनसुबे, अभय जनांची नवीन भाषा

गंगाधर मुटे
……………………………………………………………….
वृत्त : हिरण्यकेशी
काफिया : पिकांची
रदीफ : नवीन भाषा
लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा
………………………………………………………………

कृषिविद्यापीठांना अनुदान कशाला हवे?

कृषिविद्यापीठांना अनुदान कशाला हवे?
              जेव्हा जेव्हा शेतीच्या दुर्दशेचा विषय निघतो, तेव्हा तेव्हा ज्या अनेक उपाययोजना सुचविल्या जातात, त्या अनेक उपाययोजनांपैकी कृषी विद्यापीठे आणि त्यांचे संशोधन हा एक हमखास उपाय सुचविला जातो. या सर्व तज्ज्ञांच्या मते कृषी विद्यापीठाने आजवर फार मोठे चमत्कारिक संशोधन केलेले आहे पण ते संशोधन शेतकरीवर्गापर्यंत पोचत नाही किंवा पोचले तरी शेतकरी ’आळशी’ ’अज्ञानी’ वगैरे असल्याने तो ते अंगिकारत नाही म्हणून त्याला शेती परवडत नाही. त्यांच्या मते कृषी विद्यापीठांनी केलेले संशोधन जर शेतीमध्ये वापरले गेले तर या समग्र भारत देशातल्या शेतीत क्रांतीकारी बदल घडून येतील आणि शेती व्यवसायाची प्रचंड भरभराट होईल.
         कृषी विद्यापीठातील संशोधक, विषयतज्ज्ञ, आणि स्वतः कुलगुरू यांच्याही बोलण्याचा रोख कायमच उपदेशात्मक असतो. जणू काही शेतकर्‍यांच्या उत्थानासाठी परमेश्वराने यांना ’प्रेषित’ म्हणूनच भूतलावर जन्माला घातले आहे.
         दरवर्षी या विद्यापीठांना पोसण्यासाठी शासकीय तिजोरीतून प्रचंड खर्च केला जातो. त्याबदल्यात संशोधन काय केले जाते, याचाही आढावा घेणे गरजेचे आहे, अशी मात्र कोणालाच गरज भासत नाही. ऊस, केळ, ज्वारी, गहू, बाजरी, तूर,सोयाबीन वगैरे मुख्य पिकांसंदर्भात क्रांतीकारी संशोधन करण्यास किंवा त्या-त्या पिकाच्या क्रांतीकारी जाती,प्रजाती अथवा संकरित वाणाचे संशोधन करण्यात अजूनही या कृषी विद्यापीठातील संशोधकांना फारसे यश आलेच नाही, याकडेही सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते.
        पाऊस गरजेपेक्षा जास्त किंवा कमी पडला तरी तग धरेल, बदलत्या हवामानाचा प्रतिकार करून चांगले उत्पन्न देऊ शकेल, अशा तर्‍हेचे वाण अजूनही संशोधित करण्यात यश आलेले नाही. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीस पाऊसपाण्याविषयी अनुमान वर्तविण्यात येत असते. पण यांच्या अनुमानात आणि एकंदरीत पाऊस पडण्यात कुठेही ताळमेळ दिसत नाही. याउलट यांनी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असे भाकीत वर्तविले की हमखास त्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडून कोरडा दुष्काळ पडतो आणि यांनी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असे भाकीत केले की त्यावर्षी अती पाऊस पडून हजारो एकर जमीन पाण्याखाली बुडून ’’ओला दुष्काळ” जाहीर करावा लागतो. 
         सलग दोन-तीन वर्षे पाऊस कमी पडला की, “शेतकर्‍यांनी प्रचंड वृक्षतोड केली म्हणून निसर्गाचा समतोल बिघडला” असा घासून पिटून गुळगुळीत झालेला एकमेव निष्कर्ष काढून ही मंडळी मोकळी होतात. त्यापुढे काही यांच्या संशोधनाची मजल जात नाही. मग शासनाच्या कृषी विभागाच्या मदतीने व सरकारी पैशाने “वृक्ष लावा, निसर्ग वाचवा” “पाणी अडवा, पाणी जिरवा” यासारख्या प्रचारकी थाटाच्या मोहिमा हाती घेतल्या जातात. अशा मोहिमांवर प्रचंड आर्थिक खर्च केला जातो, पण ही मंडळी (साहेब असल्यामुळे) स्वतः झाडे लावत नाहीत, आणि जनतेचा यांच्या शब्दावर विश्वास नसल्याने