शेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही!

शेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही!

 

निसर्ग म्हणजे निसर्ग आहे आणि त्याची वर्तणूक सुद्धा निसर्गाला शोभेल अशी नैसर्गिकच असणार हे उघड आहे.  निसर्ग विविधतेने नटलेला आहे. विविधता हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. निसर्गातला विविधता हा गूण काही कालचा किंवा परवाचा नाही. आपल्यासारख्या बुद्धीवंतांचा जन्म झाल्यानंतर निसर्गाने विविधतेचा गूण धारण केला असेल, असेही नाही. निसर्गाचा जेव्हा केव्हा जन्म झाला असेल तेव्हाच तो विविधतेचा जन्मजात गूण धारण करुनच जन्माला आला असणार, हेही उघड आहे.  ही बाब सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट असूनही यावर मते-मतांतरे व्यक्त होत असतील तर तीही नैसर्गिक वैविध्यतेच्या रचनात्मक मानसिकतेमुळेच होत असते, ही नैसर्गिक शाश्वत सत्यता सुद्धा आपण स्विकारलीच पाहिजे. पण तिथेही विविधताच आडवी येते आणि शाश्वत सत्यता स्विकारायला शतप्रतिशत मानसिकता कधीच तयार होत नसते.

 

भारतीय शेती निसर्गावर अवलंबून असल्याने शेतकरी गरीब आहे, हे विधान मी शाळा-कॉलेजात असताना ऐकण्यात आणि वाचण्यात इतके वेळा कानावर आणि डोळ्यावर येऊन आदळायचे की कानाचे पडदे फ़ाटायला बघायचे आणि डोळ्यातली बाहुली ठार गारद व्हायला बघायची. शाळा-कॉलेजात जाऊन शिकले-सवरलेले आणि ग्रंथ-कुराण-बायबल-वेद वाचून साक्षात ज्ञानाचे महामेरू झालेले इतके येरेगबाळे कसे बोलू आणि लिहू शकतात, याचे कायम कुतुहलमिश्रीत नवल वाटत राहायचे. मग या विधानाची शहानिशा करून आकलन करण्यासाठी मेंदूच्या भवती विचाराचे लोंदे गोळा व्हायचे. ते मेंदूभवती इतका पिंगा घालायचे की मेंदू पार गुळगुळीत होऊन पलिकडे काम करेनासा व्हायचा. कधीकधी मेंदू हँग झाला की मुद्दा निकाली न काढताच त्याला आहे तसाच अर्धवट आणि येरागबाळा सोडून मेंदूला फ़ॉर्म्याट मारून, नव्याने रिफ़्रेश मारून ताजेतवाने व्हावे लागायचे.

शाळा-महाविद्यालयात मिळवलेल्या ज्ञानाची शिदोरी गाठीशी घेऊन जेव्हा मी प्रत्यक्ष शेती करायला सुरवात केली तेव्हा पहिल्या सहा महिन्यातच पुस्तकीय ज्ञानातील विरोधाभास उघड व्हायला लागला. प्रत्यक्ष शेतीतील अनुभव, प्रत्यक्ष ग्रामीण जीवन, पुस्तकीय ज्ञानातील पांडित्य व बोलघेवड्या पगारी तज्ज्ञांचे सल्ले हे दुरान्वयानेही आपसात एकमेकांच्या नातेसंबंधात लागत नाही, याची प्रचिती यायला लागली. शेती, शेतीतील गरीबी, गावाची दुर्दशा याची कारणे शोधतांना जी कारणे आढळली ती पुस्तकांशी, पुस्तकी पंडीतांच्या निष्कर्षाच्या आणि शिकवणीच्या थेट उलटी दिसत होती. डोहाकडे जाणार्‍याला वाचवण्यासाठी उदात्त हेतूचा देखावा करून सुचवले जाणारे मार्ग त्याला आणखी त्वरेने डोहाकडे नेणारे आणि कुठल्याही स्थितीत तो बुडलाच पाहिजे, अशी बेमालूमपणे पण प्रभावी व्यवस्था करणारेच आहेत, हे ज्या क्षणी लक्षात आले आणि खात्री पटली त्या क्षणीच प्रचलित पुस्तकी पंडीत, पारंपारिक ज्ञानाचे महामेरू आणि पगारी तज्ज्ञ यांच्यावरचा माझा विश्वास भुर्रकन उडून अवकाशात निघून गेला तो आजतागायतही परत आलेला नाही.

मात नव्हे मैत्री

                  निसर्गावर मात करण्याच्या वल्गना हा आणखी एक असाच आगाऊपणा. एकंदरीत निसर्गाची प्रकृती एकजिनशी आणि वैश्विक आहे. विश्वाच्या एका भौगोलिक प्रदेशात घडलेल्या बदलाचा प्रभाव विश्वाच्या दुसर्‍या भौगोलिक प्रदेशात जाणवत असतो. वैश्विक रचना समग्र ब्रह्मांड रचनेशी संलग्नीत आहे, इतके जाणायला मनुष्य खगोलशास्त्रज्ञ किंवा ज्योतिषशात्रीच असला पाहिजे, हेही आवश्यक नाही. ब्रह्मांडाची परिमिती कुणालाच मोजता आली नाही आणि मोजता येणे शक्यही दिसत नाही. आकाशगंगेतील अंतर मोजण्यासाठी प्रकाशवर्ष हे परिणाम सुद्धा अत्यंत थिटे आहे. आकाशगंगेचे नुसते अंतर मोजण्याचीही कुवत नसलेल्या मनुष्यप्राण्याने थेट मात करण्याच्या गोष्टी करणे अत्यंत हास्यास्पद आहे. एकंदरित निसर्गाची आणि निसर्गावर प्रभाव टाकणार्‍या घटकांशी व्याप्ती लक्षात घेतली तर विभागवार किंवा प्रदेशवार निसर्गाच्या प्रकृतीवर नियंत्रण आणता येणे आपल्या आवाक्यात नाही. तंत्रज्ञानाने कितीही झेप घेतली तरी निसर्गाच्या प्रकृतीवर नियंत्रण आणणे कधीही शक्य होणार नाही, याचे भान विसरून चालणार नाही. सतरा वर्षे शाळा-महाविद्यालयात घालवली आणि जोडीला शे-पाचशे पुस्तके वाचल्याने ज्ञानग्रहनक्षमतेच्या कक्षा तेवढ्या रुंदावत जातात, निसर्गावर मात करण्याचे सामर्थ्य प्राप्त होत नाही याचे भान राखायलाच हवे.

हजारो वर्षापासून शेतकरी शेती करत आला पण त्याने निसर्गावर मात करण्याची भाषा कधीच केली नाही. त्याने निसर्गाशी जुळवून घेतले, निसर्गाशी मैत्री केली. निसर्गाला बदलायला भाग पाडणे मनुष्य प्राण्याच्या आवाक्यात नाही, याची जाणीव असण्याइतपत व्यावहारिक ज्ञान त्याचाकडे असल्याने तसा प्रयत्न त्याने कधीच केला नाही. याउलट तो स्वत: बदलला. निसर्ग कसा असतो, हे त्याने समजून घेतले एवढेच नव्हे तर त्याने स्वत:ला निसर्गानुरूप बदलवून घेतले. त्याने नैसर्गिक प्रकृतीला स्वत:च्या प्रकृतीत विलिन करून घेतले. रान केव्हा नांगरायचे, उदिमाला सुरुवात केव्हा करायची, पेरणी केव्हा करायची याचे वेळापत्रक त्याने निसर्गाला अनुसरून तयार केले. पेरणी केली अन पाऊस आला नाही किंवा अति पाऊस होऊन दुबारपेरणीची वेळ आली तर कधी कुरबूर केली नाही, आदळआपट केली नाही आणि निसर्गाला कधी दोष तर दिलाच नाही. पुन्हा नव्याने तयारी केली आणि दुबार पेरणी केली. कधी ओला दुष्काळ पडला, कधी कोरडा दुष्काळ पडला, कधी एका पावसाच्या कमतरतेने पीक करपून गेले, कधी अति पावसाने अथवा महापूराने शेत पिकासहित खरडून गेले, कधी वादळाने तर कधी गारपिटीने पीक धाराशायी केले पण शेतकरी अश्रू ढाळत बसला नाही आणि निसर्गाच्या नावाने शिमगा करत डांगोराही कधीच पिटला नाही. त्याने निसर्गाला मित्रासारखीच वागणूक दिली आणि निसर्गाला त्याच्या विविधतेसह आनंदाने स्विकारले. पावसाने उघडीप दिली किंवा खंडवृष्टीची स्थिती निर्माण झाली तेव्हा शेतकर्‍याने निसर्गाला बोल लावला नाही तर त्याची आराधना केली. कधी कमरेला बेडूक बांधून वरुणदेवतेला प्रसन्न करायचा प्रयत्न केला, कधी सर्व गावकर्‍यांनी एकत्र येऊन मारोतीच्या पाळावर अभिषेक केला तर कधीकधी सामुहिक सदावर्त करून देवासमोर नैवद्य ठेवला आणि गावातील सर्व गोरगरीब गावकर्यांना यथेच्छ जेवनाचा पाहूणचार दिला. शेतकर्‍याने पेरणीसाठी मातीचा, पीक जगवण्यासाठी पाण्याचा, कचराकाडी जाळण्यासाठी अग्नीचा, धान्य उफ़णण्यासाठी वायुचा, उदीमासाठी वृक्षाचा खुबीने वापर केला आणि निसर्गदत्त संसाधनाचा पुरेपूर कौशल्यानिशी वापर करत व निसर्गाशी सलोखा राखत आपली शेती फ़ुलवत ठेवली. इतिहासाच्या कोणत्याच कालखंडात शेतकर्याने निसर्गाला शत्रू मानून त्याच्यावर मात करण्याची भाषा वापरल्याच्या यत्किंचितही पाऊलखुणा आढळत नाही.

कुटनितीचा खेळ

              मग निसर्गावर मात करण्याची आणि शेतीतील अठराविश्व दारिद्र्याशी निसर्गाच्या लहरीपणाशी सांगड घालून निसर्गालाच जबाबदार धरण्याची भाषा आली कुठून? या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे. उत्तर जटील नसले तरी कुटील नक्कीच आहे. शेतकर्‍यांच्या मर्जीनुसार आणि पिकांच्या गरजेनुसार पाऊस कोणत्याच युगात पडल्याची शक्यता नाही आणि यानंतर पुढे येणार्‍या युगातही पडणार नाही, हे शेतकर्‍याला निसर्गत: मान्य असल्याने तो त्याच्या गरिबीला निसर्गाला जबाबदार धरत नसला तरी अन्य कोण जबाबदार असेल याचीही कल्पना त्याला नाही आणि नेमकी इथेच शेतकरी समाजाची गोची झाली. शेतीत दारिद्र्य आहे हे खरे आहे पण ते कशामुळे आहे, याचे नेमकेपणाने उत्तर शेतकरी समाजाला माहित नसल्याने त्यांचा “नरोवा कुंजरोवा” झाला.

