धन्यवाद Anand Kamble आणि दिव्यमराठी.
Tag Archives: अभिप्राय
शेतकर्याला अभय देणारी निराळी गझल
“ग्रंथ हेच गुरू” असे म्हटले गेले आहे. ग्रंथ असंख्य आहेत पण शेतकर्यांच्या जीवनातील प्रश्न जाणून घेणारे, ते मांडणारे व त्यावर उपाय सांगणारे ग्रंथ दुर्मिळ आहेत. गझलकार कवी श्री गंगाधर मुटे यांचे “माझी गझल निराळी” हा गझलसंग्रह अशा दुर्मिळ पुस्तकापैकीच एक आहे.
अर्थसंकल्पात होती खायसाठीची व्यवस्था
कागदावर आकडे अन् माल सारा फस्त आहे
तेच तेच रोग आणि त्याच त्याच औषधी
एकदा तरी निदान नीट व्हायला हवे
शेतकरी व त्यांचे प्रश्न याची जाण गझलकाराला आहे. प्रश्नाचे अचूक निदान कवीस आहे. हे प्रश्न का? कशामुळे व कोणी निर्माण केले याचेही भान आहे. या प्रश्नाची उत्तरेही त्याला माहीत आहेत. पण ते सोडवणे मात्र त्याच्या हातात नाही. फक्त संघर्ष करणे, लढणे आहे. या अफाट देशाचे राज्य दिल्लीच्या तख्तावरून चालते व तेथील वास्तवातील विसंगती कवीकडून दाखवली जाते.
लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला
याचा दुष्परिणाम शेतकर्याच्या आत्महत्येत होत आहे कारण राज्यकर्ते भेकड आहेत. ते स्वतः भेकड आहेत ते जनतेला काय अभय देणार? त्यामुळे मृत्यू सोकावलाय कारण त्याला शेतकर्याच्या रक्ताची चटक लागली आहे. निसर्गही शेतकर्याला साथ देत नाही कारण पाऊसही वेळेवर येत नाही. त्यामुळे कवी व्यथा मांडतो
भाजून पीक सारे, पाऊस तृप्त झाला
उद्ध्वस्त शेत आधी, मागून थेंब आला
शिवाय शेतकर्याला फक्त कोरडा उपदेशच केला जातो. आत्महत्या करणे चूक आहे, असे सांगितले जाते ते कवीलाही मान्य आहे. पण त्याचा प्रश्न आहे की,
असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी
शेतकर्याच्या दु:खाची भाषा सत्तेस कळेल असे ज्ञान कुणी दाखवत नाही कारण सत्तेमुळे नेते चळून गेले आहेत, ते धनवंतांना कुरवाळतात तर श्रमिकाला छळतात. अधिकारीही लाचखोरीला निर्ढावलेले आहेत त्यांमुळे ते
अभय लाचखोरीत तो शिष्ट प्राणी
कुणाच्याच बापास ना घाबरे तो
तर नेतेही मुजोर झालेत कारण
नसतेच जे मिळाले केव्हाच सातजन्मी
ते सर्व प्राप्त होता नेता मुजोर झाला
उलट सत्तेचा वापर जनतेवर अन्याय करण्यासाठीच करतात. शेती करून मालक होणे त्यामुळेच मूर्खता ठरत आहे. तर लाचखोरी करता येणार्या नोकरीला सन्मान मिळत आहे.
शेती करून मालक होणेच मूर्खता
सन्मान मोल आहे कर ’अभय’ चाकरी
असे त्यामुळेच स्वतःला बजावतो आहे. या नेत्यांना स्वार्थ मात्र कळतो. एरव्ही बेमुर्वत वागणारे नेते निवडणुकीच्या वेळी मात्र नरम होतात ते अगदी मोजक्या शब्दात व्यक्त करताना कवी म्हणतो
मते पाहताच
नेते नरमले
वास्तविक पैसा जनतेचा असतो पण नेते मात्र ते कसाही उधळतात.. नेते असे वागत असले तरी, सामान्य माणूस मात्र कष्टाने मिळणार्या संपत्तीसच खरे धन मानतो.
नको रत्न मोती, न पाचू हिरे ते
अभय ते खरे जे मिळाले श्रमाने
सरकारी योजनांचे पैसे मिळवायचे तर चिरीमिरी द्यावी लागते तरच वाद होत नाही. नेते जनतेत परस्परात भांडणे लावतात. अशांचा जयजयकार करू नये असे आग्रहाने कवी सांगतो.
