एक लेख एका आत्मप्रौढीचा!

एक लेख एका आत्मप्रौढीचा!

आत्मस्तुती किंवा आत्मगौरव मानवी जीवनात निषिद्ध मानल्या गेला आहे. स्वत:च स्वत:चे कौतूक करणे तर अशोभनीयच. अगदी ग्रामीण जनजीवनात सुद्धा अशा वर्तनाला “अर्ध्या हळकुंडाने पिवळा होणे” अशा वर्गवारीत ढकलले गेले आहे. अगदी आत्मचरीत्र लिहायचे असेल तरी लेखकाने आपल्या आयुष्यातील बर्‍या-वाईट दोन्ही प्रकारच्या घटनांचा उहापोह करावा, अशी अपेक्षा असते. पण तरीही आयुष्यात कधीकधी अनपेक्षितपणे असाही प्रसंग येतो की आपलाच आपल्याला अभिमान वाटायला लागतो. आपण सहज म्हणून केलेले कार्य अनपेक्षितपणे अपेक्षेबाहेरची फ़लनिष्पती देऊन जाते. अशावेळी आपलाच आपल्याला वाटणारा  अभिमान अहंकार नसतो. त्यामागे असते केवळ आपल्या हातून घडलेल्या कार्याची कृत्यकृत्यता आणि श्रमसाफ़ल्यता.

अशाच एका प्रसंगाविषयी आज लिहायचा मोह न आवरल्यामुळे आत्मस्तुतीचा दोष स्विकारुन मी लिहित आहे.

 १२ डिसेंबर २०१५ ची ती सकाळ. वेळ ९ च्या आसपासचा. पुण्यावरून माझे मित्र श्री प्रसाद सरदेसाई यांचा एक अचानक मोबाईल कॉल आला. ते कापर्‍या स्वरात म्हणाले,

“मुटे सर, साहेबांच्या प्रकृत्तीबद्दल काही कळले का?”

          शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांची प्रकृती अनेक दिवसापासून  चांगली नव्हती हे मला माहित होते. ते अत्यवस्थ असल्याचा १० नोव्हेंबर २०१५ ला दुपारी संदेश आल्याने रवीभाऊ काशीकर, सरोजताई काशीकर, सुमनताई अग्रवाल, शैलजाताई देशपांडे, पांडुरंग भालशंकर आणि मी लगोलग रात्रीच्या फ़्लाईटने पुण्याला जाऊन रुबिया हॉस्पीटलमध्ये त्यांची भेट घेऊन आलो होतो. ते अत्यवस्थ होते आणि वैद्यकीय उपचाराला त्यांचे शरीर फ़ारसे प्रतिसाद नव्हते. एवढे मला माहित होते. नंतरच्या काळात संपर्क माध्यमातून प्रकृती “यथास्थिती” असल्याचे संकेत मिळत होते. पण अगदीच ताजी म्हणावी अशी माहिती माझ्याकडे नसल्याने मी म्हणालो,

“ नाही. यासंदर्भात ताजी माहिती माझ्याकडे नाही” मी.

“शरद जोशी इज नो मोअर” असा तिकडून प्रसाद सरदेसाई यांचा रडका आवाज ऐकताच माझ्या काळजात धस्स झाले. विश्वास बसत नव्हता पण सरदेसाई सरांनी दिलेली बातमी खोटी असण्याचीही शक्यता नव्हती. मी तातडीने मोबाईलवर नंबर डायल केला.

“सरोजताई, साहेबांच्या प्रकृत्तीबद्दल काही कळले काय?” मी.
“माझं काल रात्रीच बोलणं झालं प्रकृती………”
मी मध्येच सरोजताईंचे बोलणे थांबवून म्हटले.
“आज काहीतरी विपरित बातमी आहे, तुम्ही तातडीने पुण्याला संपर्क करावा”

            इतके बोलून मी लगेच फ़ोन कट केला. नंतर लगेच श्री वामनराव चटप व श्री राम नेवले यांना फ़ोन केला. त्यांनाही काहीच माहिती नसल्याचे लक्षात येताच त्यांनी पुण्याला संपर्क करुन माहिती मिळवावी, असे सुचवले. घरी बायकोला सांगून टीव्हीवर मराठी बातम्यांचे चॅनेल आळीपाळीने सतत बदलून काही बातमी येते का ते बघत राहायला सांगीतले.
            पुण्याला फ़ोन करून म्हात्रे सर किंवा देशपांडे सरांशी संपर्क करावा व नक्की काय ते खात्री करून घ्यावी, असा विचार करत असतानाच तिकडून तितक्यात सरोजताईंचाच फ़ोन आला. त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. आता बोलण्याची गरजही संपलीच होती. मग फ़ोनवर दोन्हीकडून अक्षरश: ओक्साबोक्सी रडारड सुरु झाली. ९-१० मिनिटानंतर मी स्वत:ला सावरायचा प्रयत्न केला पण त्यात यश येईना म्हणून बोट लाल बटनेवर ठेवले आणि फ़ोन कट केला.

आता रडण्याखेरीज अन्य काही कार्य उरलेलेच नव्हते. बातम्या अजून सुरु व्हायच्या होत्या. निदान आणखी दोन तास तरी ही बातमी अधिकृतपणे जाहीर होण्याची व प्रसारमाध्यमांपर्यत पोचण्याची शक्यता नव्हती. बातमी अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना आणि वृत्त वाहिन्यांना शरद जोशींविषयीची माहीती, जीवनपट, छायाचित्र आणि व्हिडियो लागतील. ही सर्व माहिती प्रसारमाध्यमांना उपलब्ध करून देऊ शकेल असे शेतकरी संघटनेकडे एकच व्यक्तिमत्व होते आणि ते म्हणजे प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे. संघटनेच्या सुरुवातीपासूनच म्हात्रे सरांनी केंद्रीय कार्यालय सांभाळले आहे. पण याक्षणाला ते माहिती पुरवायला नक्कीच उपलब्ध होऊ शकणार नव्हते. शिवाय शरद जोशींच्या प्रकृतीची बातमी प्रसारमाध्यमांपासून लपवून गोपणीयता राखल्याने प्रसारमाध्यमेही बेसावध असल्याने ऐन वेळेवर माहिती गोळा करणे त्यांनाही शक्य होणार नाही, याचाही नीटसा अंदाज येऊन गेला.

