प्रणाम युगात्म्या

प्रणाम युगात्म्या
            १९८० चे दशक उजाडेपर्यंत लढाऊ किसान किंवा लढवैय्या शेतकरी हे शब्दच निरर्थक होते. इतिहासात आपण कितीही मागे जाऊन बघितले तरी कोणत्याही कालखंडात भारतीय शेतकरी त्याच्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध कंबर कसून साक्षात महाकाली दुर्गेचा अवतार धारण करत होता, अशा काही पाऊलखुणा आढळत नाहीत. अगदी शेताच्या बांधावर राजसैन्याच्या घनघोर लढाया व्हायच्या तेव्हाही तो त्या लढायांकडे मुक बधिरतेने निर्विकार चेहरा करूनच बघत राहायचा. शेतकर्‍याला पक्के ठाऊक होते की, राजे असो, पेशवे असो, मोगल असो किंवा डाकू-लुटेरे असो, हे सारे विजयानंतर आपल्याकडे शेतसारा वसूल करायला किंवा धान्याची लूट करायलाच येणार आहेत. ह्या लढाया म्हणजे शेतसारा वसूल कोणी करायचा याचा रीतसर परवाना मिळवण्यासाठीच असतात. ज्याला आपले म्हणावे असे यांच्यापैकी आपले कोणीच नाहीत.

 

               कितीही अन्याय, अत्याचार झालेत तरी त्याविरुद्ध एक शेतकरी म्हणून निखळ शेतीच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शेतकरी पेटून उठला, त्याने राजसत्तेविरुद्ध बंड पुकारले असे उदाहरणच शेतीच्या इतिहासात सापडत नाही. त्याऐवजी दोन्ही हात जोडून अदबीने उभा राहणारा शेतकरी मात्र इतिहासाच्या प्रत्येक पानावर पाहायला मिळतो. साने गुरुजींनी शेतकर्‍यांना लढण्याची प्रेरणा देताना लिहिले,

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकर्‍यांच्या राज्यासाठी, लावू पणाला प्राण

              पण त्या कवितेची शेतकर्‍यांनी दखलच घेतली नाही. शेतकरी उठले नाहीत, रान पेटले नाही आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी कुणी प्राणही पणाला लावले नाहीत. तसे पाहिले तर शेतकर्‍यांचा इतिहासच तसा फार चांगला नाही. ज्यांनी ज्यांनी शेतकर्‍यांना लुटायचा प्रयत्न केला त्यांनी त्यांनी यश मिळवले. पण ज्यांनी शेतकर्‍यांच्या बाजूने लढायचा प्रयत्न केला त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढायला शेतकरी कधीच समोर आला नाही. कदाचित त्यामुळेच शेतकर्‍यांची बाजू घेऊन लढण्यापेक्षा शेतकर्‍यांना लुटून जगणार्‍या व्यवस्थेत सामील होऊन आपला निहित स्वार्थ साधून घेणे सगळ्यांना जास्त सोयीचे आणि परिणामकारक वाटले असावे, असा अंदाज बांधणे भाग पडत आहे.

 

                शेतकर्‍यांची कड घेऊन लढणारे शोधायला आपण इतिहासात कितीही मागे गेलो तरी सरते शेवटी बळीराजावर जाऊन थांबतो. खरे तर बळीराजा हा शेतकर्‍यांचा निखळ राजा नव्हताच. तो शोषित जनतेचा, सामान्य रयतेचा राजा होता. बळीराजाच्या राज्यात प्रजा सुखी होती. शेतकरी हाही त्याच प्रजेचा एक घटक असल्याने तोही सुखी होता. शेतकर्‍यांप्रती चांगला न्याय देणारा बळीराजा व्यतिरिक अन्य कोणी राजाच झाला नसल्याने बळीराजा हाच शेतकर्‍यांना आपला राजा वाटतो. आजही “इडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे” अशी शेतकर्‍यांच्या घराघरात प्रार्थना केली जाते. पण नुसतीच प्रार्थना केली जाते, मनोभावना व्यक्त केली जाते. बळीचे राज्य संपल्यानंतर पुन्हा बळीचे राज्य यावे यासाठी मात्र शेतकर्‍यांनी काही प्रयत्न केले होते, याचा मागमूसही इतिहासात सापडत नाही.     बळीराजानंतर शेतकर्‍याच्या कैवार्‍याचा शोध घेण्यासाठी गाडी पुढे काढली तर गाडी अधेमधे कुठेच थांबत नाही. गाडी थेट म. ज्योतिबा फुले यांच्यानावाजवळ येऊन थांबते. म. फुले हे शेतकर्‍यांचे दैवत. शेतकर्‍यांच्या बाजूने त्यांनीच व्यवस्थेवर पहिला आसूड उगारला. शेतीचे प्रश्न चव्हाट्यावर आणण्यासाठी अनेक हालअपेष्टा सोसून त्यांनी आयुष्य खर्ची घातले पण अत्यंत खेदजनक बाब ही की शेतकरी मात्र म. फ़ुलेंच्या बाजूने उभा राहिला नाही. म. फ़ुलेंच्या खांद्याला खांदा लावून त्यांना नैतिक बळही पुरवले नाही. ज्योतिबांना एकाकी झुंज द्यावी लागली. अगदी सावित्रीबाईच्या अंगावर घाण फेकण्यात आली तरीही शेतकरी सावित्रीबाईच्या बचावासाठी सरसावला नाही, बंड करून उठणे ही तर फारच दूरची गोष्ट झाली.

१९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात पाहिल्यांदाच एक चमत्कार पाहायला मिळाला. शरद जोशींच्या रूपात एक झंझावात आला. इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते पहिल्यांदाच घडले. लाखो शेतकरी शरद जोशींच्या खांद्याला खांदा लावून रणात उतरले. “कुत्र्याची शेपटी सरळ होईल पण शेतकरी संघटित होणार नाही” हा सार्वत्रिक समज तोंडघशी पाडत शेतकर्‍यांची संघटना स्थापन झाली. शेतीच्या प्रश्नावर कधीही शेकडोच्या संख्येत सुद्धा जमा न होणारा शेतकरी समाज लाखांच्या संख्येने गोळा व्हायला लागला. रस्ता रोको, रेलरोको, गावबंदी सारखे अस्त्र उगारून व्यवस्थेला सळो की पळो करून सोडू लागला. पुरुषच नव्हे तर महिलासुद्धा आंदोलनाचे नेतृत्व करायला पुढे सरसावल्या. चांदवडच्या अधिवेशनात ३ लक्ष शेतकरी महिलांची उपस्थिती, हा तर खरोखर चमत्कारच होता. त्यावेळी सर्वांच्या मनात एकच भावना होती,


सरकारच्या धोरणापायी छक्केपंजे आटले
बरं झालं देवा बाप्पा, शरद जोशी भेटले

              निखळ शेतीच्या प्रश्नावर ज्याच्या मागे शेतकरी समाज आपापल्या जाती-धर्माचे कडे झुगारून उभा राहिला की ज्यामुळे त्याला शेतकर्‍यांचा नेता म्हणावे, असा शेतकरी नेता एकच आणि तो म्हणजे शरद जोशी. आज शरद जोशी नसताना त्यांच्या पश्चात त्यांचा ८१ वा जन्मदिवस साजरा करण्याचा हा पहिलाच प्रसंग. आजवर या द्रष्ट्या शेतकरी नेत्याची पहिली जयंती उत्साहात साजरी करणार्‍यांना हा जन्मदिवस शोकविव्हळ वातावरणात साजरा करावा लागणार आहे. या वेळेस उत्साह आणि आनंदाऐवजी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूच तरळणार आहेत आणि शेतकरी कार्यकर्ते सांडुभाई शेख यांच्या कवितेच्या ओळीच प्रत्येकाच्या मुखातून बाहेर पडणार आहेत.

