माणसाचा नव्हे साधनांचा विकास – भाग ४

“आयुष्याच्या रेशीमवाटा” – भाग ४
माणसाचा नव्हे साधनांचा विकास
शारीरिक, मानसिक थकवा घालवण्यासाठी पुरेशी विश्रांती मिळावी म्हणून शासकीय कर्मचार्‍यांसाठी पाच दिवसांचा आठवडा, असा नुकताच शासनाने निर्णय घेतला. पण दिवसभर टेबलाच्या आसऱ्याने खुर्चीवर बसून इकडल्या फाइल तिकडे हालविणाऱ्या (कामचुकार?) लोकांना थकवा येतो, ही संकल्पना सर्वसाधारणपणे शारीरिक कामे करणाऱ्यांना अजिबात मान्य होऊ शकत नसल्याने विषय चेष्टेचा ठरतो कारण सुखासीन जीवन हे शारीरिक दुर्बलतेचे कारण असते हेच जवळजवळ सर्वांना अमान्य असते.
महिलांचे सक्षमीकरण, सबलीकरण करणे अशा तऱ्हेचा विचार सुद्धा अधूनमधून उचल खात असतो पण सबलीकरण, सक्षमीकरण म्हणजे नेमके काय? याचे उत्तर कुणाकडेच नसते. सर्वसाधारणपणे सर्व सोयी-सुविधा पुरवल्या की सक्षमीकरण होते असा काहीसा तर्क त्यामागे असतो. सोयी-सुविधांनी शारीरिक सक्षमीकरण, सबलीकरण होण्याऐवजी उलट खच्चीकरणच होत असते, याचे भान कुणालाच नसते.
मानवी उत्क्रांतीच्या प्रवाहात माणसाचा प्रचंड वेगवान गतीने प्रगती आणि विकास झाला, असा एक सार्वत्रिक समज आहे पण माणसाने खरंच प्रगती किंवा विकास केला काय? याचा आढावा घेण्याची कुणीच तसदी घेऊ इच्छित नाही. जर आढावा घेतला तर जे निष्कर्ष निघतात ते अगदीच उलट निघतात. आदिमानव अवस्थेपासून तर सद्य अवस्थेपर्यंत मानवाची प्रगती होण्याऐवजी केवळ अधोगतीच झालेली आहे. काळाच्या ओघात दिवसेंदिवस माणसाची उंची कमी होत गेली, शरीरयष्टीचा घेर कमी होत गेला, वारा, ऊन, पाऊस, थंडी आणि नैसर्गिक बदलाशी जुळवून घेण्याची प्रतिकारशक्तीही कमी होत गेली हे ऐतिहासिक सत्य आहे. बौद्धिक विकास म्हणावा तर तसेही काही दिसत नाही. प्रगल्भता, विवेक, तारतम्य, कल्पनाशक्ती या पातळीवरही मनुष्याने प्रगती केली अशा काहीही पाऊलखुणा आढळत नाहीत. पौराणिक काळात राम, रावण, बिभीषण, लक्ष्मण होते तीच स्थिती आजही कायम आहे. माणसातला रावण मेला नाही आणि रामही जागा झालेला नाही. मानवी वृत्तीचे त्या वेळेस जे प्रमाण असेल तेच प्रमाण आजही कायमचे कायमच आहे. चोर-लुटेरे-डाकू-चरित्रहीन काही प्रमाणात तेव्हाही होते; आजही आहेत. सभ्य-सज्जन-शीलवान-चरित्रवान काही प्रमाणात तेव्हाही होते; आजही आहेत.
