पैसा व विज्ञान हेच सर्वस्व नाही – भाग १२

“आयुष्याच्या रेशीमवाटा” : भाग १२
पैसा व विज्ञान हेच सर्वस्व नाही
       आज रोजी आपण एका विचित्र वळणावर उभे आहोत. तुलनाच करायची झाली तर आपण आदिमानवापेक्षाही आदिमानव झालेलो आहोत, असे म्हणण्याइतपत वेळ आली आहे. साधन निर्मितेची कला अवगत होण्यापूर्वीचा आदिमानव जसा गुहेत दडून बसायचा तसेच आज आपण आपापल्या गुहेत बसलेलो आहोत. आपल्याकडे एसी, फ्रीज, कूलर वगैरे असूनही त्याचा यथेच्छ उपभोग घेण्यास असमर्थ आहोत. अनेक वर्षातील अथक संशोधनानंतर निर्माण केलेली यांत्रिक साधने आपल्यापासून काही अंतरावर एकाजागी स्थितप्रज्ञासारखी स्थिर झालेली आहेत. एका करोना नावाच्या सूक्ष्म विषाणूमुळे आपली जीवनशैली एकाच दिवसात पार बदलून गेली आहे. ऐहिक आणि आत्मिक सुखविलासासाठी मनुष्याने तंत्र आणि यंत्राच्या बळावर ज्या रेशीमवाटा तयार केल्या होत्या त्याच वाटा आज  निष्प्रभ झाल्या सारख्या दिसत आहेत.
एकाच वादळाने उद्ध्वस्त पार केले
आयुष्य हे नव्याने रचणे कठीण झाले
        करोना संकट अभूतपूर्व असले तरी मनुष्य प्राण्यासाठी अगदीच नवखे नाही. उत्क्रांतीच्या अनेक टप्प्यावर अनेक संकटे आलेली आहेत. अनेकदा होत्याचे नव्हते झालेले आहे. पण तरीही मनुष्यप्राणी टिकून आहे, टिकूनच राहणार आहे कारण गरजेनुसार स्वतःला बदलण्याची लवचिकता व त्यानुसार आयुष्याच्या नव्या रेशीमवाटा नव्याने निर्माण करण्याची अद्भुतशक्ती मनुष्यजातीकडे आहे. सध्या लॉकडाऊन मुळे जिथला मनुष्य तिथेच थांबला आहे. ज्यांचे स्वगृही परतण्याचे सर्व यांत्रिक मार्ग बंद झाले होते त्यांनी ३००-४०० किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन आपले उद्दिष्ट गाठण्याची दुर्दम्य इच्छाशक्तीही या काळात दाखवली आहे. हेच मनुष्याचे असली स्वरूप आहे ज्या आधाराने अगम्य परिस्थितीवर मात करत उत्क्रांती सदैव दोन पावले पुढेच गेलेली आहे.
      जेव्हा जेव्हा देशावर राष्ट्रीय संकट कोसळते तेव्हा तेव्हा त्याचे चटके सरसकट सर्वांनाच बसत असतात. कदाचित कुणाला जास्त तर कदाचित कुणाला तुलनेने कमी. पण या चटक्यातून कुणीच सुटत नाही. अनेक लोकांची जीवनशैली अशी असते की त्याला जेवण आणि चहा सुद्धा बाहेर जाऊन घ्यावा लागतो. त्याच्या स्वतःच्या खोलीमध्ये स्वयंपाकाची भांडी तर सोडा पण साधी पिण्याचे पाणी साठवण्यासाठी बादली सुद्धा नसते. आज या दीर्घ लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात त्यांची काय स्थिती असेल, याची कल्पना करणे सुद्धा अंगाचा थरकाप उडवणारे ठरत आहे. अनेकांना दिवसभरातून एकदा तरी जेवण कसे मिळवावे असा प्रश्न पडला असेल. दारात यंत्र सामुग्री व खिशात पैसा असूनही अनेक लोक पुरते हतबल झालेले असतील पण अशा बिकट स्थितीशी सुद्धा  मनुष्य लीलया जुळवून घेतो, हेच तर मनुष्याचे खरेखुरे बलस्थान आहे.
        लॉकडाऊन नसलेल्या काळातील एक मजेदार अनुभव सांगतो. गोष्ट आहे याच वर्षीच्या होळीच्या दिवशीची. मला मीटिंगसाठी औरंगाबादला जायचे होते. रात्रीच्या बसने जायचे, सकाळी पोचायचे आणि रात्रीच्या बसने परतायचे असा साधासुधा बेत असल्याने सोबत छोटीशी बॅग घेतली ज्यात शाल, ब्लॅंकेट, चादर वगैरे काहीही नव्हते. मीटिंग आटोपून रात्री ज्या बसने परतायचे होते, ती बस धूळवड असल्याने ऐनवेळी रद्द झाली होती. शेवटी रात्री १० वाजताची एक नॉन एसी बस मिळाली. बसमध्ये बसलो आणि अचानक थंडी वाजायला सुरुवात झाली. मलेरियाचा ताप येतो तशी कडाक्याची थंडी व हुडहुडी भरायला लागली. तातडीने डॉक्टर किंवा निदान पॅरासिटोमॉलच्या गोळ्या आणि एका ब्लॅंकेटची आवश्यकता होती. पण रंगपंचमीचा दिवस असल्याने पूर्ण मार्केटच बंद असल्याने काहीही उपलब्ध झाले नाही.
        खिशात पैसे आहेत. देशात डॉक्टर भरपूर आहेत. औषधांनी व ब्लॅंकेटनी दुकाने खचाखच भरलेली आहे, असे अर्थशास्त्र व व्यापारशास्त्र कितीही सांगत असले व ते शंभरटक्के खरेही असले तरी त्याही पेक्षा प्रसंगानुरूप व गरजेनुसार काय उपलब्ध होऊ शकते, हेच सर्वात जास्त महत्त्वाचे असते. तंत्रविज्ञान कितीही प्रगत असले आणि गाठीशी भरपूर संपत्ती असली की सर्वच प्रश्न चुटकीसरशी सुटतात, असेही नसते.
शेवटी काय तर ना मिळाली गोळी, ना मिळाली शाल, ना मिळाले ब्लॅंकेट, ना मिळाली चादर. थंडी आणि हुडहुडी पासून बचावासाठी रात्रभर २००० व ५०० च्या नोटाच पांघरून प्रवास करावा लागला.
– गंगाधर मुटे, आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन “आयुष्याच्या रेशीमवाटा”
भाग १२ – दि. ११ एप्रिल, २०२० – “पैसा व विज्ञान हेच सर्वस्व नाही”

==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी Fingure-Right http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========

रेशीमवाटा

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s