अ आ आई

बालकविता

अ आ आई
ब ब बाबा
सी फॉर चाचा
अ‍ॅन्ड डी फॉर दादा

मराठी भाषा अमुची आई
हिंदी-इंग्लिश सिस्टर-ताई
शिकून घेऊ विविध भाषा
सप्त सुरांची जशी सनई

बोर, चिंच, पेरू, आंबे
पितळ, सोने, कथील, तांबे
विविधतेचे दृश्य मनोरम
ज्ञानदीपाची तशी समई

ज्ञान वेचणे कणाकणाने
एकेक पाऊल क्रमाक्रमाने
अर्जन करूया अभय प्रज्ञा
स्वत्व गुणाला करू कल्हई
               
                               – गंगाधर मुटे
————————————

       
मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११ 
     मध्ये प्रकाशित कविता
———————————–

‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन

‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन

                            श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत,शेगांव येथे बुधवार दिनांक १० नोव्हेंबर २०१० रोजी ‘रानमेवा’ या माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मा. शरद जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले.

                            मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रविभाऊ देवांग, कवी इंद्रजित भालेराव, माजी आमदार मा. वामनराव चटप, माजी आमदार मा. सरोजताई काशीकर आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला अंदाजे दिड लाख शेतकरी उपस्थित होते.

‘रानमेवा’

                      ११२ पृष्ठे असलेल्या ‘रानमेवा’ या कविता संग्रहात कविता, गझल, लावणी, विडंबन, तुंबडीगीत, अंगाईगीत, बालकविता, बडबडगीत, देशभक्तीगीत आणि नागपुरी तडका या काव्यप्रकांरातील रचनांचा समावेश आहे. 
                    ‘रानमेवा’ या कविता संग्रहास शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांची प्रस्तावना लाभली असून श्री वामनराव देशपांडे, श्री डॉ. श्रीकृष्ण राऊत, ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ, श्री मुकुंददादा कर्णिक, श्री गिरीश कुळकर्णी, जयश्री कुळकर्णी-अंबासकर, छाया देसाई, डॉ भारत करडक, अलका काटदरे, स्वप्नाली गुजर आणि श्री अनिल मतिवडे यांचे अभिप्राय लाभले असून पुस्तकाची किंमत रू. ६०/- आहे.

* ‘रानमेवा’ पीडीएफ़ स्वरूपात हवे असल्यास आपला ईमेल पत्ता ranmewa@gmail.com या ईमेलवर पाठवावा.

* पोष्टाने पुस्तक हवे असल्यास कृपया आपला पोस्टाचा पूर्ण पत्ता ranmewa@gmail.com या ईमेलवर किंवा कॅम्पस प्रकाशन, आर्वी छोटी त. हिंगणघाट जि. वर्धा या पोष्टाच्या पत्त्यावर पाठवून मागणी नोंदवावी. 

* मुल्य म.ऑ ने किंवा चेकने पाठवले तरी चालेल. किंवा बॅंक खात्यात जमा करता येऊ शकेल. त्यासाठी संपर्क करावा. 

* मुळ किंमत पाठवावी. पोस्टेज खर्च प्रकाशकाकडे.

‘रानमेवा’ ऑनलाइन स्वरूपात येथे वाचता येईल.

धन्यवाद!

.                                                            आपला स्नेहांकित
.                                                               गंगाधर मुटे
…………………

रानमेवाचे विमोचन करतांना मा. शरद जोशी.


…………………

…………………

sharad joshi

रानमेवाचे प्रकाशन करतांना मा. शरद जोशी.


…………………
Gangadhar Mute

रवि देवांग,शरद जोशी,इंद्रजीत भालेराव,गंगाधर मुटे,अ‍ॅड उमरीकर इत्यादी


…………………..
शरद जोशी

रानमेवाचे प्रकाशन करतांना मा. शरद जोशी.


…………………..
गंगाधर मुटे

थोडा हास्यविनोद.


……………………
गंगाधर मुटे

उपस्थित जनसमुदाय.


…………………..

मोरा मोरा नाच रे (बडबडगीत)

मोरा मोरा नाच रे (बडबडगीत)

मोरा मोरा नाच रे
अंकलिपी वाच रे
वाचता वाचता बोल रे
पृथ्वी कशी गोल रे

गोल चेंडू उडला
सूर्यावरती पडला
कान त्याचा कापला
म्हणून सूर्य तापला

ऊन, हवा आणि
गरम झाले पाणी
पाणी गरम झाले
वाफ़ होऊन आले

सोडूनिया धरती
वाफ़ गेली वरती
आभाळात मग
तिचे झाले ढग

ढग वाजे गडगड
वीज चमके कडकड
वारा सुटला सो-सो
पाऊस आला धो-धो

मोरा मोरा नाच रे
श्रावणाचा मास रे
नाचता नाचता सारा
फ़ुलवून दे पिसारा

                  गंगाधर मुटे
……………………………..
(बडबडगीत)

रानमेवा ….!(बालकविता)

रानमेवा खाऊ चला….! (बालकविता)

या झरझर या, जरा भरभर या,
चला रानोमाळी भटकू चला
कुणी अंजीर घ्या, कुणी जांभूळ घ्या,
थोडा रानमेवा खाऊ चला ….॥१॥

ते उंच-उंच दिसते ते, ते फ़ळ ताडाचे आहे
झाडांच्या डोक्यावरूनी, सूर्याचे किरण ते पाहे
कुणी कळवंद खा, कुणी चिक्कू-पेरू खा,
पाणी नारळाचे पिऊ या चला ….॥२॥

ते फ़ुगले डोळे दिसते, ते सीताफळाचे आहे
खोप्यांच्या खिंडीमधुनी, ते चोरुनी पाडस पाहे
कुणी अननस खा, कुणी बोरं-लिंबू खा,
पाड आंबे वेचू या चला ….॥३॥

ही झाडे आहे म्हणुनी, सरसर पाऊस येतो
धरणांचे पोट भरुनी, धरणीला न्हाऊन जातो
कुणी टरबूज खा, कुणी खरबूज खा,
झरा झुळझुळ पाहू चला ….॥४॥

ही झुडपे-झाडे-वल्ली, सजीवांना अभय ती देती
ती सोडती ऑक्सिजनला अन्‍ कार्बन शोषूनी घेती
कुणी कलमा घ्या, कुणी रोपटी घ्या
झाडे घरोघरी लावूया चला ……॥५॥

                                            गंगाधर मुटे
………………………………………………………….
(बालकविता)

चिऊताईची गोष्ट-एक बोधकथा

चिऊताईची गोष्ट-एक बोधकथा

एक होती चिऊ.
एक होता काऊ.
काऊचं घर होतं शेणाचं.
चिऊचं घर होतं मेणाचं.

एकदा काय झालं?
धो – धो पाऊस आला
काऊचं घर वाहून गेलं.
चिऊचं घर राहून गेलं.

मग काऊ गेला चिऊकडे
म्हणाला, चिऊताई-चिऊताई
थोडीशी राहायला जागा देता काय?
चिऊ म्हणाली मलाच पुरत नाही तर
तुला कुठून देऊ?
…………………………………
(मी लहानपणी ऐकलेली ही गोष्ट.)