हे ब्रह्मा, विष्णू, पांडुरंगा, तुम्हाला काय कमी सांगा
अमुचे शरद जोशी काका, अम्हाला देऊनी टाका

          शरद जोशींवर जिवापाड प्रेम करणारे, त्यांच्या एका शब्दावर स्वत:चा प्राण धोक्यात घालून आंदोलनाचा झेंडा पुढे नेणारे लक्षावधी पाईक त्यांना मिळालेत हे जितके खरे तितकेच हेही खरे आहे की शेतीचे अर्थशास्त्र मांडताना आणि शेतकरी आंदोलनाला पुढे नेताना त्यांनी कुणाचाही मुलाहिजा ठेवला नाही, कुणाला काय वाटेल याची कधी पर्वा केली नाही त्यामुळे त्यांना शत्रूही लक्षावधीच्या संख्येतच मिळाले. भारत विरुद्ध इंडिया ही संकल्पना मांडताना इंडियाशी वैरत्व घेतले. सारेच पक्ष शेतकर्‍यांचे शत्रू आहेत, असे सांगत सार्‍या राजकीय पक्षांशी दोन हात केले. निवडणुकांतील उमेदवार म्हणजे दोन गाढवांची शर्यत आहे, आपल्याला सोयीचा गाढव निवडायचा आहे असे प्रचारसभेतील व्यासपीठावर उमेदवाराच्या तोंडावर सांगत आपली भूमिका रोखटोकपणे विशद केली. शासकीय कर्मचार्‍यांचे पगार कमी केल्याखेरीज देशाची अर्थव्यवस्था सुधारणे शक्य नाही, असे प्रतिपादन करून शासकीय कर्मचार्‍यांची नाराजी ओढवून घेतली. आपला विचार मांडताना त्यांनी कुठलीच तडजोड केली नाही. परिणामत: त्यांना मिळालेल्या छुप्या शत्रूंची संख्याही अफाट आहे. सत्तेचे लालसी व शेतकरी आंदोलनाचा शिडीसारखा वापर करून राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करू पाहणार्‍या शेतकरी कार्यकर्त्यांनाही त्यांनी आपल्या जवळपास फारसे फिरकू दिले नाही त्यामुळे अनेक कार्यकर्ते शेतकरी आंदोलनापासून दूर जाऊन राजकीय पक्षांशी घरोबा करते झाले.

 

            शेतीला मध्यवर्ती स्थानी ठेवून विचारांची गुंफणं करणारा हा द्रष्टा नेता आज शरीराने आपल्यात नसला तरी त्यांचे विचार अनादिकाळापर्यंत शेतकरी पाईकांना प्रकाशवाट दाखवून शेतकरी चळवळीचे नेतृत्व करत राहील यात शंका नाही. २० व २१ फेब्रुवारी २०१६ ला संपन्न झालेल्या नागपूर येथील दुसर्‍या अ.भा.मराठी शेतकरी संमेलनाने त्यांना युगात्मा ही मरणोत्तर लोकउपाधी प्रदान केली आणि त्यांच्या चरणी भावना अर्पण केली की,

एक युग कवेत घेतले म्हणून तू युगात्मा.
एक युग घडवले म्हणून तू युगात्मा.
स्वातंत्र्योत्तर भारतातील सगळ्यात मोठी
लोकचळवळ उभी केली म्हणून तू युगात्मा.
शेतीचा प्रश्न या मातीचा कळीचा मुद्दा होता
ती कळ तुला सापडली म्हणून तू युगात्मा.
तुझ्या शत्रूलाही तुझे श्रेय नाकारता आले नाही
नंतर नंतर तर सगळे पक्ष आणि संघटना
तुझीच भाषा बोलायला लागले म्हणून तू युगात्मा
ऊठ म्हणालास… उठले युग, चाल म्हणालास चालायला लागले
तुझी पाहून जादू मग ब्रह्मांडही हलायला लागले
युगायुगानंतर येतो असा युगावर मिळवणारा ताबा.
शरद जोशी तुला युगात्मा नाही म्हणायचं
तर काय म्हणायचं बाबा?

– गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

लासलगाव रेल्वे रोको आंदोलन

लासलगाव रेल्वे रोको आंदोलन
 
             कांदा आणि बटाटा या शेतमालाची जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमधून मुक्तता करणे, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीवरील वीजपंपाची संपूर्ण वीजबील मुक्ती, कांद्याच्या बाजारपेठेत सरकारचा हस्तक्षेप आणि तंत्रज्ञानावर बंधने नको, या प्रमुख मागण्या ऐरणीवर आणून केंद्र शासनाच्या कांदा-बटाटा विषयक धोरणाला जोरदार हादरा देण्यासाठी आशिया खंडातली कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे दिनांक १४ ऑगष्ट २०१४ ला दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत १ तासाचे रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. श्री. शरद जोशी यांनी केले.
 
             लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून दीड किलोमीटर अंतरावरील लासलगाव रेल्वेस्थानकापर्यंत शेतकरी संघटनेचे सहा हजार आंदोलक पाईक घोषणा देत प्रचंड मिरवणूक काढून गेले व रेल्वेट्रॅकवर ठाण मांडून बसले. सुमारे एक तास मनमाड-इगतपुरी ही शटल रेल्वे गाडी अडविण्यात आली. रेल्वेट्रॅकवर पत्रकारांशी वार्तालाप करताना मा. शरद जोशी म्हणाले की, सत्तेवर येताच मोदी सरकारने शेतकरीविरोधी धोरणांचा सपाटा लावला आहे. कांद्याचे निर्यातमूल्य वाढविल्यामुळे कांदा २०० ते ३०० रुपयांनी घसरला असून यापुढे कांदा उत्पादकांचा शासनाने अंत पाहू नये अन्यथा १९८० सालच्या आंदोलनाची पुनरावृत्ती करीत राज्यव्यापी रेल व रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीचे स्वातंत्र्य असले पाहिजे. मोदी सरकार वांधा करणारा निर्णय घेणार असेल तर शेतकरी मतपेटीतून त्याचा रोष प्रकट करतील आणि त्याचे गंभीर परिणाम मोदी सरकारला भोगावे लागतील, त्यामुळे निर्णयाचा फेरविचार करण्याचे त्यांनी मोदींना आवाहन केले.
 
             पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, उपअधीक्षक माणुरी कांगणे, चंद्रमोहन मिश्रा, ए.के. स्वामी यांचेसह आंदोलनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रेल्वे स्टेशनला छावणीचे स्वरूप आलेले होते तरीही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शांततेने व अहिंसेच्या मार्गाने आंदोलन यशस्वी करून दाखविले. शेतकरी देशाचा खराखुरा राजा असून तो देशाच्या साधनसंपत्तीची नासधूस करीत नाही. जाळपोळ, आगी लावणे, लूटमार करणे, दगडफेक करणे हे सच्च्या शेतकर्‍याला आवडत नाही, हे या शांततापूर्ण रेल्वे रोको आंदोलनाने सिद्ध केले. खरंतर रेल्वे अडवणे हेही शेतकर्‍यांचे काम नाहीच पण;
 
आसुड उगारणारा माझा स्वभाव नाही
पण; वेळ आणली या मग्रूर लांडग्याने
 
असे स्वत:च्या मनाशी म्हणतच तो नाईलाजाने रस्त्यावर उतरत असतो. पण नाईलाजाने का होईना पण जेव्हा केव्हा उतरतो तेव्हा तेव्हा शासनसत्तेला हादरवून सोडतो. तद्वतच याही प्रसंगी शेतकरी संघटना, शरद जोशी जिंदाबाद आणि प्रमुख मागण्यांच्या घोषणांनी त्यांनी परिसर दुमदुमून टाकला होता.
 
             मा. शरद जोशी यांच्या नेतृत्वात सर्व आंदोलनकर्ते अपसाईडच्या लूप लाईनवर ठिय्या मांडून बसले. मनमाड-इगतपुरी शटलचे आगमन होताच इंजिनवर बसून कार्यकर्त्यांनी गाडी रोखून धरली. शेतकर्‍यांनी गळ्यात कांदा, बटाट्याच्या माळा घालून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी रेल्वेगेट बंद असल्यामुळे मनमाड लासलगाव मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे रस्ता रोकोही अनायासे सफल झाला होता. ठीक ४ वाजता या आंदोलनाचे सेनापती गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी छोटेखानी समयोचित भाषण करून सर्व आंदोलकांचे व उत्तम तर्‍हेने परिस्थिती हाताळल्याबद्दल पोलिस खात्याचे आभार मानले व रेल्वे रोको आंदोलन समाप्तीची घोषणा केली.
 
