चौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत

१८ नोव्हेंबर २०१७ : महाराष्ट्र टाईम्स । मुंबई

चौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत
संमेलनाध्यक्षपदी डॉ. विठ्ठल वाघ यांची निवड

कल्पनाविश्वात रमणाऱ्या आभासी शेतीसाहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी काही संबध उरला आहे किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी आणि मराठी साहित्यक्षेत्राकडून कृषिजगताला असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी बुधवार, ३१ जानेवारी २०१८ रोजी पु. ल देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे चौथ्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक, कवी डॉ. विठ्ठल वाघ भूषविणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते अभिजित फाळके यांनी तर अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.
शेतकरी आत्महत्यांनी विक्राळरुप धारण केले आहे पंरतु प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फारसा उहापोह आणि उपाययोजना शोधण्यासाठी शर्थीच्या हालचाली होताना दिसत नाहीत. अगदी साहित्यक्षेत्रसुद्धा या प्रश्नाकडे गंभीरतेने पाहत आहे असे आढळून येत नाही. मागील तीन वर्षातील सततच्या अवर्षणग्रस्त परिस्थितीने शेतकरी हतबल झालेला असतानाच विद्यमान सरकारच्या फसव्या कर्जमाफीने शेतकरी आणखीनच हवालदिल झालेला आहे. जवळजवळ सर्वच शेतमालाचे भाव केंद्रशासनाने निर्धारित केलेल्या हमीभावापेक्षाही (MSP) कमी दराने बाजारात विकले जात आहे. शेतकरी देशोधडीस लागत असतानाही समाजाचा आरसा समजल्या जाणाऱ्या साहित्यक्षेत्रात मात्र वास्तवाचे प्रभावीपणे चित्र प्रतिबिंबित होताना दिसत नाही, ही बाब साहित्यक्षेत्रातील उदासीनता अधोरेखित करणारी आहे.
साहित्यक्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून २०१५ मध्ये पहिले अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन वर्धा येथे, २०१६ मध्ये दुसरे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपूर येथे तर २०१७ मध्ये तिसरे साहित्य संमेलन गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले होते.
या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणाऱ्या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्तारासाठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकऱ्याच्या आयुष्यात सुखाचे आणि सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पीढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.
या संमेलनात “आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शासकीय धोरण”, “स्वामिनाथन आयोग: शेतीला तारक की मारक?”, “शेतकरी विरोधी कायद्यांचे जंगल, “सावध! ऐका पुढल्या हाका”, अशा विविध विषयावरील एकूण ४ परिसंवाद राहणार असून या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार असल्याने हे या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असणार आहे. संमेलनात शेतकरी गझल मुशायरा व शेतकरी कवी संमेलन अशी दोन स्वतंत्र सत्रं ठेवण्यात आली आहेत.
संमेलनाच्या आयोजनासाठी नियोजन समिती, व्यवस्थापन समिती, आयोजन समिती, आणि स्वागत समिती अशा चार समित्या गठीत करण्यात आल्या असून या समित्यांचे अध्यक्ष म्हणून अनुक्रमे प्रा. भुपेश मुडे, प्रा. रमेश झाडे, प्रा. कुशल मुडे, व जनार्दन म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.

४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन

४ थे अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलन : नियोजन

नमस्कार मंडळी,

        आज १ जुलै २०१७. वर्षाचा सहा महिन्याचा पूर्वार्ध संपला आणि आजपासून उत्तरार्ध सुरु झालाय. ४ थ्या अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला लागायचे म्हणता-म्हणता अन्य कामाच्या धबडग्यात चक्क चार महिने निघून गेलेत. जरा उशीर झाला असला तरी पुढील कामाचा थोडा वेग वाढवून आपल्या लेट गाडीचा टाइम भरून काढणे अशक्यही नाही. चला तर मग आजपासून आता चवथ्या संमेलनाच्या आयोजन आणि नियोजनाबद्दल विचार करुयात आणि कामाला लागुयात.

        २८ फ़ेब्रुवारी व १ मार्च २०१५ ला वर्धा येथे पहिले, २० व २१ फ़ेब्रुवारी २०१६ ला नागपूर येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात दुसरे आणि २५ आणि २६ फ़ेब्रुवारी २०१७ ला गडचिरोली येथील संस्कृती सांस्कृतिक सभागृहात तिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन सुखरूप आणि यशस्वीरित्या पार पडले, त्याबद्दल सर्व सहकाऱ्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. 

       आता चवथे संमेलन विदर्भाबाहेर मुंबई, पुणे, नाशिक किंवा औरंगाबाद येथे घ्यायचे नियोजित असून त्याकरिता  पुढील प्रयत्नाची दिशा ठरवून वाटचाल करण्यासाठी आणि पुढील कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी आपले अभिप्राय आणि सुचना महत्वाच्या ठरणार आहेत.
  • तीन साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनानंतर आता अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीच्या संघटनात्मक बांधणीला सुरुवात करणे आवश्यक झाले आहे. पहिल्या टप्यात जिल्हानिहाय संपर्क प्रमुख किंवा जिल्हा संपर्क मंडळ नेमायचे आहे. या कार्यात स्वतःची पदरमोड करून स्वेच्छेने कार्य करु इच्छिणार्‍यांनी abmsss2015@gmail.com या इमेलवर १५/०७/२०१७ पूर्वी संपर्क साधावा.
  • अ.भा. शेतकरी मराठी साहित्य चळवळीच्या आर्थिक व्यवहार व ताळेबंद हिशेबाकरिता दोन वर्षापूर्वी “शेती अर्थ प्रबोधिनी” ही संस्था नोंदणीकृत करण्यात आली आहे. सबब पुढील सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शीपणाने संस्थेच्या मार्फतच चालतील. इच्छुक व्यक्ती/संस्था/प्रतिष्ठन यांच्याकडून देणगी स्वरुपात निधी स्विकारला जाऊ शकतो. इच्छुकांनी abmsss2015@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा.   

    मोबाईलधारकासाठी खास : अ.भा. शेतकरी मराठी साहित्य चळवळीची सर्व माहिती सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी “युगात्मा परिवार” मोबाईल एप डाउनलोड करा. 
  • http://play.google.com/store/apps/details?id=com.andromo.dev633912.app614211

    आपल्या सुचनांचे स्वागत आहे. 

आपला स्नेहांकित

गंगाधर मुटे 

संस्थापक अध्यक्ष 
अ.भा. शेतकरी मराठी साहित्य चळवळ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

एक लेख एका आत्मप्रौढीचा!

एक लेख एका आत्मप्रौढीचा!

