समकालीन गझलेत वेगळेपण दाखविणारी गझल

समकालीन गझलेत वेगळेपण दाखविणारी गझल

            “माझी गझल निराळी” हे अगदी तंतोतंत पटावे असेच शीर्षक आहे. खरोखर आपली गझल निराळी आहे. तिच्यात संवेदने सोबतच सामूहिक वेदना आहेत आणि त्यांचे स्वरूप पराकोटीचे प्रामाणिक आणि कळकळीचे आहे.

            सूर्य, चंद्र, चांदण्या, बहरलेली फुले, उमलता पारिजात, नदी, तलाव, रंगीत शहर इत्यादी बहुप्रसवं विषय ती सर्वश्रुत पद्धतीने न मांडता खरेखुरे ८० टक्के लोकांचे दैन्यघटीत जीवन अभिव्यक्त करते. हाडाचा शेतकरी ( दोन्हीही अर्थाने ) जेव्हा एक कवीही असतो तेव्हाच तो फुलांचं दुःख शब्दातून सांडू शकतो. कळ्यांची काळजी अर्थातुं वाहू शकतो.

            गझलेला कुठलाही आशय-विषय अमान्य नाही. नसावाही…… निर्मिती अवस्थेत कुठलीही गोष्ट (कलासुद्धा) अपरिपक्व आणि संस्कारप्रतिक्षच असते–सातत्यपूर्ण प्रयोगशीलता व अभ्यासू संस्कार पुढे स्थिरमान्यता आणते. मला वाटतं गझल हे मुळातl काव्य आहे, पण ते तंत्रबद्ध असल्यानेच ती विधा आहे. तंत्रमागणीच्या निकषावर पूर्ण उतरली आणि आशयाची संपुर्क्तता–प्रासादिकता–गरजेनुरूप चमकृती या व इतर सर्व आंतरिक मागण्यासह जर ती अभिव्यक्त होत असेल तर तिला गझल मानायला हरकत नसावीच. विषयाचे तर बंधन नाहीतच. अगदी अरब-इराण-फारसी -रेख्ता-उर्दू-असा प्रवास करताना गझलेचा हा आशय, विषय आणि अभिव्यक्तीबदलाचा प्रवास सतत चालूच राहिला, पुढेही राहीलच. शेवटी सृजनशीलता आणि साहित्य विषयक सर्जनाला परिमाणlचा परिणाम लागू होत नसतो. “अजं जनाना गुफ़्तन” या स्त्रीयांशी बोलणे, या अर्थाचाही पुढे स्त्रियांविषयी बोलणे हा बदल झालाच. आता त्या एकल्या प्रेमाची जागा जागतिक प्रेमव्याप्तीत बदलली. अहमद फ़राज़ म्हणतात,

“ग़में दुनियामे ग़मेयार भी शामिल कर लो;
नश्शा बढ़ता है शराबे जो शराबो में मिले

            “तात्पर्य, जर संपूर्ण जग कवेत घेणारी विधा उपलब्ध असेल तर तिच्यावर आशय-विषयाचे बंधने लादण्याचा कोतकरंटेपणा आम्ही का करावा? आणि कशासाठी…… परंतु कलेसाठी कला, जीवनासाठी कला की जगवण्यासाठी कला…. हा त्या कलावंताच्या चिंतनाचा विषय असतो. तुमच्यासाठी तो जगणे आणि जगवणे असा असावा…. मला तो खचितच वास्तववादी वाटतो.

            आशावादी; स्फूर्तिकाव्य गैर नाहीच; मात्र वास्तव – निराशा याकडे डोळेझाक करणे कसे शक्य आहे? इत्यादी बाबत विचार करिता आपली गझल, आपले काव्य, आपले लेख निराळे आहेतच. तुमच्यातला सोशल कवी अलाहिदा म्हणायला तयार नाही आणि कार्यकर्ता तर डोळेझाक का करावी? हा प्रश्न नेहमीच स्व:ताला विचारताना दिसतो. डोळेझाक करूच नये हे उत्तर तो कवीला देऊन तसं करण्यास बाध्यच करीत असावा.

            शेती; शेती समस्या; त्यावर काय व्हावं त्यासाठी चिंतन प्रपंच या करिता जळणारा आणि लेखनी जाळणारा कवी कदाचित तुमच्या शेतकरी चळवळीचे फलित असावा. रूढार्थाने आणि काव्यार्थाने वेगळी वाट जोखणारा हा कवी; गझलकार निष्ठुर शासन, शासकीय धोरण आणि यंत्रणेसोबतच कृषिप्रधान देशातच होणारी शेतकऱ्याची कुचंबणा ( अमानवीय मुस्कटदाबी) इत्यादीवर धाडसी भाष्य करतो.

            “कांदा मुळा भाजी…. ” म्हणणारी सश्रद्ध संत कविता तत्कालीन समृद्धी बयाण करते तर तुमची धाडसी गझल शासकीय अनिच्छेने आलेली बकाली कथन करते. अश्या अर्थाने ती परंपरा नाते विशद करीत जाते. मानवी मनाची सूक्ष्मातिसूक्ष्म मनोचिकित्सा न करिता मानवी समूहाच्या दुःखाची सूक्ष्म चिकित्सा तिला अधिक जरूरीची वाटते हे समकालीन काव्याहून तिचे (गझलेचे) वेगळेपण होय.

            अशी ही आगळीवेगळी “माझी गझल निराळी” निश्चितच निराळी आहे. जी समकालीन कवितेत/गझलेत वेगळेपण दाखवते. दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने “माझी गझल निराळी” ला माझ्या अनंत शुभेच्छा आणि आपले मनाच्या गाभाऱ्यातून मनपूर्वक अभिनंदन……!

                                                                                                     आपला गझलकार स्नेही
                                                                                                     अनंत नांदुरकर “खलिश”
————————————————————————————————————

“काव्यदीप” मध्ये “माझी गझल निराळी”

“काव्यदीप” मध्ये “माझी गझल निराळी”  

 पुणे येथून प्रकाशीत होणार्‍या “काव्यदीप” मासिकात “माझी गझल निराळी”  चे प्रकाशित झालेले पुस्तक परिचय आणि संक्षिप्त समीक्षण.

kawyadip

“प्रहार” मध्ये “माझी गझल निराळी”

“प्रहार” मध्ये “माझी गझल निराळी”
दैनिक “प्रहार” मध्ये “माझी गझल निराळी” चे प्रकाशित झालेले पुस्तक परिचय आणि संक्षिप्त समीक्षण.
धन्यवाद प्रहार आणि Aditi Paradkar Londhe
*    *    *    *    *   *
Prahar
*    *    *    *    *   *

शेतकर्‍याला अभय देणारी निराळी गझल

शेतकर्‍याला अभय देणारी निराळी गझल

“ग्रंथ हेच गुरू” असे म्हटले गेले आहे. ग्रंथ असंख्य आहेत पण शेतकर्‍यांच्या जीवनातील प्रश्न जाणून घेणारे, ते मांडणारे व त्यावर उपाय सांगणारे ग्रंथ दुर्मिळ आहेत. गझलकार कवी श्री गंगाधर मुटे यांचे “माझी गझल निराळी” हा गझलसंग्रह अशा दुर्मिळ पुस्तकापैकीच एक आहे.

शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे सुप्रसिद्ध लेखक श्री अमर हबीब यांचे भेटीसाठी अंबेजोगाईला गेलो होतो. त्यांनी आवर्जून मला हा गझलसंग्रह दिला आणि म्हणाले “सर, माझ्याकडे या गझलसंग्रहाच्या दोन प्रती आहेत. एक तुम्ही न्या, वाचा व कवीला तुमचा अभिप्राय कळवा”
मी लातूरला आलो आणि रात्री वाचायला सुरुवात केली. पहाटे चार वाजेपर्यंत मी वाचतच राहिलो. त्यात गुंतत गेलो कारण वाचताना ओळी मनाला भिडू लागल्या. टिपण काढत गेलो. दुसर्‍याच दिवशी अमर हबीब यांना फोन केला. पुस्तक वाचल्याचे आणि त्यावर टिपण काढल्याचे सांगितले आणि अत्यंत चांगले पुस्तक भेट दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानले.
माणसाचे जगणे केवळ स्वतःच्या मनावर, मर्जीवर अवलंबून नाही. सभोवतालची परिस्थिती अशी कठीण होत आहे की जगणे काय मरणेही कठीण झाले आहे. एवढेच नव्हे तर हसणे किंवा रडणे या मानवी मनाच्या नैसर्गिक प्रक्रिया ही माणसाच्या अधीन राहिल्या नाहीत. या परिस्थितीला शासन, शासनकर्ते व नोकरदार हेच जबाबदार आहेत, कारण “खाऊ लुटून मेवा” हे शासकांचे ब्रीद झालेले आहे. अर्थसंकल्पात असणारी जनसामान्यासाठीची तरतूद त्यांच्यापर्यंत पोहचतच नाही, त्याची विदारकता

अर्थसंकल्पात होती खायसाठीची व्यवस्था
कागदावर आकडे अन् माल सारा फस्त आहे

या ओळीतून ठळकपणे मांडली आहे. शासनकर्ते निधीचे वाटपही समानतेने करत नाहीत. त्यामध्येही नागरी व गावठी असा भेद करतात. वास्तविक लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेल्या लोकशाही राज्यात शासक हे सेवक आहेत पण तेच मालक म्हणून मिरवू लागले आहेत.
जोपर्यंत समस्यांचे, प्रश्नांचे निदान नीट होणार नाही तोपर्यंत रोग नीट होणार नाही हे सत्य आहे.

तेच तेच रोग आणि त्याच त्याच औषधी
एकदा तरी निदान नीट व्हायला हवे

शेतकरी व त्यांचे प्रश्न याची जाण गझलकाराला आहे. प्रश्नाचे अचूक निदान कवीस आहे. हे प्रश्न का? कशामुळे व कोणी निर्माण केले याचेही भान आहे. या प्रश्नाची उत्तरेही त्याला माहीत आहेत. पण ते सोडवणे मात्र त्याच्या हातात नाही. फक्त संघर्ष करणे, लढणे आहे. या अफाट देशाचे राज्य दिल्लीच्या तख्तावरून चालते व तेथील वास्तवातील विसंगती कवीकडून दाखवली जाते.

लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला

याचा दुष्परिणाम शेतकर्‍याच्या आत्महत्येत होत आहे कारण राज्यकर्ते भेकड आहेत. ते स्वतः भेकड आहेत ते जनतेला काय अभय देणार? त्यामुळे मृत्यू सोकावलाय कारण त्याला शेतकर्‍याच्या रक्ताची चटक लागली आहे. निसर्गही शेतकर्‍याला साथ देत नाही कारण पाऊसही वेळेवर येत नाही. त्यामुळे कवी व्यथा मांडतो

भाजून पीक सारे, पाऊस तृप्त झाला
उद्ध्वस्त शेत आधी, मागून थेंब आला

शिवाय शेतकर्‍याला फक्त कोरडा उपदेशच केला जातो. आत्महत्या करणे चूक आहे, असे सांगितले जाते ते कवीलाही मान्य आहे. पण त्याचा प्रश्न आहे की,

असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी

शेतकर्‍याच्या दु:खाची भाषा सत्तेस कळेल असे ज्ञान कुणी दाखवत नाही कारण सत्तेमुळे नेते चळून गेले आहेत, ते धनवंतांना कुरवाळतात तर श्रमिकाला छळतात. अधिकारीही लाचखोरीला निर्ढावलेले आहेत त्यांमुळे ते

अभय लाचखोरीत तो शिष्ट प्राणी
कुणाच्याच बापास ना घाबरे तो

तर नेतेही मुजोर झालेत कारण

नसतेच जे मिळाले केव्हाच सातजन्मी
ते सर्व प्राप्त होता नेता मुजोर झाला

उलट सत्तेचा वापर जनतेवर अन्याय करण्यासाठीच करतात. शेती करून मालक होणे त्यामुळेच मूर्खता ठरत आहे. तर लाचखोरी करता येणार्‍या नोकरीला सन्मान मिळत आहे.

शेती करून मालक होणेच मूर्खता
सन्मान मोल आहे कर ’अभय’ चाकरी

असे त्यामुळेच स्वतःला बजावतो आहे. या नेत्यांना स्वार्थ मात्र कळतो. एरव्ही बेमुर्वत वागणारे नेते निवडणुकीच्या वेळी मात्र नरम होतात ते अगदी मोजक्या शब्दात व्यक्त करताना कवी म्हणतो

मते पाहताच
नेते नरमले

वास्तविक पैसा जनतेचा असतो पण नेते मात्र ते कसाही उधळतात.. नेते असे वागत असले तरी, सामान्य माणूस मात्र कष्टाने मिळणार्‍या संपत्तीसच खरे धन मानतो.

नको रत्न मोती, न पाचू हिरे ते
अभय ते खरे जे मिळाले श्रमाने

सरकारी योजनांचे पैसे मिळवायचे तर चिरीमिरी द्यावी लागते तरच वाद होत नाही. नेते जनतेत परस्परात भांडणे लावतात. अशांचा जयजयकार करू नये असे आग्रहाने कवी सांगतो.

छाया नरोत्तमाची, अभयास उब देते
त्यांचा उदो कशाला? जे कलह माजवीती

शेतीच्या दुर्दशेचे वास्तव कवी मांडतो ते असे

कायम गहाण सारे करण्यास सातबारा
बँकेसमोर झाले लाचार शेत आहे

या देशाचे दुर्दैव की येथे ना समाजवाद रुजला ना साम्यवाद रुजला, भांडवलशाही मात्र प्रबळ झाली. भ्रष्टाचारी, कंत्राटदार कसे गर्वाने वागतात.

बघा जरा हो बघा जरासे कसा भामटा फुगून गेला
मुरूम-गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे

समाजाच्या वाटेला सत्तेचा अल्पसाही वारा मिळत नाही कारण येथे घराणेशाहीच जोपासली गेली आहे. लबाडांच्या वंशात जन्म मिळणार्‍यांनाच तेथे वाव  आहे.

