पायाखालची वीट दे….!

पायाखालची वीट दे….!

 

पंढ़रीच्या पांडुरंगा
तुझ्या चरणी ठाव दे
तीर्थप्रसाद काही नको
शेतमालास भाव दे

दुर्दशेने फस्त केल्या
रानाकडे ध्यान दे
शहरावाणी खेडे होईल
असे थोडे ज्ञान दे

हृदयामध्ये राम आणि
मुखामध्ये नाम दे
सूट-माफी-सवलत नको
घामासाठी दाम दे

पाऊस पाणी येऊ दे
शेत माझे न्हाऊ दे
चोच फुटल्या अंकुरांना
दोन घास खाऊ दे

संपत्तीच्या वृद्धीसाठी
लालसेचा रोग दे
शेतीमधल्या कष्टालाही
वेतनवाला आयोग दे

देवा मला चारदोन
सवंगडी धीट दे
हरामींना कुटण्यासाठी
पायाखालची वीट दे

वास्तवाच्या शोधासाठी
डोकं थंडगार दे
लढवैयांच्या लेखणीला
‘अभय’ आणि ‘धार’ दे

– गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

चला कॅरावके शिकुया…!

चला कॅरावके शिकुया…!

                         आज ज्या विषयाला मी हात घालतोय, त्याला काय म्हणावे, माझे मलाच कळत नाही. संगीत विषयाचा फ़ारसा अभ्यास नाही, गायनायोग्य आवाज नाही आणि तरीही संगीताच्या एका पैलूचे मुखदर्शन इतरांना करून देण्याचा एक प्रयत्न करतोय. प्रारंभीच एक मुद्दा स्पष्ट करू इच्छितो की, ज्यांना माझ्याएवढी किंवा माझ्यापेक्षा संगीताची अधिक जाण आहे त्यांनी या लेखाच्या अजिबात वाटेला जाऊ नये. मात्र ज्यांनी कॅरावके हा शब्ददेखील अजून ऐकलेला नाही त्यांनी मात्र अवश्य हा लेख वाचावा आणि उदाहरणादाखल जे गीत दिले आहे तेही जरूर ऐकावे.
                         गेली दोन वर्ष आंतरजालावर वावरतांना ठळकपणे माझ्या एक बाब लक्षात आली की, अनेकांकडे सुंदर आणि सुमधूर आवाज आहे. त्यांनी जर कॅरावके तंत्र अवगत केले तर त्यांना संगीताचा अमर्याद आनंद लुटता येऊ शकेल. स्वत:च्या आवाजात अत्युत्तम संगीतसाजासह गाणी रेकॉर्डींग करता येऊ शकेल. स्वत:च स्वत:ची गाणी ऐकून किंवा इतरांना ऐकवून स्वर्णिम आनंदाचे क्षण मिळवता येऊ शकेल.
                          पूर्वीच्या काळी प्रथम गीत लिहिले जायचे. गीतकाराने लिहिलेल्या गीताला त्यानुरूप संगीतकार चाल लावायचेत. लावलेल्या चालीशी सुसंगत वाद्याची निवड करून संगीत दिले जायचे. पण काळानुरूप त्यात बरेच बदल होत गेले आणि बरीच उलटापालट झाली. सर्वप्रथम संगीतकाराच्या डोक्यात घोळत असलेली चाल संगीतबद्ध करून त्या संगीतात आणि चालीत फ़िट बसेल असे गीत गीतकाराने लिहायचे, अशी एक नवी पद्धत विकसीत झाली. कॅरावके प्रकारही काहीसा याच प्रकारात मोडणारा आहे.
                         लोकप्रिय गाण्यांच्या चालींना संगीतबद्ध करून ते प्रथम रेकॉर्डींग केले जाते. त्यानंतर गायकाने संगीतातील रिकाम्या जागा हेरून, त्याला साजेशा स्वरूपात आपला आवाज मिसळून त्यानुरूप गायचे, यालाच कॅरावके तंत्रज्ञान म्हणतात.
                         आजकाल बाजारात बर्‍याचशा गाण्यांच्या कॅरावके सिडी उपलब्ध आहेत. तुमच्या आवडत्या चालीतील कॅरावके संगीत शोधा, थोडेसे परिश्रम घेऊन संगीतामध्ये आपला आवाज मिसळून गाणी म्हणून बघा. आपणही हा प्रयोग अवश्य करून बघाच. आणि संगीताचा आनंद लुटा….!
उदाहरणादाखल मी १९८० च्या सुमारास लिहिलेले
“मना रे” आणि “हे जाणकुमाते” ही दोन भक्तीगीते सिनेसंगीताच्या चालीत साग्र संगीतात गाण्याचा प्रयत्न केलाय.