शेतकरी समाजातील याच संभ्रमाचा फ़ायदा अनुत्पादक वर्गाने नेमकेपणाने उचलला. डाकूंचे, चोरांचे किंवा भामट्यांचे बरे होते. कुठलेही तत्वज्ञान न सांगता किंवा कारणमिमांसा न करताच बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करत ते शेतमाल फ़ुकटातच लुटून न्यायचे. मात्र ऐतखाऊ, अनुत्पादक व बिगरशेतकरी वर्ग यांच्याकडे बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करण्याची क्षमता नसल्याने म्हणा किंवा त्यांना समाजात सामाजिक प्रतिष्ठा असल्याने म्हणा, त्यांना अशा राजरोसपणे लुटीच्या मार्गाने जाणे शक्यच नव्हते आणि म्हणून शेतीमध्ये उत्पादित होणारा माल फ़ुकटात मिळणेही अशक्यच होते. मग या सर्वांनी मिळून कुटनितीचा डाव खेळणे सुरू केले. जेव्हा जेव्हा थेट दोन हात करणे अशक्य असते तेव्हा तेव्हा समोरच्या बाजुला परास्त करण्यासाठी कुटनितीचा अवलंब करण्याला बहुतांश शास्त्रांची मान्यता असल्याने शेतमालाच्या लुटीसाठी या मार्गाचा अवलंब करणे सर्वांनाच सोईचे वाटले असावे. शेतमाल कमीत कमी दरात उपलब्ध होत राहण्यासाठी शेतकर्‍यांना त्यांच्या गरिबीचे खरे कारण कळू न देता त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने दिशाभूल करत राहणे सर्वांना फ़ायदेशीर ठरले असावे. शेतकरी आळशी, कामचोर, उधळ्या, अज्ञानी आहे, परंपरागत पद्धतीने शेती करणारा, नव्या तंत्रज्ञानाचा वापर न करणारा आहे त्यामुळे तो गरीब आहे किंवा शेतीच्या दुर्दशेला निसर्गाचा लहरीपणा कारणीभूत आहे, अशा सामुहिक जनमानस तयार करणार्‍या संकल्पनांचा वापर शेतीमालाला मिळणार्‍या अत्यल्प भावाच्या मुद्याला बगल देण्यासाठी कुटनितीक शैलीने पद्धतशीरपणे करण्यात आला असावा, हे उघड आहे.

ग्राहकांची मानसिकता

            कोणत्याही व्यक्ती अथवा सामुहिक कुटुंबाचा जमा आणि खर्चाचा ताळेबंद जुळत नाही तेव्हा त्या कुटुंबाचा अर्थसंकल्प तोट्याचा तयार होतो. अर्थाच्या अनुलब्धतेमुळे साधनांच्या खरेदीवर एकतर मर्यादा येतात किंवा खरेदी अशक्य होते. घरात साधनांची त्यातल्या जिवनावश्यक गरजेच्या वस्तुंच्या खरेदीसाठी अथवा जिवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारी क्रयशक्ती संपली की घरात जे चित्र तयार होते त्यालाच आपण दारिद्र्य म्हणत असतो. देशाचा, राज्याचा, कार्पोरेट क्षेत्राचा, सामाजिक क्षेत्राचा अर्थसंकल्प मांडण्याची व तर्‍हेतर्‍हेचे उपाय सुचवण्याची पात्रता असलेले लक्षावधी पगारी अर्थतज्ज्ञ या देशात मुबलक मिळून जातात. अर्थसंकल्पात तृटी दर्शविणारे व त्याचे लेखापरिक्षण करणे ऑडिटर सुद्धा लक्षावधी संख्येने मिळून जातात पण शेतीत गरिबी आहे कारण शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून निघेल एवढेही भाव मिळत नसल्याने शेतीचा अर्थसंकल्प तोट्यात जातो, असे ठासून सांगणारे अर्थतज्ज्ञ किंवा सी. ए मात्र दुर्मीळ असणे वरील कुटनितीचा परिणाम आणि पुरावा आहे.
             गणीताच्या भाषेत ०.५ च्या वरील सर्व किंमती १ च्या बरोबर तर ०.५ च्या आतील सर्व किंमती शुन्याच्या बरोबरीच्याच असतात. आज आपल्या देशात बहुतांश शेतमालाला एकूण उत्पादनखर्चाच्या निम्म्यापेक्षाही कमीच भाव दिले जातात. म्हणजे शून्य किंमतीत म्हणजेच फ़ुकटाच्या बरोबरीनेच शेतमाल हडपला जातो, हे गणीतीय सत्य सर्वांनीच स्विकारायला हवे. शेतीतील गरिबी संपवण्यासाठी शेतमालाचे उत्पादन खर्च भरून निघतील एवढे भाव मिळण्याखेरीज अन्य कुठलाही मार्गच अस्तित्वात नसल्याने शेतमाल स्वस्तात मिळाला पाहिजे, अशी मानसिकता आता ग्राहकांनीही बदलणे, काळाची गरज आहे.

– गंगाधर मुटे

(’जनशांती’नाशीक, दिवाळी अंकात प्रकाशित लेख)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

“शेतीतज्ज्ञां”नो, थोडीतरी लाज बाळगा!

“शेतीतज्ज्ञां”नो, थोडीतरी लाज बाळगा!

शेतकरी नेते मा. शरद जोशींचा उदय होण्यापूर्वी म्हणजे १९८० पूर्वी शेतकर्‍यांची संघटनाच अस्तित्वात नव्हती. “कुत्र्याची शेपटी सरळ होईल पण शेतकर्‍यांची संघटना होणार नाही” असे त्या काळी म्हटले जायचे. पण शरद जोशी नावाच्या एका ज्ञानेश्वराने शेतकर्‍यांच्या पाठीवर हात ठेवला आणि चमत्कार झाला. हजारो वर्षापासूनचा मुका असलेला शेतकरी समाज ज्ञानेश्वराच्या रेड्याप्रमाणे बोलायला लागला. नुसताच बोलायला लागला नाही तर साध्या पोलिसाला भिणारा शेतकरी चक्क मूठ आवळून रस्त्यावर उतरला. सरकारशी दोन हात करायला सज्ज झाला. शेतकरी संघटनेने शेतकर्‍याला त्याच्या गरिबीचे आणि दारिद्र्याचे मूळ कारण सांगितले. शेतीत गरिबी आहे याचे कारण शेतीतला माल स्वस्तात स्वस्त भावाने लुटून नेला जातो, हेही शिकविले.

जोपर्यंत शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळत नाही तोपर्यंत शेती व्यवसायाला बरकत येऊच शकत नाही. मग तुम्ही निसर्ग शेती करा, सेंद्रिय शेती करा,  कमी खर्चाची शेती करा, जास्त खर्चाची शेती करा, पारंपरिक शेती करा किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करा. शेती कशीही करा; जोपर्यंत शासनाचे शेतकरीविरोधी धोरण बदलत नाही तो पर्यंत शेतकर्‍याचे मरण अटळ आहे. कोरडवाहू शेती केली तर बिनपाण्याने हजामत होते आणि ओलिताची शेती केली तर पाणी लावून हजामत होते, या पलीकडे फारसा काहीही फरक पडत नाही.

शेतीमालाचा उत्पादन खर्च भरून निघेल एवढे भाव मिळायला पाहिजे, हे सर्वांनाच मान्य आहे. तसे कोणीच नाकारतही नाही पण; कृती मात्र हमखास उलटी करतात. कुणी अज्ञानापोटी करतो तर कुणी जाणूनबुजून करतो. कुणी स्वत:ला शेतीतज्ज्ञ म्हणवून घेत असले तरी शेतीच्या अर्थशास्त्राच्या बाबतीत बहुतांशी तज्ज्ञ निव्वळ अज्ञानीच असतात, असे थेट विधान केले तरी ते फारसे चुकीचे ठरणार नाही.

शिवाय या स्वनामधन्य शेतीतज्ज्ञामध्ये आपसात एकजिनसीपणा नाही. प्रत्येकाचे तोंड वेगळ्या दिशेला आहे. उठसूठ ज्याला जसे वाटते तसे सांगत सुटतो. कुणालाच खोलवर जाऊन विषयाचा पडताळा घ्यावासा वाटत नाही.  कुणी म्हणतो निसर्गशेती करा, कुणी म्हणतो झिरो बजेट शेती करा, कुणी म्हणतो मार्केटिंग करायला शिका तर कुणी म्हणतो प्रक्रिया उद्योग उभारा. आता तर काही लोकं मानवी मूत्र वापरायचा सल्ला द्यायला लागलेत. ज्याला जसे वाटते तसेतसे बोलत राहतात. बोलायला माझी हरकत नाही. तोंड त्यांचे आहे व जीभही त्यांचीच आहे पण शेतमालाचे भाव म्हटलं तर यांची दातखिळी का बसते? हा प्रश्न शिल्लक राहतोच आणि इथेच खरी ग्यानबाची मेख आहे.

निसर्गशेती म्हणजे काय? आमचे बाप-आजे निसर्गशेतीच तर करत होते. रासायनिक खते वापरत नव्हते, कीटकनाशके फवारत नव्हते, संकरित बियाणे लावत नव्हते आणि घरी संडास नसल्याने संडासला शेतातच जात होते आणि तरीही देशाची लोकसंख्या कमी असूनही जनतेला जाऊ द्या; त्या शेतकर्‍यालाच पोटभर खायला अन्न मिळत नव्हते. धान्याच्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या, ओलिताची व्यवस्था निर्माण झाली, फ़वारणीसाठी किडीनुरूप कीटकनाशके निर्माण झाली आणि चमत्कार झाला. अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण झाला. अन्नधान्याचे उत्पादन वाढण्यामागे रासायनिक खतांनी मोलाची भूमिका बजावली. आजही जर रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर थांबवला तर देशाचे शेतीतील उत्पादन ७० ते ८० टक्क्यांनी घटेल, अशी परिस्थिती आहे.  निसर्गशेतीचा सल्ला देणार्‍यांनो, मुंह खोलनेसे पहले कुछ तो शर्म करो!

झिरो बजेटशेती हा शब्द ऐकला की मला ओकार्‍या व्हायला लागतात. झिरो बजेट शेती हा शब्द मला काही केल्या पचवून घेताच आला नाही. शून्य खर्चाची शेती करायची म्हणजे नेमके काय करायचे? शेतीला बियाणे लागले ते चोरून आणायचे का? गोड गोड बोलून खतं उधारीत आणायची मग त्याचे पैसे बुडवायचे का? खर्च शून्य करायचा म्हटलं तर शेतकर्‍यांनी वस्त्र परिधान करणे सोडून झाडाच्या वल्कली अंगाभवती गुंडाळाव्यात का? मजुरांकडून फुकटात काम करून घ्यायचे म्हटले तर मग या देशात वेठबिगारी व गुलामगिरीची पद्धत नव्याने सुरुवात करायची का? कसली आली बोडक्याची शून्य खर्चाची शेती?

अनेकदा शेतकर्‍यांनी मार्केटिंग करायला शिकावे, असा सल्ला घाऊकपणे दिला जातो. आता या उपटसुंभांना कोणी सांगावे की, कोणत्याही व्यवसायाचे उत्पादन आणि विपणन हे दोन स्वतंत्र भाग असतात. शेतीमध्ये सुद्धा जो शेती कसून उत्पादन करतो तोच शेतकरी असतो. शेती उत्पादन हा पूर्णपणे पूर्णवेळ करायचा व्यवसाय आहे. शेती करताना वेळेची इतकी बचत होत नाही की त्याने जोडीला मार्केटिंगसदृश अन्य व्यवसाय करावा. आजवर अनेकांनी असे चिक्कार प्रयोग केले आहे पण “तेलही गेले, तूपही गेले; हाती धुपाटणे आले” अशीच त्यांची गत झाली, असे इतिहासच सांगतो. याउलट जो शेती सोडून केवळ मार्केटिंगमध्ये गेला त्याने चांगल्यापैकी बस्तान बसवले, असेही इतिहासच सांगतो. जो शेतकरी नोकरी, पुढारीपणा किंवा व्यापार करायला लागतो तो अल्पावधीतच नोकरदार, पुढारी किंवा व्यापारी होतो; शेतकरी म्हणून त्याचे अस्तित्व संपुष्टात येते. सातबारा नावाने असला तर त्याला शेतमालक म्हणता येईल, शेतकरी म्हणता येत नाही. अर्थात शेतकरी फक्त तोच जो शेती कसून उत्पादनाचा विभाग हाताळतो. एका वाक्यात असेही म्हणता येईल की “ज्याची उपजीविका फक्त आणि फक्त शेती उत्पादनावर अवलंबून असते, तोच खराखुरा शेतकरी” भलेही मग सातबारा त्याच्या नावाने असो किंवा नसो. तो भूधारक असो किंवा भूमिहीन असो! आपण जेव्हा शेतकरी असा शब्द वापरतो तेव्हा शेती कसून उत्पादन करणार्‍याविषयी बोलत असतो; व्यापारी, उद्योजक, दलाल यांच्या विषयी बोलत नसतो. शेती कसणे सोडून सार्‍यांनीच व्यापार सुरू करणे अशी कल्पनाच करणे शक्य नाही. इतके साधे गृहितक आमच्या शेतीतज्ज्ञांना कळत नाही, ही अद्भूतआश्चर्याच्या तोडीची बाब आहे.