माणसाचा विकास, प्रगती वगैरे काहीही झालेली नाही. केवळ मानवी अवस्था बदलली. वास्तुशिल्प, शिल्पकला, हस्तकला आणि वाङ्मय या क्षेत्रातील पूर्व कामगिरी बघून तर आज अचंबित होऊन चमत्कारिक वाटायला लागते. शारीरिक, आत्मिक अथवा बौद्धिक विकास वगैरे काहीही झालेला नाही. जो विकास झाला तो मनुष्यजातीचा विकास नसून केवळ साधनांचा, तंत्र आणि यंत्राचा विकास आहे. साधने जसजशी विकसित होत गेली तसतशी मानवी अवस्था बदलत गेली. समाजव्यवस्था सुद्धा कधीही निर्दोष नव्हती. ती सदैव एका सदोष अवस्थेकडून दुसऱ्या सदोष अवस्थेकडे सरकत राहिली. प्रगत तंत्र आणि साधनांच्या विकासामुळे मनुष्याचे ऊन, वारा, पाऊस, थंडी, वादळ, वातावरणातील बदल यापासून कृत्रिम संरक्षण झाले, जगणे आरामी-हरामी झाले, कष्टाची कामे सुसह्य आणि सुलभ झाली पण याच प्रगतीमुळे मनुष्याचा निसर्गाशी संपर्क तुटल्याने नैसर्गिक प्रतिकारक्षमता आणि सहनशीलता कमी झाली.
सर्व साधनसामुग्रीचा लाभ घेत घेत ऐषोआरामात जीवन कंठण्याच्या शैलीमध्ये प्रसूतीच्या वेळी सिझरिंगचे प्रमाण वाढत असताना नैसर्गिक अवस्थेतील समाजशैली मध्ये मात्र अजूनही तशी वेळ ओढवलेली नाही. माझी एक कष्टकरी रक्ताची नातेवाईक गरोदर असूनही एकटीच शेतात कामाला गेली होती. अकस्मात प्रसूती कळा सुरू झाल्याने तिथेच बाळंत झाली. तिने स्वतःच्या हाताने स्वतःचेच बाळंतपण उरकले. लेकरू ओट्यात घेतले आणि एकटीच शेतातून दोन किलोमीटर अंतरावरील गावातल्या घरी स्वतः चालत चालत आली. आता मायलेकी दोघेही धडधाकट आहेत. ज्यांनी बालपणापासून सायकल, बस अथवा कोणत्याही साधनांचा वापर केला नाही ती माणसे वयाच्या नव्वद-पंच्याण्णवव्या वर्षी सुद्धा चार-पाच किलोमीटर अंतर सहज पायी चालू शकतात, अशी अनेक उदाहरणे आपल्याला आपल्या सभोवताली दिसतात.
शोधात सावलीच्या असा घात झाला
की दिशा शोधण्यातच उभा जन्म गेला
निसर्गापासून गरजेपेक्षा जास्त विलगीकरण, अंतर राखले आणि सोयीसुविधांचा अतिरेक झाला तर माणसाचे जगणे सुसह्य होण्याऐवजी असह्य होऊन निसर्गानेच निर्माण करून ठेवलेल्या आयुष्याच्या रेशीमवाटा हळूहळू काटेरी वाटेत रूपांतरित व्हायला लागतात.
– गंगाधर मुटे आर्वीकर
=========
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन “आयुष्याच्या रेशीमवाटा”
भाग ४ – दि. १५ फेब्रुवारी, २०२० – माणसाचा नव्हे साधनांचा विकास