             तत्पूर्वी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दुपारी १२ वाजता कांदा उत्पादक शेतकरी मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला मार्गदर्शन करताना मा. शरद जोशी म्हणाले की, केंद्र शासनाचे कृषी विषयक धोरण शेतकरीविरोधी असून मागील सरकारचीच धोरणे मोदी सरकार पुढे नेत आहे. कांदा, बटाट्यासारख्या नगदी पिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करणाऱ्या शुद्ध हरवलेल्या सरकारच्या नाकाला आता कांदा फोडून लावण्याची वेळ आली आहे. सरकारने शेतकर्‍यांचा अधिक अंत न पाहता कांदा व बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून त्वरित वगळला पाहिजे. शेतमालाला खुल्या बाजारपेठेचे स्वातंत्र्य व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य अशी शेतकरी संघटनेची दोन प्रमुख उद्दिष्टे असून कोणत्याही सरकारने शेतमालाच्या बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करू नये. कांदा, बटाट्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत घातल्याने या दोन्ही शेतमालाची वाहतूक करता येत नाही, उत्पादनावर बंधने आली आहेत, प्रक्रियेवर बंधने आली आहेत व साठवणुकीवर बंधने घालण्यात आली असल्याने ते आम्हाला मान्य नाही. केंद्रातील भाजप सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबवून शेतकर्‍यांवर अन्याय करीत असून, या सरकारचे पानिपत करण्याची ताकद शेतकरी संघटनेत आहे. कांदा हा जीवनावश्यक नसून, कांदा न खाल्ल्याने आजपर्यंत कोणी दगावला आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कृषी क्षेत्र दिवसेंदिवस संकुचित होत असून, त्यात होणारी वाढ असून नसल्यासारखी आहे. दुसरीकडे लोकसंख्या भूमितीय पद्धतीने वाढत असून, ४०० पट वाढलेल्या लोकसंख्येला पुरेल एवढा अन्नसाठा शेतकर्‍यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर उभा करून दाखविला म्हणून ही लढाई तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. केवळ शेतकर्‍यांमध्ये जागृती करून शेतकरी संघटना थांबणार नाही, तर शेतकर्‍यांना बाजारपेठेचे स्वातंत्र्य व तंत्रज्ञान मिळावे, यासाठी शेतकर्‍यांचा पक्ष स्थापन करण्याचे संघटनेने ठरवले आहे. मात्र या आंदोलनात महिलांचा सहभाग नसल्याबद्दल मा. शरद जोशी यांनी खंत व्यक्त केली.
 
             लासलगाव येथे शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारलेल्या रेलरोको आंदोलनापूर्वी बाजारसमितीमध्ये झालेल्या विराट सभेच्या व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष डॉ. मानवेंद्र काचोळे, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष अ‍ॅड दिनेश शर्मा, अ‍ॅड वामनराव चटप, रवी देवांग, रामचंद्रबापू पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा शैलेजा देशपांडे, स्मिता गुरव, निर्मलाताई जगझाप, अर्जुन तात्या बोराडे, देविदास पवार, संजय कोल्हे, तुकाराम निरगुडे आदी शेतकरी संघटनेचे नेते उपस्थित होते. प्रारंभी लासलगाव बाजार समितीत सभापती नानासाहेब पाटील यांनी शरद जोशी व इतर पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
 
             आंदोलनात किसनराव कुटे, शिवाजीराव राजोळे, दत्तात्रय मोगल, शंकरराव पूरकर, सांडूभाई शेख, भास्कर सोनवणे, शांताराम जाधव, फुलाआप्पा, बाबासाहेब गुजर, विष्णू ताकाटे, रामकिसन बोंबले, डॉ. श्याम आष्टेकर, गिरिधर पाटील, भानुदास ढिकले, केदू बोराडे, विलास देशमाने, मधुकर हांबरे, प्रभाकर हिरे, अशोक भंडारी, सुभाष गवळी, सुरेश जाधव, सोपान संघान, विशाल पालवे, लक्ष्मण मापारी, विनोद पाटील, संतू झांबरे, शिवाजी राजोळे आदींसह देवळा, कळवण, लासलगाव, सटाणा, तसेच धुळे जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
 
             कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या खांद्याला खांदा लावून समर्थन देण्यासाठी आंदोलनात संपूर्ण राज्यभरातून शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते. परभणीवरून श्री गोविंद जोशी, राम शिंदे, प्रल्हाद बारतले, मदन शिंदे, शेषराव राखुंडे, वर्ध्यावरून गंगाधर मुटे, सतीश दाणी, धोंडबा गावंडे, शांताराम भालेराव, गणेश मुटे, अशोक कातोरे, मनोहर जयपूरकर, गोपाल चदनखेडे, अमरावतीवरून श्रीकांत पाटील पुजदेकर, राजेंद्र आगरकर, जालन्यावरून पुंजातात्या, लातूरवरून मदन सोमवंशी, माधव मल्लाशे, माधव कल्ले, बुलढाण्यावरून दामोदर शर्मा, समाधान कणखर, सादीक देशमुख, नामदेव जाधव, भिकाजी सोलंकी, शेषराव साळके, प्रल्हाद सोनुने, जळगाववरून कडुआप्पा पाटील, उल्हास चौधरी, मधुकर वेडु पाटील, धुळ्यावरून शांतुभाई पटेल, गुलाबसिंग रघुवंशी, ए.के.पाटील, आत्माराम अण्णा पाटील, सांगलीवरून शितल राजोबा, सिंधुताई गुरव, सिंधू कोळी, नवनाथ पोळ, रामचंद्र कनसे, अण्णासो पाटील, सातार्‍यावरून ज्ञानदेव सकुंडे, बाळासाहेब चव्हाण, कोल्हापूरवरून अण्णासो कुरने, अनिल पाटील, अरुण सावंत, पूण्यावरून लक्ष्मण राजणे यांनी आंदोलन सफ़ल करण्यात मोलाची भूमिका पार पाडली.
 
             या रेलरोको आंदोलनाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता गेल्या काही काळापासून सुस्त पडलेल्या नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेला या आंदोलनाने प्रचंड उर्जित अवस्था प्राप्त झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी भविष्यकाळासाठी आश्वस्त झाल्यासारखा भासत होता.
 
                                                                                                                     गंगाधर मुटे
                                                                                                     महासचिव, स्वभाप, महाराष्ट्र प्रदेश
—————————————————————————————————————————–
चित्रवृत्तांत :
 
lasalgaon rail roko
लासलगाव रेल्वेरोको आंदोलन
————————————————————————————————————

lasalgaon rail roko

लासलगाव रेल्वेरोको आंदोलन

————————————————————————————————————
lasalgaon rail roko
लासलगाव रेल्वेरोको आंदोलन
————————————————————————————————————
lasalgaon rail roko
लासलगाव रेल्वेरोको आंदोलन
————————————————————————————————————
lasalgaon rail roko
लासलगाव रेल्वेरोको आंदोलन – प्रचंड पोलिस बंदोबस्त
————————————————————————————————————
lasalgaon rail roko
लासलगाव रेल्वेरोको आंदोलन – शेतकरी रुळावर ठिय्या देऊन बसले
————————————————————————————————————
lasalgaon rail roko
शिस्तबद्ध मोर्चा काढून आंदोलक शेतकरी रेल्वेकडे जाताना
————————————————————————————————————
lasalgaon rail roko
आंदोलनापूर्वी झालेल्या सभेस मार्गदर्शन करताना मा. शरद जोशी
————————————————————————————————————
lasalgaon rail roko
स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष आंदोलकांना मार्गदर्शन करताना
————————————————————————————————————
lasalgaon rail roko
आंदोलन शिस्तीत आणि शांततेत पार पडले पाहिजे, याविषयी सुचना देताना माजी अध्यक्ष श्री रवी देवांग
————————————————————————————————————
lasalgaon rail roko
उपस्थित विराट आंदोलकसमुदाय
————————————————————————————————————
lasalgaon rail roko
कानात तेल ओतून आपल्या प्राणापेक्षा प्रिय साहेबांचे विचार ऐकताना उपस्थित पाईक
————————————————————————————————————
 

संघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे – शरद जोशी

संघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे
                                                                                      – शरद जोशी

 
             आज पिंपळगावला या बैठकीसमोर बोलताना माझ्या मनात दोन विचार येतात. पहिला विचार हा की ज्यांच्याबरोबर सगळं आंदोलन उभं राहिलं ते माधवराव मोरे जर का आज इथे हजर असते तर मोठी मजा आली असती. त्यांची प्रकृती बरी नाही, ते अगदी आजाराने झोपून असल्यामुळे ते इथे येऊ शकले नाही. त्यांच्या वतीने मी तुमची सगळ्यांची माफी मागतो. शेतकरी संघटनेचे आंदोलन चाकण येथे १९७८ साली सुरू झालं आणि तेव्हाच्या आंदोलनाची तत्त्व फार सोपी होती. सगळ्या शेतकर्‍यांना घामाचे दाम मिळायला पाहिजे हे तत्त्व नंबर एक आणि घामाचे दाम कसे मिळाले पाहिजे त्या साठी सोपी उपाय सांगितले ते तत्व नंबर म्हणजे दोन. पाहिली गोष्ट म्हणजे सरकारने बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करता कामा नये, हात घालता कामा नये. कांद्याला काय भाव मिळायचा तो मिळेल; कमी मिळाला तरी चालेल, जास्त मिळाला तर आनंदच आहे परंतु सरकारने भाव पाडण्यासाठी काही करू नये, हा पहिला सिद्धांत. दुसरा सिद्धांत असा की, शेतीमध्ये उत्पादन किती निघतं, उत्पादन किती निघतं हे जमिनीबरोबरच शेतीला तुम्ही कोणतं खत, औषध वापरता, तंत्रज्ञान कोणतं वापरता यावर सगळं उत्पादन अवलंबून असतं. त्याचप्रमाणे सरकारनं बाजारपेठेमध्ये हात घालू नये, तंत्रज्ञानाच्या व्यवस्थेमध्ये हात घालू नये आणि सरकारने एवढे जरी केले तरी शेतीमालाला आपोआपच घामाचे दाम भरून मिळेल. हे तीन तत्त्व घेऊन त्यावेळी आपण शेतकरी संघटना स्थापन केली.

                सटाण्याला जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये संघटनेची राजकीय भूमिका सांगताना मी असं म्हटलं की आपल्या उरावरती एक चोर बसलेला आहे. त्याला जर उठवायचं असेल तर त्याच्यावर एक उपाय असा आहे की दुसऱ्या चोराची मदत घ्यायची आणि पहिल्याला हाकलून द्यायचं. पहिल्या चोराला उठवलं म्हणजे आपण कोलांडी उडी मारून त्या दुसर्‍या चोरालाही हाकलून लावू शकतो. २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत जे काही झालं त्याच्यामध्ये लोकांची कल्पना अशी आहे की या मोदी सरकारला लोकांनी फार मोठ्या संख्येनी निवडून दिलं, त्याला ३००-४०० जागा मिळाल्या, त्याकाही आपोआप मिळालेल्या नाहीत. मी तुम्हाला सांगतो की, शेतकरी संघटनेच्या सटाणा अधिवेशनामध्ये जो निर्णय झाला होता. त्या निर्णयाप्रमाणे म्हणजे एका चोराला उठवून देण्यासाठी दुसऱ्या चोराची मदत आपण केली त्यामुळे आता दुसर्‍या चोराला विजय मिळाला हे सर्वांनी कबूल केलेले आहे. पण त्याचा अर्थ असा की एका चोराला आपण बाजूला काढलं. पहिल्यांदा गोरा इंग्रज आला त्या गोर्‍या इंग्रजाला काढून त्याजागी काळा इंग्रज आला. काळ्या इंग्रजाला काढून आता तिसरा इंग्रज आला आहे, त्यालाही बाजूला काढून ठेवण्यासाठी काय व्यवस्था करायची आहे, ते मला सांगायचे आहे.

                परंतु; हा विषय फार कठीण आहे. उदाहरणार्थ कांद्याला नव्या केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूच्या यादीमध्ये घातलं. कांदा ही जीवनावश्यक वस्तू नाही. कांदा खायला मिळाला नाही तर लोकांचा जीव कदाचित कासाविस होईल हे खरं; पण कांदा न खाल्ल्यामुळे कुणाचा जीव गेला असं कधी घडलेलं नाही. याउलट माझ्याजवळ शंभरपेक्षा जास्त औषधांची यादी आहे ती औषधं जीवनावश्यक वस्तुच्या यादीमध्ये घातली असती तर उपयोगाचे झाले असते. मी पूर्वी सांगायचो की, चाकणच्या बाजारामध्ये एखादी बाई आणि तिचा मुलगा डॉक्टर कडे जाते आणि डॉक्टरला म्हणते की पोराला ताप चढलाय, डॉक्टर मुलाला तपासतो व म्हणतो की तुम्ही पोराला आधी का नाही आणलंत? आता त्याला फार ताप चढला आहे. मग डॉक्टर चिठ्ठी लिहून देतो, ती बाई चिठ्ठी घेऊन दुकानामध्ये जाते आणि औषधाची किंमत फार तर सध्याच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ६७ रुपये असं सांगितलं तर ती बाई म्हणते की मला ते परवडणार नाही आणि मग ती पोराला घेऊन पायऱ्या उतरून खाली जाते आणि मग ते तापाने तडफणार पोर तसंच पडलेलं असते.

                ज्या सरकारला जीवनावश्यक वस्तूमध्ये औषधं घालायचं सुचत नाही ते सरकार कांद्याला मात्र जीवनावश्यक वस्तूच्या यादीत धरते. याचा अर्थ काय? पहिलं अर्थ असा की तुम्हाला किती उत्पादन करायचं याचा अधिकार तुम्हाला नाही, सरकार ते ठरवणार. सरकारने तुम्हाला सांगितलं की कांदा इतका नाही इतका पिकवायला पाहिजे तर तो तुम्हाला पिकवावा लागेल. दुसरी गोष्ट अशी की वाहतूक करता येणार नाही, साठवणूक करता येणार नाही, त्याच्यावर प्रक्रिया करता येणार नाही, एवढेच नाही तर कांद्याची निर्यात सुद्धा करता येणार नाही. कांद्यावर इतकी बंधने घातली याचा अर्थ सरकारने बाजारपेठेमध्ये हात घातला. एवढेच नव्हे तर मला असे सांगायचे आहे की डब्ल्यूटीओला विरोध करून या मोदी सरकारने केवळ देशातल्या बाजारपेठेमध्येच नव्हे तर परदेशातल्या बाजारपेठेमध्ये सुद्धा ढवळाढवळ केली आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत पण सरकार हस्तक्षेप करत आहे आणि त्याच मूळ स्वदेशी जागरण मंच व भारतीय किसान संघ या संघपरिवाराच्या संघटना यांच्यामध्ये दडलेलं आहे.

                अशी कित्येक औषधे आहेत की जिच्यामध्ये जीन तंत्रज्ञान वापरलं जातं. उदा. साखरेचा त्रास कमी करण्या करिता ईन्सुलिन ज्या तंत्रज्ञानाने तयार होते तेच तंत्रज्ञान शेतीच्या बाबतीत मात्र आणायला मात्र सरकारने बंदी आणली आहे. नवीनं पंतप्रधानाला आपण निवडून दिलं, त्यांच्याकडून आपल्या काही पुष्कळशा अपेक्षा होत्या आणि आहेतही पण काही दृष्ट मंडळी त्यांच्याभोवती बसलेली आहे. स्वदेशी जागरण मंच आणि भारतीय किसान संघ या लोकांनी नरेंद्र मोदीला वेढून टाकलेलं आहे आणि नरेंद्र मोदीची यातून सुटका करणे हे आपलं शेतकर्‍यांचं कर्तव्य आहे आणि आपण त्यांची सुटका करणार आहोत हे नक्की.

