सामान्य चायवाला

सामान्य चायवाला 

जिंकावया जगाला ऐटीत तो निघाला
मुलखात मुद्रिकेच्या अलगद शिकार झाला

मज रानटी समजला तेही बरेच झाले
कसदार रानमेवा मी चारतोच त्याला

ना घाम गाळला अन ना रक्त आटविले
कोणी कुणा पुसेना पैसा कुठून आला?

मी मेघ बाष्पधारी वणव्याकडे निघालो
लांबी-परीघ-रुंदी मोजत बसू कशाला?

धनवान इंडियाची बलवान लोकशाही
होतो प्रधानमंत्री सामान्य चायवाला

शिर्षस्थ पाखरांच्या चोची चरून झाल्या
की धाडतील नक्की आमंत्रणे तुम्हाला

ज्यांचे अभय पहारे ते मारतात बाजी
पुसणार कोण येथे निद्रिस्त जागल्याला?

– गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

झाडावर पाखरू बसलं : लावणी

झाडावर पाखरू बसलं : लावणी

पाडाशी आला आंबा बघुनी
आभाळ खुदू खुदू हसलं
चोच टोचण्यास पोपट बघतंय
टक लावून एकतार टपलं
कुणी तरी याssss गं
पोपट धराssss गं
माझ्या धीराचं अवसान खचलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं …||धृ||

आडून येती, झाडून येती
चहुबाजूला थवेच दिसती
लगट करुनी झोंबाझोंबी
पानाच्या आडोशाला धसती
चोचटोचुनी चोची चरती
माझ्या फळांची खादल करती
कुणी तरी याssss गं
अलग कराssss गं
माझं काळीज चोळीत थिजलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं …||१||

कलम लावली, खतपाणी दिधलं
कुंपण करुनी जिवापाड जपलं
कुणी ना आलं, पाणी घालाया
खतं टाकाया, कुणी न दिसलं
बहर बघुनी, लाळ गाळती
ताव माराया, अभय चळती
कुणी तरी याssss गं
गोफण धराssss गं
कच्च्या आंब्याला लई बाई पिडलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं …||२||

                  – गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अभिमानाने बोल : जय विदर्भ!

अभिमानाने बोल : जय विदर्भ!

या मातीचा सवंगडी तू
अभिमानाने बोल
ही धनश्री माझी, वनश्री माझी
अन वैदर्भीय भूगोल
तू अभिमानाने बोल
तू अभिमानाने बोल पाईका
वैदर्भीय भूगोल
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!

तूर, कपाशी, धान, हरबरा
ज्वारी, सोयाबीन
जांभूळ, केळी, पपई, संत्री
रास पिके अनगीन
सुजलाम सुफलाम
शस्य शामलाम
द्रुमफ़लही अनमोल
तू अभिमानाने बोल
तू अभिमानाने बोल पाईका
द्रुमफ़लही अनमोल
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!

बावनकशीचा साग इथे
कानन नृपती वाघ इथे
कोकीळ, पोपट, मोर, काजवे
दिव्यफ़णीचा नाग इथे
सप्तसुरांचे नाद बोलती
ताशा नगारा ढोल
तू अभिमानाने बोल
तू अभिमानाने बोल पाईका
ताशा नगारा ढोल
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!

निसर्गराणी, खनिज खाणी
भुईगर्भाला अविरत पाणी
नयन मनोहर अभय अरण्य
वन्य जीवांची मंजूळ वाणी
या मातीला, जनजीवनाला
मानवतेची ओल
तू अभिमानाने बोल
तू अभिमानाने बोल पाईका
मानवतेची ओल
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!

– गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

॥सांगा तुकारामा : अभंग-४॥

॥सांगा तुकारामा : अभंग-४॥

 

धाडा तुकोराया । विठूला सांगावा ।
मायेचा कांगावा । उतू आला ॥१॥

नासले सकळ । तन मन धन ।
मिथ्या जन गण । वेढीयले ॥२॥

विलासी लोळती । द्रव्याचे सोयरे ।
अनाठायी मरे । कामनिष्ठी ॥३॥

विव्देषाचा डोंब । कैसा परतावा ।
स्नेहाचा ओलावा । क्षीण झाला ॥४॥

वैष्णवाचे चित्त । झुंडीची मुसंडी ।
सावजाला धुंडी । मिथ्यावादी ॥५॥

नाही उपवासी । नाही एकादशी ।
अभय द्वादशी । सोडियेली ॥६॥

– गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१८/०७/२०१६

॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

 

सांग तुकोराया तुझा । विठू कुठे मेला? ।
कर्जापायी भक्त त्याचा । स्मशानात गेला ॥धृo॥

पुजा, अर्चा, भक्तिभाव । आरतीचे ताट ॥
सर्वकाळ सत्संगाची । सोडली ना वाट ॥
तरी का रे अल्पायुषी । श्वास बंद केला ॥१॥

जित्रुपाचा दोर हाती । ओठी विठू नाम ॥
रात्रंदिन पाण्यावाणी । गाळलाय घाम ॥
तरी का रे चोपडला । कुंकवाने शेला ॥२॥

तुझा देव, धर्म तुझा । शोषकांचा साथी ॥
घोर, दु:ख, हीनता, गरिबी । पोशिंद्याचे माथी ॥
कळेना अभय कैसा । विठूचा झमेला ॥३॥

– गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(१७/०७/२०१६)

॥सांगा तुकारामा : अभंग-२॥

॥सांगा तुकारामा : अभंग-२॥

 

