‘कमल’ ’आप’के ’हाथ’ – विडंबन गीत

‘कमल’ ’आप’के ’हाथ’ – विडंबन गीत

‘आप’ के अडैल रुख पे ’कमल’ जरा मलूल है।
’हाथ’ भी फ़िसल गया तो ’आठ’ की जरूर है॥

खुली खुली ये बात है की उलझा हुआ ये दाव है-२
सोचना ये सोच है की सोच ही पडाव है
अण्णा जिधर गये – २
अण्णा जिधर गये वहॉसे ’लोकपाल’ दूर है
’हाथ’ भी फ़िसल गया तो ’आठ’ की जरूर है॥१॥

झुकी झुकी निगाह में भी है बला की मग्रूरी -२
दबी दबी सी बात मे भी छुपी हुई धुरंधरी
ये पेच दिल्लीका-२
ये पेच दिल्लीका अब बन गया नुपूर है
’हाथ’ भी फ़िसल गया तो ’आठ’ की जरूर है॥२॥

गीत – गंगाधर मुटे
संगीत – अरविंद हर्षवर्धन
गायिका – बि. किरण
फ़िल्म – ’आप’ के हसिन सपने
’दूम दबाके दिल्ली भागी’ प्रॉडक्शन की प्रस्तुती
————————————————————

नागपुरी तडका – ई पुस्तक

                 ई साहित्य प्रतिष्ठान, ठाणे या प्रकाशनसंस्थेने “नागपुरी तडका” हा माझा Online कवितासंग्रह आज प्रकाशीत केलाय, त्याबद्दल मी “ई साहित्य प्रतिष्ठान” चमूचा आभारी आहे.
                                                                                                                   
*  *  *  *
PDF स्वरुपातील पुस्तक वाचण्याकरिता चित्रावर क्लिक करा.
प्रकाशकाचे दोन शब्द

                          मराठी अमृताहून गोड भाषा. पण तिच्या ग्रामीण बोलींना जो गोडवा, तजेला आणि मसालेदार झणझणीत तडका आहे तो पुस्तकी शहरी मराठीत नाही. कोकणची खुमासदार मालवणी घ्या किंवा कोपरखळ्या मारणारी अहमदनगरची नगरी , सणसणीत गोळीबंद आगरी किंवा मिठ्ठास खानदेशातली अहिराणी. गांवोगांवच्या या भाषांची मज्जाच न्यारी. अगदी ज्वारीच्या भाकरीबरोबर तांबड्या रश्शासारखी. ज्यांनी अशा भाषांतून व्यवहार केला नाही ते कमनशीबीच. या भाषा म्हणजे अस्सल संस्कृतीची खाण आहे. त्यामुळे आज वऱ्हाडी भाषेतल्या या कवितांची मेजवानी तुमच्यासमोर आणताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. 

                          पण गंगाधर मुटे यांच्या नागपुरी तडक्यात केवळ भाषेचा फ़ुलबाग नाही. काळजाची आग आहे. उपाशी शेतकऱ्याच्या पोटात खवळणाऱ्या अॅसिडमधल्या या कविता आहेत. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अत्महत्यांवर अश्रू गाळणारं भरपूर लिखाण आजवर झालंय. “बिचारा शेतकरी” असंच विदर्भातल्या शेतकऱ्याचं वर्णन इतर लेखक कवी करतात. मनापासून त्यांना त्याच्या दुःखाची संवेदना जाणवते यात वाद नाही. पण गंगाधर मुटेंच्या कवितेत हाच शेतकरी हात पसरून नाही तर मुठी वळून येतो. वाकून नाही तर ताठ मानेने येतो. गुंडा नोयता तरीबी पन, गुंड्यावानी वागतो. त्यांची जनता बिचारी नाही तर विचारी आहे. आणि ती अविचारी होण्यापुर्वी पिळणाऱ्यानी आणि गिळणाऱ्यानी सावध व्हावे असा इशारा ती घेऊन येते. त्यांचा शेतकरी “खादीचं धोतर सोडून, मांजरपाठ घालणाऱ्या” पुढाऱ्यांना खणखणीत दणके घालणारा आहे. 

                          गंगाधरजींच्या कविता मरगळलेल्या शेतकऱ्याला स्फ़ूर्ती देणाऱ्या आहेत. या कविता केवळ आरामखुर्चीतलं वाचन नाहीत. भविष्यकाळाला घडवण्याची ताकद असलेल्या जनसंमर्दाला झोपेतून जागं करणाऱ्या आहेत. आपल्याला त्या नक्की आवडतील.

