अ आ आई

बालकविता

अ आ आई
ब ब बाबा
सी फॉर चाचा
अ‍ॅन्ड डी फॉर दादा

मराठी भाषा अमुची आई
हिंदी-इंग्लिश सिस्टर-ताई
शिकून घेऊ विविध भाषा
सप्त सुरांची जशी सनई

बोर, चिंच, पेरू, आंबे
पितळ, सोने, कथील, तांबे
विविधतेचे दृश्य मनोरम
ज्ञानदीपाची तशी समई

ज्ञान वेचणे कणाकणाने
एकेक पाऊल क्रमाक्रमाने
अर्जन करूया अभय प्रज्ञा
स्वत्व गुणाला करू कल्हई
               
                               – गंगाधर मुटे
————————————

       
मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११ 
     मध्ये प्रकाशित कविता
———————————–

भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन

भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन

                भुलाबाईची गाणी ही तत्कालीन सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडवितात. काही गाणी सामाजिक आणि आर्थिक शोषणाला नकळतपणे प्रतिबिंबित करून जातात. या गीतांचे गेयता आणि आशय हेच बलस्थान असल्याने त्यात रचनाशैली, खोटा समाजाभिमुख बेगडीपणा, आलंकारिक शब्दरचना वगैरे कृत्रिमरित्या अनावश्यकपणे घुसडण्याची त्या महिला गीतरचनाकारांना गरजच भासलेली दिसत नाही. मिरची-मसाला न वापरता आहे तेच वास्तव शब्दात उतरविण्याचा प्रयत्न केल्यानेच या गीतांना अस्सल अभिजातपणा आलेला आहे आणि म्हणूनच त्यात ग्रामीण जीवन आणि ग्राम संस्कृतीचे अनेक पदर सहजपणे प्रतिबिंबित झालेले आहेत. हे गीत बघा.

वैदूदादा, वैदूदादा घरावरी चाल गा, चाल गा
बुढ्याचे मचले हाल गा, हाल गा
माही(माझी) सासू म्हणते गा, म्हणते गा
तुले खुट्याची म्हैस देते गा, देते गा.

                 घरात म्हातारा सासरा बिमार झालाय म्हणून वैद्याला बोलवताना त्याला उपचाराची फी म्हणून चक्क खुट्याची म्हैस देण्याचा वायदा करणे म्हणजे काय? नगदी फी का देऊ नये? शिवाय वैद्याची फी आणि म्हशीच किंमत यात खूपच तफावत आहे. या गीताचे दोन अर्थ निघू शकतात. 

                 खिशात रोकड नसली आणि एखादी वस्तू उधार मागायची म्हटले तर थेट तसे उधार न मागता आडवळणाने मागणी प्रस्तुत करायची एक पद्धत आहे. ती आजतागायत वापरात सुद्धा आहे. शेतकर्‍याच्या घरात वर्षातून एकदाच पैसा येत असल्याने व खर्च मात्र वर्षभर करावे लागत असल्याने त्याच्या उधारीचा प्रकारही दिर्घमुदतीचा असतो. स्वाभाविकपणे वैद्य वगैरे एकवर्षाच्या उधारीवर औषधोपचार करायला सहजासहजी तयार होत नसावेत म्हणून गरजेपोटी म्हैस देऊन किंवा म्हैस देण्याची भाषा करून उधारीवर औषधोपचार करून घेणे ही अपरिहार्यता असावी, हे स्पष्ट आहे.

                किंवा दुसरा अर्थ असाही निघतो की, सासर्‍याचा जीव वाचविण्याच्या बदल्यात वैद्याला म्हैस देण्याची भाषा सासू-सुनेने स्वेच्छेनेच केली असावी. शेतकर्‍याला बळीराजा म्हणतात कारण बळीराजाच्या दानशूरपणाचा गूण शेतकर्‍याच्या रक्तामासांत पुरेपूर भिनलेला आहे. आजही शेतकरी समाजाएवढे दानशूर दुसरे कोणीच नाही. अन्नदानाच्या बाबतीत आजही शेतकरी समाज सर्वात पुढे आहे. गणेश स्थापना, महालक्ष्मी स्थापना, माऊंदे, बारसे, लग्नकार्य, व्रतांचे उत्थापन या निमित्ताने शेतकर्‍याच्या अंगणात जेवढ्या पंगती बसतात, तेवढे अन्नदान अन्य कोणत्याच समाजात होत नाही, ही वास्तविकता आहे. वर्षभर घरात चटणी-भाकर खायची पण अन्नदान करताना इतरांना वरण-भात-भाजी-पोळी खाऊ घालायची हा शेतकरी समाजाचा धर्मच बनला आहे. ही वृत्ती चांगली की वाईट, हा स्वतंत्र वादाचा विषय असू शकेल पण शेतकरी माणसापेक्षा पन्नास पटीने अधिक मिळकत मिळविणारी बिगर शेतकरी मंडळी आपली संपूर्ण मिळकत स्वतःच्या स्वतःपुरत्या मर्यादित प्रपंचातच खर्च करीत असतात. स्वतः फारसे दान वगैरे करीत नाहीत आणि शेतकरी करतो त्याचे कौतुकही करीत नाहीत, याउलट “शेतकरी उधळखोर असल्याने कर्जबाजारी होतो’’ असा शिक्का मारून मोकळे होतात.

               शेतकर्‍यांमधील दानशूरपणाची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. शेतकर्‍याच्या घरी येणारा पाहुणा कधीच उपाशी जात नाही. चहा-सुपारीवर पाहुण्याची बोळवण करणे अजूनही शेतकर्‍याला जमलेच नाही. अर्धा लाख मासिक मिळकत मिळवूनही भिकार्‍याच्या ताटात चार आणे टाकण्यासाठी का-कू करणे किंवा त्याऐवजी भिकार्‍याला दुनियाभराची अक्कल सांगत सुटणार्‍यांच्या या देशात आजही शेतकर्‍याच्या दारात भिक्षेकरी गेला तर त्याच्या झोळीत अगदीच सहजपणे शेर-दोन शेर धान्य पडतच असते. स्वेच्छेने लोकवर्गणी देऊन गावात एखादा सार्वजनिक उत्सव साजरा करणे त्याच्या अंगवळणीच पडले आहे.

             विनोबांच्या भूदान यज्ञात शेतजमीन दान करण्याची हिंमत शेतकर्‍यांनी दाखविली आहे. जनावरे (मुख्यत: गाय) दान करण्याची फार जुनी परंपरा आहे. काही काळापूर्वी झाडे सुद्धा दान दिली जात. आजही महसूल खात्याच्या नोंदी तपासल्या तर शेतीची मालकी एकाची आणि त्याच शेतातील झाडाची कायदेशीर मालकी दुसर्‍याची, असे प्रकार आढळतात.

