“रानमोगरा – माझी वाङ्मयशेती” दूरदर्शनवर (Vdo क्लिप)

ABP Majha

“रानमोगरा – माझी वाङ्मयशेती” दूरदर्शनवर

एबीपी माझा TV – ब्लॉग माझा पुरस्कार सोहळा 

                       एबीपी माझा TV व्दारा नोव्हेंबर २०१२ मध्ये ब्लॉग माझा-४ या जागतीक ब्लॉग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये जगाच्या कानाकोपर्‍यातून मराठी ब्लॉगर्सनी उत्स्फ़ुर्तपणे भाग घेतला होता. या स्पर्धेत माझ्या “रानमोगरा” या ब्लॉगला पुरस्कार मिळाला. 

               माझ्या “रानमोगरा” (https://gangadharmute.wordpress.com/) या ब्लॉगला सलगपणे दुसर्‍यांदा हे पारितोषिक मिळाले आहे. या स्पर्धेचे निकाल जाहीर झाल्यानंतर २७ जानेवारी २०१३ रोजी एबीपी माझाच्या मुंबई येथील स्टुडियोमध्ये बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला.
ब्लॉग माझा-४ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याच्या समारंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे एबीपी माझा TV वर दिनांक ०३ फ़ेब्रुवारी २०१३ रोजी दुपारी १२:३० वाजता प्रक्षेपण करण्यात आले. 

दिनांक – रविवार, ३ फेब्रुवारी २०१३

वेळ – दुपारी १२.३० वा.

चॅनेल – एबीपी माझा




 “रानमोगरा” विषयी प्रसारीत झालेली ३.१९ मिनिटांची VDO क्लिप 
——————————————————————————————————————

ABP Majha
परिक्षकासोबत विजेत्यांचा ग्रूप फ़ोटो
*
————————————————————————————————————

एबीपी माझा, विनोद कांबळी आणि माझी भटकंती

Blog Majha
एबीपी माझा, विनोद कांबळी आणि माझी भटकंती

                एबीपी माझा या मराठी सॅटेलाइट दूरदर्शन वाहिनीने आयोजित केलेल्या ‘ब्लॉग माझा २०१२’ ह्या स्पर्धेतील विजेत्यांना परिक्षकांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण आणि सोबतच एबीपी माझाच्या टेलीकास्टींगसाठीच्या एपीसोड शूटींगचा कार्यक्रम मुंबई येथील बोस्टन हाऊस, सुरेन रोड, लँडमार्क बिल्डींगजवळ, दर्पण टॉकीज चौक, अंधेरी पूर्व येथे तारीख २७ जानेवारी २०१३, रविवारला सकाळी ११ ते दुपारी ४.३० च्या दरम्यान पार पडला. सदर कार्यक्रमाचे लवकरच  एबीपी माझा या मराठी सॅटेलाइट दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारण केले जाईल.
                मराठी ब्लॉगर्सना व्यासपीठ मिळवून देणारी ‘ब्लॉग माझा’ ही मराठीतली एकमेव अभिनव स्पर्धा आहे. न्यू मीडियामुळे आपल्या मराठी भाषेसमोर संधी आणि आव्हानं उभी होत आहेत. या आव्हानांचं रूपांतर संधीत करण्याचा आणि या ब्लॉगसारख्या माध्यमातील मराठीला, मराठी लेखनाला व मराठी सृजनशीलतेला दाद देण्याचा उपक्रम म्हणजे ‘ब्लॉग माझा’! यंदाही या उपक्रमाला मराठी ब्लॉगर्सनी मोठा प्रतिसाद दिला. या स्पर्धेचे परिक्षक असणारे दै.’महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक श्री. अशोक पानवलकर, मराठी अभ्यास केंद्राचे संचालक श्री. दीपक पवार आणि युवा नाटककार व लेखिका इरावती कर्णिक यांच्या समोर विजेते ब्लॉग्ज निवडण्याचं आव्हान होतं. ते आव्हान निभवतांना परिक्षकांनी काय निकष  ठेवलेत, निवड प्रक्रिया कशी किचकट होती याविषयी
Blog Majha


परिक्षक पॅनेल मधले एक परिक्षक श्री दिपक पवार ह्यांच्याशी दिलखुलास चर्चा झाली. एकंदरीत मजा आली.

              १५ विजेत्यांपैकी १२ विजेते स्वतः कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्याशी संवाद साधता आला. “ब्लॉग माझा-३” या २०१० मधील स्पर्धेत विजेते ठरल्यापैकी श्री नरेंद्र गोळे, श्री एकनाथ मराठे आणि मी स्वत: या वेळी सलग दुसर्‍यांदा विजेते ठरलो असल्यामुळे त्यांच्याशी माझा जुना परीचय आणि मैत्री असल्यामुळे त्यांच्याशी संवाद तर झालाच पण यावेळेस नव्यानेच आलेल्यांशीही संवाद साधता आला. आंतरजालावरील प्रसिद्ध व्यक्तिमत्व सोकाजीराव त्रिलोकेकर म्हणजे ब्रिजेश मराठे होय, हे सुद्धा कळून आले. सुलक्षणा लक्ष्मण प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत. श्रेया महाजन यांचेकडून आणखी बरेचकाही शिकण्यासारखे आहे, याची जाणिव झाली. रोहन जगताप, तन्मय कानिटकर, प्रशांत रोटवदकर आणि इतर विजेत्यांशी संवाद साधण्याची इच्छा वेळेअभावी अपूर्णच राहिली.