जनताही झाडे लावण्याच्या फंदात पडत नाहीत. निदान या मंडळींनी स्वतः काही झाडे लावली असती तर काही उपयोग तरी झाला असता, काही झाडे तरी लावल्या गेल्याचे समाधान मिळाले असते पण साहेबांनी झाडे थोडी लावायची असतात? साहेबांनी शारीरिक श्रमाची कामे करायचीच नसतात, शारीरिक श्रमाची कामे करण्यासाठी देवाने शेतकरी नावाचा प्राणी जन्माला घातला आहे, त्यानेच खड्डे खोदायचे, झाडे लावायची, असा या मंडळींचा पक्का समज असतो. त्यामुळे ही मंडळी सल्ले द्यायची कामे तेवढी करीत राहतात आणि शेतकरी यांच्याकडे कुतूहलाने बघत असतात. आणि यदाकदाचित काही झाडे लावली गेलीच तरी त्या झाडांचे आयुष्य फार तर महिना-दोन महिन्याचेच असते. कारण नंतर त्या झाडांचे संगोपनाचे पालकत्व कुणाकडेच नसते. 
       एवढी सगळी मोहीम राबवूनही नवीन झाडे काही लागले जात नाहीत. झाडे-झुडपे-जंगल आहे तोच असतो. तेवढ्यातच नवा पावसाळा सुरू होतो. आणि पाऊस धुवांधार कोसळायला लागतो. पाऊस एवढा कोसळतो की, पाऊस पडण्याचे सर्व उच्चांक मोडीत निघतात. “प्रचंड वृक्षतोडीमुळे पावसाचा तोल बिघडला” या अतीअभ्यासांती काढलेल्या सिद्धांताचे बारा वाजतात.
      शेतीच्या औजाराच्या संशोधनाबद्दलही तेच. विद्यापीठांनी शेतीसाठी बहुउपयोगी औजार बनविले आणि ते शेतीसाठी फारच उपयोगी ठरत आहे, असेही फारसे कधी घडत नाही. शेतीसाठी लागणार्‍या औजारामध्ये दोर-दोरखंड, कुळव-तिफण, कुर्‍हाड-पावडे वगैरे साहित्याचे डिझाइन गावातले कारागीर, ज्यांना अधिकृतपणे अकुशल मानले जातात तेच कारागीर करतात. लोखंडी नांगर, फवारणी यंत्र, मोटारपंप, यापासून ते टॅक्टरपर्यंतचे सर्व डिझाइन खाजगी कंपन्या करीत असतात, या क्षेत्रातही कृषी विद्यापीठातील संशोधकांचे योगदान नगण्यच आहे. 
      संपूर्ण देशातील कृषी विद्यापीठांनी थोडीफार कामगिरी केली असे एकमेव क्षेत्र आहे बियाणे संशोधन. कृषी संशोधकांनी संकरित बियाणात संशोधन करून नवे वाण निर्माण केले, पण अधिक उत्पन्न देणारे संकरित वाण केवळ कापूस, ज्वारी आणि टमाटर या पिकांपुरतेच मर्यादित राहिले. गहू, तूर, हरबरा, सोयाबीन, उडीद, मूग, भात, भुईमूग या पिकामध्ये अजूनपर्यंत तरी भरघोस उत्पन्न देणारे संकरित वाण निर्माण झाले नाही. निवड पद्धतीने सुधारीत जाती तयार होण्यापलीकडे अजून तरी बियाणे संशोधकांची झेप गेलेली नाही. पण बियाणे संशोधन विभागातही कृषिविद्यापीठांची मोलाची भूमिका आहे, असे म्हणण्यासारखी स्थिती नाही.
         १९७० च्या सुमारास गुजरात विद्यापीठाने कपाशीमध्ये एच-४ नावाचे संकरित वाण तयार केले, त्यानंतर त्यांना दुसरे दर्जेदार संकरित वाण निर्माण करण्यास फारसे यश आले नाही. नाही म्हणायला एच-६, एच-८ संकरित वाण त्यांनी आणले पण ते वाण बदलत्या हवामानात फ़ारकाळ टिकू शकले नाही. त्याचप्रमाणे १९८०   च्या सुमारास मराठवाडा कृषिविद्यापीठाने एनएचएच-४४ व पंजाबराव देशमुख कृषिविद्यापीठाने एएचएच-४६८ या दोन कापसाच्या संकरित जाती निर्माण करण्याखेरीज संकरित बियाणे संशोधनात फार काही मौलिक संशोधन केलेले नाही, हे उघड आहे. 
      पण हे सर्व संशोधन पंधरा-वीस वर्षापूर्वीचे आहे, आणि हे सर्व संकरित वाण आता शेतीतून हद्दपार झालेले आहे.
     या उलट गेल्या वीस वर्षात खाजगी कंपन्यांनी मात्र बियाणे क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. जवळ-जवळ सर्वच पिकांमध्ये स्वतः संशोधन करून स्वसंशोधित बियाणे बाजारात आणले आहे आणि त्यालाच शेतकर्‍यांची पसंती मिळाली आहे.
