भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा

भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा

              बालपणीच्या अशा फारच कमी आठवणी असतात की ज्या माणसाच्या आयुष्यभर सावलीसारख्या सोबत-सोबत चालतात. जीवनाने कितीही रंग बदललेत, आचार-विचारांच्या संरचनेत कितीही बदल झालेत तरीही त्या आठवणी मात्र वास्तवाचे कायम स्मरण करून देत असतात. एका अर्थाने ह्या आठवणी माणसाला “डोळस दृष्टी” प्राप्त करून देत असतात आणि सामाजिक जीवनमानाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोनही देत असतात.

             माझ्या बालपणीच्या (१९७०-७५) काळात दळणवळणाची साधने एकतर फारसी विकसित झाली नव्हती किंवा ग्रामीण भागापर्यंत पोचलेली तरी नव्हती. एखादी मोटर सायकल जरी गावात आली तरी गावातील लहानसहान पोरं मोटरसायकल मागे धावायचीत. बुजुर्ग मंडळीही घराबाहेर येऊन कुतूहलाने बघायचीत. त्याकाळी गावातले दळवळणाचे सर्वात मोठे विकसित साधन म्हणजे सायकल. सायकलचा वापरही केवळ पुरुषांसाठीच असायचा. पत्नीला सुद्धा सायकलवर बसवणे लाजिरवाणे वाटायचे आणि कुणी जर तसा प्रयत्न केलाच तर ते चेष्टेचा विषय ठरायचे.  ग्रामीण जनतेचे दळणवळणाचे एकमेव साधन म्हणजे रेंगीबैल, छकडा, दमनी वगैरे. गावाला जोडणारे पक्के रस्ते उपलब्ध नसल्याने ग्रामीण माणसांचा संचारही मर्यादित असायचा. पावसाळाभर गावाचा संपूर्ण जगाशीच संपर्क तुटायचा, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.

           इलेक्ट्रिक, टेलिफोन किंवा तत्सम साधने गावात पोचायची होती. टीव्ही, संगणकाचे नामोनिशाण नव्हते. गावात दिसलाच तर एकट-दुकट रेडियो दिसायचा. गावातील एखादा तरुण नोकरी करायला शहरात गेला की शहरातून गावाकडे परतताना हमखास काखेला रेडियो लटकवून आणि रस्त्याने गाणी वाजवतच गावात प्रवेश करायचा. लग्नामध्ये हुंडा म्हणून गोफ, घड्याळ, अंगठी, सायकल आणि रेडियो ही वरपक्षाची सर्वात मोठी मागणी समजली जायची. स्वाभाविकपणे मनोरंजनाची काहीच साधने उपलब्ध नसल्याने पारंपरिक सण साजरे करून त्यातूनच मनोरंजनाची गरज पूर्ण केली जायची.

        जी अवस्था दळणवळण व मनोरंजनाची; तीच वैचारिक देवाणघेवाणीची. सभा, मेळावे, परिसंवाद याचे लोण गावापर्यंत पोचलेच नव्हते. चालायचेत ते केवळ हरिनाम सप्ताह किंवा कीर्तन-प्रवचने.  हरिनाम सप्ताह किंवा कीर्तन-प्रवचने याप्रकारातला सर्वात मोठा दोष असा की हे वनवे ट्रॅफिक असते. त्यात चर्चेला वगैरे काहीच स्थान नसते. एकाने सांगायचे आणि इतरांनी ते भक्तिभावाने श्रवण करायचे. आपल्या सुखद:खांना व्यक्त करण्याचे व्यासपीठच उपलब्ध नसल्याने ग्रामीण जनतेची केवढी घुसमट झाली असावी, याचा अंदाज आता सहज बांधता येऊ शकतो.

       निदान पुरुष मंडळींना मारुतीच्या पारावर किंवा चावडीवर बसून गप्पा तरी करता येत होत्या. भावना व्यक्त करायला संधी मिळत होती, पण महिलांचे काय? त्यांना ना पारावर बसून गप्पा मारण्याची अनुमती, ना सुखदु:खाला व्यक्त करण्यासाठी एखादे व्यासपीठ उपलब्ध. त्यामुळेच महिलाप्रधान सण अतिशय जिव्हाळ्याने साजरे केले जात असावेत आणि त्यानिमित्ताने ग्रामीण महिला मनोरंजन आणि एकीमेकीचे क्षेमकुशल व्यक्त करण्यासाठी अथवा जाणून घेण्यासाठी या सणांचा वापर व्यासपीठासारखा वापर करून घेत असाव्यात.

       अशाच काही महिलाप्रधान सणापैकी भुलाबाईचा उत्सव हा एक सण. आश्विन शु.१० ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंतचा काळ “आश्विनच्या भुलाया” म्हणून साजरा केला जातो. काही भागात याला हादगा म्हटले जाते तर काही भागात भोंडला. या काळात मातीच्या बाहुल्या/भुलाया मांडून दररोज नित्यनेमाने गाणी म्हटली जातात. खिरापत वाटली जाते. जसजसा काळ बदलत गेला तसतसे या सणांचे महत्वही कमी होत गेले.

       पण त्याकाळी छोट्या-छोट्या बालिकांपासून जख्खड म्हातार्‍या महिला सुद्धा यामध्ये गाणी गायनासाठी सहभागी होत असायच्या. त्या पैकी काही गाणी ऐकतांना माझ्या अंगावर काटा उभारायचा. तर काही गाणी ऐकून मन खूप-खूप उदास व्हायचे. काही गाणी मनाला चटका लावून जायची तर काही गाणी ऐकताना कुतूहलमिश्रीत प्रश्नचिह्न निर्माण व्हायचे.

