फेसायदान

फेसायदान

आता फेसबुकात्मके देवे । ना वाग्यज्ञे वैतागावे ।
तोषोनि पोस्टीस द्यावे । फेसायदान हे ॥१॥

जे अनेकांप्रती जळे । कळे तरी ते ना वळे ।
तया परस्परांचे लळे । लागावेजी ॥२॥

आयड्यांचे घमेंड जावो । कंपूबाजी अस्त पावो ।
जो जे वांछील तैसा लाहो । प्रतिसादो ॥३॥

तू खाजवी पाठ माझी । मीही खाजवितो मग तुझी
ऐसी सांठगाठ खुजी । जावो लयासी ॥४॥

काव्यत्त्वही जे रसहीन । ललीतही जे तथ्यहीन ।
तरीही रसिक सज्जन । सोयरे होतु ॥५॥

कुणी नर असो वा नारी । नसो तयी लेखणी विखारी ।
अनवरत फबुवरी । नांदो संवादू ॥६॥

चला साहित्यिकांचे गावी । तया ऐकवू कविता काही ।
काव्य आमुचे “रटाळ” नाही । समजाविण्याशी ॥७॥

काही पोस्टी अर्थाविन । हीन भासती सर्वांगिन
जैसी कुणी अलंकारहीन । सुवासिनी ती ॥८॥

काव्य म्हंजे नोय रद्दी । नाकळे जया न चित्तशुद्धी
तयांस द्यावी शुद्धबुद्धी । रे फेसबुक्या ॥९॥

किंबहुना सर्वज्ञानी । ऐसा कोणी स्वत:स मानी ।
पाजीजो तयास पाणी । बुक्कीत एक्या ॥१०॥

आणिक वंगाळ लेखणे । अश्लिल शब्द विशेषणे
योजिल अश्लाघ्य दुषणे । पुच्छ तया फ़ुटावेजी ॥११॥

येथं म्हणे श्रीफेसबुकाय । हा होईल दान अभय।
येणे वरे बुकेफेसाय । नाचते झाले ।।१२।।

– गंगाधर मुटे ‘अभय’
============

ये तू मैदानात : शेतकरी गीत

ये तू मैदानात : शेतकरी गीत 

ये तू मैदानात, ये तू मैदानात
ये तू मैदानात, पाईका ये तू मैदानात
काळ्या आईचा एल्गार
बिगूल फुंकण्या हो तय्यार
उलवून फेकू गुलाम बेड्या
जगण्या स्वातंत्र्यात
जगण्या स्वातंत्र्यात, जगण्या स्वातंत्र्यात
जगण्या स्वातंत्र्यात, पाईका ये तू मैदानात ||धृ||

गोरे गेले, काळे आले
शस्त्राचे रंगांतर झाले
काळी आई खितपत पडली
विझल्या अंधारात
विझल्या अंधारात, विझल्या अंधारात
विझल्या अंधारात तेवण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात, तेवण्या ये तू मैदानात ||१||

झोन बंदी, निर्यातबंदी
साठेबंदी, प्रदेशबंदी
आयातीचा दोर खेचतो
कंठाचा गळफास
कंठाचा गळफास, कंठाचा गळफास
कंठाचा गळफास सोडण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात, सोडण्या ये तू मैदानात ||२||

हात बांधती, पाय बांधती
डोळ्यावरती टाय बांधती
आणिक म्हणती स्पर्धा कर तू
विद्वानांची जात
विद्वानांची जात, ‘ती’ विद्वानांची जात
‘ती’ विद्वानांची जात ठेचण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात, ठेचण्या ये तू मैदानात ||३||

शेतीला गिळणार कायदे
हिरवळीला पिळणार वायदे
सुगीशिखरावर श्वापदं झाली
नांगी रोवून स्वार
नांगी रोवून स्वार, नांगी रोवून स्वार
सरावलेली नांगी चेचण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात, चेचण्या ये तू मैदानात ||४||

रणकंदनाची हाळी आली
नीजप्रहरावर पहाट झाली
दे ललकारी अभय पाईका
हाती घेत मशाल
हाती घेत मशाल, हाती घेत मशाल
मशाल हाती घेत झुंजण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात झुंजण्या, ये तू मैदानात ||५||