शहरातील मनुष्य जर खेड्यात शेतकर्‍याकडे आला तर येताना सोबत रिकामी पिशवी घेऊन येतो. शेतकरीही अगदी आनंदाने चिंच, बोर, आंबे, संत्री, केळी, वांगी, मिरची, टमाटर, कोबी यापैकी त्याच्याकडे जे उपलब्ध असेल त्या वस्तूंनी ती रिकामी पिशवी भरून देतो. त्याचा तो कधीच मोबदला घेत नाही कारण रिकामी पिशवी घेऊन येणारा कधी मोबदला देतच नाही. मला अगदी बालपणापासून पडलेला प्रश्न असा की हे वनवे ट्रॅफिक का? शहरी माणसाला शेतकर्‍याकडून ताजा भाजीपाला, फुले फळे प्रेमाच्या नात्याखातर विनामूल्य घेऊन जावे असे वाटत असेल तर त्यात गैर काहीच नाही; पण येताना तो पिशवी रिकामीच का घेऊन येतो? शहरामध्ये असे अनेक पदार्थ असतात की जे शेतकर्‍यांनी कधीच पाहिलेले किंवा खाल्लेले नसतात. बालूशाही, बर्फी, चमचम, रसगुल्ला, फरसाण वगैरे तर लहानसहान शहरातही उपलब्ध असतात. मग शहराकडून खेड्याकडे येणारी पिशवी हमखास रिकामीच का असते? ज्याला इकडून काहीतरी घेऊन जायची सुबुद्धी असते त्याला तिकडूनही काहीतरी घेऊन येण्याची देव सद्‍बुद्धी का देत नाही? शेतकर्‍यांनी हे पदार्थ खाणे त्यांच्या प्रकृतीला हानिकारक असते काय? की शेतकर्‍याला हे पदार्थ पचतच नाही, खाल्ले तर शेतकर्‍याला अंदाधुंद ओकार्‍या होतील असे शहरी माणसाला वाटते?  बरे या एकतर्फी प्रेमाचे समीकरण शेतकर्‍याच्या लक्षात येत नसेल काय? बहुतेक नाहीच कारण पाहुण्याची पिशवी भरून देताना त्याच्या चेहर्‍यावर जे समाधान उमटते ते काही औरच असते. त्याची नैसर्गिक दातृत्ववृती अधोरेखित करणारे असते.

             वरील गीताचा समीक्षणात्मक अंगाने विचार केल्यास या गीतात गेयता, यमक आणि आशय वगळता अलंकार, उपमा, लेखनकौशल्य वगैरे फारसे आढळणार नाही पण आशयगर्भिता हेच या गीताचे बलस्थान आहे. चार ओळीच्या या गीतातील शब्दयोजना अत्यंत समर्पक व नेमकी असून दोनशे पानाचे पुस्तक लिहूनही जो आशय नेमकेपणाने व्यक्त करणे कठीण जाईल, एवढा प्रचंड आशय या गीतात ठासून भरला आहे. 

               मचने हा शब्द सध्या प्रमाणभाषेत वापरला जात नाही आणि मचणे या शब्दाचा नेमका अर्थ व छटा प्रकट करणारा दुसरा पर्यायी शब्द प्रमाणभाषेत उपलब्ध नाही. मर्यादित शब्दात गेयता राखून अमर्याद आशय व्यक्त करायचा असेल तर “मचणे” या शब्दासारखे शब्द भाषेत असणे अत्यंत आवश्यक आहे आणि मोजक्या शब्दात बरेच काही व्यक्त करणारे शब्द असल्याखेरीज कोणत्याही भाषेला भाषासमृद्धी येऊ शकत नाही, हेही लक्षात घेणे तितकेच गरजेचे आहे. 

                   बुढ्याचे मचले हाल याचा अर्थ वयाने म्हातारपणाकडे झुकलेल्या सासर्‍याला काहीतरी भयानक बिमारी झाली आहे. त्याच्या शरीरात उठणार्‍या कळा आणि आत्यंतिक वेदनांमुळे तो विव्हळत, तळमळत किंवा तडफडत आहे, असा होतो.

                     जेथे मला अर्थ लिहायला दोन वाक्य व बावीस शब्द वापरावे लागले व पद्याचे गद्य झाले तेथे तेवढाच आशय या गीतामध्ये “बुढ्याचे मचले हाल” या तीनच शब्दात व्यक्त झालाय आणि गेयताही निर्माण झाली. हे शक्य झाले ते केवळ मचले या शब्दाच्या वापरामुळेच.

                       गीतामध्ये वैद्यबुवाला घरावरी म्हणजे घरापर्यंत चाल असे म्हटलेले आहे, घरी ये असे म्हटलेले नाही. घरी ये असे म्हणण्यामध्ये औषधोपचार करण्यासाठी घरी ये असा अभिनिवेश असतो. 

                   मात्र घरापर्यंत चाल याचा वेगळा अर्थ लागतो. खरे तर पेशंटला जेवढी वैद्याची गरज असते तितकीच किंवा त्यापेक्षाही जास्त गरज “पापी पेट का सवाल है” या न्यायाने वैद्याला पेशंटची असायला हवी. ज्या घरात आजारी व्यक्ती आहे ते घर जर ऐश्वर्यसंपन्न आणि आर्थिक सुदृढ असेल तर उपचारासाठी बोलावताना वैद्याची मिनतवारी करायची गरज भासूच नये. कर्तव्यदक्षता किंवा पैशाचा मोह या दोन कारणापैकी निदान एका कारणाने तरी वैद्याने आजारी माणसाच्या घराकडे पळतच सुटायला हवे. पण या गीतातील आशयाचा मामला जरा वेगळा आहे. या म्हातार्‍याच्या घरची आर्थिक स्थिती वैद्याला माहीत असणार म्हणून तो चालढकल करीत असावा. म्हणून सून जे म्हणते त्याचा अर्थ असा की,

                “हे वैद्यराजा, तू मला माझ्या थोरल्या दादासारखा आहेस. तू केवळ माझ्या घरापर्यंत चल. उधारीवर उपचार करायचे किंवा नाही याचा निर्णय तू नंतर घे, मला खात्री आहे की, तू घरापर्यंत आलास तर माझ्या सासर्‍याच्या वेदना पाहून तुझे अंतःकरण नक्कीच द्रवेल. समोरचे दृश्य बघून व्यावसायिक विचार बाजूला पडेल, उधार की नगदी यापेक्षा पेशंट व वैद्य यांच्यातील नात्याची आठवण तुला होऊन तुझ्यातला वैद्य जागा होईल. म्हणून तू इथून ऊठ, फक्त माझ्या घरापर्यंत चल आणि एक नजर माझ्या सासर्‍यावर तर टाक.” 

               या चार ओळीच्या गीताची नायिका सून आहे. सामाजिक भान हरवलेल्या एखाद्या साहित्यश्रेष्ठ कवीने ही कविता लिहायला घेतली असती तर आजारी सासरा आहे मग वैद्याला बोलवायला सासूच जाऊ शकते, सुनेसाठी कवितेत स्थानच निर्माण होत नाही असे गृहीत धरून सासूलाच नायिका बनविले असते. पण या गीतात तसे झाले नाही. सून-सासू-सासरा या नात्याच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न येथे झालेला दिसतो. या घरातली सून “सासरा माझा कुरकूर करे, तिकडेच मरू दे त्याले, भवानी आई रोडगा वाहीन तुले” असे म्हणणार्‍यापैकी नक्कीच नाही. सासर्‍याचे दु:ख पाहून व्याकूळ होणारी आहे. म्हातार्‍याच्या उपचारासाठी खुट्याची म्हैस देऊन टाकू म्हणणार्‍या सासूचे ती समर्थन करते. सासू सासर्‍यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविणार्‍या उच्चभ्रू सभ्य संस्कृतीचा तिला अजूनतरी वारा लागलेला दिसत नाही.