शरद जोशींच्या अत्यवस्थेविषयी कार्यकर्त्यांनाही फ़ारशी माहिती नसल्याने ही बातमी महाराष्ट्रासहित अन्य राज्यातील शेतकर्‍यांनाही धक्का देणारी असल्याने या बातमीचे महत्वही अनन्यसाधारणच होते. आता यासंदर्भात जे काही करायचे ते आपल्यालाच करायला हवे असे ठरवून  तातडीने लॅपटॉपवर बसलो आणि महाराष्ट्रासहित देशातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांना आणि दुरदर्शन वाहिन्यांना इमेलद्वारे माहीती पाठवायचा सपाटा सुरू केला.

तीन-चार इमेल जाईपर्यंत ठीक होते पण जेव्हा एकापाठोपाठ शरद जोशींविषयीची संपूर्ण माहिती, जीवनपट, आंदोलनाचा आढावा, छायाचित्र व व्हिडियो असलेले दहा-बारा इमेल त्यांचेकडे पोचले तेव्हा पत्रकारांना संशय येऊन काहीतरी नक्कीच वाईट बातमी असल्याचा त्यांनाही अंदाज येणे क्रमप्राप्त होते. मग माझा मोबाईल खणखणायला लागला. पुण्यावरून अधिकृत घोषणा न झाल्याने मी पत्रकारांना बातमीच्या सत्यतेचा दुजोरा देऊ शकत नव्हतो. मग मोबाईल मित्राच्या हाती दिला आणि सांगीतले की कॉल करणार्‍या सर्वांना सांग की मी सध्या अतिव्यस्त आहे त्यामुळे त्यांनी एक तासानंतर संपर्क करावा. मी मात्र माहितीचे इमेल पाठवणे सुरुच ठेवले.

मी पाठवत असलेल्या माहितीचा बाज लक्षात घेता बहुधा प्रसारमाध्यमांनाही पुरेसा अंदाज येऊन गेलेलाच असावा कारण मी फ़ोनवर उपलब्ध नाही म्हटल्यावर तिकडून इमेलवर रिप्लाय यायला लागलेत. रिप्लायला प्रतिसाद न देता मी नवीन माहिती पाठवणे सुरुच ठेवले.  त्याचा परिणाम असा झाला की अधिकृत घोषणा होताच दूरदर्शन वाहिन्यावर थेट सविस्तर बातम्याच सुरू झाल्यात. पुण्यापासून ८०० किलोमिटर अंतरावरील आर्वी छोटी सारख्या दुरवरच्या ग्रामीण भागातील ३००० लोकसंख्या असलेल्या गावात बसून मी दिवसभर राज्यभरातल्या कानाकोपर्‍यातील प्रसारमाध्यमांना हवी ती माहिती आणि साहित्य पुरवत होतो, ही आधुनिक संगणकीय व आंतरजालिय तंत्रज्ञानाची किमया होती आणि मी त्या अत्याधुनिक नवतंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून घेत होतो.  दिवसभर दूरदर्शन वाहिन्यावर आणि १३ तारखेच्या राज्यभरातील वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यामध्ये ५० ते ९० टक्के मजकूर मी पाठवलेलाच दिसत होता किंवा मीच चालवत असलेल्या http://www.sharadjoshi.inhttp://www.baliraja.com या संकेतस्थळावरुन तरी घेतलेला होता. शरद जोशींचा जीवनपट तर जवळजवळ सर्वच वृत्तपत्रांनी मी जसा पाठवला तसाच्या तसाच छापला होता.

माझ्या एका छोट्याशा प्रयत्नाने व मी निर्माण करून ठेवलेल्या संकेतस्थळांमुळे शरद जोशींसारख्या युगात्म्याचे व्यक्तीमत्व सविस्तर माहितीसह जनतेपर्यंत पोहचू शकल्याने श्रमसाफ़ल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटून अभिमानास्पद वाटणे अगदीच स्वाभाविक आहे.

 – गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~~~~
साप्ताहिक उदयकाळ “चैत्र विषेशांक-२०१७” मध्ये प्रकाशित.

सामान्य चायवाला

सामान्य चायवाला 

जिंकावया जगाला ऐटीत तो निघाला
मुलखात मुद्रिकेच्या अलगद शिकार झाला

मज रानटी समजला तेही बरेच झाले
कसदार रानमेवा मी चारतोच त्याला

ना घाम गाळला अन ना रक्त आटविले
कोणी कुणा पुसेना पैसा कुठून आला?

मी मेघ बाष्पधारी वणव्याकडे निघालो
लांबी-परीघ-रुंदी मोजत बसू कशाला?

धनवान इंडियाची बलवान लोकशाही
होतो प्रधानमंत्री सामान्य चायवाला

शिर्षस्थ पाखरांच्या चोची चरून झाल्या
की धाडतील नक्की आमंत्रणे तुम्हाला

ज्यांचे अभय पहारे ते मारतात बाजी
पुसणार कोण येथे निद्रिस्त जागल्याला?

– गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सोज्वळ मदिरा

सोज्वळ मदिरा

आधी खाते भाव जराशी
मग ती घेते नाव जराशी

तू नसण्याने भिकार झाले
बघून ये तू गाव जराशी

चाल रडी पण; लोभसवाणी
खेळ आणखी डाव जराशी

आढे वेढे हवे कशाला
थेटच दे ना ठाव जराशी

खुळ्या स्मृतींना जपण्यासाठी
निदान दे तू घाव जराशी

उत स्वप्नांचा पाडा आला
लगबग ये चल घाव जराशी

मम श्वासाची कपोलभाती
ओठावरती लाव जराशी

अभय नशेची सोज्वळ मदिरा
दे चढण्याला वाव जराशी

               – गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही!

शेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही!

 

निसर्ग म्हणजे निसर्ग आहे आणि त्याची वर्तणूक सुद्धा निसर्गाला शोभेल अशी नैसर्गिकच असणार हे उघड आहे.  निसर्ग विविधतेने नटलेला आहे. विविधता हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. निसर्गातला विविधता हा गूण काही कालचा किंवा परवाचा नाही. आपल्यासारख्या बुद्धीवंतांचा जन्म झाल्यानंतर निसर्गाने विविधतेचा गूण धारण केला असेल, असेही नाही. निसर्गाचा जेव्हा केव्हा जन्म झाला असेल तेव्हाच तो विविधतेचा जन्मजात गूण धारण करुनच जन्माला आला असणार, हेही उघड आहे.  ही बाब सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट असूनही यावर मते-मतांतरे व्यक्त होत असतील तर तीही नैसर्गिक वैविध्यतेच्या रचनात्मक मानसिकतेमुळेच होत असते, ही नैसर्गिक शाश्वत सत्यता सुद्धा आपण स्विकारलीच पाहिजे. पण तिथेही विविधताच आडवी येते आणि शाश्वत सत्यता स्विकारायला शतप्रतिशत मानसिकता कधीच तयार होत नसते.

 

भारतीय शेती निसर्गावर अवलंबून असल्याने शेतकरी गरीब आहे, हे विधान मी शाळा-कॉलेजात असताना ऐकण्यात आणि वाचण्यात इतके वेळा कानावर आणि डोळ्यावर येऊन आदळायचे की कानाचे पडदे फ़ाटायला बघायचे आणि डोळ्यातली बाहुली ठार गारद व्हायला बघायची. शाळा-कॉलेजात जाऊन शिकले-सवरलेले आणि ग्रंथ-कुराण-बायबल-वेद वाचून साक्षात ज्ञानाचे महामेरू झालेले इतके येरेगबाळे कसे बोलू आणि लिहू शकतात, याचे कायम कुतुहलमिश्रीत नवल वाटत राहायचे. मग या विधानाची शहानिशा करून आकलन करण्यासाठी मेंदूच्या भवती विचाराचे लोंदे गोळा व्हायचे. ते मेंदूभवती इतका पिंगा घालायचे की मेंदू पार गुळगुळीत होऊन पलिकडे काम करेनासा व्हायचा. कधीकधी मेंदू हँग झाला की मुद्दा निकाली न काढताच त्याला आहे तसाच अर्धवट आणि येरागबाळा सोडून मेंदूला फ़ॉर्म्याट मारून, नव्याने रिफ़्रेश मारून ताजेतवाने व्हावे लागायचे.

शाळा-महाविद्यालयात मिळवलेल्या ज्ञानाची शिदोरी गाठीशी घेऊन जेव्हा मी प्रत्यक्ष शेती करायला सुरवात केली तेव्हा पहिल्या सहा महिन्यातच पुस्तकीय ज्ञानातील विरोधाभास उघड व्हायला लागला. प्रत्यक्ष शेतीतील अनुभव, प्रत्यक्ष ग्रामीण जीवन, पुस्तकीय ज्ञानातील पांडित्य व बोलघेवड्या पगारी तज्ज्ञांचे सल्ले हे दुरान्वयानेही आपसात एकमेकांच्या नातेसंबंधात लागत नाही, याची प्रचिती यायला लागली. शेती, शेतीतील गरीबी, गावाची दुर्दशा याची कारणे शोधतांना जी कारणे आढळली ती पुस्तकांशी, पुस्तकी पंडीतांच्या निष्कर्षाच्या आणि शिकवणीच्या थेट उलटी दिसत होती. डोहाकडे जाणार्‍याला वाचवण्यासाठी उदात्त हेतूचा देखावा करून सुचवले जाणारे मार्ग त्याला आणखी त्वरेने डोहाकडे नेणारे आणि कुठल्याही स्थितीत तो बुडलाच पाहिजे, अशी बेमालूमपणे पण प्रभावी व्यवस्था करणारेच आहेत, हे ज्या क्षणी लक्षात आले आणि खात्री पटली त्या क्षणीच प्रचलित पुस्तकी पंडीत, पारंपारिक ज्ञानाचे महामेरू आणि पगारी तज्ज्ञ यांच्यावरचा माझा विश्वास भुर्रकन उडून अवकाशात निघून गेला तो आजतागायतही परत आलेला नाही.

मात नव्हे मैत्री

                  निसर्गावर मात करण्याच्या वल्गना हा आणखी एक असाच आगाऊपणा. एकंदरीत निसर्गाची प्रकृती एकजिनशी आणि वैश्विक आहे. विश्वाच्या एका भौगोलिक प्रदेशात घडलेल्या बदलाचा प्रभाव विश्वाच्या दुसर्‍या भौगोलिक प्रदेशात जाणवत असतो. वैश्विक रचना समग्र ब्रह्मांड रचनेशी संलग्नीत आहे, इतके जाणायला मनुष्य खगोलशास्त्रज्ञ किंवा ज्योतिषशात्रीच असला पाहिजे, हेही आवश्यक नाही. ब्रह्मांडाची परिमिती कुणालाच मोजता आली नाही आणि मोजता येणे शक्यही दिसत नाही. आकाशगंगेतील अंतर मोजण्यासाठी प्रकाशवर्ष हे परिणाम सुद्धा अत्यंत थिटे आहे. आकाशगंगेचे नुसते अंतर मोजण्याचीही कुवत नसलेल्या मनुष्यप्राण्याने थेट मात करण्याच्या गोष्टी करणे अत्यंत हास्यास्पद आहे. एकंदरित निसर्गाची आणि निसर्गावर प्रभाव टाकणार्‍या घटकांशी व्याप्ती लक्षात घेतली तर विभागवार किंवा प्रदेशवार निसर्गाच्या प्रकृतीवर नियंत्रण आणता येणे आपल्या आवाक्यात नाही. तंत्रज्ञानाने कितीही झेप घेतली तरी निसर्गाच्या प्रकृतीवर नियंत्रण आणणे कधीही शक्य होणार नाही, याचे भान विसरून चालणार नाही. सतरा वर्षे शाळा-महाविद्यालयात घालवली आणि जोडीला शे-पाचशे पुस्तके वाचल्याने ज्ञानग्रहनक्षमतेच्या कक्षा तेवढ्या रुंदावत जातात, निसर्गावर मात करण्याचे सामर्थ्य प्राप्त होत नाही याचे भान राखायलाच हवे.

