ते शिंकले तरीही…..!


ते शिंकले तरीही…..!

आकांत बेदखल का अमुचे जगात होते?
ते शिंकले तरीही चर्चा नभात होते

सोकावलाय येथे काळोख माजलेला
घनघोर रात्र कोठे, कोठे प्रभात होते

का लोळतात पायी सिंहासने तयांच्या?
अद्भुत नवल कसले, त्यांच्या कुळात होते?

आक्रोश शोषितांचे ना उग्र रूप घेते
आक्रंदणे तयांची घरट्यात आत होते

जुळली सतार नव्हती बेसूर जीवनाशी
कसली स्मशानयात्रा तालासुरात होते?

दारिद्र्य पोसताना, गरिबीस राखताना
वाट्यात तज्ज्ञ अभये का एकजात होते?

                                      – गंगाधर मुटे
————————————————
                     पूर्वप्रकाशित गझल
                  
                       मोगरा फ़ुलला
                 ई दीपावली अंक २०११
————————————————

अस्तित्व दान केले – लोकमत दिवाळी अंक

अस्तित्व दान केले – लोकमत दिवाळी अंक २०११

असणेच आज माझे, नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने अस्तित्व दान केले

मस्तीत टाकलेल्या, एकाच पावलाने
पावित्र्य आज माझे, दोलायमान केले

हळवा नकोस होऊ, अश्रू मला म्हणाले
संतप्त हुंदक्यांनी, माझे निदान केले

चंचूप्रवेश ज्यांचा हळुवार पावलांनी
त्या शुभ्र कावळ्यांनी उद्ध्वस्त रान केले

वाचाळ वल्गनांना वैतागलो पुरेसा
कानास वेधणारे, रस्ते किमान केले

इवल्या जगात माझ्या, मी रांगतो अजूनी
निष्कपट भावनेला दैदिप्यमान केले

जळले न रोज जेव्हा, चुल्ह्यातले निखारे
तेव्हा “अभय” भुकेला, धारिष्ट्यवान केले

                                – गंगाधर मुटे
————————————————

              लोकमत दिवाळी विशेषांक
              
             मध्ये प्रकाशीत कविता/ गझल
————————————————

क्षण एक पुरे जगण्यास खरा : पुण्यनगरी दीपावली विशेषांक २०११

क्षण एक पुरे जगण्यास खरा

जगणे कसले शतवर्ष नरा?
क्षण एक पुरे जगण्यास खरा

लपवून व्यथा रडतोय मनी
दिसतोच सदा मुखडा हसरा

जगणेच नको असले तसले
परसात पडून जणू कचरा

मरणास इथे नच घाबरतो
असते जगणेच कठीण जरा

श्रमतो, दमतो, शिणतो पुरता
परिहार जणू जुळता नजरा

दिसतात इथे जन सज्जन हे
अपुलाच स्वभाव नसेल बरा

रुळताच मनी भलतेसलते
पुसतात कशास हवा नवरा

वरदान मिळो “अभया”त जगा
दररोज घरात जणू दसरा

                           – गंगाधर मुटे
———————————-
पुण्यनगरी दीपावली विशेषांक २०११

पुण्यनगरी
प्रकाशित गझल
———————————-
वृत्त : तोटक    रदीफ : गैरमुरद्दफ
———————————-

हात घसरतो आहे


हात घसरतो आहे

अल्याड डोंगर पल्याड खाई, डचमळतो मी मधात आहे
रुतेचना ही नखे कुठेही, सदा घसरतोच हात आहे

कुटाळकीच्या समोर सज्जन समाज सारा हरून गेला
तसाच मीही क्रमाक्रमाने सदैव खातोच मात आहे

बरेच काही लिहून गेलो, कुठे दखल घेतलीय माझी?
जरी तयांनी जरा खरडले, तुफान चर्चा जगात आहे

खुशाल करती टवाळखोरी बघून कोणास पाठमोरा
समोर येता मुखावरी मुख हसून हॅलो प्रघात आहे

किती शहाणे, किती दयाळू, घडीव आहेत राज्यकर्ते
विरोधकांनो बघा जरासे हवेवरी का जकात आहे?

’अभय’ पुन्हा तू नकोच देऊ, तुझे असूदे तुझेच पाशी
मुळीच नाही गरज कुणाला समस्तजन हे सुखात आहे

                                        – गंगाधर मुटे
——————————————————–
                    पूर्वप्रकाशित गझल
                
            मायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११

——————————————————–

चला कॅरावके शिकुया…!

चला कॅरावके शिकुया…!