                      खुट्याची म्हैस देणे हे सुद्धा आशयगर्भ वाक्य आहे. तुकारामांनी “भले आम्ही देऊ कासेची लंगोटी” असे म्हटले. कासेची न म्हणता नुसतीच लंगोटी देऊ म्हटले असते तर त्याचा अर्थ परिणामकारकतेने प्रकट झालाच नसता. तसे म्हैस देणे आणि खुट्याची म्हैस देणे यातही फरक आहे. म्हैस देतो म्हणणे याचा अर्थ अनेक म्हशीपैकी एक देतो, असा निघू शकला असता. पण खुट्याची म्हैस देतो याचा अर्थ खुट्याला असलेली एकमेव म्हैस असाच घ्यावा लागेल. अशा परिस्थितीत खुट्याची म्हैस देण्याची भाषा दानशूर वृत्ती किंवा आत्यंतिक विवशता या दोनपैकी निदान एक तरी कारण स्पष्टपणे अधोरेखित करून जाते.

            या चार ओळीच्या गीतातील एकेक शब्द तोलून-मापून वापरलेला दिसत आहे. नेमक्या शब्दप्रयोगामुळे मर्यादित शब्दामध्ये अमर्याद आशय गुंफणारे कवित्व अशिक्षित ग्रामीण महिलांनी गेयस्वरूपात कवन केले आहे. पण या भुलाबाईच्या गीतांकडे साहित्यक्षेत्राने कधीच गंभीरतेने पाहिलेले दिसत नाही. ग्रामीण अशिक्षित जनजीवनामध्येही तोलमोलाचे काव्य रचण्याचे अंगीभूत कौशल्य असू शकते, भुलाबाईंची गाणी सुद्धा साहित्यक्षेत्राला मार्गदर्शक ठरू शकतात असे गृहीत धरून जर काव्यजगताची पुढील वाटचाल झाली असती तर मूठभर आशय व्यक्त करण्यासाठी ढीगभर शब्दांचे मनोरे रचून गेयता गमाविलेल्या गद्यस्वरूपातील निबंधांना कविता म्हणण्याचा प्रघातच पडला नसता. कवितेने सामाजिक बांधीलकी जपली असती तर कवीही स्वतःच्या एकलकोंड्या मानसिकतेतून बाहेर येऊन समाजाशी एकरूप झाला असता. कवितेला जनसामान्यांच्या सुखदु:खाची किनार लाभली असती तर कविता आमजनतेच्या भावविश्वाशी समरस झाली असती. आहे ते वास्तव साकारण्याचा प्रयत्न झाला असता तर कवितेच्या विषयामध्ये विविधता आली असती व काव्य लोकाभिमूख झाले असते आणि जर असे झाले असते तर कवी आणि कविता हा चेष्टेचा व उपहासाचा विषय नक्कीच झाला नसता अशी आता माझी खात्री पटायला लागली आहे.

                                                                                                                                गंगाधर मुटे
———————————————————————————————————

भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा

भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा

              बालपणीच्या अशा फारच कमी आठवणी असतात की ज्या माणसाच्या आयुष्यभर सावलीसारख्या सोबत-सोबत चालतात. जीवनाने कितीही रंग बदललेत, आचार-विचारांच्या संरचनेत कितीही बदल झालेत तरीही त्या आठवणी मात्र वास्तवाचे कायम स्मरण करून देत असतात. एका अर्थाने ह्या आठवणी माणसाला “डोळस दृष्टी” प्राप्त करून देत असतात आणि सामाजिक जीवनमानाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोनही देत असतात.

             माझ्या बालपणीच्या (१९७०-७५) काळात दळणवळणाची साधने एकतर फारसी विकसित झाली नव्हती किंवा ग्रामीण भागापर्यंत पोचलेली तरी नव्हती. एखादी मोटर सायकल जरी गावात आली तरी गावातील लहानसहान पोरं मोटरसायकल मागे धावायचीत. बुजुर्ग मंडळीही घराबाहेर येऊन कुतूहलाने बघायचीत. त्याकाळी गावातले दळवळणाचे सर्वात मोठे विकसित साधन म्हणजे सायकल. सायकलचा वापरही केवळ पुरुषांसाठीच असायचा. पत्नीला सुद्धा सायकलवर बसवणे लाजिरवाणे वाटायचे आणि कुणी जर तसा प्रयत्न केलाच तर ते चेष्टेचा विषय ठरायचे.  ग्रामीण जनतेचे दळणवळणाचे एकमेव साधन म्हणजे रेंगीबैल, छकडा, दमनी वगैरे. गावाला जोडणारे पक्के रस्ते उपलब्ध नसल्याने ग्रामीण माणसांचा संचारही मर्यादित असायचा. पावसाळाभर गावाचा संपूर्ण जगाशीच संपर्क तुटायचा, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.

           इलेक्ट्रिक, टेलिफोन किंवा तत्सम साधने गावात पोचायची होती. टीव्ही, संगणकाचे नामोनिशाण नव्हते. गावात दिसलाच तर एकट-दुकट रेडियो दिसायचा. गावातील एखादा तरुण नोकरी करायला शहरात गेला की शहरातून गावाकडे परतताना हमखास काखेला रेडियो लटकवून आणि रस्त्याने गाणी वाजवतच गावात प्रवेश करायचा. लग्नामध्ये हुंडा म्हणून गोफ, घड्याळ, अंगठी, सायकल आणि रेडियो ही वरपक्षाची सर्वात मोठी मागणी समजली जायची. स्वाभाविकपणे मनोरंजनाची काहीच साधने उपलब्ध नसल्याने पारंपरिक सण साजरे करून त्यातूनच मनोरंजनाची गरज पूर्ण केली जायची.

        जी अवस्था दळणवळण व मनोरंजनाची; तीच वैचारिक देवाणघेवाणीची. सभा, मेळावे, परिसंवाद याचे लोण गावापर्यंत पोचलेच नव्हते. चालायचेत ते केवळ हरिनाम सप्ताह किंवा कीर्तन-प्रवचने.  हरिनाम सप्ताह किंवा कीर्तन-प्रवचने याप्रकारातला सर्वात मोठा दोष असा की हे वनवे ट्रॅफिक असते. त्यात चर्चेला वगैरे काहीच स्थान नसते. एकाने सांगायचे आणि इतरांनी ते भक्तिभावाने श्रवण करायचे. आपल्या सुखद:खांना व्यक्त करण्याचे व्यासपीठच उपलब्ध नसल्याने ग्रामीण जनतेची केवढी घुसमट झाली असावी, याचा अंदाज आता सहज बांधता येऊ शकतो.