रुणझुण पाखरा जा माझ्या माहेरा
माझ्या का माहेरी सोन्याची पायरी
त्यावरी बसजो शिदोरी सोडजो
माझ्या का मातेला निरोप सांगजो
तुझ्या का लेकीला बहू सासुरवास
होते तर होऊ दे औंदाच्या मास
पुढंदी धाडीन … गायीचे कळप
पुढंदी धाडीन … म्हशीचे कळप

सोन्याचे मंदिर, सोन्याचा कळस या धर्तीवर घराचे छत सोन्याचे असेल तर ते समजण्यासारखे होते, पण घराला चक्क सोन्याची पायरी? उलगडा व्हायचा नाही म्हणून मग खूप कुतूहल वाटायचे.

      भुलाबाईच्या गाण्याला तत्कालीन सामाजिक साहित्याचा आविष्कारच म्हणावे लागेल. साहित्य हा समाजाचा आरसा असतो असे म्हणतात. परंतू थोरा–मोठ्या कवी/लेखकांच्या साहित्यात तत्कालीन वास्तव प्रामाणिकपणे उतरलेलेच नसावे. त्या काळात संतकवी देवास भजण्यात गुंग, त्यांचे बहुतांश काव्यवैभव/प्रतिभा देवाचे गूण गाण्यात खर्ची पडली असावी. कवी हा तर मुळातच कल्पनाविलासात रमणारा प्राणी. वास्तववादी लेखन केले तर आपल्या काव्याला साहित्यिक दर्जा मिळणार नाही, या भयाने पछाडलेला. त्यातल्यात्यात कवी हे बहुतांश पुरूषच. त्यामुळे आपल्या दुखा:ला कोणीच वाली नाही हे बघून महिलांचा कोंडमारा झाला असावा. महिला विश्वाच्या सुखदु:खाचे लेखक, कवी किंवा गीतकारांनी नीट शब्दांकन केले नाही म्हणून आमच्या मायमाउल्या स्वतःच पुढे सरसावल्या असाव्यात आणि कदाचित त्यामुळेच अपरिहार्यपणे महिलांनी प्रस्थापित काव्याला फाटा देऊन स्वतःचे काव्यविश्व स्वतःच तयार केले असावे. कवी, गीतकार आणि संगीतकाराची भूमिका त्यांनीच चोख पार पाडली असावी आणि मग त्यातूनच आकारास आले असावे हादगा, भोंडला, भुलाबाईचे गाणे. या गीतामध्ये साठवलेली आहेत महिलांची अपार दु:खे. प्रकट झाली आहे साताजन्माच्या असहायतेची कारुण्यता. स्पष्टपणे प्रतिबिंबित झाली आहे अबला म्हणून आयुष्य कंठतांना वेळोवेळी झालेली कुचंबणा आणि मिळालेली हीनत्वाची वागणूक. त्यासोबतच अधोरेखित झाली आहे अठराविश्व दारिद्र्य लाभलेल्या संसाराचा गाडा हाकलताना झालेली दमछाक व ससेहोलपट अगदी ठळकपणे.

          वरील गीतात आईच्या घराला सोन्याची पायरी आहे असे म्हटले आहे. मग याला काय म्हणावे? कल्पनाविलास की अतिशयोक्ती? माहेरच्या बढाया की वास्तवता? मला मात्र यामध्ये एक भीषण वास्तविकता दिसते. ती सासुरवासीन जेव्हा सांगावा धाडण्यासाठी त्या पाखराला तिच्या माहेरगावी पाठविण्याचा बेत आखते तेव्हा तिचे माहेरघर पाखराला ओळखता यावे यासाठी तिच्या आईच्या घराची ओळख, खाणाखुणा सांगणे क्रमप्राप्तच ठरते. नेमकी येथेच तिची गोची झाली असावी. तिच्या आईच्या घराचे कवेलू, छप्पर, भिंती आणि दरवाजे हे नक्कीच सांगण्यायोग्य नसावे. खरं आहे ते सांगण्यासारखं नाही आणि खोटंही बोलायचं नाही अशी स्थिती जेव्हा उद्‍भवते तेव्हा अतिशयोक्तिपूर्ण कथन करून वेळ मारून नेणे, हाच तर मनुष्यस्वभाव आहे.  “जेव्हा एखाद्याकडे सांगण्यासारखे काहीच नसते तेव्हा तो बढाईचा आधार घेत असतो” हेच तर त्रिकाल अबाधित शाश्वत सत्य. मग तिने सोन्याची पायरी सांगितली त्याचा वेगळा अर्थ कसा घेणार?

         त्यावरी (पायरीवर) बसजो, शिदोरी सोडजो म्हणजे काय? निरोप घेऊन जाणार्‍या पाखराला सोबत नेलेली शिदोरीच खाण्यास सांगायला ती विसरत नाही. का? उत्तर अगदी सोपे आहे, पाखराला तातडीने जेवायची व्यवस्था आईच्या घरी होऊ शकेल अशी परिस्थिती आईचीही नाही, हे तिला पुरेपूर ठाऊक असावे. तसे नसते तर तिने सोबत शिदोरी कशाला दिली असती? आईचे गाव लांब आहे, तेवढी मजल गाठेपर्यंत रस्त्याने भूक लागेल हा उद्देश असता तर मध्येच वाटेवरच्या एखाद्या विहिरीवर किंवा नदीवर बसून शिदोरी खायला सांगितले असते. आईच्या घरी पोचल्यावर पायरीवर बसून सोबतचीच शिदोरी खावी जेणेकरून पाव्हणा उपाशी नाही याचे समाधान आईला लाभेल व आईकडे पाव्हण्याला तातडीने जेवू घालायची व्यवस्था नसेल तरी तिची या फ़टफ़जितीपासून सुटकाही होईल, असा कयास बांधूनच तिने पाखराला नेमकी सूचना दिली, हे उघड आहे.

           आता हे गीत बघा. या गीतामध्ये एका सुनेला लागलेली माहेरची ओढ आणि सुनेला जर माहेरा जाऊ दिले तर शेतीत कष्ट करणारे दोन हात कमी होतील, या भितीने त्रेधातिरपट उडालेल्या कुटुंबातील उर्वरित सदस्यांची हतबलताच दिसून येत आहे.