तरीही शेतकामातून अतिरिक्त वेळ मिळाला तर किरकोळ मार्केटिंग करणे, शेतकर्‍याला वावगे नाही. अनादिकाळापासून शेतकरी शक्य होईल तसे किरकोळ मार्केटिंग करतच आला आहे. पूर्वी दहा-वीस गावाच्या परिघात एका मुख्य गावी गुजरी भरायची. आठवडी बाजार भरायचा. तिथे शेतकरी आपला शेतमाल स्वत: दुकान मांडून विकायचे. ही शेतमालाची मार्केटिंगच होती ना? आपल्या जवळचा शेतमाल विकून येणार्‍या पैशात अन्य गरजेच्या वस्तू खरेदी करणे, शेतकर्‍यांच्या अंगवळणीच पडले आहे. अगदी पौराणिक काळातला जरी विचार केला तरी गौळणी मथुरेच्या बाजारी दही-दूध-लोणी विकायला घेऊन जायच्याच ना? कुठे मध्यस्थ होता? कुठे दलाल होता? मग मार्केटिंग म्हणजे यापेक्षा वेगळं काय असते? आणि तरीही बरेचशे उपटसुंभ तज्ज्ञ शेतकर्‍यांना जणू काही फार मोलाचा आणि क्रांतीकारी मूलमंत्र सांगतो आहोत, अशा थाटामाटात मार्केटिंगसारखा बोजड शब्द वापरून शेतकर्‍याला सल्ले द्यायला उतावीळ असतात.

पूर्वी गावागावात बाराबलुतेदारांचे व्यवसाय चालायचे, गावागावात तेलघाण्या होत्या. गुळाची गुर्‍हाळं होती, हातमाग होते, कवेलू बनविण्याच्या भट्ट्या होत्या, कुंभारांचा कुंभारवाडा होता. तेलबियांपासून तेल, तूर-चण्यापासून डाळ, धानापासून तांदूळ, ज्वारी-बाजरी-गव्हापासून पीठ गावातच तयार होत होते. ही तेव्हाची शेतमाल प्रक्रियाच होती ना? आता शासकीय धोरणांच्या कृपेने गावात पिठाची चक्की हा एकमेव कुटीरोद्योग उरला आहे. बाकी सारंच शहरात-महानगरात पळालं आहे. हा बदल आपोआप घडलेला नाही. याला शासनाची इंडियाला पूरक आणि भारताला मारक शेतकरीविरोधी धोरणेच जबाबदार आहेत.  इस्रायली शेती, शेतकरी व त्यांचं तंत्रज्ञान या विषयी बोलणारे चिक्कार आहेत. रस्त्याने चालायला लागलं की जागोजागी ठेचा लागतात इतके मार्गदर्शक गल्लोगल्ली झाले आहेत पण; इस्रायली सरकारच्या शेतीविषयक धोरणाविषयी कुणीच “माईचा लाल” बोलायला तयार नाही. शेतीविषयात भरारी घेण्यात इस्रायली सरकारच्या शेतीविषयक धोरणांचा सिंहाचा वाटा आहे. तिथले शेतीधोरण शेतीला पूरक आहेत भारतासारखे मारक नाहीत, हे मात्र जाणीवपूर्वक मांजरीच्या शेणासारखे या तज्ज्ञाकरवी झाकून ठेवले जाते.

स्वातंत्र्योत्तर काळात शहरातील औद्योगिकीकरण वाढवण्यासाठी शेतमाल स्वस्तात लुटून नेणारी धोरणे राबविली गेली त्यामुळे गावात बचत निर्माण होणे थांबले आणि खेडी भकास होत गेली. शेतमाल स्वस्तात मिळाल्याने आणि पक्का माल महाग विकण्याची मुभा मिळाल्याने शहरात-महानगरात बचत निर्माण झाली. बचत निर्माण झाली म्हणून शहरात कारखानदारी वाढली आणि शहरे फुगत गेली. जेथे बचत निर्माण होत नाही तेथे प्रक्रिया उद्योग उभे राहू शकत नाही. गाव ओसाड झाले आणि गावात प्रक्रियाउद्योग निर्माण होत नाही याचे कारण येथे दडले आहे. आमचे शेतकी तज्ज्ञ वैचारिक पातळीवर खुजे असल्याने त्यांना हे कळत नाही. त्यामुळे ते शेतकर्‍यांना दोष देत फ़िरत असतात. शासकीय योजनांचा लाभ शेतकर्‍यांना घेता येत नाही असा “वड्याचे तेल वांग्यावर काढणारा” राग आळवत बसतात. धोरणे आखताना चक्क शेतकरी विरोधी आखायची आणि वरून पुन्हा शेतकर्‍यांनी प्रक्रिया उद्योग उभारले पाहिजेत असे सल्ले देत फिरायचे हा चक्क वाह्यातपणा आहे.

मी निसर्गशेती, कमी खर्चाची शेती, पारंपरिक शेती, सेंद्रीयशेती वगैरे कोणत्याही शेतीपद्धतीच्या विरोधात अजिबात नाही, याउलट शेतकर्‍यांसमोर शेती पद्धतीचे अनेक पर्याय उपलब्ध असले पाहिजे, या मताचा आहे. शेतकर्‍याला जे सोयीचे वाटेल, त्याच्या खिशाला परवडणारे असेल तसे तो स्वीकारेल. हा त्याच्या व्यवसाय स्वातंत्र्याचा भाग म्हणून मान्य केले पाहिजे. पण होते असे काही मंडळी स्वत:ला ब्रम्हदेवाचा अवतार समजून किंवा ऋषी-महाऋषी भासवून आम्ही सांगतो तसे केले तर तुझ्या शेतीत करोडो रुपयाचे उत्पन्न येईल आणि तू मालामाल होशील, अशी बतावणी करून फीच्या माध्यमातून पुन्हा शेतकर्‍यांची लूटच करून जातात. शेतकरी देशोधडीला लागतो आणि यांची दुकानदारी मात्र “दिवसा दुप्पट आणि रात्रीची तिप्पट” या वेगाने बहरत जाते. त्यालाही माझा आक्षेप नाही मात्र शेतमाल लुटीच्या व्यवस्थेबद्दल ही मंडळी तोंडामध्ये चक्क बोळे कोंबून असतात, यावर माझा आक्षेप आहे.

पगारी शेतीतज्ज्ञांचे तर बरे असते. काही वर्ष रासायनिक खतांचा वापर करा म्हणून सांगत सुटतात, त्याचाही ते पगार घेतात. मग रासायनिक खतांचा वापर टाळा म्हणून सांगत सुटतात. त्याचाही पगार घेतात. यातच त्यांच्या नोकरीचे आयुष्य निघून जाते. पण पुन्हा मरेपर्यंत पेन्शन आहेच. कर्तृत्व काय तर एकदा ’करा’ म्हणून सांगीतले आणि एकदा ’टाळा’ म्हणून सांगितले. मला असे वाटते की शेतकर्‍यांना आता सल्ले वगैरे देण्याची अजिबात गरज उरलेली नाही. शेतमालाच्या भावाचा मुद्दा बाजूला ठेवून अन्य उपचार करण्याची तर अजिबातच आवश्यकता नाही. जर तुम्हाला शेतीच्या भल्यासाठी प्रयत्न करतो आहोत, असा आव आणायचा असेल तर निदान शेतमालाच्या भावाचा प्रश्न निकाली निघेपर्यंततरी सर्वांनी मिळून आपले लक्ष्य शेतमालाच्या भावाच्या प्रश्नावरच केंद्रित केले पाहिजे.

मी एक उदाहरण सांगतो. ४  वर्षापूर्वी माझा एक जवळचा नातेवाईक आजारी पडला होता. आजार तसा साधा होता. पण त्याला सतत ताप यायचा. ताप आला की १०५ डिग्री सेल्सियसच्याही पुढे जायचा. ताप चढला की पॅरसिटॉमालसहित कुठल्याही औषधाने उतरतच नव्हता. फक्त गार पाण्याच्या कापडीबोळ्याने अंग पुसून काढले की ताप उतरायचा पण तोही तात्पुरताच. काही मिनिटातच पुन्हा चढायचा. सर्व उपचार केलेत पण यश येत नव्हते. १५ दिवस लोटले पण काहीच सुधारणा होत नव्हती. हिंगणघाटचे डॉक्टर झाले, वर्ध्याचे शासकीय रुग्णालय झाले, सेवाग्राम इस्पितळात उपचार करून झाले पण ताप उतरायचे नावच घेईना उलट आजार आणखी गंभीर होत गेला. शेवटी पेशंट घेऊन आम्ही नागपूरला एक्स्पर्ट डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने तपासल्यानंतर आजवर केलेल्या औषधोपराची माहिती घेतली आणि म्हणाले की जितका औषधोपचार करायला तेवढा करून झाला आहे. आता मी आणखी कुठले औषध देऊ? काहीही द्यायचं बाकी राहिलेलं नाही. हे ऐकून आम्ही अक्षरश: हादरलोच. मग थोडा विचार करून डॉक्टर म्हणाले की आता एकच मार्ग शिल्लक आहे. आम्ही म्हणालो, काय खर्च येईल तो येऊ द्या साहेब चिंता करू नका पण उपचार कराच. त्यावर डॉक्टर म्हणाले की आता एकच मार्ग शिल्लक आहे आणि तो म्हणजे “उपचारच न करणे.” पुढील ७२ तास रुग्णाला अजिबात औषधच द्यायचे नाही. मला खात्री आहे की पेशंटवर तोच एकमेव उपचार आहे. आम्ही होकार दिला. औषधोपचार बंद केल्याने कदाचित जर काही अघटित घडले तरी आम्ही डॉक्टरला दोष देणार नाही, असेही लेखी स्वरूपात लिहून दिले.

रुग्णाला औषध देणे बंद केले आणि पाच-सहा तासातच ताप उतरायला लागला. १५ दिवसापासून न उतरलेला ताप सातव्या तासाला ताप पूर्णपणे उतरला. पुन्हा फिरून ताप आलाच नाही. रुग्ण पूर्णपणे बरा झाला तो सुद्धा औषधी देणे थांबवल्याने. शेतीचेही तर असेच होत नाही ना? गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. शेती नावाचा पेशंट एकच आहे आणि त्यावर औषधोपचार करणारे तज्ज्ञ आहेत लक्षावधी. संपूर्ण भारतवर्षात शेतीचे मुख्य दुखणे एकच आहे आणि तेही सार्वत्रिक समान आहे मात्र सुचविण्यात येणारे इलाज नाना तर्‍हेचे आहेत. जो येतो तो शेतकर्‍याला वाटेल तसा डोज पाजूनच जातो. शेतीची मुख्य बिमारी एकच; शेतमालास योग्य भाव न मिळणे. पण इलाज मात्र भलतेच चालले. कदाचित नको त्या उपचारानेच तर शेती व्यवसाय आणखी दुर्दशेकडे ढकलला जात नाही ना? याचाही प्रामुख्याने विचार करायची वेळ आली आहे.

