प्रिय श्री बन्याबापू, रामराम, विनंती विशेष

प्रिय श्री बन्याबापू,

रामराम, विनंती विशेष

         आपले पत्र मिळाले. पत्र वाचून मजकूर कळला. आपण “तुम्ही तुमच्या सगळ्या संस्थळांवर स्वत:चेच कौतुक का करून घेत असता ?” असा प्रश्न विचारला आहे.

 

         बन्याबापू, तुम्ही म्हणता ते खरे आहे पण असे करणे म्हणजे माझ्यातला दुर्गुण किंवा माझा स्वभावदोष नक्कीच नाही. मी लिहितो ते माझ्या स्वतःच्या कौतुकासाठी लिहितच नाही. मला स्वत:ची महतीसुद्धा वाढवून घ्यायची अजिबात हौस नाही. तसे असते तर लोकांना रुचेल आणि आवडेल असे लिहिण्याकडे माझ्या लेखणीचा कल असता. अनेकदा माझ्या लेखनीमुळे मला अनेकांची, वाचकांची आणि साक्षात सत्ताधार्‍यांची नाराजी ओढवून घ्यावी लागते. माझ्या लेखनीमुळे मी मित्रपरिवारात अप्रिय झालो आहे, हेही लक्षात घ्यावे.
         मी लिहितो ते केवळ मला काहीतरी म्हणायचे आहे म्हणून. पिढ्यान्-पिढ्या शेतकर्‍यापर्यंत जो-जो आला तो-तो शेतकर्‍याला सल्ला द्यायला किंवा अक्कल शिकवायलाच आला. एका दाण्यातून हजार दाणे निर्माण करणार्‍याला शुद्र व बेअक्कल गाढव समजून त्याला कोणी बोलुच दिले नाही, त्याचे ऐकण्याची तर गोष्टच दूर…! सर्व मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे शेतीच्या शोषणाची समर्थकच असल्याने त्याला प्रसारमाध्यमात स्थान मिळाले, तेही नगण्यच. पण आता इंटरनेट शेतकर्‍यांचा मदतीला आलंय. या माध्यामाने सर्वांना एक जागतिक दर्जाचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय आणि नेमका ह्याच सुविधेचा फ़ायदा उचलून मी शेतकर्‍यांची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न करतो आहे. शेतीच्या शोषणाच्या व्यवस्थेला झुगारणारा एक विचार रेटतो आहे. स्वाभाविकच हा विचार जास्तीतजास्त वाचकांपर्यत पोचावा, यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करतो आहे आणि असे करणे गैर आहे, असे मला अजिबात वाटत नाही.
         मात्र इतरांच्या लेखांवर/कवितांवर/गझलांवर मी वाचून प्रतिक्रिया देऊ शकत नाही, त्याची खंत मलाही आहे. मात्र सर्वच गोष्टी कधीच मनाजोग्या घडत नाहीत. त्याला अनेकदा नाईलाज असतो. मात्र मला जसजशी संधी मिळेल तसतसा यथावकाश नक्कीच इतरांचे लेखन वाचेन व प्रतिक्रियाही नोंदवेन.

 

         “मी तुझी पाठ खाजवतो, तू माझी पाठ खाजव” या धर्तीवर स्वत:च्या लेखनावर इतरांच्या प्रतिक्रिया मिळाव्या एवढ्याच एका कारणासाठी इतरांच्या लेखनावर प्रतिसाद नोंदवणे सध्यातरी मला शक्य नाही आणि तशी हौस तर नाहीच नाही.

असो. पुढे कधीतरी अधिक विस्ताराने बोलुयात.

कळावे, लोभ असावा, ही विनंती.

आपला नम्र

– गंगाधर मुटे

——————————————————————–

मुख्यमंत्र्यांना पत्र.

मुख्यमंत्र्यांना पत्र.