           नुकतेच लग्न होऊन सासरला नांदायला आलेल्या सुनेला तिच्या माहेरची आठवण होते, आईच्या आठवणीने जीव व्याकूळ झालेला असतो. तिकडे आईला सुद्धा लेकीची आठवण होऊन गहिवरलेले असते म्हणून मायलेकीची गाठभेठ करून देण्यासाठी बाप लेकीला घेण्यासाठी आलेला असतो. बाप घ्यायला आलेला बघून आनंदाने उल्हसित झालेली सून सासूला हळूच पण भीत-भीत विचारते.

हात जोडूनी पाया पडूनी
सासूबाई मी विनविते तुम्हाला
बावाजी आले घ्यायाला
जाऊ का मी माहेराला, माहेराला?

माहेराला जायची रीतसर परवानगी सूनबाई मागते आहे हे बघून सासू थोडी भांबावते. तिच्या समोर अनेक प्रश्न उभे राहतात. एक तर काहीना काही पैसा लागेलच जो घरात नाहीच. दुसरे असे की शेतीत कष्ट करणारे दोन हात पण कमी होणार. म्हणून ती सुनेला म्हणते.

कारलीचे बी लाव गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा

कारलीच्या बियाणाची लागवड करून माहेराला जाण्याचा सल्ला सुनेला मनोमन पटतो. ती बेगीबेगी लागवड उरकते आणि पुन्हा सासूला विचारते.

कारलीचे बी लावलेजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा

एक वेळ मारून नेता आली. कारलीचे बी लावून झाले पण आता पुढे काय? पुन्हा सासूबाई शक्कल लढवते.

कारलीचा वेल निघू दे गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा

सून पुन्हा काही दिवस कळ काढते, बियाणे अंकुरून वेल निघेपर्यंत बियाला पाणी घालते, वेलीचे संवर्धन करते आणि मग वेल निघालेला बघून पुन्हा एकदा आपल्या सासूला विचारती होते.

कारलीचा वेल निघालाजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा

सासूसमोर पुन्हा तोच यक्षप्रश्न. इकडे आड तिकडे विहीर. नाही म्हणता येत नाही आणि पाठवायला गेले तर संसाराचं अर्थशास्त्र कोसळते. कौटिल्याची अर्थनिती कळायला अर्थतज्ज्ञ किंवा अर्थमंत्रीच लागतो या सुशिक्षित समाजातील गोंडस समजुतीला उभा छेद देणारी एका अशिक्षित सासूची वर्तणूक.  मग तिथून पुढे नवनवीन युक्त्या लढविणे सासूचा नित्यक्रमच बनून जातो.

कारलीला फूल लागू दे गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा

कारलीला फूल लागले की माहेराला जायला मिळणार या आशेने सून मात्र आलेला दिवस पुढे ढकलत असते.

कारलीला फूल लागलेजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा

कारलीचा वेल मांडवावर गेलाय. वेल फुलांनी बहरून गेली. पण नशिबाच्या वेलीला बहर येईल तेव्हा ना.

कारलीला कारले लागू दे गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा

आता प्रतीक्षेची घडी संपली. कारलीला कारले लागलेत. आता तरी परवानगी मिळायला हवी की नाही?

कारलीला कारले लागलेजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा

आता कष्ट फळांस आले. कारली पण कारल्याने लदबदून गेली. पण कारली बाजारात नेऊन विकल्याखेरीज पैसा कसा येणार? म्हणून पुन्हा सासू सुनेला अगदी समजावणीच्या स्वरात सांगते

कारलीला बाजारा जाऊ दे गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा

कारलीला कारले लागलेत, कारली बाजारात गेली. आता मात्र नक्कीच परवानगी मिळणार अशी सुनेला खात्री आहे, म्हणून ती म्हणते

कारली बाजारात गेलीजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा

कारली बाजारात गेली आहे. शेतीत पिकवलेला माल बाजारात जाणे, हा शेतीतील कष्ट फळांस येणारा परमोच्च बिंदू. खरे तर हे गीत यापुढे आनंदाच्या क्षणांकडे वळायला हवे. एवढ्या मेहेनतीने पिकविलेली कारली बाजारात जाणे हा कष्टाचे फळ पदरात पडण्याचा क्षण. शेतकर्‍याच्या घरात लक्ष्मी येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शेतीत घाम गाळून पिकविलेला माल विक्रीस जाणे. माल विकायला बाजाराकडे गेलेला घरधनी घराकडे येताना लक्ष्मी घेऊन परतायला हवा. सोबत काहीना काही भातकं, खाऊ वगैरे आणायला हवा. पण इथून पुढे या गीतात तसे काहीच होत नाही. याउलट गीताच्या याच कडव्यापासून गीत विचित्र वळण घेते. निदान आतापर्यंत तरी कुठलाही खाष्टपणा न दाखविणार्‍या सासूचा स्वभाव इथूनच बदलायला लागतो. आजपर्यंत घरात एकमेकाशी गोडीगुलाबीने वागणारी माणसे आता नैराश्याच्या भावनेतून एकमेकांशी फटकून वागताना दिसत आहे. घरात चिडचीडपणा, उदासीनता वाढीस लागलेली दिसत आहे.

         नेमकं झालंय तरी काय? कारली मातीमोल भावाने तर नाही खपली ना? की कारलीच्या खरेदीला कोणी घेवालच मिळाला नाही? मनुष्यजातीचा स्वभाव त्याच्या आर्थिक स्थितीनुसार बदलत असतो हे समीकरण अर्थतज्ज्ञांच्या अर्थशास्त्रात बसत नसले तरीही तेच सत्य असावे. कारण या गीताचा शेवट नेमके तेच अधोरेखीत करून जातो.