                          एबीपी माझाचे असो-सिनिअर प्रोड्युसर-  अँकर, नावाप्रमाणेच सदोदित प्रसन्न भासणारे प्रसन्न 

जोशी, यांनी सर्वांचा परिचय करून घेतल्यानंतर ‘ब्लॉग माझा २०१२’ ह्या स्पर्धेतील विजेत्यांना परिक्षकांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि आपापल्या ब्लॉगची माहिती सांगण्याची प्रत्येकी २ मिनीटांची ‘बाइट’, अश्या तर्‍हेने कार्यक्रमाचे शूटींग व रेकोर्डिंग करायचे असल्याची माहिती दिली. कुणी कुठे-कसे उभे राहायचे, कुठून चालायला सुरूवात करायची, प्रमाणपत्र स्विकारल्यानंतर कशी “पोझ” घ्यायची, अशा तर्‍हेच्या जुजबी सुचना देऊन शूटींग व रेकोर्डिंगला सुरूवात झाली.   
Vinod Kambli
विनोद कांबळी

            दरम्यानचे काळात प्रसिद्ध माजीक्रिकेटपटू विनोद कांबळी स्टुडियोत पोचले. त्यांचेशी प्रत्यक्ष भेट  होणे याचा आनंद  काही वेगळाच होता. विनोद कांबळी म्हणजे माझा सर्वाधिक आवडता खेळाडू. अगदी सचीन तेंडूलकर पेक्षाही माझा जीव कांबळीमध्येच जास्त गुंतायचा. सचीनची महानता मला निर्विवाद मान्य असूनही मी कांबळीवरच जास्त प्रेम का केले, याचे उत्तर मला तेव्हाही माहीत नव्हते आणि आजही मला बिनतोड स्पष्टीकरण देता येत नाही. मात्र एकेकाळी कांबळी माझा “जीव की प्राण” होता, हे नाकारण्यातही अर्थ नाही. त्याला टीममधून वगळल्यावर मला किती वेदना व्हायच्या, हे शब्दात सांगणे कठीण आहे. सचीन नावाच्या विक्रमांच्या बादशाहने एक-एक शिखर पादाक्रांत करत एकदिवसीय क्रिकेटमधील स्वप्नवत दोनशे धावांचा पल्ला गाठला तेव्हा सलाम नाबाद २००! – तुंबडीगीत हे तुंबडीगीत मी उत्स्फ़ूर्तपणे लिहिले; तसे एखादे गीत कांबळीवर अजूनपर्यंत तरी माझ्या हातून लिहिले गेले नाही. मात्र यानिमित्ताने कांबळीसोबत जवळून भेटण्याचा जो योग आला तो क्षण माझ्या कायमच स्मरणात राहील.

                  कर्मधर्मसंयोगाने नेमके त्याच दिवशी प्रमोद देव साहेंबाच्या मुलीचे लग्न होते. शूटींगचा कार्यक्रम आटोपल्यावर त्यांच्या मुलीच्या लग्नातही जाता आले. अक्षता टाकण्याचा मुहूर्त उलटून गेला असला तरी भोजनाचा कार्यक्रम ऐन बहारात होता. मलाही त्यानिमित्ताने अक्षता न टाकताच भोजनाचा अर्थात “पंचावन्नपक्वानाचा” यथेच्छ समाचार घेता आला.

              योगायोग बघा, १४ जानेवारी २०१३ला मी “शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)” ही हजल लिहिली त्यातील एक शेर असा आहे.

भोजनाचा लुटा स्वाद पंक्तीमध्ये
अक्षता टाकण्याला असा वा नसा

आणि ……………. १३ दिवसातच आयुष्यात पहिल्यांदाच अगदी तशीच वेळ माझ्यावर आली. 🙂






Goa
प्रसन्न जोशी सोबत लेखक
                     मुंबईपासून माझ्या गावाचे अंतर जवळपास ८०० किलोमीटर. एवढे अंतर चालून कार्यक्रमाला जायचे किंवा नाही असा प्रश्न माझ्यासमोर उद्भवलाच नाही. कार्यक्रमाला जायचेच हा विचार आधीच पक्का झाला होता. त्यामुळे प्रसन्न जोशींची १२ जानेवारी २०१३ रोजी मेल येताच आणि प्रशस्तीपत्रक वितरण कार्यक्रम १० फेब्रुवारी २०१३, रविवारला आयोजित केला आहे हे कळताच रेल्वे आरक्षण वगैरे उरकून घेतले. पण एक घोळ झाला. पुन्हा प्रसन्न जोशींची मेल आली आणि कार्यक्रमाच्या तारखेत बदल होऊन १० फेब्रुवारी २०१३ ऐवजी २७ जानेवारी २०१३ ला होणार असल्याचे कळल्याने थोडी तारांबळ उडाली. आता ऐनवेळेवर रेल्वे आरक्षण मिळेल काय, वेटींग मिळाले तर कन्फ़र्म होईल काय, सारे प्रश्नच प्रश्न. शेवटी निर्णय झाला की थेट चारचाकी वाहनानेच जायचे. भटकंती करत जायचे. कोकणात खूप खोलवर घुसायचे, तेथील जीवनशैली न्याहाळत गोवा-रत्नागिरी मार्गे मुंबईला पोचायचे. पण पुरेसा वेळ नसल्याने इष्टमित्र-मंडळींशी आणि आंतरजालीय मित्रांशी फ़ारसा संपर्कच करता आला नाही. त्यामुळे भटकंतीचा उद्देश फ़सला नसला तरी फ़ारसा सफ़लही झाला नाही.
*   *   *   *

Pandharpur
चंद्रभागेच्या तिरी – पांडुरंग हरी

 *   *   *   *

Goa
देशी-विदेशी पर्यटकांचा आवडता कोलंगुट बीच, गोवा

*   *   *   *

Goa
मंगेश मंदीर, गोवा
*   *   *   *
Goa
कोलंगुट समुद्रकिनारा, गोवा
*   *   *   *
Goa
जुने गिरिजाघर, गोवा
*   *   *   *
Goa
दोना पौला, गोवा
*   *   *   *
Goa
किनारपट्टीवरील सुर्यास्त, गोवा
*   *   *   *
काजू
कोकणचा काजू (रत्नागिरी)*   *   *   *

‘ब्लॉग माझा-२०१२’ स्पर्धा – विजेता रानमोगरा

‘ब्लॉग माझा-२०१२’ स्पर्धेचा निकाल जाहीर


  ‘एबीपी माझा’ या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनी तर्फे जगभरातल्या मराठी भाषिक ब्लॉग लेखकांसाठी नुकतीच “ब्लॉग माझा” ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेत कुवैत ते कल्याण, इटली ते इंदापूर आणि न्यूयॉर्क ते नागपूर अशा विश्वाच्या कानाकोपर्‍यातून मराठी ब्लॉगर्सनी भाग घेतला होता. नुकतेच ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचे निकाल जाहीर करण्यांत आलेले आहेत.


