शेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही!
शाळा-महाविद्यालयात मिळवलेल्या ज्ञानाची शिदोरी गाठीशी घेऊन जेव्हा मी प्रत्यक्ष शेती करायला सुरवात केली तेव्हा पहिल्या सहा महिन्यातच पुस्तकीय ज्ञानातील विरोधाभास उघड व्हायला लागला. प्रत्यक्ष शेतीतील अनुभव, प्रत्यक्ष ग्रामीण जीवन, पुस्तकीय ज्ञानातील पांडित्य व बोलघेवड्या पगारी तज्ज्ञांचे सल्ले हे दुरान्वयानेही आपसात एकमेकांच्या नातेसंबंधात लागत नाही, याची प्रचिती यायला लागली. शेती, शेतीतील गरीबी, गावाची दुर्दशा याची कारणे शोधतांना जी कारणे आढळली ती पुस्तकांशी, पुस्तकी पंडीतांच्या निष्कर्षाच्या आणि शिकवणीच्या थेट उलटी दिसत होती. डोहाकडे जाणार्याला वाचवण्यासाठी उदात्त हेतूचा देखावा करून सुचवले जाणारे मार्ग त्याला आणखी त्वरेने डोहाकडे नेणारे आणि कुठल्याही स्थितीत तो बुडलाच पाहिजे, अशी बेमालूमपणे पण प्रभावी व्यवस्था करणारेच आहेत, हे ज्या क्षणी लक्षात आले आणि खात्री पटली त्या क्षणीच प्रचलित पुस्तकी पंडीत, पारंपारिक ज्ञानाचे महामेरू आणि पगारी तज्ज्ञ यांच्यावरचा माझा विश्वास भुर्रकन उडून अवकाशात निघून गेला तो आजतागायतही परत आलेला नाही.
मात नव्हे मैत्री
हजारो वर्षापासून शेतकरी शेती करत आला पण त्याने निसर्गावर मात करण्याची भाषा कधीच केली नाही. त्याने निसर्गाशी जुळवून घेतले, निसर्गाशी मैत्री केली. निसर्गाला बदलायला भाग पाडणे मनुष्य प्राण्याच्या आवाक्यात नाही, याची जाणीव असण्याइतपत व्यावहारिक ज्ञान त्याचाकडे असल्याने तसा प्रयत्न त्याने कधीच केला नाही. याउलट तो स्वत: बदलला. निसर्ग कसा असतो, हे त्याने समजून घेतले एवढेच नव्हे तर त्याने स्वत:ला निसर्गानुरूप बदलवून घेतले. त्याने नैसर्गिक प्रकृतीला स्वत:च्या प्रकृतीत विलिन करून घेतले. रान केव्हा नांगरायचे, उदिमाला सुरुवात केव्हा करायची, पेरणी केव्हा करायची याचे वेळापत्रक त्याने निसर्गाला अनुसरून तयार केले. पेरणी केली अन पाऊस आला नाही किंवा अति पाऊस होऊन दुबारपेरणीची वेळ आली तर कधी कुरबूर केली नाही, आदळआपट केली नाही आणि निसर्गाला कधी दोष तर दिलाच नाही. पुन्हा नव्याने तयारी केली आणि दुबार पेरणी केली. कधी ओला दुष्काळ पडला, कधी कोरडा दुष्काळ पडला, कधी एका पावसाच्या कमतरतेने पीक करपून गेले, कधी अति पावसाने अथवा महापूराने शेत पिकासहित खरडून गेले, कधी वादळाने तर कधी गारपिटीने पीक धाराशायी केले पण शेतकरी अश्रू ढाळत बसला नाही आणि निसर्गाच्या नावाने शिमगा करत डांगोराही कधीच पिटला नाही. त्याने निसर्गाला मित्रासारखीच वागणूक दिली आणि निसर्गाला त्याच्या विविधतेसह आनंदाने स्विकारले. पावसाने उघडीप