अम्हांस नाही कुठेच सत्ता, कुठेच नाही “अभय” पदांचे
लबाडवंशात जन्म ज्यांचा, तमाम त्यांचा पुढार आहे

तर कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू? या गझलेत कवी म्हणतो

“घराणे” उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही?
सग्यासोयर्‍यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे

कवीला प्रश्न पडतो

का लोळतात पायी सिंहासने तयांच्या?
अद्भुत नवल कसले, त्यांच्या कुळात होते?

सामान्यांच्या प्रश्नाबाबत पूर्वी पक्षांच्या चळवळी व्हायच्या त्या आता कमी झाल्या आहेत. म्हणून कवीला वाटते की

वादंग वा दुरावा पंक्तीत उरला नाही
डावी उपाशी नव्हती, उजवी जेवली होती

कारण सगळ्यांनीच आता कुठे ना कुठे काही काळ तरी सत्ता उपभोगल्या आहेत.

घामचोरीची तक्रार दाखल केली तेव्हा
विरोधक प्रसन्न नव्हते, सत्ता कोपली होती

अशी दोन्ही बाजूंनी सामान्यांची कुचंबणा  होत आहे.
कवीची जातकुळी नारायण सुर्वे यांच्या व्यथांशी साम्य दाखवते. पूर्वी साहित्यात चंद्र, प्रेयसी यांची म्हणजेच प्रेमाची वर्णने प्रामुख्याने असायची. वास्तव जीवनापासून ती शेकडो मैल दूर असायची. कवी नारायण सुर्वेने एका कवितेत म्हटले आहे. भाकरीचा चंद्र शोधण्यातच आयुष्याचा खूप काळ गेला. गझलकार “अभय” म्हणतात

शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
स्वप्नेच वांझ झाली तारुण्य जाळताना

शेतकर्‍यांचे प्रश्न सुटले पाहिजेत असे केवळ शाब्दिक बुडबुडे उडविणारा हा कवी नाही. हा कृतिशील कवी आहे. प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शेतकर्‍यात एकी पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे.

शेतीत राबणाऱ्या खंबीर हो ‘अभय’ तू
एकीत चालण्याचा करूया सराव सस्ता

शेतकर्‍यांच्या प्रश्नाची फारशी गांभीर्याने चर्चा होत नाही. आकांताची दखल घेतली जात नाही पण नको त्या प्रश्नांची मात्र चर्चा होते,

आकांत बेदखल का अमुचे जगात होते?
ते शिंकले तरीही चर्चा नभात होते

शेतकर्‍याने आंदोलन केले तर त्यांना लाठीमार, गोळीबाराला सामोरे जावे लागते

लाठी उगारताना, बंदूक रोखताना
का वाटला तुला रे माझा उठाव सस्ता?

असा रोकठोक प्रश्न शासनकर्त्यांस विचारतात अन शेतकर्‍याला आपल्या बचावासाठी क्रांतीचा नवा उग्र मार्ग अवलंबावा लागेल असेही ठासून सांगतात. कवी म्हणतात

सत्याग्रहास आता रक्तात माखवावे
शिकवू चला नव्याने क्रांतीस डाव सस्ता

या क्रांतीला शब्दांच्या माध्यमाची जोड हवी. रशियातील क्रांतीच्या वातावरण निर्मितीला मॅक्झिमा गॉर्कीच्या “आई” या कादंबरीची मदत झाली होती. म्हणूनच कवी आत्मविश्वासाने म्हणतात

घामाची कत्तल जेथे, होते सांज सकाळी
तुतारी फुंकते तेथे, माझी गझल निराळी

गझल माझी बंड आणि अन्यायाला दंडही
शेतकर्‍यांच्या मुक्तिसाठी आयुधांची थाळी

कवी केवळ संघर्ष करणारा नाही तर त्याला विधायकतेच्या निर्मितीचा ध्यासही आहे.

चेतनेला पेरून देते अभयतेची खते
संघर्षाला पिकवताना प्रतिभा बनते माळी

मानवी जीवनात प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रसंगी युद्धाचा मार्ग अवलंबावा लागतो. पण मानवी जीवन केवळ संघर्षासाठी नाही. त्याला सुख, शांती व समाधानाची नैसर्गिक आस असते. त्यामुळेच कवी मार्मिक शब्दांतून ते व्यक्त करतो.

घमासान आधी महायुद्ध होते
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते

शासनकर्त्यांना स्वतःच्या सावलीचीही भिती वाटते. त्यामुळे त्यांना शस्त्राच्या क्रांतीची भीती वाटतेच वाटते. पण शब्दाच्या शस्त्राचीही वाटते. हा कवी नारायण सुर्वे प्रमाणेच संत तुकाराम महाराजांचाही मागोवा घेत चालणारा आहे. त्यामुळेच तो शब्दांना शस्त्राइतके सामर्थ्यवान मानतो. तुकोबाराय म्हणतात,

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने
शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू

कवीही शब्दाला शस्त्र बनवतो पण शासनकर्त्याला त्याची भिती वाटते. त्यामुळे

मी म्हणालो फक्त इतुके “शब्द माझे शस्त्र आहे”
चक्क माझ्या भोवताली चोख बंदोबस्त आहे

कारण आजवरच्या लेखकांनी कधीही ही नोंद केली नाही की,

पुस्तकाने कोणत्याही नोंद नाही घेतली की
कष्ट आणिक भाग्य-लक्ष्मी हाच रेशो व्यस्त आहे

शासनकर्ते समाजावर सवलतीचा वर्षाव करून त्याला कामापासून दूर करत आहे. तर काहींना साहेब बनण्यात भूषण वाटते. कष्ट करणारा शेतकरी मात्र मूर्ख ठरत आहे.

सारे काही सवलतीत; धान्य, इंधन, साखर, तेल
कोण तयार होईल मग, इथे हाडे झिजवायला

निघून गेलेत शहाणे, सर्व ’साहेब’ बनायला
मूर्ख आम्ही उरलो इथे, मोफत अन्न पिकवायला

पण हे फार काळ चालणार नाही कारण जनतेला आता कळू लागले आहे, म्हणून कवी निर्धाराने-निश्चयाने म्हणतो,

 श्रमास मातीत गाडण्याला, नव्या दमाचा विरोध आहे
नवीन शाई, नवे मनसुबे, अभय जनांची नवीन भाषा

एवढेच नव्हे बळीराजाला पाताळात घालणार्‍या वामनाची सत्ता उलथून टाकण्याची  ईर्ष्या मनात आहे

मामला तीन पद भूमीचा, तुझ्या सिंगावर घेच तू
त्या बटू वामनाची सत्ता, “अभय” पालटली पाहिजे

     गझल म्हटली की त्याग, प्रेम, शृंगार, यांचाच प्रामुख्याने समावेश असतो. पण गंगाधर मुटे उर्फ “अभय” या गझलकाराच्या गझलांमध्ये शेतकर्‍यांचे जीवन, त्यांचे प्रश्न, त्या प्रश्नांची कारणे, त्याची जबाबदारी कोणाची व ते प्रश्न सोडविण्यासाठी काय करायला हवे, हे सर्व त्यांनी “गझल माझी निराळी” मधून समर्पक व यथार्थपणे मांडली आहे. ही गझल खरोखरच नावाप्रमाणे इतरांपेक्षा निराळी आहे. ती शेतकर्‍यांचे दु:ख सांगणारी आहे. ती केवळ शेतकर्‍याचे दु:ख, व्यथा मांडत नाही तर शेतकर्‍याला साथ, अभय देणारी आहे. ताज्या गारपिठीच्या तडाख्यानंतर शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकर्‍यांना धीर देणार्‍या संघर्षाला व जगण्याला प्रवृत्त करणार्‍या या गझला खरोखरच कौतुकास व धन्यवादास पात्र आहेत.