      २०१०-११ हा खरीप हंगाम शेतीसाठी प्रतिकूल असूनही केवळ बीटीयुक्त बियाणे शेतीमध्ये पेरले म्हणून कापसाचे बर्‍यापैकी उत्पादन आले आहे. आणि कापसाची निर्यात सुरू आहे म्हणून कापसाला विक्रमी भाव मिळत आहे. कापूस उत्पादकांच्या आयुष्यात कदाचित चांगले दिवस येण्याची शक्यता निर्माण होत असेल तर ती बिटी बियाणे संशोधित करणार्‍या मोन्सॅटो कंपनीची किमया आहे. कापसाला चांगले भाव मिळत असेल तर ती मुक्तअर्थव्यवस्थेची किमया आहे. मग कापूस उत्पादकांच्या आयुष्यात कदाचित चांगले दिवस येण्याची शक्यता निर्माण होत असेल तर यात शासन किंवा कृषिविद्यापीठांचे काय योगदान आहे?
            पण हे सत्य कोणी मानायलाच तयार नाही. कृषिविद्यापीठांनी गेल्या पन्नास वर्षात केलेल्या संशोधनाच्या समर्थनार्थ ते गाढाभर कागदपत्रांचा दस्तऐवज सादर करायला नेहमीच उतावीळ असतात. पण कागदोपत्री संशोधनाच्या आधारे पीएचडी, डी लिट वगैरे मिळू शकते, पण शेती पिकवायसाठी बियाणे-खते-कीटकनाशके लागतात, कागदपत्री दस्तऐवज हे काही पिकांचे खाद्य नाही. शिवाय या दस्तऐवजांचे सेंद्रिय खतात रूपांतर केले आणि पिकाला खाऊ घातले तर जास्तीत जास्त क्विंटल-दोन क्विंटल अन्नधान्य पिकू शकेल, पिकाच्या भाषेत या दस्तऐवजाला यापेक्षा जास्त काही अर्थ उरत नाही. मुलांची भाषा ज्याला चांगली कळते तोच चांगला पालक. ज्याला विद्यार्थ्याची भाषा कळत नाही तो शिक्षक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणू शकत नाही, अगदी तसेच, ज्याला पिकांची भाषा कळत नाही तो शेतीमध्ये चांगले संशोधन करूच शकत नाही.
         पण दुर्दैवाने विद्यापीठीय शेतीसंशोधक आणि प्रत्यक्ष शेती यांचा अर्थाअर्थी काहीही संबंधच राहिलेला नाही. शेतीचे अर्थशास्त्र यांना कळत नाही कारण शेती किंवा शेतीसंशोधन याऐवजी शासकीय अनुदानावर यांचे प्रपंच चालतात. आणि निसर्गाचा लहरीपणा, हवामान, पाऊसपाणी किंवा ओला-कोरडा दुष्काळ यांचेशी शासकीय अनुदानाचा काहीही संबंध नसतो. अनुदान हे हमखास पीक असते.
        कृषी विद्यापीठांकडे हजारो एकर जमीन आहे. सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांनीच गेल्या पन्नास वर्षात केलेल्या संशोधनाची शिदोरी आहे. मग कृषी विद्यापीठांना अनुदानाची गरज का पडावी? आता एकदा सर्व विद्यापीठांचे अनुदान बंद करून यांना सांगण्याची गरज आहे की, बाबा रे, निव्वळ सल्ले देणे खूप झाले, या विद्यापीठाच्या हजारो एकरावर तुमच्याच संशोधनाच्या आधारे आता शेती करून किमान पाच वर्ष तरी जगून दाखवा, प्रपंच चालवून दाखवा आणि शेती करून होणार्‍या मिळकतीवर विद्यापीठाचे सर्व कारभार अनुदान न घेता चालवून दाखवा.
“आधी केले मग सांगितले” यासारखा दुसरा चांगला मार्ग नाही.
      पण ज्या विद्यापीठांना शेतीतील गरिबीचे कारण शेतीत उत्पादित केलेल्या मालास “उत्पादन खर्च भरून निघेल” एवढाही भाव मिळत नाही, यात दडलेले आहे, हेच अजूनपर्यंत कळलेले नाही, त्यांच्याकडून फारश्या अपेक्षा करणे, हेच मूर्खपणाचे आहे.
                                                                                       गंगाधर मुटे  
—————————————————————————————————————–                                                                                      

