फेसायदान

फेसायदान

आता फेसबुकात्मके देवे । ना वाग्यज्ञे वैतागावे ।
तोषोनि पोस्टीस द्यावे । फेसायदान हे ॥१॥

जे अनेकांप्रती जळे । कळे तरी ते ना वळे ।
तया परस्परांचे लळे । लागावेजी ॥२॥

आयड्यांचे घमेंड जावो । कंपूबाजी अस्त पावो ।
जो जे वांछील तैसा लाहो । प्रतिसादो ॥३॥

तू खाजवी पाठ माझी । मीही खाजवितो मग तुझी
ऐसी सांठगाठ खुजी । जावो लयासी ॥४॥

काव्यत्त्वही जे रसहीन । ललीतही जे तथ्यहीन ।
तरीही रसिक सज्जन । सोयरे होतु ॥५॥

कुणी नर असो वा नारी । नसो तयी लेखणी विखारी ।
अनवरत फबुवरी । नांदो संवादू ॥६॥

चला साहित्यिकांचे गावी । तया ऐकवू कविता काही ।
काव्य आमुचे “रटाळ” नाही । समजाविण्याशी ॥७॥

काही पोस्टी अर्थाविन । हीन भासती सर्वांगिन
जैसी कुणी अलंकारहीन । सुवासिनी ती ॥८॥

काव्य म्हंजे नोय रद्दी । नाकळे जया न चित्तशुद्धी
तयांस द्यावी शुद्धबुद्धी । रे फेसबुक्या ॥९॥

किंबहुना सर्वज्ञानी । ऐसा कोणी स्वत:स मानी ।
पाजीजो तयास पाणी । बुक्कीत एक्या ॥१०॥

आणिक वंगाळ लेखणे । अश्लिल शब्द विशेषणे
योजिल अश्लाघ्य दुषणे । पुच्छ तया फ़ुटावेजी ॥११॥

येथं म्हणे श्रीफेसबुकाय । हा होईल दान अभय।
येणे वरे बुकेफेसाय । नाचते झाले ।।१२।।

– गंगाधर मुटे ‘अभय’
============

मामाच्या पोरींना शिमग्याची भेट!

मामाच्या पोरींना शिमग्याची भेट!

माझ्या मामाला साडेचार पोरी
चार डोमड्या पण एक छोरी गोरी
या छोर्‍यांचं कौतूकं सांगू मी काय
गे माझे शिमगेमाय!

एक नुसताच लंबा बांबू
जणू हाडाचा उभारला तंबू
रक्ता-मासाचा बिल्कूल पत्ताच नाय
गे माझे शिमगेमाय!

एक भलतीच ऐसपैस
जणू पंजाबी मुऱ्हा म्हैस
डोलतडोलत रस्त्यानं चालत जाय
गे माझे शिमगेमाय!

एका रंभेचं रुपडं भालू
दोन्ही गालाचे फ़ुगले आलू
रोज वेणीला लावते हेअरडाय
गे माझे शिमगेमाय!

एक अप्सरा बेलमांजर
हत्ती डोळ्यात काजळाचे थर
पण स्वभाव गरीब गोगलगाय
गे माझे शिमगेमाय!

एक दणकट मल्ल शिपाई
तिला पिसीआर घेण्याची घाई
तिची मस्करी अभय तू करायची नाय
गे माझे शिमगेमाय!

– गंगाधर मुटे ’अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

‘कमल’ ’आप’के ’हाथ’ – विडंबन गीत

‘कमल’ ’आप’के ’हाथ’ – विडंबन गीत

‘आप’ के अडैल रुख पे ’कमल’ जरा मलूल है।
’हाथ’ भी फ़िसल गया तो ’आठ’ की जरूर है॥

खुली खुली ये बात है की उलझा हुआ ये दाव है-२
सोचना ये सोच है की सोच ही पडाव है
अण्णा जिधर गये – २
अण्णा जिधर गये वहॉसे ’लोकपाल’ दूर है
’हाथ’ भी फ़िसल गया तो ’आठ’ की जरूर है॥१॥

झुकी झुकी निगाह में भी है बला की मग्रूरी -२
दबी दबी सी बात मे भी छुपी हुई धुरंधरी
ये पेच दिल्लीका-२
ये पेच दिल्लीका अब बन गया नुपूर है
’हाथ’ भी फ़िसल गया तो ’आठ’ की जरूर है॥२॥

गीत – गंगाधर मुटे
संगीत – अरविंद हर्षवर्धन
गायिका – बि. किरण
फ़िल्म – ’आप’ के हसिन सपने
’दूम दबाके दिल्ली भागी’ प्रॉडक्शन की प्रस्तुती
————————————————————

पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका

पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका

कोण जाणे कोणासंग टाका भिडून व्हता…।
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता… ॥