       निदान पुरुष मंडळींना मारुतीच्या पारावर किंवा चावडीवर बसून गप्पा तरी करता येत होत्या. भावना व्यक्त करायला संधी मिळत होती, पण महिलांचे काय? त्यांना ना पारावर बसून गप्पा मारण्याची अनुमती, ना सुखदु:खाला व्यक्त करण्यासाठी एखादे व्यासपीठ उपलब्ध. त्यामुळेच महिलाप्रधान सण अतिशय जिव्हाळ्याने साजरे केले जात असावेत आणि त्यानिमित्ताने ग्रामीण महिला मनोरंजन आणि एकीमेकीचे क्षेमकुशल व्यक्त करण्यासाठी अथवा जाणून घेण्यासाठी या सणांचा वापर व्यासपीठासारखा वापर करून घेत असाव्यात.

       अशाच काही महिलाप्रधान सणापैकी भुलाबाईचा उत्सव हा एक सण. आश्विन शु.१० ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंतचा काळ “आश्विनच्या भुलाया” म्हणून साजरा केला जातो. काही भागात याला हादगा म्हटले जाते तर काही भागात भोंडला. या काळात मातीच्या बाहुल्या/भुलाया मांडून दररोज नित्यनेमाने गाणी म्हटली जातात. खिरापत वाटली जाते. जसजसा काळ बदलत गेला तसतसे या सणांचे महत्वही कमी होत गेले.

       पण त्याकाळी छोट्या-छोट्या बालिकांपासून जख्खड म्हातार्‍या महिला सुद्धा यामध्ये गाणी गायनासाठी सहभागी होत असायच्या. त्या पैकी काही गाणी ऐकतांना माझ्या अंगावर काटा उभारायचा. तर काही गाणी ऐकून मन खूप-खूप उदास व्हायचे. काही गाणी मनाला चटका लावून जायची तर काही गाणी ऐकताना कुतूहलमिश्रीत प्रश्नचिह्न निर्माण व्हायचे.

रुणझुण पाखरा जा माझ्या माहेरा
माझ्या का माहेरी सोन्याची पायरी
त्यावरी बसजो शिदोरी सोडजो
माझ्या का मातेला निरोप सांगजो
तुझ्या का लेकीला बहू सासुरवास
होते तर होऊ दे औंदाच्या मास
पुढंदी धाडीन … गायीचे कळप
पुढंदी धाडीन … म्हशीचे कळप

सोन्याचे मंदिर, सोन्याचा कळस या धर्तीवर घराचे छत सोन्याचे असेल तर ते समजण्यासारखे होते, पण घराला चक्क सोन्याची पायरी? उलगडा व्हायचा नाही म्हणून मग खूप कुतूहल वाटायचे.

      भुलाबाईच्या गाण्याला तत्कालीन सामाजिक साहित्याचा आविष्कारच म्हणावे लागेल. साहित्य हा समाजाचा आरसा असतो असे म्हणतात. परंतू थोरा–मोठ्या कवी/लेखकांच्या साहित्यात तत्कालीन वास्तव प्रामाणिकपणे उतरलेलेच नसावे. त्या काळात संतकवी देवास भजण्यात गुंग, त्यांचे बहुतांश काव्यवैभव/प्रतिभा देवाचे गूण गाण्यात खर्ची पडली असावी. कवी हा तर मुळातच कल्पनाविलासात रमणारा प्राणी. वास्तववादी लेखन केले तर आपल्या काव्याला साहित्यिक दर्जा मिळणार नाही, या भयाने पछाडलेला. त्यातल्यात्यात कवी हे बहुतांश पुरूषच. त्यामुळे आपल्या दुखा:ला कोणीच वाली नाही हे बघून महिलांचा कोंडमारा झाला असावा. महिला विश्वाच्या सुखदु:खाचे लेखक, कवी किंवा गीतकारांनी नीट शब्दांकन केले नाही म्हणून आमच्या मायमाउल्या स्वतःच पुढे सरसावल्या असाव्यात आणि कदाचित त्यामुळेच अपरिहार्यपणे महिलांनी प्रस्थापित काव्याला फाटा देऊन स्वतःचे काव्यविश्व स्वतःच तयार केले असावे. कवी, गीतकार आणि संगीतकाराची भूमिका त्यांनीच चोख पार पाडली असावी आणि मग त्यातूनच आकारास आले असावे हादगा, भोंडला, भुलाबाईचे गाणे. या गीतामध्ये साठवलेली आहेत महिलांची अपार दु:खे. प्रकट झाली आहे साताजन्माच्या असहायतेची कारुण्यता. स्पष्टपणे प्रतिबिंबित झाली आहे अबला म्हणून आयुष्य कंठतांना वेळोवेळी झालेली कुचंबणा आणि मिळालेली हीनत्वाची वागणूक. त्यासोबतच अधोरेखित झाली आहे अठराविश्व दारिद्र्य लाभलेल्या संसाराचा गाडा हाकलताना झालेली दमछाक व ससेहोलपट अगदी ठळकपणे.

          वरील गीतात आईच्या घराला सोन्याची पायरी आहे असे म्हटले आहे. मग याला काय म्हणावे? कल्पनाविलास की अतिशयोक्ती? माहेरच्या बढाया की वास्तवता? मला मात्र यामध्ये एक भीषण वास्तविकता दिसते. ती सासुरवासीन जेव्हा सांगावा धाडण्यासाठी त्या पाखराला तिच्या माहेरगावी पाठविण्याचा बेत आखते तेव्हा तिचे माहेरघर पाखराला ओळखता यावे यासाठी तिच्या आईच्या घराची ओळख, खाणाखुणा सांगणे क्रमप्राप्तच ठरते. नेमकी येथेच तिची गोची झाली असावी. तिच्या आईच्या घराचे कवेलू, छप्पर, भिंती आणि दरवाजे हे नक्कीच सांगण्यायोग्य नसावे. खरं आहे ते सांगण्यासारखं नाही आणि खोटंही बोलायचं नाही अशी स्थिती जेव्हा उद्‍भवते तेव्हा अतिशयोक्तिपूर्ण कथन करून वेळ मारून नेणे, हाच तर मनुष्यस्वभाव आहे.  “जेव्हा एखाद्याकडे सांगण्यासारखे काहीच नसते तेव्हा तो बढाईचा आधार घेत असतो” हेच तर त्रिकाल अबाधित शाश्वत सत्य. मग तिने सोन्याची पायरी सांगितली त्याचा वेगळा अर्थ कसा घेणार?

         त्यावरी (पायरीवर) बसजो, शिदोरी सोडजो म्हणजे काय? निरोप घेऊन जाणार्‍या पाखराला सोबत नेलेली शिदोरीच खाण्यास सांगायला ती विसरत नाही. का? उत्तर अगदी सोपे आहे, पाखराला तातडीने जेवायची व्यवस्था आईच्या घरी होऊ शकेल अशी परिस्थिती आईचीही नाही, हे तिला पुरेपूर ठाऊक असावे. तसे नसते तर तिने सोबत शिदोरी कशाला दिली असती? आईचे गाव लांब आहे, तेवढी मजल गाठेपर्यंत रस्त्याने भूक लागेल हा उद्देश असता तर मध्येच वाटेवरच्या एखाद्या विहिरीवर किंवा नदीवर बसून शिदोरी खायला सांगितले असते. आईच्या घरी पोचल्यावर पायरीवर बसून सोबतचीच शिदोरी खावी जेणेकरून पाव्हणा उपाशी नाही याचे समाधान आईला लाभेल व आईकडे पाव्हण्याला तातडीने जेवू घालायची व्यवस्था नसेल तरी तिची या फ़टफ़जितीपासून सुटकाही होईल, असा कयास बांधूनच तिने पाखराला नेमकी सूचना दिली, हे उघड आहे.