                आतापर्यंत अनेक वेळा मी तुम्हाला आदेश दिला आणि तुम्ही तो पाळलेला आहे, हे मला मान्य आहे. आता मी थोडक्यात मांडतो आहे ते येवढ्याकरिता की आतापर्यंत सर्वच वक्त्यांनी एवढी तेजस्वी भाषणे केली आहेत की त्याच गोष्टी मी पुन्हा पुन्हा सांगावं असा मला वाटत नाही. परंतु जर का काही करायचं असेल आणि त्यांच्यामध्ये नाशिक जिल्ह्याची भीती दिल्लीला फ़ार आहे. कालच्या सभेत मी खुर्चीवर बसून बोललो. पुंजाजी गोवर्धने ज्यांनी भाताचे आंदोलन पहिल्यांदा सुरू केलं आणि ते यशस्वी करून दाखवलं, त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि ते प्रकाशन करताना मी खुर्चीवर बसलेलो होतो. उभे राहून बोलण्याची माझी ताकत नव्हती. पण आज तुमच्या सगळ्या लोकांचा उत्साह पाहिला आणि असं वाटलं की खुर्चीवर बसून बोलणं काही योग्य नाही. तुमच्या सगळ्यांचा उत्साह पाहिल्यानंतर तुमच्या उत्साहाला प्रतिसाद देण्याकरिता निदान आजच्या दिवस तरी मी उभं राहून बोललं पाहिजे. मला अगदी पाहिल्यासारखं शांत स्वरात बोलता येत नसलं तरी मी जे काही बोलणार आहे ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न कराल याची मला खात्री आहे.

                आपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो थोडक्यात सांगतो. पहिली गोष्ट अशी की हा प्रश्न मुंबईला सुटणारा नाही. हा प्रश्न आपल्याला दिल्लीला मांडायचा आहे आणि त्याच्याकरिता आपल्याला नाशिक मधील जास्तीत जास्त मंडळीला दिल्लीला येण्याचे मी आवाहन करतो. त्यासोबतच येत्या १० नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात पिंपळगावला किंवा जवळपास जिथे कांद्याचा प्रश्न ज्वलंत आहे तिथे शेतकरी संघटनेचं अधिवेशन घेतलं जावं. संघटनेचं अधिवेशन आपण केव्हा घेतो? जेव्हा फार मोठा प्रश्न उभा राहतो आणि निर्णय घेणं कार्यकारिणीला शक्य नसतं त्यावेळी आपण अधिवेशन घेतो. हा प्रश्न खरंच मोठा आहे. आता आपण एका चोराला छातीवरून उठवून लावलं आणि त्याच्याऐवजी आता दुसरा चोर त्याच पद्धतीने छातीवर बसतो आहे आणि त्याच पद्धतीने शेतकर्‍याचं शोषण चालू ठेवत आहे. हा प्रश्न खरंच खूप आगळावेगळा आहे, नवीनं आहे आणि तो सोडविण्याकरिता आपल्याला स्वतंत्र वेगळं अधिवेशन घ्यायला पाहिजे. त्या अधिवेशनामध्ये जो पाहिजे तो निर्णय होऊ शकतो. ते अधिवेशन पिंपळगाव, लासलगाव किंवा नाशिकच्या आसपास झालं पाहिजे. स्थानिक मंडळींना जी जागा योग्य वाटेल ती निवडावी आणि अधिवेशन १० नोव्हेंबरच्या जवळपास म्हणजे दिवाळीच्या आधी घ्यावं. १० नोव्हेंबर ही तारीख आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे, त्यादिवशी अधिवेशन व्हावं आणि मग दिल्लीला जाण्यांसंबंधीचा निर्णय व्हावा. दिल्लीला जाऊन आपल्याला नरेंद्र मोदीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत स्वदेशी जागरण मंच व भारतीय किसान संघ या संघटनांच्या तावडीतून सोडवायचं आहे हे लक्षात ठेवा. १० नोव्हेंबर नाशिकच्या अधिवेशनामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने यावं आणि ती संख्या इतकी मोठी असली पाहिजे की ती संख्या पाहूनच दिल्लीला घाम सुटला पाहिजे.

                                                                                                                                   – शरद जोशी

(पिंपळगाव बसवंत जि. नाशिक येथील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या बैठकीला संबोधित करतांना मा. शरद जोशी यांनी केलेल्या भाषणाचा सारांश. शब्दांकन – अक्षय मुटे)

————————————————————————————————————————

 

शरद जोशी पुन्हा रणांगणात उतरणार!

शेगाव येथील संयुक्त कार्यकारिणीच्या बैठकीचा वृत्तांत

             दिनांक १० जुलै २०१४ ला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत देशातील एकूण राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि पुढील आंदोलनाची रणनीती ठरविण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटनेची बलस्थाने असलेल्या काही मोजक्या जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

Sharad Joshi

             राज्यावर येऊ घातलेले दुष्काळाचे सावट, दुबार पेरणीचे उद्भवलेले संकट त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍याची परिस्थिती बघता पीककर्ज, वीजबील, हमीभाव यासंदर्भात महत्त्वपूर्ण आणि सांगोपांग चर्चा करण्यात आली.

Sharad Joshi

आंदोलनाची दिशा : 

             बैठकीला संबोधित करताना मा. शरद जोशी म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुल्यांची एका बाबतीत चूक झाली, त्यांनी असे मानले की ब्राम्हण-भटजी कारकुनांऐवजी जर शेतकर्‍याच्या जातीचे, त्यांच्या नात्यागोत्यातले कारकून आलेत तर ते शेतकर्‍यांशी जास्त सहानुभूतीने वागतील आणि पिळवणूक कमी होईल पण आता क्रित्येक ठिकाणी भट कारकून गेलेत आणि त्यांच्या ऐवजी शेतकर्‍याच्या जातीचे कारकून आलेत, पण शेतकर्‍यांची पिळवणूक काही कमी झाली नाही, याउलट ते भटकारकुनांपेक्षा जास्त जोमाने व ताकदीने दुष्टपणे पिळायला लागले आहेत.
             मी १९८० सालच्या भाषणात सांगत असे की, साखर, कांदा, बटाटा ही काही जीवनावश्यक वस्तू आहे काय? साखर, कांदा, बटाटा खाल्ला नाही तर माणूस मरत असतो काय? उलट साखर खाल्ल्यामुळे लोकांना डायबिटीस व्हायची भिती असते. डायबिटीसने मरण्याची शक्यता असते. उलट औषधाच्या गोळ्या माणसाचा जीव वाचवतात पण औषधाच्या गोळ्यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश नाही. काँग्रेसही तेच करत होती आणि नरेंद्र मोदी तुमच्या-आमच्या शेतकर्‍यांच्या जातीचे असले तरी तेच करत आहेत. त्यामुळे आता आपल्याला आंदोलनाच्याच मार्गाने जावे लागणार आहे.

             नाशिक येथे ३ ऑगष्टला पुंजाभाऊ खोत यांच्या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा आहे, या कार्यक्रमात मी पुढील आंदोलनाची घोषणा करणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक येथेच ४ ऑगष्टला कांदा उत्पादक शेतकरी मेळावा आहे. कांदा व बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून काढून टाकावा यासाठी, सत्ताधार्‍यांना हादरा बसेल असे आंदोलन मी जाहीर करणार आहे. मी शरीराने थकलो असलो तरी मनाने थकलेलो नाही. रस्ता रोको आणि रेल्वे रोको आंदोलनाचे प्रत्यक्ष रणांगणात उतरून मी नेतृत्व करेन, असेही शरद जोशींनी जाहीर केले.