                                                                                               – विजय  शंकरराव चव्हाण
                                                                                               पद्मावती अपार्टमेंट
                                                                                               पद्मनगर, लातूर
======================================================================

“माझी गझल निराळी” प्रस्तावना – श्री सुधाकर कदम

कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले……..!

कोणताही साहित्यप्रकार हा त्या-त्या साहित्यिकाच्या स्वभावानुरूप आकार घेत असतो. मग ती कथा असो, कादंबरी असो, वा कोणताही काव्यप्रकार असो… कथा वाचूनही लेखकाच्या स्वभावाचे पैलू कळतात की हा लेखक कोणत्या धाटणीचा आहे. आणि कवितेत तर त्या कवीचे अंतरंगच उलगडून ठेवलेले असतात. शिवाय कवी हा इतर कोणत्याही साहित्यिकाहून अधिक संवेदनशील असतो. अगदी झाडावरून गळणारं पिकलं पान पाहून सुद्धा त्याचं मन हेलावून जातं. केवळ कविता वाचूनच जातीवंत कविचा जीवनपट नजरेसमोर उभा ठाकतो.

गझल हा तसा तंत्रानुगामी काव्यप्रकार… यात मात्रांचे, वृत्ताचे बंधन असल्यामुळे फार कमी कवी या प्रकाराकडे वळले आहेत. आणि या प्रकाराकडे वळलेल्यांमध्येही फार कमी लोकांनी चांगली गझल मराठी साहित्याला दिली आहे. गझलकारांचा आकडा शेकड्यांनी असला तरी सकस गझल लिहिणा-यांची संख्या उणीपुरीच आहे.

गंगाधर मुटे हे असेच एक उल्लेखनीय नाव आहे. मातीचं गाणं लिहिणार्‍या या कवीची नाळ मातीशी कायम जुळलेली आहे. रानमेवा हा त्यांचा काव्यसंग्रह आधीच प्रकाशित झाला आहे. मुळात शेतकरी असल्यामुळे मातीशी तसेही नाते जडलेले. शिवाय गंगाधर मुटे हे शेतकरी संघटनेचे खंदे कार्यकर्ते असल्यामुळे शेतक-यांच्या अडी-अडचणींना, व्यथांना त्यांच्या लेखणीतून वाचा फुटलेली दिसते.

पुसतो सदा आसवांना तो पदर भुमिचा ओला
आसू पुसता हळूच पुसतो आली जाग शिवारा

अशी रचना त्यांच्या लेखणीतून सहज साकारते. अनेकदा त्यांची लेखणी पीक, पेरणी या विषयावर मार्मिक टीप्पणी करते. अशावेळी व्यथा सांगत असतानाच ते पुसटसे बंडखोर देखील होताना दिसतात… त्यांची ही एक गझल पहा…

कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?

पुन्हा आज होऊ नये तेच झाले, कशा थांबवाव्यात वाताहती?
हवेनेच केला जिथे कोंडमारा, तिथे प्राण जाणे टळावे कसे?

तुझा पिंड आहेच विश्वासघाती, तसा एक अंदाज आहे मला
तरी जीव गुंतून जातो तुझ्याशी, मनाचे पिसे कुस्करावे कसे?

जरी सत्य तू बोलशी मान्य आहे, परी त्यास आहे कुठे मान्यता?
सही आणि शिक्क्याविना व्यर्थ सारे, पुरावे तुझे मान्य व्हावे कसे?

कशी एकटी हिंडते रानमाळी, जरी अर्धवेडी भिते ना कुणा
तिला फ़क्त भीती जित्या माणसांची, पशूंना तिने घाबरावे कसे?

कसा व्यर्थ नाराज झालास आंब्या, वृथा खेद व्हावा असे काय ते
फ़ळे चाखण्याचेच कौशल्य ज्याला, तया ओलणे ते जमावे कसे?

शिवारात काळ्या नि उत्क्रान्तलेल्या खुज्या माकडांचा धुमाकूळ तो
जिथे कुंपणे शेत खाऊन गेली, तिथे त्या पिकांनी लपावे कसे?

’अभय’ काळजी त्या मृताची कशाला, स्मशानात जागा हवी तेवढी
समस्या इथे ग्रासते जीवितांना, विसावा कुठे अन् वसावे कसे..!

(खुरटणे = वाढ खुंटणे, तण = पिकांत वाढणारे अनावश्यक गवत, ओलणे = ओलीत करणे,पाणी देणे)

कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नव्या पिकांची नवीन भाषा, मरणे कठीण झाले, भुईला दिली ओल नाही ढगाने, भाजून पीक सारे पाऊस तृप्त झाला, आत्महत्या बळीच्या तू रोख वामना, गहाणात हा सातबारा… या त्यांच्या रचना विशेषत्वाने शेतक-यांच्या व्यथा मांडणा-या आहेत. पण गंगाधर मुटे हे कुठेही एकाच विषयात अडकून पडलेले दिसत नाहीत. मातीचं गाणं लिहिणारा हा कवी शृंगार देखील काव्यात तितक्याच खुबीने मांडताना दिसतो… आणि…

ती बोलली तरी का शब्दास नाद येतो
त्या बोलक्या स्वरांचे झंकार चित्तवेधी

असा एखादा शेर आपल्याला वाचायला मिळतो.

मक्ता या गझलेतील एका परंपरेची कास गंगाधर मुटे यांनी धरलेली दिसते. मक्ता म्हणजे कवीचे नाव अथवा टोपणनाव असलेला शेवटचा शेर… गंगाधर मुटे हे काव्यात आपले अभय हे टोपणनाव वापरतात. मक्ता लिहिताना एका गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागते. ती म्हणजे मक्त्यामध्ये आपले नाव लिहिताना तेथे एखाद्या मौल्यवान शब्दाची जागा वाया तर जाणार नाही ना ? किंवा हे नाव त्या शेराच्या अर्थाला पूरक आहे ना ? या गोष्टींची काळजी घेणे. आणि अशी काळजी गंगाधर मुटे यांनी घेतलेली दिसते… मक्ता असलेले त्यांचे काही शेर पहा…

संचिताचे खेळ न्यारे… पायवाटा रोखती
चालता मी अभय रस्ता काळही भारावला

अभय एक युक्ती तुला सांगतो मी, करावे खरे प्रेम मातीवरी या
भुईसंग जगणे… भुईसंग मरणे… भुईसंग झरणे… वगैरे वगैरे

आता अभय जगावे अश्रू न पाझरावे
आशेवरी निघावे ही वाट चालताना

नको रत्न मोती, न पाचू हिरे ते
अभय ते खरे जे मिळाले श्रमाने

आत्मह्त्या बळीच्या तू रोख वामना
मी अभयदान इतके मागून पाहिले

घे हा अभय पुरावा त्यांच्या परिश्रमाचा
ती माणसेच होती जी कोहिनूर झाली

गंगाधर मुटे यांना कवितेच्या, गझलच्या रुपाने जगण्याचे संचित गवसले आहे. म्हणूनच तर ते म्हणतात…