PDF स्वरुपातील पुस्तक वाचण्याकरिता येथे क्लिक करा.
———————————————————————————————-

पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका

पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका

कोण जाणे कोणासंग टाका भिडून व्हता…।
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता… ॥

जवा पाय कसाबचे मुंबईमंधी पडले
“लालबत्ती” वाले तमाम घरामंधी दडले
तवा म्हणान माहा पारा असा काही चढला
दोन ढूशे मारून त्याले तोंडबुचक्या पाडला
पायापोटी तवा कसाब माह्या पडत व्हता… ॥
अन्
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता… ॥

सुराज्याचं सपन जवा शिवाजीले पडलं
इचिबैन तवा मले जाम स्फ़ूरण चढलं
मंग म्हणान माही तलवार अशी काही चालली
एका हिसक्यात सारी सेना धारातिर्थी पाडली
चूलीमागं औरंगजेब जीव लपवत व्हता… ॥
अन्
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता… ॥

रावणानं सीता चोरून लंकेमंधी नेली
तळपायीची आग माह्या मस्तकात गेली
तोडून त्याचे नऊ मुंडके, मी संग घेऊन आलो
पण; तवापासून मीच “अभय” दहातोंड्या झालो
काय करू, काय नाही; मले समजत नाही आता
अन्
सपनातून जाग आली तं घाम फ़ुटून व्हता… ॥

                                                  – गंगाधर मुटे
———————————————————

शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)


शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)

मी तुझी साथ सोडून गाऊ कसा?
तूच माझा गळा, कंठ, नरडी, घसा

वाटले मोगर्‍याला तुला पाहुनी
पालखीला मिळालाय भोई जसा

मारली मी मिठी त्या क्षणी वाटले
शेरनीच्याच जबड्यात गेला ससा

झोप पाण्यात घेतोय मासा कसा?
प्रश्न हा फ़ालतू;  फ़क्त खावा रसा

कार्य बाकी किती ते उद्याला बघू
मंडळींनो चला भोजनाला बसा

भोजनाचा लुटा स्वाद पंक्तीमध्ये
अक्षता टाकण्याला असा वा नसा

टक्कलाला तुझ्या तूप मी लावते
दे मला एकदा तू ’अभय’ राजसा

                                  – गंगाधर मुटे
—————————————

कापला रेशमाच्या सुताने गळा

.
.
——————————————————–
कशी दाद देऊ मित्रा, तुझा विकासाचा आलेख वेगळा
ऐश्वर्य तुझे सात मजली, तुला गालिच्यांचा लळा
आरसी – ओसी मध्ये तुझी करंगळी खेळते, पण;
त्या तिथे गावी बापास मिळत नाही कोरडा जोंधळा
———————————————————
.
.
कापला रेशमाच्या सुताने गळा
.

जाणवू ना दिल्या वेदना ना कळा
कापला रेशमाच्या सुताने गळा

घेतला आळ नाही निसर्गावरी
भोगुनी सोसले मी तडाखे-झळा

साथ नाही सुखाचा खरे हे जरी
का तुझ्या वाचुनी मी लुळापांगळा?

राहतो मी कुठे, नेमका कोण मी?
सापडेना खुणा, मी कसा बावळा?

भाग ओसाड का घाम गळतो जिथे?
वाट चुकलाय पैसा-टका आंधळा

झेप घेण्यास तू वेळ लावू नये
मांडला आज आहे इथे सापळा

रंग खात्रीस पक्का, फिका ना पडे
वर्ण भाग्यात माझ्या निळासावळा

मार्ग सारेच धुंडाळतो कैकदा
चालण्याला तरी शोधतो वेगळा

चित्त शाबूत असणे ”अभय” चांगले
पोळलेला जरी भावनांचा मळा

                               – गंगाधर मुटे
—————————————
अवांतर – एक विडंबन

मै खंजर तो नही
मगर ये घोरफडी
जबसे मैने तुझको काटा
खंजरी हो गयी….॥
—————————————

टुकारघोडे! (हझल)

टुकारघोडे! (हझल)

 उगाच पिळतोस रे मिशा तू, कडमडणे हा विकार आहे
तिच्या खुट्याला तुझ्याप्रमाणे टुकारघोडे हजार आहे

कशी बघा चालते कचेरी, अशी जशी की दुकानदारी
अनाथ सोडून कायद्याला, विधानमंडळ फ़रार आहे

बघा जरा हो बघा जरासे कसा भामटा फ़ुगून गेला
मुरूम-गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे

गमावतो ना कधीच संधी हपापलेला विचित्र प्राणी
डसून लचकेच तोडण्याचा ठरून त्याला ’पगार’ आहे

कुठून आणू नवीन गजरा, दुकान शोधू कुठे नव्याने?
सरून पर्याय सर्व गेले, जुनीच देणी उधार आहे

नकोस मित्रा मला जळू तू, अता न सामान्य राहिलो मी
कितीतरी जाड पुस्तकांचे लिखान माझे तयार आहे

अम्हांस नाही कुठेच सत्ता, कुठेच नाही “अभय” पदांचे
लबाडवंशात जन्म ज्यांचा, तमाम त्यांचा पुढार आहे

                                                    – गंगाधर मुटे
————————————————–

उद्दिष्ट, चोरी आणि आयुष्य ……!


उद्दिष्ट, चोरी आणि आयुष्य ……!