* * *

हे जाणकुमाते

हे जाणकुमाते, हे जाणकुमाते
तुझ्या दर्शनास मी आलो मा, पुजा घेऊनी
या पामरास दान द्यावे, दर्शन देऊनी ॥धृ०॥

मनमोगर्‍याचे फ़ूल मी हारास आणिले
गुंफ़ूनी भाव भोळा मी चरणी वाहिले ॥१॥

मुर्ती तू साजरीशी, डोळ्यात साठली
स्वप्नात मुर्त आज मी तुझीच पाहिली ॥२॥

येते सदासदा मुखी, तुझेच गूण ते
अरविंदही मनोमनी, तुलाच गाईते ॥३॥

                             – गंगाधर मुटे “अरविंद”
——————————————
ऐकण्यासाठी क्लिक करा
——————————————

मना रे मना रे….!

मना रे मना रे, नको आडराना
जाऊ सोडोनी सतमार्गा ॥धृ०॥

घर तुझे नाशिवंत असे हे रे
आशा मनिषा काम क्रोध सोयरे हे
देह हा जाईल, आत्मा हा राहिल
असे तुझा कोठे वास रे ॥१॥

तुझे हाती जीवनाची नाव ह्या रे
तोलुनिया संयमाने हाकार रे
भरतीही येईल, ओहोटीही जाईल
आला भोग संयमाने भोग रे ॥२॥

वासनेच्या आहारी तू जाऊ नको
पाप भरले जहर तू पिऊ नको
संग असा घेई जो, मोक्षपदा नेई जो
“अरविंदा” चढवी तू साज रे ॥३॥

                              – गंगाधर मुटे “अरविंद”
——————————————
ऐकण्यासाठी क्लिक करा
——————————————
       पूर्वप्रकाशित लेख

दीपज्योती ई-दीपावली अंक २०११
————————————-

माझी मराठी माऊली : ओवी

माझी मराठी माऊली : ओवी

.
.

माझी मराठी माऊली, जसा ओंकाराचा वाण
शब्दशब्द मोहविते, हरपते देहभान             …॥१॥

माझी मराठी माऊली, शब्दामध्ये सरस्वती
ओव्या, श्लोक वाचुनिया, सारे जन सुज्ञ होती   …॥२॥

माझी मराठी माऊली, जसा गंगेचा प्रवाह
ओघवते उच्चारण, मन बोले वाह! वाह!!      …॥३॥

माझी मराठी माऊली, कोकिळेची कुहूकुहू
जशी पहाटेची साद, येते कानी मऊमऊ        …॥४॥

माझी मराठी माऊली, इंद्रधनुष्याचे रंग
आणि सुवासाने होई, चंपा, जाईजुई दंग      …॥५॥

माझी अभय मराठी, रेशमाची नरमाई
दिसे माऊली शोभून, सार्‍या जगताची आई    …॥६॥

                               गंगाघर मुटे “अभय”

……………………………………………………………..
सर्वांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
…………………………………………………………….

चिडवितो गोपिकांना-गौळण

चिडवितो गोपिकांना-गौळण

चिडवितो गोपिकांना, वरी मस्करी,
उडवितो दूधदही, करी तस्करी,
यशोदे असा गं कसा? तुझा श्रीहरी,
हा हरी, श्रीहरी ……….. ॥धृ०॥

मेळवुनी लष्कर सेना, चोरी चोरी येतो,
लोणियाच्या सार्‍या हंड्या, चोरुनिया नेतो,
भरवितो गोप सारी, सखा सावरी ….. ॥१॥

मारीयेला चेंडू हाता, यमुनेशी जाता,
लपवितो साडी चोळी, गोपिकांची न्हाता,
कान्हाईची खोड न्यारी, राधा बावरी ….. ॥२॥

मुरलीचा सूर सारा, नादब्रह्म बोले,
हरे कृष्ण, हरे कृष्ण, तन मन डोले,
अरविंद साथसंग, नाचे मुरारी ……. ॥३॥

गंगाधर मुटे
…………………………………………..