हजारो वर्षापासून शेतकरी शेती करत आला पण त्याने निसर्गावर मात करण्याची भाषा कधीच केली नाही. त्याने निसर्गाशी जुळवून घेतले, निसर्गाशी मैत्री केली. निसर्गाला बदलायला भाग पाडणे मनुष्य प्राण्याच्या आवाक्यात नाही, याची जाणीव असण्याइतपत व्यावहारिक ज्ञान त्याचाकडे असल्याने तसा प्रयत्न त्याने कधीच केला नाही. याउलट तो स्वत: बदलला. निसर्ग कसा असतो, हे त्याने समजून घेतले एवढेच नव्हे तर त्याने स्वत:ला निसर्गानुरूप बदलवून घेतले. त्याने नैसर्गिक प्रकृतीला स्वत:च्या प्रकृतीत विलिन करून घेतले. रान केव्हा नांगरायचे, उदिमाला सुरुवात केव्हा करायची, पेरणी केव्हा करायची याचे वेळापत्रक त्याने निसर्गाला अनुसरून तयार केले. पेरणी केली अन पाऊस आला नाही किंवा अति पाऊस होऊन दुबारपेरणीची वेळ आली तर कधी कुरबूर केली नाही, आदळआपट केली नाही आणि निसर्गाला कधी दोष तर दिलाच नाही. पुन्हा नव्याने तयारी केली आणि दुबार पेरणी केली. कधी ओला दुष्काळ पडला, कधी कोरडा दुष्काळ पडला, कधी एका पावसाच्या कमतरतेने पीक करपून गेले, कधी अति पावसाने अथवा महापूराने शेत पिकासहित खरडून गेले, कधी वादळाने तर कधी गारपिटीने पीक धाराशायी केले पण शेतकरी अश्रू ढाळत बसला नाही आणि निसर्गाच्या नावाने शिमगा करत डांगोराही कधीच पिटला नाही. त्याने निसर्गाला मित्रासारखीच वागणूक दिली आणि निसर्गाला त्याच्या विविधतेसह आनंदाने स्विकारले. पावसाने उघडीप दिली किंवा खंडवृष्टीची स्थिती निर्माण झाली तेव्हा शेतकर्‍याने निसर्गाला बोल लावला नाही तर त्याची आराधना केली. कधी कमरेला बेडूक बांधून वरुणदेवतेला प्रसन्न करायचा प्रयत्न केला, कधी सर्व गावकर्‍यांनी एकत्र येऊन मारोतीच्या पाळावर अभिषेक केला तर कधीकधी सामुहिक सदावर्त करून देवासमोर नैवद्य ठेवला आणि गावातील सर्व गोरगरीब गावकर्यांना यथेच्छ जेवनाचा पाहूणचार दिला. शेतकर्‍याने पेरणीसाठी मातीचा, पीक जगवण्यासाठी पाण्याचा, कचराकाडी जाळण्यासाठी अग्नीचा, धान्य उफ़णण्यासाठी वायुचा, उदीमासाठी वृक्षाचा खुबीने वापर केला आणि निसर्गदत्त संसाधनाचा पुरेपूर कौशल्यानिशी वापर करत व निसर्गाशी सलोखा राखत आपली शेती फ़ुलवत ठेवली. इतिहासाच्या कोणत्याच कालखंडात शेतकर्याने निसर्गाला शत्रू मानून त्याच्यावर मात करण्याची भाषा वापरल्याच्या यत्किंचितही पाऊलखुणा आढळत नाही.

कुटनितीचा खेळ

              मग निसर्गावर मात करण्याची आणि शेतीतील अठराविश्व दारिद्र्याशी निसर्गाच्या लहरीपणाशी सांगड घालून निसर्गालाच जबाबदार धरण्याची भाषा आली कुठून? या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे. उत्तर जटील नसले तरी कुटील नक्कीच आहे. शेतकर्‍यांच्या मर्जीनुसार आणि पिकांच्या गरजेनुसार पाऊस कोणत्याच युगात पडल्याची शक्यता नाही आणि यानंतर पुढे येणार्‍या युगातही पडणार नाही, हे शेतकर्‍याला निसर्गत: मान्य असल्याने तो त्याच्या गरिबीला निसर्गाला जबाबदार धरत नसला तरी अन्य कोण जबाबदार असेल याचीही कल्पना त्याला नाही आणि नेमकी इथेच शेतकरी समाजाची गोची झाली. शेतीत दारिद्र्य आहे हे खरे आहे पण ते कशामुळे आहे, याचे नेमकेपणाने उत्तर शेतकरी समाजाला माहित नसल्याने त्यांचा “नरोवा कुंजरोवा” झाला.