छाया नरोत्तमाची, अभयास उब देते
त्यांचा उदो कशाला? जे कलह माजवीती
शेतीच्या दुर्दशेचे वास्तव कवी मांडतो ते असे
कायम गहाण सारे करण्यास सातबारा
बँकेसमोर झाले लाचार शेत आहे
बघा जरा हो बघा जरासे कसा भामटा फुगून गेला
मुरूम-गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे
समाजाच्या वाटेला सत्तेचा अल्पसाही वारा मिळत नाही कारण येथे घराणेशाहीच जोपासली गेली आहे. लबाडांच्या वंशात जन्म मिळणार्यांनाच तेथे वाव आहे.
अम्हांस नाही कुठेच सत्ता, कुठेच नाही “अभय” पदांचे
लबाडवंशात जन्म ज्यांचा, तमाम त्यांचा पुढार आहे
तर कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू? या गझलेत कवी म्हणतो
“घराणे” उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही?
सग्यासोयर्यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे
कवीला प्रश्न पडतो
का लोळतात पायी सिंहासने तयांच्या?
अद्भुत नवल कसले, त्यांच्या कुळात होते?
सामान्यांच्या प्रश्नाबाबत पूर्वी पक्षांच्या चळवळी व्हायच्या त्या आता कमी झाल्या आहेत. म्हणून कवीला वाटते की
वादंग वा दुरावा पंक्तीत उरला नाही
डावी उपाशी नव्हती, उजवी जेवली होती
कारण सगळ्यांनीच आता कुठे ना कुठे काही काळ तरी सत्ता उपभोगल्या आहेत.
घामचोरीची तक्रार दाखल केली तेव्हा
विरोधक प्रसन्न नव्हते, सत्ता कोपली होती
शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
स्वप्नेच वांझ झाली तारुण्य जाळताना
शेतीत राबणाऱ्या खंबीर हो ‘अभय’ तू
एकीत चालण्याचा करूया सराव सस्ता
शेतकर्यांच्या प्रश्नाची फारशी गांभीर्याने चर्चा होत नाही. आकांताची दखल घेतली जात नाही पण नको त्या प्रश्नांची मात्र चर्चा होते,
आकांत बेदखल का अमुचे जगात होते?
ते शिंकले तरीही चर्चा नभात होते
शेतकर्याने आंदोलन केले तर त्यांना लाठीमार, गोळीबाराला सामोरे जावे लागते
लाठी उगारताना, बंदूक रोखताना
का वाटला तुला रे माझा उठाव सस्ता?
असा रोकठोक प्रश्न शासनकर्त्यांस विचारतात अन शेतकर्याला आपल्या बचावासाठी क्रांतीचा नवा उग्र मार्ग अवलंबावा लागेल असेही ठासून सांगतात. कवी म्हणतात
सत्याग्रहास आता रक्तात माखवावे
शिकवू चला नव्याने क्रांतीस डाव सस्ता
या क्रांतीला शब्दांच्या माध्यमाची जोड हवी. रशियातील क्रांतीच्या वातावरण निर्मितीला मॅक्झिमा गॉर्कीच्या “आई” या कादंबरीची मदत झाली होती. म्हणूनच कवी आत्मविश्वासाने म्हणतात
घामाची कत्तल जेथे, होते सांज सकाळी
तुतारी फुंकते तेथे, माझी गझल निराळी
गझल माझी बंड आणि अन्यायाला दंडही
शेतकर्यांच्या मुक्तिसाठी आयुधांची थाळी
कवी केवळ संघर्ष करणारा नाही तर त्याला विधायकतेच्या निर्मितीचा ध्यासही आहे.
चेतनेला पेरून देते अभयतेची खते
संघर्षाला पिकवताना प्रतिभा बनते माळी
मानवी जीवनात प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रसंगी युद्धाचा मार्ग अवलंबावा लागतो. पण मानवी जीवन केवळ संघर्षासाठी नाही. त्याला सुख, शांती व समाधानाची नैसर्गिक आस असते. त्यामुळेच कवी मार्मिक शब्दांतून ते व्यक्त करतो.