जवा पाय कसाबचे मुंबईमंधी पडले
“लालबत्ती” वाले तमाम घरामंधी दडले
तवा म्हणान माहा पारा असा काही चढला
दोन ढूशे मारून त्याले तोंडबुचक्या पाडला
पायापोटी तवा कसाब माह्या पडत व्हता… ॥
अन्
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता… ॥

सुराज्याचं सपन जवा शिवाजीले पडलं
इचिबैन तवा मले जाम स्फ़ूरण चढलं
मंग म्हणान माही तलवार अशी काही चालली
एका हिसक्यात सारी सेना धारातिर्थी पाडली
चूलीमागं औरंगजेब जीव लपवत व्हता… ॥
अन्
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता… ॥

रावणानं सीता चोरून लंकेमंधी नेली
तळपायीची आग माह्या मस्तकात गेली
तोडून त्याचे नऊ मुंडके, मी संग घेऊन आलो
पण; तवापासून मीच “अभय” दहातोंड्या झालो
काय करू, काय नाही; मले समजत नाही आता
अन्
सपनातून जाग आली तं घाम फ़ुटून व्हता… ॥

                                                  – गंगाधर मुटे
———————————————————

टुकारघोडे! (हझल)

टुकारघोडे! (हझल)

 उगाच पिळतोस रे मिशा तू, कडमडणे हा विकार आहे
तिच्या खुट्याला तुझ्याप्रमाणे टुकारघोडे हजार आहे

कशी बघा चालते कचेरी, अशी जशी की दुकानदारी
अनाथ सोडून कायद्याला, विधानमंडळ फ़रार आहे

बघा जरा हो बघा जरासे कसा भामटा फ़ुगून गेला
मुरूम-गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे

गमावतो ना कधीच संधी हपापलेला विचित्र प्राणी
डसून लचकेच तोडण्याचा ठरून त्याला ’पगार’ आहे

कुठून आणू नवीन गजरा, दुकान शोधू कुठे नव्याने?
सरून पर्याय सर्व गेले, जुनीच देणी उधार आहे

नकोस मित्रा मला जळू तू, अता न सामान्य राहिलो मी
कितीतरी जाड पुस्तकांचे लिखान माझे तयार आहे

अम्हांस नाही कुठेच सत्ता, कुठेच नाही “अभय” पदांचे
लबाडवंशात जन्म ज्यांचा, तमाम त्यांचा पुढार आहे

                                                    – गंगाधर मुटे
————————————————–

गाणे बदनाम वाले

गाणे बदनाम वाले


कोण्या एका गावामाजी । वार्ता एक मिळाली ताजी ॥
की कोणी साधू बुवा संताजी । गावामध्ये प्रवेशले ॥१॥

वार्ता पसरता सार्‍या नगरी । गोळा होय सभ्य गावकरी ॥
म्हणती घ्यावा सप्ताह तरी । आता सत्संगाचा ॥२॥

त्यात एक सद्‍गृहस्थ । म्हणे होणार जगाचा अस्त॥
भक्तीमार्गे जावे समस्त । मोक्षप्राप्ती मिळविण्या ॥३॥

सल्ला असा ध्यानी भरला । की भक्तीमार्गे गेला तो तरला ॥
नाहीतर नरकामध्ये चरला । भोगवादी जाणावा तो ॥४॥

ठराव केला एकमताने । आणि गाठला स्वर्ग सुताने ॥
मग उभारले शामियाने । व्यासपिठ भव्यही ॥५॥

पारायणाची पाहती वाट । तिथे गर्दी झाली अफ़ाट ॥
पुजेचेही आणिले ताट । पण बुवा काही येईना ॥६॥

मग कुणाला आली शंका । अफ़वेनेही लूटली लंका ॥
त्यातच कोणी पिटवला डंका । की बुवा पळाले रे ॥७॥

एक नास्तिक संधी साधून । बोलून गेला गहिवरून ॥
घेऊ थोडी ’सिरियल’ पाहून । येईस्तोवर बुवाजी ॥८॥

मग वेळ लावियेला सार्थकी । टीव्हीत नाचत होती नर्तकी ॥
तिने वेधिले चित्त सर्व की । तमाम आपुल्याकडे ॥९॥

पारायणास भुलून गेले । नृत्यांगनेस जवळ केले ॥
ठेका धरूनी नाचू लागले । भावविके भक्तही ॥१०॥

आता मुन्नीचे नाम आले । बुवा झेंडूबाम झाले
गाणे बदनाम वाले । भारतभर फ़ेमस झाले ॥११॥

गंगाधर मुटे
………………………………………………………

‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन

‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन

                            श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत,शेगांव येथे बुधवार दिनांक १० नोव्हेंबर २०१० रोजी ‘रानमेवा’ या माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मा. शरद जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले.

                            मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रविभाऊ देवांग, कवी इंद्रजित भालेराव, माजी आमदार मा. वामनराव चटप, माजी आमदार मा. सरोजताई काशीकर आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला अंदाजे दिड लाख शेतकरी उपस्थित होते.