शेतकरी समाजातील याच संभ्रमाचा फ़ायदा अनुत्पादक वर्गाने नेमकेपणाने उचलला. डाकूंचे, चोरांचे किंवा भामट्यांचे बरे होते. कुठलेही तत्वज्ञान न सांगता किंवा कारणमिमांसा न करताच बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करत ते शेतमाल फ़ुकटातच लुटून न्यायचे. मात्र ऐतखाऊ, अनुत्पादक व बिगरशेतकरी वर्ग यांच्याकडे बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करण्याची क्षमता नसल्याने म्हणा किंवा त्यांना समाजात सामाजिक प्रतिष्ठा असल्याने म्हणा, त्यांना अशा राजरोसपणे लुटीच्या मार्गाने जाणे शक्यच नव्हते आणि म्हणून शेतीमध्ये उत्पादित होणारा माल फ़ुकटात मिळणेही अशक्यच होते. मग या सर्वांनी मिळून कुटनितीचा डाव खेळणे सुरू केले. जेव्हा जेव्हा थेट दोन हात करणे अशक्य असते तेव्हा तेव्हा समोरच्या बाजुला परास्त करण्यासाठी कुटनितीचा अवलंब करण्याला बहुतांश शास्त्रांची मान्यता असल्याने शेतमालाच्या लुटीसाठी या मार्गाचा अवलंब करणे सर्वांनाच सोईचे वाटले असावे. शेतमाल कमीत कमी दरात उपलब्ध होत राहण्यासाठी शेतकर्‍यांना त्यांच्या गरिबीचे खरे कारण कळू न देता त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने दिशाभूल करत राहणे सर्वांना फ़ायदेशीर ठरले असावे. शेतकरी आळशी, कामचोर, उधळ्या, अज्ञानी आहे, परंपरागत पद्धतीने शेती करणारा, नव्या तंत्रज्ञानाचा वापर न करणारा आहे त्यामुळे तो गरीब आहे किंवा शेतीच्या दुर्दशेला निसर्गाचा लहरीपणा कारणीभूत आहे, अशा सामुहिक जनमानस तयार करणार्‍या संकल्पनांचा वापर शेतीमालाला मिळणार्‍या अत्यल्प भावाच्या मुद्याला बगल देण्यासाठी कुटनितीक शैलीने पद्धतशीरपणे करण्यात आला असावा, हे उघड आहे.

ग्राहकांची मानसिकता

            कोणत्याही व्यक्ती अथवा सामुहिक कुटुंबाचा जमा आणि खर्चाचा ताळेबंद जुळत नाही तेव्हा त्या कुटुंबाचा अर्थसंकल्प तोट्याचा तयार होतो. अर्थाच्या अनुलब्धतेमुळे साधनांच्या खरेदीवर एकतर मर्यादा येतात किंवा खरेदी अशक्य होते. घरात साधनांची त्यातल्या जिवनावश्यक गरजेच्या वस्तुंच्या खरेदीसाठी अथवा जिवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारी क्रयशक्ती संपली की घरात जे चित्र तयार होते त्यालाच आपण दारिद्र्य म्हणत असतो. देशाचा, राज्याचा, कार्पोरेट क्षेत्राचा, सामाजिक क्षेत्राचा अर्थसंकल्प मांडण्याची व तर्‍हेतर्‍हेचे उपाय सुचवण्याची पात्रता असलेले लक्षावधी पगारी अर्थतज्ज्ञ या देशात मुबलक मिळून जातात. अर्थसंकल्पात तृटी दर्शविणारे व त्याचे लेखापरिक्षण करणे ऑडिटर सुद्धा लक्षावधी संख्येने मिळून जातात पण शेतीत गरिबी आहे कारण शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून निघेल एवढेही भाव मिळत नसल्याने शेतीचा अर्थसंकल्प तोट्यात जातो, असे ठासून सांगणारे अर्थतज्ज्ञ किंवा सी. ए मात्र दुर्मीळ असणे वरील कुटनितीचा परिणाम आणि पुरावा आहे.
             गणीताच्या भाषेत ०.५ च्या वरील सर्व किंमती १ च्या बरोबर तर ०.५ च्या आतील सर्व किंमती शुन्याच्या बरोबरीच्याच असतात. आज आपल्या देशात बहुतांश शेतमालाला एकूण उत्पादनखर्चाच्या निम्म्यापेक्षाही कमीच भाव दिले जातात. म्हणजे शून्य किंमतीत म्हणजेच फ़ुकटाच्या बरोबरीनेच शेतमाल हडपला जातो, हे गणीतीय सत्य सर्वांनीच स्विकारायला हवे. शेतीतील गरिबी संपवण्यासाठी शेतमालाचे उत्पादन खर्च भरून निघतील एवढे भाव मिळण्याखेरीज अन्य कुठलाही मार्गच अस्तित्वात नसल्याने शेतमाल स्वस्तात मिळाला पाहिजे, अशी मानसिकता आता ग्राहकांनीही बदलणे, काळाची गरज आहे.

– गंगाधर मुटे

(’जनशांती’नाशीक, दिवाळी अंकात प्रकाशित लेख)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

ये तू मैदानात : शेतकरी गीत

ये तू मैदानात : शेतकरी गीत 

ये तू मैदानात, ये तू मैदानात
ये तू मैदानात, पाईका ये तू मैदानात
काळ्या आईचा एल्गार
बिगूल फुंकण्या हो तय्यार
उलवून फेकू गुलाम बेड्या
जगण्या स्वातंत्र्यात
जगण्या स्वातंत्र्यात, जगण्या स्वातंत्र्यात
जगण्या स्वातंत्र्यात, पाईका ये तू मैदानात ||धृ||

गोरे गेले, काळे आले
शस्त्राचे रंगांतर झाले
काळी आई खितपत पडली
विझल्या अंधारात
विझल्या अंधारात, विझल्या अंधारात
विझल्या अंधारात तेवण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात, तेवण्या ये तू मैदानात ||१||

झोन बंदी, निर्यातबंदी
साठेबंदी, प्रदेशबंदी
आयातीचा दोर खेचतो
कंठाचा गळफास
कंठाचा गळफास, कंठाचा गळफास
कंठाचा गळफास सोडण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात, सोडण्या ये तू मैदानात ||२||