==========

आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी *fr* http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.

==========

मूळ मानवी प्रवृत्तीवर हवा ताबा – भाग ३

“आयुष्याच्या रेशीमवाटा” – भाग ३
मूळ मानवी प्रवृत्तीवर हवा ताबा
अन्न वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या तीन मूलभूत गरजा एकदाच्या पूर्ण झाल्या की नंतरच माणसाचं खरंखुरं माणूस म्हणून आयुष्य सुरू होतं. सर्व सजीव प्राण्यासमोरचा प्राथमिक आणि मूलभूत प्रश्न स्वसंरक्षणाचा असतो, त्यानंतरच उदरभरणाची पायरी सुरु होते. मनुष्य आणिि त्याचे पाळीव प्राणी सोडले तर आजही स्वसंरक्षण हाच मुख्य प्रश्न अन्य प्राणिमात्रांच्या समोर कायमच आहे. त्यामुळेच स्वाभाविकपणे सर्व प्राणिमात्रांमध्ये स्वसंरक्षणासाठी बचाव आणि आक्रमण हे दोन विशेष गुण आपोआपच विकसित झालेले आहेत.
गुणवैशिष्ट्यामध्ये मनुष्य हा सुद्धा इतर प्राण्यांपेक्षा फार वेगळा नसल्याने त्याच्यामध्ये सुद्धा बचाव आणि आक्रमण हे दोन्ही गूण निसर्गतःच विकसित झालेले आहे आणि इथेच नेमकी मानवतेची घाऊकपणे सदैव कुचंबणा होत आहे. माणसाचे नैसर्गिक शत्रू उदाहरणार्थ हिंस्त्र पशूपक्षी, वन्यप्राणी वगैरेपासून (वन्यप्राणी माणसाचे शत्रू नसून मित्र आहेत अशा दृष्टिकोनातून या मुद्याचा विचार करू नये. ज्याअर्थी मनुष्य हिंस्त्र पशूपक्षांना भितो आणि जीवाला धोका आहे असे तो स्वतः समजतो, त्या अर्थी शत्रू आहे असे गृहीत धरावे) माणसाच्या जीविताला अजिबात धोका उरलेला नाही. त्यामुळे माणसाच्या नैसर्गिक शत्रू सोबत लढाई करणे, त्यांच्यावर आक्रमण करणे ही संधी आता माणसाला उपलब्ध नाही. नैसर्गिक रित्या मिळालेली आक्रमणाची कला व्यक्त करण्यासाठी माणसाला शत्रू उरला नसल्याने त्याचा दुष्परिणाम असा झाला की माणूस आता माणसावरच आक्रमण करायला लागला. येथे एक उदाहरण नमूद करावेसे वाटते की, एकमेकाशी आपसात लढणारी प्राणिजात म्हणून कुत्री ही जात मान्यता पावलेली आहे पण जेव्हा त्यांच्यावर जर कुण्या अन्य प्राण्याने आक्रमण केले तर अशा स्थितीत सर्व कुत्री एकवटतात, एकजीव होतात आणि शत्रूशी लढतात. पण शत्रू नसेल तर मग मात्र सर्व कुत्री आपसातच भांडतात.