तुझ्या विठ्ठलाचा । कैसा दुजाभाव ।
चारीमुंड्या गाव । चीत केले ॥१॥

रानातलं पाणी । उद्योगानं नेलं ।
उभं पीक मेलं । पाण्याविना ॥२॥

धरणाचा साठा । शॉवरात गेला ।
तिथं श्वान न्हाला । शैम्पुसवे ॥३॥

इथं पाण्यासाठी । शोधती टँकरं ।
धावुनी लेकरं । दुडुदुडू ॥४॥

तिथे शौचासाठी । फिल्टरले जळ ।
माळ्यावरी नळ । चुलीपाशी ॥५॥

इथे पिण्यासाठी । क्षारयुक्त पाणी ।
गढुळाचे धनी । गावकरी ॥६॥

लक्ष अब्जावधी । करोडोचा निधी ।
वाढवी उपाधी । शहरांची ॥७॥

ठेऊनिया कमी । शेतीमाल भाव ।
ध्वस्त केला गाव । पिळुनिया ॥८॥

गावही भकास । भकास मारुती ।
घामाची आहुती । व्यर्थ गेली ॥९॥

तिथे ऐश्वर्याचा । सुख, चैनी, भोग ।
सातवा आयोग । सेवेसाठी ॥१०॥

इथे दारिद्र्याचे । सर्वत्र साम्राज्य ।
कर्जाचेच राज्य । आम्हावरी ॥११॥

गाव म्हंजे जणू । दुभत्याची गाय ।
खरडूनी साय । रक्त पिती ॥१२॥

सांगा तुकोराया । अभय एवढे ।
कुणाला साकडे । घालावे गा? ॥१३॥

– गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१६/०७/२०१६

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो…!!

शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्‍याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो…!!

शेतकर्‍याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्‍याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो…!!

शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्‍याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो…!!

शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्‍याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्‍याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय….!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय….!!!

                     – गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मामाच्या पोरींना शिमग्याची भेट!

मामाच्या पोरींना शिमग्याची भेट!

माझ्या मामाला साडेचार पोरी
चार डोमड्या पण एक छोरी गोरी
या छोर्‍यांचं कौतूकं सांगू मी काय
गे माझे शिमगेमाय!

एक नुसताच लंबा बांबू
जणू हाडाचा उभारला तंबू
रक्ता-मासाचा बिल्कूल पत्ताच नाय
गे माझे शिमगेमाय!

एक भलतीच ऐसपैस
जणू पंजाबी मुऱ्हा म्हैस
डोलतडोलत रस्त्यानं चालत जाय
गे माझे शिमगेमाय!

एका रंभेचं रुपडं भालू
दोन्ही गालाचे फ़ुगले आलू
रोज वेणीला लावते हेअरडाय
गे माझे शिमगेमाय!

एक अप्सरा बेलमांजर
हत्ती डोळ्यात काजळाचे थर
पण स्वभाव गरीब गोगलगाय
गे माझे शिमगेमाय!

एक दणकट मल्ल शिपाई
तिला पिसीआर घेण्याची घाई
तिची मस्करी अभय तू करायची नाय
गे माझे शिमगेमाय!

– गंगाधर मुटे ’अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी तडका

स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी तडका

एक आणखी झाडावरती लटकून मेला काल
तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल

पुन्हा एकदा बिनपाण्याने भाजून गेले शेत
एसीमध्ये आखतोस तू सटरमफटरम बेत
तुला दावतो भकासबंजर तू बांधावरती चाल

खते, औषधी, बीज, मजुरी दसपट झाले भाव
वीज, किराणा, डिझेल, डॉक्टर लुटून नेती गाव
अन् तुला पाहिजे स्वस्तामध्ये शेतीमधला माल

शेतपिकाच्या निर्यातीला जगात आहे वाव
बरकत येऊ शकते हे तर तुलाही आहे ठाव
तरी खेळतोस तू शहाण्या का रे तिरपी चाल ?

आयातीवर सूट देऊनी गाडलास तू बळीराजा
म्हणून वाजतो दारापुढती अंत्यक्रियेचा वाजा
स्वदेशीचे ढोंगधतूरे; खातोस विदेशातली दाल

छल कपटाचा नाद सोडूनी भानावर ये आता
‘अभय’ जाहली जर भूमिकन्या, मरशील लाथा खाता
तुझी हुशारी, अक्कल तज्ज्ञा बेसुरी बेताल

– गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
बुलडाणा : चार/एक/सोळा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अखेरची मानवंदना

अखेरची मानवंदना

अखेरची ही मानवंदना
नतमस्तकल्या स्वरी
अश्रू होऊन हृदय वितळले
योद्ध्या चरणावरी

कृषीवलांना, मृदश्रमिकांना
तूच आसरा होता
अर्थवादाच्या प्रबोधिनीचा
तू प्रकाशतारा होता
तूच आमुची मथुरा, काशी
प्रयाग नि पंढरी

एका दाण्यापासून दाणे
हजार निर्मित जेथे
डाकू, लुटारू बनूनी शासक
सनद घेऊनी येते
उणे सबसिडीचा मांडलास तू
हिशेब गणितेश्वरी

युगायुगाच्या अबोलतेला
फोडलीस तू वाचा
मूठ आवळून लढवैय्याची
शिकविलीस तू भाषा
आयुष्याची मशाल चेतवून
जगलास जन्मभरी

कोटी-कोटी शेतकऱ्यांचा
पंचप्राण तू होता
युगपुरुष अन् थोर महात्मा
निर्विवाद तू होता
रेखांकित सप्रमाण केलीस
तू भारत इंडिया दरी

जाऊ नकोस तू त्यागून आम्हा
जरी सोडली काया
सदैव असू दे हात शिरावर
पाईक अभय व्हाया
तूच आमचा प्रकाशसूर्य अन्
योद्धा सारथ्यकरी

– गंगाधर मुटे ’अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

१२/१२/२०१५
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Manwandana