हात बांधती, पाय बांधती
डोळ्यावरती टाय बांधती
आणिक म्हणती स्पर्धा कर तू
विद्वानांची जात
विद्वानांची जात, ‘ती’ विद्वानांची जात
‘ती’ विद्वानांची जात ठेचण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात, ठेचण्या ये तू मैदानात ||३||

शेतीला गिळणार कायदे
हिरवळीला पिळणार वायदे
सुगीशिखरावर श्वापदं झाली
नांगी रोवून स्वार
नांगी रोवून स्वार, नांगी रोवून स्वार
सरावलेली नांगी चेचण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात, चेचण्या ये तू मैदानात ||४||

रणकंदनाची हाळी आली
नीजप्रहरावर पहाट झाली
दे ललकारी अभय पाईका
हाती घेत मशाल
हाती घेत मशाल, हाती घेत मशाल
मशाल हाती घेत झुंजण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात झुंजण्या, ये तू मैदानात ||५||

– गंगाधर मुटे ’ अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हे काव्यफ़ूल युगात्म्याच्या चरणी वाहून शेतकरी संघटनेला अर्पण करून दिलेल्या वचनमुक्तीतून उतराई होण्याचा प्रयत्न.
संदर्भ >>> http://www.baliraja.com/node/986 “हतबल झाली प्रतिभा”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रणाम युगात्म्या

प्रणाम युगात्म्या
            १९८० चे दशक उजाडेपर्यंत लढाऊ किसान किंवा लढवैय्या शेतकरी हे शब्दच निरर्थक होते. इतिहासात आपण कितीही मागे जाऊन बघितले तरी कोणत्याही कालखंडात भारतीय शेतकरी त्याच्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध कंबर कसून साक्षात महाकाली दुर्गेचा अवतार धारण करत होता, अशा काही पाऊलखुणा आढळत नाहीत. अगदी शेताच्या बांधावर राजसैन्याच्या घनघोर लढाया व्हायच्या तेव्हाही तो त्या लढायांकडे मुक बधिरतेने निर्विकार चेहरा करूनच बघत राहायचा. शेतकर्‍याला पक्के ठाऊक होते की, राजे असो, पेशवे असो, मोगल असो किंवा डाकू-लुटेरे असो, हे सारे विजयानंतर आपल्याकडे शेतसारा वसूल करायला किंवा धान्याची लूट करायलाच येणार आहेत. ह्या लढाया म्हणजे शेतसारा वसूल कोणी करायचा याचा रीतसर परवाना मिळवण्यासाठीच असतात. ज्याला आपले म्हणावे असे यांच्यापैकी आपले कोणीच नाहीत.

 

               कितीही अन्याय, अत्याचार झालेत तरी त्याविरुद्ध एक शेतकरी म्हणून निखळ शेतीच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शेतकरी पेटून उठला, त्याने राजसत्तेविरुद्ध बंड पुकारले असे उदाहरणच शेतीच्या इतिहासात सापडत नाही. त्याऐवजी दोन्ही हात जोडून अदबीने उभा राहणारा शेतकरी मात्र इतिहासाच्या प्रत्येक पानावर पाहायला मिळतो. साने गुरुजींनी शेतकर्‍यांना लढण्याची प्रेरणा देताना लिहिले,

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकर्‍यांच्या राज्यासाठी, लावू पणाला प्राण

              पण त्या कवितेची शेतकर्‍यांनी दखलच घेतली नाही. शेतकरी उठले नाहीत, रान पेटले नाही आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी कुणी प्राणही पणाला लावले नाहीत. तसे पाहिले तर शेतकर्‍यांचा इतिहासच तसा फार चांगला नाही. ज्यांनी ज्यांनी शेतकर्‍यांना लुटायचा प्रयत्न केला त्यांनी त्यांनी यश मिळवले. पण ज्यांनी शेतकर्‍यांच्या बाजूने लढायचा प्रयत्न केला त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढायला शेतकरी कधीच समोर आला नाही. कदाचित त्यामुळेच शेतकर्‍यांची बाजू घेऊन लढण्यापेक्षा शेतकर्‍यांना लुटून जगणार्‍या व्यवस्थेत सामील होऊन आपला निहित स्वार्थ साधून घेणे सगळ्यांना जास्त सोयीचे आणि परिणामकारक वाटले असावे, असा अंदाज बांधणे भाग पडत आहे.

 

                शेतकर्‍यांची कड घेऊन लढणारे शोधायला आपण इतिहासात कितीही मागे गेलो तरी सरते शेवटी बळीराजावर जाऊन थांबतो. खरे तर बळीराजा हा शेतकर्‍यांचा निखळ राजा नव्हताच. तो शोषित जनतेचा, सामान्य रयतेचा राजा होता. बळीराजाच्या राज्यात प्रजा सुखी होती. शेतकरी हाही त्याच प्रजेचा एक घटक असल्याने तोही सुखी होता. शेतकर्‍यांप्रती चांगला न्याय देणारा बळीराजा व्यतिरिक अन्य कोणी राजाच झाला नसल्याने बळीराजा हाच शेतकर्‍यांना आपला राजा वाटतो. आजही “इडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे” अशी शेतकर्‍यांच्या घराघरात प्रार्थना केली जाते. पण नुसतीच प्रार्थना केली जाते, मनोभावना व्यक्त केली जाते. बळीचे राज्य संपल्यानंतर पुन्हा बळीचे राज्य यावे यासाठी मात्र शेतकर्‍यांनी काही प्रयत्न केले होते, याचा मागमूसही इतिहासात सापडत नाही.     बळीराजानंतर शेतकर्‍याच्या कैवार्‍याचा शोध घेण्यासाठी गाडी पुढे काढली तर गाडी अधेमधे कुठेच थांबत नाही. गाडी थेट म. ज्योतिबा फुले यांच्यानावाजवळ येऊन थांबते. म. फुले हे शेतकर्‍यांचे दैवत. शेतकर्‍यांच्या बाजूने त्यांनीच व्यवस्थेवर पहिला आसूड उगारला. शेतीचे प्रश्न चव्हाट्यावर आणण्यासाठी अनेक हालअपेष्टा सोसून त्यांनी आयुष्य खर्ची घातले पण अत्यंत खेदजनक बाब ही की शेतकरी मात्र म. फ़ुलेंच्या बाजूने उभा राहिला नाही. म. फ़ुलेंच्या खांद्याला खांदा लावून त्यांना नैतिक बळही पुरवले नाही. ज्योतिबांना एकाकी झुंज द्यावी लागली. अगदी सावित्रीबाईच्या अंगावर घाण फेकण्यात आली तरीही शेतकरी सावित्रीबाईच्या बचावासाठी सरसावला नाही, बंड करून उठणे ही तर फारच दूरची गोष्ट झाली.

