.. मावळलेल्या वर्षास ...
उचल खाल्ली हैवानांनी,
सुजन झाले टाईट,
२००१ साला तुला टाटा,
बाय-बाय, गुड नाईट …..!
जाणार्याबद्दल बोलावं वाईट,
नाही आमच्याकडे प्रथा,
पण विसरता विसरत नाहीरे,
तुझ्या कारकीर्दीच्या व्यथा ….!
सव्वीस दिवसाचा बाळ तू ,
नसतील सुकले दुधाचे ओंठ,
हादरून टाकलास गुजरात,
फाटले धरणीचे पोट …!
हत्त्या,ठार,हल्ला,बॉम्बस्फोट,
झाले तुझ्या परवलीचे शब्द,
अमानुषतेणे केला कहर,
महाशक्तीही झाली निरुत्तर ….!
पगार नाही,बोनस नाही,
उदिमांची गिर्हाईकी नेली,
कापुसवाल्या हलधरांची,
दिवाळीच अंधारात गेली ….!
घेऊन गेला इंद्रजीत,
देवीलाल,डाकुरानी फुला,
माधवरावांना हात लावतांना,
काहीच नाही वाटलं तुला ?…!
किमान अबाधित असुदे रे,
माणुसकी जगण्याचे राईट,
२००१ साला तुला टाटा,
बाय-बाय, गुड नाईट …..!!
.. गंगाधर मुटे
.. ( प्रकाशित लोकसत्ता ४ जानेवारी २००२ )