गंधवार्ता….. एका प्रेताची!
Category करुणरस
गंधवार्ता
गंधवार्ता
दोर गळ्यात लटकवून
बाप झुलतोय झाडावर
माय निपचित पडलीय
हृदय फाटता धरतीवर
बाळ खिदळतंय मनीसंगे
मिशा तिच्या धरता-धरता
नाही जराही त्याला
कसलीsssच गंधवार्ता
गंगाधर मुटे
………… **………….. **………….
आता काही देणे घेणे उरले नाही
आता काही देणे घेणे उरले नाही
१) तृप्ततेची चमक
तुझ्यात मी? की माझ्यात तू? नाही माहीत
तरीपण आपले छानपैकी यमक जुळत आहे
दिले फ़ाटक्या हातांनी तुला मी… तेवढ्यानेच
तृप्ततेची चमक तुझ्या नजरेत खेळत आहे
जिथे झालेय मीलन मनाचे मनाशी
तिथे रूप-स्वरूपाला काही अर्थ उरले नाही
हे नाशवंत काये..! मला तुझ्याशी
आता काही देणे घेणे उरले नाही…..!!
***
२) मर्यादा सहनशीलतेची
तू “काय रे” म्हणालास, मी “नमस्कार” म्हणालो
तू “चिमटा” घेतलास, मी “आभार” म्हणालो
तू “डिवचत” राहिलास, मी ”हसत” राहिलो
तू “फाडत” राहिलास, मी “झाकत” राहिलो
माझी सोशिकता संपायला आली.. पण
मर्कटचाळे, तुझे काही सरले नाही
बस कर मित्रा, हा घे शेवटचा रामराम माझा
तुझे-माझे… आता काही… देणे घेणे…. उरले नाही
***
३) आत्मप्रौढी
मी फ़ूले मागितली, तू काटे दिलेस
फ़ुंकरी ऐवजी धपाटे दिलेस
तुझ्या पौरुषी अहंकारात
माझे अस्तित्वच नाकारले गेले
तुझ्या आत्मप्रौढी समोर
माझे आत्मक्लेश पुरले नाही
म्हणून मलाही तुझ्या अहंमन्यतेशी
आता काही देणे घेणे उरले नाही…..!!
***
४) फ़टाकडी
तू आलीस आणि घुसलीस
हृदयाची सारी दारे ओलांडून
थेट ……. हृदयाच्या केंद्रस्थानी
तू असतेस….. तेंव्हा तू असतेस
तू नसतेस….. तेंव्हाही तूच असतेस
मला कसे एकटे म्हणुन सोडतच नाहीस तू
त्यामुळे.. हो त्याचमुळे…..”त्या फ़टाकडीशी”
माझे आता, काही देणे घेणे उरले नाही…..!!
***
५ ) हे मृत्यो..!
जगायचे होते ते जगून झाले
करायचे होते ते करून झाले
द्यायचे होते ते देऊन झाले
घ्यायचे होते ते घेऊन झाले….!
हे मृत्यो..! तुला यायचे असेल तर ये
कधीही…..; तुझ्या सवडीने
तुला टाळावे असे आता कारण उरले नाही
आता काही देणे घेणे उरले नाही…..!!
६) आयुष्याची दोरी
आयुष्याच्या दोरीची अंतिम किनार
माझी मला दिसायला लागली
जीव घाबरा अन् नाडी मंदावून
श्वासेही घरघरायला लागली
बराच पुढे निघून आलोय मी आता
रामनाम सत्याशिवाय काही उरले नाही
मोह,माया; मद,हेवा; काम-क्रोध यांचेशी
मला आता काही देणे घेणे उरले नाही
गंगाधर मुटे
………………………………………………….
मी गेल्यावर ….?
मी गेल्यावर ….?
मी गेल्यावर माझे कोण, कशाला गुण गाईन?
मी तरी जातांना कुणास काय देऊन जाईन?
जरी माझी कातडी जाड असेल गेंड्यासारखी
पण तिची चप्पल बनते ना खेटर
केसापासून ना वारवत, ना चर्हाट
ना उब देणारं स्वेटर.
मी कसा कुणाच्या चिरकाल स्मरणात राहीन?
हाडेही माझी कणखर आहेत खरी
पण आयुर्वेदात उपयोग शून्य
मी मात्र मिरवत आलो
देहाचे लावण्य
स्वर्गवाले मजकडे का आतुरतेने पाहीन?
नसलो काही देणार तरी जातांना
नवमण लाकडांची राख आणि
आणखी प्रदूषित करणार
हवा आणि पाणी
जीवेभावे का कोणीतरी श्रद्धांजली वाहीन?
हसू फ़ुलवलं नाहीच आजवर
कधी कुणाच्या चेहर्यावर
मात्र नुसतच रडवणार
जातांना-गेल्यावर
स्वयंप्रेरणेने कोण मग खांद्यावर घेईन?