           आता हे गीत बघा. या गीतामध्ये एका सुनेला लागलेली माहेरची ओढ आणि सुनेला जर माहेरा जाऊ दिले तर शेतीत कष्ट करणारे दोन हात कमी होतील, या भितीने त्रेधातिरपट उडालेल्या कुटुंबातील उर्वरित सदस्यांची हतबलताच दिसून येत आहे.

           नुकतेच लग्न होऊन सासरला नांदायला आलेल्या सुनेला तिच्या माहेरची आठवण होते, आईच्या आठवणीने जीव व्याकूळ झालेला असतो. तिकडे आईला सुद्धा लेकीची आठवण होऊन गहिवरलेले असते म्हणून मायलेकीची गाठभेठ करून देण्यासाठी बाप लेकीला घेण्यासाठी आलेला असतो. बाप घ्यायला आलेला बघून आनंदाने उल्हसित झालेली सून सासूला हळूच पण भीत-भीत विचारते.

हात जोडूनी पाया पडूनी
सासूबाई मी विनविते तुम्हाला
बावाजी आले घ्यायाला
जाऊ का मी माहेराला, माहेराला?

माहेराला जायची रीतसर परवानगी सूनबाई मागते आहे हे बघून सासू थोडी भांबावते. तिच्या समोर अनेक प्रश्न उभे राहतात. एक तर काहीना काही पैसा लागेलच जो घरात नाहीच. दुसरे असे की शेतीत कष्ट करणारे दोन हात पण कमी होणार. म्हणून ती सुनेला म्हणते.

कारलीचे बी लाव गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा

कारलीच्या बियाणाची लागवड करून माहेराला जाण्याचा सल्ला सुनेला मनोमन पटतो. ती बेगीबेगी लागवड उरकते आणि पुन्हा सासूला विचारते.

कारलीचे बी लावलेजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा

एक वेळ मारून नेता आली. कारलीचे बी लावून झाले पण आता पुढे काय? पुन्हा सासूबाई शक्कल लढवते.

कारलीचा वेल निघू दे गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा

सून पुन्हा काही दिवस कळ काढते, बियाणे अंकुरून वेल निघेपर्यंत बियाला पाणी घालते, वेलीचे संवर्धन करते आणि मग वेल निघालेला बघून पुन्हा एकदा आपल्या सासूला विचारती होते.

कारलीचा वेल निघालाजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा

सासूसमोर पुन्हा तोच यक्षप्रश्न. इकडे आड तिकडे विहीर. नाही म्हणता येत नाही आणि पाठवायला गेले तर संसाराचं अर्थशास्त्र कोसळते. कौटिल्याची अर्थनिती कळायला अर्थतज्ज्ञ किंवा अर्थमंत्रीच लागतो या सुशिक्षित समाजातील गोंडस समजुतीला उभा छेद देणारी एका अशिक्षित सासूची वर्तणूक.  मग तिथून पुढे नवनवीन युक्त्या लढविणे सासूचा नित्यक्रमच बनून जातो.

कारलीला फूल लागू दे गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा

कारलीला फूल लागले की माहेराला जायला मिळणार या आशेने सून मात्र आलेला दिवस पुढे ढकलत असते.

कारलीला फूल लागलेजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा

कारलीचा वेल मांडवावर गेलाय. वेल फुलांनी बहरून गेली. पण नशिबाच्या वेलीला बहर येईल तेव्हा ना.

कारलीला कारले लागू दे गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा

आता प्रतीक्षेची घडी संपली. कारलीला कारले लागलेत. आता तरी परवानगी मिळायला हवी की नाही?

कारलीला कारले लागलेजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा

आता कष्ट फळांस आले. कारली पण कारल्याने लदबदून गेली. पण कारली बाजारात नेऊन विकल्याखेरीज पैसा कसा येणार? म्हणून पुन्हा सासू सुनेला अगदी समजावणीच्या स्वरात सांगते

कारलीला बाजारा जाऊ दे गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा

कारलीला कारले लागलेत, कारली बाजारात गेली. आता मात्र नक्कीच परवानगी मिळणार अशी सुनेला खात्री आहे, म्हणून ती म्हणते

कारली बाजारात गेलीजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा

कारली बाजारात गेली आहे. शेतीत पिकवलेला माल बाजारात जाणे, हा शेतीतील कष्ट फळांस येणारा परमोच्च बिंदू. खरे तर हे गीत यापुढे आनंदाच्या क्षणांकडे वळायला हवे. एवढ्या मेहेनतीने पिकविलेली कारली बाजारात जाणे हा कष्टाचे फळ पदरात पडण्याचा क्षण. शेतकर्‍याच्या घरात लक्ष्मी येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शेतीत घाम गाळून पिकविलेला माल विक्रीस जाणे. माल विकायला बाजाराकडे गेलेला घरधनी घराकडे येताना लक्ष्मी घेऊन परतायला हवा. सोबत काहीना काही भातकं, खाऊ वगैरे आणायला हवा. पण इथून पुढे या गीतात तसे काहीच होत नाही. याउलट गीताच्या याच कडव्यापासून गीत विचित्र वळण घेते. निदान आतापर्यंत तरी कुठलाही खाष्टपणा न दाखविणार्‍या सासूचा स्वभाव इथूनच बदलायला लागतो. आजपर्यंत घरात एकमेकाशी गोडीगुलाबीने वागणारी माणसे आता नैराश्याच्या भावनेतून एकमेकांशी फटकून वागताना दिसत आहे. घरात चिडचीडपणा, उदासीनता वाढीस लागलेली दिसत आहे.

         नेमकं झालंय तरी काय? कारली मातीमोल भावाने तर नाही खपली ना? की कारलीच्या खरेदीला कोणी घेवालच मिळाला नाही? मनुष्यजातीचा स्वभाव त्याच्या आर्थिक स्थितीनुसार बदलत असतो हे समीकरण अर्थतज्ज्ञांच्या अर्थशास्त्रात बसत नसले तरीही तेच सत्य असावे. कारण या गीताचा शेवट नेमके तेच अधोरेखीत करून जातो.

आतातरी आपल्याला माहेराला जायला मिळणार की नाही या विचाराने ग्रस्त झालेली सून परत एकदा सासूला विचारती होते. सासूला खूश करण्यासाठी तिला तिच्या आवडीची कारलीची भाजी करून खाऊ घालते.

कारलीची भाजी केलीजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा

पण आता आर्थिक विवंचनेने ग्रासलेल्या घरातली सारी कहाणीच बदललेली असते. परिस्थितीसमोर निरुत्तर झालेली सासू चक्क सुनेसोबत त्रोटक स्वरूपात बोलायला लागते. तिची भाषा बदलते, भाषेची ढब बदलते आणि शब्दफ़ेकीची तर्‍हाही बदलते.

