झाडावर पाखरू बसलं : लावणी

झाडावर पाखरू बसलं : लावणी

पाडाशी आला आंबा बघुनी
आभाळ खुदू खुदू हसलं
चोच टोचण्यास पोपट बघतंय
टक लावून एकतार टपलं
कुणी तरी याssss गं
पोपट धराssss गं
माझ्या धीराचं अवसान खचलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं …||धृ||

आडून येती, झाडून येती
चहुबाजूला थवेच दिसती
लगट करुनी झोंबाझोंबी
पानाच्या आडोशाला धसती
चोचटोचुनी चोची चरती
माझ्या फळांची खादल करती
कुणी तरी याssss गं
अलग कराssss गं
माझं काळीज चोळीत थिजलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं …||१||

कलम लावली, खतपाणी दिधलं
कुंपण करुनी जिवापाड जपलं
कुणी ना आलं, पाणी घालाया
खतं टाकाया, कुणी न दिसलं
बहर बघुनी, लाळ गाळती
ताव माराया, अभय चळती
कुणी तरी याssss गं
गोफण धराssss गं
कच्च्या आंब्याला लई बाई पिडलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं …||२||

                  – गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

निसर्गकन्या : लावणी

निसर्गकन्या : लावणी

चांदणं गारा, श्रावण धारा, वादळवारा प्याली
मेघांची गडगड, विजांची कडकड, ऐकून ठुमकत आली
पावसात भिजली, तरी न विझली, ज्योत मनी चेतलेली
भान हरपली आणि थिरकली, वयाची वलसावली

आली निसर्गकन्या आली, ठुमकत आली, थिरकत आली …. ॥धृ०॥

हिरवळ ल्याली, पावसात न्हाली, न्हाऊन चिंबचिंब झाली
मुरडत आली, लचकत आली, लाजून पाठमोरी झाली …… कोरस

निसवता जोंधळा जणू, दाटली तनू, चोळीला भार
उगवती वल्लरी जशी, कांती लुसलुशी, अंग सुकुमार
वनी विहरली, दिशांत फिरली, तरूवर पिंगण घाली …. ॥१॥

श्रावणाची सर, चाळविते उर, हवा खट्याळ पदराला नेते दूर
वाजले कंगण की कोकिळेची कुहु, पैंजणाच्या सवेला मैनेचा सूर
चिमणी-पाखरू, हरिण-कोकरू, फेर धरी भोवताली …. ॥२॥

आसक्त नजर तीक्ष्ण ती, ‘अभय’ बोलकी, अधर अनिवार
खुणवती पापणी प्रिया, पाश द्यावया, बाहु अलवार
शोधीत भिरभीर, बघुनी दूरवर, मनीच पुलकित झाली …. ॥३॥

                                                       – गंगाधर मुटे ‘अभय’
————————————————————————

गवसला एक पाहुणा : लावणी

गवसला एक पाहुणा : लावणी

पहाटलेली विभोर लाली
उधाण वारा पिऊन आली
मस्तीतकाया, धुंदीत न्हाया
कशी उतावीळ झाली
गं बाई उतावीळ झाली
मन ऐकेचना, तन ऐकेचना
जाई पुढे, पळते पुढे
सांगू कुणा? मी सांगू कुणा?
सखे गंsssss
नजरेस माझ्या गवसला एक पाहुणा
सखे गं मला गवसला एक पाहुणा ॥धृ०॥

माझ्या राजाची वेगळीच बात
चाल डौलाची मिशीवर हात
त्याचा रुबाब वेगळा तोरा
तरी चालतोय नाकासमोरा
बघा सूटबूट, कसा दिसतोय क्यूट
लाजाळू कसा, टकमक बघेचना ॥१॥

माझ्या गड्याची न्यारी कहाणी
स्पष्ट विचार, साधी राहणी
जुने थोतांड देतो फ़ेकुनी
नव्या जगाचा ध्यास धरुनी
त्याला विसरेचिना, भूल पडेचिना
सखे गं मना, चैन येईचना ॥२॥

जरी वरवर दिसतो तामस
आत हृदयात दडलाय माणूस
जातो अभय सदा धावून
जनसेवेचे व्रत घेऊन
तोच ठसला मनी, होईल माझा धनी
लावा गं सखे, विड्याला काथ, चुना ॥३॥

. गंगाधर मुटे
…*…..**…..***…..****….***….**….*…

नाचू द्या गं मला : लावणी

नाचू द्या गं मला


गेली रोहिणी, मिरूग आला, आल्या पावसाच्या धारा
थेंब टपोरे चोळी भिजविती, पदर खेचतो वारा
कुलीनघरची जरी लेक मी, मला बंधात जखडू नका
जाऊ द्या गं मला पावसात अडवू नका
भिजू द्या गं मला पावसात अडवू नका
नाचू द्या गं मला पावसात अडवू नका …॥धृ०॥

कोरस :- वेल कोवळी नवथर भेंडी, हिला पिंजर्‍यात दडवू नका
नाचू द्या गं हिला पावसात अडवू नका

कडकड करुनी विजा नाचती
गडगड गर्जन मेघ गर्जती
तरी जरा ना भिती वाटते
झंकार सुरांचे कानी दाटते
पाय थिरकण्या पुलकित करिती
देई टाळी मोर आणिक मयुरी ठुमका ….. ॥१॥

या जलधारा मस्ती करोनी
थेंब मारिती नेम धरोनी
सर्वांगाशी झोंबीत सारा
गुदगुली करितो अवखळ वारा
नसानसातुनी उधाण वाहे
गिरक्या घेते तरी ना थकते, मी नाजुका …..॥२॥

जाऊ एकली नकोच रानी
आई वदली हळूच कानी
घडे असे का मला न कळते
तनामनातुनी काय सळसळते
तरी खेळू द्या अभयाने मज
या धारांच्या पुढती सारा, अमृतघटही फ़िका ..॥३॥

                                                  गंगाधर मुटे
………………………………………………………….
(लावणी)