मा. मुख्यमंत्री
महाराष्ट्र शासन, मुंबई

विषय : शेतातील विजेच्या बिलाची थकबाकी.
संदर्भ : भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे निवडणुकपूर्व जाहीरनामे.
अर्जदार : समस्त शेतकरी, महाराष्ट्र

महोदय,
वरील संदर्भांकित विषयाचे अनुषंगाने महाराष्ट्रातील समस्त शेतकरी आपले लक्ष वेधू इच्छिते की, ज्या शेतकर्‍यांकडे शेतातील मोटारपंपाचे विजेचे बील थकित आहे त्यांच्या शेतातील विद्युत पुरवठा खंडीत करण्यासाठी संबंधित म.रा.वीज वितरण कंपनी मर्या. “महावितरण” कडून वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.
मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपर्यंत, या राज्यातले शेतकरी शेतातील मोटारपंपाची वीजबिले नियमितपणे भरत होते. शेतकर्‍यांनी विजेची बिले माफ करावी किंवा शेतीला फुकट वीज द्यावी अशी मागणीही केलेली नव्हती. असे असतानाही आपल्या पक्षाने आणि आपल्या सहकारी पक्षाने सवंग लोकप्रियतेसाठी व निवडणुकीत भरघोस यश मिळविण्यासाठी पक्षाच्या जाहीरनाम्यात “आमचा पक्ष निवडून आल्यास शेतीस विनामूल्य वीज” देण्याचे जाहीर केले होते.
पण बहुमत मिळून सत्ताप्राप्ती होताच आपला पक्ष आणि आपले सरकार यांनी शब्द फिरवला आणि महाराष्ट्रीय शेतकर्‍यांचा विश्वासघात केला.
उणेपुरे अर्धशतक एवढा प्रदिर्घ काळ सत्तेत असणार्‍या जबाबदार पक्षाने, न पाळता येणारी वचने देणे किंवा दिलेली वचने न पाळणे हे शोभादायक नाही, असे शेतकर्‍यांना वाटत आहे.
दिलेल्या शब्दाला जागून शेतीला मोफत वीज पुरवठा करणे ही शासनाची नैतिक जबाबदारी असून त्यापासून पाठ फिरविण्याची शासनाची विश्वासघाती वृत्ती आणि कृती आम्ही शेतकरी खपवून घेऊ शकत नाही.
तसेही मागील वर्षीपासून शेतावरील मोटारपंप बंदच आहेत. जुलै २०१० पर्यंत विहिरीत पाणीच नव्हते आणि जुलै २०१० नंतर निसर्गानेच एवढा पाऊस दिला की मोटारपंप सुरू करायची गरजच पडली नाही. अतिवृष्टीमुळे आधीच खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. आणि किमान रबी पिके तरी घेऊन नुकसान काही अंशी भरून काढायचे म्हटले तर विद्युत पुरवठा खंडीत करण्यासाठी संबंधित म.रा.वीज वितरण कंपनी मर्या. “महावितरण” कडून वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.

सबब आपण योग्य ती कारवाई करून वीजबीलांचा प्रश्न मार्गी लावाल, हि अपेक्षा.

दिनांक : १५-१०-२०१०                           – समस्त महाराष्ट्रीय शेतकरी

प्रतिलीपी :
मुख्य अभियंता
म.रा.वीज वितरण कंपनी मर्या. “महावितरण”

महोदय, शेतीची वीजबिले भरण्याची जबाबदारी सबंधित शेतकर्‍यांची नसून शासनाची आहे. त्यामुळे वीजबिले शेतकर्‍यांकडे न पाठवता शासनाकडे पाठवावीत. तसेच विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा आततायीपणा करू नये कारण वीजबिले थकली असल्यास त्याचे उत्तरदायित्व शेतकर्‍यांचे नसून शासनाचे आहे, हे लक्षात घ्यावे.

दिनांक : १५-१०-२०१०                           – समस्त महाराष्ट्रीय शेतकरी