मनुष्यजातीचे गणितही त्यापेक्षा फार वेगळे नाही. माणसाच्या स्वभावात बचाव आणि आक्रमण ही दोन्ही कौशल्ये निसर्गदत्त आलेली आहेत. भूतकाळात झालेल्या लढाया, युद्ध यामागे माणसाचा आक्रमणकारी स्वभावच कारणीभूत आहे. भांडणतंटे सुद्धा आक्रमण व बचावाचे सौम्य स्वरूपच आहे. शाब्दिक आक्रमणाच्या पातळीवर बघितले तर तुरळक अपवाद सोडले तर प्रत्येक मनुष्य भांडखोर असतो. भांडण्यासाठी मनुष्य नवनवी कारणे शोधत राहतो. शत्रूशी तर भांडतोच पण शत्रू नसेल तर मग तो शेवटी मित्रासोबत तरी भांडणतंटा करून आपली हौस पूर्ण करून घेतो. बायकासुद्धा बायकांशी भांडतात. त्यांना सार्वजनिक नळावर किंवा पाणवठ्यावर भांडायची संधी उपलब्ध नसेल तर त्या निदान नवऱ्याशी तरी निष्कारण भांडून आपली हौस पूर्ण करून घेतात. पण त्यातही गंमत अशी आहे की आपण कुणालाही “तुम्ही भांडखोर आहात का?” असा प्रश्न विचारल्यास उत्तर नकारार्थीच येते. पण हे सत्य नाही. मनुष्यातील हेच दुर्गुण प्रामुख्याने संतांनी, समाजसुधारकांनी आणि महापुरुषांनी ओळखले होते म्हणून त्यांनी माणसाच्या तमोगुणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळे धर्म, पंथ, संप्रदाय, शाळा, विद्यापीठे वगैरे स्थापन केलीत. संतांनी भजने लिहून, प्रवचने करून माणुसकीची शिकवण देण्याचा प्रयत्न केला. पण सुधारक बदलत गेले पण माणूस काही सुधारला नाही. परिणामतः माणसामध्ये माणसाचे कमी आणि प्राणिमात्रांचेच गूण जास्त आढळतात.
अरे माणूस माणूस, जसा निर्ढावला कोल्हा
धूर्त कसा लबाडीने, रोज पेटवितो चुल्हा
कोल्ह्यासारखी लबाडी, सरड्यासारखी गरजेनुसार हवा तसा रंग बदलण्याची वृत्ती, बगळ्यासारखा ढोंगीपणा, सापाच्या विषासारखी विखारी भाषा, गाढवासारखा अविचारीपणा, माकडासारख्या कोलांटउड्या वगैरे माणसाला हमखास अंगवळणी पडलेले असते. काही केल्या अंगवळणी पडत नाही ती एकच भाषा म्हणजे मानवतेची भाषा. पण त्यातही गंमत अशी आहे की, जे निसर्गदत्त मिळते ते शिकावे लागत नाही व शिकवावेही लागत नाही कारण ती मूळ मानवी प्रवृत्ती असते. मानवी मूळ प्रवृत्ती अमानुष असते. माणसाला माणसासारखे जगायचे असेल तर मूळ मानवी प्रवृत्तीवर ताबा मिळवून मानवतेचा ध्यास धरणे, हीच मानवतेच्या कल्याणाची रेशीमवाट आहे; मानवतेच्या कल्याणासाठी दुसरी वाट उपलब्ध नाही.
– गंगाधर मुटे आर्वीकर
==========
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन “आयुष्याच्या रेशीमवाटा”
भाग ३ – दि. ८ फेब्रुवारी, २०२० – मूळ मानवी प्रवृत्तीवर हवा ताबा