आतातरी आपल्याला माहेराला जायला मिळणार की नाही या विचाराने ग्रस्त झालेली सून परत एकदा सासूला विचारती होते. सासूला खूश करण्यासाठी तिला तिच्या आवडीची कारलीची भाजी करून खाऊ घालते.

कारलीची भाजी केलीजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा

पण आता आर्थिक विवंचनेने ग्रासलेल्या घरातली सारी कहाणीच बदललेली असते. परिस्थितीसमोर निरुत्तर झालेली सासू चक्क सुनेसोबत त्रोटक स्वरूपात बोलायला लागते. तिची भाषा बदलते, भाषेची ढब बदलते आणि शब्दफ़ेकीची तर्‍हाही बदलते.

मला काय पुसते, बरीच दिसते
पूस आपल्या सासर्‍याला, सासर्‍याला

अगं सूनबाई, माझी ना नाही पण एक शब्द मामंजीला पण विचारून घे ना. असे म्हटले असते तर ते समजण्यासारखे होते पण सासूची आता तशी सहज आणि सौदार्हपूर्ण बोलीभाषाच बदललेली दिसत आहे कारण “मला काय पुसते, बरीच दिसते” हे वाक्य वाटते तेवढे सहज नाही. या वाक्यात उद्वेग, उबग, क्लेश, चिडचिड, ग्लानी आणि फ़टकळपणा ठासून भरला आहे.
मात्र तरीही “सासर्‍याकडूनच परवानगी घ्यायची होती तर इतके दिवस तुम्ही कशाला उगीच बहाणे सांगत राहिल्या” असा प्रतीसवाल सून करीत नाही. सासूची इच्छा प्रमाण मानून सून आता सासर्‍याला विचारायला जाते.

मामाजी, मामाजी बाबा आले न्यायाला
जाऊ काजी माहेरा, माहेरा

पण सासरा तरी वेगळं बोलणार? सुनेला माहेरी पाठवायचे म्हणजे निदान तिला जाण्यापुरता तरी घरात पैसा असावा की नाही? नसणारच. म्हणून तर तोही आपल्यावरची जबाबदारी दुसर्‍यावर ढकलून मोकळा होतो.

मला काय पुसते, बरीच दिसते
पूस आपल्या नवर्‍याला, नवर्‍याला

आता शेवटला पर्याय. तिची माहेराला जाण्याची हक्काची मागणी कोणीच समजून घेतली नाही. पण आता परवानगी देण्याचे अधिकार थेट नवर्‍याच्याच हातात आले आहे. तिच्या व्याकुळतेची तीव्रता नवर्‍याला तरी नक्कीच कळलेली असणार, असे तिला वाटते. तिला खात्री आहे की आता नक्कीच जायला मिळणार. बस्स एवढ्याच तर आशेपायी ती नवर्‍याला विचारायला जाते.

स्वामीजी, स्वामीजी बाबा आले न्यायाला
जाऊ काजी माहेरा, माहेरा

पण प्राणप्रियेच्या प्रश्नाला नवरा उत्तरच देत नाही. नवरा काय म्हणतो हे गीतात लिहिलेच नाही. गीताचा दोन ओळीत थेट शेवटच करून टाकला आहे.

”घेतलीय लाठी, हाणलीय पाठी,
तुला मोठं माहेर आठवते, आठवते……!!”

             पीएचडी, डी.लिट मिळवून किंवा वेदपुराण, कुराण, बायबल, कौटिल्य, चाणक्य किंवा हजारो पानांचे अर्थशास्त्राचे पुस्तक वाचूनही जेवढे गाव, गरिबी आणि शेतीचे अर्थशास्त्र समजून घेता येत नाही त्यापेक्षा जास्त वास्तववादी अर्थशास्त्र ह्या एका गीतात सामावले आहे, याची मला खात्री आहे.

                                                                                                                        गंगाधर मुटे

…………………………………………………………………………………………………………………….
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
…………………………………………………………………………………………………………………….

गाय,वाघ आणि स्त्री


गाय,वाघ आणि स्त्री

                     मुंबईच्या अभिव्यक्ती ग्रंथ न्यास या संस्थेतर्फे नुकताच “गझल : सुरेश भटानंतर” हा गझलेचा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. अभिव्यक्ती ग्रंथ न्यास ही समग्र मराठी गझलेच्या उत्कर्षासाठी झटणारी जनमान्यता पावलेली संस्था. कविवर्य स्व. सुरेश भटानंतर जे गझलकार झालेत त्यांच्या निवडक गझलांचा या ग्रंथात समावेश करण्यात आला असून या ग्रंथात माझ्या तीन गझलांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला  आहे. मी गझल लिहायला लागल्यापासून आजपर्यंत काही दिग्गज गझलकारांनी मी गझलेमध्ये जसा आशय व्यक्त करतो, तो गझलियतशी मेळ खात नाही, असे म्हणून माझ्या गझलेला कमी लेखण्याचा जो प्रकार केला, त्या पार्श्वभूमीवर माझ्या गझलांचा या संग्रहात समावेश झाल्याने माझ्या गझलेतील ग्रामीण आशयाला या निमित्ताने जनमान्यतेची अधिकृत पावतीच मिळाली आहे.

                     दोन वर्षापूर्वी मराठी गझल या काव्यप्रकाराशी माझी पहिल्यांदा ओळख झाली. कवितेपेक्षा गझल हा काव्यप्रकार पूर्णपणे भिन्न असतो. लयबद्धता हा गझलेचा प्राण असतो. तंत्रशुद्धतेच्या चौकटी काटेकोरपणे सांभाळूनच गझल जन्माला येते. मुक्तछंद किंवा छंदमुक्ततेला गझलेत काहीही स्थान नसते. वेगवेगळ्या तर्‍हेचे पाचपेक्षा जास्त विषय एकाच रचनेत प्रभावीपणे हाताळण्यासाठी गझलेसारखा दुसरा पर्याय असूच शकत नाही. ह्या गोष्टी माझ्यावर एवढा मोठा प्रभाव पाडून गेल्यात की मला गझल या काव्यप्रकाराचे अक्षरशः वेड लागले आणि मी गझलेच्या प्रेमात पडलो.