– गंगाधर मुटे ’ अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हे काव्यफ़ूल युगात्म्याच्या चरणी वाहून शेतकरी संघटनेला अर्पण करून दिलेल्या वचनमुक्तीतून उतराई होण्याचा प्रयत्न.
संदर्भ >>> http://www.baliraja.com/node/986 “हतबल झाली प्रतिभा”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

झाडावर पाखरू बसलं : लावणी

झाडावर पाखरू बसलं : लावणी

पाडाशी आला आंबा बघुनी
आभाळ खुदू खुदू हसलं
चोच टोचण्यास पोपट बघतंय
टक लावून एकतार टपलं
कुणी तरी याssss गं
पोपट धराssss गं
माझ्या धीराचं अवसान खचलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं …||धृ||

आडून येती, झाडून येती
चहुबाजूला थवेच दिसती
लगट करुनी झोंबाझोंबी
पानाच्या आडोशाला धसती
चोचटोचुनी चोची चरती
माझ्या फळांची खादल करती
कुणी तरी याssss गं
अलग कराssss गं
माझं काळीज चोळीत थिजलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं …||१||

कलम लावली, खतपाणी दिधलं
कुंपण करुनी जिवापाड जपलं
कुणी ना आलं, पाणी घालाया
खतं टाकाया, कुणी न दिसलं
बहर बघुनी, लाळ गाळती
ताव माराया, अभय चळती
कुणी तरी याssss गं
गोफण धराssss गं
कच्च्या आंब्याला लई बाई पिडलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं …||२||

                  – गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अभिमानाने बोल : जय विदर्भ!

अभिमानाने बोल : जय विदर्भ!

या मातीचा सवंगडी तू
अभिमानाने बोल
ही धनश्री माझी, वनश्री माझी
अन वैदर्भीय भूगोल
तू अभिमानाने बोल
तू अभिमानाने बोल पाईका
वैदर्भीय भूगोल
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!

तूर, कपाशी, धान, हरबरा
ज्वारी, सोयाबीन
जांभूळ, केळी, पपई, संत्री
रास पिके अनगीन
सुजलाम सुफलाम
शस्य शामलाम
द्रुमफ़लही अनमोल
तू अभिमानाने बोल
तू अभिमानाने बोल पाईका
द्रुमफ़लही अनमोल
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!

बावनकशीचा साग इथे
कानन नृपती वाघ इथे
कोकीळ, पोपट, मोर, काजवे
दिव्यफ़णीचा नाग इथे
सप्तसुरांचे नाद बोलती
ताशा नगारा ढोल
तू अभिमानाने बोल
तू अभिमानाने बोल पाईका
ताशा नगारा ढोल
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!

निसर्गराणी, खनिज खाणी
भुईगर्भाला अविरत पाणी
नयन मनोहर अभय अरण्य
वन्य जीवांची मंजूळ वाणी
या मातीला, जनजीवनाला
मानवतेची ओल
तू अभिमानाने बोल
तू अभिमानाने बोल पाईका
मानवतेची ओल
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!

– गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

परतून ये तू घरी

परतून ये तू घरी

मेघ गुंजले, पवन रुंजले
आतूर झाल्या सरी
राजसा! परतून ये तू घरी॥

सूर्य, तारका, क्षितिज झाकले
किर्र ढगांनी गगन वाकले
गडगड होता बुरुजाभवती
धडधड भरली उरी
राजसा! परतून ये तू घरी॥

नाग, चिचुंद्री बिळात घुसले
पक्षी पिंपळावरती बसले
कडकडता बघ वीज नभाला
थरथरले गिरी-दरी
राजसा! परतून ये तू घरी॥

शिवार भिजले, तरूवर निजले
अश्रू पिऊनी बुबुळं थिजले
हिरमुसले बघ गायवासरू
अन् गहिवरली ओसरी
राजसा! परतून ये तू घरी॥

– गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

॥सांगा तुकारामा : अभंग-४॥

॥सांगा तुकारामा : अभंग-४॥

 