आत्मस्तुती किंवा आत्मगौरव मानवी जीवनात निषिद्ध मानल्या गेला आहे. स्वत:च स्वत:चे कौतूक करणे तर अशोभनीयच. अगदी ग्रामीण जनजीवनात सुद्धा अशा वर्तनाला “अर्ध्या हळकुंडाने पिवळा होणे” अशा वर्गवारीत ढकलले गेले आहे. अगदी आत्मचरीत्र लिहायचे असेल तरी लेखकाने आपल्या आयुष्यातील बर्‍या-वाईट दोन्ही प्रकारच्या घटनांचा उहापोह करावा, अशी अपेक्षा असते. पण तरीही आयुष्यात कधीकधी अनपेक्षितपणे असाही प्रसंग येतो की आपलाच आपल्याला अभिमान वाटायला लागतो. आपण सहज म्हणून केलेले कार्य अनपेक्षितपणे अपेक्षेबाहेरची फ़लनिष्पती देऊन जाते. अशावेळी आपलाच आपल्याला वाटणारा  अभिमान अहंकार नसतो. त्यामागे असते केवळ आपल्या हातून घडलेल्या कार्याची कृत्यकृत्यता आणि श्रमसाफ़ल्यता.

अशाच एका प्रसंगाविषयी आज लिहायचा मोह न आवरल्यामुळे आत्मस्तुतीचा दोष स्विकारुन मी लिहित आहे.

 १२ डिसेंबर २०१५ ची ती सकाळ. वेळ ९ च्या आसपासचा. पुण्यावरून माझे मित्र श्री प्रसाद सरदेसाई यांचा एक अचानक मोबाईल कॉल आला. ते कापर्‍या स्वरात म्हणाले,

“मुटे सर, साहेबांच्या प्रकृत्तीबद्दल काही कळले का?”

          शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांची प्रकृती अनेक दिवसापासून  चांगली नव्हती हे मला माहित होते. ते अत्यवस्थ असल्याचा १० नोव्हेंबर २०१५ ला दुपारी संदेश आल्याने रवीभाऊ काशीकर, सरोजताई काशीकर, सुमनताई अग्रवाल, शैलजाताई देशपांडे, पांडुरंग भालशंकर आणि मी लगोलग रात्रीच्या फ़्लाईटने पुण्याला जाऊन रुबिया हॉस्पीटलमध्ये त्यांची भेट घेऊन आलो होतो. ते अत्यवस्थ होते आणि वैद्यकीय उपचाराला त्यांचे शरीर फ़ारसे प्रतिसाद नव्हते. एवढे मला माहित होते. नंतरच्या काळात संपर्क माध्यमातून प्रकृती “यथास्थिती” असल्याचे संकेत मिळत होते. पण अगदीच ताजी म्हणावी अशी माहिती माझ्याकडे नसल्याने मी म्हणालो,

“ नाही. यासंदर्भात ताजी माहिती माझ्याकडे नाही” मी.

“शरद जोशी इज नो मोअर” असा तिकडून प्रसाद सरदेसाई यांचा रडका आवाज ऐकताच माझ्या काळजात धस्स झाले. विश्वास बसत नव्हता पण सरदेसाई सरांनी दिलेली बातमी खोटी असण्याचीही शक्यता नव्हती. मी तातडीने मोबाईलवर नंबर डायल केला.

“सरोजताई, साहेबांच्या प्रकृत्तीबद्दल काही कळले काय?” मी.
“माझं काल रात्रीच बोलणं झालं प्रकृती………”
मी मध्येच सरोजताईंचे बोलणे थांबवून म्हटले.
“आज काहीतरी विपरित बातमी आहे, तुम्ही तातडीने पुण्याला संपर्क करावा”

            इतके बोलून मी लगेच फ़ोन कट केला. नंतर लगेच श्री वामनराव चटप व श्री राम नेवले यांना फ़ोन केला. त्यांनाही काहीच माहिती नसल्याचे लक्षात येताच त्यांनी पुण्याला संपर्क करुन माहिती मिळवावी, असे सुचवले. घरी बायकोला सांगून टीव्हीवर मराठी बातम्यांचे चॅनेल आळीपाळीने सतत बदलून काही बातमी येते का ते बघत राहायला सांगीतले.
            पुण्याला फ़ोन करून म्हात्रे सर किंवा देशपांडे सरांशी संपर्क करावा व नक्की काय ते खात्री करून घ्यावी, असा विचार करत असतानाच तिकडून तितक्यात सरोजताईंचाच फ़ोन आला. त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. आता बोलण्याची गरजही संपलीच होती. मग फ़ोनवर दोन्हीकडून अक्षरश: ओक्साबोक्सी रडारड सुरु झाली. ९-१० मिनिटानंतर मी स्वत:ला सावरायचा प्रयत्न केला पण त्यात यश येईना म्हणून बोट लाल बटनेवर ठेवले आणि फ़ोन कट केला.

आता रडण्याखेरीज अन्य काही कार्य उरलेलेच नव्हते. बातम्या अजून सुरु व्हायच्या होत्या. निदान आणखी दोन तास तरी ही बातमी अधिकृतपणे जाहीर होण्याची व प्रसारमाध्यमांपर्यत पोचण्याची शक्यता नव्हती. बातमी अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना आणि वृत्त वाहिन्यांना शरद जोशींविषयीची माहीती, जीवनपट, छायाचित्र आणि व्हिडियो लागतील. ही सर्व माहिती प्रसारमाध्यमांना उपलब्ध करून देऊ शकेल असे शेतकरी संघटनेकडे एकच व्यक्तिमत्व होते आणि ते म्हणजे प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे. संघटनेच्या सुरुवातीपासूनच म्हात्रे सरांनी केंद्रीय कार्यालय सांभाळले आहे. पण याक्षणाला ते माहिती पुरवायला नक्कीच उपलब्ध होऊ शकणार नव्हते. शिवाय शरद जोशींच्या प्रकृतीची बातमी प्रसारमाध्यमांपासून लपवून गोपणीयता राखल्याने प्रसारमाध्यमेही बेसावध असल्याने ऐन वेळेवर माहिती गोळा करणे त्यांनाही शक्य होणार नाही, याचाही नीटसा अंदाज येऊन गेला.

शरद जोशींच्या अत्यवस्थेविषयी कार्यकर्त्यांनाही फ़ारशी माहिती नसल्याने ही बातमी महाराष्ट्रासहित अन्य राज्यातील शेतकर्‍यांनाही धक्का देणारी असल्याने या बातमीचे महत्वही अनन्यसाधारणच होते. आता यासंदर्भात जे काही करायचे ते आपल्यालाच करायला हवे असे ठरवून  तातडीने लॅपटॉपवर बसलो आणि महाराष्ट्रासहित देशातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांना आणि दुरदर्शन वाहिन्यांना इमेलद्वारे माहीती पाठवायचा सपाटा सुरू केला.