          मराठी ब्लॉगर्सना व्यासपीठ मिळवून देणारी ‘ब्लॉग माझा’ ही मराठीतली एकमेव अभिनव स्पर्धा आहे. न्यू मीडियामुळे आपल्या मराठी भाषेसमोर संधी आणि आव्हानं उभी होत आहेत. या आव्हानांचं रूपांतर संधीत करण्याचा आणि या ब्लॉगसारख्या माध्यमातील मराठीला, मराठी लेखनाला व मराठी सृजनशीलतेला दाद देण्याचा उपक्रम म्हणजे ‘ब्लॉग माझा’! यंदाही या उपक्रमाला मराठी ब्लॉगर्सकडून मोठा प्रतिसाद मिळाला.

        मराठी ब्लॉगच्या माध्यमातून मराठी भाषेचे वैश्विक पातळीवर संवर्धन आणि प्रसारण करण्यार्‍या ब्लॉगमधून उत्कृष्ठ आणि दर्जेदार ब्लॉग निवडीसाठी परीक्षक म्हणून असणारे दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक श्री. अशोक पानवलकर, मराठी अभ्यास केंद्राचे संचालक श्री. दीपक पवार आणि युवा नाटककार व लेखिका इरावती कर्णिक यांच्या समोर मराठी ब्लॉग्ज विश्वामधून फक्त पंधरा ब्लॉग्ज निवडण्याचं आव्हान होतं.
     या विजेत्यांच्या यादीमध्ये “रानमोगरा – माझी वांङ्मयशेती” (https://gangadharmute.wordpress.com) या ब्लॉगचाही समावेश आहे.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मराठी ब्लॉगर्सचे आणि विजेत्या ब्लॉगर्सचे मनापासून अभिनंदन! 

प्रथम पसंतीचे पाच ब्लॉगर्स आणि त्यांचे ब्लॉग
1. सुलक्षणा लक्ष्मण-  http://mrugtrushna.blogspot.in  
2. सागर पाटील-  http://bhurata.blogspot.com
3. नरेंद्र गोळे-  http://nvgole.blogspot.in/
4. विद्या कुलकर्णी- http://asvvad.blogspot.in/
5. युवराज गुर्जर-  http://ygurjar.blogspot.in/

उत्तेजनार्थ निवडलेले दहा ब्लॉगर्स आणि त्यांचे ब्लॉग

1. अवधूत- http://ekregh.blogspot.in/
2. गंगाधर मुटे- https://gangadharmute.wordpress.com
3. प्रशांत रोटवदकर- http://athirstymanmad.blogspot.in/ 
4. तन्मय कानिटकर-  http://tanmaykanitkar.blogspot.in/
5. रोहन जगताप- http://anudini.in
6. प्रसाद इनामदार- http://prajkta-prajkta.blogspot.in
7. ब्रिजेश मराठे-  http://brijeshmarathe.wordpress.com/
8. एकनाथ मराठे- http://ejmarathe.blogspot.com
9. श्रेया महाजन- http://shreya4mahajan.blogspot.com/
10. विजय लाले- http://barmahi.blogspot.in/

(प्रथम पसंतीचे पाच ब्लॉग्ज आणि उत्तेजनार्थ दहा ब्लॉग्ज हे दोनच गट आहेत. या गटातील क्रमवारी म्हणजे गुणानुक्रम नाही.)

                       विजेते ब्लॉगर्स यांच्या कौतुक सोहळ्याच्या कार्यक्रमाचे एपिसोड रेकॉर्डिंग मुंबई येथील ‘एबीपी माझा’ टीव्हीच्या स्टुडियो मध्ये होणार असून या कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम ‘एबीपी माझा’ टीव्हीच्या खास एपिसोडमध्ये प्रसारीत केला जाणार आहे.
—————————————————————————————————————————————–
नुकताच श्री.प्रसन्न जोशी, ए.बी.पी.माझा ह्यांनी ई-मेलद्वारे वरील निकाल कळविलेला आहे.
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!


श्री.प्रसन्न जोशी आणि ए.बी.पी.माझा वाहिनी ह्यांचे हार्दिक आभार!

या विजेत्यांच्या यादीमध्ये “रानमोगरा – माझी वांङ्मयशेती” (https://gangadharmute.wordpress.com) या ब्लॉगचाही समावेश आहे.
मराठी ब्लॉगर्स आणि ब्लॉग लेखनास प्रोत्साहन देण्याचे काम ते गेल्या चार वर्षांपासून करत आहेत ही अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब आहे!
सर्व परीक्षक मंडळी आणि ए.बी.पी.माझा टीव्हीच्या चमुचा मी आभारी आहे.

                                                                                                                – गंगाधर मुटे
——————————————————————————————————————————————–

मी मराठी – स्पर्धा विजेती कविता

कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू?

किती ज्येष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, किती सभ्य आहेत ही माणसे
परी माणसासारखी वागताहे, असे चित्र नाही दिसे फारसे

कधी भाट होई सख्या चेहर्‍यांची, कधी घोटती लाळ द्रव्यापुढे
खरे रूप दावी असे धैर्य नाही, किती भ्रष्ट झालेत हे आरसे?

“घराणे” उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही?
सग्यासोयर्‍यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे

जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे?

कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे
परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कसे…!