धाडा तुकोराया । विठूला सांगावा ।
मायेचा कांगावा । उतू आला ॥१॥

नासले सकळ । तन मन धन ।
मिथ्या जन गण । वेढीयले ॥२॥

विलासी लोळती । द्रव्याचे सोयरे ।
अनाठायी मरे । कामनिष्ठी ॥३॥

विव्देषाचा डोंब । कैसा परतावा ।
स्नेहाचा ओलावा । क्षीण झाला ॥४॥

वैष्णवाचे चित्त । झुंडीची मुसंडी ।
सावजाला धुंडी । मिथ्यावादी ॥५॥

नाही उपवासी । नाही एकादशी ।
अभय द्वादशी । सोडियेली ॥६॥

– गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१८/०७/२०१६

॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

 

सांग तुकोराया तुझा । विठू कुठे मेला? ।
कर्जापायी भक्त त्याचा । स्मशानात गेला ॥धृo॥

पुजा, अर्चा, भक्तिभाव । आरतीचे ताट ॥
सर्वकाळ सत्संगाची । सोडली ना वाट ॥
तरी का रे अल्पायुषी । श्वास बंद केला ॥१॥

जित्रुपाचा दोर हाती । ओठी विठू नाम ॥
रात्रंदिन पाण्यावाणी । गाळलाय घाम ॥
तरी का रे चोपडला । कुंकवाने शेला ॥२॥

तुझा देव, धर्म तुझा । शोषकांचा साथी ॥
घोर, दु:ख, हीनता, गरिबी । पोशिंद्याचे माथी ॥
कळेना अभय कैसा । विठूचा झमेला ॥३॥

– गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(१७/०७/२०१६)

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो…!!

शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्‍याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो…!!

शेतकर्‍याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्‍याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो…!!

शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्‍याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो…!!

शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्‍याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्‍याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय….!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय….!!!

                     – गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 

 

खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल

हसण्यात जन्म घ्यावा उरकून माणसाने
प्रज्ञा, कला, प्रितीवर भाळून माणसाने

दोन्ही मुठी रिकाम्या घेऊन जन्म-मृत्यू
तृप्तीसवे करावा हनिमून माणसाने

रागिष्ट रागिणीला देऊन सोडचिठ्ठी
शांतीसही बघावे बिलगून माणसाने

माया, तृषा, मनीषा नेईल आडमार्गा
लागू नयेच नादी उमजून माणसाने

करपाश घट्ट द्याया अथवा विलीन व्हाया
सुमतीस वश करावे रिझवून माणसाने

आसक्त कामिनीची छाया पडू न द्यावी
दीप्तीसमेत ज्योती विझवून माणसाने

रति, काम, मोह, मत्सर वरचढ-अभय न व्हावे
मुक्तीकडे निघावे हरखून माणसाने

– गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(मराठी मातीला खट्याळरसाचे वावगे नाही. नास्तिकांना आवडेल अशी भाषाशैली वापरून आस्तिकभाव त्यांचेपर्यंत पोचवण्यासाठी संतांनी खट्याळरसाचा उपयोग खुबीने केलेला आहे. त्याचे पुरावे संतसाहित्यात सापडतात. गझल या विदेशीसंस्कृतीचा पदर लाभलेल्या काव्यप्रकाराला मराठी मातीचा सुगंध देण्याचा हा एक प्रयत्न.)

मामाच्या पोरींना शिमग्याची भेट!

मामाच्या पोरींना शिमग्याची भेट!

माझ्या मामाला साडेचार पोरी
चार डोमड्या पण एक छोरी गोरी
या छोर्‍यांचं कौतूकं सांगू मी काय
गे माझे शिमगेमाय!

एक नुसताच लंबा बांबू
जणू हाडाचा उभारला तंबू
रक्ता-मासाचा बिल्कूल पत्ताच नाय
गे माझे शिमगेमाय!

एक भलतीच ऐसपैस
जणू पंजाबी मुऱ्हा म्हैस
डोलतडोलत रस्त्यानं चालत जाय
गे माझे शिमगेमाय!

एका रंभेचं रुपडं भालू
दोन्ही गालाचे फ़ुगले आलू
रोज वेणीला लावते हेअरडाय
गे माझे शिमगेमाय!

एक अप्सरा बेलमांजर
हत्ती डोळ्यात काजळाचे थर
पण स्वभाव गरीब गोगलगाय
गे माझे शिमगेमाय!

एक दणकट मल्ल शिपाई
तिला पिसीआर घेण्याची घाई
तिची मस्करी अभय तू करायची नाय
गे माझे शिमगेमाय!

– गंगाधर मुटे ’अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~