तीन-चार इमेल जाईपर्यंत ठीक होते पण जेव्हा एकापाठोपाठ शरद जोशींविषयीची संपूर्ण माहिती, जीवनपट, आंदोलनाचा आढावा, छायाचित्र व व्हिडियो असलेले दहा-बारा इमेल त्यांचेकडे पोचले तेव्हा पत्रकारांना संशय येऊन काहीतरी नक्कीच वाईट बातमी असल्याचा त्यांनाही अंदाज येणे क्रमप्राप्त होते. मग माझा मोबाईल खणखणायला लागला. पुण्यावरून अधिकृत घोषणा न झाल्याने मी पत्रकारांना बातमीच्या सत्यतेचा दुजोरा देऊ शकत नव्हतो. मग मोबाईल मित्राच्या हाती दिला आणि सांगीतले की कॉल करणार्‍या सर्वांना सांग की मी सध्या अतिव्यस्त आहे त्यामुळे त्यांनी एक तासानंतर संपर्क करावा. मी मात्र माहितीचे इमेल पाठवणे सुरुच ठेवले.

मी पाठवत असलेल्या माहितीचा बाज लक्षात घेता बहुधा प्रसारमाध्यमांनाही पुरेसा अंदाज येऊन गेलेलाच असावा कारण मी फ़ोनवर उपलब्ध नाही म्हटल्यावर तिकडून इमेलवर रिप्लाय यायला लागलेत. रिप्लायला प्रतिसाद न देता मी नवीन माहिती पाठवणे सुरुच ठेवले.  त्याचा परिणाम असा झाला की अधिकृत घोषणा होताच दूरदर्शन वाहिन्यावर थेट सविस्तर बातम्याच सुरू झाल्यात. पुण्यापासून ८०० किलोमिटर अंतरावरील आर्वी छोटी सारख्या दुरवरच्या ग्रामीण भागातील ३००० लोकसंख्या असलेल्या गावात बसून मी दिवसभर राज्यभरातल्या कानाकोपर्‍यातील प्रसारमाध्यमांना हवी ती माहिती आणि साहित्य पुरवत होतो, ही आधुनिक संगणकीय व आंतरजालिय तंत्रज्ञानाची किमया होती आणि मी त्या अत्याधुनिक नवतंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून घेत होतो.  दिवसभर दूरदर्शन वाहिन्यावर आणि १३ तारखेच्या राज्यभरातील वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यामध्ये ५० ते ९० टक्के मजकूर मी पाठवलेलाच दिसत होता किंवा मीच चालवत असलेल्या http://www.sharadjoshi.inhttp://www.baliraja.com या संकेतस्थळावरुन तरी घेतलेला होता. शरद जोशींचा जीवनपट तर जवळजवळ सर्वच वृत्तपत्रांनी मी जसा पाठवला तसाच्या तसाच छापला होता.

माझ्या एका छोट्याशा प्रयत्नाने व मी निर्माण करून ठेवलेल्या संकेतस्थळांमुळे शरद जोशींसारख्या युगात्म्याचे व्यक्तीमत्व सविस्तर माहितीसह जनतेपर्यंत पोहचू शकल्याने श्रमसाफ़ल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटून अभिमानास्पद वाटणे अगदीच स्वाभाविक आहे.

 – गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~~~~
साप्ताहिक उदयकाळ “चैत्र विषेशांक-२०१७” मध्ये प्रकाशित.

शेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही!

शेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही!

 

निसर्ग म्हणजे निसर्ग आहे आणि त्याची वर्तणूक सुद्धा निसर्गाला शोभेल अशी नैसर्गिकच असणार हे उघड आहे.  निसर्ग विविधतेने नटलेला आहे. विविधता हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. निसर्गातला विविधता हा गूण काही कालचा किंवा परवाचा नाही. आपल्यासारख्या बुद्धीवंतांचा जन्म झाल्यानंतर निसर्गाने विविधतेचा गूण धारण केला असेल, असेही नाही. निसर्गाचा जेव्हा केव्हा जन्म झाला असेल तेव्हाच तो विविधतेचा जन्मजात गूण धारण करुनच जन्माला आला असणार, हेही उघड आहे.  ही बाब सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट असूनही यावर मते-मतांतरे व्यक्त होत असतील तर तीही नैसर्गिक वैविध्यतेच्या रचनात्मक मानसिकतेमुळेच होत असते, ही नैसर्गिक शाश्वत सत्यता सुद्धा आपण स्विकारलीच पाहिजे. पण तिथेही विविधताच आडवी येते आणि शाश्वत सत्यता स्विकारायला शतप्रतिशत मानसिकता कधीच तयार होत नसते.

 

भारतीय शेती निसर्गावर अवलंबून असल्याने शेतकरी गरीब आहे, हे विधान मी शाळा-कॉलेजात असताना ऐकण्यात आणि वाचण्यात इतके वेळा कानावर आणि डोळ्यावर येऊन आदळायचे की कानाचे पडदे फ़ाटायला बघायचे आणि डोळ्यातली बाहुली ठार गारद व्हायला बघायची. शाळा-कॉलेजात जाऊन शिकले-सवरलेले आणि ग्रंथ-कुराण-बायबल-वेद वाचून साक्षात ज्ञानाचे महामेरू झालेले इतके येरेगबाळे कसे बोलू आणि लिहू शकतात, याचे कायम कुतुहलमिश्रीत नवल वाटत राहायचे. मग या विधानाची शहानिशा करून आकलन करण्यासाठी मेंदूच्या भवती विचाराचे लोंदे गोळा व्हायचे. ते मेंदूभवती इतका पिंगा घालायचे की मेंदू पार गुळगुळीत होऊन पलिकडे काम करेनासा व्हायचा. कधीकधी मेंदू हँग झाला की मुद्दा निकाली न काढताच त्याला आहे तसाच अर्धवट आणि येरागबाळा सोडून मेंदूला फ़ॉर्म्याट मारून, नव्याने रिफ़्रेश मारून ताजेतवाने व्हावे लागायचे.