                                                                               गंगाधर मुटे
—————————————————————————-
कविता/गझल                                                    वृत्त – सुमंदारमाला
लगावली – लगागा लगागा लगागा लगागा, लगागा लगागा लगागा लगा
—————————————————————————-

                   १ एप्रिल २०११ ते १५ मे २०११ या कालावधीत मी मराठी.नेट (http://www.mimarathi.net) ने कविता स्पर्धा २०११ ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये तब्बल १५७ स्पर्धकांनी प्रवेशिका भाग घेतला होता.
                  या स्पर्धेचा आज दि. १० सप्टेंबर २०११ रोजी निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेत माझी वरील कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू? ही  कविता प्रथम क्रमांक विजेता ठरली आहे.
             दुरवर ग्रामीण भागात अडगळीत पडलेल्या माझ्यासारख्या  एका शेतकरी माणसाची कविता पुरस्कृत करून माझ्यामध्ये या स्पर्धेने एक नवा आत्मविश्वास जागविला आहे.
             त्याबद्दल  माझ्या कवितेला व्यासपीठ उपलब्ध करून देणार्‍या या आंतरजालीय विश्वाच्या निर्मात्याला, संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मराठीचे मालक या नात्याने राज जैन यांना,  ज्येष्ठ पत्रकार-लेखक-गझलकार असलेले परीक्षक श्री प्रदीप निफाडकर यांना,  तसेच
            माझ्या कवितेला फुलविण्यात मोलाचा हातभार लावणार्‍या तमाम आंतरजालावरील प्रतिसादकांना
मी मन:पूर्वक अभिवादन करतो. 🙂
                                                                                                                         – गंगाधर मुटे

———————————————————————————————————————–

श्री शरद जोशी यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार

श्री शरद जोशी यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार
                    मुंबईतील ‘चतुरंग प्रतिष्ठान’ संस्थेच्या या वर्षीच्या सामाजिक क्षेत्रासाठी असलेल्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी, निवड समितीने शेतकरी संघटनेचे नेते श्री. शरद जोशी यांची निवडक केली आहे. भारतासारख्या शेतीप्रधान देशात, सर्वदूर पसरलेल्या शेतकर्‍यांची मोठी संघटना बांधण्याचा आणि त्यांच्या शेतीविषयक बहुविध प्रश्नांची तड लावण्यासाठी कृतिशील चळवळ उभारण्याचा जो ध्यास श्री. शरद जोशी यांनी आयुष्यभर धरला, त्यासाठी अथक प्रयत्न केले, त्या त्यांच्या जीवनध्येयाचा आणि त्यासाठी त्यांनी केलेल्या अथक परिश्रमी कार्याचा आम समाजातर्फे सामाजिक जाणीवेतून कृतज्ञतापूर्वक गौरव व्हावा, या भावनेने चतुरंग प्रतिष्ठानच्या यंदाच्या सामाजिक ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी श्री. शरद जोशींची निवड करीत असल्याचे निवड समितीने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

                   शेतीमालाला वाजवी भाव मिळावा, शेतकर्‍यांच्या न्याय्य मागण्या मान्य व्हाव्यात, त्यांच्या प्रश्नांचा साल्याने विचार साहित्य प्रस्तृत करून समाजमनात शेतकरी बांधवाविषयी जागृती निर्माण व्हावी, तसेच ग्रामीण महिलांही संघटित होऊन कार्यरत व्हाव्यात अशा बीजस्वरुपी समाजकार्याचा विचार या निवडीमागे असल्याचे समितीने म्हटले आहे.

                        डॉ. अरुण टीकेकर अध्यक्षतेखालील डॉ. द.ना.धनागरे, डॉ. तात्याराव लहाणे, डॉ. विनय सहस्रबुद्धे, श्री. अविनाश धर्माधिकारी, श्री. सुधीर जोगळेकर आणि सौ. प्रफ़ुल्ला डहाणूकर या मंडळींनी यंदाच्या २१ व्या जीवनगौरव पुरस्काराच्या निवड समितीचे कामकाज पाहिले.

                         मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लक्ष रुपये असे पुरकार स्वरूप असलेला हा जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी सामाजिक क्षेत्रासाठी श्रीमती इंदिराबाई तथा मावशी हळंबे (१९९२), डॉ. इंदुमती गोवर्धन पारिख (१९९५), श्रीमान पांडुरंगशास्त्री आठवले (१९९९) आणि श्रीमान नानाजी देशमुख (२००३) आणि सौ. साधनाताई आमटे (२००७) या मान्यवरांना देण्यात आला आहे.

                       हा पुरस्कार स्वीकारण्यास श्री. शरद जोशी यांनीही सानंद संमती दिली असून डिसेंबर २०११ मध्ये मुंबईत होणार्‍या चतुरंग रंगसंमेलनात श्री. शरद जोशी यांना तो प्रदान करण्यात येईल.

——————————————————————————————————

स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-रेकॉर्डिंग Vdo





स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-रेकॉर्डिंग Vdo

स्टार माझा TV द्वारा नोव्हेंबर-डिसेंबर २०१० मध्ये ब्लॉग माझा-३ या ब्लॉग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये जगाच्या कानाकोपर्‍यातून मराठी ब्लॉगर्सनी उत्स्फ़ुर्तपणे भाग घेतला होता. या स्पर्धेचे निकाल जाहिर झाल्यानंतर २७ डिसेंबर २०१० रोजी स्टार माझाच्या मुंबई येथील स्टुडियोमध्ये बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला.
ब्लॉग माझा-३ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याचा समरंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे स्टार माझा TV वर दिनांक २७-०३-२०११ रोजी सकाळी ९ ते १० आणि दुपारी २ ते ३ वाजता प्रक्षेपण करण्यात आले.
या कार्यक्रमाचा रेकॉर्डेड वृतांत सादर करताना खरोखरच खूप आनंद होत आहे. सदर कार्यक्रमाचे अपलोड करण्याच्या सोयीने ५ भागात विभाजन करण्यात आले आहे.
TV वरील कार्यक्रम रेकॉर्ड करून त्याच्या व्हिडियो क्लिप्स बनवून अपलोड करणे ही माझ्यासाठी नविन बाब होती. तरीही मी माझ्यापरीने शक्य तेवढा प्रयत्न केला आहे. व्हिडीओ आणि ऑडियो यामध्ये दर २५-३० सेकंदात टाईम डिफरन्स येत होता. एडिट करून आणि भरपूर मेहनत घेऊनही ध्वनी आणि चित्र यात शतप्रतिशत अ‍ॅक्यूरसी राखणे शक्य झाले नाही, त्याबद्दल दर्शक या बाबीकडे दुर्लक्ष करून मला माफ़ करतील अशी अपेक्षा बाळगतो.

———————————————————————–

———————————————————————–
अन्य व्हिडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

———————————————————————–

………………………………………………………………………………….

ब्लॉग माझा-३ चे आज स्टार माझा TV वर प्रक्षेपण.

ब्लॉग माझा-३ चे आज स्टार माझा TV वर प्रक्षेपण.