‘रानमेवा’

                      ११२ पृष्ठे असलेल्या ‘रानमेवा’ या कविता संग्रहात कविता, गझल, लावणी, विडंबन, तुंबडीगीत, अंगाईगीत, बालकविता, बडबडगीत, देशभक्तीगीत आणि नागपुरी तडका या काव्यप्रकांरातील रचनांचा समावेश आहे. 
                    ‘रानमेवा’ या कविता संग्रहास शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांची प्रस्तावना लाभली असून श्री वामनराव देशपांडे, श्री डॉ. श्रीकृष्ण राऊत, ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ, श्री मुकुंददादा कर्णिक, श्री गिरीश कुळकर्णी, जयश्री कुळकर्णी-अंबासकर, छाया देसाई, डॉ भारत करडक, अलका काटदरे, स्वप्नाली गुजर आणि श्री अनिल मतिवडे यांचे अभिप्राय लाभले असून पुस्तकाची किंमत रू. ६०/- आहे.

* ‘रानमेवा’ पीडीएफ़ स्वरूपात हवे असल्यास आपला ईमेल पत्ता ranmewa@gmail.com या ईमेलवर पाठवावा.

* पोष्टाने पुस्तक हवे असल्यास कृपया आपला पोस्टाचा पूर्ण पत्ता ranmewa@gmail.com या ईमेलवर किंवा कॅम्पस प्रकाशन, आर्वी छोटी त. हिंगणघाट जि. वर्धा या पोष्टाच्या पत्त्यावर पाठवून मागणी नोंदवावी. 

* मुल्य म.ऑ ने किंवा चेकने पाठवले तरी चालेल. किंवा बॅंक खात्यात जमा करता येऊ शकेल. त्यासाठी संपर्क करावा. 

* मुळ किंमत पाठवावी. पोस्टेज खर्च प्रकाशकाकडे.

‘रानमेवा’ ऑनलाइन स्वरूपात येथे वाचता येईल.

धन्यवाद!

.                                                            आपला स्नेहांकित
.                                                               गंगाधर मुटे
…………………

रानमेवाचे विमोचन करतांना मा. शरद जोशी.


…………………

…………………

sharad joshi

रानमेवाचे प्रकाशन करतांना मा. शरद जोशी.


…………………
Gangadhar Mute

रवि देवांग,शरद जोशी,इंद्रजीत भालेराव,गंगाधर मुटे,अ‍ॅड उमरीकर इत्यादी


…………………..
शरद जोशी

रानमेवाचे प्रकाशन करतांना मा. शरद जोशी.


…………………..
गंगाधर मुटे

थोडा हास्यविनोद.


……………………
गंगाधर मुटे

उपस्थित जनसमुदाय.


…………………..

हव्या कशाला मग सलवारी ?

हव्या कशाला मग सलवारी ?


भरजरी शालू जुनाट झाले
फेकुनी द्या त्या नववारी
कम्फ़रटिबल त्या मस्त बिकिन्या
हव्या कशाला मग सलवारी ?

नको रुढी, रिवाज नको ते
परंपरागत तर नकोच बाई
ढीगभर कपडे वापरल्याने
वाढत गेली महागाई
कराल जर का माझा अनुनय
स्वस्ताई येईल घरोघरी ….!

टकमक बघू द्या बघणार्‍यांना
आपल्या बापाचे काय जाते ?
नेत्रसुख घेऊ द्या घेणार्‍यांना
सुखावू द्या मस्त नयनपाते
टीका करती जुनाट जन ते
नव्या युगाची मी नारी …!

स्तोम कशाला या कपड्यांचे
म्हणोत काही मेले बापडे
जर का असती देवाची इच्छा
जन्मलो नसतो नेसून कपडे ?
स्वस्त बिकिनी मस्त बिकिनी
अभय वापरा घरोघरी …!

                                    गंगाधर मुटे
…………………………………………………………..
(विडंबन)
…………………………………………………………..

पहाटे पहाटे तुला जाग आली

पहाटे पहाटे तुला जाग आली 

पहाटे पहाटे तुला जाग आली
उभी रात्र सारी घोरण्यात गेली…….!!

तुझे घोरणे ते, मला सोसवेना
किती घालू कानी, बोळे ते कळेना
असा राहू दे हात, माझ्या कानाशी …!!

म्हणू घोरणे की, फुस्कारणे याला
कर्कश बेसुरांची, गुंफ़ितेस माला
भिऊनी आलापा, उंदीरे पळाली …!!

जरा तान घे तू, ताण दे घशाला
मग मच्छरदाणी, ऑलाउट कशाला?
फुकटात सारी, मच्छरे पळाली …!!

तुला जाग ना ये, मला झोप ना ये
भगवंत माझा, कसा अंत पाहे
अभय झोप सारी, चकनाचूर झाली …!!

                                      गंगाधर मुटे
…………………………………………………………………. 

(विडंबन)        (कविश्रेष्ठ सुरेश भटांचा क्षमाप्रार्थी) 
………………………………………………………………….