शेतकरी हा मुळातच उत्पादक आहे. उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करणे त्याच्या रक्तामांसातच भिनले आहे. सोबत पिढोनपिढ्यांकडून चालत आलेला वारसा आहे आणि बालपणापासूनच शेती कशी करायची याचा त्याला अनुभव आहे. तरीही त्याला पावलोपावली सल्ले देण्याची आवश्यकता आहे का, हेही तपासणे आवश्यक आहे. बीटी आली तेव्हा संशोधकांचे म्हणणे असे होते की, देशभरात बीटी वाण लागवडीखाली यायला वीस-पंचेविस वर्षे लागतील. प्रत्यक्षात दोन ते तीन वर्षातच देशभर बीटीवाणाचा प्रसार झाला. त्यासाठी शासकीय पातळीवरून काहीच प्रयत्न करायची गरज पडली नाही. चांगलं असेल ते ते अंगिकारण्याची क्षमता शेतकर्‍यांना निसर्गानेच दिलेली आहे.

उत्पादन कसे घ्यावे, हे शेतकर्‍यांना सांगायची गरजच नाही. फक्त शेतमालाचे भाव ठरवणे त्याच्या हातात नाही म्हणून शेती तोट्यात जात आहे. शेतीत सुबत्ता येऊन बचत निर्माण करायची असेल तर सर्व शेतकरी हितचिंतकांनी “शेतमालास उत्पादन खर्चावर रास्त भाव” मिळण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत वारंवार शासकीय पातळीवरून जो अडथळा निर्माण करण्यात येतो त्याला थोपवून धरणे गरजेचे आहे. शेतीसाठी अनुकूल आणि पूरक धोरणे जर सरकार राबवू शकत नसेल तर शेतीमध्ये निष्कारण होणारी शासकीय लुडबुड थांबविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

                                                                                                                           – गंगाधर मुटे

——————————————————————————————————————

दि.३१/०५/२०१५ च्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रकाशित माझा लेख

 

‘लुच्चे दिन’ आले : नागपुरी तडका

‘लुच्चे दिन’ आले : नागपुरी तडका

सच्चे दिन’ म्हणता म्हणता ‘लुच्चे दिन’ आले
अन शेतमालाचे भाव तमाम लंबेलाट झाले ….॥

म्हण काही श्यामराव, पण सत्य एकच हाय
शेतकर्‍यांच्या नात्यामंधी कोणताच पक्ष नाय
सत्तेमधी गेल्याबरोबर माजावरती येते
पण शेतकर्‍यांच्या नावाचं कुंकू पुसून घेते
मतं मागासाठी सारे सोंगी-ढोंगी झाले ….॥

ओला पडो, सुका पडो, सारं थ्येच असते
पंजा येवो, फ़ूल येवो, कोणी आपलं नसते
यंदाच्या बाजारात पुरी मंदी आली
शेतकर्‍यांना स्मशानात थेट घेऊन गेली
कुणास पडलं सुतूक, जरी बदाबदा मेले? ….॥

दुष्काळाच्या वार्‍यापायी शेंगा नाही झोंबल्या
ज्या काही झोंबल्या त्या भावापायी लोंबल्या
चाळीस रुपये किलोवर कापूस रांगत नाही
सोयाबिनच्या इज्जतीले व्यापार हुंगत नाही
काय करू काय नाही, समजत नाही मले ….॥

कास्तकाराचे हाल भाऊ, कुत्रे पुसत नाही
काय पेरावं यंदा, काही मार्ग सुचत नाही
ना सुलतानाची हमी, ना कायदोबाचे ’अभय’
म्हणत असतो तरी आम्ही, “भारतमाता की जय”
आमच्यात एकी नाई म्हून, इथं डाकू पैदा झाले ….॥

– गंगाधर मुटे ‘अभय’
——————————————————

वाङ्मयशेतीचा वर्धापन दिन

वाङ्मयशेतीचा वर्धापन दिन

नमस्कार मित्रहो,

        आज माझ्या “वाङ्मयशेतीचा” ४ था वर्धापनदिन. मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, सकाळी ८.२९ वाजता http://www.baliraja.com आणि http://www.gangadharmute.com संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला.
      मायबाप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे माझी वांगंमय शेती तोट्यात गेली असली तरी मायबाप इंटरनेट आणि रसिकांच्या कृपेने माझ्या वाङ्मयशेतीला मात्र चांगले भाव मिळत आहेत, हे या दोन्ही संकेतस्थळावरील वाचक/वाचनांच्या संख्येवरून निर्विवाद सिद्ध व्हायला लागलेलं आहे.

पिढ्यान्-पिढ्यापासून शेतकर्‍यापर्यंत जो-जो आला तो-तो शेतकर्‍याला सल्ला द्यायला किंवा अक्कल शिकवायलाच आला. एका दाण्यातून हजार दाणे निर्माण करणार्‍याला शुद्र व बेअक्कल गाढव समजून त्याला कोणी बोलुच दिले नाही, त्याचे ऐकण्याची तर गोष्टच दूर…! सर्व मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे शेतीच्या शोषणाची समर्थकच असल्याने त्याला प्रसारमाध्यमात स्थान मिळाले, तेही नगण्यच. पण आता इंटरनेट शेतकर्‍यांचा मदतीला आलंय. या माध्यामाने सर्वांना एक जागतिक दर्जाचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय.

नोव्हेंबर २००९ मध्ये मी अकस्मात आंतरजालावर आलो. एका सार्वजनिक संकेतस्थळावर १-२ लेख लिहिल्या नंतर तेथे घमासान चर्चायुद्ध झ इंटरनेटसुद्धा शेतकर्‍यांसाठी चांगले व्यासपीठ ठरू शकते, याची जाणिव झाली. एका क्लिकमध्ये आपले विचार सातासमुद्रापल्याड जगाच्या कानाकोपर्‍यात पोचू शकते, जगभरातील मराठी माणसांशी आपण संवाद साधू शकतो; या बाबींनी माझ्यावर एवढी भूरळ घातली की मी मग मागे वळून पाहिलेच नाही. माझ्या आंतरजालावरील वावराला आता उणेपुरे साडेपाच वर्ष होत आहेत.या साडेपाच वर्षात माझे शेतीविषयक लेखन २० लाखापेक्षा जास्त  वाचकापर्यंत पोचले आहे, ही फ़ार समाधानाची बाब आहे.

     मी आंतरजालावर लेखन सुरू केले तेव्हा मला स्पष्ट जाणीव होती की मी ज्यांच्यासाठी लिहिणार आहे तो आंतरजालावर उपस्थित नाही. तो आपल्या शेतात घाम गाळत शेतीकाम करण्यात गुंतलेला आहे आणि जो आंतरजालावर उपस्थित आहे तो बहुतांशी बिगरशेतकरी आहे. सातबारा नावाने असणे आणि प्रत्यक्ष शेतीवर पोट असणे या दोन वेगवेगळ्या अवस्था आहेत. दोन्ही अवस्थांचे हितसंबंध जवळजवळ परस्पर विरोधी आहेत. शहरात अथवा खेड्यात राहून शासकिय, निमशासकीय, खाजगी कंपंन्यामध्ये नोकरी करणारा अथवा व्यापार, उद्योग करणारा शेतकर्‍याचा मुलगा असला तरीही त्याला सुध्दा बिगर शेतकरी समाजासारखेच एका रुपयाला चार किलो कांदे, एका दिवसाच्या वेतनात वर्षभर कुटुंबाला पुरेल एवढे अन्नधान्य मिळाले तर हवेच असते. शेतीत पिकणारा माल स्वस्तात स्वस्त मिळवणे हा आपला निसर्गदत्त अधिकार आहे, हीच त्याचीही मनोभावना असते.
     अशा विपरित स्थितीत शेतमालाच्या रास्त भावाला मध्यवर्ती स्थानी ठेवून केलेले लेखन फ़ारसे पसंत केले जाणार नाही, याची मला खात्री  होती पण माझे लेखन पसंत केलेे जाते किंवा नाही यापेक्षा शेतकर्‍यांचे गार्‍हाणे आणि शेतीचे अर्थकारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणे जास्त महत्वाचे आहे, माझे लेखन केवळ लेखन नसून प्रबोधनयज्ञ असणार आहे, याचीही मला जाणीव असल्याने माझा वैचारिक किंवा भावनीकगोंधळ उडाला नाही. त्यामुळे माझ्या लेखनाचे समर्थन आणि टीका मला स्थितप्रज्ञपणाने स्विकारता आल्या.   या प्रवासात माझ्या gangadharmute.wordpress.com या ब्लॉगला २०१० आणि २०१२ चा सलग दोनदा स्टार/एबीपी TV चा विश्वस्तरीय “ब्लॉग माझा” पुरस्कार मिळाला.

माझा साडेपाच वर्षाचा लेखाजोखा :-

माझे संकेतस्थळ/ब्लॉग आणि कंसात वाचने/वाचकांची संख्या खालीलप्रमाणे :-

०१) http://www.baliraja.com  बळीराजा डॉट कॉम – (२,८५,७१०)

०२) http://www.gangadharmute.com   माझी वाङ्मयशेती – (२,७५,८४२)

०३) gangadharmute.wordpress.com – रानमोगरा – (८८,४००) – सलग दोनदा स्टार/एबीपी ब्लॉग माझा पुरस्कार प्राप्त.

०४) www.sharadjoshi.in – योद्धा शेतकरी – ( ७३,०२५)

०५) baliraja.wordpress.com – बळीराजा – ( ८३,३३८ )

०६) gangadharmute.blogspot.com – शेतकरी विहार – ( ३६,९४७ )

०७) gangadharmutespoem.blogspot.in – माझी कविता – (१६,६३४)

०८) marathigazal.wordpress.com – माझी मराठी गझल – ( १६,९११ )

०९) shetkari-sanghatana.blogspot.com – शेतकरी संघटना – (६,७९६)

१०) ranmewa.blogspot.in – रानमेवा – (३,५२२)

एकूण वाचन संख्या – ८,८७,०९७

खालील संकेतस्थळावरील लेखन वाचकांची एकूण संख्या उपलब्ध नाही. मात्र ती सुद्धा काही लाखाच्या घरातच असणार हे उघड आहे.

०१) www.facebook.com/gangadharmute

०२) www.youtube.com/gangadharmute

०३) www.shetkari.in

०४) sharad-anant-joshi.blogspot.in

०५) www.twitter.com/gangadharmute

०६) www.facebook.com/groups/kawita

०७) www.facebook.com/my.net.farming

०८) www.facebook.com/groups/baliraja

०९) www.maayboli.com/user/26450/created

१०) www.misalpav.com/user/8199/track

११) www.mimarathi.net/user/382/mytrack

१२) www.sureshbhat.in/user/1099/track

      एकूणच शेतीसाहित्य वाचनाबाबत असलेली वाचकांची उदासिनता आणि मुद्रित शेतीसाहित्याला दुर्मिळ असलेला नागरी वाचकवर्ग हा आजवरचा इतिहास लक्षात घेतला तर आंतरजाल हे शेतीविषयासाठी फार मोठे व्यासपीठ ठरू शकेल, याबद्दल आता माझ्यामनात तिळमात्रही शंका उरलेली नाही.

Thank you Mr Internet!