वृत्तात चालण्याचे शब्दास भान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले

खूप काही चांगले लिहिण्याची क्षमता असणा-या गंगाधर मुटे यांना पुढील गझल लेखनासाठी शुभेच्छा…

जागतिक दृष्टिदान दिन                                                                                 सुधाकर कदम
सोमवार, १० जून २०१३                                                                     जेष्ठ गझलगायक, संगीतकार
                                                                                                                           पुणे

=‌^= ० =^= ० =^= ० =^= ० == ० == == ० == ० == ० ० == ० == ० == ० ==

परिघाबाहेरची गझल – किमंतु ओंबळे

परिघाबाहेरची गझल

आनंदऋतू ई-मॅगझिनच्या निमित्ताने दर्जेदार कविता आणि गझल शोधता शोधता गंगाधर मुटे साहेबांची कविता नजरेस पडली. कविता, व्यंग, नागपुरी तडका आणि गझल अशा विविध माध्यमातून चौफेर स्वैर साहित्य भ्रमंती करणाऱ्या एका संवेदनशील आणि ऋजू व्यक्तिमत्वाशी ओळख होण्याचा योग जुळून आला. आनंदऋतू ई-मॅगझिनमध्ये दर महिना कविता आणि गझल प्रकाशित करण्याची मुटे साहेबांनी परवानगी दिल्याने नव्याने झालेली ओळख परिचयात बदलली. तशी प्रथमदर्शनीच वेगळी वाटणारी त्यांची गझल पण परिचयाची वाटू लागली.

सुरेश भट साहेबांनंतर काही काळापुरती गझल ही चार लोकात आणि चार गावात कैद झाली होती. तेच तेच, त्याच त्याच भाषेत आणि शैलीत लिहणारे लोक स्वत:ला गझलकार समजू लागल्याने, गझल त्याच त्याच साच्यात गुदमरली होती. कल्पना करून वृत्तांमध्ये बसवलेली कपोलकल्पित दु:खे! वास्तवाशी सुतराम सोयरसुतक नसलेल्या स्वप्नाळू प्रतिमा आणि अलंकारांनी गझल गुदमरली होती. शहरी भागाचा आणि एका ठराविक वर्ग समाजाचा गझलेवर ठसा स्पष्टपणे दिसू लागला होता. काही काळापुरती तर गझल एका ठराविक समाज विशेषाची मक्तेदारी बनून गेली होती. एका ठराविक समाज विशेषाबाहेरचं किंवा ठराविक परिघा आणि भूगोला बाहेरचं काही लिहणं किंवा मांडणं हे गझलेला वर्ज्य मानलं गेलं होतं. कोणी तसा प्रयत्न केलाच, तर त्याला गझलेच्या व्याकरणात रक्तबंबाळ करून, शाब्दिक कसोट्यांमध्ये जेर करून स्वत: होऊन गझल लेखानातून बहिष्कृत करण्यासा भाग पाडलं जाऊ लागल्याने, गझलेमध्ये तोच तोच पणा आला. त्यामुळे साहजिकच सुरेश भटांनी नावारुपाला आणलेली आणि लोकाश्रय मिळवूने दिलेली गझल लोकांपासून दुरावली आणि एका आम्ही म्हणजे मैफिल मानणाऱ्या एका वर्तुळात सिमटली गेली.

हे सर्व सांगण्याचे प्रयोजन म्हणजे गंगाधर मुटे साहेबांची गझल. ती वाचता क्षणीच, परिघाबाहेरची वाटते. तिच्यामध्ये कदाचित ती गझलेची नजाकत नसेलही, पण जी गझलेची रग आहे, ती मात्र सोळा आणे अस्सल आहे. प्राचार्य प्र. के. अत्रेंनी उत्कृष्ट आणि सकस साहित्य कसं असावं? यासंबंधी एका ठिकाणी असं म्हटलं होतं की, “ऊस जसा ज्या जमिनीत रुजून येतो, त्या जमिनीची त्याला गोडी येते. तसं खरं साहित्य ज्या जमिनीतून फुलून येतं, तिचा त्याला गंध यावा.” गंगाधर मुटे साहेबांची गझल या परिमाणाला पुरेपूर उतरते. त्यांची कोणतीही गझल वाचली, तरी तिच्यामध्ये प्रथमच जाणवतो तो तिचा अस्सल गावरान बाज आणि शेतकरी साज! या गझलेमध्ये एक बंडखोरपणा आहे. पण त्यात उर्मटपणाचा लवलेशही नाही हे या गझलेचं मोठं वैशिष्ट्य आहे. वाचकाना या गझलेमध्ये चंद्र तारे, ऊन वारे, प्रेमाचे शिडकावे आणि प्रियकर प्रियेसीचे शृंगारमय बारकावे कमीच सापडतील, पण शेतकऱ्यांचा आक्रोश आणि पीडितांच्या व्यथा मात्र भरभरून मिळतील. कारण ही गझलच लिहली गेली आहे, शोषितांच्या आणि श्रमकऱ्यांच्या ऊपेक्षेला वाट करून द्यायला! श्रमिकांची दु:खे कधी गझलेमध्ये सांडलेली दिसत नाहीत, कारण गझलेमध्ये मांडण्याइतकी ती सुवासिक आणि अलंकारिक नसतात, असा एक अघोषित वृथा समज पसरवण्यात आला आहे. गंगाधर मुटे साहेबांची वास्तववादी गझल या गैरसमजाला छेद देण्याएवढी पूर्ण सक्षम नक्कीच आहे.

“माझी गझल निराळी” या गंगाधर मुटे साहेबांच्या गझल संग्रहास मन:पूर्वक शुभेच्छा!

                                                                                                                     किमंतु ओंबळे
                                                                                                                          संपादक
दिनांक: ५ मे २०१३                                                                                     आनंदऋतू ई-मॅगझिन
                                                                                                                             ठाणे

== ० == ० == ० == ० == ० == == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० ==

’माझी गझल निराळी’ – अभिप्राय : राज पठाण

गझलविश्वाची परिभाषा बदलणारा 

गझलसंग्रह : ’माझी गझल निराळी’

              मागच्या विजयादशमीलाच ‘माझी गझल निराळी’ हा गंगाधर मुटेंचा गझलसंग्रह प्रकाशित झाला आणि लागलीच दुसरी आवृत्ती. “वाह! हार्दिक शुभेच्छा गंगाधर मुटेजी !!” असेच उद्गार निघाले, जेव्हा ही बातमी ऐकली. या गझलसंग्रहाची प्रकाशनापूर्वीच अनेकांना प्रतीक्षा होती त्यापैकी मी सुद्धा एक होतो. शेतकर्‍यांच्या वेदनांची कैफियत मांडण्यासाठी त्यांनी गझल हा काव्यप्रकार निवडावा हेच मुळी धाडसाचे काम आहे. हा गझलसंग्रह विषयाच्या अनुषंगाने अद्वितीय असाच आहे. “शेतकर्‍यांचा आसूड” या महात्मा फुलेंच्या पुस्तकानंतर शेतकर्‍यांच्या जीवनाला समग्र स्पर्श करणारे लिखाण माझ्या वाचनात आले नव्हते. ही पोकळी गंगाधर मुटेंच्या समर्थ लेखणीने भरून काढली आहे.