        स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे ऑन एअर प्रक्षेपण करण्याची सज्जता झाली असून आज रविवारी (२७ मार्च) सकाळी ९ ते १० या वेळेत स्टार माझावर हा कार्यक्रम आपल्याला पाहता येईल.

चॅनेल : स्टार माझा TV मराठी
दिनांक : २७-०३-२०११
वेळ : सकाळी ९ वाजता

……………………………………………………..
त्या निमित्ताने दि. २६-०३-२०११ ला प्रसारीत करण्यात आलेली स्टार माझावर झलक.



मीमराठी बक्षिस समारंभ


मेहता पब्लिकेशन हाऊस आणि मी मराठी.नेट (
http://www.mimarathi.net 
यांच्या संयुक्त विद्यमाने “लेखन स्पर्धा २०१०” ही आंतरजालीय स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.
अधिक माहिती या दुव्यावर मिळेल. http://www.mimarathi.net/node/5216
या स्पर्धेत “वांगे अमर रहे…!”
या ललित लेखाला पारितोषक मिळाले आहे.
………………………………………………
हा लेख खालील दुव्यावर वाचता येईल.

……………………………………………..

या स्पर्धेमधे २०७ प्रवेशिका पात्र ठरल्या होत्या.
स्पर्धेसाठी 
श्री. शंकर सारडा
श्री. प्रविण टोकेकर
श्री. रामदास
यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
……………..

१९ मार्च रोजी लेखन स्पर्धा २०१०-२०११ बक्षिसं समारंभ ठाणे येथे संपन्न झाला,

दिवस : १९ मार्च, २०११.
वेळ : ४.०० ते ७.०० संध्याकाळी.
पत्ता :
लक्ष्मी केशव मंगल कार्यालय, प्रताप सिनेमा समोर, कोलबाड रोड, खोपट, ठाणे (प).

…………………

लेखन स्पर्धा बक्षिस समारंभाची काही – क्षणचित्रे

(सर्व छायाचित्र श्री रोहन चौधरी आणि मी मराठी डॉट नेट च्या सौजन्याने.)



****


******

कॅम्पस परिवार स्नेहसमारंभ

कॅम्पस परिवार सत्कार समारंभ – आर्वी (छोटी)

दिनांक – २० जानेवारी २०११
———————————————–
Campus
Arvi
Arvi chhoti
Gangadhar Mute
farm House
Farm
Arvi
Campus
—————————————————————————————————-

सत्कार समारंभ

सत्कार समारंभ
                        माझ्या ब्लॉगला स्टार माझा पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी व्यक्तिगत पातळीवर फ़ारच मोठी उपलब्धी आणि तेवढीच डोकेदुखी ठरेल असे दिसते. पुरस्कारामुळे आपले कर्तृत्व इतरांच्या नजरेत भरून ते व्यापकप्रमाणावर अधोरेखीत होत असते. अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची मुसळधार बरसात ही होत असतेच. पण माझ्या बाबतीत हा पुरस्कार मला जरा जास्तच भरभरून देत आहे. गरजेपेक्षा जास्त म्हणा की छप्परफ़ाडून देणे म्हणा असंच काहीसं माझ्या बाबतीत होत आहे. शिवाय पुरस्कार मला काही एकट्याला मिळालेला नाही. मी छत्तीसपैकी एक आहे. पण कदाचित कौतुकाचा वर्षाव माझ्यावर जास्तच होत असावा,असे दिसते. आणि त्याची काही कारणेही आहेत.
                             सर्वप्रथम मी मायबोलीकर असल्याने मायबोलीवर आणि मी मराठीकर असल्याने मी मराठीवर अभिनंदनाचा वर्षाव झाला.
पुरस्काराच्या यादीत ३-४ वैदर्भीय नावे आहेत पण मी विदर्भातील एकमेव रहिवासी वैदर्भीय असल्याने स्थानीय सर्व मराठी, हिंदी, इंग्रजी  वृत्तपत्रात ही बातमी अगदी फ़ोटोसहीत झळकली.
इथपर्यंत ठीक होतं पण एकदम सत्कार समारंभ?
                       होय हे खरे आहे. दिनांक १४ डिसेंबरला वर्धा येथील नामदेव सभागृहात शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांचे हस्ते, शेतकरी संघटनेचे प्रांतीय अध्यक्ष श्री रवीभाऊ देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड.वामनराव चटप, माजी आमदार सरोजताई काशीकर यांचे प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला.

……………….


शेतकरी संघटना

गंगाधर मुटे यांना शाल,श्रीफ़ळ व मानपत्र देवून गौरवतांना मा. शरद जोशी


……………….