==========

आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी  Fingure-Right  http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.

==========

 

सुखासीन आयुष्याचा राजमार्ग – भाग २

“आयुष्याच्या रेशीमवाटा” – भाग २
सुखासीन आयुष्याचा राजमार्ग
एकंदरीतच सजीव प्राण्यांचा विचार केला तर केवळ मनुष्यजात हीच एकमेव अशी प्राणीजात आहे की ती चराचर सृष्टीतील अन्य प्राणिमात्रापेक्षा अत्यंत शारीरिक दुर्बल अशी प्राणिजात आहे. स्वसंरक्षणासाठी मनुष्याकडे कोणतेही शारीरिक सामर्थ्य नाही. त्याला वाघासारखा तीक्ष्ण नखे असणारा पंजा नाही, रेड्यासारखे शिंगे नाहीत, हत्तीसारखे दात नाहीत, हरणासारखी पळण्याची गती नाही, पक्षासारखे हवेत उडता येत नाही, माकडासारखे झाडावर चढता येत नाही आणि उंदरासारखे बिळात लपताही येत नाही. त्याला स्वसामर्थ्याने स्वतःच्या अवयवांच्या बळावर इतरांवर आक्रमण करता येत नाही, इतकेच नव्हे तर स्वतःचे रक्षण देखील करता येत नाही. जंगली श्वापदे जाऊ द्या; साध्या मुंगीपासून, मधमाशीपासून किंवा उंदरा-मांजरापासून देखील त्याला स्वतःचा बचाव करणे अवघड आहे. तरीही अत्यंत दुर्बल अशा मनुष्यप्राण्याने संबंध प्राणिमात्रावर साम्राज्य प्रस्थापित केले कारण इतर शक्तिशाली प्राण्यांकडे नसलेली विचार करण्याची एकमेव अद्भुतशक्ती मनुष्याकडे आहे आणि तिचाच वापर मनुष्यजातीने आपल्या उत्क्रांतीसाठी करून घेतला. विचारशक्तीच्या बळावर मनुष्याने साधनांची, आयुधांची निर्मिती केली आणि त्याचा उपयोग स्वसंरक्षणासोबतच इतरांवर आक्रमण करण्यासाठी करून समग्र प्राणी जगतावर स्वतःचे साम्राज्य प्रस्थापित केले. मनुष्यजातीच्या उत्क्रांतीचा इतिहास हा त्याच्या साधनांच्या निर्मिती व विकासाच्या उत्क्रांतीचा इतिहास आहे
शारीरिक दुर्बल असल्यानेच स्वसंरक्षणासाठी मनुष्याला मेंदूचा उपयोग करणे भाग पडले. त्यातूनच त्याला साधने निर्माण करण्याची कला अवगत झाली. जो सर्वात जास्त शारीरिक दुर्बल, कमजोर अथवा हीन असतो त्यालाच वेगवान क्रांतिकारी उत्क्रांतीची गरज भासते आणि ज्याची सतत उत्क्रांती सुरू असते तोच बदलत्या स्थितीत बदलत्या काळात खंबीरपणे टिकून राहतो. भूतलावरील डायनासोरसारखे अनेक शक्तिशाली प्राणीजात लोप पावत असताना माणसाने मात्र स्वतःची मानवजात केवळ टिकवूनच ठेवली नाही तर अधिकाधिक उत्क्रांत करत नेली. हत्यार सादृश्य साधनांची निर्मिती करून स्वसंरक्षणाचा परिघ प्रशस्त करणे हा त्याचा साधन निर्मितीचा पहिला टप्पा होता. प्राथमिक अवस्थेत अन्न, वस्त्र आणि निवारा यापैकी वस्त्र आणि निवारा ह्या दोन्ही बाबीचे महत्त्व केवळ स्वसंरक्षणापुरतेच मर्यादित होते. पण कालांतराने त्याच्या स्वसंरक्षणाचे प्रश्न सुटत जाऊन निर्धोक पातळीवर पोहोचला लागल्याने त्याची विचार करण्याची पद्धत स्वसंरक्षणावरून अन्य बाबीवर केंद्रित व्हायला लागली. संरक्षणासाठी निर्माण केलेली साधने त्याला आपोआपच शिकारीसाठी उपयोगी पडून त्याचा उपयोग अन्न मिळवण्यासाठी सुद्धा व्हायला लागला.