अर्थसंकल्प २०१४-१५ :

             शेती आणि शेतकरी यांच्यासाठी हा अर्थसंकल्प निराशाजनक व डोंगर पोखरून उंदीरही निघू नये असा आहे. ‘भारत’ आणि ‘इंडिया’ यांच्या लढाईत भारत पराभूत झाला आहे. दुस-या महायुद्धानंतर युरोपातील राष्ट्रांच्या पुनरुत्थानासाठी ज्याप्रमाणे ‘मार्शल प्लान’ अमलात आणला गेला त्याप्रमाणे, शेतक-यांना शेती करण्यास हुरूप वाटेल अशा प्रकारच्या इंडियन मार्शल प्लानची आवश्यकता आहे. असा काही प्लान सरकारचा समोर असल्याचे दिसत नाही. शेतीसंदर्भात या अर्थसंकल्पात काही रस्ते आखून दिले आहेत; त्यावर मार्गक्रमण कसे होते ते बघावे लागेल. अशी प्रतिक्रिया केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्प २०१४-१५ वर बोलताना शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी व्यक्त केली.

Sharad Joshi

शरद जोशी यांची जामिनावर सुटका :

             शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांची बुधवारी न्यायालयाने जामिनावर सुटका केली. सन २०१० साली शेगाव येथे एका कार्यक्रमात चिथावणी देणारे भाषण केल्याने शेतकर्‍यांनी शेगावात रेल रोको केल्याच्या त्यांच्यासह ९ जणांवर आरोप आहे.

             ११ ऑक्टोंबर २०१० साली शेगाव येथे शेतकरी संघटनेने शेतकर्‍यांचा मेळावा आयोजित करण्यात आले होते. स्व.गजाननदादा पाटील मार्केट यार्डात पार पडलेल्या या मेळाव्यात शेतकरी नेते शरद जोशी यांनी आपल्या भाषणातून शेतकर्‍यांना लगेच रेल रोको सुचविल्या नंतर हजारो शेतकर्‍यांनी शेगावचे रेल्वेस्थानक गाठून ३ तास रेल रोको केले. या प्रकरणात शरद जोशी यांच्या सह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी वामनराव चटप, रवी देवांग, नामदेव जाधव, अनिल घनवट, सरोज काशीकर, शैलेजा देशपांडे आणि कैलास फाटे अशा ९ जणांविरुद्ध शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते.
             तेव्हा पासून या प्रकरणातील ४ आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार होते. बुधवारी या फरार आरोपींपैकी शरद जोशी, वामनराव चटप, रवी देवांग हे पोलीस स्टेशनला हजर झाल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. समाधान कणखर रा. वरखेड यांनी शरद जोशी यांची जामीन घेतली. या प्रकरणात अनिल घनवट रा. श्रीगोंदा जि. अहमदनगर हे आरोपी सद्या फरार घोषित केले आहेत.

                 याच बैठकीत मा. शरद जोशी यांनी शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या नव्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. कार्यकारिणी पुढील प्रमाणे;

स्वतंत्र भारत पक्ष : महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी पुढील प्रमाणे;

१ श्री. अ‍ॅड दिनेश शर्मा (वर्धा)                                 प्रदेशाध्यक्ष

२ सौ. सरोजताई काशीकर (वर्धा)                          प्रदेशाध्यक्ष (महिला आघाडी)

३ श्री. सुधीर बिंदू (परभणी)                                   प्रदेशाध्यक्ष (युवा आघाडी)

४ श्री. गंगाधर मुटे (वर्धा)                                       महासचिव

५ श्री. अनिल धनवट (नगर)                                 उपाध्यक्ष

६ श्री. समाधान कणखर (बुलडाणा)                       उपाध्यक्ष

७ श्री. गुलाबसिंग सुर्यवंशी (धुळे)                          उपाध्यक्ष

८ श्री. उत्तमराव वाबळे (हिंगोली)                         उपाध्यक्ष

९ श्री. प्रभाकर दिवे (चंद्रपूर)                                  उपाध्यक्ष

१० श्री. विजय निवल (यवतमाळ)                         उपाध्यक्ष

११ श्री. महमूद पटेल (सोलापूर)                             सचिव

१२ श्री. दिलीप भोयर (अमरावती)                         सचिव

१३ श्री. शिवाजी शिंदे (नांदेड)                                सचिव

१४ श्री. निवृत्ती कर्डक (नाशिक)                           सचिव

१५ श्री. श्रीकृष्ण उमरीकर (परभणी)                      प्रसिद्धीप्रमुख

१६ श्री. संजय पानसे (मुंबई)                                कोषाध्यक्ष

१७ सौ. अंजलीताई पातुरकर (हिंगोली)                 प्रचार प्रमुख

१८ श्री अ‍ॅड प्रकाशसिंह पाटील (औरंगाबाद)           प्रचार प्रमुख

१९ सौ. जोत्स्नाताई बहाळे (अकोला)                    कार्यकारीणी सदस्य

२० श्री. सतिश देशमुख (अकोला)                          कार्यकारीणी सदस्य

२१ श्री. सुनिल शेरेवार (अमरावती)                        कार्यकारीणी सदस्य

२२ श्री. राजेंद्रसिंह ठाकूर (गडचिरोली)                    कार्यकारीणी सदस्य

२३ श्री. आनंद पवार (परभणी)                              कार्यकारीणी सदस्य

२४ श्री. बाबुराव गोरडे (जालना)                             कार्यकारीणी सदस्य

२५ श्री. कडुअप्पा पाटील (जळगाव)                       कार्यकारीणी सदस्य

२६ श्री. शीतल राजोबा (सांगली)                            कार्यकारीणी सदस्य

२७ श्री. माधव मल्लेशे (लातूर)                              कार्यकारीणी सदस्य

२८ श्री. विठ्ठल पवार (पुणे)                                     कार्यकारीणी सदस्य

***********************

***********************

बरं झालं देवाबाप्पा

बरं झालं देवाबाप्पा…..!

                        दोन दिवसापूर्वी मी एका वृत्तपत्राच्या कार्यालयात गेलो होतो. तिथे काही अनोळखी राजकीय मंडळी बसली होती. माझ्या छातीवरचा बिल्ला बघून चर्चेला तोंड फुटले. तसा हा नेहमीचाच प्रकार आहे. बिल्ला बघितल्याबरोबर काही विशिष्ट लोकांच्या टाळक्यात प्रसुतीवेदनेच्या कळा उठायला लागतात आणि शेतकरी संघटना व शरद जोशी यांच्याविषयी काहीतरी खोचक वाक्य प्रसवल्याशिवाय त्यांचे मन काही शांत होत नाही. लालबिल्लेवालेसुद्धा शरद जोशी नावाच्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याने तितक्याच ताकदीने त्यांचे वार परतवून लावत असतात. विषय आर्थिक असो की सामाजिक, मुद्दा धोरणात्मक असो की तार्किक, शेतकरी संघटनेच्या पाईकाजवळ शेतीच्या अर्थकारणाची जेवढी खोलवर जाणीव आहे तेवढी क्वचितच कुणाकडे असेल. चार वर्ग शिकलेले शेतकरी संघटनेचे पाईक मोठमोठ्या अर्थतज्ज्ञांना निरुत्तर करू शकतात, हे जवळजवळ सर्वमान्य झाले आहे.


                              तर झाले असे की, चर्चेला सुरवात झाली. खरं तर या चर्चेला चर्चेपेक्षा वादविवाद स्पर्धेचे नाव देणे अधिक योग्य राहील. केंद्रसरकारची धोरणं कशी शेतकरी हिताची आहे, कापूस निर्यातबंदीचा निर्णय कसा ग्राहकांच्या हिताचा आहे, हे तो माझ्यावर बिंबवण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु त्या समर्थनार्थ तो ज्या मुद्द्याचा आधार घेत होता ते मुद्दे एवढे तकलादू होते की माझ्या एकाच उत्तराने तो गारद व्हायचा. त्या उत्तरावर प्रतिप्रश्न करण्यासाठी त्याच्या जवळ काहीच उरत नसल्याने मग तो लगेच दुसरा मुद्दा पुढे रेटायचा. सरतेशेवटी केंद्रसरकारच्या धोरणांची बाजू घेऊन आपला टिकाव लागणार नाही हे लक्षात आल्यावर मग चक्क वैयक्तिक पातळीवर घसरणे आणि शरद जोशींवर टीका करणे ही बहुतेकांना सवयच असते तसाच तोही घसरला. पण इथेही त्याचा टिकाव काही लागला नाही. शेवटी युद्धात हार पत्करल्याच्या मानसिकतेने शस्त्र खाली ठेवावीत, अशा हावभावाने त्याने कान पाडले आणि चर्चा संपली. 