                   आपल्याच हाताने आपलाच डमरू वाजवत, आपलेच गुणगाण गात ही बातमी तुमच्याशी शेअर करायचा विचार नव्हता. पण  या “सत्कार समारंभाच्या” बातम्याही वृत्तपत्रात झळकायला लागल्या (लोकमत) आणि मित्रमंडळीकडून फ़ोनवर/ईमेलच्या माध्यमातून विचारणा व्हायला लागली आणि प्रत्येकाला स्वतंत्रपणे सांगणे जड जायला लागले, शिवाय मनातील काही भावना सुद्धा व्यक्त करण्याशिवाय राहावले नाही म्हणून उशिराने का होईना पण ही आगळीक.
मुळात भारतातील शेतकरी मुकाच आहे. तो बोलत नाही, वाचत नाही आणि लिहितही नाही. त्याच अर्थाने शेतकर्‍यांची  संघटनाही निरक्षर असते. त्यांच्या कार्याची दखल “बेदखल” असते. लाखो शेतकरी एकत्र येऊन मेळावा घेतला किंवा शांततामय मार्गाने धरणे दिले तरी प्रसार माध्यमात ती न्यूज बनत नाही, किंवा बनली तरी एखाद्या कोपर्‍यात आगपेटीच्या आकारात तिला स्थान मिळत असते. याउलट राजकीय व्यक्ती शिंकली किंवा एखाद्या सेलेब्रिटीच्या पोटात गर्भ वाढत असेल तर भारतीय प्रसार माध्यमांसाठी ती ब्रेकिंग न्यूज ठरत असते, वृत्तपत्रातील रकानेच्या रकाने खर्ची पडायला लागतात.
त्या पार्श्वभूमीवर स्टार माझाला दखल घेण्याइतपत मी आंतरजालावर शेतकरी विषयक लेखन केलं, हे सर्वांना फ़ारच सुखावून गेलं असावं. नागपुरच्या भेटीत चटप साहेबांनी माझ्या सत्काराचा विषय काढला तेव्हा मी त्यांना म्हटले की, असं काही करू नये, शक्यतोवर टाळावे. तर ते म्हणाले “आमच्या मुलाचं कौतुक आम्ही नाही तर कुणी करावे.” वर्ध्याच्या मिटींगमध्ये सरोजताई म्हणाल्या. आम्ही सत्कार नाही तर “कौतुक सोहळा” करू. सत्कार काय किंवा कौतुक काय, शब्दामधले फ़रक. त्यामागची भावना आणि प्रेरणा मात्र एकच. सत्कार किंवा कौतुक करू नये असे नाही, पण या निमित्ताने माझ्या समोर काही प्रश्न निर्माण झाले आहेत. पहिला प्रश्न असा की सत्कार कुणी कुणाचा करायचा. आज माझ्या कवितांचे बर्‍यापैकी कौतुक होत आहे. माझ्या लेखनीला पुरस्कार मिळत आहे, मी प्रगल्भ आणि दर्जेदार लेखन करतो हे जवळपास सर्वमान्य होत आहे.
                   मग हे जर खरे असेल तर, एवढे चांगले लिहिण्याची शक्ती माझ्याकडे आली कुठून? मी वयाच्या विसाव्या वर्षी शेतकरी संघटनेत आलोय. मला माहित आहे की, मी शेतकरी संघटनेत येण्यापुर्वी एक दगड होतो. मी जे काही शिकलो ते शेतकरी संघटनेकडून शिकलो. मी जर आज प्रभावी आणि दर्जेदार काव्य लिहू शकत असेल तर ती बुद्धी मला फ़क्त आणि फ़क्त शेतकरी संघटनेने दिली आहे. शरद जोशींचे ,शेतकरी संघटनेच्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे विचार दर्जेदार होते म्हणून माझ्या लेखनीतले विचार दर्जेदार असावे, हे निर्विवाद सत्य आहे.
                 मग सत्कार कुणी कुणाचा करायचा? मी शेतकरी संघटनेचे आभार मानायचे की शेतकरी संघटनेने माझा सत्कार करायचा?
               दुसरा प्रश्न. आम्ही चळवळीतली माणसं, आंदोलन आमचा पिंड. आजही मला मी कवी आहे याचा जेवढा अभिमान वाटत नाही त्यापेक्षा मी शेतकरी संघटनेचा सच्चा पाईक आणि एक आंदोलक आहे, याचा जास्त अभिमान वाटतो. आणि आंदोलकांनी जे काही करायचे ते स्वत:साठी नव्हे तर चळवळीसाठी करायचे असते. जगायचे तर चळवळीसाठी, मरायचे तर चळवळीसाठी हाच आंदोलकांचा धर्म असला पाहिजे. त्यामुळे चळवळीतल्या कार्यकर्‍यांनी शक्यतो सत्कारापासून वगैरे चार हात लांबच असले पाहिजे हे माझे मत.
                         तिसरा प्रश्न. या तिसर्‍याप्रश्नामागे इतिहास आहे. शेतकरी संघटनेचा इतिहास असे सांगतो की, मुळातच दगड असलेल्यांना शेतकरी संघटनेने शेंदूर लावून मोठे बनविले. दगदाचा देव बनवला. पण मुळातच दगड असलेले दगड मोठेपण प्राप्त झाल्यावर स्वत:ला शेतकरी संघटना आणि शरद जोशींपेक्षाही मोठे तत्वज्ञानी,राजकारणी समजायला लागले, आणि ज्या संघटनेने त्यांना मोठे बनविले त्या संघटनेशी दगाबाजी करून उठून पळालेत. १९८० ते २०१० या काळातील संघटनेला सोडून गेलेल्यांची  यादी बनविली तर ही बाब निर्विवादपणे सिद्ध झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे यापुढे तरी संघटनेने सावधगिरीने पावले टाकली पाहिजेत असे मला वाटते.
मला सध्या एक प्रश्न विचारला जातो की मी असा अचानक कवितेकडे कसा काय वळलो, त्यामागची प्रेरणा काय? वगैरे. याबाबत मी माझ्या ‘रानमेवा’ या काव्यसंग्रहातील लिहिलेल्या भुमिकेत सविस्तर उहापोह केला आहे.