अन्न, वस्त्र व निवाऱ्याचे प्रश्न सहज सुटून आयुष्यात किंचितशी स्थिरता आल्यानंतर त्याच्या डोक्यात सुखासीन आयुष्याची कल्पना घर करत गेलेली असावी. पण याच सुखासीन आयुष्याच्या संकल्पनेने मनुष्यजातीची जितकी हानी केली तितकी हानी अन्य कोणत्याही संकल्पनेने खचितच केली नसेल. रानटी अवस्थेपासून तर एकविसाव्या शतकापर्यंतचा मनुष्यप्राण्याचा स्वभाव बघितला तर मनुष्यप्राणी कधी एकलपणे तर कधी समूहाने सुखासीन आयुष्याच्या संकल्पनेच्या सभोवतीच पिंगा घालण्यात आपली सर्व शक्ती खर्ची घालत असल्याचे अधोरेखित होते. स्वतःचे व स्वतःच्या समूहाचे सुखासीन आयुष्य अधिकाधिक निर्धोक करण्यासाठीच एखादी अमेरिका एखाद्या इराकला बेचिराख करून टाकते. सुखासीन आयुष्याची प्रेरणाच दोन टोळ्यांमध्ये टोळीयुद्ध, दोन समूहांमध्ये दंगल, दोन पक्षांमध्ये सत्तेची लढाई किंवा दोन देशांमध्ये विनाशकारी विध्वंसक रक्तपात घडवून आणत असते. अण्वस्त्रांच्या वापराने मनुष्यजातीचे अस्तित्वच संपुष्टात येऊ शकते इतके माहीत असून सुद्धा शंभर वेळा पृथ्वी निर्मनुष्य करू शकेल इतक्या अण्वस्त्रांची निर्मिती स्वतः मनुष्यप्राणी करून ठेवत असतो.
माणसाची उत्क्रांती माकडापासून झाली किंवा नाही हा मुद्दा बाजूला ठेवला तरी मनुष्यजातीच्या विचारशैलीमध्ये मर्कटचेष्टा हा स्थायीभाव असतो. ह्या मर्कटचेष्टापायीच मनुष्यप्राणी सुखासीन आयुष्याच्या शोधात सदैव भटकत असतो आणि नव्याने नवनवी संकटे स्वतःवर ओढवून घेत असतो. मनुष्य कधी नराचा नारायण, कधी नारायणाचा नर, तर कधी नराचा वानर होत राहतो. आधी युद्ध मग बुद्ध, पुन्हा युद्ध पुन्हा बुद्ध. हीच वारंवारिता त्याच त्याच क्रमाने वारंवार दृग्गोचर होत राहते. हे असे दृष्टचक्र सुद्धा सृष्टिचक्रासारखे अव्याहतपणे सुरू राहते.
धमासान आधी महायुद्ध होते
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते
राग, लोभ, मोह, माया, मत्सर, क्रोध यावर नियंत्रण मिळवून प्रेम, शांती, अहिंसा आणि परस्पर सद्भाव हीच खरीखुरी आयुष्याची रेशमी पाऊलवाट आहे आणि एकमेव रेशमी राजमार्ग सुद्धा हाच आहे. अगदी निःसंशयपणे!
– गंगाधर मुटे आर्वीकर
==========
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन “आयुष्याच्या रेशीमवाटा”
भाग २ – दि. १ फेब्रुवारी, २०२० – सुखासीन आयुष्याचा राजमार्ग