                           विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी चर्चा करावयाची असते. चर्चेतून जे सकस, चांगले, अधिक तार्किक असेल ते स्वीकारायचे असते. आपल्या मनातील अर्धवट किंवा कोणत्याही निष्कर्षाप्रत न पोचलेल्या विचारांना अधिक तर्कसंगत करण्यासाठी किंवा एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी चर्चा हे प्रात्यक्षिकासारखे माध्यम ठरू शकते. वादविवादातून आपण जोपासलेल्या विचारांची खोली पडताळण्याची संधी निर्माण होते. चर्चा ही समुद्रमंथनासारखी असते. प्रचंड समुद्रमंथनानंतर जे काही विष किंवा अमृत निघेल तेव्हा त्यातील काय स्वीकारायचे आणि काय अव्हेरायचे, याचा विवेकाच्या आधाराने सारासार विचार करून मग त्यापुढील निर्णय घ्यायचे असतात.

                         परंतु, दुर्दैवाने असे फारसे घडताना दिसत नाही. बहुतांश चर्चा एकतर जिंकण्याच्या, फड गाजवण्याच्या किंवा आपापले घोडे दामटण्याच्या उद्देशानेच केल्या जातात. विधानभवन आणि संसदही याला अपवाद नाही. एखाद्या विधेयकावर किंवा धोरणात्मक मसुद्यावर सांगोपांग चर्चा झाली आणि त्या चर्चेला अनुरूप असे धोरण आखले गेले, असेही फारसे घडत नाही. संसदेतील चर्चा रंगणे म्हणजे आखाड्यात दोन पहिलवानांची कुस्ती रंगावी, अशासारखाच प्रकार असतो. सत्ताधारी पक्ष एका बाजूने तर विरोधी पक्ष दुसर्‍या बाजूने तावातावाने आपापले घोडे दामटत असतात. त्यात विषयाचे मूळ गांभीर्य कुठेच दिसत नाही किंवा उकल करण्याच्या उद्देशाने मुद्देसूद उहापोह होत आहे, असेही दिसत नाही. चर्चेच्या माध्यमातून एखादा जटिल किंवा सर्वसामान्य जनतेच्या जीवनमरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे, असे फारसे कधीच घडत नाही आणि मग,

असे म्हणायची वेळ येते.

                             त्या दिवशी माझ्यावरही तीच वेळ आली होती. त्यामुळे मी केवळ उत्तरे तेवढे देत होतो. तो निरुत्तर होत असला तरी त्याला मात्र माझे म्हणणे पटवून घ्यायचेच नव्हते. त्याला त्याचे विचार, चर्चेच्या नावाखाली माझ्यावर लादायचे होते. विषय शेती आणि शेतकरी असला तरी शेतीचे बरे किंवा वाईट यापैकी काहीतरी व्हावे हा त्याचा उद्देशच नव्हता, केवळ मला हरवून जिंकायच्या ईर्ष्येनेच तो तावातावाने माझ्यावर तुटून पडत होता.

                           फळाच्या अपेक्षेने केलेले कर्म म्हणजे सकाम कर्म आणि फळाची अपेक्षा न बाळगता केलेले कर्म म्हणजे निष्काम कर्म. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत दोनच कर्मयोग सांगितलेत. पण काही माणसं अशीही असतात की “कुठल्याही स्थितीत फळ मिळताच कामा नये, असा पक्का निर्धार करूनच कर्म करतात” त्याला कोणता कर्मयोग म्हणावे, याचा उलगडा बहुतेक भगवान श्रीकृष्णाला सुद्धा झाला नसावा, म्हणून तर त्याने एवढी मोठी गीता कथन करूनही त्यात अशा कर्मयोग्याबद्दल अवाक्षर सुद्धा उच्चारले नाही.

                            वृत्तपत्राच्या कार्यालयातील माझे काम आटोपून मी जेव्हा बाहेर पडत होतो. तेव्हा त्याने परत एकदा उचल खाल्ली अन म्हणाला, “तू शरद जोशींचा आंधळा समर्थक आहेस.” मी मागे वळून पाहिले, स्मित केले, अन पुढे निघून आलो.

                            शरद जोशींचे शिष्य, बगलबच्चे, पित्तू, चमचे ही विशेषणे संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी कुणी ना कुणी यापूर्वी वापरलेलीच आहेत. शेतकरी संघटनेचा मी पाईक आहे, हे प्रत्येक कार्यकर्ता अभिमानाने सांगतच असतो. पण आंधळा समर्थक हे विशेषण माझ्यासाठी नवीन होते. शेतकरी संघटनेच्या विचारांवर माझी श्रद्धा आहे, शरद जोशींनी दिलेल्या “शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव” या एककलमी कार्यक्रमाचा मी समर्थक आहे. मात्र डोळस समर्थक की आंधळा समर्थक, याचा मी कधी विचारच केला नव्हता. गावाच्या गरिबीचे शाळेतील गुरुजनांनी सांगितलेले कारण, महाविद्यालयात प्राध्यापकांनी आणि लायब्ररीतील पुस्तकांनी वर्णन केलेले कारण यापेक्षा शरद जोशींनी सांगितलेले कारण हे अधिक प्रामाणिक, तर्कशुद्ध आणि वास्तवाच्या जवळ जाणारे असल्याने ते मला पटले होते. याच कारणाने मी अल्पवयातच शेतकरी संघटनेकडे खेचल्या गेलो, हे मला माहीत होते. तरीही मी आंधळा समर्थक तर नाहीना? या विचाराने मला ग्रासायला सुरुवात केली होती. श्रद्धा की अंधश्रद्धा, आंधळा समर्थक की डोळस समर्थक हे सिद्ध करण्यासाठी काही शास्त्रशुद्ध फूटपट्ट्याही उपलब्ध नाहीत. आपापल्या सोयीनुसार, कुवतीनुसार व आकलनशक्तीनुसार प्रत्येकजण यासंबंधात वेगवेगळ्या फूटपट्ट्या ठरवीत असतो. या फूटपट्ट्यांचे निकषही व्यक्तीसापेक्ष किंवा समूहासापेक्ष असतात. त्यामुळे या अशास्त्रीय फूटपट्ट्यांनी माझ्या गोंधळात आणखीच भर घातली. मग त्या रात्री काही केल्या झोपच येईना. 

                          आणि अचानकच मला एक फूटपट्टी गवसली. आंधळे की डोळस याचा हमखास निकाल लावून देणारे सूत्र गवसले.

                               गेल्या तीस-बत्तीस वर्षातील शेतकरी संघटनेची वाटचाल ही एकखांबी तंबूसारखीच राहिली आहे. शेतकरी संघटना म्हणजे शरद जोशी आणि शरद जोशींचे विचार म्हणजेच शेतकरी संघटनेचे विचार. जेव्हा जेव्हा शेतकरी संघटनेला राजकीय स्वरूपाचे किंवा अत्यंत महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा तेव्हा शेतकरी संघटनेने अधिवेशन बोलावून खुलेपणाने चर्चा घडवून आणली. अधिवेशनाच्या पहिल्याच सत्रात शरद जोशींनी बीजभाषण करायचे आणि मग त्यावर प्रतिनिधींनी चर्चा करायची. शरद जोशींनी केलेले बीजभाषण शेतकरी प्रतिनिधींना खूप रुचायचे, शरद जोशींच्या शब्दामध्ये शेतीची दशा पालटवण्याचे सामर्थ्य दिसायचे आणि मग त्या बीजभाषणाला एवढे समर्थन मिळायचे की शरद जोशींचे वाक्य हेच ब्रह्मवाक्य ठरायचे. शेतकरी संघटनेच्या पहिल्या/दुसर्‍या फळीतील काही नेते मंडळी वेगळाच किंवा अगदीच उलट सूर काढायचीत पण त्याला अजिबातच समर्थन न मिळाल्याने ते मुद्दे आपोआपच बाजूला पडायचे. विचार शरद जोशींचेच पण त्याला लोकमान्यता मिळाल्याने ते विचार शेतकरी संघटनेचे विचार ठरायचे. महत्त्वाचे निर्णय शरद जोशींचेच असले तरी ते अधिवेशनाच्या माध्यमातून जनमान्यता पावल्याने त्याला लोकशाही प्रक्रियेचे अधिष्ठान प्राप्त व्हायचे आणि म्हणूनच अधिवेशनात घेतलेले सर्व निर्णय शेतकरी संघटनेच्या पाईकांनीच घेतले होते, असे म्हणावे लागेल.