घमासान आधी महायुद्ध होते
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते
शासनकर्त्यांना स्वतःच्या सावलीचीही भिती वाटते. त्यामुळे त्यांना शस्त्राच्या क्रांतीची भीती वाटतेच वाटते. पण शब्दाच्या शस्त्राचीही वाटते. हा कवी नारायण सुर्वे प्रमाणेच संत तुकाराम महाराजांचाही मागोवा घेत चालणारा आहे. त्यामुळेच तो शब्दांना शस्त्राइतके सामर्थ्यवान मानतो. तुकोबाराय म्हणतात,
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने
शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू
कवीही शब्दाला शस्त्र बनवतो पण शासनकर्त्याला त्याची भिती वाटते. त्यामुळे
मी म्हणालो फक्त इतुके “शब्द माझे शस्त्र आहे”
चक्क माझ्या भोवताली चोख बंदोबस्त आहे
कारण आजवरच्या लेखकांनी कधीही ही नोंद केली नाही की,
पुस्तकाने कोणत्याही नोंद नाही घेतली की
कष्ट आणिक भाग्य-लक्ष्मी हाच रेशो व्यस्त आहे
शासनकर्ते समाजावर सवलतीचा वर्षाव करून त्याला कामापासून दूर करत आहे. तर काहींना साहेब बनण्यात भूषण वाटते. कष्ट करणारा शेतकरी मात्र मूर्ख ठरत आहे.
सारे काही सवलतीत; धान्य, इंधन, साखर, तेल
कोण तयार होईल मग, इथे हाडे झिजवायला
निघून गेलेत शहाणे, सर्व ’साहेब’ बनायला
मूर्ख आम्ही उरलो इथे, मोफत अन्न पिकवायला
पण हे फार काळ चालणार नाही कारण जनतेला आता कळू लागले आहे, म्हणून कवी निर्धाराने-निश्चयाने म्हणतो,
श्रमास मातीत गाडण्याला, नव्या दमाचा विरोध आहे
नवीन शाई, नवे मनसुबे, अभय जनांची नवीन भाषा
एवढेच नव्हे बळीराजाला पाताळात घालणार्या वामनाची सत्ता उलथून टाकण्याची ईर्ष्या मनात आहे
मामला तीन पद भूमीचा, तुझ्या सिंगावर घेच तू
त्या बटू वामनाची सत्ता, “अभय” पालटली पाहिजे
– विजय शंकरराव चव्हाण
पद्मावती अपार्टमेंट
पद्मनगर, लातूर
======================================================================
“माझी गझल निराळी” प्रस्तावना – श्री सुधाकर कदम
कोणताही साहित्यप्रकार हा त्या-त्या साहित्यिकाच्या स्वभावानुरूप आकार घेत असतो. मग ती कथा असो, कादंबरी असो, वा कोणताही काव्यप्रकार असो… कथा वाचूनही लेखकाच्या स्वभावाचे पैलू कळतात की हा लेखक कोणत्या धाटणीचा आहे. आणि कवितेत तर त्या कवीचे अंतरंगच उलगडून ठेवलेले असतात. शिवाय कवी हा इतर कोणत्याही साहित्यिकाहून अधिक संवेदनशील असतो. अगदी झाडावरून गळणारं पिकलं पान पाहून सुद्धा त्याचं मन हेलावून जातं. केवळ कविता वाचूनच जातीवंत कविचा जीवनपट नजरेसमोर उभा ठाकतो.
असा एखादा शेर आपल्याला वाचायला मिळतो.
गंगाधर मुटे यांना कवितेच्या, गझलच्या रुपाने जगण्याचे संचित गवसले आहे. म्हणूनच तर ते म्हणतात…
खूप काही चांगले लिहिण्याची क्षमता असणा-या गंगाधर मुटे यांना पुढील गझल लेखनासाठी शुभेच्छा…
जागतिक दृष्टिदान दिन सुधाकर कदम
सोमवार, १० जून २०१३ जेष्ठ गझलगायक, संगीतकार
पुणे
परिघाबाहेरची गझल – किमंतु ओंबळे
आनंदऋतू ई-मॅगझिनच्या निमित्ताने दर्जेदार कविता आणि गझल शोधता शोधता गंगाधर मुटे साहेबांची कविता नजरेस पडली. कविता, व्यंग, नागपुरी तडका आणि गझल अशा विविध माध्यमातून चौफेर स्वैर साहित्य भ्रमंती करणाऱ्या एका संवेदनशील आणि ऋजू व्यक्तिमत्वाशी ओळख होण्याचा योग जुळून आला. आनंदऋतू ई-मॅगझिनमध्ये दर महिना कविता आणि गझल प्रकाशित करण्याची मुटे साहेबांनी परवानगी दिल्याने नव्याने झालेली ओळख परिचयात बदलली. तशी प्रथमदर्शनीच वेगळी वाटणारी त्यांची गझल पण परिचयाची वाटू लागली.