– गंगाधर मुटे
—————————————————————————————————————-

पाहून घे महात्म्या

पाहून घे महात्म्या

पाहून घे महात्म्या, इथली शिवार राने
केला भकास भारत, शोषून इंडियाने

तुमचे विचार बापू, गाडून पूर्ण केला
तुमचा बघा पराभव, तुमच्याच वारसाने

चाकू – सुऱ्या प्रमाणे, हातात पेन त्यांच्या
जितके लुटायचे ते, लुटतात कायद्याने

संपूर्ण सातबारा, कोरा करू म्हणाले
भुललेत भाड़खाऊ, दिल्लीत पोचल्याने

आसुड उगारणारा, माझा स्वभाव नाही
पण; वेळ आणली या, मग्रूर लांडग्याने

वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास झुरते
गायीस मात्र माता, म्हणतात गौरवाने

इतुकेच शोध उत्तर, मातीत राबणार्‍या
बदलेल भाग्य निव्वळ, घाम गाळल्याने?

मुर्दाड शासकांना, सोयरसुतूक नाही
हकनाक तूच मरशील, गळफास घेतल्याने

शेती कसून दाखव, तू विद्याप्रचूर तज्ज्ञा
सुटणार प्रश्न नाही, बुद्धी उगाळण्याने

लक्ष्मीस आणखी मी, सांगा किती पुजावे?
नांदूच देत नाही, ही अवदसा सुखाने!

डोक्यास ताण दे तू , अन सोड आत्मग्लानी
काही तरी ‘अभय’ कर; मुक्ती मिळेल ज्याने

– गंगाधर मुटे ‘अभय’
=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=

औंदाची शेती : रेकॉर्डब्रेक शेती

औंदाची शेती : रेकॉर्डब्रेक शेती

       अपवाद हा अपवादात्मकच असतो म्हणून त्याचे व्यावहारिक महत्वही अपवादत्मकच असले पाहिजे. अपवादानाने घडणार्‍या अपवादात्मक घटनांचा सर्वसाधारण घटनांशी संबंधसुद्धा अपवादानेच जोडला पाहिजे, अपवादात्मक घटनांचा साध्य आणि सिद्धतेशी सांगड घालण्याचा प्रयत्नही अपवादात्मकच असला पाहिजे, असा धडा मला माझ्या औंदाच्या शेतीने दिला आहे.

       होतं काय की बर्‍याचदा अपवादानेच एखाद्याला ढोबळी मिरचीचे प्रचंड उत्पादन येते. पण या अपवादाला एखादा “उंटावरचा शेतकरी” स्वत:ची यशस्विता समजून घेतो आणि रस्त्याने जो मिळेल त्याला “यशोगाथा” सांगत सुटतो. एखाद्याला एखादे वर्षी मक्यासारख्या पिकाला चांगला भाव मिळतो, तोही अपवादानेच. पण तरी सुद्धा तो शेतकरी जर “उंटावरचा” असेल तर स्वत:च्याच तोंडाने स्वत:चेच पोवाडे गात सुटतो. यावर कुणी असेही म्हणेल की “आम्हाला अपवादाने नव्हे तर बुद्धीचातुर्याने यश मिळाले आहे”. त्यावर सरळसोपे उत्तर असे की त्याने निदान सलग चार वर्षाचा त्याच्या शेतीचा बिल-पावत्यासह ताळेबंद सादर करून दाखवावा. जर चारही वर्ष समान गुणोत्तर आढळले तर मी माझी सारी लेखनगाथा आपल्या विचारधारेसह समुद्रात नेऊन विसर्जित करायला तयार आहे.

       पण आव्हान कोणी स्विकारायला तयार नसते कारण वास्तव तसे नसतेच. एखाद्या वर्षी चांगले उत्पादन येते हे खरे; परंतू अनेक वर्ष शेतीतला तोटा भरून काढताना शेतकर्‍याला त्याच्या बायकोच्या अंगावरील मंगळसूत्र विकावे लागते, हे शेतीमधले शाश्वत सत्य झाले आहे, हे कोण नाकारू शकेल? अनेक “कृषिनिष्ठ” शेतकर्‍यांना बॅंकेतून कर्ज काढल्याशिवाय स्वत:च्या बायकोला वस्त्र आणि अंतर्वस्त्र घेताच येत नाही, हे मी पुराव्यासहीत केव्हाही सिद्ध करून दाखवायला तयार आहे. तद्वतच या “यशोगाथा”वाल्यांचा मागील फ़क्त दहा वर्षाचा इतिहास तपासावा, त्याचे पोट शेतीव्यतिरिक्त अन्य व्यवसायावर अवलंबून नसेल, त्याला चोर्‍या करण्याची सवय नसेल, व्याज-बट्ट्याची गावठी सावकारी नसेल आणि फ़क्त शेती हेच जर त्याच्या उपजिविकेचे साधन राहिले असेल तर त्याचीही अवस्था यापेक्षा वेगळी आढळून येणार नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो.

       मी १९८५ साली शेती सुरू केली. तेव्हापासून नाना तर्‍हेचे प्रयोग करून झाले. उभा महाराष्ट्र पालथा घालून झाला. देशाच्या कानाकोपर्‍यातली शेती आणि शेतीची पद्धत न्याहाळून झाली. मिशीला पीळ देत मोठमोठ्या बढाया मारणार्‍या पाटलाचे माजघर पाहून झाले आणि अशा पाटलाच्या माजघरात शिरल्यावर त्याच्या गळलेल्या मिशाही पाहून झाले. विदर्भातील शेतकर्‍यांपेक्षा पश्चिम महाराष्ट्रातला द्राक्ष, उस उत्पादक शेतकरी दहापट जास्त कर्जबाजारी आहे, हेही पाहून झाले. 

        हे सांगायचे औचित्य असे की, यावर्षी सार्वत्रिक नापिकी आहे. यंदा शेतीव्यवसायात सर्वत्र हाहाकार माजला असताना व दुष्काळाने शेतीउत्पादनात प्रचंड घट आली असताना माझी औंदाची शेती मात्र याला अपवाद ठरली आहे. या मला विक्रमी उत्पादन झाले व माझ्या स्वत:च्याच शेतीतील उत्पादनाचे ३० वर्षाचे रेकॉर्ड मोडले गेले आहेत. पण मागील वर्षी कमी उत्पादन होऊनही घरात जेवढा पैसा आला तेवढाही पैसा यावर्षी घरात आलेला नाही कारण तूर वगळता अन्य पिकाचे बाजारभाव मागील वर्षी पेक्षा यावर्षी कमी आहेत.

       अधिक उत्पादन घेतल्याने अधिक फ़ायदा होतो, असे फ़क्त कागदीतज्ज्ञच म्हणू शकतात. प्रत्यक्ष शेती करून शेती उत्पन्नावरच जगून पाहिल्याशिवाय किंवा दुसर्‍याच्या शेतीच्या जमाखर्चाचा गणीतीय ताळेबंद मांडल्याशिवाय कुणालाच (अगदी ब्रह्मदेवालासुद्धा) शेतीचे अर्थशास्त्र कळू शकत नाही, हे माझे मत पुन्हा एकदा अधिक ठाम झाले आहे. 

       तसा हा विषय व गणीत साधे, सोपे आणि सरळ आहे. पण शेतीविषयात हात घालू इच्छिणारांमध्ये एक अनुवंशीय खोट आलेली असते. ती खोट अशी की शेतकर्‍याला गाढव गृहीत धरणे व जेवढी अक्कल मला आहे तेवढी अक्कल शेतकर्‍याला नसते, अशी स्वत:ची ठाम समजूत करून घेणे. त्यामुळेच शेतीव्यवसायाच्या उत्थानासाठी “शेतीमालाच्या भावाला” बगल देऊन अन्य गृहितके “उंटावरच्या शहाण्यांकडून” मांडली जातात.
मला यावर्षी रेकॉर्डब्रेक उत्पादन झाले यामागे माझे नियोजन, परिश्रम, आर्थिक गुंतवणूक वगैरे बाबींचा अंतर्भाव नक्कीच आहे, याबाबत दुमत नाही; पण एवढे मी यापूर्वीही केलेले आहे, करत आलेलो आहेच. मग एवढे उत्पादन या पूर्वी का झाले नाही? याचे उत्तरही तसे फ़ार सोपे आहे. शेतीचा संबंध थेट निसर्गाशी आहे आणि निसर्ग विविधतेने नटलेला आहे. एकवर्ष दुसर्‍या वर्षासारखे कधीच नसते, पाऊसमान प्रत्येकवर्षी समान असू शकत नाही. दर चार वर्षातून एकदातरी ओला अथवा कोरडा दुष्काळ नक्कीच पडणार, चारवर्षातून एकदा तरी गारपीठाचा वर्षावही हमखास होणार. त्यामुळे शेतीमध्ये उत्पादन घेण्यासाठी खर्च सारखाच केला तरी दरवर्षी उत्पादनाचा आकडा सारखाच राहील हे कदापीही शक्य नाही. त्यामुळे शेतीमध्ये चार वर्षाच्या उत्पादनाची गोळाबेरीज करून त्याला चारने भागूनच वार्षिक उत्पादनाची सरासरी काढली गेली पाहिजे आणि हेच यावरचे एकमेव उत्तर आहे.

                शेतीत सधनता आणणे अजिबात कठीण नाही पण शेतीत सुबत्ता यावी, हीच अनेकांची आंतरिक इच्छा नसते. त्यामुळे “शेतीमालाचा भाव” हा प्रमुख मुद्दा सोडून अन्य पर्याय सुचविण्याचे व तेच अधिक ताकदीने मांडण्याचे कार्य अनेकांकडून अव्याहतपणे मांडले जाते. त्यामागे मूळ मुद्द्यावरील लक्ष दुसरीकडे वळवणे, हा छुपा डाव असतो. शेतकरी पुत्रांनी हा डाव ओळखला पाहिजे. शेतकरीविरोधी धोरणांच्या पुरस्कर्त्यांच्या सापळ्यात अलगद फ़सण्यापासून स्वत:ला वाचविले पाहिजे.

– गंगाधर मुटे

—————————————————————————————
 sheti
यंदाची सुरुवातच खतरनाक झाली. मातीत बियाणं पडलं आणि वरुणराजा दिर्घ रजेवर गेला.

*********************************
sheti

तुषार सिंचन – दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रकार

*********************************
sheti

पाऊस येईल तेव्हा येईल.. त्यासाठी पेरणी थांबवणे शक्य नसते.

*********************************
sheti

पेरते व्हा! पेरते व्हा!!

*********************************
sheti

पावसाची शाश्वती नसतानाही आपले सर्वस्व मातीच्या स्वाधीन करण्याची कणखरता फ़क्त शेतकर्‍याकडेच असते.

*********************************
sheti

भुईला दिली ओल नाही ढगाने
कसे अंकुरावे अता हे बियाणे?

*********************************
sheti

मात्र तणाला फ़ारच जोर

*********************************
sheti

*********************************
sheti

*********************************
sheti

वादळवार्‍यामुळे गव्हाच्या उत्पादनात सुमारे ३० टक्के घट आली.

*********************************
sheti

नवे तंत्रज्ञान वापरायचे?
(शेतमजुरांचे काय होईल, असा प्रश्न कुणालाच पडत नाही)

*********************************

आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून!

आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून!

        यंदाचा दुष्काळ “न भूतो न भविष्यति” असाच म्हणावा लागेल. विदर्भात तर आतापासून चटके बसायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसापासून वृत्तपत्र उघडलं की, शेतकरी आत्महत्त्येच्या संदर्भातील निदान एकतरी बातमी दिसलीच समजायची. आता असा एकही दिवस जात नाही की, शेतकरी आत्महत्त्येची बातमी कानावर येऊन आदळत नाही. मात्र तरीही कोणत्याच पातळीवर काहीही हालचाल होताना दिसत नाही. “रोजचे मढे त्याला कोण रडे” अशी एक म्हण आहे. भारतीय मानसिकता अधोरेखित करण्यासाठी ही एकच म्हण पुरेशी ठरावी.