सहज करता येण्याजोगे शेती-उद्योग

सहज करता येण्याजोगे शेती-उद्योग.

                 बदलत्या काळानुसार शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढीस लागला आहे. नत्र,स्फ़ुरद, पालाश या मुख्य खतांसोबतच सुक्ष्मखतांचा (Micro nutrient fertilizers) वापर वाढला आहे. पैकी नत्र,स्फ़ुरद,पालाश या मुख्य खतांची निर्मीतीसाठी प्रचंड गुंतवणुकीचे कारखाने लागतात.

परंतू सुक्ष्मखतांची (Micro nutrient fertilizers) निर्मीती किंवा प्रक्रिया-पॆकिंग करून विपनन करणे हा उद्योग/व्यवसाय म्हणुन अत्यंत चांगला पर्याय ठरू शकतो.
या अनुषंगाने इच्छूकांना मदत व्हावी या उद्देशाने येथे काही कृषीसंबधित करता येण्याजोग्या उद्योगांची एक यादी बनविण्याचा प्रयत्न करित आहे.


१) सुक्ष्मखते (Micro nutrient fertilizers)
पिकांच्या जोमदार वाढीसाठी १६ मुलद्रव्यांची (elements) आवश्यकता असते. त्यापैकी Fe, Zn, Mn, Cu, B, Mo, Cl हे प्रमुख मुलघटक असुन यांच्या एकापेक्षा अधिक मुलघटकांच्या योग्य त्या प्रमाणात मिश्रणाला सुक्ष्मखते म्हणतात. सध्या या सुक्ष्मखंतांना प्रचंड मागणी आहे.
मुलद्रव्यांची (elements) नांवे खालील प्रमाणे.
1) Copper sulphate (CuSO4.5H2O)
2) Zinc sulphate (ZnSO4.7H2O)
3) Borax or Sod.Borate (Na2B4O7.10 H2O)
4) Manganese Sulphate (MnSO4.4H2O)
5) Ammonium Molybdate ( (NH4)6Mo7O24.4H2O)
6) Ferrous sulphate (FeSO4.7H2O)
7) Magnesium sulfate (or magnesium sulphate)
………………………………………………………………………
२) जैविक खते (Bio-fertilizers)
A. Nitrogen fixers
Symbiotic: – Rhizobium, inoculants for legumes.
Non-symbiotic: – For cereals, millets, and vegetables.
a) Bacteria:-
i). Aerobic:-Azatobacter, Azomonas, Azospirillum.
ii) Anaerobic:- Closteridium, chlorobium
iii) Facultative anaerobes- Bacillus, Eisherichia
b) Blue green algae- Anabaena, Anabaenopsis, Nostoe
A. Phosphate solubilizing micro-organisms.
B. Cellulolytic and lignolytic micro-organisms.
C. Sulphur dissolving bacteria.
D. Azolla.
………………………………………………………………………….
३) संप्रेरके – फ़वारणीच्या माध्यमातुन वापर केला जातो.
पिकांची कायीक वाढ, फ़ळांची गुणवत्तासुधारणा, पिकांचा कालावधी