केले असतील सत्कर्म
पण असतील दोन-चार
तेवढ्याने थोडंच उघडणार
स्वर्गाचं दार
काहीतरी कर अभय
जेणेकरून मुक्तिमार्ग जरा सुलभ होईन…!
गंगाधर मुटे
………… **………….. **………….
हताश औदुंबर
हताश औदुंबर
ऐल तीरावर लाल शिरावर,लुकलुकता घेऊन
निळा पांढरा थवा चालला, रजःकण पांघरून
ढोलं-चौघडे, बोल बडबडे, खाकी गर्दी पुढे
सरावल्यांची पोपटपंची, गगन भेदुनी उडे
पैल तीरावर पत्र घरावर, तुळशीचे ठेवून
बेत शिजविला,देह निजविला, काळघुटी घेऊन
अभागीनीचे कुंकूम पुसता, अचेतन ती पडे
पोशिंद्याचा बाळ भुकेला, तिच्या उराशी दडे
दोन तीरांना अभये धारा, विलगे निरंतर
पाने गाळुनी मुंडण करितो, हताश औदुंबर
गंगाधर मुटे
………… **………….. **………….**…….
(“त्या” सर्व हजारो स्वर्गिय शेतकर्यांना
भावपुर्ण श्रद्दांजलीसह सादर समर्पित.)
……………………………………………..
आईचं छप्पर
कडाक्यात भांडतात
मेघ गडगड करून
भरून येते नभाला
अश्रू ढाळते वरूण …!
अश्रू बनती गारा
वादळ तांडव करी
गारठल्या हवेसवे
विजेस हिंव भरी …!
हिंव भरल्या विजेस
ताप चढवी गारा
तिला पांघराया
छप्पर नेतो वारा …!
छप्पर उडल्या संसारात
ब्रह्मपुत्रा वाहते
तेल मिरची शिदकुट
पाण्यावरती पोहते ….!
पोहतांना पुस्तक वही
सरस्वती भिजते
माती करून जीवाची
चूल उल्हे निजते ….!
गरजत्या पावसात
चोळी झबले न्हाती
पदराखाली लेकरं
कवटाळती छाती ….!
गंगाधर मुटे
………… **………….. **………….**…….
औंदाचा पाऊस
औंदाचा पाऊस
सायबीन झालं पोटलोड, पराटी केविलवाणी
कोमात गेलं शिवार सारं, व्वा रे पाऊसपाणी ……!!
उन्हाळवाही-जांभूळवाही, शेती केली सुधारीत
बी-बेनं खत-दवाई, बीटी आणली उधारीत
नवं ज्ञान, नवं तंत्र, उदीम केला पुरा
पावसाच्या उघाडीनं, स्वप्न झालं चुरा
खंगून गेली कपाशी, बोंड बोरावाणी ……!!
बेनारचा बाबू म्हणे कापूस नाही बरा
औंदा पेर सायबीन, बरकत येईन घरा
नाही उतारा तिलेबी, खासर उलार होते
रोग झाला गेरवा,एकरी दीड पोते
बिनपाणी हजामत, चीत चारखानी ……!!
सायबाचं दप्तर म्हणते, पीक सोळा आणे
अक्कल नाही तूले म्हून, भरले नाही दाणे
विहिरीत नाही पाझर, नयनी मात्र झरे
किसाना परीस कईपट, चिमण्या-पाखरं बरे
भकास झालं गावकूस, दिशा वंगळवाणी …..!!
गंगाधर मुटे
………… **………….. **………….**…….
ढोबळमानाने शब्दार्थ :
पोटलोड = जमिनीतील अपुऱ्या ओलाव्यामुळे
दाण्याची पूर्ण वाढ होण्यापूर्वीच शेंग पक्व होणे.
पराटी = पऱ्हांटी,कपाशीचे झाड.
बेनार = कृषी विषयक सल्ला देणारा शासकीय विभाग
खासर = बंडी, शेतीमाल वाहतुकीसाठी बैल
जुंपून वापरावयाचे साधन.
गेरवा = तांबेरा नावाचा रोग, झाडाची पूर्ण वाढ न
होता पिक कापणीला येते.
खासर उलार होणे = लाक्षणिक अर्थाने व्यवस्था
कोलमडणे. घडी विस्कटणे
……………………………………………..
शल्य एका कवीचे
शल्य एका कवीचे
तो कवी! शब्दप्रभू, अद्भुत प्रतिभाधनी
ओघवती, रसाळ, सोज्वळ त्याची काव्यवाणी……!