मला काय पुसते, बरीच दिसते
पूस आपल्या सासर्‍याला, सासर्‍याला

अगं सूनबाई, माझी ना नाही पण एक शब्द मामंजीला पण विचारून घे ना. असे म्हटले असते तर ते समजण्यासारखे होते पण सासूची आता तशी सहज आणि सौदार्हपूर्ण बोलीभाषाच बदललेली दिसत आहे कारण “मला काय पुसते, बरीच दिसते” हे वाक्य वाटते तेवढे सहज नाही. या वाक्यात उद्वेग, उबग, क्लेश, चिडचिड, ग्लानी आणि फ़टकळपणा ठासून भरला आहे.
मात्र तरीही “सासर्‍याकडूनच परवानगी घ्यायची होती तर इतके दिवस तुम्ही कशाला उगीच बहाणे सांगत राहिल्या” असा प्रतीसवाल सून करीत नाही. सासूची इच्छा प्रमाण मानून सून आता सासर्‍याला विचारायला जाते.

मामाजी, मामाजी बाबा आले न्यायाला
जाऊ काजी माहेरा, माहेरा

पण सासरा तरी वेगळं बोलणार? सुनेला माहेरी पाठवायचे म्हणजे निदान तिला जाण्यापुरता तरी घरात पैसा असावा की नाही? नसणारच. म्हणून तर तोही आपल्यावरची जबाबदारी दुसर्‍यावर ढकलून मोकळा होतो.

मला काय पुसते, बरीच दिसते
पूस आपल्या नवर्‍याला, नवर्‍याला

आता शेवटला पर्याय. तिची माहेराला जाण्याची हक्काची मागणी कोणीच समजून घेतली नाही. पण आता परवानगी देण्याचे अधिकार थेट नवर्‍याच्याच हातात आले आहे. तिच्या व्याकुळतेची तीव्रता नवर्‍याला तरी नक्कीच कळलेली असणार, असे तिला वाटते. तिला खात्री आहे की आता नक्कीच जायला मिळणार. बस्स एवढ्याच तर आशेपायी ती नवर्‍याला विचारायला जाते.

स्वामीजी, स्वामीजी बाबा आले न्यायाला
जाऊ काजी माहेरा, माहेरा

पण प्राणप्रियेच्या प्रश्नाला नवरा उत्तरच देत नाही. नवरा काय म्हणतो हे गीतात लिहिलेच नाही. गीताचा दोन ओळीत थेट शेवटच करून टाकला आहे.

”घेतलीय लाठी, हाणलीय पाठी,
तुला मोठं माहेर आठवते, आठवते……!!”

             पीएचडी, डी.लिट मिळवून किंवा वेदपुराण, कुराण, बायबल, कौटिल्य, चाणक्य किंवा हजारो पानांचे अर्थशास्त्राचे पुस्तक वाचूनही जेवढे गाव, गरिबी आणि शेतीचे अर्थशास्त्र समजून घेता येत नाही त्यापेक्षा जास्त वास्तववादी अर्थशास्त्र ह्या एका गीतात सामावले आहे, याची मला खात्री आहे.

                                                                                                                        गंगाधर मुटे

…………………………………………………………………………………………………………………….
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
…………………………………………………………………………………………………………………….

माझी मराठी माऊली : ओवी

माझी मराठी माऊली : ओवी

.
.

माझी मराठी माऊली, जसा ओंकाराचा वाण
शब्दशब्द मोहविते, हरपते देहभान             …॥१॥

माझी मराठी माऊली, शब्दामध्ये सरस्वती
ओव्या, श्लोक वाचुनिया, सारे जन सुज्ञ होती   …॥२॥

माझी मराठी माऊली, जसा गंगेचा प्रवाह
ओघवते उच्चारण, मन बोले वाह! वाह!!      …॥३॥

माझी मराठी माऊली, कोकिळेची कुहूकुहू
जशी पहाटेची साद, येते कानी मऊमऊ        …॥४॥

माझी मराठी माऊली, इंद्रधनुष्याचे रंग
आणि सुवासाने होई, चंपा, जाईजुई दंग      …॥५॥

माझी अभय मराठी, रेशमाची नरमाई
दिसे माऊली शोभून, सार्‍या जगताची आई    …॥६॥

                               गंगाघर मुटे “अभय”

……………………………………………………………..
सर्वांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
…………………………………………………………….