==========

आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.

==========

जगणे सुरात यावे – भाग १

“आयुष्याच्या रेशीमवाटा” – भाग १
जगणे सुरात यावे
“असा बेभान हा वारा, नदीला पूर आलेला” हे गीत कानावर पडलं की आपण सुरेल अशा तालासुरांमध्ये पद्याऐवजी गद्य तर ऐकत नाही ना, असे काहीसे वाटायला लागते. सुर आणि पद्य यांच्यामध्ये जे सुरेल नाते आहे ते नाते सुर आणि गद्य यांच्यात मेळ खात नाही असे जाणवत राहते. तालासुरात गाणे म्हणजेच संगीत नसते. अगदी वृत्तपत्रातला एखादा लेख सुद्धा चाल लावून संगीतबद्ध करता येईल पण त्यातून जो नाद निर्माण होईल तो खचित सुरमयी नसेलच. शब्दांना सुरात सजवले आणि लयीत गुंफले म्हणजे शब्दांना सुर येतोच असे नाही तर त्यासाठी शब्द सुद्धा सुरमयी व शब्दरचना ओघवती असणे अनिवार्य असते.
लय हा जसा संगीताचा आत्मा तद्वतच मानवी आयुष्याचाही आत्मा आहे. जीवनात लय नसेल तर आयुष्य बेसूर होऊन जाते. संगीतातच किंवा संगीतामध्येच नादमाधुर्य तयार होते, असेही नाही. मुळात स्वतः शब्दच गद्य किंवा पद्य असतात. तसेच एकापेक्षा अधिक शब्दांचा समूह देखील स्वतः लयीची निर्मिती करत असतो. वाक्य सहज उच्चारताच आपोआप लयीत येऊन नादमय माधुर्य तयार होत असते. कोमल शब्द घेऊन वाक्यरचना केली तर अभिव्यक्तीला मृदू, मृदुभाषी, सोज्वळ व सात्त्विक संवादाचे स्वरूप येते. याउलट कठोर, जहाल, भडक शब्द घेऊन वाक्यरचना केली तर अभिव्यक्तीला भेसूर, बीभत्स, कर्कश व शिवराळ संवादाचे स्वरूप येते. त्यामुळे आयुष्याचा प्रवाह आनंदमयी व आल्हाददायी करण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात आपले उठणे, आपले चालणे, आपले बोलणे, आपले वागणे, सारे काही लयबद्धंच असायला हवे.
खरंतर मनुष्यच नव्हे तर साऱ्या सजीव सृष्टीचा स्वभाव निसर्गतः लयबद्धतेला प्राधान्य देणाराच असतो. वाघाची डरकाळी असो की गायीचे हंबरणे, पाखरांची किलबिल असो की कोकिळेची कुहूकुहू सारे कसे लयबद्धच असते. जंगलातील रातकिड्यांचा आवाज देखील नादब्रह्माची निसर्गतः निर्मिती करणाराच असतो. इतकेच नव्हे तर त्याही पुढे जाऊन बघितले तर आपल्याला सहजपणे दिसतेय की निर्जीवामध्येही लयबद्धतेला प्राधान्य असतेच. झऱ्यांचे झुळझुळ वाहणे व त्यातून उत्पन्न होणारा आवाज हा नादब्रह्माचा आविष्कारच असतो.
अणुरेणू सहित साऱ्या विश्वाचा पसारा जर लयबद्धतेशी, नादमाधुर्याशी जवळीक साधणारा असेल तर मग नेमका मनुष्यप्राण्यामध्येच गद्यप्रकार किंवा गद्यस्वभाव आला तरी कुठून? जन्माला येताना माणसाचे रडणे लयीमध्येच असते आणि नादमाधुर्य निर्माण करणारेच असते. याचाच दुसरा अर्थ असा की, मनुष्याची मूळ अभिव्यक्ती लयबद्धतेशी इमान राखणारीच असते; पण पुढे मनुष्य जसा वयाने मोठा होत जातो तसतसी त्याची जडणघडण निसर्गदत्त अभिव्यक्तीशी फारकत घेत जाते. त्याच्यावर लादले जाणारे अनावश्यक कृत्रिम संस्कार, बेगड्या सभ्यतेच्या पायात लटकलेल्या बेड्या आणि संस्कारक्षम वर्तणुकीचे निकष यामुळे मनुष्य आपल्या मूळ स्वभावापासून दूर जातो व जन्मतः मिळालेली लय गमावून बसतो. लोक काय म्हणतील या भीतीने त्याचे गुणगुणणे बंद होते, लोक हसतील या भीतीने चालताना त्याचे पदलालित्य नाहीसे होते, आपण फार सभ्य आहोत असे इतरांना दाखविण्याच्या नादात त्याचे बोलणे पूर्णतः गद्य होऊन जाते. कालांतराने मनुष्य हळूहळू पूर्णतः बदलून जातो; इतका गद्य होऊन जातो की त्याला आपल्या इवल्याश्या बाळाशी पद्यमय गुंजारव करायला सुद्धा त्याची जीभ धजावत नाही, कारण आपल्याला आपले सभ्यत्व धोक्यात येण्याची भीती वाटत असते आणि इथेच मनुष्य आपल्या आयुष्याची लय हरवून बसतो. कर्तव्यनिष्ठ, समाजनिष्ठ जीवन जगताना आपण आपल्या आयुष्यातील आनंददायी जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगण्यापासून फार दूर गेलेलो आहोत, इतके सुद्धा मग स्वतःच्या लक्षात येत नाही.
समाजनिष्ठ जीवन जगणे आणि आनंदनिष्ठ जीवन जगणे यामध्ये फार तफावत आहे. आनंददायी, चैतन्यदायी जीवन जगण्यासाठी माणसाने स्वतःला लयीत आणलं पाहिजे.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान व्हावे
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात यावे
आयुष्य लयीत आणण्यासाठी मनसोक्त हसलं पाहिजे, मनसोक्त रडलं पाहिजे, मनसोक्त खेळलं पाहिजे, मनसोक्त गायलं पाहिजे, मनसोक्त नाचलं पाहिजे, मनसोक्त उडलं-बागडलं पाहिजे; इतकेच नव्हे तर कधी कधी मनसोक्त कुदलंही पाहिजे. यातच आनंददायी उल्हसित जीवन जगण्याच्या प्रेरणा सामावलेल्या आहेत.
– गंगाधर मुटे
===========
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन “आयुष्याच्या रेशीमवाटा”

भाग १ – दि. २५ जानेवारी, २०२० – जगणं सुरात यावं

==========

आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी *fr* http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.

==========