           मी तसा या प्रांतात नवखाच. दोनशेच्या आसपास गझला लिहिल्यानंतर मला अद्यापही हे उमगले नाही की नेमके मी कोणासाठी लिहीत आहे. परंतू गंगाधर मुटेंकडे मात्र याचे स्पष्ट उत्तर आहे. त्यांचे लेखन त्या तमाम कष्टकऱ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे या उद्दाम राज्यकर्त्यांनी युगानुयुगे जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे.
           असेच एकदा फेसबुकवर पडणार्‍या शेकडो गझलांच्या पावसाचा आनंद लुटत आणि अधून मधून एखादा शेर लिहीत बसलो होतो. अनेक विषय होते – हृदय आणि त्याच्या विविध विकारांचा आशय असलेले, ‘उमदा खयाल’ वाले. तेवढ्यात मेसेज बॉक्स मध्ये प्रसिद्ध विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कवी, असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेले माझे स्नेही, अमर हबीब यांचा मेसेज डोकावला. तो असा होता- “काय हो, आपल्याला परिचित एखादा शायर आहे का, जो शेतकर्‍यांच्या दयनीय स्थितीवर लिहितो?” मला सुरुवातीला वाटले अमर हबीबजींना असे म्हणावयाचे आहे की “काय हो, तुम्हाला काही उद्यागबिद्योग नाही का? कसल्या गझला लिहिता? जरा ज्वलंत सामाजिक विषयाचे भान ठेवून लिहीत चला.” परंतू त्यांना खरेच कुठेतरी याच विषयावर व्याख्यान द्यायचे होते. मी विचारात पडलो ‘गझल आणि शेतकरी’! बापरे!! याप्रसंगी वीज चमकल्यागत गंगाधर मुटे हे नांव माझ्या डोळ्यासमोर आले आणि लागलीच मी त्यांना गंगाधर मुटें हेच एकमेव व्यक्तिमत्त्व शेतकर्‍यांची गार्‍हाणी गझलेतून मांडते हे बिनदिक्कतपणे सांगितले होते..
       एकंदर काय तर हजारोंच्या घरात आज महाराष्ट्रात मराठी गझलकारांची संख्या गेली असूनही, कास्तकारांच्या मूक वेदनांना समाजासमोर मांडणारे गंगाधर मुटे हेच एकमेव नांव! हा स्तंभ मला टाळताही आला असता परंतू मुद्दाम लिहितोय. गझलेचे अध्वर्यू सुरेश भट यांनी मराठी गझलेचे दालन येणार्‍या पिढ्यांसाठी खुले केले हे अंतिम सत्य. सुरेश भटांनंतर सर्वार्थाने मराठी गझलेचा झेंडा अटकेपार रोवणारे दोन व्यक्तिमत्त्व मला ज्ञात आहेत, एक इलाही जमादार व दुसरे भीमराव पांचाळे! याचा अर्थ असा मुळीच नाही की आम्ही निव्वळ सुमार लिहितो…!
           काय आहे ही गझल? फक्त दोन ओळींची पूर्ण कविता? तरीही अभिव्यक्तीचे एक सशक्त माध्यम. आज माझ्यासारख्या पामराकडेही १९४ अक्षरगणवृत्तं आणि ४६ मात्रावृत्तांची यादी का यावी? अर्थातच मराठी मातीत गझलेची पाळेमुळे आता अगदी खोलवर रुजू लागली आहेत. गंगाधर मुटेंच्या ‘माझी गझल निराळी’ या गझलसंग्रहाची पहिली आवृत्ती हातोहात संपणे हे त्याचेच द्योतक आहे!
         काव्यलेखनाचा हा प्रपंच समाज घडवण्यासाठी केलेला पाहून आनंद होतो. शेतकर्‍यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांच्या संघर्षाची मशाल सदैव तेवती ठेवण्याचे कठीण काम गंगाधर मुटेंजीनी लीलया पेलले आहे. ८८ गझलांचा हा संग्रह गझलविश्वाची परिभाषा बदलणारा असा आहे.

घामाची कत्तल जेथे, होते सांज सकाळी
तुतारी फुंकते तेथे, माझी गझल निराळी

या मतल्याने त्यांनी आपली गझल सुरू करून पुस्तकाच्या अगदी सुरुवातीलाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उठसूट गझलेचे वाटोळे करत सुटलेल्या बाजारबुणग्यांना खालील शेर बरेच काही सांगून जातो.

शब्दांची गुळणी नोहे, नव्हेच शब्द धुराडा
निद्रिस्थी जागवण्याला, गातो शेर भुपाळी

अस्मानी सुलतानीच्या फेर्‍यांत अडकलेला शेती व्यवसाय अधोरेखीत करताना ते म्हणतात,

अडदांड बेत ओला शिजवून पावसाने
केला शिवार खच्ची भिजवून पावसाने

वातानुकूलित काव्य आणि रणरणत्या उन्हात कष्टकर्‍यांच्या घामातून झरणारे काव्य, इंडिया आणि ग्रामीण भारतातील फरक स्पष्ट करून जाते. हा गझलसंग्रह त्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण वाटतो.

तुझे तडाखे सोसून काया झिजून गेली सुकून गेली
तरी निसर्गा ! कुठे मनाने यत्किंचित मी खचून गेलो ?

अशा या दुर्दम्य इच्छाशक्तीचा आधार घेत गंगाधर मुटेंची गझल उभी राहते आणि ती जगण्याचे बळही निर्माण करते… नव्हे बेसूर जीवनाला सुरात आणते..

वृत्तात चालण्याचे शब्दांस ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले!!

वाह! क्या बात है! 

             खरे तर गंगाधरजींची गझल सर्वच मानवी भावनांना स्पर्श करताना दिसते. त्यांची गझल बेमालूमपणे एखादवेळी गझलप्रांताच्या मूळगावी सुद्धा लाजतमुरडत जाऊन येते आणि हळुवार यौवनसुलभ वंचनांचा ठाव घेते. मग हे वेगळेपणही रसिकमनाचा ठाव घेणारे ठरते. त्यांची प्रेमरसाने ओतप्रोत भरलेली एक गझल मला बरीच भावली…

किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या, तुझे ते बिथरणे वगैरे वगैरे
छुप्या पावलांनी हळुवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

ही गझल शृंगार रसाने ओतप्रोत भरलेली तर आहेच शिवाय ती गंगाधर मुटेंच्या समर्थ लेखणीची साक्ष देणारीही आहे. बहोत बढिया, लाजवाब आणि जबरदस्त गझलियत असलेली गझल म्हणजे ही गझल. त्यानंतरचे शेर तर शायराला शब्दांची पकड मिळाल्याने लाभलेली समाधी अवस्थाच………. अव्वल नंबर गज़ल आहे ही.

ही गझल वाचली की मला हसरत मोहनीच्या गझलेची आठवण होते… उर्दू मराठीची गज़लियत समपातळीवर येत असल्याचे पाहून आनंदही वाटतो. तीच ती गझल जी गुलाम अली ने गायीली. चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है। मधील हा शेर पहा-

खेंच लेना वो तेरा परदे का कोना दफ़तन
और दुपट्टेसे तेरा वो मुँह छुपाना याद है!