आंतरजालीय व्यासपीठ

                सध्या आंतरजालावर मराठीमध्ये मोठ्या प्रमाणावर लेखन केले जाते. त्यात ब्लॉग (अनुदिनी) आणि मराठी संकेतस्थळे येथे विपुल लेखन केले जाते. आंतरजालावर लेखन करण्याचा सहजसोपा, कुणाचाही अंकुश नसलेला पर्याय उपलब्ध झाल्याने आजवर निव्वळ  वाचक असलेली मंडळी आता लेखन करायला लागली आहे. त्यामुळे आता आंतरजालावर लेखक, वाचक, समीक्षक, व टीकाकार या वेगवेगळ्या भूमिका एकच व्यक्ती वठवायला लागली आहे. त्यामुळे आंतरजालावरील लेखनाकडे पाहताना काही चित्रविचित्र मुद्दे उपस्थित होत आहेत. त्यातील काही बाबी अशा.
   १) लेखनावर अंकुश नसल्याने तसेच संपादन करणारा कुणीच नसल्याने ज्याला जसे वाटेल तसे लिहायची मुक्तमुभा मिळाली आहे. त्यामुळे लेखकाजवळ त्या विषयाचा पुरेसा अभ्यास व वैचारिक परिपक्वता नसूनही त्याने जर नको तो विषय हाताळला तर त्याच्या वादग्रस्त लेखनाला थोपविता येणे सहज शक्य नाही.
   २) लेखक/कवीला लेखनाविषयीचा स्वतःचा असा एक दृष्टिकोन असतो. इतर लेखक/कवीचा लेखनाविषयीचा वेगळा दृष्टिकोन असू शकतो, पण स्वतः लेखक/कवी असलेला व्यक्ती इतरांच्या लेखनावर प्रतिसाद देताना ही बाब दुर्लक्षित करून स्वतःच्या दृष्टिकोनातून  इतरांच्या कलाकृतीकडे बघतो तेव्हा चांगल्या रचना देखिल त्याला भंकस वाटायला लागतात. त्यामुळे एखाद्या उत्तम कलाकृतीचे योग्य ते समीक्षण, मूल्यमापन होईल याची अजिबात शाश्वती देता येत नाही.
   ३) लेखक/कवी हाच प्रतिसादक असल्याने “जो मला प्रतिसाद देतो, मी सुद्धा त्यालाच प्रतिसाद देईन” अशी भावना जोर धरून एकतर कंपूबाजी तयार होते किंवा “मी तुझी पाठ खाजवतो, तू माझी पाठ खाजव” असा प्रकार सर्रास सुरू होतो. त्यामुळे लेख/कवितेचा दर्जा हा मुद्दा गौण ठरतो. त्यामुळे साधारण रचनेवरही भरपूर प्रतिसाद पडतात आणि एखादी उत्कृष्ट रचना दुर्लक्षित राहते. प्रतिसादाच्या संख्येवरून रचनेचे मूल्यमापन करता येत नाही, त्यामुळे प्रतिसादाची विश्वासहार्यता आपसूक कमी होते.
              अर्थात हे मुद्दे सरसकट सर्वांनाच लागू होते असे मला म्हणायचे नाही, आणि हे मुद्दे सरसकट सर्वांनाच लागू पडतही नाहीत, पण मोठ्या प्रमाणावर हे घडत असते एवढे मात्र खरे.
   ४) कविता कशी असावी किंवा कविता कशी नसावी याबद्दल जर एखाद्या कवीला मार्गदर्शनपर सल्ला द्यायचा असेल तर पहिल्यांदा त्या कवीची विचारशैली समजून घ्यायला हवी. त्याचा दृष्टिकोन समजून घ्यायला हवा पण तसे न होता स्वतःच्या फूटपट्टीने अवलोकन करून नको तो सल्ला दिला जातो, त्यामुळे त्या कवीला काही प्रेरणा मिळण्याऐवजी त्या कवीचे खच्चीकरण व्हायचीच जास्त शक्यता असते.
त्यामुळे आंतरजालावर वावरताना काही मूलभूत बाबींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
   १) आजवरच्या सर्व व्यासपीठापेक्षा आंतरजालीय व्यासपीठ हे पूर्णतः भिन्न आहे. कारण येथे जात, पात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत, देश, श्रीमंत, गरीब अशा सर्व सीमा ओलांडून एकाचवेळी एकाच व्यासपीठावर वेगवेगळी मंडळी जमू शकतात. त्यामुळे मतभिन्नता असणे किंवा एकच विचार अनेकांनी वेगवेगळ्या शब्दात व्यक्त करणे यात नवल काहीच नाही. आणि येथे लेखकापेक्षा वाचकाचीच जास्त कसोटी लागू शकते, त्यासाठी जालावर वाचक म्हणून वावरताना हे भान ठेवणे गरजेचे आहे.
   २) समविचारी व्यक्ती एकत्र येऊन ग्रुप तयार होणे यात वावगे काहीच नाही, पण त्यात संकुचितपणा नसल्यास कंपूबाजीचे स्वरूप येणार नाही.
   ३) आपले विचार मांडावेत पण दुस‍र्‍यावर लादण्याचा अट्टहास नसावा.
   ४) न पटणार्‍या विचारांना देखिल “असा सुद्धा एक विचार असू शकतो” असे समजून सन्मान द्यावा.
                 हळूहळू आंतरजालिय लेखनाचा/वाचनाचा जसजसा अनुभव वाढत जाईन तसतशी प्रगल्भता आपोआप वाढीस लागेल आणि भविष्यकाळात आंतरजालीय व्यासपीठ हेच सर्वोच्च व्यासपीठ म्हणून नावारूपास येईल, अशी मला खात्री वाटते.
                                                                                                   गंगाधर मुटे
………………………………………………………………………………………………………

आज स्व. सुरेश भट यांचा जन्मदिवस.

१५ एप्रिल, मराठी साहित्यसम्राट स्व. सुरेश भट यांचा जन्मदिवस.
अजरामर साहित्यनिर्मीतीकार कविवर्य सुरेश भट यांना आदरांजली आणि सादर वंदन.
………………………………………………

हरफनमौला सुरेश

गाण्याचा गळा व गाण्यात रुची या गोष्टी सुरेशमध्ये आहेत; हे आमच्या आईच्या (ती. कै. शांताबाई भट) ध्यानात आले. म्हणून सुरेशच्या गाण्यातील रुची वाढावी, काही माहिती व्हावी यासाठी तिने एक बाजाची पेटी (विश्वास कंपनी, कोलकाता) आणली आणि त्याला संगीताची मुळाक्षरे व बाराखडी शिकविणे सुरू केले. आमची आई ही स्वत: चांगली पेटी वाजवायची व तिला संगीताची जाण होती. पुढे काही वर्षांनंतर सुरेशला पद्धतशीर गाणे शिकविण्यासाठी प्रल्हादबुआ नावाचे संगीत शिक्षक आमच्या घरी येत असत. त्याची गाण्याची आवड व प्रगती पाहून आमच्या वडिलांनी (ती. कै. डॉ. श्री. रं. भट) एच. एम. व्ही.चा एक ग्रामोफोन (चावीवाला) आणला होता.

ते सुरेशसाठी दर आठवडय़ातून एक रेकॉर्ड विकत आणत. आमच्या वडिलांना चांगले संगीत ऐकण्याचा नाद होता. त्यामुळे सुरेशला संगीतात आवड निर्माण झाली. पुढे तो एका बॅण्डपथकामध्ये काही दिवस होता आणि तेथेच तो बासरी वाजविणे शिकला. तो आजारी पडायचा तेव्हा अंथरुणावर असताना तो तासन्-तास बासरी वाजवित असे.

पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठी पारिभाषिक संज्ञा आणि संज्ञावली कोश

-चेतना प्रधान, विभागीय सहाय्यक संचालक, भाषा संचालनालय

इ. स. १९६०मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर इ. स. १९६४मध्ये महाराष्ट्र शासनाने मराठीला राजभाषेचा कायदेशीर दर्जा प्राप्त करून दिला. इंग्रजी राजवटीत मराठी भाषेला राजाश्रय नव्हता. ज्ञानार्जनाचे प्रमुख साधन म्हणजे भाषा. केवळ विकासासाठी नव्हे तर अस्तित्वासाठी सुद्धा भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा यावा लागतो. यासाठी शास्त्रीय व तांत्रिक शिक्षणाचे माध्यम मराठी असणे आवश्यक होते. ज्ञानभाषा म्हणजे ज्ञानार्जनाची, ज्ञानसंवर्धनाची व ज्ञान देण्याची भाषा. यामध्ये पहिली अडचण अशी होती की, शास्त्रीय व तांत्रिक विद्या शाखांसाठी आवश्यक असलेला पारिभाषिक शब्दसंग्रह उपलब्ध नव्हता. सर्व विद्यापीठांतून समान व एकरूप परिभाषा वापरली जावी यासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक होते.
Continue reading

मराठीभाषा : शुद्धी आणि समृद्धी

मराठीभाषा : शुद्धी आणि समृद्धी

८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.द.भि.कुळकर्णी यांनी त्यांच्या भाषणामध्ये भाषा शुद्धी आणि समृद्धतेच्या अनुषंगाने काही मौलीक विचार व्यक्त केले आहेत. त्यावर अधिक चर्चा होऊन भाषालेखनासंबधात काही निटनेटके,सुस्पष्ट आराखडे तयार होणे गरजेचे आहे.

मी साहित्यीक नाही,पण अधून-मधून गद्य-पद्य लिखान करण्याची उर्मी काही पिच्छा सोडत नाही त्यामुळे फ़ुटकळ स्वरूपात का होईना लिखान चालूच असते त्यामुळे मी साहित्यीक नसलो तरी साहित्यापासून अलिप्तही नाही.
भाषेची शुद्धता आणि समृद्धी या दोन्ही अंगाचा विचार करतांना दोन्ही बाबी लवचिक असल्या तरच दोन्हीचा समन्वय साधून भाषाविकास साधला जाऊ शकेल.