जेवढे झुलायचे फ़ास लाऊन
तेवढे झुलत बसा
खायचे तितके जहर तुम्ही
खुशाल खात बसा

दहा-पाच करा किंवा शेकड्यांनी करा
हजारोंनी करा किंवा लाखोंनी करा
आम्ही सारे ढिम्म, आम्हाला काय त्याचे?
शेतामध्ये मरा नाहीतर घरामध्ये मरा

शिक्षित, सुजाण, वकील, डॉक्टर
नेता, तज्ज्ञ, सेवक, मास्तर
यांना तरीही ज्या देशामध्ये
निवांत झोप लागू शकते!
शासन-प्रशासन, पुजार्‍यांना
रंभा-परीचे स्वप्न पडू शकते!!
त्या देशाच्या पोशिंद्यांनो
एवढे तरी ध्यानी घ्या की;
हे फ़क्त इंडियातच घडू शकते!!!

संवेदनाशीलता मेली काय?

        माणूस संवेदनाक्षम वगैरे खरंच असतो काय, याबद्दल मला फार पूर्वीपासून संशय होता;  पण तो केवळ संशय होता. आता मात्र माझ्या मनातला कालचा संशय हळूहळू दृढतेत बदलायला लागला आहे. आता मनुष्याच्या संवेदनक्षमतेविषयी मी एवढेच म्हणू शकतो की माणसाच्या संवेदनशीलते मागे त्याचा निहित स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले असतात. स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले नसेल तर सभोवताली कितीही लाजिरवाण्या, क्रूर अथवा अमानुष घटना घडल्या तरीही मनुष्यप्राणी कळवळत नाही, हळहळत नाही आणि काळजाचे पाणी होण्याइतपत द्रवतही नाही. तो निगरगट्ट, ढिम्मच्या ढिम्म आणि निर्विकारच असतो.

आतापर्यंत लाखोच्या संख्येने शेतकरी आत्महत्या झाल्यातरी मख्ख असणारा समाज दिल्लीत एका मुलीवर बलात्कार होऊन खून झाल्याबरोबर रस्त्यावर उतरतो, मेणबत्त्या पाजळतो, सर्वत्र हाहाकार माजेल इतपत निदर्शने करतो, प्रसारमाध्यमातही रात्रंदिवस एवढ्याच एका मुद्द्याभवती रेंगाळत बसण्याची जणूकाही चढाओढ लागते; तेव्हा त्यामागे सुजाण आणि सुशिक्षित समाजाची संवेदनाशीलता नसते. असते ती केवळ त्यांच्या मनात निर्माण झालेली भिती. जी घटना आज त्या मुली संदर्भात घडली तीच घटना आपल्याही मुलीवर ओढवू शकते, या भितीपोटी उडालेला थरकाप!

शेतकरी आत्महत्यांशी सुजाण आणि सुशिक्षित समाजाचे दूरान्वयानेही स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले नसतात. आज आत्महत्या करण्याची वेळ त्या शेतकर्‍यावर आली, उद्या माझ्यावरही येऊ शकते, अशी भिती उत्पन्न व्हायचेही कारण नसते. त्यामुळे शेतकरी कितीही आत्महत्या करोत, सहा लाख शेतकरी आत्महत्या करोत की साठ लाख शेतकरी आत्महत्या करोत; हळहळण्याचे कारणच संपुष्टात आलेले असते.

हुश्श! एका मुलीच्या हत्त्येवर आकाश-पाताळ एक करणारा सुजाण आणि सुशिक्षित समाज शेतकरी आत्महत्यांवर गप्प का बसतो? हा प्रश्न अनेक दिवसांपासून मनात दबा धरून बसला होता. आता मात्र हळूहळू उत्तरावरील धुकं हटायला लागलं आहे. समाजाची संवेदनाशीलता मेली काय? असा प्रश्न उपस्थित करण्याचे औचित्य दिसतच नाही कारण सामूहिक समाजमन संवेदनक्षम असते, हेच मुळात थोतांड आहे, अशी खात्री व्हायला लागली आहे.

बिनपाण्याने हजामत

        या विषयावर उहापोह करण्याचे कारण असे की, मला समोर भयाण वास्तव दिसत आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीय कमी दाबाचा पट्टा निर्माण व्हायला लागला की जशी पाऊस पडण्याची शक्यता बळावत जाते तद्वतच शेतकरी आत्महत्यांमध्ये प्रचंड वाढ होऊ शकेल अशी अनुकूल स्थिती शेतकर्‍यांच्या अवतीभवती निर्माण व्हायला लागली आहे. वेळीच शासकीय स्तरावर वेगवान हालचाली होऊन युद्धस्तरावर उपाययोजना झाली नाही तर येणारे सहा-सात महिने अत्यंत वाईट बातम्या घेऊन येतील, हे अगदी सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट दिसायला लागले आहे.

यंदा विदर्भात नापिकीने कहर केला आहे. कापसाचे एकरी उत्पादन गत दोन वर्षाच्या तुलनेने फक्त ३०-३५ टक्केच होईल, असा अंदाज आहे. सोयाबीनची स्थिती तर सर्वाधिक खराब आहे. जिथे एकरी ९-१० क्विंटल सोयाबीन व्हावे तिथे १ ते २ क्विंटल होत आहे. अनेक शेतात तर एकरी १ क्विंटलापेक्षा कमी उत्पादन होण्याची शक्यता असल्याने व सोयाबीन कापणीसाठी लागणारा खर्चसुद्धा भरून निघण्याची शक्यता नसल्याने शेतकर्‍यांनी उभ्या पिकातच नांगरट सुरू केली आहे किंवा गुरे चरायला सोडली आहेत. यात जिरायती आणि बागायती असासुद्धा भेदाभेद करायला कारण नाही आहे, कारण एकाची पाणी लावून तर दुसर्‍याची बिनपाण्याने हजामत होत आहे. एकीकडे उत्पादनात आलेली प्रचंड घट आणि दुसरीकडे शेतमालाचे पडलेले बाजारभाव अशा दुहेरी जात्यात शेतकरी पूर्णपणे भरडला जात आहे.

राजा! ही तुझी बदमाषी आहे

        विदर्भातलाच शेतकरी जास्त प्रमाणात आत्महत्या का करतो, या प्रश्नाचे उत्तरही कठीण नाही. कापसाच्या एकाधिकार खरेदीचा कायदा महाराष्ट्र सरकारने १९७१ साली मंजूर केला. पण महाराष्ट्र शासनाच्या कापूस एकाधिकार योजनेअंतर्गत ‘भारतीय कापूस महामंडळा’ च्या धर्तीवर बाजारभावाप्रमाणे किंवा बाजारभावापेक्षा जास्त चढ्या दराने कापूस खरेदीचे धोरण राबविण्यात आले नाही. तुरळक अपवाद वगळले तर अन्य प्रांतातील शेतकर्‍यांना खुल्या बाजारपेठेत जेवढे भाव कापसाला मिळालेत त्यापेक्षा कायमच कमी भाव एकाधिकाराच्या नावाखाली महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पदरात टाकले गेले. अन्य प्रांतात चांगले भाव असूनही त्याचा फायदा राज्यातील शेतकर्‍यांना घेता आला नाही कारण प्रांतबंदी लादून अन्य राज्यामध्ये कापूस विक्रीस नेण्यास राज्यातील कापूस उत्पादकांना कायदेशीर मज्जाव करण्यात आला आणि “आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना” अशी गत खुद्द शासनानेच राज्यातील कापूस उत्पादकांची करून टाकली. कापूस एकाधिकाराच्या गोंडस नावाखाली कापूस उत्पादकांचे जवळजवळ ३०-३५ वर्षे “कायदेशीर शोषण” झाल्याने राज्यातला कापूस उत्पादक आर्थिक स्थितीने एवढा नेस्तनाबूत झाला की त्याला पुन्हा डोके वर काढताच आले नाही.

मध्यंतरी खुल्या अर्थव्यवस्थेच्या प्रारंभालाच चांगली संधी आली होती. कापसाला प्रति क्विंटल ९०००/- भाव मिळू शकेल एवढी तेजी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आली होती. तेव्हा शासनाने फक्त गप्प बसण्याची गरज होती. मामला व्यापारी आणि शेतकरी यांच्यामधला होता. सरकारवर आर्थिक भारही पडणार नव्हता. याउलट कापसाच्या निर्यातीतून परकीय चलनाची गंगाजळी शासकीय तिजोरीत येऊन साठणार होती पण; कापसाला प्रति क्विंटल ९०००/- भाव मिळू देईल तर ते ’मायबाप’ सरकार कसलं? कापूस गिरणी मालकांच्या दबावाखाली येऊन सरकारने तातडीने सूत्रे हालवली. कापसावर निर्यातबंदी लादली आणि देशांतर्गत बाजारपेठेत प्रति क्विंटल ९०००/- सहज मिळू शकणारे भाव प्रति क्विंटल ५०००/- पेक्षाही कमी आले.

जेव्हा चांगलं पिकलं व बाजारभावही चांगले मिळून कापूस उत्पादकांची आर्थिकबाजू सावरायची शक्यता निर्माण झाली तेव्हा शेतकर्‍यांची लूट करायला कोणी व्यापारी आला नाही, दलाल आला नाही, चोर आला नाही किंवा दरोडेखोरसुद्धा आला नाही. कापूस उत्पादकांना सरकारने लुटलं, राजरोजसपणे लुटलं, कायदेशीरपणे लुटलं. कापूस उत्पादकांच्या अधोगतीला शासनाची बदमाषीच कारणीभूत आहे.

आत्महत्या नव्हे, शासकीय खून!

        ज्या वर्षी शेतीत उत्पादन कमी येते आणि शेतमालाचे भावही पडतात, त्या-त्या वर्षी शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत जातो. शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची पाळी येते ती त्याने आळशीपणा दाखवला म्हणून नव्हे, त्याने कर्तव्यात कसूर केला होता म्हणून नव्हे, त्याच्या व्यसनाधीनतेमुळे तर नव्हेच नव्हे! शेतमालाचे भाव ठरविण्याचे, त्यावर निर्बंध लादण्याचे, शेतमालाचे आयात-निर्यात धोरण ठरविण्याचे सर्वाधिकार शासनाकडेच असल्याने शेतीक्षेत्रातील सर्व बर्‍याबाईट परिणामांसाठी व प्रगती-अधोगतीसाठी थेट सरकारच जबाबदार ठरते. शासनाच्या चुकीच्या व शेतकरी विरोधी धोरणांमुळे आज शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या ह्या आत्महत्या नसून ह्या आत्महत्यांना “शेतकर्‍यांचा शासकीय खून” असेच संबोधावे लागेल.

– गंगाधर मुटे
—————————————————————————————————————-

“माझी गझल निराळी” दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा

दिनांक : ०१-०७-२०१४

“माझी गझल निराळी” : दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा

                     शब्दांजली प्रकाशन, पुणे तर्फे दिनांक २९-०६-२०१४ रोजी पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे सकाळी ११:३० वाजता “माझी गझल निराळी” या गझलसंग्रहाच्या दुसर्‍या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संगीता जोशी,  सौ. विनिता देशमुख आणि डॉ. अविनाश भोंडवे उपस्थित होते.

या प्रसंगी तीन नवीन पुस्तकांचे व २ पुस्तकांच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.