“माझी गझल निराळी” या गंगाधर मुटे साहेबांच्या गझल संग्रहास मन:पूर्वक शुभेच्छा!
किमंतु ओंबळे
संपादक
दिनांक: ५ मे २०१३ आनंदऋतू ई-मॅगझिन
ठाणे
’माझी गझल निराळी’ – अभिप्राय : राज पठाण
गझलविश्वाची परिभाषा बदलणारा
मागच्या विजयादशमीलाच ‘माझी गझल निराळी’ हा गंगाधर मुटेंचा गझलसंग्रह प्रकाशित झाला आणि लागलीच दुसरी आवृत्ती. “वाह! हार्दिक शुभेच्छा गंगाधर मुटेजी !!” असेच उद्गार निघाले, जेव्हा ही बातमी ऐकली. या गझलसंग्रहाची प्रकाशनापूर्वीच अनेकांना प्रतीक्षा होती त्यापैकी मी सुद्धा एक होतो. शेतकर्यांच्या वेदनांची कैफियत मांडण्यासाठी त्यांनी गझल हा काव्यप्रकार निवडावा हेच मुळी धाडसाचे काम आहे. हा गझलसंग्रह विषयाच्या अनुषंगाने अद्वितीय असाच आहे. “शेतकर्यांचा आसूड” या महात्मा फुलेंच्या पुस्तकानंतर शेतकर्यांच्या जीवनाला समग्र स्पर्श करणारे लिखाण माझ्या वाचनात आले नव्हते. ही पोकळी गंगाधर मुटेंच्या समर्थ लेखणीने भरून काढली आहे.
’माझी गझल निराळी’ – अभिप्राय : तुषार देसले
मनाला थेट भिडणारी गझल
’माझी गझल निराळी’ – अभिप्राय : प्रमोद गुळवेलकर
’माझी गझल निराळी’ – अभिप्राय : प्रमोद गुळवेलकर
प्रमोद गुळवेलकर
स्टेट बॅंक ऑफ़ हैदराबाद
शहाजंग शाखा, औरंगाबाद
दि : ०२-०२-२०१४
प्रिय श्री गंगाधर मुटे ’अभय’
यांस स. नमस्कार
पुन:पुन्हा ही गझल वाचतांना कै. सुरेश भटांचा वसा चालवणारा कुणी एक भेटल्याचा आनंद वाटला. तुम्ही भटांची नक्कल करता, असे नव्हे पण त्यांच्या रचना वाचतांना येणार्या तरल अनुभूती, मोजक्या शब्दयोजनेतून मिळणारी चपखल अभिव्यक्ती आणि जगावेगळी फ़किरीवृती तुमच्या साहित्यकृतीत सम्यकपणे आढळतात.
’माझी गझल निराळी’ – अभिप्राय : डॉ. मधुकर वाकोडे
’माझी गझल निराळी’ – अभिप्राय : डॉ. मधुकर वाकोडे
– डॉ. मधुकर वाकोडे
’माझी गझल निराळी’ – अभिप्राय : डॉ.विकास आमटे
कवितेचे माध्यम हाताळणे काहीसे कठीण असले तरी निवडक काव्यपंक्तीतून योग्य तो आशयघन वाचकापर्यंत पोहचविण्याचे सामर्थ्य त्यात नक्कीच आहे. याचे भान आपण राखलेत आणि म्हणूनच आपल्या कवितांना वास्तवाचा परिसस्पर्श लाभला आहे. कविता वाचनीय झाल्या आहेत. वास्तव कितीही भडक असले, बोचणारे सत्य असले तरी ते कसे मांडायचे हा ज्या लेखकाचा अधिकार आहे. आपण जे लिहितोय ते वाचण्यायोग्य असावे, त्यातून निखळणार्या भावना प्रामाणिक असाव्यात…. एवढेच! एक खरे की आपल्या बहुतांशी कवितांना अनुभवाची किनार लाभलेली आहे, उत्तम बाज साधलेला आहे.