                     गझल लिहिणे हे थोडे कलाकुसरीचेच काम असते. काव्य स्फुरले तर कविता लिहिली जाऊ शकते, गझल लिहिली जाऊ शकत नाही. गझल हा तसा कृत्रिमरीत्या काव्य हाताळण्याचा प्रकार आहे. स्फ़ूर्तीमुळे एखाद्या लयबद्ध शेराची किंवा मतल्याची निर्मिती होऊ शकेल; पण उर्वरित चार किंवा त्यापेक्षा जास्त शेर मात्र मतल्यात निश्चित झालेल्या जमिनीला म्हणजे बहर (वृत्त), काफ़िया (यमक)  आणि रदीफ (अंत्ययमक) अनुसरून जाणीवपूर्वकच रचावे लागतात. मी तसा गझलेचा अभ्यासक किंवा फारसा वाचकही नाही; पण ज्या काही गझला माझ्या वाचण्यात आल्या त्यात ग्रामीण सुखदु:खाचे पदर असलेली गझल मला आढळलीच नाही. शेती आणि शेतकरी या शब्दांचा गझलेशी दूरान्वयानेही संबंध मला तेव्हाही आढळला नाही, आजही आढळत नाही. अरबीतून फारसीत व फारसीतून उर्दू भाषेत दाखल झालेला हा काव्यप्रकार आता सर्वच भारतीय भाषांत दाखल होऊ पाहत आहे. मराठी भाषेतही गझल हा काव्यप्रकार बर्‍यापैकी रुजलेला आहे. सर्वसाधारणपणे “शराब आणि शबाब” याविषयाभोवतीच पिंगा घालणार्‍या पारंपरिक गझलेला मराठी गझलेने फाटा देऊन सामाजिक आशयाची झालर दिली असली तरीसुद्धा विशिष्ट साचेबंद आशयाच्या बाहेर पडून मराठी मातीचा सुगंध पुलकित करण्यार्‍या आशयाकडे झेप घ्यायची उत्कंठा मराठी गझलेत अजूनही जागृत झाल्याचे जाणवत नाही. ज्या देशातला बहुसंख्य समाज अनादीकाळापासून शेती याच एकमेव व्यवसायावर गुजराण करीत असला आणि स्वतः अर्धापोटी राहून इतरांना पोटभर जेवू घालत असला तरी शेतीक्षेत्राचे वास्तववादी चित्र प्रतिबिंबित करण्यात जिथे संपूर्ण साहित्यक्षेत्रानेच शेतीक्षेत्राची उपेक्षा केली तिथे नवख्या मराठी गझलेला दोष देण्यात अर्थ नसला तरी या दिशेने पाऊल टाकण्याचे प्रयत्न न होणे, ही मात्र साहित्यक्षेत्राला फारशी शोभादायक बाब खचितच नाही. गझलेला शेतीच्या बांधवर आणून सोडायचे असेल तर त्यासाठी कोणीतरी गझलकार पुढाकार घेईल याची वाट पाहात बसण्यापेक्षा आपणच गझल लिहिण्याचा प्रयत्न का करू नये? अशी माझी भावना झाली आणि मी गझल लिहायचे ठरवले.

                     मी गझल लिहायचे ठरविले तेव्हा तंत्रशुद्धता आत्मसात करणे ही अभ्यासाने साध्य करण्यासारखी बाब आहे, याची मला जाणीव होती. मुख्य प्रश्न होता आशयाचा. आलंकारिक भाषेत शारीरिक प्रेमभाव व्यक्त करण्यासाठी गझल लिहिणे हा माझा प्रांत नव्हता. तरुण, तरुणी, प्रेमरस, प्रेमभंग किंवा तिचा गजरा, तिच्या नजरा, तिचे चालणे, नटकणे, लचकणे, गालात खळी पडणे या विषयावर एवढ्या गझला लिहिल्या गेल्या आहेत की मी आणखी पुन्हा याच विषयावर गझल लिहावी असे मला वाटत नाही. आधीच कुण्यातरी गझलकाराने लिहिलेल्या ओळींची मोडतोड करून किंवा शब्दांची अदलाबदल करून शेर किंवा गझल रचायची आणि ती आपल्या नावावर खपविण्यासाठी लागणार्‍या वृत्तीची माझ्याकडे वानवा आहे. शिवाय शेती आणि ग्रामीण जीवन हाताळता येत नसेल तर गझल लिहायची हौस तरी कशासाठी बाळगायची? हा मला पडलेला प्रश्न.


                     
गझलेतील लयबद्धता, वृत्ताची हाताळणी, यमकाचे नादमाधुर्य आणि एकाच गझलेत पाचपेक्षा जास्त वेगवेगळे विषय हाताळायची संधी, हे गझलेने मला वेड लावण्याचे मुख्य कारण होते. त्यामुळे गझल लिहिण्याचा मोह काही केल्या टाळताही येईना. शेवटी ठरले की आपण जे काही लिहायचे, ते शेतीविषयाला अनुसरूनच लिहायचे. गझलेतील आशयाच्या प्रांतात सुद्धा चिरयौवणी ललनेचे मोहक डोळे किंवा शरीरसौंदर्य प्रकटीत करणार्‍या अवयवाऐवजी आपल्याच शेतातील वांगे, टमाटर, आंबे, चिक्कू, पेरू, गाय, बैल, वासरू इत्यादींना सोबत घेऊन गझलप्रातांत शिरायचे. निर्णय झाला आणि लेखनी उचलली. पहिल्याच प्रयत्नात थोडीशी सूट घेतलेली आनंदकंद या वृत्तातील माझी पहिलीवहिली गझल आकारास आली…. 

गायीस अभय देण्या, वाघास दात नाही
रजनीस जोजवीण्या, सूर्यास हात नाही.