तो चालत होता.. एक एक पाऊल पुढे
स्वच्छ तनाचा अन पारदर्शी मनाचा.. तो
अगदीच साधाभोळा, कसलेही किल्मिष.. न बाळगणारा
एक एक पाऊल टाकत… उद्दिष्टाकडे … त्याची वाटचाल
.
.
सोबत सहकार्‍याची झुंड….. त्याच्या मदतीला
कधी मागे.. तर कधी त्याच्याही पुढे चालायची
स्वतःलाच सर्वेसर्वा समजून.. करायची कारभार
हवे ते……. आणि नको तेही
.
.
शेवटी गाठला दरबार एकदाचा… उद्दिष्टाचा
धावतच गेला तो..
उद्दिष्टाला मिठी मारण्याला..
आणि तेवढ्यात
उद्दिष्ट कडाडलं… म्हणालं..
चोsssssssरा
काम काय तुझं? या पवित्र दरबारात!
.
.
तो हादरला.. म्हणाला.. महाराज
हे काय लांच्छनास्पद दूषण लावताय माझ्यावर
मी जगलोय.. माझं आयुष्य… अगदीच
पारदर्शी…… एखाद्या काचेसारखं
.
.
उद्दिष्ट हसलं…. म्हणालं…. अरे
पारदर्शीत्व मिळवायला निव्वळ
काच नाही रे पुरेशी
तुझ्याकडे काचेसोबतच जर का
असता एखादा आरसा
पाठीमागच्या प्रतिमा दाखवणारा
तर तुला कळले असते… की…
तू खाल्लेली फळे… तुझ्या सहकार्‍यांनी
आणलेली होती चोरून…..
लुटून… अगदीच सराईतपणे
.
.
आज त्याला कळली होती त्याची चूक.. पण
निसटून गेलं होतं त्याच्या हातून…. त्याने भोगलेलं आयुष्य….!

                                                                      गंगाधर मुटे
——————————————————————

राखेमधे लोळतो मी (हजल)

राखेमधे लोळतो मी (हजल)

मलिंदा मिळावा असे भाकतो मी
जगावेगळे मागणे मागतो मी

कशाला गडे रोज येतेस स्वप्नी?
असा काय आमिर तुला वाटतो मी?

जसे गुंग व्हावे नशीले पिताना
तुला पाहताना तसा झिंगतो मी

मला नेमक्या टाळती अप्सरा त्या
बहूतेक त्यांना कवी भासतो मी!

दिलेली फुले तू जमा खूप झाली
अता गूळ, साखर, डबा शोधतो मी

करा बंद कानात आकाशवाणी
अरे मच्छरांनो बघा पेंगतो मी

समाजात चर्चेमधे राहण्याला
अभय मस्त राखेमधे लोळतो मी

                                     गंगाधर मुटे
————————————-
(तर ही हजल)

लगान एकदा तरी….

लगान एकदा तरी….. (हझल)

चरेन शासकीय कुरण-रान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी

हरूनही रणांगणात लाभते विरत्वश्री
बनेन राजकीय पहिलवान एकदा तरी

क्षणाक्षणास भेटण्यास फ़ालतू विलंब का?
तुझ्या समोर बांधतो मकान एकदा तरी

शिकून घे धडे लढायचे हिरोकडे अता
बघून थेटरात घे लगान एकदा तरी

कधी विचारतेय का अभय इथे कुणी तुला?
जरा गप बसणार का? गुमान एकदा तरी

                                             – गंगाधर मुटे
……………………………………………………………………………………….
वृत्त : कलिंदनंदिनी     काफिया : महान    रदीफ : एकदा तरी 

लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा
……………………………………………………………………………………….

धोतर फ़ाटेपाव्‌तर : नागपुरी तडका

धोतर फ़ाटेपाव्‌तर : नागपुरी तडका

मारखुंड्याच्या घरामंधी पारखुंडा गेला
धोतर फ़ाटेपाव्‌तर सोटे खाऊन आला …॥१॥

गाढवाम्होरं भगवद्‌गीता वाचून काय होते?
माणसाची अक्कल तरी भायच उतू जाते
राखडीमंदी लोळू नको, सांगासाठी गेला
उसण उतरेपाव्‌तर लाथा खाऊन आला …॥२॥

मुद्दे आटून गेले की, हातघाईवर येणार
शिवीगाळ करता करता, गुद्दे हाणून देणार
माणुसकीच्या गोष्टी त्याले समजवाले गेला
येता येता ढोरावाणी, रट्टे खाऊन आला …॥३॥

पोशाखाच्या आधाराने, पारख होत नसते
कपड्याच्या आतमंदी, नंगे लपून बसते
मांडी उघडी दिसली म्हणून, झाकासाठी गेला
होती नव्हती थेय आपली, अब्रू देऊन आला …॥४॥

अरधकच्चं ग्यान लई, खतरा असते भाऊ
नको अभय कोणाच्याबी, झाशामंदी जाऊ
कावरल्या कुत्र्यासाठी भाकर घेऊन गेला
येता येता बोम्लीवर, सुया घेऊन आला …॥५॥

                                                  गंगाधर मुटे
————————————————————
मारखुंडा = मारकुडा, पारखुंडा = पारखी, पारख करणारा
————————————————————