आमच्या आनंदवन वाचनालयात ठेवण्यात आलेले हे संग्रह इथे येणार्या वाचकांच्या पसंतीस उतरतील अशी आशा बाळगावयास हरकत नाही.
सानंद आभार! आनंदवनी सदैव स्वागत. सुमंगल शुभकामनासह….!
आपले शुभाकांक्षी
डॉ.विकास आमटे
भारती आमटे
महारोगी सेवा समिती, वरोरा
== ० == ० == ० == ० == ० == ० == == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० ==० ==
‘माझी गझल निराळी’ अभिप्राय – श्री. श्याम पवार
श्री. गंगाधर मुटे,
सप्रेम नमस्कार
अलीकडेच प्रकाशित झालेली तुमची ‘वांगे अमर रहे’ व ‘माझी गझल निराळी’ ही दोनही पुस्तके वाचली. वाचकाला अस्वस्थ करण्याचे व विचार करायला भाग पाडण्याचे काम या लिखाणातून निश्चितपणे झाले आहे. कृषिप्रधान भारतातील, शेतात घाम गाळणार्या शेतकरी समाजाचे दुर्दैवी भयाण वास्तव परिणामकारक शब्दांत या लिखाणात व्यक्त झाले आहे.
‘वांगे अमर रहे’ या लेखसंग्रहातील प्रत्येक लेखात तुम्ही मांडलेली व्यथा भारताच्या अर्थव्यवहारातील व्यंगांवर नेमकेपणाने बोट ठेवणारी आहेच आणि त्याचबरोबर ‘शेतकर्याचा आसूड’ ओढण्याची ताकदही त्यातून समर्थपणे प्रगट झाली आहे.
सन १९८० नंतरच्या दोन दशकांत महाराष्ट्रात शेतकरी संघटनेचे वादळ उठले. भूतकाळाचे अचूक विश्लेषण आणि भविष्यकाळाचा नेमका वेध घेणारे शरद जोशी यांचे नेतृत्व संघटनेला लाभले. संघटनेच्या भरतीचा हा काळ. या भरतीच्या लाटा छातीवर झेलण्यासाठी असंख्य तरूण यात उतरले. शतकानुशतके घाव झेलून वेदना मुकी झालेल्या व सदान् कदा मनं मारली जाऊन मुर्दाड झालेल्यांना नवी ऊर्मी, नवी प्रेरणा या विचाराने निश्चितपणे मिळाली. लाखोंच्या संख्येने शेतकरी भाऊबहिणी रस्त्यावर उतरले. शेतकर्याच्या व कष्टकर्याच्या स्वातंत्र्याची प्रेरणा घेतलेल्या आणि घरदार सोडून काम करण्यासाठी तयार झालेल्या तरूण संघटनापाईकंची फौज उभी राहिली. पारतंत्र्यानंतर प्रथमच शेतकरी भावांच्या बरोबरीने मायभगिनी तुरुंगात जाण्यासाठी घराबाहेर पडल्या. धास्तावलेल्या स्वकीयांच्या सरकारातील आमच्याच राज्यकर्त्या पोरांनी आपल्या भावांच्या छातीत गोळ्या घालून त्यांचे बळी घेतले, मायभगिनींना लाठ्याकाठ्यांनी सोलून काढले. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर इतर राज्यांतही शेतकरी संघटनेच्या प्रभावाखाली शेतकर्यांची एकजूट झाली. राज्य सरकारे आणि केंद्र सरकार यांना संघटनेच्या अर्थशास्त्रीय विचारांची दखल घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. मात्र संघटनेच्या मागण्यांची पूर्तता अजूनही पूर्णत्वाने झालेली नाही. त्यामुळे चळवळीचे सामर्थ्य टिकविणे आणि वाढविणे आवश्यक असल्याचा तुम्ही मांडलेला आशावाद योग्यच आहे.
संघटनेचा विचार जितका मूलगामी आणि परिवर्तनवादी तितका तो समाजाच्या विविध थरांतून व विविधांगांतून खोलवर रुजतो. शेतकरी संघटनेला असे भाग्य लाभले. संघटनेच्या विचारांचा व आंदोलनांचा प्रभाव साहित्यक्षेत्रातही झालेला आहे. विशेष करून ग्रामीण साहित्यिक नव्याने लिहू लागले. एक नवीन साहित्यधारा तयार झाली. सकस आणि परिवर्तवादी साहित्यलेखकांची दमदार पिढी संघटनेच्या विचाराने प्रभावित होऊन लिहू लागली, बोलू लागली. आज ही यादी लक्षात घेण्याइतपत मोठी झाली आहे. संघटनेच्या या मंतरलेल्या कालखंडात काम केलेल्यांची पिढी आता वृद्धत्वाकडे झुकली आहे. अनेकजण परलोक(!)वासी झाले आहेत. परंतु, हा वारसा समर्थपणे पुढे सुरू राहील याचा भरवसा तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडे पाहून ‘अभय’ देणारा वाटतो.