फुलल्या फुलास नाही, थोडी तमा कळींची
एका स्वरात गाणे, साथीत गात नाही.

रंगात तू गुलाबी, रूपात का भुलावे
वांग्या तुझ्या चवीला, मुंगूस खात नाही.

खांद्यास नांगराचा का भार सोसवेना ?
प्राशू नको विषा रे, देहास कात नाही

अभयात वाढलेली, वाचाळ राजसत्ता
राजा पहूडलेला, राजत्व ज्ञात नाही.

                     ही गझल सहा संकेतस्थळावर प्रकाशित केल्यावर रसिकाकडून जोरदार स्वागत झाले. पहिलीच गझलरचना असल्याने कौतुकही झाले पण; दबक्या आवाजात का होईना, भाषाशुद्धता व तंत्रशुद्धतेतील दोन निकष पाळले गेले नसल्याची खंतही व्यक्त झाली. देण्या ऐवजी देण्यास आणि जोजविण्या ऐवजी जोजविण्यास असे असायला हवे होते आणि तसे केले तर वृत्त बिघडणार होते. दुसरा मुख्य नियम असा की, मतल्याच्या किंवा शेराच्या पहिल्या ओळीत विषयाची प्रस्तावना व दुसर्‍या ओळीत पहिल्या ओळीत जी प्रस्तावना व्यक्त झाली असेल तिचा प्रभावी समारोप असायला हवा. शेरातील दोन ओळींचा परस्पर संबंध असायलाच हवा. त्यामुळे 


गायीस अभय देण्या, वाघास दात नाही
रजनीस जोजवीण्या, सूर्यास हात नाही.

                     हा मतला डोक्यावरून डोक्यावरून गेल्याच्या किंवा काहीही अर्थच लागत नसल्याच्या प्रतिक्रिया उमटल्यात. त्या निमित्ताने थोडक्यात या मतल्या मागची पार्श्वभूमी उलगडण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या मते त्या मतल्याचा अर्थ खालीलप्रमाणे असू शकतो.


बाईत आणि गायीत मला नेहमीच एक साम्य आढळत आले आहे.
दोघीही शारीरिक अंगाने अबलाच. स्वबळावर स्वसंरक्षणास असमर्थ.
निसर्गाने सर्व सजीवांना नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत स्वबळावर स्वसंरक्षण करून प्राण वाचविण्यासाठी काही जन्मजात काही ‘हत्यारे आणि ढाली’ दिल्या आहेत.
उदाहरणार्थ, उंदराला बिळात घुसता येते, मांजरीला बिळात घुसता येत नाही त्यामुळे उंदराचे रक्षण होते.
याच अर्थाने मांजरीला भिंतीवर चढता येते, कुत्र्याला भिंतीवर चढता येत नाही.
या झाल्या उंदीर आणि मांजरीच्या स्वसंरक्षणाच्या ढाली.
याच प्रमाणे आपल्या दात आणि नखांचा वापर करून कौशल्याने अन्न मिळविण्यासाठी उपयोग करणे हे झाले उंदराचे हत्यार.
त्याच प्रमाणे मांजर शिकार मिळविण्यासाठी ज्या ज्या अवयवांचा वापर करते ते झाले मांजरीचे हत्यार.
मुद्दा अधिक स्पष्ट होण्यासाठी २-३ उदाहरणे बघूयात.
हरणाला वाघ-सिंहापेक्षा आणि सशाला त्याच्या शत्रूपेक्षा अधिक वेगवान वेगाने पळता येते.
माकडाला झाडावर चढता येते. मोराला बचावापुरते उडता येते.
मुद्दा एवढाच की बचावासाठी सजीवाकडे नैसर्गिकरीत्या हत्यार/ढाल/कौशल्य यापैकी काहीतरी नक्कीच आहे.
मात्र मानव जात आणि त्याचे बहुतेक पाळीव प्राणी यांचेकडे निसर्गत: यापैकी काहीही नाही.
निदान मानवाकडे बुद्धी आणि साधने बनविण्याची कला तरी आहे.
मानवाने बुद्धीचा वापर करून साधने बनविली आणि त्या साधनांचा हत्यारासारखा उपयोग करून संपूर्ण सजीव सृष्टीवर हुकुमत मिळविली. हातात साधन नसेल तर मानवाएवढा दुर्बल कोणीच नाही. विनाहत्याराने मनुष्य साध्या मधमाशीसोबत सुद्धा लढू शकत नाही. साधनविरहीत माणसाला, कावळासुद्धा पराजित करू शकेल.
पण गायीचे काय? गाय पूर्णतः संरक्षणासाठी मानवावर अवलंबून.
कल्पना करा. (कल्पना काय फक्त कवींनीच करायच्या? आणि रसिकांनी फक्त टाळ्या वाजवायच्या?)
कल्पना करा की जर उद्या मानवाला गाय निरूपयोगाची आणि परवडेनाशी वाटली तर माणूस गायीचा त्याग करणार. कारण नकोशा गोष्टीचा बिनदिक्कत त्याग करणे हा मूलभूत मानवी स्वभावच.
गायीवरचे प्रेम, भूतदया वगैरे दिखावाच. जर तसे नसते तर गाय फक्त शेतकर्‍यांच्याच दारात नसती दिसली.
गाय दिसली असती कलेक्टर, मंत्रालय, राजकीय पक्षांची कार्यालये वगैरे ठिकाणी गाय बांधलेली आढळली असती आणि सकाळी उठून कलेक्टर शेण सावडतांना आणि मुख्यमंत्री दूध काढताना आढळले असते.
मग नकोशा गोष्टीचा बिनदिक्कत त्याग करणे हा मूलभूत मानवी स्वभाव असलेल्या माणसाने गायी पाळणे बंद केले तर काय होईल? गायीचे काय होईल?
वाढत्या यांत्रिकीकरणाने बैलांची गरज संपत चाललेली.
दुधाच्या किंमती आवाक्यात आहे तोपर्यंत ग्राहक दूध पिणार.
यदाकदाचित दुधाचे भाव ५०० रु. प्रतीलीटर झालेत तर निव्वळ गायीच्या प्रेमापोटी दूध खरेदी करणार्‍या ग्राहकांची संख्या किती?
जर अशी स्थिती उद्भवली आणि दुधाचा धंदा न परवडणारा झाला तर कोणी कशाला गायी पाळतील? मग अशा विपरीत परिस्थितीत माणूस गायीचा त्याग करणारच.
मग गायीचे काय होईल? कशी जगेल बिचारी?
जंगलात ती शत्रूपासून स्वसंरक्षण करू शकत नाही कारण गायीला ना बिळात घुसता येत, ना झाडावर चढता येत, ना हवेत उडता येत, ना अती वेगाने पळता येत. शत्रुशी दोन हात करायला ना दात ना नखे, ना हत्तीसारखे शक्तिशाली सोंड.
शेपटी आणि शिंगांची ताकत व धार उत्क्रांतीच्या प्रवाहात क्षीण झालेली.
मग ती स्वबचाव कशी करेल?
तेव्हा तिला तिच्या संरक्षणार्थ गरज पडेल एका बलशाली सहकार्‍याची. मग तो सहकारी कोण?
गायीला जेवढे नैसर्गिक शत्रू आहेत त्या सर्वांना पराभूत करून गायीला जीवदान, अभय देण्याची शक्ती केवळ सिंह, वाघापाशीच. सिंह, वाघाशिवाय गायीचे रक्षण कोणीच करू शकत नाही.
आणि नेमकी येथेच बंडी उलार होते.
जो गायीचे रक्षण करू शकतो तोही तिचा शत्रूच.
गाय वाघाकडे अभय मागण्यास गेली तर वाघोबा तिला अभय देण्याऐवजी तिच्यामध्ये आपले खाद्य शोधणार.
भूक शमविण्याची वस्तू या नजरेने पाहणार.
ज्याच्याकडे आश्रयाला जावे तोच काळशत्रू ठरणार.
कारण..
वाघाकडे जे दात आहेत ते गायीला खाण्यासाठीच…
तिचे प्राण वाचवू शकेल, अभय देऊ शकेल, असे दात वाघाजवळ आहेतच कुठे?
ज्याच्याकडून रक्षणाची अपेक्षा केली जाऊ शकते तोच जर भक्षक ठरणार असेल तर………….
म्हणून गाय आणि स्त्री या दोघीत याच अनुषंगाने विचार केला तर दोघींच्याही व्यथा सारख्याच वाटतात मला.