दिली किंवा खंडवृष्टीची स्थिती निर्माण झाली तेव्हा शेतकर्याने निसर्गाला बोल लावला नाही तर त्याची आराधना केली. कधी कमरेला बेडूक बांधून वरुणदेवतेला प्रसन्न करायचा प्रयत्न केला, कधी सर्व गावकर्यांनी एकत्र येऊन मारोतीच्या पाळावर अभिषेक केला तर कधीकधी सामुहिक सदावर्त करून देवासमोर नैवद्य ठेवला आणि गावातील सर्व गोरगरीब गावकर्यांना यथेच्छ जेवनाचा पाहूणचार दिला. शेतकर्याने पेरणीसाठी मातीचा, पीक जगवण्यासाठी पाण्याचा, कचराकाडी जाळण्यासाठी अग्नीचा, धान्य उफ़णण्यासाठी वायुचा, उदीमासाठी वृक्षाचा खुबीने वापर केला आणि निसर्गदत्त संसाधनाचा पुरेपूर कौशल्यानिशी वापर करत व निसर्गाशी सलोखा राखत आपली शेती फ़ुलवत ठेवली. इतिहासाच्या कोणत्याच कालखंडात शेतकर्याने निसर्गाला शत्रू मानून त्याच्यावर मात करण्याची भाषा वापरल्याच्या यत्किंचितही पाऊलखुणा आढळत नाही.
कुटनितीचा खेळ
शेतकरी समाजातील याच संभ्रमाचा फ़ायदा अनुत्पादक वर्गाने नेमकेपणाने उचलला. डाकूंचे, चोरांचे किंवा भामट्यांचे बरे होते. कुठलेही तत्वज्ञान न सांगता किंवा कारणमिमांसा न करताच बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करत ते शेतमाल फ़ुकटातच लुटून न्यायचे. मात्र ऐतखाऊ, अनुत्पादक व बिगरशेतकरी वर्ग यांच्याकडे बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करण्याची क्षमता नसल्याने म्हणा किंवा त्यांना समाजात सामाजिक प्रतिष्ठा असल्याने म्हणा, त्यांना अशा राजरोसपणे लुटीच्या मार्गाने जाणे शक्यच नव्हते आणि म्हणून शेतीमध्ये उत्पादित होणारा माल फ़ुकटात मिळणेही अशक्यच होते. मग या सर्वांनी मिळून कुटनितीचा डाव खेळणे सुरू केले. जेव्हा जेव्हा थेट दोन हात करणे अशक्य असते तेव्हा तेव्हा समोरच्या बाजुला परास्त करण्यासाठी कुटनितीचा अवलंब करण्याला बहुतांश शास्त्रांची मान्यता असल्याने शेतमालाच्या लुटीसाठी या मार्गाचा अवलंब करणे सर्वांनाच सोईचे वाटले असावे. शेतमाल कमीत कमी दरात उपलब्ध होत राहण्यासाठी शेतकर्यांना त्यांच्या गरिबीचे खरे कारण कळू न देता त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने दिशाभूल करत राहणे सर्वांना फ़ायदेशीर ठरले असावे. शेतकरी आळशी, कामचोर, उधळ्या, अज्ञानी आहे, परंपरागत पद्धतीने शेती करणारा, नव्या तंत्रज्ञानाचा वापर न करणारा आहे त्यामुळे तो गरीब आहे किंवा शेतीच्या दुर्दशेला निसर्गाचा लहरीपणा कारणीभूत आहे, अशा सामुहिक जनमानस तयार करणार्या संकल्पनांचा वापर शेतीमालाला मिळणार्या अत्यल्प भावाच्या मुद्याला बगल देण्यासाठी कुटनितीक शैलीने पद्धतशीरपणे करण्यात आला असावा, हे उघड आहे.
ग्राहकांची मानसिकता
– गंगाधर मुटे