जा रे कान्हा नटखट : गौळण (नाट्यगीत)


जा रे कान्हा नटखट : गौळण (नाट्यगीत)


राधा : जा रे कान्हा नटखट, तू सोड माझे मनगट
         मोडेन तुझी खोड कान्हा सारी रे
         मला समजू नको भोळीभाळी रे ……॥१॥ 


कृष्ण : तू मस्त मदनाची नार, गोमटी झुंजार
           बोलीचालीत अंगार सखे, भरला गं
           तुझ्या पदराला हात राधे धरला गं …॥२॥


राधा : अधरी धरुनी पावा, का रे धून छेडीते?
          सुरांच्या लहरीने, धुंदी मज जडते
         नंदाच्या नंदलाला, रंगीला रंगलाला
         मुरलीचा मोह नच पाडी रे 
         मला समजू नको भोळीभाळी रे ……॥३॥


कृष्ण : गार गार वारं वाहे, बहरिले अंग
          वेणुच्या नादाने का न होशी दंग?
          वेडीच्या वेडलगे, जिवीच्या जिवलगे
          शुन्यात ब्रह्म कसा भरला गं?
          तुझ्या पदराला हात राधे धरला गं …॥४॥


राधा : निळे-निळे आकाश, निळा माझा शालू रे
         हिरवे हिरवे शिवार, हिरवी किनार रे
         खोडीच्या खोडकरा, प्रितीच्या प्रियकरा
         प्रितीची चाल नगं चाली रे
         मला समजू नको भोळीभाळी रे ……॥५॥ 


कृष्ण : ना निळे अंबर, ना हिरवी किनार गं
          वितभर दुनियेचा, मोह पसारा गं
          तन-मन मज देई, रज-तम दूर नेई
          प्रितीने भोग सारा सरला गं
       तुझ्या पदराला हात राधे धरला गं …॥६॥


राधा : तन-मन कृष्णा तुला, समर्पित केले रे
         रज-तम मुरलीधरा, आज वर्ज्य केले रे
         येरे येरे कान्हाई, प्रितीचा पंथ दावी
         प्रणयाचा खेळ आज खेळी रे
         मला समजू नको भोळीभाळी रे ……॥७॥ 


कृष्ण : अशा रितीप्रितीने, शरण कुणी येईन
          प्रितीचा खेळ खेळून, पंथ तया दाविन
          अरविंद गीत गात, नाद घुमे गोकुळात
          प्रितीने जीव सारा तरला गं
          तुझ्या पदराला हात राधे धरला गं …॥१॥


                                          गंगाधर मुटे
…………………………………………….
(१९८० चे सुमारास लिहिलेली गौळण)

वेणी सोडुनिया : गौळण

वेणी सोडुनिया : गौळण

          गुपचिप आला हा उघडोनी ताला
          झोपेमधी होते याने रंग टाकीला
          गौळण सांगे राधा, गौळणीला …. ॥धृ०॥
.
नाही गडे याचा, जराही भरोसा
नख मारूनिया दिला, पदराला खोसा
बेगी बेगी येतो, चिमटेची घेतो
वाकड्या, सुदामा, पेंद्या संगतीला ….. ॥१॥
.
          करुनिया चाल, डिवचितो गाल
          वेणी सोडुनिया आत, भरतो गुलाल
          असा चक्रपाणी, कोणा ना जुमानी
          चिंबाचिंब भिजवितो पैठणीला ….. ॥२॥
.
कुणी गडे याला, जरा समजावा
बोलताती सासू दीर, मार किती खावा
वळणाचा घाट, हा अडवितो वाट
अरविंद पाहे सखे, ब्रह्मलीला ….. ॥३॥
.
                                    गंगाधर मुटे
……………………………………………
१९८० च्या सुमारास मी लिहिलेली एक गौळण. ’’गौळण” एक लोभसवाणा काव्यप्रकार. गोकुळात श्रीकृष्णाने गोपिकांसमवेत ज्या कृष्णलीला केल्यात त्याचे रसभरित गेयरूपी वर्णन म्हणजे ’’गौळण”. पवित्र आणि वासनारहित प्रेमाचे प्रतीक म्हणजे “गौळण”. पण या काव्यप्रकाराची फारशी दखल साहित्यक्षेत्राने घेतलेली नसावी.
जाणकारांनी या काव्यप्रकाराविषयी अधिक प्रकाश टाकला तर आवडेल.
……………………………………………