शेतकरी संघटनेच्या एवढ्या वर्षाच्या प्रवासात एक मुद्दा नेहमीच चर्चीला गेला की, शेतकरी चळवळीला पुरक असं साहित्य का तयार होत नाही. शेतकरी समाजाचं वास्तववादी साहित्य तयार व्हायलाच पाहिजे. हाच प्रश्न बराच काळ सतावत होता आणि आजही सतावतो आहे कारण आपण म्हणतो की वास्तववादी साहित्य तयार व्हायला पाहिजे, पण आम्ही मात्र लिहिणार नाही,मग ते कुणी लिहायचं? तर इतरांनी लिहायचं. मला कायम प्रश्न पडतोय तो असा की आम्हाला जे दिसतंय, आम्ही जे भोगलंय, आमची अनुभूती, आमचा विचार पण तो आम्ही नाही लिहिणार, तो इतरांनी लिहावा. हे कसे शक्य आहे? हे शक्य नाही. शेतकरी चळवळीचा विचार पुढे नेणारी साहित्यनिर्मीती शेतकरी चळवळीमध्ये काम केलेला आंदोलक जेवढ्या प्रभावीपणे करू शकेल तेवढा प्रभावीपणे चळवळीबाहेरचा साहित्यिक करू शकणार नाही मग तो कितीही मोठ्ठा प्रभावशाली साहित्यिक असू देत.
आपली अनुभूती आपणच साकारायलाच हवी. बस्स. ह्या एकाच प्रेरणेपोटी मी हाती लेखनी धरली. आणि कविता  लिहायला लागलो.
                 यानिमित्ताने आपण माझे कौतुक केले, ही माझ्यासाठी मोठी गौरवाची गोष्ट आहे आणि म्हणुन मी तुमचा खूप खूप आभारी आहे.
गंगाधर मुटे
*   *    *
सभेत बोलताना स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप म्हणाले की, एकमेकाच्या सुखदु:खात वाटेकरी व्हावे हा माणसाचा स्वभाव आहे आणि शेतकरी संघटनेचं आपलं हे संयुक्त कुटूंब आहे. आपल्या संयुक्त कुटूंबातल्या एका भावाने एका वेगळ्या क्षेत्रात, संघटनेचं कार्य करता करता, त्याच्या मनातल्या असणार्‍या भावना, मनातल्या कल्पना, त्याच्या मनातल्या भुमिका, शेतकरी संघटनेचं काम हे गद्यातलं असलं तरी पद्यामध्ये मांडून समाजाचं प्रबोधन करायचा प्रयत्न केला आहे, म्हणून, संघटना ही आपली आई आहे, आणि आईचं काम आहे की लेकराचं कौतुक करावं. म्हणून साहेब स्वत: आज गंगाधरच्या या सत्कार समारंभाला हजर आहेत. ज्याची दखल स्टार टीव्हीच्या चॅनेलने घेतली, समाजाने घेतली आणि त्याचं त्या तर्‍हेचं कौतुक होणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्या कुटूंबातल्या माणसाला अवार्ड, पुरस्कार मिळतो तेव्हा आपल्या कुटूंबाचा घटक म्हणून त्याचं कौतुक करणं, त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणं आवश्यक असते. म्हणून आपण हा कौतुक सोहळा साजरा करीत आहोत.
*    *    *
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रवीभाऊ देवांग म्हणाले की, गंगाधर मुटेंच्या एका कवितेत गावातला एक शाम्या नावाचा मुलगा बिपाशासाठी मुंबईला लुगडं घेऊन जातो आणि त्या शाम्यात गावरानपणा ठासून भरला आहे. श्याम्यानं तर कहरच केला. इच्चीबैन. आता इच्चीबैन या शब्दात असं काय आहे की ते प्रत्येकाला हसायला लावतं? तर गंगाधर मुटेंच्या शब्दातली ही जादू आहे. या कवितेची ओरिजिनीलीटी काय तर अस्सल गावरानपणा. गंगाधर मुटेंच्या कवितामधून  त्यांची अनुभूती अभिव्यक्त झाली आहे. त्यांच्या कवितेचा आवाका मोठा आहे. त्यांनी गझल लिहिली, त्यांनी लावणीपण लिहिली. एक लावणी तर इतकी सुंदर आहे की ती शेतकर्‍याची मुलगी म्हणते की “मला पावसात भिजू द्या.” तिला आता पावसात खेळायचे आहे. तिच्या मैत्रीनी म्हणतात की तिला मनसोक्त नाचू द्या. तिला स्वातंत्र्याचा आनंद घेऊ द्या. तिच्या आनंद घेण्याच्या कक्षा तिला रुंदावू द्या. अडथळे आणू नका. असे ती लावणी सांगते. गंगाधर मुटेंच्या कवितेमध्ये ती सगळी विविधता भरली आहे. त्यांनी असं म्हटलंय की माझ्या आयुष्यात भाकरीचा शोध घेता घेता अर्ध आयुष्य निघून गेले आणि तारुण्यपणात पाहिलेले स्वप्न भाकरीच्या शोधातच उध्वस्त झाले. सुरुवातीला “बरं झाले देवाबाप्पा शरद जोशी भेटले” असे लिहिणार्‍या कवीची मध्यंतरीच्या काळात जणूकाही कविताच करपून गेली होती. मध्ये बराच मोठा अंतराळ गेला, पुन्हा त्यांची कविता बहरून आली आणि ते संघटनेचे जिल्हाध्यक्षही झाले. त्यांच्या कवितेचं स्टारमाझाने कौतुक केलं आणि त्या निमित्ताने आपण आपल्या परिवारातल्या कार्यकर्‍याचं कौतुक करीत आहो. मा. शरद जोशींनी ज्या दिवशी गंगाधर मुटेंच्या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहिली, मला असं वाटतं की यापेक्षा मोठं कौतुक या कवीचं दुसरं कोणतंच असू शकत नाही. आपण पुन्हा एकदा या कवीचं टाळ्या वाजवून जोरदार कौतुक करुया.
*    *    *