       देशाचा पोशिंदा हा राजकारणात चेष्टेचा विषय होवून बसला आहे. शेतकरी संघटनेच्या शरद जोशींनी उभ्या महाराष्ट्रात कुचकामी व्यवस्थेविरुद्ध संघटनेच्या माध्यमातून एल्गार पुकारला तेव्हा मी अंबाजोगाईत महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो. भाईंच्या त्या बोलबाल्याच्या लढ्यात माझ्या सख्या भावाला तेव्हा शिक्षण सोडून स्वतःला झोकून द्यावे लागले होते. त्यांना प्रेरित करणारे आजही त्या सुखद क्षणांना जपतात, हा सत्याच्या जपणुकींसाठीचा आदर्श असावा. माझ्या तरुण मनाला तेव्हा वाटले होते माझा शेतकरी बाप आता युगानुयुगांच्या जोखडातून मुक्त होईल. परंतू दुर्दैवाने तो लढा पुढे कमजोर होत गेला. त्याला बळ देण्याचे काम गंगाधर मुटेंनी गझलेच्या माध्यमातून नक्कीच केले आहे. ही आशा पल्लवित करणारी ‘अन्नधान्य स्वस्त आहे’ ही गझल मनाचा ठाव घेणारी आहे…

कोरडा दुष्काळ तेव्हा पांढरे पक्षी दिसेना
कंच पिकलेल्या सुगीला मात्र त्यांची गस्त आहे!

वाह! किती सुंदर अभिव्यक्ती आणि किती सखोल आशयगर्भता!!

मिर्झा ग़ालिब आणि बहादूर शाह जफ़र यांचे जीवन आणि गझल वेगळे केले जाऊ शकत नाहीत. गझल जगावी लागते तेव्हाच निपजते. गंगाधरजींच्या बाबतीतही ही उक्ती मला योग्य वाटते. ज्यांना मातीच्या कळांची जाण नाही, ते या काळ्या आईवर काय लिहिणार? प्रत्यक्ष राबते हातच राबणार्‍यांच्या जाणिवांची सशक्तपणे अभिव्यक्ती करू शकतात. गंगाधरजींचा हा मतला हे सिद्ध करण्यासाठी स्वयंसिद्ध आहे;

कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे ?

वाह…..!! अगदी साक्षात कास्तकारच ही खंत व्यक्त करू शकतो!

              अण्णा हजारेंनी निर्माण केलेली चळवळ भारतीय इतिहासात सुवर्णअक्षरांनी नक्कीच नोंदवली जाईल. “गोरे गेले काळे आले ! देशाचे वाटोळे झाले !!” असे म्हणत दिल्लीच्या तख्ताला पळताभुई थोडी करणार्‍या या आंदोलनाच्या प्रभावाखाली कोण येणार नाही? गंगाधरजींसारखे व्यक्तिमत्त्व, ज्याला अन्यायाची चीड व चाड आहे, ते तर न आले तर नवलच! त्यांची ‘वादळाची जात अण्णा’ ही गझल म्हणजे ज्वलंत सामाजिक परिस्थितीवर जळजळीत प्रहार करण्याच्या प्रक्रियेतून साकारलेले एक सुंदर शिल्पच जणू-

धर्म सत्तेचा कळेना, का असा सोकावलेला ?
भ्रष्ट नेते मोकळे अन् , कोठडीच्या आंत अण्णा !
* * *
भ्रष्ट आचारास सत्ता, मुख्य झाला स्रोत आहे,
घाव घाला केंद्रस्थानी, एकदा द्या मात अण्णा!
* * *
आस अण्णा श्वास अण्णा, ‘अभय’ तेचा ध्यास अण्णा.
अग्निलाही पोळणार्‍या, वादळाची जात अण्णा !!!!!

गझलेचे एक दिलखुलास रूप म्हणजे हझल. ‘माझी गझल निराळी’ मधील एकूण ६ हझल अतिशय विनोदी तथा हझलविश्वाला समृद्ध करणार्‍या अशाच आहेत. त्यातील मला अतिशय आवडलेले ५ शेर मी इथे मुद्दाम अधोरेखीत करतो आहे-

मारली मी मिठी त्या क्षणी वाटले
शेरणीच्याच जबड्यात गेला ससा
* * *
भोजनाचा लुटा स्वाद पंक्तीमध्ये
अक्षता टाकण्याला असा वा नसा
* * *
करा बंद कानात आकाशवाणी
अरे मच्छरांनो बघा पेंगतो मी
* * *
उगाच पिळतोस रे मिशा तू, कडमडणे हा विकार आहे
तिच्या खुट्याला तुझ्याप्रमाणे, टुकार घोडे हजार आहे
* * *
बघा जरा हो बघा जरासे, कसा भामटा फुगून गेला
मुरूम-गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे..

वाह वा! माझी हझल निराळी !!

         गझलकाराचे व गझलेचे वय जसजसे वाढत जाते तसतसे ते दोघेही तरुण होत जातात असे माझे गुरु तथा सुरेश भटांचे शिष्य आदरणीय प्रा. सतीश देवपूरकर म्हणतात. याचा प्रत्यय हा गझलसंग्रह वाचून येतो. गंगाधर मुटेंची गझल विविध खयालांना एकत्र घेऊन पुढे पुढे अधिकच संपन्न होत गेलेली आहे. गझल निर्मितीत चिंतनाला अतिशय महत्त्व आहे. शिवाय एखाद्या शेराच्या परिपूर्णतेसाठी तास न् तास चालणारा रियाज ही तेवढाच महत्त्वाचा असतो. वृत्तबद्ध रचनांची बांधणी म्हणावी तेवढी सोपी नाही परंतू रियाजाअंती ती सहज साध्य आहे मात्र कमीतकमी शब्दांत दांडगा विचार मांडणे तसे जिकिरीचेच काम आहे. वैचारिक प्रगल्भतेचे प्रतिबिंब तेव्हाच गझलांतून अगदी सहज उतरत जाते, जेव्हा एखादा गझलकार एखाद्या रचनेत रात्रंदिवस अडकून पडतो. दोन मिसरे एका सेकंदातही सुचू शकतात किंवा त्याला दोन दिवसही लागू शकतात. अशावेळी चिंतनाच्या विविधपैलुंची झलक एखाद्या शेरामध्ये एकाचवेळी दिसून येते. गंगाधरजींचा काही गझलांचा या अंगाने विचार केला तर त्यांची वैचारिक ठेवण गझलकार म्हणून प्रथम श्रेणीची वाटते. गझलकार हा प्रथम दर्जाचा विचारवंतही असायलाच हवा. त्यांचा हा मतला आणि काही शेर या बाबीची प्रचिती नक्कीच करून देतात. पाहा

घमासान आधी महायुद्ध होते !!
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते !!

किती सुंदर विचार मात्रांची कसलीही सूट न घेता मांडलेले आहेत! ‘रूप सज्जनांचे’ ही गझल सुद्धा तितकीच नितांत सुंदर झाली आहे. नमुन्यादाखल एक शेर……

लेऊन फार झाले, हे लेप चंदनाचे !!
भाळास लाव माती, संकेत बंधनाचे !!