‘घामाची कत्तल जेथे, होते सांजसकाळी
‘युगानुयुगे ते बोलले, ऐकत आलो आम्ही
ही तुमच्या गझलेमधली भूमिका केशवसुतांच्या ‘तुतारी’ची आठवण जागविणारी आहे यात शंका नाही.
सभोवतालचे भयाण वास्तव आणि उद्ध्वस्त ग्रामव्यवस्था यांचे चित्रण वेगवेगळ्या गझलांमध्ये टोकदार शब्दांत व्यक्त झाले आहे.
‘बाभूळ, चिंच, आंबा; बागा भकास झाल्या
‘शिवारात काळ्या, नि उत्क्रांतलेल्या खुज्या माकडांचा धुमाकूळ तो
‘टाळले होते फुलांनी, आयुष्यभर भेटायचे
‘दिसतात अभय येथे चकवे सभोवताली
‘विज्ञानाने हात टेकले अन् बुद्धीही हतबल झाली
अश्या प्रकारच्या ओळींतून हे वास्तव स्वरूपात व्यक्त झाले आहे. जीवन जगण्यातील हतबलता आणि त्यामुळे होणारी आत्महत्या याची व्यथा
‘असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
अश्या ओळींतून व्यक्त झाली आहे. तरीसुद्धा या प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्याची जिद्द ठाम आहे.
‘राजसत्ताच कोपली बघ, तुझ्या श्रमाच्या कमाईवर
‘आता अभय जगावे अश्रु न पांघरावे
या ओळींमधून तुमची संकटावर मात करण्याची लढावू वृत्ती व्यक्त झाली आहे.
‘घराणे उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो आम्ही?
‘आम्हास नाही कुठेच सत्ता, कुठेच नाही अभय पदांचे
‘जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या
‘लोंढेच घोषणांचे, दिल्लीवरून आले
‘भ्रष्ट आचारास सत्ता, मुख्य झाला स्रोत आहे
या प्रकारच्या अनेक गझलांमधून या विकृतीचे चित्र मांडले गेले आहे ते निश्चितच विषण्ण करणारे तर आहेच आणि त्याच बरोबर विचार कराय लावणारे आहे. या सगळ्या विसंगतीत तुमची मातीशी असलेली अतूट नाळ
‘अभय एक युक्ती तुला सांगतो मी करावे खरे प्रेम मातीवरी या
या शब्दांमधून व्यक्त झाली आहे, ती खरोखरी भावणारी वाटली यात काही शंका नाही.
गझल या काव्यप्रकाराची हाताळणी तुम्ही अगदी अलीकडे सुरू केली तथापि त्यात जे लिखाण केले त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना दाद देणे भाग आहे. मात्र त्याच वेळी तंत्राच्या मार्गाने जाताना अंतःकरणातल्या ऊर्मी व्यक्त करताना काही राहून तर जात नाही ना याचा विचार होण्याची आवश्यकता व्यक्त करावीशी वाटते.
‘वांगे अमर रहे’ या लेखसंग्रहातील शेवटचा ‘असा आहे आमचा शेतकरी’ हा लेख सर्वांनाच अंतर्मुख व्हायला लावणारा आहे. आणि ‘शेतकरी समाजासाठी कार्य करणे हे तुलनेने अधिक कठीण काम असले तरी ऐतिहासिक आणि महान कार्य आहे याची खूणगाठ मनाशी पक्की बांधून घेणे गरजेचे आहे’ असा व्यक्त केलेला आशावाद बरेच काही सांगून जाणारा आहे. एकूणच सर्व लेखसंग्रह अभ्यासनीय झाला आहे.
पुस्तके वाचण्याची संधी जाणीवपूर्वक करून दिली याबद्दल मनापासून धन्यवाद आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी अंतःकरणपूर्वक शुभेच्छा.