शाळा-महाविद्यालयात मिळवलेल्या ज्ञानाची शिदोरी गाठीशी घेऊन जेव्हा मी प्रत्यक्ष शेती करायला सुरवात केली तेव्हा पहिल्या सहा महिन्यातच पुस्तकीय ज्ञानातील विरोधाभास उघड व्हायला लागला. प्रत्यक्ष शेतीतील अनुभव, प्रत्यक्ष ग्रामीण जीवन, पुस्तकीय ज्ञानातील पांडित्य व बोलघेवड्या पगारी तज्ज्ञांचे सल्ले हे दुरान्वयानेही आपसात एकमेकांच्या नातेसंबंधात लागत नाही, याची प्रचिती यायला लागली. शेती, शेतीतील गरीबी, गावाची दुर्दशा याची कारणे शोधतांना जी कारणे आढळली ती पुस्तकांशी, पुस्तकी पंडीतांच्या निष्कर्षाच्या आणि शिकवणीच्या थेट उलटी दिसत होती. डोहाकडे जाणार्‍याला वाचवण्यासाठी उदात्त हेतूचा देखावा करून सुचवले जाणारे मार्ग त्याला आणखी त्वरेने डोहाकडे नेणारे आणि कुठल्याही स्थितीत तो बुडलाच पाहिजे, अशी बेमालूमपणे पण प्रभावी व्यवस्था करणारेच आहेत, हे ज्या क्षणी लक्षात आले आणि खात्री पटली त्या क्षणीच प्रचलित पुस्तकी पंडीत, पारंपारिक ज्ञानाचे महामेरू आणि पगारी तज्ज्ञ यांच्यावरचा माझा विश्वास भुर्रकन उडून अवकाशात निघून गेला तो आजतागायतही परत आलेला नाही.

मात नव्हे मैत्री

                  निसर्गावर मात करण्याच्या वल्गना हा आणखी एक असाच आगाऊपणा. एकंदरीत निसर्गाची प्रकृती एकजिनशी आणि वैश्विक आहे. विश्वाच्या एका भौगोलिक प्रदेशात घडलेल्या बदलाचा प्रभाव विश्वाच्या दुसर्‍या भौगोलिक प्रदेशात जाणवत असतो. वैश्विक रचना समग्र ब्रह्मांड रचनेशी संलग्नीत आहे, इतके जाणायला मनुष्य खगोलशास्त्रज्ञ किंवा ज्योतिषशात्रीच असला पाहिजे, हेही आवश्यक नाही. ब्रह्मांडाची परिमिती कुणालाच मोजता आली नाही आणि मोजता येणे शक्यही दिसत नाही. आकाशगंगेतील अंतर मोजण्यासाठी प्रकाशवर्ष हे परिणाम सुद्धा अत्यंत थिटे आहे. आकाशगंगेचे नुसते अंतर मोजण्याचीही कुवत नसलेल्या मनुष्यप्राण्याने थेट मात करण्याच्या गोष्टी करणे अत्यंत हास्यास्पद आहे. एकंदरित निसर्गाची आणि निसर्गावर प्रभाव टाकणार्‍या घटकांशी व्याप्ती लक्षात घेतली तर विभागवार किंवा प्रदेशवार निसर्गाच्या प्रकृतीवर नियंत्रण आणता येणे आपल्या आवाक्यात नाही. तंत्रज्ञानाने कितीही झेप घेतली तरी निसर्गाच्या प्रकृतीवर नियंत्रण आणणे कधीही शक्य होणार नाही, याचे भान विसरून चालणार नाही. सतरा वर्षे शाळा-महाविद्यालयात घालवली आणि जोडीला शे-पाचशे पुस्तके वाचल्याने ज्ञानग्रहनक्षमतेच्या कक्षा तेवढ्या रुंदावत जातात, निसर्गावर मात करण्याचे सामर्थ्य प्राप्त होत नाही याचे भान राखायलाच हवे.

हजारो वर्षापासून शेतकरी शेती करत आला पण त्याने निसर्गावर मात करण्याची भाषा कधीच केली नाही. त्याने निसर्गाशी जुळवून घेतले, निसर्गाशी मैत्री केली. निसर्गाला बदलायला भाग पाडणे मनुष्य प्राण्याच्या आवाक्यात नाही, याची जाणीव असण्याइतपत व्यावहारिक ज्ञान त्याचाकडे असल्याने तसा प्रयत्न त्याने कधीच केला नाही. याउलट तो स्वत: बदलला. निसर्ग कसा असतो, हे त्याने समजून घेतले एवढेच नव्हे तर त्याने स्वत:ला निसर्गानुरूप बदलवून घेतले. त्याने नैसर्गिक प्रकृतीला स्वत:च्या प्रकृतीत विलिन करून घेतले. रान केव्हा नांगरायचे, उदिमाला सुरुवात केव्हा करायची, पेरणी केव्हा करायची याचे वेळापत्रक त्याने निसर्गाला अनुसरून तयार केले. पेरणी केली अन पाऊस आला नाही किंवा अति पाऊस होऊन दुबारपेरणीची वेळ आली तर कधी कुरबूर केली नाही, आदळआपट केली नाही आणि निसर्गाला कधी दोष तर दिलाच नाही. पुन्हा नव्याने तयारी केली आणि दुबार पेरणी केली. कधी ओला दुष्काळ पडला, कधी कोरडा दुष्काळ पडला, कधी एका पावसाच्या कमतरतेने पीक करपून गेले, कधी अति पावसाने अथवा महापूराने शेत पिकासहित खरडून गेले, कधी वादळाने तर कधी गारपिटीने पीक धाराशायी केले पण शेतकरी अश्रू ढाळत बसला नाही आणि निसर्गाच्या नावाने शिमगा करत डांगोराही कधीच पिटला नाही. त्याने निसर्गाला मित्रासारखीच वागणूक दिली आणि निसर्गाला त्याच्या विविधतेसह आनंदाने स्विकारले. पावसाने उघडीप दिली किंवा खंडवृष्टीची स्थिती निर्माण झाली तेव्हा शेतकर्‍याने निसर्गाला बोल लावला नाही तर त्याची आराधना केली. कधी कमरेला बेडूक बांधून वरुणदेवतेला प्रसन्न करायचा प्रयत्न केला, कधी सर्व गावकर्‍यांनी एकत्र येऊन मारोतीच्या पाळावर अभिषेक केला तर कधीकधी सामुहिक सदावर्त करून देवासमोर नैवद्य ठेवला आणि गावातील सर्व गोरगरीब गावकर्यांना यथेच्छ जेवनाचा पाहूणचार दिला. शेतकर्‍याने पेरणीसाठी मातीचा, पीक जगवण्यासाठी पाण्याचा, कचराकाडी जाळण्यासाठी अग्नीचा, धान्य उफ़णण्यासाठी वायुचा, उदीमासाठी वृक्षाचा खुबीने वापर केला आणि निसर्गदत्त संसाधनाचा पुरेपूर कौशल्यानिशी वापर करत व निसर्गाशी सलोखा राखत आपली शेती फ़ुलवत ठेवली. इतिहासाच्या कोणत्याच कालखंडात शेतकर्याने निसर्गाला शत्रू मानून त्याच्यावर मात करण्याची भाषा वापरल्याच्या यत्किंचितही पाऊलखुणा आढळत नाही.