                         आज ज्या विषयाला मी हात घालतोय, त्याला काय म्हणावे, माझे मलाच कळत नाही. संगीत विषयाचा फ़ारसा अभ्यास नाही, गायनायोग्य आवाज नाही आणि तरीही संगीताच्या एका पैलूचे मुखदर्शन इतरांना करून देण्याचा एक प्रयत्न करतोय. प्रारंभीच एक मुद्दा स्पष्ट करू इच्छितो की, ज्यांना माझ्याएवढी किंवा माझ्यापेक्षा संगीताची अधिक जाण आहे त्यांनी या लेखाच्या अजिबात वाटेला जाऊ नये. मात्र ज्यांनी कॅरावके हा शब्ददेखील अजून ऐकलेला नाही त्यांनी मात्र अवश्य हा लेख वाचावा आणि उदाहरणादाखल जे गीत दिले आहे तेही जरूर ऐकावे.
                         गेली दोन वर्ष आंतरजालावर वावरतांना ठळकपणे माझ्या एक बाब लक्षात आली की, अनेकांकडे सुंदर आणि सुमधूर आवाज आहे. त्यांनी जर कॅरावके तंत्र अवगत केले तर त्यांना संगीताचा अमर्याद आनंद लुटता येऊ शकेल. स्वत:च्या आवाजात अत्युत्तम संगीतसाजासह गाणी रेकॉर्डींग करता येऊ शकेल. स्वत:च स्वत:ची गाणी ऐकून किंवा इतरांना ऐकवून स्वर्णिम आनंदाचे क्षण मिळवता येऊ शकेल.
                          पूर्वीच्या काळी प्रथम गीत लिहिले जायचे. गीतकाराने लिहिलेल्या गीताला त्यानुरूप संगीतकार चाल लावायचेत. लावलेल्या चालीशी सुसंगत वाद्याची निवड करून संगीत दिले जायचे. पण काळानुरूप त्यात बरेच बदल होत गेले आणि बरीच उलटापालट झाली. सर्वप्रथम संगीतकाराच्या डोक्यात घोळत असलेली चाल संगीतबद्ध करून त्या संगीतात आणि चालीत फ़िट बसेल असे गीत गीतकाराने लिहायचे, अशी एक नवी पद्धत विकसीत झाली. कॅरावके प्रकारही काहीसा याच प्रकारात मोडणारा आहे.
                         लोकप्रिय गाण्यांच्या चालींना संगीतबद्ध करून ते प्रथम रेकॉर्डींग केले जाते. त्यानंतर गायकाने संगीतातील रिकाम्या जागा हेरून, त्याला साजेशा स्वरूपात आपला आवाज मिसळून त्यानुरूप गायचे, यालाच कॅरावके तंत्रज्ञान म्हणतात.
                         आजकाल बाजारात बर्‍याचशा गाण्यांच्या कॅरावके सिडी उपलब्ध आहेत. तुमच्या आवडत्या चालीतील कॅरावके संगीत शोधा, थोडेसे परिश्रम घेऊन संगीतामध्ये आपला आवाज मिसळून गाणी म्हणून बघा. आपणही हा प्रयोग अवश्य करून बघाच. आणि संगीताचा आनंद लुटा….!
उदाहरणादाखल मी १९८० च्या सुमारास लिहिलेले
“मना रे” आणि “हे जाणकुमाते” ही दोन भक्तीगीते सिनेसंगीताच्या चालीत साग्र संगीतात गाण्याचा प्रयत्न केलाय.

* * *

हे जाणकुमाते

हे जाणकुमाते, हे जाणकुमाते
तुझ्या दर्शनास मी आलो मा, पुजा घेऊनी
या पामरास दान द्यावे, दर्शन देऊनी ॥धृ०॥

मनमोगर्‍याचे फ़ूल मी हारास आणिले
गुंफ़ूनी भाव भोळा मी चरणी वाहिले ॥१॥

मुर्ती तू साजरीशी, डोळ्यात साठली
स्वप्नात मुर्त आज मी तुझीच पाहिली ॥२॥

येते सदासदा मुखी, तुझेच गूण ते
अरविंदही मनोमनी, तुलाच गाईते ॥३॥

                             – गंगाधर मुटे “अरविंद”
——————————————
ऐकण्यासाठी क्लिक करा
——————————————

मना रे मना रे….!

मना रे मना रे, नको आडराना
जाऊ सोडोनी सतमार्गा ॥धृ०॥

घर तुझे नाशिवंत असे हे रे
आशा मनिषा काम क्रोध सोयरे हे
देह हा जाईल, आत्मा हा राहिल
असे तुझा कोठे वास रे ॥१॥

तुझे हाती जीवनाची नाव ह्या रे
तोलुनिया संयमाने हाकार रे
भरतीही येईल, ओहोटीही जाईल
आला भोग संयमाने भोग रे ॥२॥

वासनेच्या आहारी तू जाऊ नको
पाप भरले जहर तू पिऊ नको
संग असा घेई जो, मोक्षपदा नेई जो
“अरविंदा” चढवी तू साज रे ॥३॥

                              – गंगाधर मुटे “अरविंद”
——————————————
ऐकण्यासाठी क्लिक करा
——————————————
       पूर्वप्रकाशित लेख

दीपज्योती ई-दीपावली अंक २०११
————————————-

अ आ आई

बालकविता

अ आ आई
ब ब बाबा
सी फॉर चाचा
अ‍ॅन्ड डी फॉर दादा

मराठी भाषा अमुची आई
हिंदी-इंग्लिश सिस्टर-ताई
शिकून घेऊ विविध भाषा
सप्त सुरांची जशी सनई

बोर, चिंच, पेरू, आंबे
पितळ, सोने, कथील, तांबे
विविधतेचे दृश्य मनोरम
ज्ञानदीपाची तशी समई

ज्ञान वेचणे कणाकणाने
एकेक पाऊल क्रमाक्रमाने
अर्जन करूया अभय प्रज्ञा
स्वत्व गुणाला करू कल्हई
               
                               – गंगाधर मुटे
————————————

       
मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११ 
     मध्ये प्रकाशित कविता
———————————–