१९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात पाहिल्यांदाच एक चमत्कार पाहायला मिळाला. शरद जोशींच्या रूपात एक झंझावात आला. इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते पहिल्यांदाच घडले. लाखो शेतकरी शरद जोशींच्या खांद्याला खांदा लावून रणात उतरले. “कुत्र्याची शेपटी सरळ होईल पण शेतकरी संघटित होणार नाही” हा सार्वत्रिक समज तोंडघशी पाडत शेतकर्‍यांची संघटना स्थापन झाली. शेतीच्या प्रश्नावर कधीही शेकडोच्या संख्येत सुद्धा जमा न होणारा शेतकरी समाज लाखांच्या संख्येने गोळा व्हायला लागला. रस्ता रोको, रेलरोको, गावबंदी सारखे अस्त्र उगारून व्यवस्थेला सळो की पळो करून सोडू लागला. पुरुषच नव्हे तर महिलासुद्धा आंदोलनाचे नेतृत्व करायला पुढे सरसावल्या. चांदवडच्या अधिवेशनात ३ लक्ष शेतकरी महिलांची उपस्थिती, हा तर खरोखर चमत्कारच होता. त्यावेळी सर्वांच्या मनात एकच भावना होती,


सरकारच्या धोरणापायी छक्केपंजे आटले
बरं झालं देवा बाप्पा, शरद जोशी भेटले

              निखळ शेतीच्या प्रश्नावर ज्याच्या मागे शेतकरी समाज आपापल्या जाती-धर्माचे कडे झुगारून उभा राहिला की ज्यामुळे त्याला शेतकर्‍यांचा नेता म्हणावे, असा शेतकरी नेता एकच आणि तो म्हणजे शरद जोशी. आज शरद जोशी नसताना त्यांच्या पश्चात त्यांचा ८१ वा जन्मदिवस साजरा करण्याचा हा पहिलाच प्रसंग. आजवर या द्रष्ट्या शेतकरी नेत्याची पहिली जयंती उत्साहात साजरी करणार्‍यांना हा जन्मदिवस शोकविव्हळ वातावरणात साजरा करावा लागणार आहे. या वेळेस उत्साह आणि आनंदाऐवजी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूच तरळणार आहेत आणि शेतकरी कार्यकर्ते सांडुभाई शेख यांच्या कवितेच्या ओळीच प्रत्येकाच्या मुखातून बाहेर पडणार आहेत.

हे ब्रह्मा, विष्णू, पांडुरंगा, तुम्हाला काय कमी सांगा
अमुचे शरद जोशी काका, अम्हाला देऊनी टाका

          शरद जोशींवर जिवापाड प्रेम करणारे, त्यांच्या एका शब्दावर स्वत:चा प्राण धोक्यात घालून आंदोलनाचा झेंडा पुढे नेणारे लक्षावधी पाईक त्यांना मिळालेत हे जितके खरे तितकेच हेही खरे आहे की शेतीचे अर्थशास्त्र मांडताना आणि शेतकरी आंदोलनाला पुढे नेताना त्यांनी कुणाचाही मुलाहिजा ठेवला नाही, कुणाला काय वाटेल याची कधी पर्वा केली नाही त्यामुळे त्यांना शत्रूही लक्षावधीच्या संख्येतच मिळाले. भारत विरुद्ध इंडिया ही संकल्पना मांडताना इंडियाशी वैरत्व घेतले. सारेच पक्ष शेतकर्‍यांचे शत्रू आहेत, असे सांगत सार्‍या राजकीय पक्षांशी दोन हात केले. निवडणुकांतील उमेदवार म्हणजे दोन गाढवांची शर्यत आहे, आपल्याला सोयीचा गाढव निवडायचा आहे असे प्रचारसभेतील व्यासपीठावर उमेदवाराच्या तोंडावर सांगत आपली भूमिका रोखटोकपणे विशद केली. शासकीय कर्मचार्‍यांचे पगार कमी केल्याखेरीज देशाची अर्थव्यवस्था सुधारणे शक्य नाही, असे प्रतिपादन करून शासकीय कर्मचार्‍यांची नाराजी ओढवून घेतली. आपला विचार मांडताना त्यांनी कुठलीच तडजोड केली नाही. परिणामत: त्यांना मिळालेल्या छुप्या शत्रूंची संख्याही अफाट आहे. सत्तेचे लालसी व शेतकरी आंदोलनाचा शिडीसारखा वापर करून राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करू पाहणार्‍या शेतकरी कार्यकर्त्यांनाही त्यांनी आपल्या जवळपास फारसे फिरकू दिले नाही त्यामुळे अनेक कार्यकर्ते शेतकरी आंदोलनापासून दूर जाऊन राजकीय पक्षांशी घरोबा करते झाले.