१. माझी गझल निराळी (दुसरी आवृत्ती) – गंगाधर मुटे
२. घरी रोज करायचे व्यायाम (तिसरी आवृत्ती) – अनिल बर्वे
३. तरंग मनाचे – रवींद्र कामठे
४. काचखड्यांची नक्षी – प्राजक्ता पटवर्धन
५. Your Daily Execerise at Home – अनिल बर्वे / प्रसन्न केसकर

या प्रसंगी मी व्यक्त केलेल्या मनोगताचा संक्षिप्त सारांश :

               आतापर्यंत माझी तीन पुस्तके प्रकाशित झालीत. नोव्हेंबर २०१० मध्ये माझा पहिलावाहिला काव्यसंग्रह “रानमेवा” प्रकाशित झाला. जुलै २०१२ मध्ये “वांगे अमर रहे” हा लेखसंग्रह प्रकाशित झाला आणि नोव्हेंबर २०१३ मध्ये “माझी गझल निराळी” हा गझलसंग्रह प्रकाशित झाला. या तीनही पुस्तकांना वाचकांची पसंती आणि भरभरून प्रेम मिळाले असले तरी चारच महिन्यात हातोहात पहिली आवृत्ती संपून दुसरी आवृत्ती काढावी लागण्याचा सोनेरी दिवस मात्र माझ्या आयुष्यात “माझी गझल निराळी” या गझलसंग्रहानेच आणला त्याबद्दल मी वाचकांना अभिवादन करतो.

                 माझी गझल खूपच लोकप्रिय आहे किंवा मी खूप विकला जाणारा गझलकार आहे म्हणून इतक्या लवकर दुसरी आवृत्ती काढावी लागली असे मी समजत नाही. धडाडीची वृत्ती आणि मार्केटिंग कौशल्य असलेला राज जैन/निवेदिता जैन यांच्यासारखा प्रकाशक मला मिळाला, त्यामुळेच इतक्या लवकर दुसरी आवृत्ती काढावी लागण्याचा सन्मान “माझी गझल निराळी”ला मिळाला त्याचे सर्व श्रेय राज जैन/निवेदिता जैन या प्रकाशकव्दयांनाच जाते, म्हणून मी त्यांनाही अभिवादन करतो.

                       माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असली तरी मी आजही स्वतः:ला साहित्यिक वगैरे मानत नाही आणि साहित्यात भर घालण्यासाठी मी माझी लेखनीही झिजवत नाही. मी जे जगतो तेच लिहितो. कल्पनाविलासात रमून भावविश्वाचे आभासी मनोरे रचने, हा माझा प्रांत नाही.  शेती केली, शेतीमधली गरिबी जवळून न्याहाळली, देशाच्या दूरवर कानाकोपर्‍यात फिरल्यानंतर जे वास्तव दिसलं तेच माझ्यासाठी ब्रह्मज्ञान ठरलं आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासून कन्याकुमारीपर्यंत तुम्ही कुठेही जा, शेतीमध्ये सर्वत्र कॉमन आढळणारी एकच गोष्ट आहे; ती म्हणजे गरिबी. शेतीमध्ये हमखास पिकणारं पीक म्हणजे शेतीवर कर्जाचा डोंगर आणि दरिद्री.

देशात जा कुठेही, भागात कोणत्याही
सर्वत्र सत्य एकच; तोट्यात कास्तकारी!

झिजतात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण;
दारिद्र्य-अवदसेच्या विळख्यात कास्तकारी

सांगा कशी फुलावी, तोर्‍यात कास्तकारी
वाह्यात कायद्यांच्या लोच्यात कास्तकारी

                 गेल्या १५-२० वर्षांमध्ये ६ लाखापेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याची दखल साहित्यक्षेत्राने घेतलेली नाही किंवा त्याचे प्रतिबिंब काही साहित्यात उमटलेले नाही. शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे एकही पुस्तक साहित्यक्षेत्रात उपलब्ध नाही, ही उणीव साहित्यक्षेत्रात राहिलेली आहे, हे सत्य आहे. शेतीच्या दुर्दशेचे कारण सांगताना शेतकरी आळशी आहे, त्याला तंत्रज्ञानाचा योग्य वापर करता येत नाही, तो अज्ञानी आहे, तो व्यसनाधीन आहे, यापलीकडे साहित्याला काही लिहिताच आले नाही. योग्य कारणाचा वेध घेऊन अभ्यासपूर्ण लेखन करण्यात साहित्यक्षेत्राने कुचराई केली ही पहिली चूक आणि जे लिहिले ते निखालस खोटे, अशास्त्रीय लिहिले ही दुसरी चूक. मी शाळेत शिकत असताना मी गावाच्या भकासपणाचे कारण शोधत होतो, एकही पुस्तक मला योग्य व समाधानकारक उत्तर देऊ शकलेलं नाही, त्यामुळे मराठी साहित्यविश्व परिपूर्ण नाही, हे विधान करताना मला अजिबात संकोच वाटत नाही.

                 खैरलांजी प्रकरण झाले तर त्यावर शेकडोने पुस्तके लिहिली गेली. दिल्लीत एका मुलीवर बलात्कार होऊन खून करण्यात आला तर शेकड्यांनी पुस्तके लिहिली जातात, मात्र; शेतकर्‍यांच्या आत्महत्या दखल घेण्याइतपतही साहित्यक्षेत्राला महत्त्वाच्या वाटत नाही. कारण काय? शेतकरी गरीब असतो म्हणून? की त्याच्याकडे पुस्तके विकत घेण्याची ऐपत नसते म्हणून? आणि जर हे खरे असेल तर साहित्य म्हणजे समाजाचा आरसा आहे असे म्हणण्याला अर्थच काय उरतो? शेतकरी आत्महत्यांवर सर्वंकश प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेणारे आज एकही पुस्तक उपलब्ध नसणे ही बाब साहित्यक्षेत्राला लाजिरवाणीच म्हटली पाहिजे. त्यामुळे माफ करा; मी साहित्यक्षेत्राकडे फारफार आदराने पाहू शकत नाही.

असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी

               मला नेहमी एक प्रश्न विचारला जातो की मी असा अचानक कवितेकडे कसा काय वळलो, त्यामागची प्रेरणा काय? वगैरे वगैरे. मी वयाच्या ४७ व्या लिहायला लागलो. मी हातात लेखणी धरण्यामागची प्रेरणा अशी की मी एक दिवस विचार केला. आमचं आयुष्य जगलो आम्ही, आमचं आयुष्य भोगलं आम्ही. रस्त्यावर उतरून लढलो आम्ही, तुरुंगाची हवा खाल्ली आम्ही, पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या आम्ही, बंदुकीच्या गोळ्या झेलल्या आम्ही.
                अनुभूती आमची आणि आम्ही म्हणतो आम्ही लिहिणार नाही. द्सर्‍याने कुणीतरी लिहावं! पिढ्यानपिढ्या उलटून गेल्या पण आमचा शेतकरी बोलायला तयार नाही. मुळात भारतातील शेतकरी मुकाच आहे. तो बोलत नाही, लिहीत नाही आणि वाचतही नाही. हे चित्र बदलायचं असेल तर आपण हातात नांगराऐवजी लेखनी धरायलाच हवी, या स्वयंप्रेरणेने मी लिहायला सुरुवात केली. लिहायला लागलो, वाचकांना आवडायला लागलं, प्रबोधनाचा यज्ञ सफल  व्हायला लागला की ऊर्मी आणि मस्तीचा आपोआपच अंगात संचार व्हायला लागतो.

माझ्या गझलांवर प्रेम करणार्‍या समस्त रसिकांचे मी आभार मानतो आणि त्यांना एवढेच सांगू इच्छितो की,

मस्तीत चालतो मी तुडवीत कूप-काट्या
करतील आमरस्ता मागून चालणारे

                                                                                                                             – गंगाधर मुटे
————————————————————————————————————-

स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही – भाग १

स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही – भाग १


              “येत्या २४ तासात विदर्भ, मराठवाडा आणि प. महाराष्ट्रासह कुठेकुठे मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून त्यापुढील ३६ तासात हवामानामध्ये फ़ारसा बदल संभवत नाही” अशी उद्‍घोषणा आकाशवाणी किंवा दूरदर्शनवर झाली तरी पावसाचे दर्शन होईलच याची खात्री देता येत नाही. कधीकधी २४ अथवा ३६ तासच काय ४८ अथवा ७२ तास उलटून जातात पण आकाशात कापसाच्या बोंडाएवढाही तुकडा दुर्बिनीने शोधूनही नजरेस पडत नाही. मात्र याउलट “पुढील ४८ तासात आकाश निरभ्र राहून स्वच्छ ऊन पडेल,” असा आकाशवाणी/दुरदर्वशनर व्यक्त केला गेलेला अंदाज ऐकून जर एखाद्याने आपल्या लहानग्या मुलास शेतात न्याहारी पोचवायला पाठवायचे ठरवले तर त्याला रस्त्यात पावसाने झोडपलेच समजावे, अशी स्थिती आहे.

             एकदा तर “पावसाने दडी मारली, मान्सूनचे आगमन लांबले – शेतकरी चिंताग्रस्त” असा मुख्यमथळा असलेल्या वृत्तपत्राचे पार्सलच पुरात वाहून गेले होते. बिचारा वृत्तपत्र वाटणारा पोरगा कसाबसा वाहून जाता जाता बचावला होता.

           आकाशवाणी, दुरदर्शन किंवा वृत्तपत्र यांचे पाऊसविषयक अंदाज हवामानखात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकावर आधारीत असतात. हवामानखात्याला वारंवार तोंडघशी पाडण्यात त्या वरूणदेवतेला काय समाधान लाभते कुणास ठाऊक पण त्याचे विपरित परिणाम मात्र या माध्यमांना भोगावे लागतात. हवामानखाते आपल्या जागी सुरक्षित असते पण विश्वासाहार्यतेला भेगा जातात या माध्यमांच्या. त्यावर जालिम उपाय म्हणून वृत्तपत्रे पाऊसपाण्याचे अंदाज छापण्याचे टाळतात आणि दुरदर्शन व वेगवेगळे टीव्ही चॅनेल जास्तीतजास्त वेळा हवामानाच्या अंदाजाच्या मथळ्याखाली केवळ कमाल आणि किमान तापमान दर्शवून मोकळे होतात.

       कदाचित याच कारणामुळे शेतकरी वर्गात जेवढे स्थान पंचागाचे आहे, त्या तुलनेत हवामानखाते कुठेच नाही. हवामान बदलाच्या  संभाव्यतेचे ढोबळमानाने का होईना पण काहीतरी आराखडे मनात गृहित धरल्याशिवाय शेती करताच येत नाही. हवामानशास्त्राचे शेतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. शेती करणारा प्रत्येक शेतकरी हा त्याच्या शेतीपुरता हवामान शास्त्रज्ञच असतो. पंचागात पर्जन्यामानाची संभाव्यता व्यक्त केली असते ती फ़ारच मोघम स्वरुपाची असते पण बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने वर्षानुवर्षे शेतकरी या पंचागातील हवामानाच्या अंदाजावर विश्वास ठेवून आहे. नक्षत्रानुरुप आणि नक्षत्रांच्या वाहनानुसार पाऊस पडत असतो, यावर त्याचा विश्वास आहे. नक्षत्राचे वाहन जर मोर असेल तर पाऊस थुईथुई येतो, वाहन बेडूक असेल तर भारी पाऊस येतो, वाहन गाढव असेल तर पळता पाऊस येतो किंवा वाहन जर म्हैस असेल तर पाऊस ठाण मांडून बसतो असे त्याने वर्नुषावर्षे अनुभवातून हवामानाचे दर्शन घेतलेले, त्यामुळे त्याचा या बाबीवर विश्वास असतो. पंचागात व्यक्त केलेले अंदाज अचूक किंवा तंतोतंत नसतात पण एकदमच फ़ालतूही नसतात. मोघम असले तरी शेतीमधील उपयुक्ततेचा विचार केला तर हवामान खात्यापेक्षा काहीना काही अंशी अधिक विश्वासाहार्य नक्कीच असतात.