असे सुंदर शेर सहज साध्य असत नाहीत. यासाठी करावा लागतो तास न् तास रियाज. यासाठी जगावी लागते गझल. याचसाठी शायर लिहीत राहतो तहयात. गझल साधनेत गंगाधरजी कुठेच कमी पडलेले नाहीत हेच यातून स्पष्ट होते.

‘माझी गझल निराळी’ च्या दुसर्‍या आवृत्तीत नवीन दोन गझलांची भर पडत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. ‘टिकले तुफान काही’ आणि ‘अमेठीची शेती’ या दोन्ही गझला परत शेतकर्‍याच्या डोक्यावरील फाटक्या आभाळाची जाणीव करून देतात. खरे आहे आपले, गंगाधरजी, अपूर्णतेची खंत घेऊन पोशिंदा आजही हळहळतो आहे.

ललकारण्या दिशांना, उठले तुफान काही !!
त्यातील फार थोडे, टिकले तुफान काही !!
* * *
निद्रिस्त चेतनेचे, सामर्थ्य जागवाया,
पोटात सागराच्या घुसले तुफान काही !!

                      या दोन्हीही गझलांतील एकूण एक शेर दर्जेदार आहेत. नवचैतन्य जागवणारे आहेत. न्याय्य हक्कांच्या लढ्याची तुतारी फुंकणारे आहेत. पिढ्या न् पिढ्या अंधारात खितपत पडलेल्यांना आशेचा किरण दाखवणारे आहेत. आपल्या लेखणीच्या ताकदीची चुणूक दाखवणारे आहेत. त्याच त्या राजकारणाचा वीट आलेल्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालणार्‍या आहेत. हा गझलसंग्रह वाचून ‘साये में धूप’ या दुष्यंत कुमारांच्या गज़लसंग्रहाची आठवण झाली. त्यांची एक गज़ल गंगाधर मुटेंच्या विचारांशी मिळती जुळती आहे, त्यातील दोन शेर येथे देणे मला क्रमप्राप्त वाटते.

सिर्फ हंगामा खडा करना मेरा मक़सद नही,
मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए ।
* * *
मेरे सीने में नही तो तेरे सीने में सही,
हो कहीं भी आग, लेकीन आग जलनी चाहिए।

               यापुढेही पिढ्यानपिढ्यांच्या अबोल आवाजाला गंगाधरजींनी असेच बोलते करत राहावे. त्यांचे चळवळीतील कार्य यशस्वी व्हावे, यासाठी विधाता त्यांना सर्वतोपरी बळ तथा उदंड आयुष्य देवो हीच सदिच्छा!

गंगाधर मुटे यांना ‘माझी गझल निराळी’ च्या दुसर्‍या आवृत्ती निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !!

                                                                                                                                 – राज पठाण
                                                                                                                          अंबाजोगाई, जि. बीड.
                                                                                                                             दि. ०६ मार्च, २०१४

== ० == ० == ० == ० == ० == == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० ==

’माझी गझल निराळी’ – अभिप्राय : तुषार देसले

मनाला थेट भिडणारी गझल

        “माझी गझल निराळी” हा अत्यंत देखणा,  उत्तम बांधणी,  मांडणी आणि मुखपृष्ठ असलेला हा संग्रह नक्कीच निराळा वाटतो. आपल्या गझलचा मीपण एक फॅन आहे. लगेच वाचून ही टाकला… आजवर मायबोली व फेसबूक-वर आबांकडून नेहमीच तुमच्या गझल व त्याविषयी वाचत होतो.  या गझल  संग्रहातही  नेहमीसारखीच  मनाला थेट भिडणारी  गझल  वाचून  आनंद  वाटला. मला  आपली गझल  का आवडते  हे आबांना  सांगताना  मी  म्हटले  की  “त्यांची गझल ही कल्पनेच्या विश्वात भरकटण्यापेक्षा वास्तव जगण्याचा जो ठाव घेते त्यामुळे ती जास्त भावते. काल जेव्हा मी गझल वाचत होतो तेव्हा हातात पेन्सिल होती आणि  आवडत्या  शेरांवर  टिकमार्क  करत  होतो पण बघता बघता सगळ्या पुस्तकावरच टिकमार्क झालेत….. 
काका, सामान्य कष्टकरी, शेतकरी हा मला जगातला सगळ्यात मोठा सृजक वाटतो. आपल्या रक्तात ती सृजन शिलता आहे. आणि तीच गझलेत उतरली आहे म्हणून गझल जीवंत वाटते. जब गझल का इतिहास लिखा जायेगा……  तेव्हा गझल कल्पनेच्या कोषातून बाहेर काढण्यात आपल्यासारख्या गझलकाराचे योगदान फ़ार मोठे आहे, याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल.  खरं तर मी आत्ताच गझल प्रकाराशी परिचित होतो आहे.  त्यामुळे  माझं  रसग्रहण कदाचित बालिश वाटेलही परंतु आपल्या गझला मला मनापासून आवडल्यात इतकंच!
                                                                                       तुषार देसले
                                                                                  झोडगा (माळेगाव)
== ० == ० == ० == ० == ० == ० ==  == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == 

’माझी गझल निराळी’ – अभिप्राय : प्रमोद गुळवेलकर


 ’माझी गझल निराळी’ – अभिप्राय : प्रमोद गुळवेलकर

                                                                                                       प्रमोद गुळवेलकर
                                                                                                       स्टेट बॅंक ऑफ़ हैदराबाद
                                                                                                       शहाजंग शाखा, औरंगाबाद
                                                                                                       दि : ०२-०२-२०१४
प्रिय श्री गंगाधर मुटे ’अभय’
यांस स. नमस्कार

      आपली दोन्ही पुस्तके दोन दिवसात वाचून काढली. समाधान वाटले.
     गझल संग्रहातील “दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे, कुठे लुप्त झाले फ़ुले-भीम-बापू, ते शिंकले तरीही” या गझल खूप उत्तम झाल्या आहेत. कवीचे तरल संवेदनाक्षम मनाचे प्रतिबिंब या रचनांतून उमटले आहे. “माझी ललाट रेषा, मजला फ़ितूर झाली’ ही एक अप्रतिम गझल.
    पुन:पुन्हा ही गझल वाचतांना कै. सुरेश भटांचा वसा चालवणारा कुणी एक भेटल्याचा आनंद वाटला. तुम्ही भटांची नक्कल करता, असे नव्हे पण त्यांच्या रचना वाचतांना येणार्‍या तरल अनुभूती, मोजक्या शब्दयोजनेतून मिळणारी चपखल अभिव्यक्ती आणि जगावेगळी फ़किरीवृती तुमच्या साहित्यकृतीत सम्यकपणे आढळतात.
तुमचा हात असाच लिहीता राहो, हि सदिच्छा व्यक्त करून हा लेखनप्रपंच थांबवतो.
अमर वांग्याविषयी नंतर लिहीन. औरंगाबादला कधी येणं केलंत तर भेटीमुळे स्नेह वृद्धिंगत होईल.
                                                                                                                            आपला
                                                                                                                    प्रमोद गुळवेलकर
== ० == ० == ० == ० == ० ==  == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० ==