राधा गौळण

राधा गौळण

डोईवर घागर खांदी दुपट्टा
पाठीशी वेणी
भरीतसे राधिका पाणी……. ॥धृ॥

हलवित हात कमर लचकते
पैंजण वाजत हळूच दचकते
नाकी नथणी,लोंबतं कुंडलं
झुलतसे कानी ……..॥१॥

चालत बोलत रूप मिरवते
शोधित कान्हा नजर फ़िरविते
कान्हाईची आठव झाली
झुरतसे नयनी ……..॥२॥

तितुक्यातच हा रांगत आला
परमात्म्याचा संगम झाला
अभय जनांनी रूप लोचनी
साठविले ध्यानी ……..॥३॥

सरबत…… प्रेमाच्या नात्याचं

सरबत…… प्रेमाच्या नात्याचं

मी तिला विचारलं
कसं असावं तुझं-माझं नातं….?
भ्रमर आणि फ़ुलासारखं…?
ती उत्तरली, “नको नको
एकदा मकरंद सेवून भ्रमर गेला की
परतण्याची शक्यता धूसर होते
तसा विरह मला नाही रे सहन व्हायचा”

मग मी तिला विचारलं
कसं असावं तुझं-माझं नातं….?
पतंग आणि पणतीसारखं…?
ती उत्तरली, “नको नको
भावनेच्या उत्तुंग अविष्कारात
पतंगाची आहुती जाण्याचा धोका
मी नाही रे पत्करायची”

मग मी पुन्हा तिला विचारलं
कसं असावं तुझं-माझं नातं….?
गीत आणि संगीतासारखं…?
की शब्द आणि स्वरासारखं…?
ती जरा संथपणे उत्तरली
“हे चाललं असतं….. पण
गीत आणि संगीत एकरूप होऊनही
आपापलं अस्तित्व
स्वतंत्रपणे टिकवून ठेवतात रे
मग तसं नातं का स्वीकारावं?”

मग तीच मला म्हणाली
“पण काय रे, तुझं-माझं नातं काव्यात्मक
साहित्यिक दर्जाचं वगैरे कशाला हवंय रे?
अरे ’’तू आणि मी”, ’’मी आणि तू”
“मी-तू”, “तू-मी” कशाला हवंय रे?
त्याऐवजी “आपण” नाही का रे चालणार?
लिंबू आणि साखरेचं पाण्यातील मीलनासारखं…!
एकदा का त्यांचं मीलन झालं की
लिंबू आणि साखरेला स्वतंत्र अस्तित्वच उरत नाही
उरतेय केवळ …. आणि केवळ “सरबत”
लिंबू-साखरेला कधीही वेगवेगळं
न करता येण्यासारखं…!!
मला हवंय, तुझं-माझं नातं…. तस्सच
अगदी त्या ……….. सरबतासारखं…….!!!”

                                                     गंगाधर मुटे
………… **………….. **…………. **…………..**……..

सजणीचे रूप

सजणीचे रूप …!!

रुपये पाहता लोचनी। सुखी झाली ती साजणी ॥१॥
म्हणे व्यापारी बरवा। म्हणे पगारी बरवा ॥२॥
शेती बागा त्याचे घरी। परी नको शेतकरी ॥३॥
ऐसे सजणीचे रूप। पदोपदी दिसे खूप ॥४॥
अभय म्हणे कास्तकारा। डोहामधी डुबक्या मारा ॥५॥

                                          गंगाधर मुटे
………… **………….. **………….**…….

अंगावरती पाजेचिना

अंगावरती पाजेचिना….!!

इभ्रतीला झाकेचिना, तिला चोळी का म्हणावे?
भुकेल्याला लाभेचिना, तिला पोळी का म्हणावे?

वास्तवाला चितारेना, तिला शाई का म्हणावे?
अंगावरती पाजेचिना, तिला आई का म्हणावे?

श्रमाविना पैदासते, तिला वृद्धी का म्हणावे?
पीडितांना कुस्कारते, तिला बुद्धी का म्हणावे?

अस्सलाची विटंबना, तिला नक्कल का म्हणावे?
बुरशीवाणी परजीवी, तिला अक्कल का म्हणावे?

विवेकाला स्मरेचिना, तिला सुज्ञ का म्हणावे?
तारतम्य हुंगेचिना, तिला तज्ज्ञ का म्हणावे?

अभयाने बोलेचिना, तिला वाणी का म्हणावे?
अंतरात्मा हालेचिना, तिला ज्ञानी का म्हणावे?

                                                गंगाधर मुटे
………… **………….. **………….**…….

बळीराजाचे ध्यान

बळीराजाचे ध्यान ….!!