कैक संग्रह छापून त्याने, खपविले रातोरात
रसिक समग्र, काव्यात त्याच्या, चिंब-चिंब न्हात
आवेशाने करी वाचन, उधळीत काव्यफुले
हेलाविती तनू-मने, वृद्ध, तरुण, सानुले
शासनाने केला त्याचा, सत्कार शालपांघरी
समीक्षक म्हणती “असा न् होणे” कवी जन्मांतरी
प्रेमरसावर वाहे त्याची, अखंड काव्य सरिता
प्रेमी युगुले रंगून गाती, त्याच्या प्रणयकविता
परी हृदयी शल्य एकची, कायम ही छलना
जीवनी त्याच्या, बनुनी प्रेमिका, ना ये कुणी ललना
“लाख दिलांच्या गळीचा ताईत” मिरवे बिरुदावली
गळात त्याच्या अजुनी नव्हती, एक वारू गावली
सांजसकाळी, ऐन दुपारी, ठाके ना त्याचे चित्त
खाण्यापिण्याशी मन लागेना, एवढ्याची निमित्त
जलात हलते पाय सोडूनी, गावी प्रेम गाणी
कधी येशील गे! रूपमोहिनी मम हृदयराणी
नित्य नेमाने असेच स्वप्न, उघड्या डोळ्या पडे
दचकणे, नेत्र मिचकने, क्षणाक्षणाला घडे
वर्षामागुनी अशीच वर्षे, वर्षे उलटली बारा
अढळ, निश्चल, अचल राहिला, सोसुनी ऊन वारा
प्रेमाराधना, त्याची अर्चना, आसमंता कळाली
प्रेम देवता प्रसन्न झाली, तपश्चर्या फळाली
एक दिवस टक लावूनी, होता क्षितिजाकडे
दूरवर दिसली, एक कामिनी, येत त्याच्याकडे
त्याचे हृदय हलले, अंतरंग फुलले, आली एक झुरझुरी
शहारले अंग, उठले तरंग, रसनाही थरथरली
पाहता अवखळ चंचला, जसा कनक कुंचला, काळीजा रूतला, तीर आरंपार
वाहता खळखळ झरा, जशी भोवळ गरगरा, येतसे तरतरा, झुळूक थंडगार
आजवर जी स्वप्नी नटली
मनःचक्षू जीस्तव झटली
ती हीच स्वप्नीची ज्वाला, जिवलग मंदारबाला
हुरूप असा की आला, मग बोलीला गहीवरुनी
मग उठती स्फूर्ती तरंग
त्या अद्भुत प्रतिभेसंग
प्रकटती इंद्रछटांचे रंग
त्याच्या वाणीमधुनी
हे सुंदरी, मदन मंजिरी, कपोल अंजिरी, अधर अंगुरी, अतिसुकुमार
चंचल नयना, मंजुळ मैना, कोकिळ गहिना, प्रीती ऐना, नासिका चिरंदार
रूप साजिरे, मुख गोजिरे, लावण्य लाजिरे, तारुण्य माजिरे, चालणे ठसकेबाज
जशी उमलली,चाफ्याची कली,झुलती रानवली,अल्लड सुकमली,मुसमुसता साज
देवे घडवली, मूर्त मढवली
साजे चढविली, सृष्टीच्या अमोल तारा
स्वप्न साकारा, आले आकारा
दे तू होकारा, होशील का अर्धांगी दारा?
रसभरी मस्केगिरी ऐकुनी, प्रिया ती हसली
जळात हलते पाय सोडूनी, पाषाणी बसली
मग हळूच वदली, अती मंद-मंद मृदुभाषी
जसे रुणझुण पैंजण की, गुणगुणती मधमाशी
तुम्ही घातले साकडे, बोलुनी बोल धाकडे
मनही आल्हादले गडे, पण बोलू कशी खोटी?
माझ्या रूपाचा रंग भिन्न, चिंता घोर चित्त विषण्ण,
कसा व्हावा प्रेमरंग मान्य व्याकुळल्या पोटी?
गडे स्वीकारू कसा? तवं प्रीतीचा वसा
तन्मयतेने असा? फुकाच्या शब्दे
बापू, माई आणिक भाऊ तान्हुला
सृष्टीचे अघटित चक्र, बापूला आले अंधत्व
आई पांगळी, दिले नियतीने मला पालकत्व
प्रश्न तोलाचा, लाख मोलाचा, उदरभरणाचा
घोट दुधाचा, ओठ तान्ह्याचा, सवाल जीवनमरणाचा
घरी उपाशी बसली सारी, रस्त्याला टक लावूनी
म्हटले “येते तान्हुल्या, थोडा दूधभात घेवूनी”
पदरी नाही अडकू-खडकू, कसे आणावे दूध कुठूनी?
तुम्ही माझा वेळ दवडला, तुमच्या कविता ऐकवूनी
उत्तम आहे तुमच्या कविता, मनही मस्त रमले
पण पोटातील काहूर माझ्या, जराही न् शमले
‘येत्ते मी आत्ता’ म्हणुनी, गेली निघूनिया तरतरा
ठेवूनी त्याच्या हातावरती, बेरंगी मोतीतुरा
शोधीत आहे, तो वेडा बापडा, अजुनी प्रेम छाया
अभय रसिकहो, तुम्हांस दिसली, कुठे ती नयन मोहिनी,
द्यावा निरोप तिजला, तो कविराजा, वाट पाहतोय अजुनी……!
गंगाधर मुटे
* * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * **
घायाळ पाखरांस
गंगाधर मुटे