 

            शेतीला मध्यवर्ती स्थानी ठेवून विचारांची गुंफणं करणारा हा द्रष्टा नेता आज शरीराने आपल्यात नसला तरी त्यांचे विचार अनादिकाळापर्यंत शेतकरी पाईकांना प्रकाशवाट दाखवून शेतकरी चळवळीचे नेतृत्व करत राहील यात शंका नाही. २० व २१ फेब्रुवारी २०१६ ला संपन्न झालेल्या नागपूर येथील दुसर्‍या अ.भा.मराठी शेतकरी संमेलनाने त्यांना युगात्मा ही मरणोत्तर लोकउपाधी प्रदान केली आणि त्यांच्या चरणी भावना अर्पण केली की,

एक युग कवेत घेतले म्हणून तू युगात्मा.
एक युग घडवले म्हणून तू युगात्मा.
स्वातंत्र्योत्तर भारतातील सगळ्यात मोठी
लोकचळवळ उभी केली म्हणून तू युगात्मा.
शेतीचा प्रश्न या मातीचा कळीचा मुद्दा होता
ती कळ तुला सापडली म्हणून तू युगात्मा.
तुझ्या शत्रूलाही तुझे श्रेय नाकारता आले नाही
नंतर नंतर तर सगळे पक्ष आणि संघटना
तुझीच भाषा बोलायला लागले म्हणून तू युगात्मा
ऊठ म्हणालास… उठले युग, चाल म्हणालास चालायला लागले
तुझी पाहून जादू मग ब्रह्मांडही हलायला लागले
युगायुगानंतर येतो असा युगावर मिळवणारा ताबा.
शरद जोशी तुला युगात्मा नाही म्हणायचं
तर काय म्हणायचं बाबा?

– गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

झाडावर पाखरू बसलं : लावणी

झाडावर पाखरू बसलं : लावणी

पाडाशी आला आंबा बघुनी
आभाळ खुदू खुदू हसलं
चोच टोचण्यास पोपट बघतंय
टक लावून एकतार टपलं
कुणी तरी याssss गं
पोपट धराssss गं
माझ्या धीराचं अवसान खचलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं …||धृ||

आडून येती, झाडून येती
चहुबाजूला थवेच दिसती
लगट करुनी झोंबाझोंबी
पानाच्या आडोशाला धसती
चोचटोचुनी चोची चरती
माझ्या फळांची खादल करती
कुणी तरी याssss गं
अलग कराssss गं
माझं काळीज चोळीत थिजलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं …||१||

कलम लावली, खतपाणी दिधलं
कुंपण करुनी जिवापाड जपलं
कुणी ना आलं, पाणी घालाया
खतं टाकाया, कुणी न दिसलं
बहर बघुनी, लाळ गाळती
ताव माराया, अभय चळती
कुणी तरी याssss गं
गोफण धराssss गं
कच्च्या आंब्याला लई बाई पिडलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं …||२||

                  – गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अभिमानाने बोल : जय विदर्भ!

अभिमानाने बोल : जय विदर्भ!

या मातीचा सवंगडी तू
अभिमानाने बोल
ही धनश्री माझी, वनश्री माझी
अन वैदर्भीय भूगोल
तू अभिमानाने बोल
तू अभिमानाने बोल पाईका
वैदर्भीय भूगोल
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!

तूर, कपाशी, धान, हरबरा
ज्वारी, सोयाबीन
जांभूळ, केळी, पपई, संत्री
रास पिके अनगीन
सुजलाम सुफलाम
शस्य शामलाम
द्रुमफ़लही अनमोल
तू अभिमानाने बोल
तू अभिमानाने बोल पाईका
द्रुमफ़लही अनमोल
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!

बावनकशीचा साग इथे
कानन नृपती वाघ इथे
कोकीळ, पोपट, मोर, काजवे
दिव्यफ़णीचा नाग इथे
सप्तसुरांचे नाद बोलती
ताशा नगारा ढोल
तू अभिमानाने बोल
तू अभिमानाने बोल पाईका
ताशा नगारा ढोल
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!

निसर्गराणी, खनिज खाणी
भुईगर्भाला अविरत पाणी
नयन मनोहर अभय अरण्य
वन्य जीवांची मंजूळ वाणी
या मातीला, जनजीवनाला
मानवतेची ओल
तू अभिमानाने बोल
तू अभिमानाने बोल पाईका
मानवतेची ओल
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!

– गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

॥सांगा तुकारामा : अभंग-४॥

॥सांगा तुकारामा : अभंग-४॥

 

धाडा तुकोराया । विठूला सांगावा ।
मायेचा कांगावा । उतू आला ॥१॥

नासले सकळ । तन मन धन ।
मिथ्या जन गण । वेढीयले ॥२॥

विलासी लोळती । द्रव्याचे सोयरे ।
अनाठायी मरे । कामनिष्ठी ॥३॥

विव्देषाचा डोंब । कैसा परतावा ।
स्नेहाचा ओलावा । क्षीण झाला ॥४॥

वैष्णवाचे चित्त । झुंडीची मुसंडी ।
सावजाला धुंडी । मिथ्यावादी ॥५॥

नाही उपवासी । नाही एकादशी ।
अभय द्वादशी । सोडियेली ॥६॥

– गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१८/०७/२०१६

॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

 

सांग तुकोराया तुझा । विठू कुठे मेला? ।
कर्जापायी भक्त त्याचा । स्मशानात गेला ॥धृo॥

पुजा, अर्चा, भक्तिभाव । आरतीचे ताट ॥
सर्वकाळ सत्संगाची । सोडली ना वाट ॥
तरी का रे अल्पायुषी । श्वास बंद केला ॥१॥

जित्रुपाचा दोर हाती । ओठी विठू नाम ॥
रात्रंदिन पाण्यावाणी । गाळलाय घाम ॥
तरी का रे चोपडला । कुंकवाने शेला ॥२॥

तुझा देव, धर्म तुझा । शोषकांचा साथी ॥
घोर, दु:ख, हीनता, गरिबी । पोशिंद्याचे माथी ॥
कळेना अभय कैसा । विठूचा झमेला ॥३॥

– गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(१७/०७/२०१६)