”गायीस अभय देण्या,वाघास दात नाही
रजनीस जोजवीण्या,सूर्यास हात नाही.”

                                                                                                                            – गंगाधर मुटे
—————————————————————————————————

जात्यावरची गाणी

जात्यावरची गाणी

झपाट्याने काळ पालटला आणि जातं, पाटा व वरूटा काळाच्या पडद्या आड गेला. डिझेल-विद्युतवर चालणारी चक्की,पीठ गिरणी आली आणि जात्यावर दळणाची गरजच संपून गेली.
तसा तो काळ फ़ार जुना नाही. अगदी १९८० पर्यंत ग्रामीण भागात दळणासाठी ’जाते’ हेच प्रमुख साधन होते. महिलांच्या कष्टात भर घालणारे पण त्यानिमित्ताने दळतांना ओव्या गाऊन आपल्या मनातल्या भावनांना मोकळी वाट करून देणारे.
जात्यावरच्या गाण्यांना साहित्यिकमूल्य नसेलही पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी ती ही की,
फ़िरत्या जात्याला स्वत:ची अशी एक लय आणि नाद असतो, त्यामुळे कोणतेही गाणे, कोणत्याही चालीत म्हणत दळण दळणे शक्यच नाही. त्यासाठी ठराविक ठेका पकडणारेच शब्दच लागतात. ठराविक घाटणीचेच गीत हवे असते. अशी गीते कवी किंवा गीतकारांनी लिहिली नाहीत म्हणून आमच्या मायमाऊल्या त्यासाठी थांबल्या नाहीत.
कवी, गीतकार आणि संगीतकाराची भूमिका त्यांनीच चोख पार पाडली आणि ……
आणि घराघरात आकारास आले जात्यावरचे गाणे.
काही येथे दिली आहेत, बाकी यथावकाश देण्याचा प्रयत्‍न आहेच.

१) मायबापानं देल्ल्या लेकी,
वाटच्या गोसायाले
नित पलंग बसायाले

२) मायबापानं देल्ल्या लेकी,
नाही पाहिली जागाजुगा
लेक लोटली चंद्रभागा

३) मायबापानं देल्ल्या लेकी,
नाही पाहिले घरदार
वर पाहिला सुंदर

४) आली दिवाळी दसरा,
मी माहेरा जाईन
बंधु-भावाले ओवाळीन

५) माझं जातं पाटा आहे,
जन्माचा इसरा
मला भेटला भाग्यवंत सासरा

(संकलन : गंगाधर मुटे)
…………………………………..

झिलपी बाई झिलपी : भुलाबाईची गाणी

झिलपी बाई झिलपी : भुलाबाईची गाणी

झिलपी बाई झिलपी
झिलपी बसली नाहाले
शंकर गेले पाहाले
असे शंकर भ्याले
फ़ूलं वेचत गेले
फ़ुलात पडली अंबाई
नाव ठेवले भिमाई
भिमाईच्या टोपल्या
ठाई ठाई गुंफ़ल्या
एक ठाई हारपली
मामा घरी सापडली
असे मामा चोर
खिडकी आंबा गोड
खिडकी आंबा कोणाचा
रघुजीच्या राणीचा
रघुजीची राणी
भरत होती पाणी
मागून सुटली वेणी
धावा धावा कोणी
धावन तीचे धनी
धनी गेले ताकाले
इच्चू डसला नाकाले.