कुटनितीचा खेळ

              मग निसर्गावर मात करण्याची आणि शेतीतील अठराविश्व दारिद्र्याशी निसर्गाच्या लहरीपणाशी सांगड घालून निसर्गालाच जबाबदार धरण्याची भाषा आली कुठून? या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे. उत्तर जटील नसले तरी कुटील नक्कीच आहे. शेतकर्‍यांच्या मर्जीनुसार आणि पिकांच्या गरजेनुसार पाऊस कोणत्याच युगात पडल्याची शक्यता नाही आणि यानंतर पुढे येणार्‍या युगातही पडणार नाही, हे शेतकर्‍याला निसर्गत: मान्य असल्याने तो त्याच्या गरिबीला निसर्गाला जबाबदार धरत नसला तरी अन्य कोण जबाबदार असेल याचीही कल्पना त्याला नाही आणि नेमकी इथेच शेतकरी समाजाची गोची झाली. शेतीत दारिद्र्य आहे हे खरे आहे पण ते कशामुळे आहे, याचे नेमकेपणाने उत्तर शेतकरी समाजाला माहित नसल्याने त्यांचा “नरोवा कुंजरोवा” झाला.

शेतकरी समाजातील याच संभ्रमाचा फ़ायदा अनुत्पादक वर्गाने नेमकेपणाने उचलला. डाकूंचे, चोरांचे किंवा भामट्यांचे बरे होते. कुठलेही तत्वज्ञान न सांगता किंवा कारणमिमांसा न करताच बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करत ते शेतमाल फ़ुकटातच लुटून न्यायचे. मात्र ऐतखाऊ, अनुत्पादक व बिगरशेतकरी वर्ग यांच्याकडे बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करण्याची क्षमता नसल्याने म्हणा किंवा त्यांना समाजात सामाजिक प्रतिष्ठा असल्याने म्हणा, त्यांना अशा राजरोसपणे लुटीच्या मार्गाने जाणे शक्यच नव्हते आणि म्हणून शेतीमध्ये उत्पादित होणारा माल फ़ुकटात मिळणेही अशक्यच होते. मग या सर्वांनी मिळून कुटनितीचा डाव खेळणे सुरू केले. जेव्हा जेव्हा थेट दोन हात करणे अशक्य असते तेव्हा तेव्हा समोरच्या बाजुला परास्त करण्यासाठी कुटनितीचा अवलंब करण्याला बहुतांश शास्त्रांची मान्यता असल्याने शेतमालाच्या लुटीसाठी या मार्गाचा अवलंब करणे सर्वांनाच सोईचे वाटले असावे. शेतमाल कमीत कमी दरात उपलब्ध होत राहण्यासाठी शेतकर्‍यांना त्यांच्या गरिबीचे खरे कारण कळू न देता त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने दिशाभूल करत राहणे सर्वांना फ़ायदेशीर ठरले असावे. शेतकरी आळशी, कामचोर, उधळ्या, अज्ञानी आहे, परंपरागत पद्धतीने शेती करणारा, नव्या तंत्रज्ञानाचा वापर न करणारा आहे त्यामुळे तो गरीब आहे किंवा शेतीच्या दुर्दशेला निसर्गाचा लहरीपणा कारणीभूत आहे, अशा सामुहिक जनमानस तयार करणार्‍या संकल्पनांचा वापर शेतीमालाला मिळणार्‍या अत्यल्प भावाच्या मुद्याला बगल देण्यासाठी कुटनितीक शैलीने पद्धतशीरपणे करण्यात आला असावा, हे उघड आहे.

ग्राहकांची मानसिकता

            कोणत्याही व्यक्ती अथवा सामुहिक कुटुंबाचा जमा आणि खर्चाचा ताळेबंद जुळत नाही तेव्हा त्या कुटुंबाचा अर्थसंकल्प तोट्याचा तयार होतो. अर्थाच्या अनुलब्धतेमुळे साधनांच्या खरेदीवर एकतर मर्यादा येतात किंवा खरेदी अशक्य होते. घरात साधनांची त्यातल्या जिवनावश्यक गरजेच्या वस्तुंच्या खरेदीसाठी अथवा जिवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारी क्रयशक्ती संपली की घरात जे चित्र तयार होते त्यालाच आपण दारिद्र्य म्हणत असतो. देशाचा, राज्याचा, कार्पोरेट क्षेत्राचा, सामाजिक क्षेत्राचा अर्थसंकल्प मांडण्याची व तर्‍हेतर्‍हेचे उपाय सुचवण्याची पात्रता असलेले लक्षावधी पगारी अर्थतज्ज्ञ या देशात मुबलक मिळून जातात. अर्थसंकल्पात तृटी दर्शविणारे व त्याचे लेखापरिक्षण करणे ऑडिटर सुद्धा लक्षावधी संख्येने मिळून जातात पण शेतीत गरिबी आहे कारण शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून निघेल एवढेही भाव मिळत नसल्याने शेतीचा अर्थसंकल्प तोट्यात जातो, असे ठासून सांगणारे अर्थतज्ज्ञ किंवा सी. ए मात्र दुर्मीळ असणे वरील कुटनितीचा परिणाम आणि पुरावा आहे.
             गणीताच्या भाषेत ०.५ च्या वरील सर्व किंमती १ च्या बरोबर तर ०.५ च्या आतील सर्व किंमती शुन्याच्या बरोबरीच्याच असतात. आज आपल्या देशात बहुतांश शेतमालाला एकूण उत्पादनखर्चाच्या निम्म्यापेक्षाही कमीच भाव दिले जातात. म्हणजे शून्य किंमतीत म्हणजेच फ़ुकटाच्या बरोबरीनेच शेतमाल हडपला जातो, हे गणीतीय सत्य सर्वांनीच स्विकारायला हवे. शेतीतील गरिबी संपवण्यासाठी शेतमालाचे उत्पादन खर्च भरून निघतील एवढे भाव मिळण्याखेरीज अन्य कुठलाही मार्गच अस्तित्वात नसल्याने शेतमाल स्वस्तात मिळाला पाहिजे, अशी मानसिकता आता ग्राहकांनीही बदलणे, काळाची गरज आहे.