        हवामानाचा अंदाज काढणे हे आकाशाला गवसणी घालण्यापेक्षा जिकिरीचे काम आहे, शिवाय हवामानशास्त्र अजून बाल्यावस्थेतच असल्याने हवामानखात्याचे अंदाज चूकत असावे, त्याला बिचारे हवामानशास्त्रज्ञ काय करतील, असेच मला वाटायचे आणि मग या शास्त्रज्ञाबद्दल सहानुभूती वाटायची. हवामान खात्याबद्दल टीकात्मक लेखन वाचून त्यांच्याबद्दल मनात करूणा उत्पन्न व्हायची. दोनवर्षापूर्वीपर्यंत तरी माझी अशीच मनोधारणा होती.

        पण मी इंटरनेटवर आलो आणि भारतीय हवामानखाते वगळता वेगवेगळ्या परदेशी संकेतस्थळावरील हवामानाच्या अंदाजाची तपशीलवार माहीती पाहून दंगच झालो. बराच काळ मी या अंदाजाची अचूकता पडताळत राहिलो. या अंदाजावर आधारीत शेतीच्या कामाचे नियोजन करित राहिलो. त्याचा मला खूप फ़ायदा झाला. यावर्षी अगदी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मला कपाशीची धूळ पेरणी करता आली. अंदाजाप्रमाणे पाऊस आला. माझ्या शेतीपासूनच्या १०० किलोमीटर परिघक्षेत्रात माझी लागवड इतरांपेक्षा दहा दिवस आधी आणि चांगली झाली. आकाशवाणी-टीव्हीवरील हवामानाचे अंदाज ऐकून ज्यांनी लागवडी केल्यात त्यांच्या लागवडी बिघडल्या. दुबार लागवडीचे संकट कोसळण्याची भिती उत्पन्न झाली होती.

मला ज्ञात असलेली हवामानाचे अंदाज वर्तविणारी काही संकेतस्थळे खालील प्रमाणे:

१) भारत मौसम विज्ञान विभाग
(Ministry of Earth Science, Govt of India)
http://www.imd.gov.in/
———————
२) भारत मौसम विज्ञान विभाग, पुणे
http://www.imdpune.gov.in/
———————
३) foreca
http://www.foreca.com
——————-
४) weatherbug
http://weather.weatherbug.com
——————
५) The Weather chanel India
http://in.weather.com/
———————–
६) MSN Weather
http://weather.in.msn.com
———————–
७) BBC
http://news.bbc.co.uk/weather/
——————————-
८) Agricultural Meteorogy Division
http://www.imdagrimet.gov.in
——————————–

        यामध्ये फ़ोरिका आणि वेदरबग हे संकेतस्थळ मला अधिक विश्वासाहार्य वाटले. येथे पुढील दहा दिवसापर्यंतच्या हवामानबदलाचे अंदाज व्यक्त केलेले असतात. अगदी दर तीन तासांनी हवामानात काय बदल घडतील याचा अंदाज व्यक्त केलेला असतो. शिवाय या अंदाजाचे स्वरूपही राज्यनिहाय किंवा प्रांतनिहाय असे मोघम स्वरूपाचे नसून विभागवार असते आणि हे विभाग ५०/१०० किलोमिटर क्षेत्रासाठी असते. तुम्हाला हवे ते तुमचे छोटेमोठे शहर शोधून त्या शहराचे हवामान ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी काय असू शकेल याचा अदमास घेता येतो.

         या सर्व संकेतस्थळामध्ये शेतकर्‍याचा दृष्टीने अत्यंत निरूपयोगी, समजण्यास क्लिष्ठ, काहीही तपशिलवार माहीती उपलब्ध नसलेले संकेतस्थळ म्हणून उल्लेख करायचा झाला तर एकमेव नाव घ्यावे लागते ते भारत मौसम विज्ञान विभागाच्या संकेतस्थळाचे. या संकेतस्थळाचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास “शेतीमधील उपयुक्ततेच्या दृष्टीने अत्यंत फ़डतूस” असेच करावे लागेल. इथे सारे मोघमच मोघम आहे. “पुढील ४८ तासांत विदर्भ, मराठवाडा, गोव्यात कुठेकुठे पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे” हीच यांची हवामानाच्या अंदाजाची संभाव्यता. त्यावरून कशाचाच काहीही थांगपत्ता लागत नाही. पाऊस कुठे आणि केव्हा येणार, याचाही बोध होत नाही. असे मोघमच अंदाज व्यक्त करायचे असेल तर त्यासाठी शास्त्रज्ञ कशाला हवेत? एवढे किंवा यापेक्षा अधिक चांगले भाकित तर एखादा शेंबडा पोरगाही वर्तवू शकेल. त्यासाठी हजारो कोटी रूपये या हवामान खात्यावर खर्च करायची गरजच काय? एखाद्या बालवाडीतल्या मुलास पेपरमेंट किंवा कॅटबरी दिल्यास तो सुद्धा एवढं वाक्य सहज बोलून दाखवेल. जे काम पेपरमेंटच्या चार गोळ्यांनी होण्यासारखे आहे तेथे हजारो कोटी खर्च करून पांढरे हत्ती पोसण्याखेरीज आपण दुसरे काय करत आहोत? एवढा तरी विचार करायला आपण शिकणार आहोत की नाही?
            मुख्य मुद्दा असा की, जे काम परदेशी शास्त्रज्ञांना जमत आहे ते काम आमच्या भारतीय शास्त्रज्ञांना का जमू नये? फ़ोरिका आणि वेदरबग यासारख्या संकेतस्थळावरील अंदाज अचूक, तंतोतंत किंवा खरेच असतात, असे मला म्हणायचे नाही. ते चुकण्याचीही शक्यता असतेच. शेवटी अंदाज हा केवळ अंदाज आणि शक्यता ही केवळ शक्यताच असते. पण ही संकेतस्थळे सांभाळणारी माणसे जेवढे परिश्रम घेतात, चिकाटी दाखवतात, तपशिलवार अंदाज व्यक्त करण्याचे धाडस आणि आत्मविश्वास बाळगतात, गरजेनुरूप सॉफ़्ट्वेअर निर्माण करण्याचे कौशल्य दाखवतात; तेच आमच्या हवामानखात्याला का जमू नये? हाच मुख्य प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर शोधणेही तेवढेच गरजेचे आहे.
        हवामानशास्त्राच्या बाबतीत आपण इतर देशांपेक्षा शेकडो वर्षांनी मागे आहोत, हे दिसतेच आहे. हरकत नाही पण; इतर देशांच्या पुढे जाण्याचा, बरोबरी करण्याचा किंवा महाशक्ती बनण्याचा मुद्दाही सोडा, शेतीला थोडाफ़ार हातभार लागेल  एवढे तरी हवामानशास्त्र विकसित करण्यासाठी आमचे शास्त्रज्ञ, सत्ताधारी आणि वेळोवेळी निव्वळ पुस्तकी ज्ञानाच्या आधारे शेतीविषयात नको तेव्हा, नको ती लुडबुड करणारी विद्वान मंडळी काही हातपाय हालवणार आहेत की नाही, हाच कळीचा मुद्दा आहे.

      स्वातंत्र्योत्तर भारतातील शास्त्रज्ञ, सत्ताधारी आणि पुस्तकी ज्ञानाच्या महामेरू विद्वान मंडळींना स्वातंत्र्याचे हवामान मानवणार नाही, याचा अदमास जर महात्मा गांधींना जर तेव्हा आला असता तर त्यांनी स्वातंत्र्याचा लढा दिला असता किंवा नाही, याचा अंदाज बांधणे कठीण आहे.

( क्रमश: )
पूर्वप्रकाशित दि : 22/07/2011
                                                                                                                  – गंगाधर मुटे
—————————————————————————————————————-

अच्छे दिन आनेवाले है – १


अच्छे दिन आनेवाले है – १

सारा देश म्हणतो, मोदी आलेत ना! अच्छे दिन आनेवाले है.

.
.
मात्र, अच्छे दिवस कुणाला येतील हे समजून घेण्यासाठी येणार्‍या पुढील दिवसाची वाट पाहण्याची गरज नाही. चित्र स्पष्टच आहे.
– कदाचित कांदा आणखी स्वस्त होईल. खाणारा खिदळणार आणि पिकवणारा बोंबलणार.
– आमच्या मायमाऊलीची चूल फ़ुंकायची स्थिती काही बदलणार नाहीये. गॅस वापरणाराला आणखी सबसिडी दिली जाईल पण …
.
आमच्या मायबहिनी सरपण गोळा करायला, डोईवर मोळी वाहायला आणि शेवटी चूल फ़ुंकायलाच जन्माला आल्या, असाच बुद्धीवाद्यांचा आणि राज्यकर्त्यांचा दृढ समज आहे. आणि यातून सुटका आणि यावर सबसिडी कालही नव्हती … उद्याही नसणार आहे.
.
आगामी काळात असेच काहिसे चित्र बघायला मिळेल. 
आणि ज्यांच्या हाती लेखनी, माईक ते म्हणतील……
अच्छे दिन आनेवाले है…..! 

*    *    *    *

विकास म्हणजे नेमके काय हो?
विकास म्हणजे औद्योगीक आणि तत्संबंधी विकासच ना?
कॉंग्रेसवाल्यांनी शेतीतील कच्चा माल लुटून औद्योगीक विकास केला.
नवे सरकार सुद्धा हेच करणार की वेगळे काही करणार?

*    *    *    *

 “पुरेशी मजुरी नसणे” आणि “अन्नधान्य स्वस्त असणे” यामुळे असंघटीत कामगार क्षेत्रात काम न करण्याची वृत्ती बळावत चालली व शेतीमध्ये मजूर मिळणे कठीण होत चालले. वेठबिगाराप्रमाणे किंवा कमी मोबदल्यात घाम गाळायला तयार न होणे, हे तसे चांगलेच लक्षण मानावे लागेल. ज्या दिवशी शेतकरी शेतीत काम करणे थांबवतील किंवा स्वत:पुरतेच पिकवेल, वरकड पिकवणार नाही, तो दिवस शेतीला सुबत्ता आणण्यासाठीचे पहिले पाऊल पडणारा पहिला दिवस ठरेल. तो दिवस लवकर यावा. (पण तसा दिवस कधिही येण्याची शक्यता नाहीये.)

*    *    *    *

सर्वांच्या जिभांचे चोचले पूर्ण करण्याची आणि सर्व भुकेल्या पोटांना भरपेट खाऊ घालण्याची जबाबदारी जर शेतकर्‍यांनी घ्यायची असेल तर शेतकर्‍यांच्या जीवनात दोन दिवस सुखाचे यावे, अशी सदिच्छा बाळगायला “खाणार्‍यांच्या” बापाचे काय जाते? निदान त्याच्या कमरेचे धडूते पळवायचे नाही, एवढी “अक्कल” तरी बिगरशेतकरी जनतेला केव्हा येणार?

दोन वर्षापूर्वी कांदा महाग झाला तेव्हा पाकिस्तान मधून कांदा आयात केला होता. तो राहूल गांधी, सोनिया गांधी, मनमोहनसिंग, अडवाणी, मोदी, मोहन भागवत, उद्धव ठाकरे आणि डावे-उजवे यांनी “सर्वानुमते” गोड मानून खाल्लाच होता ना?

निदान पाकिस्तानचा कांदा पाकनिष्ठ आहे म्हणून त्याला नाकारणारा या देशात एकसुद्धा स्वदेशीप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी “मायचा लाल” जाहिररित्या पुढे का आला नसावा?

शेवटी “शेतकर्‍यांचे मरण हेच राज्यकर्त्यांचे धोरण” हेच खरे असते ना?

                                                                                                                      – गंगाधर मुटे 
*    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *
(तीन वर्षापूर्वीची एक गझल)

Onion

*    *    *    *