करोना चालेल; एचआयव्ही नक्कोच! – भाग ९

“आयुष्याच्या रेशीमवाटा” : भाग ९
करोना चालेल; एचआयव्ही नक्कोच!

सध्या जगभर करोना विषाणूने थैमान घातल्याने पूर्ण जग धास्तावलेले आहे. जनमानस दहशतीखाली आलेले आहे. पण मी मात्र ठामपणे सांगू शकतो की, भारत नावाचा देश करोना नावाच्या विषाणूला अजिबात घाबरलेला नाही आणि घाबरणार नाही. भारतातील माणसे मरणाला भीत नाहीत. ‘देह नश्वर आणि आत्मा अमर’ ही संतांची शिकवण भारतीय जनमानसावर अजूनही प्रचंड प्रभाव टाकून असल्याने भारतीय माणसे मरणाला भीत नाहीत, अशी प्रचिती आपल्याला क्षणोक्षणी येत असते.
रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे, सिग्नल तोडू नये, पुरेशी जागा मिळाल्याशिवाय ओव्हरटेक करू नये, वळणदार घाटाच्या रस्त्यातून वाहनाचा वेग कमी करावा, डोक्यात हेल्मेट घालावे इतके साधे नियम पाळण्यासाठीसुद्धा कायदा करून लोकांना दंडात्मक कारवाईची भीती दाखवावी लागते. भारतीय मनुष्य दंडाच्या भीतीने नियम पाळायला तयार होतो, पण मरणाच्या भीतीने तो नियम पाळायला अजिबात तयार नसतो. जेव्हा एखादी व्यक्ती मरणासन्न अवस्थेत पोचते, तेव्हा मरणाच्या भीतीने ती व्यक्ती कधीच कावरीबावरी होत नाही आणि ढसढसा रडतही नाही. अशा क्षणी त्याचे आप्त रडवेले होतात, पण जो मरतो तो मात्र निश्चिंत असतो आणि निश्चिंत मनाने मरणाला सामोरा जातो.
मनुष्य मरणाला घाबरत नाही, पण स्वतःच्या अब्रूला प्रचंड घाबरतो. अब्रू वाचवून आत्मसन्मान जोपासणे त्याचे हेच सर्वस्व आणि आयुष्याचे सार असते. रस्त्याने चालताना पाय घसरून पडला तर तो सर्वात आधी स्वतःची मान ३६० अंशांत फिरवून आपल्याकडे कुणाचे लक्ष तर नाही ना, याचा शोध घेतो. कुठे लागले, पाणी पितोस का, असे लोक त्याला विचारतात, पण पडलेला मनुष्य आपल्याला कुठे काही मार लागला का, हे शोधण्याऐवजी आपल्याला पडताना कुणीकुणी पाहिले, याचा शोध आधी घेत असतो.
मनुष्य मरणाला घाबरत नाही म्हणून रोगालाही घाबरत नाही. परिसर स्वच्छ ठेवा, पाणी उकळून प्या, जेवणाआधी हात स्वच्छ करा, इतकेसुद्धा त्याला जबराईने सांगावे लागते. पण काही रोग मात्र असे आहेत की त्याला तो प्रचंड घाबरतो. उदाहरण म्हणून गजकर्ण, टीबी आणि एड्स या व्याधींची नावे घेता येईल. गजकर्ण, खाज, खरूज झाकून ठेवण्याचा लोकं जीवापाड प्रयत्न करतात. टीबीचा पेशंट ‘मला टीबी झाला’ हे सांगायला संकोचतो व त्याऐवजी दुसऱ्या कुठल्यातरी रोगाचे नाव सांगतो. याउलट हृदयविकार, कॅन्सरचे पेशंट ‘मला हृदयविकाराचा त्रास आहे’ असे इतक्या सहज आविर्भावात सांगतात की जणू काही त्याला त्याचा प्रचंड अभिमान आहे.
एड्सबद्दल समाजामध्ये इतके समज-गैरसमज पसरवले गेले आहेत की, एचआयव्हीची बाधा केवळ अनैतिक संबंधातूनच होते असा सार्वत्रिक समज रूढ झाला आहे. त्यामुळे समाज संबंधित व्यक्तीकडे संशयित नजरेने बघतो आणि त्याच्या चारित्र्याला संशयाच्या भोवऱ्यात उभे करतो. वस्तुतः एड्सचा संसर्ग होण्याचे अनैतिक संबंध हेच एकमेव कारण अजिबात नाही. याव्यतिरिक्त अनेक कारणे आजही जाणकारांना माहीत आहेत आणि भविष्यात आणखी शेकडो कारणे सापडतील, पण एड्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी उतावीळपणाच्या जाहिरातबाजीचा एवढा अतिरेक झाला की एचआयव्हीची बाधा केवळ असुरक्षित शरीर संबंधामुळेच होते, असाच सामान्य जनतेमध्ये संदेश गेला.
चारित्र्यसंपन्न व्यक्तीलादेखील चुकीच्या उपचार पद्धतीने किंवा अन्य अनेक कारणामुळे एचआयव्हीचा संसर्ग होऊ शकतो, हे बोललेच गेले नाही. या चुकीच्या जाहिरात पद्धतीचा इतका विपरीत परिणाम समाजावर झाला की, आता एड्स हा शब्दच अश्लील समजून त्या शब्दाचा उच्चारदेखील कुणी खुलेआम न करता लपूनछपून करतात. त्यामुळे आपल्याला असा काही संसर्ग झाला तर आपल्याकडे संशयित नजरेने बघितले जाईल आणि आपण आयुष्यभर मिळवलेला आत्मसन्मान एका झटक्यात धुळीस मिळेल; इतकेच नव्हे तर मरणोपरांतदेखील आपल्याकडे अनादरानेच बघितले जाईल अशा अदृश्य भीतीने लोक धास्तावून आहेत, हे शतप्रतिशत खरे आहे.
जगणे कसले शतवर्ष नरा?
क्षण एक पुरे जगण्यास खरा
मरणास इथे नच घाबरतो
असते जगणेच कठीण जरा
दोन दिवस जगावे पण आत्मसन्मान राखूनच जगावे, हीच भारतीयांच्या जीवनशैलीची रेशीमवाट असल्याने ‘करोनाने तत्काळ मरण हवे की एड्ससहीत शंभर वर्षांचे दीर्घ आयुष्य हवे’ असा जर यमराजाने एखाद्यासमोर पर्याय ठेवून पर्याय निवडायला सांगितला, तर भारतीय मनुष्य एका क्षणाचा विलंब न लावता उत्तरेल. की… ‘करोना चालेल पण एचआयव्ही नको रे बाबा!’
– गंगाधर मुटे आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन “आयुष्याच्या रेशीमवाटा”
भाग ९ – दि. २१ मार्च, २०२० – “करोना चालेल; एचआयव्ही नक्कोच!”

==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी  http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s