सुंदर ते ध्यान उभे बांधावरी
नांगर खांद्यावरी घेवोनिया..॥१॥

कासे पितांबर ते फ़ाटके धोतर
टायरचे खेटर पायामधी..॥२॥

तुळशीहार जणू घामाचीच धार
उन्हाला आधार पगडीचा..॥३॥

कवच-कुंडले छातीच्या बरगड्या
पोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥

नैवेद्य-प्रसाद कांदा भाकरीचा
चेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥

आरतीला नाही त्याची रखुमाई
चारतसे गाई माळरानी..॥६॥

राजा शेतकरी बळीराज यावे
संघटित व्हावे अभयाने..॥७॥

                          गंगाधर मुटे
………… **………….. **………….**…….

रूप सज्जनाचे

रूप सज्जनाचे

लेवून फ़ार झाले, हे लेप चंदनाचे
भाळास लाव माती, संकेत बंधनाचे

का हाकतोस बाबा, उंटावरून मेंढ्या
सत्यास मान्यता दे, घे स्पर्श स्पंदनाचे

दातास शुभ्र केले, घासून घे मनाला
जे दे मनास शुद्धी, घे शोध मंजनाचे

आमरण का तनाला भोगात गुंतवावे?
सोडून दे असे हे, उन्माद वर्तनाचे

अभये चराचराला, संचार मुक्त आहे
शत्रूसही निवारा, हे रूप सज्जनाचे

                                गंगाधर मुटे
……………………………………..
(वृत्त – आनंदकंद )
……………………………………..

कथा एका आत्मबोधाची

कथा एका आत्मबोधाची…!!


तो सर्प…! जन्मत: बिनविषारी होता
फ़ुत्कारणे त्याच्या गावी नव्हते
आचरण त्याचे सरळमार्गी….कुणाला न दुखावणारे
तेव्हा त्याच्यावर सगळे….. तुटून पडायचेत
कोल्हे-लांडगे खेकसायचेत… मुंग्या-माकोडे चावायचेत
अज्ञान-सज्ञान, सभ्य-असभ्य, शिक्षित-अशिक्षित
सुसंस्कृत-सुसंस्कारी …….. झाडून सगळीच
त्याला खडे मारायचीत
तो रडायचा……. केविलवाणी अश्रू ढाळायचा
कळवळायचा… असह्य वेदनांनी… कण्हायचा
पण दुसऱ्याच्या वेदनांवर पाझरेल… तर
ती जगरूढी कसली?
मग तो स्वबचावासाठी
जीव मुठीत घेऊन पळायचा…..आणि तरीही…..
पाठलाग करणारी पिच्छा पुरवायची….
खिदळत….. दात वेंगाडत…!
आणि मग एक दिवस…….. एका निवांत क्षणी
त्याला आत्मबोध झाला………!!
विचाराला कलाटणी मिळाली… कळले की
आक्रमणाला उत्तर बचाव नसते…
तलवारीला उत्तर ढाल नसते….
‘अहिंसे’चे अर्थ भेकडपणात नसते.
“आक्रमणाला आक्रमणानेच” आणि
“तलवारीला तलवारीनेच” उत्तर द्यायचे असते….!!!
आणि मग……. आणि मग त्याने…..
त्याने श्वास रोखला….. आणि सगळे बळ एकवटून…..
असा काही फ़ुत्कार सोडला की………..!!!!
आता……
कोल्हे-लांडगे कान पाडून पळत होती,
कुत्रे शेपट्या खाली करून पळत होती,
आणि माणसे?…. माणसे जीव मुठीत घेऊन….
जीवाच्या आकांताने सैरावरा पळत होती…!!!!
कारण………कालचा बिनविषारी साप
अभयपणे आजचा….
जहाल विखारी नाग बनला होता…. …!!!!!
                                          गंगाधर मुटे
………… **………….. **…………. **…………..

कुटिलतेचा जन्म…….!!

कुटिलतेचा जन्म…….!!

मत्सराची ज्योत जेथे शीलगाया लागली
नेमकी तेथे कुटिलता जन्म घ्याया लागली

जळफ़ळ्या वृत्तीवर दवा,औषध तरी कोठले?
आमरस्त्यावरच कांटे पसरवाया लागली

कालपावेतो भुतावळ मी म्हणत होतो तिला
चेटकी होऊन आता ती फ़िराया लागली

वरणभात जुनाट झाला वेगळे खावे म्हणे
कुंठलेली नीतिमत्ता शेण खाया लागली

थांबवा फ़ाजील चेष्टा बांडगूळांनो अता
वेदना सोसून काने, छी:! पिकाया लागली

ह्या खडूसांची खुशामत “अभय” केली ना कधी
सावजासम घेरती मज डाफ़राया लागली

गंगाधर मुटे
…………………………………………….
वृत्त – देवप्रिया ( गालगागा ) ३ + गालगा
…………………………………………….