कमि-जास्त करणे वा तत्सम कारणासाठी संप्रेरके वापरली जातात.
सध्या वापरात असलेली काही मुख्य संप्रेरके.
१) आमिनो अ‍ॅसिड – Amino Acid.
२) जिबरेलिक अ‍ॅसिड – Gibberellic acid (also called Gibberellin A3, GA, and (GA3)
३) नॆपथ्यालिक अ‍ॅसेटिक अ‍ॅसिड – NAA
४) ह्युमिक ऎसिड – Humic acid – Fulvic acid organic plant food and root growth promoters
……………………………………………………………………………
१) या उद्योगांसाठी जिल्हा उद्योग केंद्र,खादी-ग्रामोद्योग वा इतर शासकिय विभागांकडून बिजभांडवल स्वरूपात अर्थसाहाय्य होऊ शकते.
२) वर उल्लेखिलेले बहुतांश उद्योग २५ लाखाचे आंत असल्याने पंतप्रधान रोजगार योजनेंतर्गत सबसिडी मिळण्यास पात्र आहेत.
वरिल सर्व उत्पादनांना चांगली मागणी असून मालाची गुणवत्ता व मार्केटिंग
कौशल्य या दोन बाबींच्या आधारावर सहज यशप्राप्ती होऊ शकते.
.शुभेच्छासह.
.
गंगाधर मुटे.

—————————————————————————————————-

०३-०७-२०१३

टीप : शेतीविषयक सल्ला विचारणारे अनेक प्रश्न या लेखावर वाचकांकडून प्रतिसादामार्फ़त उपस्थित केले जातात. त्या सर्व प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी माझ्याकडे काहीही यंत्रणा नसल्याने मी कुणालाच फ़ारशी व्यक्तिगत मदत करू शकत नाही.
यावर पर्याय म्हणून मी http://www.baliraja.com/ या साईटवर काही पर्यायी व्यवस्था उभारायचा प्रयत्न केला परंतू अजूनपर्यंत तरी मला यश आलेले नाही.
त्यामुळे सल्ला अथवा मदतीची अपेक्षा असलेले प्रश्न प्रतिसादातून विचारले जावू नयेत. ही विनंती.

लगान एकदा तरी….

लगान एकदा तरी….. (हझल)

चरेन शासकीय कुरण-रान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी

हरूनही रणांगणात लाभते विरत्वश्री
बनेन राजकीय पहिलवान एकदा तरी

क्षणाक्षणास भेटण्यास फ़ालतू विलंब का?
तुझ्या समोर बांधतो मकान एकदा तरी

शिकून घे धडे लढायचे हिरोकडे अता
बघून थेटरात घे लगान एकदा तरी

कधी विचारतेय का अभय इथे कुणी तुला?
जरा गप बसणार का? गुमान एकदा तरी

                                             – गंगाधर मुटे
……………………………………………………………………………………….
वृत्त : कलिंदनंदिनी     काफिया : महान    रदीफ : एकदा तरी 

लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा
……………………………………………………………………………………….