शुद्धतेचा ध्यास हवा पण भाषेच्या समृद्धीसाठी नवनविन शब्दांचा स्विकार करण्यासाठी दरवाजे सताड उघडे असले पाहीजेत. परभाषेतील काही शब्द मायभाषेत वापरतांना निसंकोच वापरले गेले पाहीजेत कारण त्या शब्दांना मराठीत पर्यायी शब्द असेलच याची शाश्वतीच नसते. जसे की एन्डोसल्फ़ान, सायपरमेथ्रीन, पॅरासिटामॉल वगैरे. तर काही शब्दांना मराठीत पर्यायी शब्द तयार केले जाऊ शकते जसे की सॉफ़्टवेअर,हार्डडिस्क, ब्लॉग वगैरे. पण ह्या संशोधनाचा उगम ज्या भाषेत झाला असेल, सहाजीकपणे त्याच भाषेतील शब्द प्रथम सर्वश्रुत होतात.ब्लॉग या शब्दाने जेवढा लवकर बोध होईल तेवढा बोध अनुदिनी या शब्दाने होणार नाही हे उघड आहे. तरी पण हे मराठीशब्द शक्य तेवढे वापरायलाच हवे. मात्र तसा अट्टाहास धरणे फ़ारसे लाभदायक ठरणार नाहीत.

याउलट मराठी भाषेच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या मराठी बोली बोलल्या जातात. त्या स्थानिक बोलीभाषा असल्यातरी समृद्ध आहेत.प्रत्येक बोलीभाषेचे स्वत:चे शब्दभांडार आहेत. स्वत:ची ढब,ठेवन आहे. या बोलीभाषेमध्ये असे अनेक शब्द आहेत की त्याला पर्यायी शब्द प्रमाणभाषेमध्ये आज उपलब्ध नाहीत.उदाहरणार्थ,

विदर्भात मुख्यत्वे वर्‍हाडी आणि झाडी भाषा बोलली जाते हे सर्वश्रुत असले तरी नागपुर,वर्धा आणि आसपासच्या क्षेत्रात जी भाषा बोलली जाते ती ना झाडीबोली आहे ना वर्‍हाडबोली आहे,तर ती स्वतंत्र बोलीभाषा आहे. ज्याला मी नागपुरी बोली म्हणतो. ही नागपुरीबोली सुद्धा परिपुर्ण,समृद्ध बोली आहे. या बोलीत बोलतांना एखादा शब्द नसल्याने मी कुठे अडखळलो अथवा जे म्हणायचे होते तसे सक्षमपणे बोलताच आले नाही, असे कधी घडल्याचे मला स्मरत नाही. पण या बोलीमधील चांगले- चांगले शब्द सुद्धा प्रमाणभाषेत आलेले नाहीत.

उदा :- टोंगळा,घोटा,वज,हिडगा,गंज,गुंडी,कोपर,भेद्रं,चारं,टेंबरं,धान,आंबिल,सुतना,मनिला,खकाणा,भोकणा,
लमचा,इच्चक,चेंगड,सांडशी,बुहारा,पिलांटू,बंबाड,लल्लाऱ्या,माहुरा,बोथर,टालगी,जित्रुब,पहार,बाज,
जुप्न,सुदा,नावकुल,नावनाव,बंदा,सप्पा,सिद्दा,अध्धर,दाल्ला,ऐनक,बेकुब,मेकुड,आव,कवटा,खाती,
कंदोरी,शायवान,तुत्या,इरित,वार्त,वार्ती हे सर्व अर्थबोधक शब्द असूनही यापैकी बहूतांश शब्दांना प्रमाणभाषेत अजिबात पर्यायी शब्द नाहीत.

टोमॅटोला भेद्र हा पर्यायी शब्द प्रमाणभाषा का स्विकारीत नाही हे गौडबंगालच आहे.
असे नविन शब्द प्रमाणभाषेत रूजविने फ़ारसे कठीन काम नाही. लिखान करतांना ते वापरले पाहीजेत आणि सर्वांना कळावे यासाठी तळटीप देऊन अर्थ दिले पाहीजेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी मराठीभाषा शुद्धी आणि समृद्धतेची अपेक्षा व्यक्त केली तर त्यासाठी सर्वांनी काही ना काही प्रयत्न करून अमलात आणले पाहीजेत आणि त्या पदाची बुज राखली पाहीजे. तोच त्या पदाचा यथोचित सन्मान ठरेल असे मला वाटते.

गंगाधर मुटे

भाषेच्या गमतीजमती-भाग-२

भाषेच्या गमतीजमती-भाग-२

आमच्याकडे बोलतांना-लिहितांना “मला जाग आला” असे म्हणतात.
मी पण तसेच म्हणतोय.
पहिल्यांदा मी सुरेश भटांचे “पहाटे पहाटे मला जाग आली” हे गीत ऐकले तेव्हा भटांचे भाषाविषयक ज्ञान कमजोर आहे असाच माझा समज झाला होता.
पण जेव्हा ”जाग” हा स्त्रीलिंगी शब्द आहे हे कळले तेव्हा माझीच बंडी उलार झाली.
आमच्या नागपुरी गावरान भाषेत जाग या शब्दाला “चेव” हा पर्यायी शब्द आहे आणि तोच वापरात आहे.
त्यामुळे “मला चेव आला” हे गांवढळ वाटले तरी शुद्ध वाक्य आहे.
तसेच “तो जागा आहे काय?” या ऐवजी “तो चेता आहे का?” असे म्हणतात.
पण जसजसा अशिक्षित समाज शिक्षितांच्या सानिध्यात यायला लागला तसतसे त्यांनी नवनवे शब्द ऐकून जाणिवपुर्वक आत्मसात केलेत. शब्द शिकता आलेत पण व्याकरण बोंबलले. कारण त्यांनी
“मला चेव आला” हे वाक्य फक्त शब्दबदल करून “मला जाग आला” असे उच्चारले.
आणि शुद्ध बोलण्याच्या नादात मुळात शुद्ध असलेलं वाक्य अशुद्ध करून टाकलं.
.
करू जाता काय, उलटे झाले पाय. आहे ना गंमत?
मी पण तसेच म्हणतोय. काय करणार? माझ्या सभोवताल सगळेच “जाग आला” असे म्हणत असतांना मी एकट्यानेच “जाग आली”
असे म्हणायचे ठरवले तर ते मलाच “वाटोळे” बोलल्यासारखे वाटते.

.
गंगाधर मुटे

माय मराठीचे श्लोक…!!

माय मराठीचे श्लोक…!!

नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष “हर हर महादेव” झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

“अभय” एक निश्चय मनासी करावा
ध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा
सदा शब्द वाणीत ये सर्वकाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

                             – गंगाधर मुटे “अभय”
…………………………………………………………..
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशीत. दि. १०.११.२०१०)
…………………………………………………………..


श्रीमद्‍ भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहामध्ये ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ आणि समुह यांनी माय मराठीच्या श्लोकाचे गायन केले.
ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
—————————-
गायक – विनायक वानखेडे
गीत- गंगाधर मुटे
तबलावादक – प्रविण खापरे
हार्मोनियम – सुरेश सायवाने