– गंगाधर मुटे

(’जनशांती’नाशीक, दिवाळी अंकात प्रकाशित लेख)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

ये तू मैदानात : शेतकरी गीत

ये तू मैदानात : शेतकरी गीत 

ये तू मैदानात, ये तू मैदानात
ये तू मैदानात, पाईका ये तू मैदानात
काळ्या आईचा एल्गार
बिगूल फुंकण्या हो तय्यार
उलवून फेकू गुलाम बेड्या
जगण्या स्वातंत्र्यात
जगण्या स्वातंत्र्यात, जगण्या स्वातंत्र्यात
जगण्या स्वातंत्र्यात, पाईका ये तू मैदानात ||धृ||

गोरे गेले, काळे आले
शस्त्राचे रंगांतर झाले
काळी आई खितपत पडली
विझल्या अंधारात
विझल्या अंधारात, विझल्या अंधारात
विझल्या अंधारात तेवण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात, तेवण्या ये तू मैदानात ||१||

झोन बंदी, निर्यातबंदी
साठेबंदी, प्रदेशबंदी
आयातीचा दोर खेचतो
कंठाचा गळफास
कंठाचा गळफास, कंठाचा गळफास
कंठाचा गळफास सोडण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात, सोडण्या ये तू मैदानात ||२||

हात बांधती, पाय बांधती
डोळ्यावरती टाय बांधती
आणिक म्हणती स्पर्धा कर तू
विद्वानांची जात
विद्वानांची जात, ‘ती’ विद्वानांची जात
‘ती’ विद्वानांची जात ठेचण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात, ठेचण्या ये तू मैदानात ||३||

शेतीला गिळणार कायदे
हिरवळीला पिळणार वायदे
सुगीशिखरावर श्वापदं झाली
नांगी रोवून स्वार
नांगी रोवून स्वार, नांगी रोवून स्वार
सरावलेली नांगी चेचण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात, चेचण्या ये तू मैदानात ||४||

रणकंदनाची हाळी आली
नीजप्रहरावर पहाट झाली
दे ललकारी अभय पाईका
हाती घेत मशाल
हाती घेत मशाल, हाती घेत मशाल
मशाल हाती घेत झुंजण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात झुंजण्या, ये तू मैदानात ||५||

– गंगाधर मुटे ’ अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हे काव्यफ़ूल युगात्म्याच्या चरणी वाहून शेतकरी संघटनेला अर्पण करून दिलेल्या वचनमुक्तीतून उतराई होण्याचा प्रयत्न.
संदर्भ >>> http://www.baliraja.com/node/986 “हतबल झाली प्रतिभा”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रणाम युगात्म्या

प्रणाम युगात्म्या
            १९८० चे दशक उजाडेपर्यंत लढाऊ किसान किंवा लढवैय्या शेतकरी हे शब्दच निरर्थक होते. इतिहासात आपण कितीही मागे जाऊन बघितले तरी कोणत्याही कालखंडात भारतीय शेतकरी त्याच्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध कंबर कसून साक्षात महाकाली दुर्गेचा अवतार धारण करत होता, अशा काही पाऊलखुणा आढळत नाहीत. अगदी शेताच्या बांधावर राजसैन्याच्या घनघोर लढाया व्हायच्या तेव्हाही तो त्या लढायांकडे मुक बधिरतेने निर्विकार चेहरा करूनच बघत राहायचा. शेतकर्‍याला पक्के ठाऊक होते की, राजे असो, पेशवे असो, मोगल असो किंवा डाकू-लुटेरे असो, हे सारे विजयानंतर आपल्याकडे शेतसारा वसूल करायला किंवा धान्याची लूट करायलाच येणार आहेत. ह्या लढाया म्हणजे शेतसारा वसूल कोणी करायचा याचा रीतसर परवाना मिळवण्यासाठीच असतात. ज्याला आपले म्हणावे असे यांच्यापैकी आपले कोणीच नाहीत.

 

               कितीही अन्याय, अत्याचार झालेत तरी त्याविरुद्ध एक शेतकरी म्हणून निखळ शेतीच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शेतकरी पेटून उठला, त्याने राजसत्तेविरुद्ध बंड पुकारले असे उदाहरणच शेतीच्या इतिहासात सापडत नाही. त्याऐवजी दोन्ही हात जोडून अदबीने उभा राहणारा शेतकरी मात्र इतिहासाच्या प्रत्येक पानावर पाहायला मिळतो. साने गुरुजींनी शेतकर्‍यांना लढण्याची प्रेरणा देताना लिहिले,

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकर्‍यांच्या राज्यासाठी, लावू पणाला प्राण

              पण त्या कवितेची शेतकर्‍यांनी दखलच घेतली नाही. शेतकरी उठले नाहीत, रान पेटले नाही आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी कुणी प्राणही पणाला लावले नाहीत. तसे पाहिले तर शेतकर्‍यांचा इतिहासच तसा फार चांगला नाही. ज्यांनी ज्यांनी शेतकर्‍यांना लुटायचा प्रयत्न केला त्यांनी त्यांनी यश मिळवले. पण ज्यांनी शेतकर्‍यांच्या बाजूने लढायचा प्रयत्न केला त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढायला शेतकरी कधीच समोर आला नाही. कदाचित त्यामुळेच शेतकर्‍यांची बाजू घेऊन लढण्यापेक्षा शेतकर्‍यांना लुटून जगणार्‍या व्यवस्थेत सामील होऊन आपला निहित स्वार्थ साधून घेणे सगळ्यांना जास्त सोयीचे आणि परिणामकारक वाटले असावे, असा अंदाज बांधणे भाग पडत आहे.

 