शेतकरी संघटना

शेतकरी सत्कार समारंभ सभेस संबोधीत करतांना मा. शरद जोशी



                    समारोपीय भाषणात मा. शरद जोशी म्हणाले की, शेतकरी संघटनेच्या सगळ्या इतिहासामध्ये कार्यकर्त्यांना काही पुरस्कार मिळाले आणि त्याकरिता त्यांच्या कौतुकाची काही बैठक झाली, समारंभ झाले असे कधी झाले नाही. कौतुक करावे असे प्रसंग घडले नाहीत असे नाही, पण आपण कुणाचं फ़ारसं कौतुक केलं नाही.अशी परंपरा नसताना एका अगदी वेगळ्या तर्‍हेच्या कामगिरीकरिता किंवा कौतुकाकरिता हा सत्कार समारंभ आहे. ज्या क्षेत्रामध्ये मुट्यांना पुरस्कार मिळाला आहे, ते क्षेत्र माझं आहे, हे लक्षात घ्यावे. मी हिंदुस्थानात येऊन शेतकरी संघटनेच्या कामाला लागण्याआधी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये गणकयंत्र विभागाचा प्रमुख होतो.
                 मी शक्यतो कोणत्याही कवितेच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहीत नाही. गंगाधर मुट्यांच्या कवितेच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली, त्याचा त्यांना आनंद वाटत असेल तर तो त्यांनी व्दिगुणित करून घ्यावा. कारण मी पूर्वी कधी प्रस्तावना लिहिलेली नाही. 
                गंगाधर मुट्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं आहे आणि त्याकरिता प्रस्तावना लिहिल्यानंतर आणि मी तेथे हजर राहणार आहे म्हटल्यावरती लोकांच्या मनात साहजिकच थोडं कुतूहल नेहमीपेक्षा जास्त वाटलं. आणि गंगाधर मुटे वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. तेव्हा जिल्हाध्यक्षाच पुस्तक आणि ते पुस्तक कॉम्प्युटरवर, नेटवर्कवर केलं आहे, म्हणजे नेमकं काय, याची फारशी कल्पना कार्यकर्त्यांना असण्याची शक्यता नाही. माझी या प्रसंगात थोडीशी अडचण होते ती अशी की मी मुळामध्ये काव्यबुद्धीचा नाही. काव्यप्रतिभा ही माझ्याकडे शून्य आहे. पुण्याला राष्ट्रसेवादलाच्या एका बैठकीमध्ये ना.ग.गोरे यांना त्यांच्या बैठकीमध्ये कुणीतरी एक प्रश्न विचारला की शेतकरी संघटनेचं आंदोलन फार मोठं होतं, लाखाच्या संख्येने लोक येतात, लाखाच्या संख्येनं तुरुंगात जातात, शिक्षा भोगतात, त्यांच्या संबंध आंदोलनामध्ये, मघाशी गंगाधर मुट्यांनी म्हटल्याप्रमाणे, साहित्यनिर्मिती फारशी नाही. आणि साहित्याकरिता केवळ गद्यलिखान, लेख आणि पुस्तके लिहून भागत नाही. ना.ग.गोर्‍यांनी असं म्हटलं की याचं कारण असं आहे की शरद जोशी हा मनुष्यच मुळात गद्य स्वभावाचा आहे. त्याला काव्यशक्ती नसल्यामुळे त्याची मांडणी सगळी गद्य स्वरूपाची आहे. आणि शेतकरी किंवा कोणतेही आंदोलन चालवायचं म्हणजे इतकं तर्कशुद्ध, तर्ककर्कश असून भागत नाही. त्याच्यामध्ये कुठेतरी थोडा पागलपणा यावा लागतो. आणि पागलपणा आल्याशिवाय लोकं आहुती चाखायला तयार होत नाही.
                 मी प्रामाणिकपणे सांगतो की, कुणाची सेवा करायची,कुणाची करुणा करायची या भावनेने मी कामाला लागलो नाही. अगदी व्यावहारिक तर्कशुद्ध हिशेब करून मी या कामाला लागलो. मी संयुक्त राष्ट्रसंघात राहिलो असतो तर भारताची राजकीय प्रतिष्ठा लक्षात घेता मी जास्तीत जास्त संयुक्त राष्ट्रसंघाचा महासचिव, सेक्रेटरी जनरल त्याच्या खालोखाल डेप्युटी सेक्रेटरी जनरल या पदापर्यंत पोचलो असतो. पण मी जेव्हा मनाशी हिशेब केला की हिंदुस्थानातल्या दारिद्र्यनिर्मुलनाचे काम इतकं महत्त्वाचं आहे की त्या कामामध्ये कितीही कष्ट,पराजय,अपमान सोसावे लागले तरी सुद्धा संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपमहासचीव होण्यापेक्षा या कामामध्ये मला जास्त आनंद वाटेल इतक्या तर्कशुद्ध बुद्धीने, गणिताने मी या कामात पडलेलो आहे. माझ्यामध्ये काव्यशक्तीनाही हा मुद्दा मी वारंवार मांडलेला आहे.
                      मी जेव्हा हिंदुस्थानात आलो तेव्हा गणकयंत्र इथे माहीत नव्हतं. राजीव गांधींनी ते नंतर आणलं. आणि त्यावेळी माझ्याकडे पहिल्यांदा आयको-२ मॉडेल आलं, त्याचा उपयोग करून मी शेतीमालाचा उत्पादनखर्च कसा काढावा, याचं एक सॉफ्टवेअर तयार केलं. त्या सॉफ्टवेअरमध्ये मी तुम्ही दररोज जे काही कामे करता त्यापैकी कोणकोणते खर्च हिशेबात धरायचे, कोणकोणते खर्च हिशेबात धरायचे नाहीत, याचं एक मॉडेल त्याच्यामध्ये मांडलं होतं. पण जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा आणि त्यानंतर आपली चूक झाली आणि अजूनही शेतकरी संघटनेचं संकेतस्थळ अजूनही पूर्णं झालेलं नाही. सुरुवात झाली पण त्याला नियमितपणे अपडेटींग करणे शेतकरी संघटनेला फारसं जमलेलं नाही. याउलट शेतकरी संघटनेच्या बरोबर झालेल्या चळवळी उदा. NGO ज्यामध्ये मेघा पाटकर, वंदना शिवा किंवा सुमन नारायण, यांच्या चळवळींना जनाधार जवळजवळ शून्य असताना, केवळ त्यांनी गणकयंत्राच्या हिशेबाने आपण फार मोठी संघटना आहे, हे दाखवलं. केवळ महसूलखात्याकडून किती शेतकर्‍यांनी आत्महत्यां केली, त्यांची नांवे, परिस्थिती यांची आकडेवारी घेऊन संकेतस्थळं तयार केली आणि मोठीमोठी पारितोषकं मिळवून गेली. आम्ही याबाबतीत फार कमी पडलो. अलीकडे या बाबतीत चांगल्यापैकी जागृती व्हायला लागली आहे. म्हात्रे सरांनी पहिल्यांदा जुना शेतकरी संघटक सुद्धा ई-मेलने पाठवायला सुरुवात केली आहे. आणि अलीकडे या ब्लॉगमध्ये मी निदान दोन नावं घेतो. सुधाकर जाधव आणि अमर हबीब हे दोघेही या प्रकारचं काम करताहेत. आज ना उद्या त्यांच्या कामालाही चांगला प्रतिसाद मिळेल, अशी मी आशा करतो. गंगाधर मुट्यांप्रमाणे ही मंडळीही या क्षेत्रात पुढे जातील आणि शेतकरी संघटनेची ही लुळी, कमजोर पडलेली बाजू थोडी आणखी मजबूत होईल अशी मी आशा करायला हरकत नाही.



* * * * * * * * * *
………………………………………………………………………………
कार्यक्रमाचा वृतांत पाहण्यासाठी आणि मा. शरद जोशी व मान्यवरांचे भाषण ऐकण्यासाठी क्लिक करा.

……

……

……


……

…..

…………………………………………………………………………………..