श्रीगणेशा..!!

.
.
श्रीगणेशा..!!
.

नमन करतो श्री गणेशा, वक्रतुंडा रे परेशा
लेखना प्रारंभ करतो, तरल शब्दा दे परेशा

शक्य करसी तू अशक्या, गम्यता देसी अगम्या
लक्ष अपराधास माझ्या, तूच पोटी घे परेशा

तू गजानन निर्विकल्पा, फेड माझ्या तू विकल्पा
वेल कवितेची चढू दे, वृक्ष तू व्हावे परेशा

तूच माझा सोयरा रे, पाठराखा तू सखा रे
तूच माझा भाव भोळा, मधुरसे गाणे परेशा

अभय कविता देखणी तू, वृत्त्त तू, स्वरशब्द तू रे
अंत्ययमका संग दे ते यमक तू माझे परेशा

.                                                     गंगाधर मुटे
………… **………….. **………….**…….
(वृत्त – मात्रावृत्त)

श्री गणराया

श्री गणराया

कृपावंत व्हावे श्री गणराया
भूलचूक माझी हृदयी धराया ॥धृ॥

चिंतामणी तू चिन्मय देवा
अनुतापी मी, तू करुणा ठेवा
द्वारी उभा मी नाम स्मराया ॥१॥

भयमोचक तव मंगलदृष्टी
अनुदिन लाभो तारक वृष्टी
हा भवबंध पार कराया ॥२॥

अनुष्ठान हे तव पूजनाशी
क्षणभंगुर मी, तू अविनाशी
साह्य होई मज अभय तराया ॥३॥

                                गंगाधर मुटे
………… **………….. **………….**…….

शुभहस्ते पुजा : अभंग

.
.
शुभहस्ते पुजा : अभंग

प्रथम पुजेला । लालदीवा मस्त ॥
सत्ताधारी हस्त । कशाला रे ॥१॥

त्यांचे शुभ हस्त । कसे सांगा देवा ॥
हरामाचा मेवा । चाखती ते ॥२॥

लबाड लंपट । तयांची जमात ॥
माखलेले हात । रक्ताने गा ॥३॥

पाय तुझे कैसे । नाही विटाळले ॥
मन किटाळले । कैसे नाही ॥४॥

म्हणा काही देवा । आहे साटेलोटे ॥
अभयास वाटे । शंका तशी ॥५॥

                          गंगाधर मुटे
………… **………….. **…………

पंढरीचा राया : अभंग

.

पंढरीचा राया : अभंग

पंढरीच्या राया । प्रभू दीननाथा ॥
टेकितो मी माथा । तुझे पायी ॥१॥

युगे किती उभा । एका विटेवरी ॥
येवुनी बाहेरी । पाहा जरा ॥२॥

बदलले जग । आणि माणसेही ॥
तशा देवताही । बदलल्या ॥३॥

कनकाच्या भिंती । सोन्याचे कळस ॥
सोन्याची हौस । देवालाही ॥४॥

त्यांचे भक्त बघा । विमानाने जाई ॥
आम्हा का रे पायी । बोलावतो ॥५॥

देव गरिबाचा । तू राहिला गरीब ॥
भक्तही गरीब । ठेविले तू ॥६॥

आम्हां का रे असा । गरिबीचा शाप ॥
असे काय पाप । आम्ही केले? ॥७॥

अभयाने देवा । करा नियोजन ॥
जेणे भक्तजन । सुखी होती ॥८॥

                     गंगाधर मुटे
………… **………….. **………….