                शेतकर्‍यांची कड घेऊन लढणारे शोधायला आपण इतिहासात कितीही मागे गेलो तरी सरते शेवटी बळीराजावर जाऊन थांबतो. खरे तर बळीराजा हा शेतकर्‍यांचा निखळ राजा नव्हताच. तो शोषित जनतेचा, सामान्य रयतेचा राजा होता. बळीराजाच्या राज्यात प्रजा सुखी होती. शेतकरी हाही त्याच प्रजेचा एक घटक असल्याने तोही सुखी होता. शेतकर्‍यांप्रती चांगला न्याय देणारा बळीराजा व्यतिरिक अन्य कोणी राजाच झाला नसल्याने बळीराजा हाच शेतकर्‍यांना आपला राजा वाटतो. आजही “इडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे” अशी शेतकर्‍यांच्या घराघरात प्रार्थना केली जाते. पण नुसतीच प्रार्थना केली जाते, मनोभावना व्यक्त केली जाते. बळीचे राज्य संपल्यानंतर पुन्हा बळीचे राज्य यावे यासाठी मात्र शेतकर्‍यांनी काही प्रयत्न केले होते, याचा मागमूसही इतिहासात सापडत नाही.     बळीराजानंतर शेतकर्‍याच्या कैवार्‍याचा शोध घेण्यासाठी गाडी पुढे काढली तर गाडी अधेमधे कुठेच थांबत नाही. गाडी थेट म. ज्योतिबा फुले यांच्यानावाजवळ येऊन थांबते. म. फुले हे शेतकर्‍यांचे दैवत. शेतकर्‍यांच्या बाजूने त्यांनीच व्यवस्थेवर पहिला आसूड उगारला. शेतीचे प्रश्न चव्हाट्यावर आणण्यासाठी अनेक हालअपेष्टा सोसून त्यांनी आयुष्य खर्ची घातले पण अत्यंत खेदजनक बाब ही की शेतकरी मात्र म. फ़ुलेंच्या बाजूने उभा राहिला नाही. म. फ़ुलेंच्या खांद्याला खांदा लावून त्यांना नैतिक बळही पुरवले नाही. ज्योतिबांना एकाकी झुंज द्यावी लागली. अगदी सावित्रीबाईच्या अंगावर घाण फेकण्यात आली तरीही शेतकरी सावित्रीबाईच्या बचावासाठी सरसावला नाही, बंड करून उठणे ही तर फारच दूरची गोष्ट झाली.

१९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात पाहिल्यांदाच एक चमत्कार पाहायला मिळाला. शरद जोशींच्या रूपात एक झंझावात आला. इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते पहिल्यांदाच घडले. लाखो शेतकरी शरद जोशींच्या खांद्याला खांदा लावून रणात उतरले. “कुत्र्याची शेपटी सरळ होईल पण शेतकरी संघटित होणार नाही” हा सार्वत्रिक समज तोंडघशी पाडत शेतकर्‍यांची संघटना स्थापन झाली. शेतीच्या प्रश्नावर कधीही शेकडोच्या संख्येत सुद्धा जमा न होणारा शेतकरी समाज लाखांच्या संख्येने गोळा व्हायला लागला. रस्ता रोको, रेलरोको, गावबंदी सारखे अस्त्र उगारून व्यवस्थेला सळो की पळो करून सोडू लागला. पुरुषच नव्हे तर महिलासुद्धा आंदोलनाचे नेतृत्व करायला पुढे सरसावल्या. चांदवडच्या अधिवेशनात ३ लक्ष शेतकरी महिलांची उपस्थिती, हा तर खरोखर चमत्कारच होता. त्यावेळी सर्वांच्या मनात एकच भावना होती,


सरकारच्या धोरणापायी छक्केपंजे आटले
बरं झालं देवा बाप्पा, शरद जोशी भेटले

              निखळ शेतीच्या प्रश्नावर ज्याच्या मागे शेतकरी समाज आपापल्या जाती-धर्माचे कडे झुगारून उभा राहिला की ज्यामुळे त्याला शेतकर्‍यांचा नेता म्हणावे, असा शेतकरी नेता एकच आणि तो म्हणजे शरद जोशी. आज शरद जोशी नसताना त्यांच्या पश्चात त्यांचा ८१ वा जन्मदिवस साजरा करण्याचा हा पहिलाच प्रसंग. आजवर या द्रष्ट्या शेतकरी नेत्याची पहिली जयंती उत्साहात साजरी करणार्‍यांना हा जन्मदिवस शोकविव्हळ वातावरणात साजरा करावा लागणार आहे. या वेळेस उत्साह आणि आनंदाऐवजी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूच तरळणार आहेत आणि शेतकरी कार्यकर्ते सांडुभाई शेख यांच्या कवितेच्या ओळीच प्रत्येकाच्या मुखातून बाहेर पडणार आहेत.

हे ब्रह्मा, विष्णू, पांडुरंगा, तुम्हाला काय कमी सांगा
अमुचे शरद जोशी काका, अम्हाला देऊनी टाका

          शरद जोशींवर जिवापाड प्रेम करणारे, त्यांच्या एका शब्दावर स्वत:चा प्राण धोक्यात घालून आंदोलनाचा झेंडा पुढे नेणारे लक्षावधी पाईक त्यांना मिळालेत हे जितके खरे तितकेच हेही खरे आहे की शेतीचे अर्थशास्त्र मांडताना आणि शेतकरी आंदोलनाला पुढे नेताना त्यांनी कुणाचाही मुलाहिजा ठेवला नाही, कुणाला काय वाटेल याची कधी पर्वा केली नाही त्यामुळे त्यांना शत्रूही लक्षावधीच्या संख्येतच मिळाले. भारत विरुद्ध इंडिया ही संकल्पना मांडताना इंडियाशी वैरत्व घेतले. सारेच पक्ष शेतकर्‍यांचे शत्रू आहेत, असे सांगत सार्‍या राजकीय पक्षांशी दोन हात केले. निवडणुकांतील उमेदवार म्हणजे दोन गाढवांची शर्यत आहे, आपल्याला सोयीचा गाढव निवडायचा आहे असे प्रचारसभेतील व्यासपीठावर उमेदवाराच्या तोंडावर सांगत आपली भूमिका रोखटोकपणे विशद केली. शासकीय कर्मचार्‍यांचे पगार कमी केल्याखेरीज देशाची अर्थव्यवस्था सुधारणे शक्य नाही, असे प्रतिपादन करून शासकीय कर्मचार्‍यांची नाराजी ओढवून घेतली. आपला विचार मांडताना त्यांनी कुठलीच तडजोड केली नाही. परिणामत: त्यांना मिळालेल्या छुप्या शत्रूंची संख्याही अफाट आहे. सत्तेचे लालसी व शेतकरी आंदोलनाचा शिडीसारखा वापर करून राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करू पाहणार्‍या शेतकरी कार्यकर्त्यांनाही त्यांनी आपल्या जवळपास फारसे फिरकू दिले नाही त्यामुळे अनेक कार्यकर्ते शेतकरी आंदोलनापासून दूर जाऊन राजकीय पक्षांशी घरोबा करते झाले.