                              आंधळे की डोळस याचा हमखास निकाल लावून देणारे मला गवसलेले सूत्र असे की, आजपर्यंतच्या शेतकरी संघटनेच्या प्रवासात जेवढे काही निर्णय घ्यायची वेळ आली आणि निर्णय घेतले गेले, ते निर्णय जर मला अजिबात चुकीचे वाटत नसेल किंवा योग्यच वाटत असेल तर मला ते योग्यच का वाटतात, याचा शोध घेणे गरजेचे ठरते. ते मला मनोमन पटले म्हणून मी समर्थन केले की केवळ शरद जोशींवर नितांत श्रद्धा आहे म्हणून मी डोळे मिटून समर्थन केले? याचा जर शोध घ्यायचा असेल तर “शरद जोशी ऐवजी जर मी असतो तर काय निर्णय घेतले असते, असा विचार करून शक्यता पडताळून पाहणे” यापेक्षा अधिक चांगला दुसरा मार्ग असू शकत नाही. मी जेव्हा असा विचार करतो तेव्हा असे दिसते की, अनेक निर्णय मी तसेच घेतले असते, जसे शरद जोशींनी घेतले आहेत. त्यात मला आजवर कुठलाच विरोधाभास आढळला नाही. मला असा एकही निर्णय दिसत नाही की येथे शरद जोशींचे चुकले, असे मी म्हणू शकेन. मात्र असे काही निर्णय आहेत की, मी अगदी त्याच्या उलट निर्णय घेतले असते, असे मला वाटते. जसे की, जर अभ्यास आणि आकलन शक्तीच्या बळावर निर्णय घ्यायची माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ आली असती तर मी डंकेल प्रस्तावाला, गॅट कराराला, बिटी तंत्रज्ञानाला, मुक्तअर्थव्यवस्थेला कडाडून विरोध केला असता.

                        मी नक्की असेच केले असते कारण की मी आयुष्यातले १६-१७ वर्ष शाळा-कॉलेजात शिक्षण घेण्यात खर्ची घालवले, अवांतर साहित्याची पुस्तके वाचून डोळेफ़ोड केली, पुढार्‍यांची भाषणे मन लावून कानात तेल ओतून ऐकलीत; त्याबदल्यात या सर्वांनी मिळून त्यांना ऐदीने जीवन जगता यावे यासाठी शेतीला लुटून आपापले ऐश्वर्य वाढविण्यासाठी त्यांचा एक हस्तक/दलाल म्हणून मला घडविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. सरकार हे शेतकर्‍यांसाठी मायबाप असते व व्यापारी मात्र लुटारू असून ते पावलोपावली शेतकर्‍यांची लूट करतात, असेच माझ्या मनावर ठसविण्यात या शिक्षणप्रणालीने कुठलीच कसर बाकी ठेवली नव्हती. शरद जोशी जर भारतात आले नसते आणि या शेतीच्या लुटीच्या रहस्याचा सप्रमाण भेद जर शेतकरी समाजासमोर खुला केला नसता तर आमच्या सारख्या शेतकरीपुत्रांना मुक्तअर्थव्यवस्थेतच शेतकर्‍यांचे हित आहे हे कधी कळलेच नसते.

                       शेतकरी संघटनेचा विचार कानात पडला आणि माझ्या आयुष्याची दिशा बदलली. हे गमक ज्याक्षणी मला कळले त्याच क्षणी मुखातून शब्द बाहेर पडले होते,

                       संघटना शेतकर्‍यांची असली तरी या संघटनेचा विचार केवळ शेतकर्‍यांचे हित साधण्यापुरताच मर्यादित नाही. शेतकरी संघटनेने देश वाचविण्याचा विचार मांडला आहे. हा विचार म्हणजे अनेक तुकडे एकत्र करून बांधलेल्या गोधड्यांचे गाठोडे नसून एकाच धाग्याने विणलेले महावस्त्र आहे. बेरोजगारी पासून महागाईपर्यंत सर्व समस्यांचे निराकरण करण्याची ताकद या विचारसरणीत आहे. संघटनेचा विचार म्हणजे एक मार्ग आहे. ज्याला ज्याला संघटना कळली त्या सर्वांची वाटचाल ह्याच मार्गावरून व्हायला हवी. विचारधारेतच दिशानिर्देशन करायचे सामर्थ्य असेल तर त्या विचाराशी बांधिलकी जोपासणारे एकाच मार्गाने जात आहे, असे म्हणावे लागेल. त्यात कुणी कुणाचे अंधानुकरण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 
                १९८० च्या सुमारास संघटना, चळवळ आणि संप-आंदोलनाचे पेवच फुटले होते. शिक्षकांचा संप, कामगारांचा संप, आसामचे आंदोलन, कर्मचार्‍यांच्या संघटना, हमालांच्या संघटना, उग्रवादी चळवळीमध्ये बोडोलॅन्ड, नागालॅन्ड, काश्मीर, खलिस्तान वगैरे. कुणाच्याच पदरात काहीच न पडताच या सर्व चळवळी संपून गेल्यात. फक्त शेतकरी संघटनाच एवढा प्रचंड काळ टिकून आहे त्याचे कारण विचारांची ताकद हेच आहे. शरद जोशी नावाचा विचार शेतकर्‍याच्या घराघरात पोहचला आहे. शेतीतील दारिद्र्याचा नायनाट करण्याची क्षमता केवळ शरद जोशींनी दाखविलेल्या मार्गात आहे, याची सर्वांना खात्री पटली आहे.

                मुक्तअर्थव्यवस्थेचा पुरस्कार करण्यासाठी जेव्हा या देशातले मोठमोठे उद्योगपती, नामवंत अर्थशास्त्रज्ञ, अर्थशास्त्राचे प्राध्यापक जेव्हा कचखाऊ वृत्ती बाळगून आहे, तेव्हा या देशातला अनपढ-अनाडी शेतकरी मात्र मुक्तअर्थव्यवस्थेच्या बाजूने खंबीरपणे उभा ठाकला आहे. जे भल्याभल्यांना समजत नाही ते अर्थशास्त्र शेतकर्‍यांना कळलेले आहे आणि हा चमत्कार शरद जोशी नावाच्या वादळाने घडवून आणला आहे.

                  अडीच तपा एवढा प्रदीर्घ काळ कोटी कोटी शेतकर्‍यांच्या हृदयात अनभिषिक्त अधिराज्य गाजवणारे वादळ ३ सप्टेंबरला वयाचे ७६ टप्पे पूर्ण करून ७७ व्या  टप्प्यात पदार्पण करीत आहे, त्यानिमित्ताने त्यांना उदंड आयुष्य लाभावे म्हणून समस्त शेतकरी बांधवातर्फे माझ्या त्यांना लाखलाख शुभेच्छा…! 

                                                                                                                                          – गंगाधर मुटे
————————————————————————————————————————————–

अण्णांच्या समर्थनार्थ बापूकुटीसमोर उपोषण

समाजसेवक अण्णा हजारे यांच्या “भ्रष्टाचार मुक्ती अभियानाला” पाठींबा दर्शविण्यासाठी आणि “जनलोकपाल विधेयकाच्या” सक्रिय समर्थनार्थ वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेच्यावतीने दि. ९ एप्रिलला सेवाग्राम (वर्धा) येथील महात्मा गांधींच्या वास्तवाने पावन झालेल्या पुण्यभुमीतील बापूकुटीसमोर एक दिवसाचे लाक्षणिक स्वरूपाचे सामुहिक उपोषण करण्याचे ठरले आहे. त्यापुढील आंदोलनाची दिशा एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेऊन तेथेच जाहिर केली जाईल.