(संकलन : गंगाधर मुटे)

भुलाबाईचे सासरे कसे?

भुलाबाईचे सासरे कसे?

भुलाबाई भुलाबाई सासरे कसे गं सासरे कसे?
कचेरीत बसले हे वकील जसे गं वकील जसे

भुलाबाई भुलाबाई सासू कशा गं सासू कशा?
कपाळभर कुंकू पाटलीन जशा गं पाटलीन जशा

भुलाबाई भुलाबाई भासरे कसे गं भासरे कसे?
हातामध्ये घडी मास्तर जसे गं मास्तर जसे

भुलाबाई भुलाबाई जाऊ कशी गं जाऊ कशी?
हातामध्ये लाटणं स्वंयपाकीन जशी गं स्वंयपाकीन जशी

भुलाबाई भुलाबाई दीर कसे गं दीर कसे?
डोळ्यावर गॉगल डॉक्टर जसे गं डॉक्टर जसे

भुलाबाई भुलाबाई नणंद कशी गं नणंद कशी?
हातामध्ये घडी मास्तरीन जशी गं मास्तरीन जशी

भुलाबाई भुलाबाई पती कसे गं पती कसे?
जटातून गंगा वाहे शंकरजी जसे गं शंकरजी जसे

भुलाबाई भुलाबाई आपण कशा गं आपण कशा?
शंकराच्या मांडीवर पार्वती जशा गं पार्वती जशा

भुलाबाई भुलाबाई मुल कसे गं मुल कसे?
वाकडया सोंडाचे गणपती जसे गं गणपती जसे

(संकलन : गंगाधर मुटे)

एकच पापड भाजला : हादग्याची गाणी

एकच पापड भाजला : हादग्याची गाणी

एकच पापड भाजला,भाजला
चुलीमागे ठेविला,ठेविला
सासुबाईने पाहीला,पाहिला
कोरा कागद लिहिला,लिहिला
झुनझुन गाडी जुंतली,जुंतली
त्यात मैना बैसवली,बैसवली
काऊन मैना कोमावली,कोमावली
माहेराला पाठवली,पाठवली.

(संकलन-गंगाधर मुटे)

या या भुलाबाई : हादग्याची गाणी

या या भुलाबाई : हादग्याची गाणी

(१)
या या भुलाबाई, आमच्या आळी,तुमच्या आळी
तुमच्या अंगात हिरवी चोळी
हिरव्या चोळीवर बसला मोर,बसला मोर,
बसल्या मोरावर सांडले दाणे
भुलोजी राणे घरी नाही,घरी नाही.

(२)

या या भुलाबाई, आमच्या आळी,तुमच्या आळी
तुमच्या अंगात लाल चोळी
लाल चोळीवर बसला मोर,बसला मोर,
बसल्या मोरावर सांडला बुक्का
भुलोजी अप्पा घरी नाही,घरी नाही.

(संकलन-गंगाधर मुटे)

कृष्ण घालितो लोळण : हादग्याची गाणी

कृष्ण घालितो लोळण : हादग्याची गाणी

कृष्ण घालितो लोळण
आली यशोदा धावून
काय रे मागतोस बाळा
तुला देते मी आणून

‘आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून’
“असलं रे कसलं बाळा, तुझं जगाच्या वेगळं”

कृष्ण घालितो लोळण
आली यशोदा धावून
काय रे मागतोस बाळा
तुला देते मी आणून

‘आई मला साप दे आणून, त्याचा चाबूक दे करून’
“असलं रे कसलं बाळा, तुझं जगाच्या वेगळं”

कृष्ण घालितो लोळण
आली यशोदा धावून
काय रे मागतोस बाळा
तुला देते मी आणून….

(शिरिष “मायबोलीकर यांचे सौजन्याने)

ऐलमा पैलमा : हादग्याची गाणी

ऐलमा पैलमा : हादग्याची गाणी

ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडूदे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी
पारवत गुंजे गुंजावाणी
गुंजावाणी —च्या सारविल्या टिका
आमच्या गावच्या भुलोजी बायका
एविनी गा तेविनी गा (हे चाल बदलून)
कांदा चिरू बाई तांदूळ घ्या
आमच्या आया, तुमच्या आया
खातील काय दुधोंडे
दुधोंड्याची वाजली टाळी (हे म्हणताना टाळी वाजवायची)
आयुष्य दे रे वनमाळी

माळी गेला शेता भाता
पाऊस पडला येता जाता
पड पड पावसा थेंबोथेंबी
थेंबोथेंबीच्या आडव्या लोंबी
आडव्या लोंबती अंगणा
अंगणा तुझी सात वर्ष
भोंडल्या तुझी बारा वर्ष
अतुल्या मतुल्या
चरणी चातुल्या
चरणीचे धोंडे
हातपाय खणखणीत गोंडे
एकएक गोंडा वीसावीसाचा
सार्‍या नांगर नेसायचा
नेसा ग नेसा बाहुल्यांनो
अडीच वर्ष पावल्यांनो

(शिरीष ‘मायबोलीकर’ यांचे सहकार्याने)

शिवाजी अमुचा राजा : हादग्याची गाणी

शिवाजी अमुचा राजा : हादग्याची गाणी

शिवाजी अमुचा राजा
त्याचा तो तोरणा किल्ला
किल्ल्यामधे सात विहिरी
सात विहिरींमधे एक एक कमळ
एक एक कमळ तोडीले
भवानी मातेला अर्पण केले
भवानी माता प्रसन्न झाली
शिवरायाला तलवार दिली
तलवार… घेऊनी आला…( इथे चाल बदल)
हिंदुंचा राजा तो झाला
हिंदुनी त्याचे स्मरण करावे
हादग्यापुढे गाणे गावें.
……………………………..
(आश्विनी डोंगरे यांचे सहकार्याने.)