 

            शेतीला मध्यवर्ती स्थानी ठेवून विचारांची गुंफणं करणारा हा द्रष्टा नेता आज शरीराने आपल्यात नसला तरी त्यांचे विचार अनादिकाळापर्यंत शेतकरी पाईकांना प्रकाशवाट दाखवून शेतकरी चळवळीचे नेतृत्व करत राहील यात शंका नाही. २० व २१ फेब्रुवारी २०१६ ला संपन्न झालेल्या नागपूर येथील दुसर्‍या अ.भा.मराठी शेतकरी संमेलनाने त्यांना युगात्मा ही मरणोत्तर लोकउपाधी प्रदान केली आणि त्यांच्या चरणी भावना अर्पण केली की,

एक युग कवेत घेतले म्हणून तू युगात्मा.
एक युग घडवले म्हणून तू युगात्मा.
स्वातंत्र्योत्तर भारतातील सगळ्यात मोठी
लोकचळवळ उभी केली म्हणून तू युगात्मा.
शेतीचा प्रश्न या मातीचा कळीचा मुद्दा होता
ती कळ तुला सापडली म्हणून तू युगात्मा.
तुझ्या शत्रूलाही तुझे श्रेय नाकारता आले नाही
नंतर नंतर तर सगळे पक्ष आणि संघटना
तुझीच भाषा बोलायला लागले म्हणून तू युगात्मा
ऊठ म्हणालास… उठले युग, चाल म्हणालास चालायला लागले
तुझी पाहून जादू मग ब्रह्मांडही हलायला लागले
युगायुगानंतर येतो असा युगावर मिळवणारा ताबा.
शरद जोशी तुला युगात्मा नाही म्हणायचं
तर काय म्हणायचं बाबा?

– गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

परतून ये तू घरी

परतून ये तू घरी

मेघ गुंजले, पवन रुंजले
आतूर झाल्या सरी
राजसा! परतून ये तू घरी॥

सूर्य, तारका, क्षितिज झाकले
किर्र ढगांनी गगन वाकले
गडगड होता बुरुजाभवती
धडधड भरली उरी
राजसा! परतून ये तू घरी॥

नाग, चिचुंद्री बिळात घुसले
पक्षी पिंपळावरती बसले
कडकडता बघ वीज नभाला
थरथरले गिरी-दरी
राजसा! परतून ये तू घरी॥

शिवार भिजले, तरूवर निजले
अश्रू पिऊनी बुबुळं थिजले
हिरमुसले बघ गायवासरू
अन् गहिवरली ओसरी
राजसा! परतून ये तू घरी॥

– गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

॥सांगा तुकारामा : अभंग-२॥

॥सांगा तुकारामा : अभंग-२॥

 

तुझ्या विठ्ठलाचा । कैसा दुजाभाव ।
चारीमुंड्या गाव । चीत केले ॥१॥

रानातलं पाणी । उद्योगानं नेलं ।
उभं पीक मेलं । पाण्याविना ॥२॥

धरणाचा साठा । शॉवरात गेला ।
तिथं श्वान न्हाला । शैम्पुसवे ॥३॥

इथं पाण्यासाठी । शोधती टँकरं ।
धावुनी लेकरं । दुडुदुडू ॥४॥

तिथे शौचासाठी । फिल्टरले जळ ।
माळ्यावरी नळ । चुलीपाशी ॥५॥

इथे पिण्यासाठी । क्षारयुक्त पाणी ।
गढुळाचे धनी । गावकरी ॥६॥

लक्ष अब्जावधी । करोडोचा निधी ।
वाढवी उपाधी । शहरांची ॥७॥

ठेऊनिया कमी । शेतीमाल भाव ।
ध्वस्त केला गाव । पिळुनिया ॥८॥

गावही भकास । भकास मारुती ।
घामाची आहुती । व्यर्थ गेली ॥९॥

तिथे ऐश्वर्याचा । सुख, चैनी, भोग ।
सातवा आयोग । सेवेसाठी ॥१०॥

इथे दारिद्र्याचे । सर्वत्र साम्राज्य ।
कर्जाचेच राज्य । आम्हावरी ॥११॥

गाव म्हंजे जणू । दुभत्याची गाय ।
खरडूनी साय । रक्त पिती ॥१२॥

सांगा तुकोराया । अभय एवढे ।
कुणाला साकडे । घालावे गा? ॥१३॥

– गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१६/०७/२०१६

स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी तडका

स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी तडका

एक आणखी झाडावरती लटकून मेला काल
तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल

पुन्हा एकदा बिनपाण्याने भाजून गेले शेत
एसीमध्ये आखतोस तू सटरमफटरम बेत
तुला दावतो भकासबंजर तू बांधावरती चाल

खते, औषधी, बीज, मजुरी दसपट झाले भाव
वीज, किराणा, डिझेल, डॉक्टर लुटून नेती गाव
अन् तुला पाहिजे स्वस्तामध्ये शेतीमधला माल

शेतपिकाच्या निर्यातीला जगात आहे वाव
बरकत येऊ शकते हे तर तुलाही आहे ठाव
तरी खेळतोस तू शहाण्या का रे तिरपी चाल ?

आयातीवर सूट देऊनी गाडलास तू बळीराजा
म्हणून वाजतो दारापुढती अंत्यक्रियेचा वाजा
स्वदेशीचे ढोंगधतूरे; खातोस विदेशातली दाल

छल कपटाचा नाद सोडूनी भानावर ये आता
‘अभय’ जाहली जर भूमिकन्या, मरशील लाथा खाता
तुझी हुशारी, अक्कल तज्ज्ञा बेसुरी बेताल

– गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
बुलडाणा : चार/एक/सोळा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अखेरची मानवंदना

अखेरची मानवंदना

अखेरची ही मानवंदना
नतमस्तकल्या स्वरी
अश्रू होऊन हृदय वितळले
योद्ध्या चरणावरी

कृषीवलांना, मृदश्रमिकांना
तूच आसरा होता
अर्थवादाच्या प्रबोधिनीचा
तू प्रकाशतारा होता
तूच आमुची मथुरा, काशी
प्रयाग नि पंढरी

एका दाण्यापासून दाणे
हजार निर्मित जेथे
डाकू, लुटारू बनूनी शासक
सनद घेऊनी येते
उणे सबसिडीचा मांडलास तू
हिशेब गणितेश्वरी

युगायुगाच्या अबोलतेला
फोडलीस तू वाचा
मूठ आवळून लढवैय्याची
शिकविलीस तू भाषा
आयुष्याची मशाल चेतवून
जगलास जन्मभरी

कोटी-कोटी शेतकऱ्यांचा
पंचप्राण तू होता
युगपुरुष अन् थोर महात्मा
निर्विवाद तू होता
रेखांकित सप्रमाण केलीस
तू भारत इंडिया दरी

जाऊ नकोस तू त्यागून आम्हा
जरी सोडली काया
सदैव असू दे हात शिरावर
पाईक अभय व्हाया
तूच आमचा प्रकाशसूर्य अन्
योद्धा सारथ्यकरी

– गंगाधर मुटे ’अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

१२/१२/२०१५
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Manwandana